एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


अर्जुनः प्रेयसः सख्युः, कृष्णस्य विरहातुरः ।

आत्मानं सान्त्वयामास, कृष्णगीतैः सदुक्तिभिः ॥२१॥

ज्याचा रथ वागवी आपण । ज्याचा सारथी श्रीकृष्ण ।

ऐसा प्रियसखा अर्जुन । कृष्णविरहें पूर्ण उद्विग्न जाहला ॥४९॥

तंव कृष्णगीता सदुक्ती । आठवल्या त्याच्या चित्तीं ।

मग आपण आपणाप्रती । बोलिला उपपत्ती त्या ऐका ॥२५०॥

कृष्ण माझ्या मनाचें ’मन’ । कृष्ण ’बुद्धीचें’ आयतन ।

कृष्णप्रभा हें प्रकाशे ’ज्ञान’ । तेथ भिन्नपण मज कैंचें ॥५१॥

कृष्णप्रभा ’दृष्टी’ देखे । कृष्ण अवधानें ’श्रवण’ ऐके ।

कृष्णानुवादें ’बोल’ बोलके । तेथें ’मी’ वेगळिकें वृथा मानीं ॥५२॥

कृष्ण हृदयस्थ ’आत्मा’ अव्यंग । कृष्ण माझ्या अंगाचें अंग ।

त्या कृष्णासीं मज वियोग । हा मिथ्या प्रयोग मायिक ॥५३॥

कृष्ण माझ्या जीवाचें जीवन । कृष्ण सबाह्य परिपूर्ण ।

कृष्णवियोग मानी जें मीपण । तेंही निमग्न श्रीकृष्णीं ॥५४॥

भिन्न भिन्न भूताकृती । त्यामाजीं अभिन्न कृष्णस्थिती ।

विषमीं समान श्रीपती । त्यासी वियोगप्राप्ती कदा न घडे ॥५५॥

घट मृत्तिकेसी नव्हे भिन्न । पट न निवडे तंतु त्यागून ।

तैसा श्रीकृष्णवेगळा अर्जुन । माझें मीपण निवडेना ॥५६॥

कृष्णावियोग मी मानीं जेथ । तेथेंही असे श्रीकृष्णनाथ ।

वियोग मानिती जे सत्य । ते केवळ भ्रांत अतिमूर्ख ॥५७॥

नित्य सर्वगत परिपूर्ण । कृष्ण अखंड दंडायमान ।

त्यासीं मजसीं वेगळेपण । सर्वथा जाण असेना ॥५८॥

’न जायते म्रियते’ हें वचन । स्वमुखें बोलिला श्रीकृष्ण ।

त्या कृष्णासी जन्ममरण । मूर्खजन मानिती ॥५९॥

’अक्षरं ब्रह्म परमं’ । स्वयें बोलिला पुरुषोत्तम ।

त्या कृष्णासी मरणजन्म । मूर्ख मनोधर्म कल्पिती ॥२६०॥

जो ’क्षराक्षरातीत’ । ’उत्तमपुरुष’ श्रीकृष्णनाथ ।

त्यासी जन्ममरणादि आवर्त । कल्पिती भ्रांत मनोधर्में ॥६१॥

त्या कृष्णासीं मज वेगळेपण । कल्पांतींही नाहीं जाण ।

करितां गीतार्थाचें स्मरण । आपुलें आपण पूर्णत्व देखे ॥६२॥

मी अज आद्य अचळ । मी निज नित्य निर्मळ ।

माझ्या स्वरुपा नाहीं चळ । त्रैलोक्य खेळ पैं माझा ॥६३॥

जगातें नेमिता वेद । तो निःश्वसित माझा बोध ।

मी आनंदा परमानंद । स्वानंदकंद निजांगें ॥६४॥

मी आपरुपें आप । मी प्रकृतिपुरुषांचा बाप ।

मी अवतारी अवतरें कृष्णरुप । हा सत्यसंकल्प पैं माझा ॥६५॥

धरोनियां माझ्या स्वरुपाचा आधार । मीचि कृष्णीं कृष्णरुप अवतार ।

करुनि स्वलीला नानाचरित्र । अंतीं सामावें साचार मजमाजीं मीच ॥६६॥

माझ्या निजस्वरुपाचेनि बळें । मीच कृष्णरुपें खेळ खेळें ।

अंतीं मजमाजीं मी मिळें । निजात्ममेळें निजनिष्ठा ॥६७॥

एक नर एक नारायण । परस्परें तें जाण अभिन्न ।

यालागीं पूर्णत्वें अर्जुन । आपण्या आपण स्वयें देखे ॥६८॥

बाप कृपाळु कृपानिधि । उपदेशिला युद्धसंधीं ।

परी लाविली जे समाधी । ते न मोडे त्रिशुद्धी कल्पांतकाळीं ॥६९॥

नाहीं स्थानशुद्धी चोखट । सैंघ रथांचे घडघडाट ।

सुटतां शस्त्रांचे कडकडाट । लाविली निर्दुष्ट परमार्थनिष्ठा ॥२७०॥

कैशी लाविली समाधी । जी न मोडेच महायुद्धीं ।

शेखीं कृष्णावसान अवधीं । तोचि बोध उद्बोधी परिपूर्णत्वें ॥७१॥

ज्यासी गीता उपदेशी श्रीकृष्ण । त्यासी न बाणे पूर्णपण ।

ऐसें बोलतां वचन । परम दूषण वाचेसी ॥७२॥

ते वाचा गलितकुष्ठें झडे । तीसी विकल्पाचे पडती किडे ।

ते वाचाचि समूळ उडे । ’कृष्णोक्तीं न घडे बोध’ म्हणतां ॥७३॥

’गीताउपदेशें पूर्णपण । नव्हे’ ऐसें म्हणतां जाण ।

वाग्देवता कांपे आपण । इतरांचा कोण पडिपाडू ॥७४॥

गीता ऐके पाहे पढे । ज्यासी गीतास्मरण घडे ।

त्यासी परिपूर्णत्व स्वयें जोडे । मा उपदेशें नातुडे परिपूर्णत्व कैसें ॥७५॥

गीतार्थाचें पूर्णपण । वक्ता जाणे श्रीकृष्ण ।

कां श्रोता जाणे अर्जुन । त्यासी ते खूण बाणली ॥७६॥

सारांश काढूनि वेदार्था । श्रीकृष्णें प्रकट केली गीता ।

जेथील अभिप्रायो पाहतां । जोडे आइता निजमोक्ष ॥७७॥

परदेशी जाहला होता वेदान्त । त्यासी सहाय जाहला गीतार्थ ।

तेणें बळें मतें समस्त । जिणोनि समर्थ तो झाला ॥७८॥

कृष्णनिःश्वासीं जन्मले वेद । गीता श्रीकृष्णमुखें प्रगटली शुद्ध ।

यालागीं गीतार्थ अगाध । धडौते वेद तेणें जाहले ॥७९॥

वेदें आप्त केले तिनी वर्ण । दुरावले स्त्रीशूद्रादि जन ।

न शिवेचि त्यांचे कान । हें वेदांसी न्यूनपण पैं आलें ॥२८०॥

तें वेदाचें फेडावया उणें । गीता प्रगट केली श्रीकृष्णें ।

गीतेचेनि श्रवणें पठणें । उद्धरणें समस्तीं ॥८१॥

अर्जुनाचे प्रीतीकारणें । गीतार्थ प्रकाशिला श्रीकृष्णें ।

ते गीतेचेनि श्रवणें पठणें । उद्धरणें जडजीवीं ॥८२॥

असो अगाध गीतामहिमान । तेणें गीतार्थें तो अर्जुन ।

करुनि आपुलें सांत्वन । जाहला सावधान प्रकृतिस्थ ॥८३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP