शुकाष्टक - श्लोक ४

श्रीशुक्राचार्यांनीं स्वानंदस्थितीचे जे उद्‍गार काढले आहेत त्यावर ’ शुकाष्टक ’ही नाथांची प्राकृत टीका आहे.


यस्मिन्विश्वं सकलभुवनं सामरस्यैकभूतं ।

उर्वी ह्यापोनलमनिलखं कालजीवक्रमेण ।

यत् क्षीराब्धौ समरसतया सैधवं वैकभूतं ।

निस्त्रैगुण्ये पथि विचारतां को विधिः को निषेधः ॥४॥

विश्वेसी विश्वदेही । आत्माराम जाला पाही । सकळ भूतें ज्याच्या ठाईं । समरसां आलीं ॥९८॥

पृथ्वी आप तेज वायो । गगनेंसहित विरोनि जाये । तेथ सकळ भुवनें काये । भौतिकेंसी राहाती ॥९९॥

पृथ्वी सलिल परिमाण सिद्ध । तेव्हां पृथ्वीचा जळीं ये गंध । मग जळचि एकविध । वोतप्रोत ॥२००॥

त्या जळाचा रसु । प्राशूं निघे हुताशु । तेव्हां जळाचा हारासु । तेजगर्भी ॥१॥

मग तेजाचें रुप । वायोनें शोषिलें अमुप । मग वायोचि एकरुप । सैरा वाढे ॥२॥

त्या वायोच्या स्पर्शातें । गगनें नेलें आतौतें । तै वायो पावे लयातें । गगनोदरीं ॥३॥

तें शून्यही सगळें । अहंकारीं मावळे । तो अहंकारु जाउनी मिळे । कारणामाजीं ॥४॥

एवं महदभूत भौतिकेंसी । माया प्रवेशे आदि पुरुषीं । ते गेली नलगत कोणे वेसी । हे शुद्धिही नलभे ॥५॥

जेंवीं दोराचें सापपण । दोरींचि हारपे पूर्ण । तेवीं मायेचें निदान । चैतन्यघनीं ॥६॥

माया वेष्टित चैतन्या । ‘ जीव ’ या अभिधाना । तेंचि गेलिया जीवपणा । सहजेंचि विलयो ॥७॥

पंचभूतां ऐक्यता । मायेसकट समरसता । जाली तेथें जीविता । तोचि भावो ॥८॥

क्षारसिंधूमाजीं रवा । घातलिया सेंधवा । तेणें विरणें तेवीं जिवा । प्रकृतीसकट ॥९॥

त्या सैंधवाचा खडा । जाला सिंधूचि येवढा । तेवीं एकदेशी होडा । पूर्ण ब्रह्म जाला ॥२१०॥

तेव्हां त्रिगुण अहंकार व्याला । वास प्रकृती वावरला । जो विधिनिषेधाच्या गरळा । सदांसांडी ॥११॥

ज्याचेनि विषभेदें । जन जाली बोधमंदें । अविदेचि विषये अंधें । केलीं जेणें ॥१२॥

ज्याचिया लहरी । विराजती राजपुरीं । मां इतरां चराचरी । कवण पाडु ॥१३॥

नवल विषयांचा पडिपाडु । गोड परमार्थ केला कडु । केवळ विषप्राय तो गोडु । विषयो जाला ॥१४॥

त्या भुजंग फणी मंडळा । घातली ऐक्याची शिळा । तेव्हां विधिनिषेध गरळा । स्वयेचि घुटकी ॥१५॥

त्या प्रकृती वावरला । शोधिले पावे तंव मुळा । मुळींच्या स्वप्रकाशा ज्वाळा । जाळिले गुण सकळी ॥१६॥

तेव्हां सर्प गरळ वावरले । जाळोनि ब्रह्माग्नी केवळ । जाला तो तेजबंभाळ । नमावळतु राहे ॥१७॥

ऐसा निस्त्रैगुण्य योगी । त्यासी विधि कवणु जगीं । आणि निषेधाही लागीं । वेगळा विभागु कैचा ॥१८॥

एवं विधिनिषेध दोन्ही । गेले ज्या देखोनि । जो विश्व समरस होउनी । एकू ऐक्यें ॥१९॥

बहुतांसी एकपण । आलें तें कीं लक्षण । येचिविषीं निरोपण । शुक योगींद्र निरोपी ॥२२०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP