मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|अवतार वाणी|

अवतारवाणी - भजन संग्रह २४

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


एक तूं ही निरंकार (२३१)

ज्या ज्योतीचा अंश तू प्राण्या जाणुनी घे तू त्या प्रभुला ।

ज्याने दिधली सुख संपती ओळखुन घे त्या प्रभुला ।

विसरूनी अंतर्यामी प्रभुला सारी जी कामे करीसी ।

जाण खरी ती सर्व निशिद्ध जे करिसी तैसे भरीसी ।

येशी जरी ना शरण गुरुला पदोपदी ठोकर खाशी ।

'अवतार' गुरुज्ञाना वाचोनी चौर्‍याऐंशी फेरे फिरशी ।

*

एक तूं ही निरंकार (२३२)

असो कलंकीत कपटी पापी किंवा कोणी खुनी असो ।

क्रोधी निंदक अविचारी अन सट्टेबाज कुकर्मी असो ।

चोर लुटारु असो मद्यपी काम मानसी जरी भरला ।

साधु चरणी येऊन त्याने जाणियले जर श्रीहरिला ।

नाश पावती सर्व कुकर्मे गुरुकृपा होईल जरी ।

चरण धूळ 'अवतार' गुरुची सारी पापे नष्ट करी ।

*

एक तूं ही निरंकार (२३३)

सदगुर्च्या दरबारी येता राहे ना जगताचे ध्यान ।

मनोराज्य संपूनी जाई जाय संपूनी सर्वही मान ।

दाही दिशातून तुला पहावे दुजे न दृष्टीला यावे ।

विसर पडावा माझा मजला तव नामी तल्लीन व्हावे ।

दुर तुझ्या चरणाहुन होता वाटे मजला तो वनवास ।

दुःख मूळ 'अवतार' जगत हे क्षणोक्षणी मन होय उदास ।

*

एक तूं ही निरंकार (२३४)

उभी न राहे भिंत कधीही असेल जर कच्चा पाया ।

उभारणी सत्याची न होईल सत्याचा नसता पाया ।

अशक्य प्रभुला प्रसन्न करणे निजबुद्धी चातुर्याने ।

पैलपार ना जाईल नौका भरली जर कां दगडाने ।

अंतर्बाह्य निर्मळ जो नर प्रभु त्याचा स्वीकार करी ।

'अवतार' भावड्या भक्तजनांचे सदगुरुच कल्याण करी ।

*

एक तूं ही निरंकार (२३५)

दुःखमयी या जगतामाजी खुशी सुद्धां भासे रडवी ।

स्वप्न तुल्य पडछायेवरती प्राणी जगी आशा ठेवी ।

खोटी मान बढाई वाः वाः मानवास हैराण करी ।

अपुले यश दुसर्‍याची निम्दा इच्छा ऐसी मनी धरी ।

प्रेमानंद मिळे तव द्वारी आणिक स्थान दुजे नाही ।

'अवतार' तुझ्या द्वारावीण कोठे सुखशांती जगती नाही ।

*

एक तूं ही निरंकार (२३६)

झगडे दंगे आणि लढाया असे जगी यांचा बाजार ।

वैर द्वेष ईर्षा निंदेने भरला हा सारा संसार ।

कळक परस्परे घर्षण होता एक दुजा संगे सडती ।

ऐशापरी मानव या जगती परस्परे लढूनी मरती ।

जाणीयले जर एक पित्याला सकल वाद मिटूनी जाती ।

'अवतार' सदगुरु नांदवू शके बंधुभावना या जगती ।

*

एक तूं ही निरंकार (२३७)

ज्याला कोणी नसे सहारा गुरु तयाला साह्य करी ।

पालक नाही ज्याचा कोनी पालन त्याचे गुरु करी ।

गुरुवाचोनी पापी जनांचा कोणी ना करिती स्वीकार ।

अभिमानाचा रोग मिटवूनी अपार सदगुरु करी उपकार ।

'अवतार' म्हणे हे ज्ञान गुरुचे होत नसे जोवर कोणा ।

जीवनाचा उद्देश तयाला शक्य नसे समजूनी येण्या ।

*

एक तूं ही निरंकार (२३८)

वनी जाऊनी व्रत उपसवे देह कुणी कष्टवी जरी ।

मिथ्या मानुनी कोणी मनाचे जीवन अपुले त्रस्त्र करी ।

पूजा पाठ नमाजे करूनी देती कष्ट शरीराला ।

मूढमती ते जाणा प्राणी जे भजतात प्रतिमेला ।

जन्म मिळाला याच करणे प्रभुरूप ओलखण्यासी ।

'अवतार प्रभु प्राप्तीवीण पुजा व्यर्थही समया घालवीसी ।

*

एक तूं ही निरंकार (२३९)

माणसाहूनी पशु चांगला नसती जर मानवी विचार ।

पक्षी उत्तम नराहुनी त्या कधी न ते करिती तक्रार ।

हाडे चर्म पशुंची अपुल्या अनेक कामाला येती ।

त्यांचे गुण स्वभाव मानवा बहुत अशी शिकवण देती ।

पशु मानवामाजी अंतर आहे इतुकेची 'अवतार' ।

ब्रह्मज्ञान प्राप्तीचा केवळ मानवास आहे अधिकार ।

*

एक तूं ही निरंकार (२४०)

ईश्वर अल्ला गॉड वाहेगुरु सर्वही नांवे या प्रभुची ।

राम महम्मद नानक ईसा नांवे प्रिय सकल असती ।

निरंकार नाम या युगाचे घेईल जरी कुणी हे नाम ।

जाणिल्यावीना पाहिल्यावीना कामी ना येई हे नाम ।

पाहिले दर्शन नंतर प्रीती त्याचे नंतर स्मरण करी ।

'अवतार' म्हणे हरि दर्शनावीना स्मरण नसून विलाप करी ।

N/A

References : N/A
Last Updated : July 22, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP