कथाकल्पतरू - स्तबक ९ - अध्याय १३

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

जन्मेजयराजा नृपमणी ॥ मुनीसि ह्मणे कर जोडोनि ॥ जीजी उद्योगपर्वीची कथा ॥ मज सांगा संकलोनी ॥१॥

ऐकतां मुनी संतोषला ॥ ह्मणे ऐक गा भूपाळा ॥ सांगतों उद्योगपर्वकथा ॥ जे श्रवणें नाशी कलिमळा ॥२॥

येथोनि नाहीं झाडकवीं ॥ तेरावरुषें भोगिलीं पाडवीं ॥ आतां औटचरणी ओंवी ॥ ऐकें उद्यमार्थीं ॥३॥

राज्य घ्यावया उद्मम ॥ पांडावी केला सहधर्म ॥ तेथें साह्यकरी मेघश्याम ॥ सकळाथीं परियेसा ॥४॥

उत्कर्षें उद्यम मांडिला ॥ तो श्रीकृष्णें सिद्धिसि नेला ॥ ह्मणोनि नामार्थ प्रतिष्ठिला ॥ उद्योगपर्व ॥५॥

असो वैराटीं असतां पांडवां ॥ मत्स्य सपरिवारें करी सेवा ॥ यावरी हृदयीं चिंतिलें देवा ॥ धर्मादिकीं ॥६॥

इकडे तो द्वारके असतां ॥ अंतरीं जाणवलें सर्वथा ॥ ह्मणे नष्टचर्य पंडुसुतां ॥ अतिक्रमलें असेल ॥७॥

मग आरुढोनि स्वरथीं ॥ आला विराटनगराप्रती ॥ तया सांष्टांग नमस्कारिती ॥ पांडव आणि मत्स्यादिक ॥८॥

आनंद जाहला सकळांसी ॥ हर्ष न माये मानसीं ॥ बैसलें सभें हृषीकेशी ॥ सिंहासनीं ॥९॥

यावरी समग्र वृत्तांत ॥ मत्स्यरायें केला श्रुत ॥ तो ऐकोनि साद्यंत ॥ देव संतोषला मानसीं ॥१०॥

परि कष्ट जाणोनि पांडवांचे ॥ मन गहिंवरलें श्रीरंगाचें ॥ भरितें दाटोनि स्नेहाचें ॥ आलिंगिलें पांडवां ॥११॥

उल्हासला करुणारस ॥ द्रौपदीये प्रेम बहुवस ॥ हृदयीं कवळिला हृषीकेश ॥ सुबंधु ह्मणवोनियां ॥१२॥

जाहलीं शब्दांची भरोवरी ॥ देवा धर्मा नानापरी ॥ तंव षोडशीं पूजा करी ॥ प्रेमभावें मत्स्यराय ॥१३॥

टिळेविडे सकळां जाहले ॥ मग सभेतें विसर्जिलें ॥ देव पांडव पहुडले ॥ विसावले निजमंदिरीं ॥१४॥

येरादिवशीं प्रातःकाळीं ॥ षट्‍कम सारोनि वनमाळी ॥ सभे बैसला असतां जवळी ॥ मिळाले सकळ ॥१५॥

विराट ह्मणे जी चक्रपाणी ॥ माझी उत्तरा नंदिनी ॥ तियेचा विवाह विचारोनी ॥ करणें आतां तत्वतां ॥१६॥

यावरी गोपाळकृष्ण ह्मणे ॥ राया ते अभिमन्यासि देणें ॥ दूत द्वादकेसि पाठविणें ॥ आणावया सुभद्रे ॥१७॥

असो सकळ सामुग्री करोनी ॥ बाहिले सकळ नृपमणी ॥ ते आले दळेंसिं तत्क्षणीं ॥ विवाहर्थ ॥१८॥

उत्तरे कन्येतें श्रृंगारोनी ॥ सकळ जन आंनदोनी ॥ लग्न जाहलें विधिविधानीं ॥ चारीदिवस ॥१९॥

हे संकलोनियां कथा ॥ तुज कथिली गा भारता ॥ कीं विस्तार करितां ग्रंथा ॥ होईल असंख्य ॥२०॥

यावरी राव विनंती करी ॥ उत्तराविवाह जालियावरी ॥ कथा वर्तली ते श्रुत करीं ॥ वैशंपायना ॥२१॥

मुनि ह्मणे राया परियेस ॥ विवाह जालिया चारीदिवस ॥ उपरी येवोनि सभेस ॥ सर्वेश्वर बैसला ॥२२॥

पांडव नित्यकर्में सारोनि आले ॥ शूरसेनादि यादव मिळाले ॥ बळभद्र मदनादि बैसले ॥ विराट आणि सर्व राजे ॥२३॥

तंव पांडवांच्या हितार्था ॥ श्रीकृष्ण जाहला बोलता ॥ कीं कौरवपांडवांची व्यवस्था ॥ श्रुत आहे सकळांसी ॥२४॥

तरी राजे हो समस्त ॥ जाणाया दुर्योधनाचें मत ॥ प्राज्ञ ऐसा पुरुष तेथ ॥ कोण येथूनि पाठवावा ॥२५॥

अर्ध राज्य त्यासी मागावें ॥ यावरी ह्मणीतलें बळदेवें ॥ पांडवां अर्ध राज्यचि मिळावें ॥ हें यथार्थ मज वाटे ॥२६॥

अहो शकुनीच्या हटें करून ॥ द्युत खेळला धर्म आपण ॥ अपराध नाहीं ह्मणोन ॥ दुर्योधनाचा ॥२७॥

युद्ध न करितां सामोपायें ॥ अर्धें राज्य घ्यावें धर्मरायें ॥ तंव सात्यकीं बोलिला काय ॥ सकळां देखतां ॥२८॥

ह्मणे बळदेवा ऐक साचार ॥ हा यादवकुळीं नव्हें विचार ॥ त्वां असभ्य केला उच्चार ॥ सभेमाजी ॥२९॥

जेवीं एकोदरी बदरी कंटक ॥ सरळ वक्र होती देख ॥ तैसचि प्राज्ञ मूर्ख ऐक ॥ होतति एके कुळीं ॥३०॥

पूण्यात्मा यशस्वी सत्व सागर ॥ तो अन्याई केला युधिष्ठिर ॥ आणि कपटद्युती गांधार ॥ तो न्यायवंत केला तुवां ॥३१॥

तरी वैरिया अंगि करी ॥ तो अधम जाणावा संसारीं ॥ द्रुपद ह्मणे तये अवसरी ॥ बरवें बोलिला सात्यकी ॥३२॥

गर्दभ कोमल गौ कठिण ॥ हें अयुक्त न बोलावें वचन ॥ परि राज्य नेदी दुर्योधन ॥ मज माने मृदुवाक्यें ॥३३॥

तरी प्रथम येक करावें ॥ दूत रायांकडे पाठवावे ॥ शल्य धृष्टकेतु बोलावावे ॥ भगदत्त बाल्हिकादी ॥३४॥

युद्धसामुग्री करूनि समस्तीं ॥ यावें पांडवां साह्याप्रती ॥ कौरवीं बोलाविलें नाहीं त्यांप्रती ॥ तंव आधीं तुह्मीं पाचारा ॥३५॥

मग आमुचा पुरोहित शिष्टाईसी ॥ पाठवूं कौरवीं बोलाविलें नाहीं त्यांप्रतीं ॥ तंव आधीं तुह्मीं युक्त असे ॥३६॥

आतां प्रवर्तावें कार्यासी ॥ ऐसें ह्मणोनि हृषीकेशी ॥ आपण गेले द्दारकेसी ॥ इकडे काय वर्तलें ॥३७॥

द्रुपदें विराटें दूतद्दारीं ॥ अन्यराजयां झडकरी ॥ पाचारिलें युद्धसामुग्री ॥ करोनियां स्वसैन्यें ॥३८॥

पांडवीं युद्धप्रर्वत मांडिला ॥ तंव द्रुपदें दूत धाडिला ॥ तो हस्तनापुरीं गेला ॥ वृद्धब्राह्मण ॥३९॥

तेणें पांडवांची व्यवस्था ॥ सांगीतली धृतराष्ट्रसुता ॥ तेणेंही मेळवोनि राया समस्तां ॥ केली युद्धाची तयारी ॥४०॥

परि द्दारके गेला चक्रपाणी ॥ हें दूतद्दारें ऐकोनी ॥ पाचारावया तत्क्षणीं ॥ दुर्योधन गेला द्दारके ॥४१॥

तेथें तद्दिनींच गेला पार्थ ॥ तंव कृष्ण पहुडलासे मंदिरांत ॥ पार्था देखतां गांढारीसुत ॥ पहिलेनि गेला कृष्णापें ॥४२॥

कृष्ण निजेला मुख झांकून ॥ ऐसें देखोनि दुर्योधने ॥ ह्मणे मीही राजा ह्मणोन ॥ बैसला उसेयाकडे ॥४३॥

तया मागोनि पार्थ गेला ॥ तो पायथ्याकडे भुमीं बैसला ॥ देवें उठोनि पाहतां देखिला ॥ पार्थ पहिल्यानें ॥४४॥

मग उसेयाकडे पाहिलें ॥ तंव दुर्योधनातें देखिलें ॥ असो स्वागत करोनि पुसिलें ॥ आगमनकारण ॥४५॥

गांधार ह्मणे कृष्णा संग्रामीं ॥ मज साह्य व्हावें तुह्मीं ॥ आणि पहिलेन आलों मी ॥ पाचारावया ॥४६॥

परंतु ह्मणे श्रीकृष्ण ॥ म्या प्रथम देखिला अर्जुन ॥ तरी दोघांचें साह्य करीन ॥ तो प्रकट आइका ॥४७॥

दशकोटी योद्धे वीर ॥ आह्मी योजिले महा शूर ॥ हे एकीकडे समग्र ॥ दळभारेंसीं ॥४८॥

दुसरीकडे मी येकला निःशास्त्री ॥ युद्ध नकरीं सर्वोपरी ॥ तरे जें येईल ज्याच्या विचारीं ॥ तें तयानें मागिजे ॥४९॥

परि म्यां पार्थ आधी देखिलें ॥ तरी येणेंचि मागावें पहिलें ॥ तंव पार्थ ह्मणे म्यां घेतलें ॥ कृष्णासीच ॥५०॥

दशकोटी योद्धें वीर ॥ गांधार घेवोनि तोषला थोर ॥ मग बळदेवापें जावोनि शीघ्र ॥ ह्मणे मज साह्य होई गा ॥५१॥

येरू ह्मणे मी तीर्थयात्रेसी ॥ जात असें परियेसी ॥ तीर्थें केलियावरी तुह्मासीं । भेटेन जाण ॥५२॥

मग गेला कृतवर्म्याप्रती ॥ सांगितली सर्व स्थिती ॥ येरें येकीक्षोणी निरुती ॥ दीधली सेना ॥५३॥

गांधार स्वराष्ट्रीं गेला ॥ इकडे श्रीकृष्ण पार्था बोलिला ॥ मी युद्ध नकरीं तरी वरिला ॥ कांगा मज ॥५४॥

पार्थ ह्मणे जी अनंता ॥ तूं संकल्पें सृष्टिसंहरकर्ता ॥ तुवां सारथ्य करावें हें चित्ता ॥ भावे मज ॥५५॥

देवा तुझे बळसामर्थ्यें ॥ मी जिंकीन त्रैलोक्यातें ॥ तुज वेगळीं येर अनाथें ॥ ह्मणोनि तूतेंच वरियेलें ॥५६॥

ऐकोनि देव संतोषला ॥ पार्थ धर्माजवळी आला ॥ वृत्तांत बंधुवां सांगीतला ॥ तो मानवला सकळांसी ॥५७॥

असो धर्माच्या साह्याप्रती ॥ येत होता शल्यभूपती ॥ तंव गांधार जावोनिं त्वरितीं ॥ भेटला तया ॥५८॥

समारंभेंसीं पुजला ॥ नानस्तवनीं स्तविन्नला ॥ भावभक्तीं वश केला ॥ मग तो जाहला तयाकडे ॥५९॥

परि धर्माजवळी येउनी ॥ शल्यें कथिली गांधारकरणी ॥ धर्मसांत्वन नीतिवचनीं ॥ शल्य करिता जाहला ॥६०॥

यावरी तो शल्य मागुता ॥ जावोनि भेटला धृतराष्ट्रसुता ॥ तो सारथी होईल सूर्यसुता ॥ हें कथिजेल कर्णपवीं ॥६१॥

ऐसीं कौरवपांडवांचीं पाहीं ॥ सैन्यें मिळालीं दोहीं ठायीं ॥ तंव पुरोहित भेटला लवलाहीं ॥ कौरवांसी सभेंत ॥६२॥

भीष्मद्रोण आणि विदुर ॥ कर्ण कृपाचार्य धृतराष्ट्र ॥ यांहीं करोनि उपचार ॥ पुरोहित पूजिला ॥६३॥

समस्तांसी विप्र ह्मणे ॥ तुमचें मनोगत जागाया कारणें ॥ माझें ऐका जी बोलणें ॥ दत्तचित्तें ॥६४॥

धृतराष्ट्र पंडू येकाचे पुत्र ॥ ह्मणोनि दोघां समान अधिकार ॥ द्दिभागीं पदार्थ समग्र ॥ प्राप्त व्हावे उभयतां ॥६५॥

परि कौरव राज्य पावले ॥ आणि पांडव उगेचि राहिले ॥ ऐसें असोनियां पहिलें ॥ दुजें आतां अवधारा ॥६६॥

अंध ह्मणोनि पितृराज्यासी ॥ अधिकार नाहीं धृतराष्ट्रासी ॥ ह्मणोनि राज्यपट पंडुसी ॥ सारिला तुह्मींच ॥६७॥

तया निवर्तलिया नंतरें ॥ बळें राज्य केलें धृतराष्ट्रें ॥ तेंचि सिंहासन गांधारें ॥ घेतले हटप्रयासें ॥६८॥

असो कौरवपांडवां न पडेची ॥ ह्मणोनि विभाग केले तुह्मीची ॥ पांडवा दीधलें अर्धची ॥ त्यांही तें समृद्धीतें पावविलें ॥६९॥

यावरी लाक्षागृहनिमित्तें ॥ तुह्मी जाळीत होतां त्यांतें ॥ असो मग दीघलें मागुतें ॥ इंद्रप्रस्थ प्रकटल्या ॥७०॥

तेंही हारविलें कपटफांशीं ॥ पांडवा बारा वरुषें क्केशी ॥ अद्दष्ट भोगिलें तेरावे वर्षीं ॥ तेथें दुःख अपार ॥७१॥

परि तो सत्वें राखोनि राजनीती ॥ अर्धराज्य मागताती ॥ सातक्षोणी सैन्यगणती ॥ असोनि तरी अविरोधपण ॥७२॥

भीमार्जुनांची पराक्रमता ॥ तयां कृष्ण सारथी असतां ॥ ऐसें जाणोनि सर्वथा ॥ द्यावें सुखें अर्धराज्य ॥७३॥

यावरी गंगात्मज बोले ॥ द्दिजा परम कल्याण कथिलें ॥ कीं पांडव कुशलत्व सांगीतलें ॥ आणि कळलें सारवाक्य ॥७४॥

इंद्रासि अजिक्य अर्जुन ॥ त्यासी युद्ध करील कवण ॥ ऐसें ऐकोनि ह्मणे कर्ण ॥ किती तेंची बोलता ॥७५॥

अतिसुक्ष्म नीतिशास्त्र ॥ कोणीच नेणती गंव्हार ॥ दुर्योधना निमित्त निर्धार ॥ धर्मा जिंकिलें शकुनीयें ॥७६॥

बारावरुषें वनवासीं ॥ जिवंत राखिलें पांडवांसी ॥ तैं काय झालें होतें पार्थासी ॥ राज्य कां पां न घेतलं ॥७७॥

आतां मत्स्यपांचाळांचे बळें ॥ राज्य मागाया पाठविलें ॥ तरी तें आतां भुक्त जाहलें ॥ दुर्योधनासी ॥७८॥

आतां देशाचिये शेवटींची ॥ भुमिका पाऊल येकची ॥ तेही नसे पांडवांची ॥ ऐसें आह्मां कळतसे ॥७९॥

त्यांहीं युद्ध केलें जरी ॥ तरी आह्मीं त्याचे वैरी ॥ राज्यापेक्षा असेल अंतरीं ॥ तरी येक अवधारा ॥८०॥

मागुतें बारावर्षें वरी ॥ तप करावें वनांतरीं ॥ मग येवोनि बैसावें मांडीवरी ॥ दुर्योधनाचे ॥८१॥

तयाचे पुत्र ह्मणविती ॥ तरी अर्धराज्यातें पावती ॥ आंताचि जरी संग्रामा येती ॥ तरी होईल शांती त्यांची ॥८२॥

तंव भीष्म ह्मणे कर्णासी ॥ पार्थें समस्तां रथियांसी ॥ रणीं जिंकिलें तें विसरलासी ॥ कैसा अज्ञाना ॥८३॥

त्या भीष्मवाक्या मानवोनी ॥ धृतराष्ट्र बोलिला वचनीं ॥ हेंचि श्रेय सकळां लागुनी ॥ तरी आतां करणीय येक ॥८४॥

पूजोनि पामका या विप्रा ॥ मग एकदा विचार करा ॥ यावरी तया विप्रवरा ॥ पुजोनियां पामकिलें ॥८५॥

मग संजयो बोलाविला ॥ तया धृतराष्ट्र सांगता जाहला ॥ कीं उपलव्यनगरीं आल ॥ धर्म दळभारेंसीं ॥८६॥

तरी त्वां उपलव्या जावोनि सर्वा ॥ माझा कुशळप्रश्न सांगावा ॥ कृष्ण सारथी असे पांडवां ॥ तेणें व्यग्रचित्त जाहलों ॥८७॥

हें धृतराष्ट्रवाक्य ऐकोनी ॥ संजय गेला पाडंवस्थानीं ॥ मग धर्मराया नमस्कारोनी ॥ पुसिलें क्षेम कुशळ ॥८८॥

संजयाचें करुनि स्वागंत ॥ धर्म तयाजवळी बोलत ॥ आजी भरतवंश समस्त ॥ जाणों कुशळत्वें देखिला ॥८९॥

मग भीष्मधूतराष्ट्रविदुर ॥ युयुत्सुप्रमुखसमग्र ॥ यांचे कुशळप्रश्नोत्तर ॥ धर्म करिता जाहला ॥९०॥

तंव बोलिलें संजयें ॥ त्यांचें सर्व कुशळ आहे ॥ परि धृतराष्ट्र पुत्रेंसिं पाहें ॥ जाहलासे पुत्रद्रोही ॥९१॥

कौरव परम अयुक्ताचार ॥ पांडवां सारिखे बंधु मित्र ॥ त्यांचा द्रोह करिती थोर ॥ पापात्मे ते ॥९२॥

पांडवाचा पराक्रम ऐकोन ॥ व्यथित होतो दुर्योधन ॥ ह्मणोनि अंधें तुह्मांलागुन ॥ बोलविलें तेथवरी ॥९३॥

तरी तुह्मी कुष्णासहित ॥ चला भेटाया समस्त ॥ अंधाचें असे मनोगत ॥ न करावें युद्ध सहसाही ॥९४॥

धर्म ह्मणे जी संजया ॥ जेथें मान नाहीं बोला विदुराचिया ॥ तरी नीति नाहीं तया ठायां ॥ हें तूं वायां बोलसी ॥९५॥

आह्मीं तेथ केवीं येणें ॥ आतां ऐकें येक बोलणें ॥ आमुचे पांच ग्राम देणें ॥ जे पूर्वी होते दीधले ॥९६॥

ते राज्या वेगळे करोनी ॥ गांधारें द्यावे सत्ता साडोनी ॥ तरी येऊं विरोध त्यजोनी ॥ इंद्रप्रस्थी ॥९७॥

संजय ह्मणे गा धर्मराया ॥ विना कुरुकुळ नासलिया ॥ जीविजे भिक्षा मागोनियां ॥ तें राज्यहोनी आगळें ॥९८॥

सर्व पदार्थ नश्वर जाण ॥ शाश्वत येक नारायणा ॥ येथें युक्तायुक्त वचन ॥ गोपालकृष्णें सांगावें ॥९९॥

श्रीकृष्ण ह्मणे गा संजया ॥ तृष्णा लागली असे जया ॥ तो उदकसेवना वांचोनियां ॥ न निवे गोष्टी करोनी ॥१००॥

तैसेम पांडवांचे राज्याविण ॥ वनावासदुःख न शमे जाण ॥ क्षत्रियधर्म प्रजापाळण ॥ युद्धावांचोनि केविं घडे ॥१॥

द्रौपदीचें केशाकर्षण केलें ॥ तैंचि कौरव विनाश पावले ॥ पांडव व्याघ्ररूप जाहले ॥ केवीं गौ कौरव वांचती ॥२॥

सर्वयुद्धीं विशारंद ॥ सादर आहेति पांडव वीर ॥ तथापि शतिगूण निर्धार ॥ सांडित नाहीं ॥३॥

ऐसें कृष्णावाक्य ऐकोनी ॥ संजय निघाला तत्क्षणीं ॥ तंव तया धर्म वचनीं ॥ बोलता होय ॥४॥

ह्मणे संजया कठियवचनें ॥ तुवां तेथें न बोलणें ॥ आमुचें कुशलत्व सांगणें ॥ समस्तांसी ॥५॥

मागुतें येणें जालिया स्वभावें ॥ तरी विदुरासि घेवोनि यावें ॥ तुमचें विचारवाक्य मानावें ॥ लागेल आह्मां ॥६॥

तुवां घृतराष्ट्रासि ह्मणिजे ॥ कीं अधर्मबुद्धि न कीजे ॥ तूं तरी समानाथीं सहजें ॥ वडील आहेसी ॥७॥

आह्मां दोन्हीही पदार्थ ॥ मान्य आहेति निभ्रांत ॥ ऐसें ऐकोनियां त्वरित ॥ संजय गेला तेथोनी ॥८॥

तो घृतराष्ट्रासमीप गेला ॥ नमस्कारोनियां वहिला ॥ क्षेमकुशळ सांगता जाहला ॥ मग बोलिला नीतिमार्गें ॥९॥

ह्मणे त्यांचा सत्यरूप धर्म ॥ तुझा पुत्रावशक अधर्म ॥ ऐसें बोलता तंव अस्तम ॥ पावला भानु ॥११०॥

धृतराष्ट्र ह्मणे संजयातें ॥ प्रातःकाळीं येवोनि सभेतें ॥ तुवां बोलावें यथार्थें ॥ मग घाडिला स्वस्थानीं ॥११॥

यावरी दूत पाठविला ॥ विदूर जवळी बोलाविला ॥ तया वृत्तांत सांगीतला ॥ संजयाचा ॥१२॥

ह्मणे संजयें निंदिलें मातें ॥ उदयीक सांगेल धर्मवाक्यातें ॥ सभेसि काय बोलेल तें ॥ कळत नाहीं ॥१३॥

चिंता थोर उपजली ॥ निद्रा पळोनियां गेली ॥ तरी तूं सांगे गा वहिली ॥ राजनीती कांहीं मज ॥१४॥

ऐसें ऐकोनियां विदुरें ॥ बोलिला नीतिमार्ग उत्तरें ॥ तीं पुढें ऐकवीं सारोद्धरें ॥ ह्मणे मधुकरकवी ॥१५॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ नवमस्तबक मनोहरू ॥ उद्योगपर्वदळसंग्रहप्रकारू ॥ त्रयोदशाऽध्यायीं कथियेला ॥११६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP