मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
जातिभेद नाही कोठें ?

दिवाकर - जातिभेद नाही कोठें ?

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


'' .... ही अशी लटपट नको आहे ! म्हणे पुष्कळांचें मत आहे कीं, ईश्वरानें जातिभेद निर्माण केला नाहीं म्हणून ! असेल ! एका पुष्कळांचें जसें हें मत आहे, तसेंच जगांतल्या दुसर्‍या पुष्कळांचेंही मत आहे कीं, ईश्वरानेंच जातिभेद निर्माण केला आहे ! - मी असें विचारतों कीं, आपल्या मानवसृष्टीखेरीज इतर जीवसृष्टींत परमेश्वरानें जातिभेद निर्माण केला आहे कीं नाहीं ? - फार कशाला ? या वनांतलीच मौज पहा कीं, अहो, कांहीं झाडांना नुसतीं सुवासिक फुलेंच आहेत, तर कांहीं दिखाऊ - पण अत्यंत सुंदर - अशाच फुलांनीं नटलेलीं आहेत ! पहा, तो आम्रवृक्ष पहा ! त्याला सुवासिक मोहरकी आहे व गोड फळेंही येतील ! बिचार्‍या सुरुच्या झाडांना तर फुलेंही नाहींत आणखी फळेंही नाहींत ! पण त्यांची, वायूच्या लहरीमध्यें डुलत डुलत स्वर्गाला जाऊन भिडण्याची धडपड अव्याहत चालू असते कीं नाही ? तसेंच पक्ष्यांचे ! कोणी गाणारे आहेत, कोणी सुंदर आहेत, तर कांही - पहा ती घार ! ओहोहो ! आकाशांत उंच भरार्‍या मारीत चालली आहे ! - हो, मग, मी तरी तेंच म्हणतों कीं, पशूंमध्येंही हाच प्रकार आहे ! अहो इतकेच नाहीं, पण गुलाबाच्या झाडामध्येंसुद्धां किती तरी जाती आहेत ! मला सांगा, सगळ्या जगांत पोपट तरी एकाच जातीचे आहेत का ? मुळींच नाहीं. अहो, प्रत्यक्ष माणसाला कोठें नको आहे जातिभेद ? हो, आपल्यालाच मी असें विचारतों कीं, तुम्ही आपल्या बागेंत नुसती गुलाबाचींच झाडें कां नाही लावीत ? पाहिजे कशाला जाई - जुई - मालती - मोगरा ! - तें कांही नाहीं ! माणसाचा स्वभावच हा कीं, आपल्या वर्तनांतील दोषांचा डेरा कोणाच्या तरी माथी तो आदळीत असतो ! - वा ! काय कोकिळा मधुर गात आहे ! का हो त्रिंबकराव, आपल्याभोंवती मधून मधून जें एवढें गवत पसरलें आहे, त्यामध्यें रडून रडून वाळलेली एक तरी गवताची पात तुम्हांला दिसत आहे का ? तीं नारळाचीं झाडें आमच्यापेक्षां कां उंच आहेत, आणि आम्हांला तूं इतकें उंच कां करीत नाहींस ? - अशी यांची ईश्वराजवळ चालू असलेली ओरड तुम्हांला कोठें ऐकूं येत आहे का ? कोकिळा गात आहे म्हणून इतर पक्षी गायचे थोडेच थांबले आहेत ! आपल्या बंधूजवळ जितका मोहोर आहे तितका आपल्याजवळ नाहीं, म्हणून हा आम्रवृक्ष मत्सरानें सुकून गेला आहे का ? सांगा, अगदी लहानशा गवाताच्या पातीला जितका आपल्यांतील ईश्वरी तेजाविषयीं अभिमान वाटतो, तितकाच, उंच हात पसरुन आपल्या लहान भावंडांना वारा घालणार्‍या त्या नारळाच्या झाडालाही वाटतो ! जगाचें सौंदर्य वाढविण्याची परमेश्वरानें आपल्यावर सोंपविलेली कामगिरी, जितक्या उत्साहानें व कळकळीनें तें गुलाबाचें फूल बजावीत आहे, तितक्याच उत्साहानें व कळकळीनें हें झेंडूचें फूलही नाहीं का बजावीत ? - हें पहा ! या आनंदानें स्मित करणार्‍या व शांत वनांत दुःखाचा एक तरी सुस्कारा ऐकूं येत आहे का ? - नाहीं तर आपल्या शहराकडे नजर फेंका ! जिकडे तिकडे मीपणाची आग भडकून त्यांत तडफडून - भाजून - निघणार्‍या तूंपणाच्या हदयांतून अव्याहत बाहेर पडणार्‍या धुराचें - त्रिंबकराव ! - कसें हें आच्छादन पसरलें आहे ! - काय म्हटलेंत ? हा सगळा धूर जातिभेदानें घुमसणार्‍या तंट्यांतून बाहेर पडत आहे ? - नाहीं ! तसें नाहीं ! अहो ! ईश्वराला जाणूनबुजून पायांखाली तुडवून सर्व जगाचा मी एकटा मालक असावा, या इच्छेनें अनावर होऊन, एकमेकांवर टाळकीं फोडून घेणार्‍यांच्या मेंदूतून या वाफा निघत आहेत - वाफा ! ' मी ! मी ! ' अशी रणगर्जना जिकडे तिकडे ऐकूं येत आहे !.... ''

३१ डिसेंबर १९११

N/A

References : N/A
Last Updated : September 16, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP