कार्तिक माहात्म्य - अध्याय ३७

कार्तिक माहात्म्य वाचल्याने गतजन्मातील पापे नष्ट होतात.

शंकर म्हणालेः-- स्कंदा, प्रबोधिनीचे माहात्म्य पाप - नाशकर पुण्य वाढविणारे व तत्त्वज्ञान्याला मुक्ती देणारें आहे, ते श्रवण कर ॥१॥
कार्तिकांतील हरिबोधिनी जोंपर्यंत आली नाहीं तो पर्यंतच भागीरथी पृथ्वीवर पवित्रतेची गर्जना करील ॥२॥
विष्णुप्रिया हरिबोधिनी एकादशी येईपर्यंतच समुद्रसहित सर्व तीर्थे पवित्रतेचीं गर्जना करितील ॥३॥
प्रबोधिनी एकादशीचें एक उपोषण केलें असतां हजार अश्वमेध केल्याचें व शंभर राजसूय यज्ञ केल्याचें पुण्य प्राप्त होतें ॥४॥
या चराचर त्रैलोक्यांत जें दुर्लभ व कठिण असेल, तें सर्व इच्छिलें असतां प्रबोधिनी व्रत प्राप्त करुन देतें ॥५॥
प्रबोधिनीचा सहज उपास केला तरी ऐश्वर्य, संतति, ज्ञान, राज्य, सुखसंपत्ति हीं प्राप्त होतात ॥६॥
मेरुमंदर पर्वताएवढी जरी पातकें घडलीं असलीं, तरी एका प्रबोधिनेच्या उपवासानें तीं सर्व नष्ट होतात ॥७॥
प्रबोधिनीचा उपवास समजून जो यथाविधि करील त्याला यथोक्त संपूर्ण फल मिळतें ॥८॥
प्रबोधिनीला जागरण केलें असतां पूर्वीच्या हजार जन्मांत जें पातक घडलें असेल, तें सर्व कापसाच्या राशीप्रमाणें सहज जळून जातें ॥९॥
हे स्कंदा ! तुला जागराचें लक्षण सांगतों ऐक. जें समजलें असतां विष्णूची प्राप्ति दुर्लभ नाहीं ॥१०॥
जागरांत गायन, वाद्यें, नाचणें, पुराण वाचणें, धूप, दीप, नैवेद्य, गंध, फुलें , अर्घ्य फल अर्पण करणें ॥११॥
श्रद्धापूर्वक दान, इंद्रियनिग्रह, सत्यभाषण, झोंप न घेणें, आनंदयुक्त असणें इत्यादि क्रियायुक्त असणें ॥१२॥
आश्चर्य व उत्साहयुक्त मन असून आलस्यरहित राहून प्रदक्षिणा नमस्कार करणें ॥१३॥
हरीला प्रहरा उत्साहित अत करणानें ओंवाळून आरती करणें ॥१४॥
अशा सर्व उपचारांनीं युक्त एकग्रमनानें जागरण करावें, म्हणजे त्याला पुन्हा पृथ्वीवर जन्म प्राप्त होणार नाहीं ॥१५॥
शक्तीप्रमाणें द्रव्य खर्च करुन भक्तीनें हरिजागर करितो, तो परमात्याचे सायुज्य मुक्तीला जातो ॥१६॥
जो कार्तिक महिन्यांत पुरुषसूक्तानें नित्य हरीची पूजा करितो, त्यानें हजारकोटी वर्षे विष्णूची पूजा केल्याप्रमाणे आहे ॥१७॥
नारदपंचरात्रांत सांगितलेल्या विधानाप्रमाणे जो कार्तिकांत नित्य पूजा करील त्याला मुक्ति प्राप्त होते ॥१८॥
कार्तिकांत '' नमो नारायण '' या मंत्रानें जो नित्य पूजा करील तो नरकाचे दुःखा पासून मुक्त होऊन, नित्य अविनाशी अशा वैकुंठस्थानाला जातो ॥१९॥
जो कार्तिकांत विष्णुसहस्रनाम व गजेंद्रमोक्ष नित्य पठण करील, त्याला पुनः जन्म प्राप्त होणार नाहीं ॥२०॥
कार्तिकांत द्वादशीला जो जागर करितो तो हजार कोटी युगें व शंभर मन्वंतरें होईपर्यंत स्वर्गांत वास करील ॥२१॥
हरिजागर करणार्‍याच्या शंभर कुलांमध्यें जे हजारों मनुष्य जन्मास येतील त्यांनाही वैकुंठप्राप्ति होईल, म्हणून जागर अवश्य करावा ॥२२॥
कार्तिकांत रात्रीं शेवटच्या प्रहरीं जे हरीचें स्तवन, गायन करितील, ते आपल्या पितरांसह श्वेतद्विपांत राहतील ॥२३॥
पूर्वरात्रीं जे हरीला नैवेद्य अर्पण करितील, ते अनंतयुगे स्वर्गांत राहतील ॥२४॥
हे ऋषीहो, जे मालती व कमळें यांनी देवदेवेश विष्णूची नित्य पूजा करितात, त्यांना उत्तम पद प्राप्त होते ॥२५॥
कार्तिकशुक्ल एकादशीला उपोषण करुन द्वादशीला सकाळीं उत्तम प्रकारचे कुंभ उदक भरुन दान द्यावे म्हणजे त्याला माझ्या वैकुंठाची प्राप्ति होईल ॥२६॥
कार्तिकेय म्हणतातः-- शंकरा, आपण सांगितलें कीं, कार्तिकव्रतांमध्यें उत्तम असें भीष्मपंचक व्रत करावें ॥२७॥
तर हे मुनिश्रेष्ठा शंकरा ! त्याचें विधान काय व तें केल्याचे फल काय तें कृपा करुन सांगावें ॥२८॥
ईश्वर म्हणालेः-- महापुण्यकारक सर्व व्रतांत श्रेष्ठ असें पांच दिवसांचें हे भीष्मपंचक व्रत सांगतों ॥२९॥
हें व्रत भीष्माला वासुदेवापासून मिळालें, म्हणून या व्रताला भीष्मपंचक म्हणतात. याचा महिमा केशवाशिवाय वर्णन करण्याला कोण समर्थ आहे ॥३०॥
कार्तिक शुक्लपक्षांतील पुरातनधर्मरुप हे भीष्मपंचक व्रत कृतयुगांत वसिष्ठ, भृगु, गर्ग इत्यादि ऋषींनी आचरिले आहे ॥३१॥
त्रेतायुगांत अंबरीषादिकांनी आचरिलेलें ब्राह्मणांनी ब्रह्मचर्यांचा नेम करुन व होम करुन आचरिलेले ॥३२॥
सत्य व शुद्ध आचरण करणारे क्षत्रिय, वैश्य यांनी आचरिलेले असें आहे. हे व्रत सत्यहीन मूर्ख बुद्धिचे लोकांना घडणें कठीण आहे ॥३३॥
भीष्म म्हणजे करण्याला कठीण असे हें व्रत प्राकृत जनांला घडणें कठीण आहे; याकरितां जो हें करील, त्यानें सर्व व्रतें केल्याप्रमाणें आहे ॥३४॥
हें भीष्मपंचक व्रत मोठें पुण्यकारक व सर्व पापें नाहीसें करणारें आहे, म्हणून मनुष्यांनी मोठ्या प्रयत्नानी करावे ॥३५॥
कार्तिकशुक्लपक्षामध्यें एकादशीला यथाविधि प्रातः स्नान करुन पांच दिवसांचें भीष्मपंचकव्रत ग्रहन करावे ॥३६॥
व्रत घेणारानें प्रातः स्नान करुन दोन प्रहरीं पुनः गाईचे शेण अंगाला लावून नदी, झरा अगर विहीर यांत स्नान करावें. उत्तम प्रकारें यवांनी देवांचे, तांदुळांनी ऋषीचें व तिळांनीं पितराचें तर्पण करावें. स्नान केल्यावर बोलूं नये. धुतलेली स्वच्छ वस्त्रें नेसावी व पांघरावीं ॥३७॥३८॥
भीष्माचें तर्पण करावें. अर्घ्य द्यावें. भीष्माची पूजा करुन दानें द्यावीं ॥३९॥
विशेंषेंकरुन ब्राह्मणाला पंचरत्नें द्यावीं. लक्ष्मीसह वासुदेवाची पूजा करावी ॥४०॥
अशी पांच दिवस पूजा केली असतां कोटि जन्म सुख मिळतें ॥४१॥
हें व्रत केल्यानें एक वर्षांतील सर्व व्रतांचें फल प्राप्त होतें. भीष्माचें पुढील मंत्रानें तर्पण करावें. अर्घ्यदान करावें म्हणजे मुक्ति मिळते ॥४२॥
मंत्रार्थः -- '' ज्याचें गोत्र वैयाघ्रपाद, प्रवर सांकृत्य व ज्याला अपत्य नाहीं, त्या भीष्माला उदक देतों '' ॥४३॥
वसूंचा अवतार, शंतनूचा पुत्र, आजन्म ब्रह्मचारी असणार्‍या अशा भीष्माला मी अर्घ्य देतो '' ॥४४॥
अशा विधीनें जो भीष्मपंचकव्रत समाप्त करील, त्याला अश्वमेध यज्ञाचें पुण्य मिळतें ॥४५॥
याप्रमाणें यत्नानें पांच दिवस व्रत करावें. या महिन्यांत नियमावांचून राहूं नये ॥४६॥
उत्तरायण नसतांनाही हरीनीं भीष्माला हे पांच दिवस दिले. हे पांच दिवस शुभ आहेत. या पांच दिवसांत लग्नशुद्धि शुभवेळा पाहण्याचें कारण नाहीं ॥४७॥
प्रथम सर्व पापें नाहींशी करुन मोक्ष देणार्‍या हरीची पूजा यत्नानें करावी. नंतर भीष्मपंककव्रतविधि करावा ॥४८॥
श्रीकृष्णाला उदकानें दूध, दहीं, मध, तूप, साखर या पंचामृतानें स्नान घालावें. नंतर सुवासिक गंधाच्या पाण्याने स्नान घालावें. ॥४९॥
नंतर चंदन, केशर, कापूर, वाळा यांचें गंध करुन तें गरुडध्वजाचें अंगाला लावावें ॥५०॥
नंतर भक्तीनें सुंदर सुवासिक पुष्पें वाहून गुग्गुळ तूप मिश्रित सुगंधी धूप दाखवावा ॥५१॥
पांच दिवस सारखा नंदादीप ठेवावा. खीर व पक्कान्नांचा नैवेद्य अर्पण करावा ॥५२॥
याप्रमाणें विष्णूचें पूजन करुन नामस्मरण करीत नमस्कार घालावे. ' ॐ नमो भगवते वासुदेवाय ' असा एकशें आठ वेळा जप करावा ॥५३॥
धृत, तीळ, तांदूळ, यव, यांनी सहा अक्षरांच्या कृष्णमंत्रानें होम करावा ॥५४॥
संध्याकाळची सध्या करुन गरुडध्वज भगवंताला नमस्कार करावा. पुन्हा मंत्र जपून भूमीवर निजावें ॥५५॥
याप्रमाणें पांच दिवस करावें. या व्रतांत ज्या योगानें व्रत पूर्ण होतें असें विशेष आहे तें ऐक ॥५६॥
व्रत करणार्‍यानें पहिले दिवशीं कमळांनीं देवाचे पायांची पूजा करावी; दुसरे दिवशी बेलाच्या पानांनी गुडघ्यांनी पूजा करावी ॥५७॥
नंतर पुढें मालतीनें देवाच्या मस्तकावर पूजा करावी. याप्रमाणें कार्तिकांत मोठ्या भक्तीनें हरीकडे अंतःकरण ठेवून त्याची पूजा करावी ॥५८॥
एकादशीला पूजा करुन गोमय ( गाईचें शेण ) प्राशन करुन उपवास करावा ॥५९॥
द्वादशीला गोमूत्र मंत्रयुक्त प्राशन करावें, त्रयोदशीला दूध प्यावें व चतुर्दशीला दहीं प्यावें ॥६०॥
देहशुद्धीकरितां याप्रमाणें प्राशन करुन चार दिवस उपवास करावा; पांचवेदिवशीं स्नान करुन यथाविधि देवाची पूजा करावी ॥६१॥
ब्राह्मणाला भोजन घालून दक्षिणा द्यावी, पापबुद्धि टाकून बुद्धिमंतांनी ब्रह्मचर्यानें रहावें ॥६२॥
मद्य, मांस, पापकारी मैथुन वर्ज्य करावें. भाजीपाल्यांचा आहार करुन कृष्णपूजेंत तत्पर असावें ॥६३॥
पंचगव्य घेऊन संध्याकाळी भोजन करावें. याप्रमाणें व्रताची समाप्ति करणाराला संपूर्ण फल मिळतें ॥६४॥
जन्मापासून मरेपर्यंत दारु पिणारा असला तरी हें भीष्मपंचक केलें असतां तो मोक्षास जातो ॥६५॥
बायकांनींही नवर्‍याचे आज्ञेनें हें धर्म वाढविणारे व्रत करावें म्हणजे धर्मवृद्धि होते. विधवांनीं केले असता मोक्ष व सुख प्राप्त होतें ॥६६॥
हे स्कंदा ! कार्तिकांत नित्यस्नान, दान, उपवास केल्यानें सर्वकर्मसमृद्धि, पुण्य व अर्थ प्राप्त होतात ॥६७॥
विष्णुभक्तांनी वैश्वदेव करावा, म्हणजे आरोग्य व पुत्रप्राप्ति होऊन महापातक नाहींसे होतें ॥६८॥
कार्तिकव्रताची समाप्ति प्रयत्नानें तीर्थाचे ठिकाणीं करावी. सर्व संवत्सरव्रतांची समाप्ति कार्तिकांत करावी ॥६९॥
एक सोन्याची पापाची प्रतिमा भयंकर सुखाची अशी करावी, जिच्या हातांत खङ्ग, लोहाच्या दाढांनी भयंकर, काळीं वस्त्रे गुंडाळलेली, अशी एक शेर तिळांच्या ढिगावर ठेवावी ॥७०॥
तांबड्या फूलांच्या तुरा व सोन्याची झगझगीत कुंडले घालून तिची भक्तीनें यमधर्माच्या नांवानें पूजा करावी ॥७१॥
ओंजळीत फुलें घेऊन पुढील मंत्रांनीं प्रार्थना करावी.
'' मी पूर्वजन्मीं व या जन्मीं जें पातक केलें असेल तें तुझ्या पायाच्या प्रसादानें नाहीसें होवो.'' याप्रमाणे विधिपूर्वक पूजा करुन ती सोन्याची प्रतिमा ॥७२॥७३॥
सर्व दुःखाचा परिहार करणारा भगवान् श्रीकृष्ण याच्या संतोषाकरितां वैदिक ब्राह्मणाची पूजा करुन ॥७४॥
मंत्र पूजा सांगणार्‍या ब्राह्मणाला यथाशक्ति दक्षिणा देऊन, धर्म प्रसन्न होवो, असें म्हणून दान करावी ॥७५॥
सोनें व गाय वाचक ब्राह्मणाला देऊन श्रीकृष्णाला अर्पण असो असें म्हणावें. याप्रमाणें सर्व कृत्य झाल्यावर विरक्त जितेंद्रिय होऊन स्वस्थ असावें ॥७६॥
इतरांनाही शक्तीप्रमाणें दानें करावी. त्या योगानें शांतचित्त व निरोगी होऊन मनुष्य उत्तमपदाला जातो ॥७७॥
नीलकमलाप्रमाणें शामवर्ण ज्याला चार दाढा, चार भुज, आठ पाय, ज्यास एक डोळा, शंकूसारखे कान व मोठा आवाज मस्तकाला जटा, दोन जिभा, लाल डोळे, सिंहासारखें रुप धारण करणार्‍या नरहरीचें चिंतन करावें ॥७८॥७९॥
शरपंजरीं असतांना भीष्मानें याप्रमाणें मला सांगितलें हें करण्यास कठीण असें भीष्मपंचक व्रत मी तुला सांगितलें
॥८०॥
धर्मराजा ! हें धन्य, पुण्य कारक, पाप घालविणारें, मोठें व्रत आहे. हें केलें असतां ब्रह्महत्या व गोहत्या करणारे देखील पापापासून मुक्त होतात ॥८१।
एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पांच दिवसांचें हें भीष्मपंचक व्रत पृथ्वीवर प्रसिद्ध असलेलें सांगितले. भोजन करणाराला याचा निषेध आहे. तें व्रत करणाराला विष्णु शुभ फळ देतात ॥८२॥
सूत म्हणालेः-- हें व्रत सर्वापेक्षां अधिक पुण्य देणारें, कलीमध्यें दुर्लभ असें आहे. शस्त्रांतील सार व गुह्य हें व्रत मी तुम्हाला सांगितलें ॥८३॥
देवांना देखील माहीत नाहीं, असें गुप्त गुह्य असून मोक्ष देणारें असें आहे; हें ऐकले असतां अगम्य स्त्रियांशीं रत होणारे, कन्येचा व बहिणीचा विक्रय करणारे हे सर्व दोषमुक्त होतात. मोक्ष देणारें हें शास्त्र इतर लोकांना उघड करुन सांगूं नये ॥८४॥८५॥
हें एक समयीं ऐकिलें असतां मनुष्याला मोक्ष मिळतो. जे अधर्मी आहेत त्यांपासून हें गुप्त ठेवावें ॥८६॥
षण्मुखा, त्यांना हें पुण्यव्रत खचित सांगूं नये. याप्रमाणें हें सर्व तुला कार्तिकाचें फल सांगितलें ॥८७॥
विष्णु म्हणालेः-- शंकरांनी कार्तिकेयाला सर्वांच्या कल्याणाचे इच्छेनें ही कथा सांगितलीं. पित्यानें सांगितलेली कथा ऐकून षडाननाला फार आनंद झाला ॥८८॥
सर्व जण हात जोडून जगच्चालक शंकराला म्हणाले, आम्ही कार्तिकाचें माहात्म्य ऐकून कृतकृत्य झालों ॥८९॥
आतां दुसरें कांहीं ऐकावयाचें राहिले नाहीं. आमचे जन्म सफल झालें. हें माहात्म्य ऐकून पुराण वाचणाराची पूजा करावी ॥९०॥
तो विष्णुतुल्य आहे असें समजून त्याला गाय, जमीन, सोनें, वस्त्रें, द्यावी, त्याची पूजा केली असतां विष्णूची पूजा केल्याचे फल आहे ॥९१॥
म्हणून ज्याला शुभदायक फलप्राप्ति व्हावी अशी इच्छा असेल त्यानें त्या वाचकाची नित्य पूजा करावी ॥ धर्मेच्छूंनीं पुराण सांगणारांना धर्मशास्त्र, पुराण, वेदविद्या इत्यादि पुस्तकें दान करावीं. पुराणविद्या दान करणाराला अनंत फल मिळतें ॥९२॥९३॥
हें माहात्म्य जे पठण करतील व भक्तीनें ऐकून ध्यानांत ठेवितील, ते सर्व पापांपासून मुक्त होऊन विष्णुलोकास जातील ॥९४॥
माहात्म्य श्रवणापासून धन, धान्य, यश, पुत्र, आरोग्य हीं निःसंशय प्राप्त होतात ॥९५॥
सूत म्हणालेः-- कृष्णाचा व सत्यभामेचा संवाद, तसाच नारदाचा व पृथुराजाचा संवाद तुम्हांला सांगितला. आणखी कांहीं विचारण्याची इच्छा असल्यास प्रश्न करा, मी विस्तारानें कथन करितों ॥९६॥
हें सूताचें भाषण ऐकून सर्व ऋषि आनंद पावले व एकमेकांशीं कांहीं न बोलतां स्वस्थ राहिले ॥९७॥
व सर्व शांत मनानें बदरीनारायणाचे दर्शनाकरितां निघून गेले ॥९८॥
इति श्रीपद्मपुराणे उत्तरखण्डे कार्तिकमाहात्म्ये श्रीकृष्णसत्यभामासंवादे सप्तत्रिंशोऽध्यायः ॥३७॥
इति कार्तिकमाहात्म्यं संपूर्णम् ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP