एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


राजन्परस्य तनुभृज्जननाप्ययेहा,

मायाविडम्बनमवेहि यथा नटस्य ।

सृष्टवाऽऽत्मनदमनुविश्य विहृत्य चान्ते,

संहृत्य चात्ममहिनोपरतः स आस्ते ॥११॥

ऐके राया परीक्षिती । सकळ कारणां कारण श्रीपती ।

मायेचीही चेतनाशक्ती । जाण निश्चितीं श्रीकृष्ण ॥९५॥

ज्यासी नाहीं व्यक्ति वर्ण । ज्यासी नाहीं रुप गुण ।

तो स्वलीला श्रीकृष्ण । यदुवंशीं जाण अवतरला ॥९६॥

जो सकळवंशवंशज जाण । जो सकळ गोत्र गोत्रज पूर्ण ।

जो सकळ जातींची जाती जाण । स्वयें श्रीकृष्ण सर्वादि ॥९७॥

त्यासी यदुवंशीं जें जन्म । गोवर्धनोद्धारणादि कर्म ।

कुलक्षयो निजधर्म । हें स्वलीलाकर्म योगमाया ॥९८॥

योगमायेचिया सत्ता । मत्स्यकूर्मादि अवतारता ।

शेखीं धरी श्वेतवराहता । ते अतर्क्य योग्यता कृष्णाची ॥९९॥

श्रीकृष्ण नव्हे नव्हे अवतार । हा अवतारी पूर्ण चिन्मात्र ।

त्याचें अतिअतर्क्य चरित्र । ब्रह्मादि रुद्र नेणती ॥१००॥

जैसें आरिसां प्रतिबिंब बिंबलें । तैसें यदुवंशीं कृष्णजन्म जाहलें ।

आरिसां हावभाव पाहिले । तैसें कर्म केलें श्रीकृष्णें ॥१॥

तो आरिसा हातींचा त्यागितां । हारपे पुढील प्रतिबिंबता ।

त्या नांव कृष्णनिधनता । मिथ्या वार्ता मायिक ॥२॥

जैसा नट धरी नाना वेष । सवेंचि सांडी त्या वेषांस ।

परी नटासी नाहीं नाश । तैसा पैं हृषीकेश अवतारी ॥३॥

यदुवंशीं श्रीकृष्णनाथ । सर्व कर्मी सदा अलिप्त ।

सृष्टिस्थित्यंतीं नित्यमुक्त । त्यासी परमाद्भुत तें कायी ॥४॥

न मेळवितां साह्य संगें । कृष्ण सृष्टी सृजी निजांगें ।

ते प्रतिपाळूनि यथाभागें । संहारुनि वेगें स्वयें उरे ॥५॥

श्रीकृष्ण सृजी पाळी संहारी । हे प्रत्यक्ष जगीं दिसे थोरी ।

कर्में करुनि तो अविकारी । कदा विकारी नव्हे कृष्ण ॥६॥

श्रीकृष्ण अंतर्यामी सर्व भूतां । जगकर्मांचा कृष्ण कर्ता ।

कर्म करुनि तो अकर्ता । विदेहता निजरुपें ॥७॥

ऐसा अगाध श्रीकृष्णमहिमा । मर्यादा न पवे शिव शक्र ब्रह्मा ।

त्याचा देहचि विदेहात्मा । गेला निजधामा तेणें योगें ॥८॥

येचि अवतारीं श्रीकृष्णनाथें । देहीं दाविलें विदेहकर्मातें ।

तें मागें परिसविलें तूतें । ऐक मागुतें सांगेन ॥९॥

सात दिवस गोवर्धन । निजकरीं धरुनि जाण ।

इंद्राचा हरिला मान । विदेही पूर्ण श्रीकृष्ण ॥११०॥

दावाग्नि प्राशूनि आपण । लाजविला हुताशन ।

रासक्रीडा करुनि जाण । हरिला मान मदनाचा ॥११॥

समुद्र सारुनि माघारां । वसविलें निजनगरा ।

निद्रा न मोडितां मथुरा । द्वारकापुरा आणिली ॥१२॥

सेवूनि भाजीचें पान । तृप्त केले ऋषिजन ।

श्रीकृष्ण अंतर्यामी आपण । हें निजलक्षण दाविलें ॥१३॥

येणेंचि देहें श्रीकृष्णनाथ । जाहला वत्सें वत्सप समस्त ।

ब्रह्मा लाजवूनि तेथ । गर्वहत तो केला ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP