निरंजन माधव - श्रीमल्लारीस्तोत्रराज

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


मल्लारी, विभु, ह्नाळसापति, तुझ्या वंदूं पदांभोरुहा.

दे भक्तासि अचिंत्य कामफळ हें निंदोनि स्वर्भूरुहा ।

गाती सादर नाभ, पुण्य चरिते जे भक्त तूझे, हरा,

संसाराब्धि तरोनि पावति सुखें मुक्तीचिया मोहरा ॥१॥

संसारीं रत जीव पंच कलुषें दुःखें सदा वाहती

जे स्वर्गी नरकीं मनुष्यनिवहीं कर्मे स्वकें राहती ।

त्यांचें बंधन केंवि दुर्घट तुटे ? माया कधीं हे घटे ?

ऐशीं हे करुणा करोनि चरितें केली तुवां दुर्घटे ॥२॥

माराया मणिमल्ल दुष्ट, कपटी, मायानिधी, तो स्वयें

तेणें निर्जर दंडिलें, म्हणुनियां प्रार्थावयातें भयें. ।

आले त्या अभया दिल्हें, करुनियां शत्रूसि उन्मूलना,

ऐसा हा अवतार केवळ तुझा दीनांचिया पालना ॥३॥

विश्वात्मा, जडजंगमांत भरला राहोनियां, सर्वदां

लीला जे करिसी विचित्र सुजना तारावया सर्वदा ।

देसी मुक्ति तसीच भुक्ति, सहजें ध्यानां तुतें सादरें

कैंची ते नरकादिभीति अथवा कष्टें महादुर्धरें ? ॥४॥

सारें विश्व तुला भजोनि तरतें संसरमायानिधी;

ऐसा तूं भजकांसि लभ्य सहसा झालासि जैसा निधी ।

गेले दुखदरिद्रसंभव पुन्हां काशासि दुष्टापदा

पाहों हे सकतील पामर तरी पावोनियां त्वत्पदा ॥५॥

या लोकीं मज एकलेंचि त्यजिलें तां काय तें पाहिलें ?

माझे पातक काय एकवटलें, कीं आड तें पाहिलें ?

पाप्यांमाजि मलाच कां निवडिलें ? खोटें मना वाटलें ?

या दुःख मज नीर हें अतिशयें नेत्रांबुजीं दाटले ॥६॥

पूर्वी पातकवंत काय नहुते ? तां टाकिले कोणते ?

तूं दीनोद्धर हें विचित्रचरितें गाताति, बा, जाणते ।

पायीं तोडर बांधिला उकलिला माझ्याचि या कारणीं ?

ऐसा हा तुज काय भार पडिला मद्दोषसंहारणीं ? ॥७॥

जें तूझ्या स्मरणेंचि पाप न सरे, ऐसें नसे देखिलें

पाप्यानें करवेचिना, सुरगुरु, त्याला न जें लेखिलें; ।

ऐसेंही असतां, मदीय दुरितें तूं चिंतिसी दुर्धरें,

तेव्हां पामर मी जगांत न कळे कैशापरी उद्धरें ॥८॥

तूझ्याही महिमांबुधीहुनि असे मज्जेष्ठ पापांबुधी;

तेव्हां मीच वरिष्ठ तूजहुनि या सन्मानिजे या बुधीं; ।

तूझा तो पुरुषार्थ हीन घडला तारावयातें मला;

तेव्हां कोण भजेल या त्रिजगतीं पादांबुजा कोमला ? ॥९॥

मोठासा मणिमल्ल दुट बधिला त्वां ज्या प्रतापें तरी,

तो होता विबुधां बुधांसि वळसा देणार त्या अंतरीं ।

तैसा पातकदैत्य हा विकसतो मद्देहवासी वधीं

तेव्हां त्वत्पुरुषार्थ मानिन खरा दुःखासि तूं आवधी ॥१०॥

कामाचा वधतांचि कीं विरचिला, क्रोधासि तां दंडिलें,

शोकातें अतिदूरता उडविलें, लोभासि तां भंडिलें ।

मोहातें तरि मदिंलें प्रभुवरा, उच्छेदिलें त्या सदा

साहाही रिपुंच्या जयासि करुनी तूं वर्तसी, शर्मदा ॥११॥

तूतें जे भजती तयांसि न घडे हे दुष्ट बाधा कधी

ते ना पाहति आपदा कलिकृता, देवा ! कधीं ना कधीं ।

तूं विश्वंभर, तूं परात्परगुरु, तूं आद्य सर्वां जनां

कल्पांती तुझिया स्वरुपसारिते ये विश्व हें मज्जना ॥१२॥

ब्रह्मा होउनि सृष्टि तूंचि करिसी, विष्णूचि तूं पाळिसी

भूतात्मा सकलांतरीं वसुनियां तूं, चिन्मया, चाळिसी ।

कल्पांतीं नटतांडवासि करुनां भक्षोनियां राहसी

पूर्णात्मा निजवैभवासि अपुल्या इच्छावशें पाहसी ॥१३॥

ऊर्णायूसम विस्तरोनि जग हें, तूं ग्रासिसी मागुती

पूर्वीपासुनियां स्वभाव असला तूझा श्रुती सांगती ।

हे गाथा तव कर्णरम्य विलसे गोडी सुधेचेपरी,

यीतें प्राशिति सिद्ध, सज्जन, मुनी; जे श्रेष्ठ सर्वापरी ॥१४॥

कल्याणी तव देव पावन कथा मी सर्वदा गातसें

तुझें सुंदर रुप हें निजमनीं मी सर्वदा ध्यातसें ।

आतां तूं अविलंब पावन करीं येना मना तेधवां,

तूझें वर्म जगांत दाविन खरें, श्रीह्नाळासाच्या धवा ! ॥१५॥

कोठें तो तव वृद्ध बैल ? हय हा कैंचा तुवां आणिला ?

कोठें मूठवळी ? सुवर्णमणिचा हा जीन पालाणिला ।

कैं खट्वांग जुनें घुणें लिबडिलें ? हें खङ्ग कैचें करीं ?

भिक्षापात्र त्यजोनि, भूपति कसा झालासि, बा ! लौकरी ? ॥१६॥

चर्मै टाकुनि, दिव्यराजवसनें कोठें मिळालीं तुला ?

मुंडें सांडुनि, मौक्तिकस्रज गळां ज्यांतें शशीचा तुला ? ।

कैं गेलें शवभस्म, बेल ? बरवें भंडार भाळीं दिसे

कैं गेले प्रमथादिभूतगण ते ? तो एकही ना दिसे ॥१७॥

सर्पांचीं वलयांगदें विलसती ग्रैवेयकें कुंडलें.

ते कांहीच न दीसती, पुरहरा ! माथां जटामंडळें ।

आतां सन्मणिकुंडलें मिरवती कानीं, कडीं हस्तकीं

दिग्वासा ! विमलांबरांसि धरिसी उष्णीप हें मस्तकी ॥१८॥

कैंचे हें तुज दिव्य वैभव असें आलें कळेना मला ?

होता की बहुकाळ वास तुजला प्रेतावनीं नेमला ।

आतां थोरपणासि घेउनि अम्हां संगेंचिना बोलसी

श्रीकंठाविभवेंचि माजुनि कसा मत्तापरी चालसी ? ॥१९॥

बाणायी हरिली तुवां धणगरी लोभें तरी कोणत्या ?

देवी सुंदर ह्नाळसा असुनियां राणी घरीं जाणत्या ? ।

घाणेरी घुरटी तुला तरि कसी ते मानली नाकळे ?

तीसंगें तुजला कसें सुख गमे ? तुझें तुला हें कळे ! ॥२०॥

तुझी ते प्रियसुंदरी, बरसती, दाक्षायणी, चित्कला,

तीने दक्षमखांत देह अपुला जाळोनियां टाकिला ।

झाली भस्म पळांत ते भगवती श्रीअन्नपूर्णेश्वरी

अन्नाथी तुजला तदां निरखिलें भुलोक देवेश्वरीं ॥२१॥

तेव्हां त्या मुनिनायकीं स्ववनिता अन्नें करीं देउनी

तूला पाठवितां, प्रसन्नमन तूं झालासि तें सेउनी ।

अन्नें पुष्ट घडोनि, काम उपजे त्या सुंदरीदेखतां,

तेव्हां लिंग तुझें गळोन पडलें, शापानळा प्रेरतां ॥२२॥

लज्जेनें विष भक्षिलें; परि नये तो मृत्यु, मृत्युंजया

केलें विव्हळ त्या हळाहळरसें जैं तुजला, दुर्जया ! ।

तैं ते देखतसे तुला भगवती, नारायणी, मोहनी,

जे देवांसि सुधा समर्पण करी, दैत्येश्वरां मोहुनी ॥२३॥

ते झाली तव वल्लभा, म्हणुनियां झालासि तेव्हां सुखी

अर्धाधांग घडोनियां विलसलां तुह्मी तदा चित्सुखीं ।

तीनें या तुज वैभवासि दिधलें दारिद्र्य तें खंडिलें

ते माता अमुची तिच्याच सुकृपें ऐश्वर्य हें जोडिलें ॥२४॥

झाली साह्य म्हणोनि शक्ति तुजला आली वधाया अरी

इंद्राच्या कुलिशा असाध्य हरिचा कुंठीत झाला अरी ।

तां खङ्गें मणिमल्ल दैत्य वधिला या ह्नाळसेच्या बळें

तां कीजे तरि काय कृत्य न कळे शक्तीविना दुर्बळें ? ॥२५॥

झाला कीं पुरुषार्थ सर्वहि तुझा तो आजि ठावा मला

ते तूझी गृहिणी असे भगवती, जे कां लता कोमला ।

देवीनें तुज नाम रुप दीधलें, तैं लोकिकीं रुढता

झाली; हें, त्रिपुरांतका ! न विसरें घेवोनियां मूढता ॥२६॥

मोक्षाचा प्रभु दानदीक्षित खरा, स्वातंत्र्य तेथें तुला

आहे साच; परंतु अद्भुत तिच्या कृत्यांसि नाहीं तुला ।

ज्या जीवांप्रति मोक्ष देसिल तयां देवीच विद्या घडे

ऐसे वेदमुखें अम्हीं परिसिले हे बोल, बा ऊघडे ॥२७॥

तूझी भाज महालसा घरधणी तूं नागवा, जोगडा

मी झालों अतिदीन याचक तुझा मीहूनि तूं ऊघडा ।

मागावें तुज काय तें ? म्हणुनियां मौनासि म्यां वाहिलें

तूंही देसिल काय सांग मजला तुझें तुपें राहिलें ॥२८॥

आतां व्यर्थ कशासि काय करणें वाग्जल्य हा आगळा ?

दुःखें म्यां बहु भोगिलीं म्हणुनियां दाटोनि आला गळा ।

प्रेमें मी वदलोंच निष्ठुर तरी तां पाहिजे साहिलें

दीनातें करुणाकटाक्ष करुनी तां पाहिजे पाहिले ॥२९॥

शांतात्मा करुनानिधी म्हणविसी तूं या जगीं एकला

तें साचें करणें तुलाच पडलें, खंडेश्वरा निर्मळा ! ।

आहे ब्रीद तुझें; करी जतन तूं दासांचिया संकटीं

टाकावीच उडी तुलाचि पडली, विश्वंभरा, एकटी ! ॥३०॥

मागेना तुज ईश्वरत्व अथवा साम्राज्य लोकत्रयीं

नेच्छीं मी, विभु, सार्वभौम पदवी जे स्पृष्ट तापत्रयीं ।

देई पादसरोजभक्ति अतुळा, हे एक वांछा मनीं

यीवांचोनि दिली तरी, पुरहरा ! ते मुक्ति मी ना मनी ॥३१॥

भक्तीचा महिमा तुझा न गणवे जन्माशतें धातया

हे ज्यांला फळली तुझ्याच करुणे, पूजीच वेदा तया ।

यासाठीं, जगदीश्वरा ! मज असो त्वद्भक्ति ते शंकरी

सिद्धी सर्व इच्या पदीं विलसती; मुक्ती घरीं किंकरी ॥३२॥

ज्या जन्मीं भजनीं तुझ्या मन रते, तो धन्य मानीं, भवा ।

नेच्छीं त्वद्भजनाविना हरिहरब्रह्मांचिया वैभवा ।

सारीं जातिल जैं लयासि, निरखूं; आम्ही उरों सेवटीं

हांसों त्यांप्रति भक्त होउनि कसे ना वांचलां संकटीं ? ॥३३॥

अव्यक्तीं लय पावलां, पुनरपी व्यक्तीस येणें घडे

ऐसें हें भ्रमणें तुह्मांसि पडलें, गीता वदे ऊघडें ।

आम्ही भक्त तरोनि मायिकपदा, अव्यक्तही जिंतिलें

झालों चिन्मय मात्र भक्तिविभवें; श्रीभैरवा चिंतिलें ॥३४॥

तेही शंकित जाहले, म्हणति कीं ना चिंतिला हैवती

हे तों धन्य, सुभक्त, भक्तिविभवें आह्मां शिरीं रावती ।

आह्मी ईशमदें भुलोनि पडलों अच्छिन्न मायाभ्रमीं

यातायात पुनः पुन्हा घडतसे आलातचक्रकमीं ॥३५॥

आतां हे नलगे, ह्नणोनि भजती त्वत्पादपद्मांप्रती

भक्तीनें तरती, अनन्यगतिका, मायानिधी सांप्रती ।

यासाठीं तव पादभक्तिमहिमा दावी तुझ्या चित्पदा

त्वद्भक्तीविण सर्व देवपतिची दुःखार्ह ते संपदा ॥३६॥

तूं अव्यक्त, अनादि, निर्गुण, विभू, तूं शुद्ध, बुद्ध, स्वयें

सद्रूपाप्रति जाणतोसि तुझिया तूं एकला निश्चयें

मायातीत, विशुद्धसत्व असतां खेळों तुला आवडे

तेव्हां निर्मिसि सर्व मायिकपदा बाळापरी रोकडें ॥३७॥

माया ते तरि अंगिकारुनि जगीं ईशत्व तूं पावसी

मायाधीन तसा नटोनि बहुशा लोकांपरी दाविसी ।

आकाशादिक पंचभूतनिवहीं, मात्रामयीं, इंद्रियीं

सूत्रात्माचि घडोनि वर्तसि, विभू पाहों असें निश्चयीं ॥३८॥

वेदांतीं कथिलें तसेंचि कथितों, सर्वत्र तूं एकला

तूं सारें नटलासि दाउनि तुझी ऐशी महाचित्कळा ।

जें जें दृश्य दिसे, तुझेचि विलसे हें रुप, सत्यात्मका

मल्लारी, करुणाधना, हयपती, चिन्मूर्ति, चिन्नामका ॥३९॥

आतां तूज नमो नभो; पुनरपी साष्टांग तूला नमो

सूक्ष्मा, तूज नमो, नमो गुरुतरा, रुपा, अरुपा, नमो ।

लोकातील नमो; पुनरपी साष्टांग तूला नमो

जेजुरीपुरनायकासि शतशा भैराळभूपा नसो ॥४०॥

आतां तूं अपुले म्हणोनि जन कां पायांतळी ठेविजे ?

तूझें जें निजरुप अव्यय असें, तें या दिठीं दाविजे ।

माझें निष्ठुर बोलणें सकळही, मायेश्वरा, साहिजे

माझ्या हत्कमळीं, परात्परगुरु ! तां सर्वदा राहिजे ॥४१॥

ऐसा हा स्तवराज माधवसुतें निर्मोनि पादांबुजा

केला अर्पण, दिव्यवाक्यलतिका वेंचोनि पद्मांबुजां ।

हे माळा जरि भक्तियुक्त धरिती कंठीं प्रमोदोत्करें

खंडेराय दया करील करुणासिंधू सुधाशीकरें ॥४२॥

त्यातें हा भवसिंधु वत्स ? पदसा होयील पादप्लवें

ध्यावाहर्निश म्हाळसापति सदा प्रेमें महाउत्सवें ।

वाचावा स्तवराज भाविकजनीं शार्दूलविक्रीडितें

भावें दिव्य निरंजनें विरचिला युक्ताक्षरें पंडितें ॥४३॥

मल्लारीस्तव भक्तिमुक्ति फळ, दे सत्पुत्र, कन्या सती,

अष्टैश्वर्य, धनेशता, विपुल दे सत्कीर्ति ते शाश्वती ।

विद्याभ्यासविनाचि लाभुनि घडे चातुर्यचिंतामणी

दीर्घायुष्य, कलत्र सुंदर मिळे त्रेलीक्यनारीमणी ॥४४॥

॥ इति श्रीमन्निरंजनमाधवविरचितमल्लारीस्तवराजः ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP