वामन पंडित - वामनचरित्र

कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.

इंद्राचे पद दैत्यराज बळि तो विप्रप्रसादें हरी
तेव्हां कश्यप - मंदिरीं अदितिच्या दिव्यव्रतें श्रीहरी
झाला वामन मुंजि तेचि समयीं होतांचि भिक्षा छळें
सर्वस्व त्रिपदें हरी स्मर मना त्याचीं पदे कोमळे ॥१॥
बळी याग तो नर्मदेच्या तटाकीं करी आहुती श्रुक अग्नींत टाकी
अकस्मात तों देखता वामनाला सुखाचा गमें पूर्ण ठेवा मनाला ॥२॥
करिं कमंडलु दंड मृगाजिन त्रिजग - माप करी बटु वामन
सकळ - वेद - विशारद चांगला कटितटीं अति सुंदर मेखला ॥३॥
श्रुतिमयें वचनें वदतां बटु वळिमखाप्रति अद्भुत ये बटु
लुटलुटां द्विजअर्भक येकटु करि उदार कथा भलता लटु ॥४॥
करिं कमंडलु ये जगजीवन त्रिजग उद्धरि जो पदजीवन
स्ववचनें बळिचें मन मोहरी रुचिर वामन - पाद नमो हरी ॥५॥
देखोनि ऐशापरि त्या द्विजाला चित्तीं बळीच्या बहु तोष झाला
येऊनियां सन्मुख पाव वंदी वर्णी गुणा होउनि भाट बंदी ॥६॥
पूजी बळी मग म्हणे बटुवामनातें
कीं माग जें तुज अभीष्ट गमे मनातें
देणार गा इतर मी मज काम नाहीं
जें माग तं पुरवितों तव कामना ही ॥७॥
म्हणे धन्य राया स्व - वंशानुसारा प्रभू बोलसी हा तुझा बोल सारा
रणीं आणि दानीं तुझीया कुळीं रे नदे पाठ कोण्हीच राया बळी रे ॥८॥
राया मला एक असे अपेक्षा त्यावेगळी सर्व झणी उपेक्षा
मोजूनि माझ्या त्रिपदेंचि मातें दे भूमि वीप्र - प्रवरोत्तमातें ॥९॥
बळि म्हणे अति सादर वामना बहुत वाटसि गा बरवा मना
मज अशा भुवन - त्रय - पाळका बहुत मागसि कां द्विज - बाळका ॥१०॥
शब्द मी धरिन मस्तकावरी ब्राम्हणा अधिक भूमिका वरीं
वाटसी बहुत नेटका मना जे असेल वद नीट कामना ॥११॥
द्विजसुता तुझिया वचनाऽमृतें मज गमे उठतील शवें मृतें
निपुण दीससि निर्मळ आरसा परि न मागसि अर्थहि फारसा ॥१२॥
हरि म्हणे मजला इतुकें पुरे त्रिभुवनात्मक होउनियां उरे
त्रिपदमात्रचि कार्य असे अरे अधिक मागति लोक न ते बरे ॥१३॥
शब्द भाव बळिला न आकळे श्रुक सन्निध तयासि तें कळे
तो म्हणे भुज सभे उभारुनी त्या बळी प्रतीच हाक मारुती ॥१४॥
अदितिच्या उदरीं हरि जन्मला म्हणुनि येसमयीं कळलें मला
विभव राज्य हरील समस्त रे यशहि विश्रुत होइल अस्त रे ॥१५॥
म्हण न देउंशकें तुज मी अगा वइस मौनपणें अथवा उगा
म्हणसि देइन यावरिही जरी रिघसि दाटुनि पातक - पंजरीं ॥१६॥
संकल्प जो तूं करसील बापा न देववे पावसि सद्य पापा
परद्वयें विश्व नुरेचि जेव्हां जासील राया नरकासि तेव्हां ॥१७॥
करुनि संकल्प न दे द्विजा तो प्रानि स्व - पापें नरकासि जातो
आधींच नेदी म्हणतां भला हो घेसी झणी वैखरिमाजि लाहो ॥१८॥
जरि विचारुनि गोंविसि वैखरी तरिच होइल जाण अगा खरी
म्हणुनि श्रुक अजी बहु बोलतो परि वदों वदला बळि बोल तो ॥१९॥
विचारुनि आचार्य - वाचा निदानीं बळी तों धरी बुद्धि सर्व स्वदानीं
म्हणे बोलतां ते जरी सत्व वाणी द्विजा केविं वाचा वदों दैन्यवाणी ॥२०॥
हे भूमि वेश्या इसिं सर्व जाती भोगूनियां मृत्युमुखासि जाती
लोभे इच्या लंघुनि विप्र - वाणी धिक् बोलणें वैखरि दीनवाणी ॥२१॥
निगमविधि विधानें मोडुनी हे पसारे
यजुनि विविध - यागीं वंदिती यासि सारे
वरद हरिच तो हो विप्र कोण्हीच हा जी
कितितरि मज मागो भूमि देतों अहो जी ॥२२॥
सर्वस्व - दानीं बळि सिद्ध झाला पूज्यासनीं बैसविलें द्विजाला
प्रक्षाळि तों श्री - पद - पंकजातें ध्याती रमा अब्नभवादि ज्यातें ॥२३॥
आली समीप यजमानिन पट्टराणी
पाहे हरीस नपुरेच जिची शिराणी
ओती करीं कनक - पात्र धरुनि वारी
सर्वस्व दे पति तयास न जे निवारी ॥२४॥
कुंभस्तती कनक - कुंभ धरुनि पाणी
ओती मणी चपळ नासिकिंचे सुपाणी
भी लावितां बळि पदीं स्वकठोर पाणी
सर्व स्व - पात्र बळिचें हरि चक्रपाणी ॥२५॥
विध्बुक्त संकल्प करुनि पाणी घालूं म्हणे पूजुनि चक्रपाणी
निघे न झारींतुनि नीर - बिंदू म्लानत्व पावे बळिचा मुखेंदू ॥२६॥
कीं श्रुक झारींत रिघोनि गोळा करुनि अंगें अजि होय बोळा
फोडी हरी घालुनि दर्भ डोळा जना दिसे विप्र - कुमार भोळा ॥२७॥
पूजुनि ऐसेरिति दनवाऽरी घाली करीं तें बळि दान - वारी
म्हणे स्वपादीं अजि भूमि मोजीं जे अर्पिली त्याचि पदी नमो जी ॥२८॥
संकल्प - युक्त पडतां स्वकरांत पाणी
वाढे त्वरेंकरुनि वामन चक्रमाणी
पाताळ पादतळ मस्तक सत्यलोकीं
कानीं दिशा दिनमणी नयनाऽवलोकीं ॥२९॥
एक्या पदें भूमि भरुनि थोडी पायें दुज्या अंडकटाह फोडी
दे तीसरा पाद म्हणे बळीला म्हणोनि पाशें दृढ आकळीला ॥३०॥
पदयुगें भुवनत्रय मोजिलें बळि - शिरीं तिसरें पद योजिलें
पदनखें विधि - अंड विदारिलें पदजळें भुवन - त्रय तारिलें ॥३१॥
त्याकारणें प्रार्थुनियां हरीची करी स्तुती प्रेमरसें विरंची
प्रर्‍हाद आजा बळि - भूपतीचा आला महाभक्त रसापतीचा ॥३२॥
म्हणे तुवां हे दिधली त्रिलोकी नेली तुंवा पूर्ण कृपावलोकीं
केला तुवां दंड कृतार्थ झाला प्रर्‍हाद इत्यादि वदे अजाला ॥३३॥
यत्नी बळीची जगदीश्वरातें वंदूनि बोले कमळावरातें
म्हणे धणी तूंचि चराचराचा वृथाभिमान प्रभुजी नरांचा ॥३४॥
सर्वाचिया आइकतां स्तुतीतें बोलावुनी त्याच महामतीतें
म्हणे बळी दे तिसर्‍या पदातें कीं भोगिं पापें बहु आपदांतें ॥३५॥
करुनि संकल्प न देसि जेव्हां जासील राया नरकासि तेव्हां
बळी म्हणे देइन देवराया आहेंचि संकल्प खरा कराया ॥३६॥
तैसा न भी मी नरकासि देवा या पाश - बंधासिहि वासुदेवा
न भी सुरांच्या जय - वाद्य - नादा भीतों तसा मी अपकीर्तिवात ॥३७॥
करुनि संकल्पहि तूज देना कोणी मला धन्य जगीं वदेना
माझ्या शिरीं ठेविं तिज्या पदातें जें छेदितें सर्वहि आपदांतें ॥३८॥
करी बळी स्वात्म - निवेदनातें संतोष ज्याणें मधुसूदनातें
दैत्येंद्र तात्काळचि मुक्त केला प्रेमाऽमृताचा हरि हो भुकेला ॥३९॥
देऊनियां सुतळ - राज्य अखंड दारीं
राहोनियां बळिचिया गृह - पुत्र - दारीं
झाला जसा त्दृदय - मंदिरिं वामनाच्या
वृत्ती चिदात्मक करी अवघ्या मनाच्या ॥४०॥

घनाक्षरी -

करीं कमंडलु दंड दावी कौतुक उदंड
ध्यावा त्दृदयीं अखंड भव - गज - केसरी
सुखी सर्वाचेही मन करी कमळ - नयन
सहस्त्रानन शयन दावी शब्दकूसरी
इंद्रासी दे इंद्रपद बळी - मस्तकी स्वपद
गंगा आणुनि त्रिपद जगीं पुण्य पसरी
पायीं पावन जीवन कथा जिवांचें जीवन
ऐसा वामनीं वामन नेणे बुद्धि दूसरी ॥१॥
अहो बळी भाग्यवंत ज्याचे द्वारीं भगवंत
देतां जग अंतवंत अनंतत्व पावला
देऊनियां तिन्हि लोक अणुमात्र नेणें शोक
मस्तकीं हें पुण्य श्लोक चरणीं झेंपावला
सर्व अर्पुनिही धीर तिज्या - पावलासि धीर
देतां न लावी उशीर आनंद दुणावला
शाप देतां श्रुक खळ तहिं नव्हेचि वीकळ
दान करुनि सकळ म्हणे डाव फावला ॥२॥
इंद्राहुनिही कल्याण करी बळीचे सुजाण
तया देवाचीच आण नव्हे गोष्टि लटकी
केला इंद्र भाग्यवंत देउनियां अंतवंत
संपदा त्या भगवंत करी त्याच्या वटकी
इंद्र इंद्रपद - दास बळी त्यावरी उदास
दासीसम ज्या पदास लेखिना नीपटं कीं
म्हणुनीयां विश्वपाळ झाला द्वारीं द्वारपाळ
जयापाशिं सर्वकाळ असुरांच्या कटकीं ॥३॥
बळीं हाचि सत्वगुण त्यासि करी हो निपुण
भाग्य अपत्तीचि खूण कळतां जो सांपडे
तंतुलागीं सर्व पट देतां काय खटपट
तैसें अर्पितां निपट विश्व हें न सांपडे
ऐसें दान देतो सत्व नुरे त्यासही भिन्नत्व
आत्म - निवेदन तत्व नेणती हे बापुडे
व्यर्थ घेउनी संन्यास व्यर्थ दाविती अन्यास
होतां वामनीं हा त्यास कर्मशेंडी ऊपडे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 29, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP