वामन पंडित - लोपामुद्रा संवाद

कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.

वंदूनि श्रीराम संसार - साक्षी
ज्याचे अंकीं जानकी सारसाऽक्षी
लोपा मुद्रेसीं तिसीं शब्द - माला
झाल्या अंर्पू त्याचि सर्वोत्तमाला ॥१॥
मारुनि रावण विदेहि - सुता - श्रमातें
नासूनि ये कलश - संभव - आश्रमातें
तो सिंधु बिंदु करि हा मनिं गर्व वाहे
त्याची वधू विदितसे मति राघवा हे ॥२॥
न ती पुढें सेतु - कथा वदावी
ह्नणोनि सीते प्रति भाव दावी
बोलोनिही सांवरिजे स्ववाचा
हे शब्द तो सूचवि लाघवाचा ॥३॥
विचारी मनीं सर्व संसार - साक्षी
जन्ही वारिली जानकी सारसाऽक्षी
सदा सेतु - लीला निज - ध्यास तीतें
वदेल स्व - वाचें ऋषीचे सतीतें ॥४॥
यापरी कथुनि ते शुक - वाणी
राम - गोष्टि असि कौतुक - वाणी
क्षार - सिंधु करितांचि समुद्रा
हे करी कुशळ - बुद्धिस मुद्रा ॥५॥
सर्वा कथा कथि अगस्ति - वधूसि सीते
क्षाराब्धि - सेतु - रचना न कथीं सतीतें
कीं चूळ जो जलधिचा करि त्या मुनीची
कांता ह्नणेल तव वल्लभ - कीर्तिनीची ॥६॥
प्रमाण आज्ञा ह्नणवूनि रामा
वंदूनि जातां मुनिवर्य - धामा
पुसे तिला क्षेम तया प्रसंगीं
संवाद हा राघव विप्रसंगीं ॥७॥
राम तो स्व - रत नित्य विरक्त
हा नसेल तुजशीं अनुरक्त
कीं असेल सुख तें वद सीते
सांग गोष्टिहि सुख - प्रदसी ते ॥८॥
काय बोलत असे अभिराम
श्रांत तूज अवलोकुनि राम
सांग अणिकहि वल्लभ - वार्त्ता
ज्या कथा करिति सौख्य भवाऽर्ता ॥९॥
स्व - रत अद्वय राम असे खरें
मजसि याचि गुणें रघु - शेखरें
स्थिर चराऽत्मपणें रमणें सये
जरि अहं ममताऽदिन यास ये ॥१०॥
विरक्त बाई रघुराज साचा
भोक्ता नव्हे राजस तामसाचा
नया बहू कल्पतरुपमातें
हे सोहळे कल्पित - रुप मातें ॥११॥
जसि बहु रवि - तप्ता साउली गोड वाटे
तसि वनिं पति - लाडें मानित्यें कोड वाटे
घरिहुनि मज बाई सोहळे काननाचे
सजल जलद संगें मोर वो का न नाचे ॥१२॥
पथीं भागे मागें परम - अनुरागें रघुपती
उभा राहे पाहे गुणहि मुनि हे हेचि जपती
कृपा पांगें अंगें निववि करि संसार धिवसा
धरा माता भ्राता शशिच सविता होय दिवसा ॥१३॥
रघुपति सह शय्या भूमि हे माय वाटे
मृदु सुपति हुनी ही मायत्या पाय वाटे
श्वशुर दिनमणी ही होय एणाक भाऊ
न कळत जन ऐसें क्लेश निःशेष भाऊं ॥१४॥
पवन वन - सुवासें उष्ण होतांचि वाटे
उपजवि सुख पुत्रा स्वामिनी ज्यासि वाटे
तनु करि अनुसूया नित्य बोली सुगंधें
नव्हति अजुनि बाई म्लान पुष्पें सुगंधे ॥१५॥
तिघें पावलों अत्रिच्या आश्रमातें
तयाची वधू ते हरी वो श्रमातें
तंई हार हे गंध लाऊनि घाली
स्व आतिथ्य कौशल्य दाऊं निघाली ॥१६॥
ये देखतां बहु कृपा मज दत्त - माते
पूजूनि ये रिति वदे सति उत्तमा ते
वेणी फणी करिल वो तुज कोण वाटे
वाईट हें मज म्हणे सति फार वाटे ॥१७॥
म्लानता कधि न यो सुमनातें
केश क्लेश न करुन मनातें
गंध आर्द्रचि असो अनसूया
दे असा वर न जीस असूया ॥१८॥
करतळ न दुखोंदे फोड वो जेवि पाणी
वनिं धरि मन माझें येरिती चाप - पाणी
कनक - मृग म्हणें तों पाटिसी राम लागे
दश - मुख हरि ऐश्या माजि मेला मला गे ॥१९॥
मृग प्राण सोडी तंई दीन वाणी
अरे लक्ष्मणा धांव ऐसी सुवाणी
वदे तों मला राम वाणीच वाटे
ह्नणोनी बळें लाविलें त्यास वाटे ॥२०॥
न जातां तया बोलिलें दुष्ट वाचा
अरे घात तूं इच्छिसी राघवाचा
तुला प्राप्त होणार कां देवरा मी
धरीसी असा कां म्हणे भाव रामीं ॥२१॥
अशा शब्द - बाणीं सुमित्रात्मजाला
अवो विधितां तो मृत प्राय जाला
रडे जाय तो राघवा लोक - पाळा
करुं काय आतां ह्नणे मी कपाळा ॥२२॥
जाय तो रडत दाढत कंठ
प्राप्त होय मजला दश - कंठ
पद्मिनी उपडितो गज हस्तीं
ने तसा उचलुनी मज हस्तीं ॥२३॥
असि सकळ अनर्था मूळ माझीच वाणी
धरुनि मज पळे तैं होय मी दीन वाणी
बहुत मज निमित्यें राघवें शोक केला
करुण ह्नणुनि न स्त्री काम कामीं भुकेला ॥२४॥
मजनिमित्त करी गडि वानरां
सुलभ जो न सुरां अथवा नरां
धरि मदर्थ असा व्यवसाय कीं
दश - सुखा वधि राघव सायकीं ॥२५॥
धरि करीं कमला कमला - पती
मथुनि सिंधु तसाचि मला पती
जलधि मध्य पुरींत तिचा धणी
वधुनि दे मज आत्म - सुखें धणी ॥२६॥
जे जळांत बुडणार तीव्र ते
थोर पर्वत अवो पतिव्रते
सागरीं तरति सेतु - वाट ते
हे अतर्क्य करणीच वाटते ॥२७॥
परततां जल धीवरि पाहतें
तरति पर्वत विस्मित राहतें
जळ तळीं वरि हो धरणी सवे
करि नसे तुलना करणीस ये ॥२८॥
समुद्रावरी सैन्य ये पाय - वाटे
मनीं हें सदां जीस आश्चर्य वाटे
कसी सेतुची गोष्टि तीच्या सुवाचे
नये बोल ते वीसरे राघवाचे ॥२९॥
शरीरीं भरे वर्णितां राम - वारें
उठाणें मनाची तंई दुर्निवारें
पतीची यशें जे निरोपीत जाते
वदे गोष्टि हेही विदेहाऽत्मता ते ॥३०॥
विदेहाऽत्मजा पावली विस्मृतीतें
ह्नणे बांधला सिंधु जों त्या सतीतें
जसें हास्य ये स्वामिचे भारतीतें
स्मरे तों स्फुरे हा चमत्कार तीतें ॥३१॥
क्षाराऽब्धि - सेतु झणि सांगासि तीस सीते
जीचा पती जळधि चूळ करी तसीने
शब्दांत या रघुपतीच खुणेस दावी
कीं क्षार मूत्र असि गोष्ट पुन्हा वदावी ॥३२॥
ह्नणे लोपामुद्रा चुळ भरि समुद्रा करि पती
तया या आयासें - करुनि उतरे कां रघुपती
द्विजाच्या हो मूत्रा शिवति अपवित्रा न कपि ते
ह्नणे सीता नाहीं तरि सगिरि - सप्ताऽब्धिहि पिते ॥३३॥
लोपामुद्रेसीं असा राघवाचा
संवाद श्री जानकीची सुवाचा
बोले वाणी बुद्धि जे वामनाची
वर्णी रामीं हेचि सेवा मनाची ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 04, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP