• Register

मृत माणसाच्या दहाव्याच्या पिंडाला कावळा न शिवल्यास धर्मशास्त्राप्रमाणे अन्य उपाय कोणता?

1,442 views
हिंदू धर्मियात मनुष्य मृत झाल्यास आत्मा दहा दिवसांपर्यंत पृथ्वीतलावरच घुटमळत असतो, त्याला मुक्ति मिळत नाही, म्हणून दहाव्या दिवशी विधी करतात. विधी करतांना भाताचे तीन गोळे करतात त्याला पिंड म्हणतात. श्रद्धेप्रमाणे या पिंडाला कावळा शिवल्यास मृत माणसाची कांहीही इच्छा राहिलेली नाही असे समजतात आणि आत्मा संतुष्ट झाल्याने त्याला मुक्ति मिळते आणि तो आपल्या पुढील प्रवासाला लागतो असा समज आहे.

परंतु कांही वेळेस कावळा अजिबात शिवत नाही, अशावेळेस काय करावे, म्हणजे आत्मा मुक्त होईल?
asked Jun 29, 2014 in Hindu - Beliefs by TransLiteral (9,280 points)

1 Answer

+1 vote
माणसाच्या मृत्युनंतर जे विधी करतात, त्यांपैकी महत्वाचा विधी म्हणजे दहाव्या दिवसाचा विधी. हिंदूधर्मशास्त्राप्रमाणे मृत्युनंतर दहा दिवस आत्मा पृथ्वीतलावर वास करतो. दहावा विधी केल्यानंतर त्याच्या इच्छा तृप्त न राहिल्यास त्याला मुक्ति मिळत नाही. इच्छा राहिल्या नसल्यास दहाव्याच्या भाताच्या पिंडाला कावळा शिवल्यास मुक्ति मिळते, कारण कावळ्याच्या रूपात आत्मा असतो असे समजतात. परंतु कधीकधी कावळा शिवत नाही अशा वेळेस ब्राह्मण दर्भाचा कावळा करतो आणि तो शिवायला लावतो.

त्याची कथा अशी -

एकदा राम वनवासात आरामात झोपला असतांना तेथे एक कावळा येतो आणि तो सीतेला त्रास देत असतो. कांही केल्या तो तिचा पिच्छा सोडत नाही. तेव्हा त्रासून सीता रामाला उठवते आणि कावळा कसा त्रास देतो ते सांगते. त्यावेळेस रामाकडे धनुष्यबाण नसते, म्हणून तो जवळच पडलेली एक गवताची काडी मंत्रून कावळावर फेकतो, तर ती काडी ( ज्याला दर्भ म्हणतात ) कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध घेते आणि कावळा एका डोळ्याने आंधळा होतो म्हणून त्याला ' एकाक्ष 'म्हणतात.

त्याच वेळेस सीता त्याला शाप देते की तू एकाक्ष असल्याने तुला सर्वजण अशुभ मानतील, तेव्हा कावळा गयावया करून उःशाप मागतो तेव्हा त्याची दया येऊन सीता त्याला उःशाप देते की, मनुष्य मृत झाल्यावर त्याच्या दहाव्याच्या पिंडाला तू स्पर्श केल्याशिवाय तो आत्मा मुक्त होणार नाही. आणि शिवाय ही दर्भाची काडी सुद्धां त्यावेळेस उपयोगी पडेल.
answered Jun 30, 2014 by TransLiteral (9,280 points)
...