एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


लोकाभिरामां स्वतनुं, धारणाध्यानमङगलम् ।

योगधारणयाग्नेय्याऽदग्ध्वा धामाविशत्स्वकम् ॥६॥

कळिकाळ जिणोनि जाण । स्वच्छंदमृत्यु योगीजन ।

ते अग्निधारणा करुनि पूर्ण । स्वदेह जाळून स्वरुप होती ॥५०॥

घृत थिजलें तें विघुरलें । तैसें सगुण निर्गुणत्वा आलें ।

या नांव योगाग्रिधारण बोलिलें । श्रीकृष्णें देह दाहिलें हें कदा न घडे ॥५१॥

कृष्णस्वरुप परिपूर्ण । तो कां करील योगधारण ।

त्याचा लीलाविग्रही देह जाण । करावें दहन कशाचें ॥५२॥

देखतां डोळ्यां लागे ध्यान । संपूर्ण जेथें विगुतें मन ।

एवढें श्रीकृष्णसौंदर्य संपूर्ण । निजमोहन जगाचें ॥५३॥

ज्याचें देखतां बरवेंपण । मदन पोटा आला आपण ।

लक्ष्मी भुलली देखोन चरण । चैतन्यघन श्रीकृष्ण ॥५४॥

ज्याचें योगियां सदा ध्यान । शिवादिकां नित्य चिंतन ।

सकल मंगलाचें आयतन । चैतन्यघन श्रीकृष्ण ॥५५॥

श्रीकृष्ण स्वयें आत्माराम । यालागीं तो जगाचा आराम ।

लीलाविग्रही घनश्याम । ध्यानगम्य चिद्रूप ॥५६॥

जैशी घृताची पुतळी । थिजोनि जाहली एके काळीं ।

तैसी चैतन्याची मुसावली । स्वलीला जाहली श्रीकृष्णमूर्ती ॥५७॥

दावाग्नि प्राशिला प्रत्यक्ष । न चढेचि काळियाचें विख ।

तो देहचि नव्हे देख । मा मरणात्मक तेथ कैंचें ॥५८॥

कृष्ण प्रकटे ज्याचे हृदयीं । तो देहींच होय विदेही ।

मा त्या कृष्णाच्या ठायीं । देहत्व कायी असेल ॥५९॥

कृष्णदेहो नाहीं निमाला । तो आभासचि सहजत्वा आला ।

जैसा दर्पणींचा लोपला । प्रतिबिंब आपुला आपुले ठायीं ॥६०॥

ज्याचें करितां नामस्मरण । भक्तांचें निरसे जन्म मरण ।

तो कृष्ण पावे जैं निधन । तैं भक्तांसी कोण उद्धरी ॥६१॥

आत्ममायेचे स्वलीला । कृष्ण कृष्णरुपें प्रगट जाहला ।

ते लीला त्यागोनि संचला । निजरुपीं ठेला निजत्वें ॥६२॥

कृष्णें देहो नेला ना त्यागिला । तो लीलाविग्रहें संचला ।

भक्तध्यानीं प्रतिष्ठिला । स्वयें गेला निजधामा ॥६३॥

जैसजैसा भक्ताचा भावो । तैसातैसा होय देवो ।

ते भक्तध्यानीं स्थापूनि देहो । निजधामा पहा हो न वचोनि गेला ॥६४॥

हो कां कृष्णमूर्ति जरी सगुण । तरी देहा दाह न घडे जाण ।

कृष्णाश्रयें जग संपूर्ण । तेव्हां होईल दहन जगाचें ॥६५॥

जेणें मायेसी निजपोटीं । दाविल्या ब्रह्मांडांच्या कोटी ।

त्या श्रीकृष्णदेहदाहापाठीं । जगाची गोठी नुरावी ॥६६॥

ऐशियाही युक्ति विचारितां । अतिस्थूळ ते योग्यता ।

श्रीकृष्णदेहचि विदेहता । तेथ दाहकता ते कैची ॥६७॥

कृष्णाचें असणें जाणें । हेंही श्रीकृष्णचि स्वयें जाणे ।

तेथ वेदांचेंही बोलणें । जाणपणें सरेना ॥६८॥

हे कृष्णाची अगम्य गती । शिवविरिंच्यादि नेणती ।

त्यांची कल्पना ऐशी चित्तीं । आम्हांसवें श्रीपती येईल ॥६९॥

ऐसेनि अभिप्रायें पूर्ण । आनंदले सुरगण ।

अवघे होऊनि सावधान । उल्हास पूर्ण मांडिला ॥७०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP