वामन पंडित - वेणुसुधा - प्रसंग २

कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.

दिसे जे धवां जे रितीनें जिला हो
तसा घेतसे ते मन माजि लाहो
कितेकी अशा आणिखी गोपदारा
प्रकारांतरें वर्णिती त्या उदारा ॥१॥
ह्नणे एक म्यां कृष्णजी देखिलागे
असा की ललाटीं टिळा रेखिला गे
पहाता पहातां पहावाच वाटे
रुते चित्त जाऊनि नेत्रींच वाटे ॥२॥
अपाद माळा प्रभु कृष्ण जीची
सुधापिती षट्पद क्रुष्ण जीची
प्रदक्षिणा ते अवघे तिला हो
करुनि गुंजारव घेति लाहो ॥३॥
गुंजारवें भ्रमर गुंजति त्यांत देवें
वेणु ध्वनी मिसळिला मृदु वासुदेवें
आपाद कंठ वनमाळ असी विराजे
ते सेविती मधुप होउनि देवराजे ॥४॥
वेष हो रचियले भ्रमरांचे
वृंद ते ऋषिवरां - अमरांचें
या मिषें स्तविति भक्तचि जाणा
सेविती त्दृदयसाक्षि सुजाणा ॥५॥
त्यांस आदर करी अधरीं तो
वेणु ये रिति मुकुंद धरीतो
कीं जया उठति षट्पद वाचा
ते रिती रसहि वेणु - रवाचा ॥६॥
विभव त्य समयांतिल आयका
नवल कीं मग या व्रज - नायका
भजति वेष्टुनियां अति वो रसें
सुरस वेणुचिया अति वोरसें
वनीं राजहंसीं पिकोनीं शुकानी ॥७॥
ध्वनी गोड तो आइकोनीं सुकानीं
त्वरें येऊनी सेविलें श्रीहरीतें
महापापही नाम ज्याचें हरीतें ॥८॥
वदन लाउनि ते सकल क्षिती
नयन झांकुनि अन्य न लक्षिती
स्थिर मनें करुनी स्थिर आसना
करिती ते खग कृष्ण - उपासना ॥९॥
त्या खगीं क्षिति कितेक चावर
व्यापिली प्रभु गधें जिचा वर
भोंवतें विहग शोभते धरा
श्रीपती सह मनांत ते धरा ॥१०॥
क्रीडे असें आणिक पूतनारी
तें गाति अन्यारत पूतनारी
कीं ते वदे तें परिसा सया हो
घ्या एक चित्तेंचि रसास या हो ॥११॥
दिव्यहार बरवेच तुरे हो
कृष्ण रामहि असे चतुरे हो
तेधवां गिरितटीं निज पांवा
वाजवी हरि तसाचि जपावा ॥१२॥
स्वयें तुष्ट संतुष्टवीतो जगातें
अगांतें नगांतें मृगांतें खगांतें
असें क्रीडतां काळ मध्यान्ह झाला
घनें देखिलें तों सख्या त्या अजाला ॥१३॥
धरुनि साउलिही वरि हर्षतो
हळुहळू घन गर्जत वर्षतो
नव - विधा निज - भक्तिहि दावितो
समगुणें स्व - सखा हरि भावितो ॥१४॥
जगज्जीवन श्रीहरी आणि काळा
करीतो जगीं जीवनाच्या सकाळा
असो मेघही यानिमित्यें सखा हो
सुत्दृद्भाव ऐसा नसे आणिकां हो ॥१५॥
झणी उष्ण लागे सख्या केशवातें
ह्नणूनी त्वरें येउनी लेश वातें
मुकुंदा वरी मेघ तो छत्र झाला
करी स्वाऽत्मदेहाऽर्पण श्री अजाला ॥१६॥
करुनि सख्य निजाऽत्म निवेदना
घन भजे पाहिलें मधु सूदना 
प्रगट दास्यहि त्याचि मिषें करी
धरि धण्यावरि साउलि लौकरी ॥१७॥
छत्राऽत्मता अर्पुनियां अजाला
धरुनियां साउलि दास झाला
करुनिही स्वात्म निवेदनातें
दास्यें भजे श्री पुरुषोत्तमातें ॥१८॥
आणीक भक्तिरस जो शुक सूचवीतो
त्यांच्या क्रमेंच नृप घेत असे चवी तो
कीं मंदमंद घन गर्जतसे नभीं हो
शंका धरुनि तरि काय ह्नणूनि भी हो ॥१९॥
मेघ ध्वनी मुरलिहूनि विशेष होतो
तेव्हां घडे महदतिक्रम कीं अहो तो
शंका असी तरि उगा घनका असेना
हें मंद - गर्जन - निमित्त असें दिसेना ॥२०॥
न मांडूनि तेव्हां असी गर्जना ही
करी वृष्टि मौन्यें तरी वर्ज नाहीं
घडी एक वर्षे घडी एक राहे
उगा कां नसे मेघ टीका करा हे ॥२१॥
श्रवण भक्तिमधें घनराज तो
करुनि कीर्त्तन भक्ति विराजतो
स्वमनिं भाव असा शुक नेमुनी
कुशळ - बुद्धिसि वोढुनि ने मुनी ॥२२॥
हळूहळू घन गर्जतसे नभीं
मुरलिहूनि चढेल ह्नणोनि भी
श्रवण भक्तिं अतिक्रम वर्ज तो
करित कीर्तन ही घन गर्जतो ॥२३॥
मिळोनि गातां प्रभु - वेणु संगें
झणी चढे गर्जत त्या प्रसंगें
शंका जरी यावरि हे वदावी
तथापि भक्तिद्वय भाव दावी ॥२४॥
पुढें होउनी एक जो गाय नाचे
तसे संगती गाति त्या गाय नाचे
असा वेणु ऐकूनिही मेघ गातो
करी एकदां सर्व भक्ती अगा तो ॥२५॥
रंगांत एक हरिचे गुए गाय नाचे
संगी तसेच गुण गातिहि गायनाचे
ते साधिती श्रवण भक्तिहि गात सारे
बोले नृपास शुक मेघ अगा तसा रे ॥२६॥
वेगळ्या नवहि भक्तिरसांचा
एकदांचि करि आदर साचा
कीर्तन श्रवण भक्ति हि माजी
सूचवी शुक मुनींद्रसमाजीं ॥२७॥
या गर्जती श्रवण भक्ति नवांत मोजी
श्री व्यास तत्सुतहि त्यां उभयां नमोजी
तेथें दिसे स्मरण भक्तिचि सूचना ही
कीं विस्मृतीस अशि हे पदवीच नाहीं ॥२८॥
गोडी दिल्ही प्रति रसा सहि जी वनानें
भक्षूनि ते विविधही जन जीवना ते
भक्ति स्व येरिति जिणें स्मृतिजी वनानें
ते ही वनांत गणिली जग जीवनातें ॥२९॥
हें सूचवी श्रवण भक्ति हि मानवांत
श्रेष्ठत्व दाखवि जिचा महिमा नवांत
भूमी वरी पडति मेघ तुषार कांहीं
तें पादसेवन गमेचि शुकाऽदि कांहीं ॥३०॥
ह्नणे मुनी कीं सुमनें करुनी
वर्षे सख्यातें घन त्यावरुनी
धूतो जलत्वें पद या प्रकारें
केलीं तुषारें सुमनाऽनुकारें ॥३१॥
भूमि हे चरण माधवजीचे
सृष्टि वृष्टिहि पदें भव जीचे
वर्षतां क्षितिवरी सुमनातें
पाद - सेवन गमे सुमनातें ॥३२॥
वर्षे तुषार परि ते सुमनें शुकानें
भावें अशा कथियलीं अति कौतुकानें
ते मूर्तिचे पदहि धूउनि अंबुदानें
पुष्पांजळी मग दिल्ही निज - अंबुदानें ॥३३॥
चरणि तोयद सेवितसा पडे
निववितां तनु अर्चन सांपडे
स्नपन देत भजे कुसुमांजुळी
सुमन शब्दिं तसा महिमा जुळी ॥३४॥
नमस्कार सर्वात्म भावें करीती
तळींही तया देव तो एकरीती
वरुनी घन स्तब्ध तो वंदनाची
करी भक्ति नंदाचिया नंदनाची ॥३५॥
गीतेंतही अर्जुन वंदनातें
श्रीविश्वरुपा यदु नंदनातें
मागें पुढें ही करि सव्यसाची
सख्या नमी तो घन ही तसाची ॥३६॥

N/A

References : N/A
Last Updated : July 04, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP