कथाकल्पतरू - स्तबक ११ - अध्याय ८

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॥

मुनि ह्मणे राया अवधारीं ॥ पुष्यनक्षत्रीं प्रलंबारी ॥ यात्रे निघोनि श्रवणनक्षत्री ॥ बेचाळीस दिनीं पातला ॥१॥

घेवोनि धनधान्य सामुग्री ॥ गाईवस्त्रे ब्राह्मण परिवारीं ॥ प्रतिकुळ सरस्वतीरीं ॥ समुद्रीहूनि चालिला ॥२॥

नियमस्थ पवित्र होवोनी ॥ भक्ष्यभोज्य वस्त्रान्नदानीं ॥ सकळां अपेक्षित देवोनी ॥ तृप्त करी तयांसी ॥३॥

सरस्वतीतीर्थीं गेला ॥ तीर्थविधी सर्व सारिला ॥ सवेंचि पावता जाहला ॥ पुष्करक्षेत्र ॥४॥

क्रमेंचि प्रभासप्रति गेला ॥ तेथही तीर्थविधी केला ॥ तो प्रभासमहिमा भूपाळा ॥ ऐकें आतां ॥५॥

जिये प्रभासतीर्थी ॥ चंद्रासि दक्षप्रजापती ॥ कन्या देता जाहला प्रीतीं ॥ आश्विन्यादी ॥६॥

मग चंद्र अश्विन्यादिकींसी ॥ प्रीती न करितां कवणासी ॥ एकी मात्र रूपराशी ॥ देखिली रोहिणी ॥७॥

तियेसिं रत जाहला प्रीतीं ॥ येरीं दुःख करोनि युवती ॥ जवोनि सांगती पितयाप्रती ॥ आपुलें वृत्त ॥८॥

कीं चंद्रे आह्मासि सांडोनि ॥ पढियेती केली रोहिणी ॥ ऐसें वचन आयकोनी ॥ दक्ष ह्मणे चंद्रासी ॥९॥

अगा तुं धर्मार्थकामें करून ॥ सकळस्त्रियांसी वतें समान ॥ नाहीं तरी शाप देईन ॥ चंद्र तुज ॥१०॥

चंद्रे हा शब्द अवगणिला ॥ येरें कोपें चंद्र शापिला ॥ कीं क्षयरोग होईल तुजला ॥ दिवसानुदिवस ॥११॥

तो क्षय नाशावया जाण ॥ करी यानदान रोहिणीरमण ॥ परि रोगाचे लांछन ॥ सुटेचि ना ॥१२॥

आणि सक्षीण असतां तया ॥ औषधीही क्षीण जालिया ॥ तेणें योगें प्रजा अवघिया ॥ जाहल्या कृश ॥१३॥

चंद्रकळांचे भोजनाविण ॥ सकळ देव जाहले क्षीण ॥ मग त्याहीं क्षयशापकारण ॥ आयकिलें चंद्रमुखें ॥१४॥

यावरी समस्त देव गेले ॥ त्यांही दक्षासि प्रार्थिलें ॥ कीं सोडवा चंद्रासि वहिलें ॥ शापक्षयापासाव ॥१५॥

येरु ह्मणे निर्जरांसी ॥ चंद्र समान प्रीती समस्तांसी ॥ करोनियां प्रभासतीथासी ॥ जाईल जरी ॥१६॥

तरी तयाची अर्धमासीं ॥ वृद्धी होईल शुक्कपक्षीं ॥ आणि कृष्णपक्षीं कळांसी ॥ होईल क्षयो ॥१७॥

अवघा शाप न फिटे ॥ परि ऐसें लाधेल गोमटें ॥ हें ऐकोनि तीर्थवाटे ॥ लागला चंद्र ॥१८॥

आधीं सरस्वती करोनी ॥ मग आमावस्येच्या दिनीं ॥ प्रभासाप्रति जाउनी ॥ सारिलें स्नान ॥१९॥

तीर्थविधान आचरिलें ॥ तंव देवीं दक्षासि पुसिलें ॥ मग आज्ञा घेवोनि आले ॥ चंद्राजवळी ॥२०॥

देवींही तीर्थविधी सारिला ॥ चंद्र क्षयापासाव सुटला ॥ प्रभाकांती पावला ॥ विनवी समस्तासी ॥२१॥

ह्मणोनि प्रभास नाम तीर्थासी ॥ कां जे प्रभा आली चंद्रासी ॥ तेथें स्नान करितां अमावस्येसी ॥ होय महाफल प्रात्प ॥२२॥

तें तीर्थ करोनि त्वरित ॥ निघता जाहल रेवतीकांता ॥ मग उर्ममती सरस्वतीअंत ॥ गेला उदपानतीर्थ ॥२३॥

तये उदपानाचा महिमा ॥ तूं ऐकें गा नृपोत्तमा ॥ पूर्वी बंधुत्रय उत्तमा ॥ होते मुनिश्रेष्ठ ॥२४॥

पहिला एकत्र दुजा द्दित ॥ आणि तिसरा बोलिजे त्रित ॥ ब्रह्मवादी होते सुत ॥ गौतमाचे ॥२५॥

गौतमिता आपुला ॥ पारत्रीं उत्तम स्थान पावला ॥ मग सर्वत्र मान पावला ॥ बंधुत्रयांसी ॥२६॥

ते यज्ञाकारणें राया ॥ चालिले धन आणावया ॥ त्रितासि पुढें करोनियां ॥ मेटावया यजमाना ॥२७॥

तैं राज्य यजमान करवीं ॥ यान करवूनि पद्धती वरवी ॥ त्यापासाव दक्षिणा आघवी ॥ घेतली नानाविध ॥२८॥

गाई प्रतिग्रह करुनी ॥ मार्गीं त्रितासि पुढें लाउनी ॥ एकत्र द्दित मागां राहुनी ॥ गाई पशू रक्षिती ॥२९॥

प्रतीचीदिशेसि चालिले ॥ तंव एकतासी द्दित बोले ॥ कीं त्रित कुशळ आहे सर्वकाळें ॥ यज्ञविद्ये संपूर्ण ॥३०॥

हा भलतियेही ठायीं ॥ स्वयें पावेल बहुत गाई ॥ तरी या गाई लवलाही ॥ घेवोनि जाऊं आपण ॥३१॥

असो इकडे चालतां रात्रीं ॥ मागीं सरस्वतीच्या तीरीं ॥ त्रितें कूपाजवळी नेत्रीं देखिला लांडगा ॥३२॥

तेणें भयें पळों लावला ॥ तंव कूपामाजी पडिला ॥ तो आक्रंदशब्द ऐकिला ॥ द्वितएकतों ॥३३॥

त्यांहीं त्रितातें सांडोनी ॥ लोभें पापमती करोनी ॥ भयें लांडगेयाचेनी ॥ पळाले दोघे ॥३४॥

असो कूपांत पडला असतां ॥ त्रित जाहला विचारिता ॥ मी मृत्यु पावेन परि माथां ॥ राहिल यज्ञसंकल्प ॥३५॥

प्रत्यवाय तेणें सत्य ॥ ऐसें चिंतोनि कूपाआंत ॥ येकीं लोंबती वल्ली तेथ ॥ देखिली तेणें ॥३६॥

ते सोमवल्ली कल्पोनी ॥ आणि उदक तें घृतस्थानीं ॥ ऋचा यजुसाम कल्पोनी ॥ केलें सोमकंडण ॥३७॥

देवांचे भाग कल्पिले ॥ यज्ञसंकल्प आथिलें ॥ मंत्रघोष उच्चारिले ॥ त्रितीय सवने ॥३८॥

तो मंत्रदोष स्वर्गस्थानी ॥ बृहस्पतीनें ऐकोनी ॥ देवांप्रति बोलिला वचनीं ॥ कीं त्रित यज्ञ करितसो ॥३९॥

आपणा जाणें येवेळ ॥ न जाऊं तरी तो कोपेल ॥ तेणें योगें नवे निर्मील ॥ यज्ञभागार्थ देवही ॥४०॥

ऐसें बोलतां बृहस्पती ॥ सकळ येवोनि कूपप्रती ॥ यज्ञमाग त्रिताप्रती ॥ मागते जाहले ॥४१॥

येरें यज्ञभाग दीधले ॥ तेणें देव संतोषले ॥ त्रितासि वर देते जाहले ॥ मग ह्मणोनी ॥४२॥

ऐकोनि येरु ह्मणे मातें ॥ कूपापासोनि रक्षा निरुतें ॥ आणि जो स्नान करील येथें ॥ तो व्हावा पुण्यशीळ ॥४३॥

तया घडावें सोमपान ॥ अंती पाविजे वैकुंठभुवन ॥ मग तेतुलेंही वरदान ॥ दीधलें सुरवरीं ॥४४॥

देव गेले स्वर्गभुवनीं ॥ त्रितें येवोनि स्वस्थानी ॥ एकतद्दित बंधु दोनी ॥ शापिले क्रोधे ॥४५॥

ह्मणे लांडगा आणि रानसोर ॥ यांची स्वरूपें पावाल शीघ्र ॥ तुमची संतती वानर ॥ रूप होईल ॥४६॥

ऐसा शाप पावोनी ॥ एकतद्दित तत्क्षणीं ॥ लांडगा सारे होवोनी ॥ राहिले वनांत ॥४७॥

संतती जाहली वानर ॥ ऐसें त्रिता पावले सुरवर ॥ राया ते उदपानतीर्थ थोराअकथ्य महिमा ॥४८॥

अतां शूद्रहटिकर याचेनी ॥ सरस्वती नाशली द्देषेंकरूनी ॥ गुप्तसरस्वती बोलिजे ते स्थानीं ॥ विनाशनतीर्थ ॥४९॥

तेथ बळदेवो पातला ॥ तीर्थविधी करिता जाहला ॥ मग पुढारां चालिला ॥ सुभुमिकतीर्थी ॥५०॥

जेथ गंधर्व अप्सरागण ॥ उद्यानसम भुमिका देखोन ॥ क्रीडती हर्ष करून ॥ निरंतरीं ॥५१॥

तिये सुभुमिक तीर्थी ॥ विधान सारी रेवतीपती ॥ मग गंधर्वतीर्थाप्रती ॥ जाता जाहला ॥५२॥

जेथ गंधर्वांचे नृत्यगीत ॥ वाद्यें वाजती संतत ॥ तेथ तीर्थविधी समस्त ॥ सारिला रामें ॥५३॥

गर्गतीर्थीं गमन केलें ॥ जेथे शुभाशुभ भलें ॥ ज्योतिःशास्त्र निर्मिलें ॥ गर्गमुनीनीं ॥५४॥

तेणें नामें गर्गस्त्रोत ॥ तेणें नामें तीर्थ विख्यात ॥ दानदिविधी केला तेथ ॥ हलधरदेवें ॥५५॥

यावरी शंखतीर्थी गेला ॥ तेथें वृक्ष देखता जाहला ॥ जयचिया भक्षिती फळां ॥ यक्षगंधर्व ॥५६॥

पुढें द्वैतवनतीर्थीं गेला ॥ सरस्वस्ती दक्षिणे चालिला ॥ नागराज तीर्थी पावला ॥ जेथ वासुकीभुवन असे ॥५७॥

तेथें स्नान करितां राया ॥ सर्पभय नाहीं प्राणिया ॥ तो तीर्थविधी सारोनियां ॥ चालिला बळदेवो ॥५८॥

जेथोनि प्राचीदिशे वहिली ॥ प्राड्मुख सरस्वती परतली ॥ तेथ गेला सहस्रमौळी ॥ तीर्थ करित ॥५९॥

पुण्यात्मे कृतायुगीं पूर्वी ॥ नैमिषारण्यींचे तपस्वी ॥ जेथ द्वादशवार्षिकें बरवीं ॥ सत्रें करिते जाहले ॥६०॥

तंव कुरुक्षेत्रींचे ऋषिजनीं ॥ सरस्वतीतें न देखोनी ॥ दुःखितमना होवोनी ॥ काय करिते जाहले ॥६१॥

प्रकट व्हावी सरस्वती ॥ ह्मणोनि नानातपें आचरती ॥ तेव्हां परतोनि सरस्वती ॥ कुरुक्षेत्री प्रवेशली ॥६२॥

मग ते ऋषीश्वर मले ॥ यागादिकर्में करिते जाहले ॥ रामें स्नानादि अचारिलें ॥ त्या पराड्मुख सरस्वतीये ॥६३॥

जे सरस्वती परतली ॥ तियेची स्थिती ऐका भली ॥ कैसी नामाख्या जाहली ॥ सरस्वतीय ॥६४॥

पितामहें पूर्वापारीं ॥ यान करितां क्षेत्रपुष्करीं ॥ आणिली ते अवधारीं ॥ सुप्रभा नामें प्रथम ओघ ॥६५॥

नैमिषारण्यामाझारी ॥ याग करितां ऋषीश्वरीं ॥ प्रकट जाहली ते अवधारीं ॥ कांचनाक्षी नामें ॥६६॥

गयदेशीं यागकाळीं ॥ गयासुरें होती आणिली ॥ ते नाम असे पावली ॥ विशाळा ऐसें ॥६७॥

चवथी उत्तरकोसलदेशीं ॥ यागीं आणी उद्दालकऋषी ॥ मनोहरा नाम तियेसी ॥ बोलिजे राया ॥६८॥

कुरुक्षेत्री कुरुराजें ॥ यागीं आणिली होती ओजें ॥ तिथेलागीं नाम बोलिजे ॥ आद्यवती ऐसें ॥६९॥

वसिष्ठें यागाचे अवसरीं ॥ आणिली जे कुरुक्षेत्रीं । ते सुवेणु नामें अवधारीं ॥ पुण्यसरिता ॥७०॥

ब्रह्में आणिली विमळोदका ॥ या सातही सरस्वती ऐका ॥ नद्या येकत्र होवोनि देखा ॥ मिळाल्या जिये तीर्थी ॥७१॥

तें सप्तसारस्वती तीर्थ ॥ लोकत्रयीं असे विख्यात ॥ मंकणक नामें मुनी तेथ ॥ तप करिता जाहला ॥७२॥

तो बाळब्रह्मचारी ॥ एकदा सरस्वती माझारी ॥ क्रीडा करितां नग्नसुंदरीं ॥ येकी देखता जाहला ॥७३॥

परम तन्वगीं देखोन ॥ मुनी पावला वीर्यस्खलन ॥ मग तें वीर्य कलशीं आपण ॥ घेता जाहला ॥७४॥

तंव तें सप्तघा जाहलें ॥ तेथे सात मरुद्नण मले ॥ महापराक्रमी उपनले ॥ ऐकें नावें तयांचीं ॥७५॥

वायुवेग वायुबळ ॥ वायुवाह सुमंडळ ॥ वायुरेता वायुजाळ ॥ वायुचक्र सातवा ॥७६॥

पूर्वी मंकणकाचे हस्तीं ॥ कुशग्र रुतलें तळहातीं ॥ तया पासाव जाहली उत्पत्ती ॥ शाकरसासी ॥७७॥

त्यासी देखोनि मंकणकें ॥ नृत्यु मांडिलें महाहरिखें ॥ तें स्थानवरजंगम लोकें ॥ देखिलें नाचतां ॥७८॥

मग तेहीं नाचों लागले ॥ ते ब्रह्मादिदेवीं देखिले ॥ यावरी महेशसी प्रार्थिलें ॥ समस्ती देखा ॥७९॥

कीं हा मुनी न करी ॥ ऐसें करावें गा त्रिपुरारी ॥ मग रुद्र हांसोनि वक्त्रीं ॥ ह्मणे मंकणकासी ॥८०॥

अरे विप्रा आइका ॥ तुझिये हस्तापासोनि देख ॥ शाकरस निघाला येक ॥ हें नवल नव्हे ॥८१॥

ऐसें ह्मणोनि शूळपाणी ॥ अंगुळीचेनि अग्रें करोनी ॥ आपुला अंगुष्ठ वाजवोनी ॥ पाडिलें क्षत ॥८२॥

तेथोनि श्र्वेतमस्म काढिले ॥ तें ऋशीश्वरें देखिलें ॥ मग वंदोनियां स्तविलें ॥ शंकरासी ॥८३॥

देवा चापलत्व क्षमावें ॥ माझें तप नाशावें ॥ मग वर दीधला शिवें ॥ तपोवृद्धीचा ॥८४॥

आणि ह्मणे मृडनीपती ॥ इये सप्तसारस्वतीर्थी ॥ तुज सांगातें मी प्रीतीं ॥ राहीन सुखें ॥८५॥

माझी येथ पूजा करील ॥ तो सारस्वलोकीं जाईल ॥ ऐसें बोलोनि जाश्वनीळ ॥ राहिला तेथें ॥८६॥

तिये मंकणकतीर्थ ॥ राम राहोनि येकी राती ॥ गेला औशनसतीर्थाप्रती ॥ कपालमोचन दुजें नाम ॥८७॥

शुक्राचार्यें तप केलें ॥ नीतिशास्त्र प्रवर्तविलें ॥ तेथेंचि येक वर्तलें भलें ॥ तें ऐकें राजया ॥८८॥

श्रीराम दंडकारण्यीं आले ॥ तेव्हां राक्षासांसी मारिलें ॥ शिरें छेदोनियां पाडिलें ॥ नासिकी देखा ॥८९॥

त्यांतील रहोदर ब्राह्मणासी ॥ शिर येक लागलें जंघेसी ॥ ह्मणोनि जाववेना तीर्थासी ॥ व्यस्थेस्तव ॥९०॥

मग ऋषीश्वरांच्या वचनीं ॥ औशनसतीर्था कष्टोनी ॥ स्नान केलें येवोनी ॥ रहोदरब्राह्मणें ॥९१॥

तंव राक्षसाचें शिर ॥ जंघेपसोनियां शीघ्र ॥ जळीं पडतां रहोदर ॥ सुखियां जाहला ॥९२॥

ऐसा कृतकृत्य होवोनी ॥ तेथचि तपश्चर्या करोनी ॥ सिद्धी पावता जाहला मुनी ॥ स्वतपोबळें ॥९३॥

तैं पासोनि नाम तयाचें ॥ कपालमोचन असे साचें ॥ यावरी बळदेव ऋषंगुचे ॥ आश्रमीं गेला ॥९४॥

पुढें पृथूदकतीर्थी गेला ॥ त्याचा महिमा ऐकें भूपाळा ॥ संजयो निरूपिता जाहला ॥ तें सांगेल मधुकर ॥९५॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ एकदशस्तबक मनोहरू ॥ बळदेवतीर्थयात्राप्रकारू ॥ अष्टमाध्यायीं कथियेला ॥९६॥

॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP