मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|अवतार वाणी|

अवतारवाणी - भजन संग्रह ३६

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


एक तूं ही निरंकार (३५१)

वसुंधरा ही कंपीत होते रूदनही आकाश करी ।

हानी होई जव धर्माची पाप वाढते भूमीवरी ।

प्रेम नम्रता नष्ट होऊनी द्वेषाची छाया पडते ।

धगधगत्या था जगतामाजी जीवात्मा ही घाबरते ।

ऐकूनी हाहाकार जगाचा युगे युगे प्रभु अवतरतो ।

'अवतार' धरूनी मानव काया सदगुरु या जगती येतो ।

*

एक तूं ही निरंकार (३५२)

मानवात मानवात नसता समजा तो मानव नाही ।

तो नर जाणा पशु निशाचार कर्तव्या जागृत नाही ।

मानव जन्मामध्ये येऊनी कर्म करी दानवा परी ।

नसून ते अज्ञान तयाचे सैतानाचे काम करी ।

कर्मावीण कोर्‍या विद्येने व्यर्थ जाय जीवन सारे ।

'अवतार' दर्शकावीना पथिक तो ध्येयापासुन दूर सरे ।

*

एक तूं ही निरंकार (३५३)

ज्ञानावाचून कर्म हे जैसे पाण्याने मंथन करणे ।

दूधापासूनी मिळणे लोणी पाणी मंथन कां करणे ।

श्‍वास अमोलक संपून जाई जव निश्चित घडी येई ।

अखेर जव होईल निवाडा नाम हेच तारक होई ।

मानव तन ही अंतीम शीडी घसरताच जाईल बारी ।

'अवतार' म्हणे चौर्‍याऐंशी मधली कमाई ती गेली सारी ।

*

एक तूं ही निरंकार (३५४)

बुद्धीमान जरी असेल कितीही गुरुवीना विद्या नाही ।

अमल करोनी कर्म करिता विसर कधी होणे नाही ।

नौकेला जरी पार लाविणे नावाड्याविण शक्य नसे ।

करील व्याधी मुक्त औषधी वैद्यावाचून शक्य नसे ।

तैशापरी हे ज्ञान प्रभुचे गुरुविण मिळणे कठीण अती ।

म्हणे 'अवतार' कृपा गुरुची करी सकल संकट मुक्ती ।

*

एक तूं ही निरंकार (३५५)

जात पात वर्णाश्रम सारे फांस असे हा तुझ्या गळा ।

अती खोल हे खड्डे जगती मानव यांत बुडून गेला ।

मुसलमान हिंदूच्या आधी केवळ असशी मानव तू ।

मिटवी द्वेष मनाची ईर्षा प्रभु प्रेमी जर असशी तू ।

म्हणे 'अवतार' पूर्ण गुरुविण समज तुला मिळणे नाही ।

जाणील्याविना एक प्रभुला आत्म बल प्राप्ती नाही ।

*

एक तूं ही निरंकार (३५६)

द्वैतमाजी फसूनी मानव अलग हरि पासून झाला ।

द्वैतमाजी फसूनी मानव उत्तम जन्म घालविला ।

द्वैतमाजी फसूनी मानव डोळे झाकूनीया बसला ।

द्वैतमाजी फसूनी मानव पिऊ न शके अमृत प्याला ।

पूर्ण गुरुच्या द्वारी येऊन जो नर अभिमाना मिटवी ।

'अवतार' म्हणे तो नर या जगती श्रीहरिचे दर्शन मिळवी ।

*

एक तूं ही निरंकार (३५७)

कर्मा धर्मामाजी फसुनी विसरलास तू प्रभुदाता ।

चिखलामाजी अधीक रुतला पाऊल पुढे पुढे पडता ।

ध्यानी ठेवितो नातीगोती प्रभुचे परि ना ध्यान करी ।

मोह मायेच्या जाळी फसूनी जीवन अपुले नष्ट करी ।

क्षणिक सुखाच्या लागुन मागे खर्‍या सुखा विसरून गेले ।

खोट्या धंद्यामाजी फसूनी जीवन व्यर्थची घालविले ।

खरा मार्ग अन खरा ठिकाणी सारे नर विसरूनी गेले ।

'अवतार' म्हणे हे द्वार गुरुचे सर्वालागी असे खुले ।

*

एक तूं ही निरंकार (३५८)

एक दिशेला दुःख जगाचे एक दिशेला सुख सारे ।

त्या बाजुला हे जगवासी इकडे हरिचे भक्त खरे ।

तिमीर तिकडे अज्ञानाचा या बाजुला ज्ञान प्रकाश ।

कलह क्लेश अन रुदन तिकडे या बाजुला सौख्य निवास ।

वैर व ईर्षा त्या बाजुला इकडे प्रेमानंद बसे ।

त्या बाजुला ग्रीष्म ऋतु तर इकडे सदा वसंत असे ।

जगताचे या काम एकची गोंधळे जगती माजविती ।

'अवतार' म्हणे ही डुबती नौका संतच पैलतीरा नेती ।

*

एक तूं ही निरंकार (३५९)

मनी वसे अंधार सदैव जोवर ज्ञानप्रकाश नसे ।

अंगसंग हा प्रकाश राहे पळभरही हा दुर नसे ।

घाणीमध्ये फसून राहिला अमृत तुज हे ना मिळता ।

पुण्यदान तू करी कितीही तिळभर याचा नसे नफा ।

दुःखातुन तुज सुटका नाही जोवर मिळे न सुखदाता ।

भ्रम हे सारे जाऊ न शकती विना प्रभुला ओळखता ।

चौर्‍याऐंशीचे चक्र मानवा ज्ञानाविण थांबू न शके ।

'अवतार' म्हणे सदगुरु वाचूनी मुक्तीमार्ग ना मिळवू शके ।

*

एक तूं ही निरंकार (३६०)

रंग रूपाहुनी राहुन न्यारा रंगमयी केला विस्तार ।

विना आकृती असून ज्याने भिन्न विभिन्न दिला आकार ।

अलख असूनी स्वये प्रभु हा दृष्टमान केला संसार ।

असे स्वतः निरंकार हा धरती गगन केले साकार ।

ऐशा नश्वर परमात्माला कोटी कोटी प्रणाम करू ।

अजर अमर 'अवतार' स्वामीला कोटी कोटी प्रणाम करू ।

N/A

References : N/A
Last Updated : July 22, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP