एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


कथयामास निधनं, वृष्णीनां कृत्स्नशो नृप ।

तच्छ्रुत्वोद्विग्नहृदया, जनाः शोकविमूर्च्छिताः ॥१६॥

दारुक म्हणे तुम्ही समस्त । पळा पळा अर्जुनासमवेत ।

अर्धं क्षण न रहावें एथ । यादव समस्त निमाले ॥९२॥

यादवीं जाऊनि प्रभसासी । केला तीर्थविधि विधानेंसीं ।

दान भोजनें देऊनि द्विजांसी । मद्यपानासी मांडिलें ॥९३॥

चढला मद्याचा उन्मादु । यादव सखे सगोत्र बंधु ।

परस्परें युद्धसंबंधु । गोत्रवधु तेथ घडला ॥९४॥

शस्त्रेंकरुनि स्वयमेव । कोणी न मरतीच यादव ।

तेथ घडलें एक अपूर्व । एरिकेनें सर्व निमाले ॥९५॥

बळिभद्रें त्यागिलें देहासी । श्रीकृष्णही गेला निजधामासी ।

मज धाडिलें तुम्हांपाशीं । क्षण द्वारकेसी न रहावें ॥९६॥

हरीनें त्यागिलें द्वारकेसी । समुद्र बुडवील शीघ्रतेशीं ।

हें कृष्णें सांगितलें तुम्हांसी । एथूनि त्वरेंसीं निघावें ॥९७॥

ऐकूनि दारुकाची गोठी । द्वारकेसी एक बोंब उठी ।

उग्रसेन कपाळ पिटी । मस्तक आपटी वसुदेव ॥९८॥

एक कुस्करिती दोनी हात । एक अत्यंत चरफडत ।

एक आक्रोशें आक्रंदत । एकें मूर्च्छित पैं पडलीं ॥९९॥

एका रडतां शोषले कंठ । एकाचे दोनी फुटले ओंठ ।

एकाचा होऊं पाहे हृदयस्फोट । दुःख अचाट सर्वांसी ॥२००॥

एक स्फुंदती उकसाबुकशीं । एक पिटिती हृदयासी ।

एक तोडिती कान-केशीं । एकें दुःखें पिशीं पैं जाहलीं ॥१॥

एक देती दीर्घ हाक । एकें पडलीं अधोमुख ।

एके मीनाच्या ऐसें देख । अत्यंतिक तळमळती ॥२॥

बोंब सुटली नरनारी । शंख करिती घरोघरीं ।

कोण कोणातें निवारी । समस्तां सरी समदुःख ॥३॥

देवकी आणि रोहिणी । मूर्च्छित पडल्या धरणीं ।

सवेंचि उठती आक्रंदोनी । दीर्घस्वनीं विलपती ॥४॥

कृष्णा विसाविया निजाचिया । वेगीं भेटी देईं कां रे कान्हया ।

कां रुसलासी रे तान्हया । तुझिया पायां लागेन ॥५॥

श्रीकृष्ण तूं माझा कैवारी । श्रीकृष्न तूं माजा सहाकारी ।

शेखीं मज सांडोनि दुरंधरी । तूं दूरचे दूरी गेलासी ॥६॥

जिणोनि कंसकेशियातें । बंदीं सोडविलें आमुतें ।

शेखीं तुवां सांडिलें एथें । निष्ठुर चित्तें झालासी ॥७॥

आणूनि निमाल्या पुत्रांतें । तुवां मज सुखी केलें येथें ।

अंतीं ठकिलें ठकिलें मातें । श्रीकृष्णनाथें नाडिलें ॥८॥

कृष्णा निरसूनि माझें दुःख । तुवा दिधलें परम सुख ।

तो तूं निष्ठुर जाहलासी देख । अंतीं निःशेख सांडिलें ॥९॥

माझिया पुत्रा कृष्णराया । वेगीं ये का रे कान्हया ।

माझ्या नाहीं प्राशिलें पान्हया । म्हणोनि तान्हया रुसलासी ॥२१०॥

जिचें केलें स्तनपान । ते यशोदाही जाहली दीन ।

तुझें न देखतां वदन । कैसेनि प्राण राहतील ॥११॥

कृष्णा ये रे ये रे धांवोन । चौभुजीं मज दे आलिंगन

तुझें चुंबीन रे वदन । मी अतिदीन तुजलागीं ॥१२॥

माझिया श्यामसुंदरा । राजीवलोचना सुकुमारा ।

चतुर्भुजा शार्डंगधरा । ये का रे उदारा श्रीकृष्णा ॥१३॥

तुझे पद्मांकित पाये । मज आठवती पाहें ।

तेणें हृदय फुटताहे । करुं मी काये श्रीकृष्णा ॥१४॥

कृष्णा तुजहूनि वेगळी । मी जाहलें रे आंधळी ।

माझी धरावया आंगोळी । धांव वनमाळी श्रीकृष्णा ॥१५॥

मज अंधाची कृष्ण काठी । कोणें घातली गे वैकुंठीं ।

आतां मी मार्ग केवीं कंठीं । पाव जगजेठी श्रीकृष्णा ॥१६॥

पुत्र नातू वंशावळी । एके वेळीं जाहली होळी ।

कोणी नुरेचि यदुकुळीं । वक्षःस्थळीं पिटिती ॥१७॥

यादव पडले रे केउते । तुज कोठूनि धाडिलें कृष्णनाथें ।

वेगीं न्या रे मज तेथें । पाहीन समस्तें तानुलीं ॥१८॥

ऐकोनि देवकीचें रुदन । वसुदेवादि उग्रसेन ।

आक्रंदोनि सकळ जन । प्रभासासी जाण निघाले ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP