एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


य एतद्देवदेवस्य, विष्णोः कर्माणि जन्म च ।

कीर्तयेत् श्रद्धया मर्त्यः, सर्वपापैः प्रमुच्यते ॥२७॥

देवाधिदेव सर्वेश्वर । त्याचे मत्स्यकूर्मादि अवतार ।

जन्मकर्मादि नाना चरित्र । गाती ते पवित्र पुण्यराशी ॥३००॥

तेंचि चरित्र तत्त्वतां । श्रद्धायुक्त गीतीं गातां ।

प्रयागादि समस्त तीर्थां । होय पवित्रता त्याचेनि ॥१॥

श्रद्धायुक्त हरिकीर्तन । त्याचे पवित्रतेसमान ।

आन नाहीं गा पावन । तुझी आण गा परीक्षिती ॥२॥

ते तूं ’श्रद्धा’ कोण म्हणसी । जेवीं धनलोभी धनासी ।

गुळीं आवडी माकोडयांसी । तैसी कीर्तनासी निज आवडी ॥३॥

जेवीं शिणतां काळें बहुतें । वंध्या प्रसवे एकोलतें ।

ते कळवळी जैशी त्यातें । तेवीं कीर्तनातें अतिप्रीती ॥४॥

जो कीर्तनाचेनि वैभवें । हरिचरित्र गावया सद्भावें ।

पतंगाच्या परी ऐसें व्हावें । ’श्रद्धा’ त्या नांवें कुरुराया ॥५॥

ऐशिया श्रद्धासंपत्तीं । वर्णितां भगवद्गुणकीर्ती ।

श्रद्धाळुवा परम प्राप्ती । जाण निश्चितीं नृपनाथा ॥६॥

जरी आपण परमेश्वर । स्वलीला धरी नानावतार ।

तरी श्रीकृष्णचरित्र । अति गंभीर पावनत्वें ॥७॥

श्रीकृष्णाची चोरी गीतीं गातां । सुवर्णस्तेया पावनता ।

कृष्णव्यभिचार वर्णितां । गुरुतल्पगता हरी दोष ॥८॥

पूतनापयःपानशोषण । हें चरित्र करितां पठण ।

सुरापानादि दोष दारुण । हरती संपूर्ण विश्वासकांचे ॥९॥

राक्षसकुळींचा रावण । परी तो जातीचा शुद्ध ब्राह्मण ।

नित्य करी वेदपठण । ब्रह्मयाचा जाण तो पणतू ॥३१०॥

त्याचें सकुळ निर्दळण । श्रीराम करी आपण ।

तें चरित्र करितां पठण । ब्रह्महत्या जाण नासती ॥११॥

धर्मसाह्यकारी श्रीकृष्ण । केलें पांडवांचें रक्षण ।

त्या भारताचेनि श्रवणें जाण । निमाले ब्राह्मण वांचविले ॥१२॥

अठरा ब्रह्महत्या जनमेजयासी । अठरा पर्वें सांगोनि त्यासी ।

निमाल्या उठविलें द्विजांसी । कृष्णकीर्ति ऐसी पावन ॥१३॥

ऐकतां श्रीरामकृष्णकीर्ती । महापातकें बापुडीं किती ।

पायां लागती चारी मुक्ती । श्रध्दासंपत्ती कीर्ती गातां ॥१४॥

श्रद्धेचिया अतिसंपत्ती । आवडीं गातां श्रीकृष्णकीर्ती ।

सहजें सायुज्यता पावती । देहस्थिती असतांही ॥१५॥
हरिकीर्तिकीर्तन ज्याच्या ठायीं । तोही वर्ततां दिसे देहीं ।

परी देहीं ना तो हरीच्या ठायीं । हरि त्याचे हृदयीं अवघाचि ॥१६॥

तोही अवघा हरीभीतरीं । हरि त्या सबाह्य अभ्यंतरीं ।

परीक्षिती ऐशियापरी । कीर्तिवंत संसारीं नांदती ॥१७॥

यालागीं हरिकीर्तनापरतें । सुगम साधन नाहीं एथें ।

जे विनटले हरिकीर्तनातें । ते देहबंधातें नातळती ॥१८॥

कृष्णकीर्तनें उजळली स्थिती । ते मैळेना कदा कल्पांतीं ।

जरी देहकर्में करिती। तरी जाहली स्थिती मैळेना ॥१९॥

आकाश पर्जन्यें नव्हे वोलें । कां रविबिंब थिल्लरजळें ।

असोनियां तेणें मेळें । कदाकाळें तिंबेना ॥३२०॥

तेवीं हरिकीर्तिकीर्तनकल्लोळें । जयाची निष्कामदशा उजळे ।

ते वर्ततां देहकर्ममेळें । देहविटाळें अलिप्त ॥२१॥

निजभक्तांचें शरीरकर्म । स्वयें चालवी पुरुषोत्तम ।

यालागीं भक्तांसी कर्मभ्रम । अधमोत्तम बाधीना ॥२२॥

भक्तांअभक्तांची कर्मगती । भगवंत चालवी निश्चितीं ।

तेथ भक्तांची कां अलिप्तस्थिती । अभक्त कां होती अतिबद्ध ॥२३॥

करितां श्रीकृष्णकीर्ति कीर्तन । भक्तांचा निरसे देहाभिमान ।

यालागीं ते अलिप्त जाण । अभक्तां बंधन अहंभावें ॥२४॥

हे दशा मागितल्या पावती । ऐसें न घडे गा परीक्षिती ।

आवडीं गातां कृष्णकीर्ती । सहजें हे स्थिति ठसावे ॥२५॥

श्रीकृष्णकीर्तिकीर्तनें । बहुतांचें संसारधरणें ।

उठविलें स्वयें श्रीकृष्णें । चरित्रपठणें तुष्टोनी ॥२६॥

कृष्णकीर्तिकीर्तनगोडी । अहंकाराची बांदवडी फोडी ।

जीवाचें जीवबंधन तोडी । निःसीम आवडीं कीर्ति गातां ॥२७॥

एवं कृष्णकीर्तिकीर्तनें । भक्तीं ’कृष्णपदवी’ स्वयें घेणें ।

जग उद्धरावयाकारणें । कीर्ति श्रीकृष्णें विस्तारिली ॥२८॥

जन्मापासूनि अंतपर्यंत । श्रीकृष्णचरित्र परमाद्भुत ।

तुज म्यां सांगितलें साद्यंत । परमामृत निजसार ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP