नाम सुधा - अध्याय १ - चरण ३

’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.


शुक्र म्हणे मुनि आइक राजया

द्विज अजामिळ - नाम कनोजया

द्विज कनोजपुरीं वृषली - पती

परम पातकि पातक - संगती ॥१॥

दासीचा पति नष्ट दुष्ट अवघें ब्राम्हण्यही टाकिलें

अट्ठ्याशीं वरुषें वया सकळही त्यानें निसीं घातलें

तीच्या पोषण पालनार्थ सकळें तो आचरे पातकें

तीच्या गर्भदरींत जो उपजतां मानी मनीं कौतुकें ॥२॥

श्रुति वदति जयाचा गर्भ पोटांत जीच्या

पुरुषचि सुतरुपें गर्भवासांत तीच्या

कळत कळत जों जों पुत्र दासीस होती

द्विज सुख बहु तों तों मूढ मानी स्वचित्तीं ॥३॥

जरठ तो वृषळी - उदरीं दहा

सुनमिसें उपजोनि सुखी महा

सुनतिचे अति सादर खेळवी

विविध लाड़रसें करि आळवी ॥४॥

नारायणारव्य सुत त्यांत कनिष्ठ झाला

तो आवडे अवघियांहुनिही तयाला

वृद्धासि वाउपरि होइल बाळ कैंचें

भावें अशा करित लालन फार त्याचें ॥५॥

जरठ खेळउनी निज बाळ तो

सफळ मानि अजामिळ काळ तो

परिसतां वचनें मृदु बोबडीं

सुख - मृगाबुमधें मन दे बुडी ॥६॥

असा खेळवी पातकाच्या फळातें

करी धन्य तन्नामधेयें कुळातें

तयाच्या मिसें नाम नारायणाचें

हरी सर्वही पाप त्या ब्राम्हणाचें ॥७॥

ये ये नारायणा रे वद वद चनें गोड नारायणा रे

जेवीं नारायणा रे त्यजुनि मज नको जाउं नारायणा रे

मातें नारायणा रे तुजविण न गमे वेळ नारायणा रे ॥८॥

उष्णांत नारायण खेळताहे

गृहींच नारायण हा न राहे

नारायणा शीतळ पाज पाणी

नारायणीं रंगलि विप्रवाणी ॥९॥

नारायणा जें प्रिय रवाद्य व्हावें

नारायणा तें अनि शीघ्र द्यावें

नारायणा मी करुं काय वाणी

नारायणीं रंगलि विप्रवाणी ॥१०॥

नारायणा वांचुनि मी न जेवीं नारायणा वीण न नीर सेवीं

नारायणा घुंडुनि शीघ्र आणी नारायणीं रंगलि विप्रवानी ॥११॥

नारायणास झणि होइल दुष्ट दृष्टी

नारायणास झणि कीटक दंशदृष्टी

नारायणास झणि रागिजतील कोणी

नारायणस्मरणि रंगलि विप्रवाणी ॥१२॥

नारायणासम शिशु त्रिजगांत नाहीं

नारायणीं न अणुमात्रहि दोष कांहीं

नारायण प्रियतमे गुणरत्नरवाणी

नारायण स्मरणिं रंगलि विप्रवाणी ॥१३॥

असा सर्वदा छंद नारायणाचा प्रियेसीं सदा वाद त्याच्या गुणांचा मनी स्वमिही लागला छंद ऐसा जसा जागरी वर्त्तवी स्वप्नि तैसा ॥१४॥

पापद्रुमीं नवल पुण्य फळसि आलें

नारायणा म्हणुनि तें सुतनाम झालें

नारायणा म्हणुनि यद्यपि पुत्र पाहे

नामप्रताप उगला न तथापि राहे ॥१५॥

लक्ष्मीकांत कृपा - सुधाघन जगीं सर्वावरी वर्षती

जे कां पातक - झोंपडींत दडती त्यातेंचि न स्पर्शती

विप्राची अघझोंपडी न कळतां नामाग्निनें जाळिली

तेव्हां कृष्णकृपंबुवृष्टि सहसा माथां पडों लागली ॥१६॥

नामाग्निनें अघकुळें जळतां अशेषें

संतोषला हरिनयावरि नामघोषें

द्याचा तयासि निज केवळ भक्तिधंदा

ऐसी अहो उपजली करुणा मुकुंदा ॥१७॥

टाकूनि तो वृषलिसंगति भक्तियोगीं

लागोनि अक्षय - निजात्मसुखासि भोगी

ऐसी कृपा उपजली करुणालयाला

निर्माण ये विषयिं एक उपाय केला ॥१८॥

यमासही मोहन वासदेवें केलें असें कीं यमधर्मदेवें

असोनि आयुष्यहि त्या द्विजाला निष्पाप तोही द्विज आणवीला ॥१९॥

आयुष्य शेष म्हणऊनिच त्या द्विजासी

नेलें न विष्णुसदनाप्रति विष्णुदासीं

आयुष्य शेष असतां यमधर्मराया

तो मृत्युकाळ गमला तरि विष्णुमाया ॥२०॥

अंतीं कथा शुकहि वर्णिल याच रीती

कीं वांचला तटुपरांतिक तो द्विजाती

आयुष्यही सरलिया जरि विप्र वांचे

प्रारब्धनेम लटिके मग या जिवांचे ॥२१॥

आतां म्हणाल सुतनाममिषेंच पापें

गेलीं जळोनि हरिनाम महाप्रतापें

त्याला न भक्ति घडली म्हणऊनि देवें

भक्तीनिमित्त दिधलें वय वासदेवें ॥२२॥

जे जे जीवनमुक्त ते भक्त मोठे प्रारब्धाचे भोगिती भोग खोटे ते प्रारब्धें सर्वथा जो न मोडी येथें कैसा आपुला नेम सोडी ॥२३॥

दिल्हें त्यासि आयुष्य हें कां म्हणावें यमा मोहिलें हेंचि अंगीकरावें पुढें शेष आयुष्य तें भक्तिभावें सरावें तदंतीं स्वलोकासि न्यावें ॥२४॥

असा माधवें सत्य संकल्प केला मनीं घातला मोह तेव्हां यमाला द्विजाचें कितीएक आयुष्य आहे कसा आणऊं मोहला हें न पाहे ॥२५॥

सुतमिसे हरिनाम मुखीं सदा जळति त्याकरितां अघआपदा परि अगोचर हा महिमा यमा म्हणुनि आणवि विप्रकुळाधमा ॥२६॥

द्विजाचे दुरन्याय ते आठवीले तिघे दूत आणावया पाठवीले उबे मस्तकीं तांबडे केश भारी मुखें वांकुडीं अंग नानाविकारी ॥२७॥

काळीं मुखें मारिति चंड हाका बांधा धरा हा नरकांत टाका धरुनि फांसे विकराळ हातीं दंष्ट्रा कराळा वदनीं न माती ॥२८॥

बहु त्रासला विप्र देखोनि त्यांला म्हणे त्रास होईल नारायणाला मुलांमाजि तो गुंतला दूरि खेळीं द्विजें त्यासि पाचारिलें अमतकाळीं ॥२९॥

अकस्मान नारायणा ये म्हणोनी म्हणे विप्र उच्चस्वरें आळऊनी यमाचा पडे लिंगदेहास फांसा उठे विप्रवाणीमध्यें घोष ऐसा ॥३०॥

निघे स्थूळ देहांतुनी लिंग जेव्हां सुताच्या मिसें नामवाचेसि तेव्हां उडी त्यामध्यें घातली विष्णुदूतीं गदा शंख पकेरुहें चक्र हातीं ॥३१॥

ने तोडिले पाश तिहीं यमाचे जे किंकर श्रीपुरुषोत्तमाचे दटाविले ते यमदूत दापें त्या ब्राम्हणा सोडविलें प्रतापें ॥३२॥

टकमका यमदूत तयांकडे चकित होउनि पाहनि बापुडे धरुनि धैर्य तथापिहि त्यांप्रती समयिं त्या यमकिंकर बोलती ॥३३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP