शुकाष्टक - श्लोक ८

श्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.


कस्त्वं कोऽहं किमपि च भवान् कोऽयमत्र प्रपंचः ।

स्वसंवेद्यं गगनसदृशं पूर्णतत्त्वप्रकाशं ।

आनंदाख्ये समरघनेबाह्यर्केऽतर्विहीने ।

निस्त्रैगुण्ये पथि विचरतां को विधिः को निषेधः ॥८॥

मी कवणु कवणाचा । एकदेशी कैचाः । माझिया मीपणाचा । निर्वाहो कोठें ॥२५॥

दृढता जो मीपणा । तेथें ठावो केला तूं पणा । मीतूपणाचा वाहाणा । प्रपंच भासे ॥२६॥

ज्या प्रपंचाचा उभारा । स्वरुपीं जणू पाठिमोरा । केला पैं नश्वरा । विषयासाठी ॥२७॥

तें मूळ विचारितां । विचारा ठाके पैं पाहतां । जें मनाचिया हाता । हातवसेना ॥२८॥

तें बुद्धीसी कुवाडें । धृतीसी धरितां सांकडें । जें असतां मागेंपुढें । नाहीचि ह्नणती ॥२९॥

जें चळे ना ढळे । गगनासी नातळे । ज्यामाजी सगळें । हारपलें गगन ॥३३०॥

तें स्वदेही पाहतां । हारपली तूपणाची वार्ता । प्रपंच दिसे मृगजळता । मृगजळाचिया ऐसा ॥३१॥

तेव्हां मीतूपण वावो । प्रपंचाचा अभावो । स्वसंवेद्य पाहाहो । आत्मात्वाचा ॥३२॥

जें खंडोखंडीं अखंड । आपुलेपणें उदंड । जें अनंत ब्रह्मांड । अधिष्ठात्रये ॥३३॥

तें स्वसंवेद्य ब्रह्म । उपमेसी निरोपम । जें सूक्ष्माहूनी सूक्ष्म । व्यापक गगनाऐसें ॥३४॥

ज्याचेनि प्रकाशलेशें । समस्ता तत्त्वां प्रकाशूनि असे । तें पूर्णं तत्त्व कैसें स्वदेहीं भोगी ॥३५॥

जो स्वादु गोडियेतें । कां सुवासु सुमनातें । पवन भोगिजे स्पर्शातें । तैसा भोगू ॥३६॥

प्रभा सूर्यातें । चांदणें चंद्रातें । तैसा पूर्णत्वातें । अद्वय भोगी ॥३७॥

तो अद्वयानंदाचां केवळ । वोतीव नित्य निर्मळ । जाला जो अढळ । आनंदरुप ॥३८॥

निबिड आणि घन । बाह्यअंतर विहीन । क्षेत्रक्षेत्रज्ञाहून । पूर्वजू जाला ॥३९॥

तेव्हां मीतूंविण प्रपंचु । हा चितपणेंचि वाच्यु । जेथें शून्याचा निर्वचु । ते हे दशा ॥३४०॥

होती त्रिगुणाची धाडी । जे धाडी जीव बांदवडी । घालुनी विधिनिषेध बेडी । जाची जन्म मरणें ॥४१॥

तेथें मागें आणि पुढें । खडखडीत उघडें । परब्रह्म डोळ्यापुढें । विराजत असे ॥४२॥

मग अहोरात्र तया । बैसवी विषय भरडावया । दळिलेंचि दळावया । चर्वितचर्वण ॥४३॥

क्षुधें तृषेचें अपाय । वाजती दरिद्राचे घाय । तेणें दुःखें विसावों जाय । गृहदाराकडे ॥४४॥

तें अतिजर्जर साचें । हातीं धरितां मोहविंचें । हाणितलें तेणें वेदनेचें । प्रबळ दुःख ॥४५॥

असूयेच्या तिडका । ब्रह्मांडी निघती देखा । वित्तहानीचा भडका । तेणें न संडे उभड ॥४६॥

पुत्रनाशांचे इंगळ । तेणें सर्वांगी जळजळ । आशा सर्पिणीची गरळ । मनमुखीं पडे ॥४७॥

तें सर्पिणीचें विख । मोहर्विचुवाचें दुःख । कैचें बदिशाळे सुख । वरी विषय भरडिणें ॥४८॥

ऐसिये त्रिगुणाचे धाडिवे । देहात्मबुद्धी देवे । सांपडली ते भोवे । भोगिती ऐसे ॥४९॥

हे देखोनि बांदवडी । जो ब्रह्माहमस्मिस्वर्ग काढीं । तो एकला करी देशधडी । त्रैवर्गिकातें ॥३५०॥

हा अविद्यामेळावा । पळोनि जाये गुणगांवा । तेथें करुनि रिघावा । सपिलीं मारी ॥५१॥

तंव तिहीं माजीं पहाहो । थोर लागे घरकलहो । वडिल लागे खावों । दोघांतेंही ॥५२॥

दोन्ही खाऊनी एकला । घाव नलगतां निमाला । एवं जो जाला । निस्त्रैगुण्य ॥५३॥

त्यासी विधिनिषेधाची कडी । पहिलेंचि तुटली बेडी । तोचि पावोनि पैलथडी । वस्तु जाला ॥५४॥

तुटली कर्माकर्मवोढी । निषेधीं पडली झांपडी । स्वानंदामाजीं सबळ बुडी । स्वसंवेद्य जाला ॥५५॥

तेव्हां नास्तिक्याची प्रौढी । उभउनी आस्तिक्याची गुढी । उभवी तेणें धडफुडी । आचार्यकृपा ॥५६॥

तेव्हां अभाव की वैभव । सगुण कीं निरावेव । अनुभवा अनुभव । अनुभविजे ॥५७॥

तेथें हेतु ना मातु । दृश्य ना दृष्टांतु । सगुण ना गुणातीतु । चिद्वेद जो ॥५८॥

जो जगदगुरु जनार्दनु । भवगजपंचाननु । ज्याचेनि सकळ जनु । परणितु असें ॥५९॥

जो अमनमनाची माउली । कीं श्रांता विश्रांतीची साउली । अनुभवाहि गुतुकली । आनंदें ज्याचेनि ॥३६०॥

तो श्रुतीचा धारकु । निजमनधरातारकु । स्वात्मबोधें कारकु । सकळद्रष्टा ॥६१॥

तो एकाकी एकपणें । एकनाम स्मरणें । एकाजनार्दनें भोगणें । हें निर्वेद्य सुख ॥६२॥

असारा सार मध्य । जें सुख भोग्य नित्य । तेंचि बोलिला सत्य । श्लोकार्थेसी ॥६३॥

आतां अष्टमावरिली टीका । काय अष्टमा सिद्धी होती एका । कीं अष्टम अवतार देखा । नाचती तांडव ॥६४॥

तेथें सांडूनियां असत्य । उघड दाविजेल सत्य । जेणें सत्यवंत । सत्यवता येती ॥६५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP