कथाकल्पतरू - स्तबक १० - अध्याय १०

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

जन्मेजयासि ह्नणे मुनी ॥ द्रोण दुर्मना होवोनि रजनीं ॥ दुर्योधनाप्रति वचनीं ॥ बोलता जाहला ॥१॥

ह्नणे म्यां पूर्वी कथिला विचार ॥ कीं हे अजेय पंडुकुमर ॥ तरी आतां युक्तिप्रकार ॥ कीजे ऐसा ॥२॥

तुह्मी सर्व नृपनंदन ॥ युद्धीं गोंवा फाल्गुन ॥ मग मी इतुकियांत धरुन ॥ आणीन धर्मासी ॥३॥

तंव त्रिगर्त ह्नणती तया ॥ आह्मी रोध करुं धनंजया ॥ तुह्मी आणा धरोनियां ॥ युधिष्ठिरासी ॥४॥

नानापातकें उच्चारोनी ॥ प्रतिज्ञा बोलती वचनीं ॥ तोषविले पुण्याहवाचनीं ॥ ब्राह्मण देखा ॥५॥

मग रणभूमीसि निघाले ॥ पार्थासि दूत पाठविले ॥ ह्नणती युद्धा बोलाविलें ॥ त्रिगर्ते तुज ॥६॥

यावरी पार्थ धर्मासि ह्नणे ॥ हा छळ केला गुरुद्रोणें ॥ तरी आतां सांभाळणें ॥ बंधुराया ॥७॥

ऐसें ह्नणोनि रणीं निघाला ॥ देवदत्त वाजविल ॥ तंव एकचि कोल्हाळ जाहला ॥ परवीरांमाजी ॥८॥

मांडलें युद्धाचें घनचक्र ॥ धडमुंडांचे पडिले डोंगर ॥ रक्तनदी वाहे घोर ॥ रणभूमीसी ॥९॥

तये वेळीं यदुरायें ॥ रथ प्रेरिला महालाहें ॥ तो श्वेताश्वीं शोभता होय ॥ विमानसदृश ॥१०॥

घायाळ उरले ते पळाले ॥ पार्थे वायव्यास्त्र सोडिलें ॥ ऐसे त्रिगर्त पराभविले ॥ पार्थे देखा ॥११॥

इकडे द्रोणें व्यूह रचिला ॥ जो क्रौंचनामें बोलिला ॥ तो देखोनि धर्म बोलिला ॥ धृष्टद्युम्नासी ॥१२॥

कीं हा अजिंक्य गुरुद्रोण ॥ प्राप्त जाहला ससैन्य ॥ दूरी राहिला असे अर्जुन ॥ समय दुर्घट दीसतो ॥१३॥

येरु ह्नणे ऐक राया ॥ मनीं भय नधरीं वायां ॥ मी या निवारीन ह्नणोनियां ॥ परमावेशें उठावला ॥१४॥

उभयसैन्या मांडली झुंजारी ॥ वीर नोळखती परस्परीं ॥ धडमुंडीं चरणकरीं ॥ खुंटले मार्ग ॥१५॥

धर्मासि धराया गुरुद्रोण ॥ क्षणक्षणा करी प्रयत्न ॥ परि उचलोनि गुरुस्यंदन ॥ भीम भिरकावी आकाशीं ॥१६॥

इकडे त्रिगर्त पराभवावरी ॥ भगदत्त धांवला पार्थावरी ॥ आरुढोनियां महाकुंजरीं ॥ प्राग्ज्योतिषनाथ ॥१७॥

तये भगदत्तें अभिमंत्रिलें ॥ तें वैष्णवास्त्र मोकलिलें ॥ परि तें केशवें साहिलें ॥ आपुले हदयीं ॥१८॥

खेद करोनि ह्नणे पार्थ ॥ देवा मुरडवीं हा रथ ॥ तंव ह्नणे कृष्णनाथ ॥ ऐसें केविं घडे ॥१९॥

अगा पूर्वील वृत्तांत ऐकणें ॥ म्यां पूर्वी लोकहिताकारणें ॥ चरीमूर्ती केलिया प्रयत्नें ॥ होवोनि चतुर्धा ॥२०॥

चहूंठायीं ठेविल्या तिया ॥ येकी करिते तपश्वर्या ॥ दुसरी पाहे न्याहाळोनियां ॥ तिजी मनुष्यकर्माश्रित ॥२१॥

चौथी सागरीं निद्रा करिते ॥ तेसहस्त्रवर्षातीं उठते ॥ तपस्वियांतें वर देते ॥ भूमंडळीं ॥२२॥

तरी हा पृथ्वीचा कुमर ॥ यासी एके समयीं परिकर ॥ म्यांचि दीधलें वैष्णवास्त्र ॥ प्रसन्नपणें ॥२३॥

ह्नणोनि तुज रक्षाया निमित्त ॥ हें म्यां उरीं घेतलें निभ्रांत ॥ ऐसें ऐकोनियां हर्षित ॥ जाहला येरु ॥२४॥

उपरी तेणें असंख्य बाण ॥ सोडोनियां अतिदारुण ॥ केलें भगदत्तशिरःपातन ॥ समरांगणीं ॥२५॥

संजय ह्नणे कुरुनायका ॥ पुरंदराचा परम सखा ॥ तो हा भगदत्त मारिला देखा ॥ धनुर्धरें ॥२६॥

तंव सौबळ नामें शकुनीबंधु ॥ भगदत्ताचा देखोनि वधु ॥ करुनि मायालाघवबंधु ॥ उठावला पार्थावरी ॥२७॥

लगोरिया परिघ पाषाण ॥ शतघ्नी शक्ति मार्गण ॥ गदा मुद्नल शूळ जाण ॥ पट्टीश मुसळें ॥ ॥२८॥

क्षुरचक्रें परश्वघें ॥ विशिख प्रास नानाविधें ॥ पडती अर्जुनावरी आयुधें ॥ आकाशींहुनी ॥२९॥

महिष लांडगे खर उष्ट्र ॥ सिंह व्याघ्र कपि सूकर ॥ राक्षसही नानाप्रकार ॥ येते जाहले ॥३०॥

पार्थे अस्त्रजाळ प्रेरिलें ॥ मायालाघव निवारिलें ॥ बाण असंख्यात सोडिले ॥ सौबळावरी ॥३१॥

इकडे द्रोणा आणि पांचाळा ॥ दारुण संग्राम जाहला ॥ आणि युद्ध करुंलागला ॥ नीळंपेशीं द्रोणसुत ॥३२॥

तो द्रोणपुत्रें तत्क्षणीं ॥ पाडियेला शिर छेदोनी ॥ तेणें पांडवसेना मनीं ॥ जाहली भयभीत ॥३३॥

तंव वासुदेव आणि अर्जुन ॥ आले भगद्त्तासि मारुन ॥ त्याहीं पराभविलें सैन्य ॥ कौरवांचें ॥३४॥

येणें परी कौरवदळ ॥ पांडवीं भंगविलें सकळ ॥ ऐसें जाहलें तुंबल ॥ द्वितीयदिनीं ॥३५॥

मग दोनी भार ओसरले ॥ आपुलाले स्थानीं गेले ॥ एवं द्रोणकंल्प जाहलें ॥ निर्फळ देखा ॥३६॥

पांडवीं धर्माचे केलें रक्षण ॥ सर्ववीर जाहले उद्विग्न ॥ रात्रिभागीं दुर्योधन ॥ द्रोणासि बोले ॥३७॥

कीं त्वां धर्म दृष्टीं देखिला ॥ तरी कायह्नणोनि सोडिला ॥ मजसी नेम होता केला ॥ तो जाहला निर्फळ ॥३८॥

आशाभंग भक्ताचा करणें ॥ याहूनि पातक नाहीं जाणणें ॥ ययाउपरी द्रोण ह्नणे ॥ दुर्योधनासी ॥३९॥

अगा अर्जुन आणि श्रीहरी ॥ तया धर्माचे साह्यकारी ॥ स्वयें पराक्रमी सदाचारी ॥ जितेंद्रिय धर्म ॥४०॥

कवणे परी तो जिंकावा ॥ तरी आतां शब्द ऐकावा ॥ चक्रव्यूह करोनि बरवा ॥ धरीन धर्मा जीवंत ॥४१॥

नानाशस्त्रास्त्रमंडित ॥ वीर उभे राहिले तेथ ॥ सुगंधमाळा चर्चित ॥ युक्त अळंकारीं ॥४२॥

ध्वजपताकायुक्त वीर ॥ सिंधुराज द्रोणकुमर ॥ सर्व कौरव गांधार ॥ ठेविले ठाइंठायीं ॥४३॥

ऐसें सन्नद्ध जाहले ॥ तंव पांडव संसारले ॥ भीम आणि सात्यकी भले ॥ चेकितानादी ॥४४॥

व्यूहमुखीं राहिला द्रोण ॥ तयाप्रति धर्मे देखोन ॥ ह्नणे समसप्तकांवरी गेला अर्जुन ॥ ऐकें अभिमन्या ॥४५॥

तरी वत्सा तूं कीं अर्जुन ॥ श्रीकृष्ण अथवा प्रद्युम्न ॥ याचा भेद चौघांवांचुन ॥ नेणती कोणी ॥४६॥

ययाउपरी बाळ ह्नणे ॥ ताता मी भेद निश्वयें जाणें ॥ परि निर्गम न जाणें ॥ आज्ञा प्रमाण तुमची मज ॥४७॥

धर्म ह्नणे तूं भेद करी ॥ आह्मीं येऊं बरोबरी ॥ भीम ह्नणे सैन्यपरिवारीं ॥ मी येतों तुजसवें ॥ ॥४८॥

परमावेशें सौभद्र ह्नणे ॥ आजि पराक्रम दाखविणें ॥ ह्नणोनि रथ प्रेरिला तेणें ॥ तंव बोलिला सारथी ॥४९॥

हे द्रोणादि वीर पुढें राहोन ॥ व्यूह अभेद्य केला ह्नणोन ॥ परि ह्नणे पार्थनंदन ॥ नधरीं धाक ॥५०॥

आजि माझा पुरुषाचार ॥ हे पाहतील वीर समग्र ॥ ऐसें ऐकोनि तेणें शीघ्र ॥ प्रेरिला स्यंदन ॥५१॥

प्रथम द्रोणासीं संग्राम केला ॥ मग सैन्यांत प्रवेशला ॥ चातुरंगा निःपात केला ॥ संख्यारहित ॥५२॥

पाश पट्टीश धनुष्य शर ॥ परिघ मुद्नल तोमर ॥ ईहींयुक्त असंक्य वीर ॥ धडमुंडीं निवटिलें ॥५३॥

मग द्रोण आणि द्रोणनंदन ॥ कृप कृतवर्मा कर्ण ॥ शस्त्रास्त्रें सोडिती दारुण ॥ एकलिया बाळावरी ॥५४॥

येरें प्रत्येकीं तीनतीनबाणीं ॥ निवारिले शरसंधानी ॥ उपरी कर्णातें विंधोनी ॥ केलें व्याकुळ ॥५५॥

आणि कुंडभेदी सुखेन ॥ मारिले वीर दीर्घलोचन ॥ मागुतें द्वंद्वयुद्ध दारुण ॥ केलें समस्तांसीं ॥५६॥

ऐसें करोनि घोरयुद्ध ॥ सौभद्रें पाडिले भारकबंध ॥ मग केला सिंहनाद ॥ हर्षदायक पांडवां जो ॥५७॥

परि सैन्य भंगलें देखोनी ॥ जयद्रथ उठिला बाणीं ॥ तो पूर्वी द्रौपदीहरणीं ॥ पांडवीं विटंबिला होता ॥५८॥

तेणें थोर अपमानला ॥ ईश्वर तपें प्रसन्न केला ॥ पांडवां जिंकाया मागीतला ॥ तेणें वर ॥५९॥

तेव्हां रुद्र ह्नणे तयासी ॥ एकावांचोनि अर्जुनासी ॥ सकळ पांडवां तूं जिंकिसी ॥ येके वेळे ॥६०॥

तयेचि वरदानें करोनी ॥ जयद्रथ पांडवांलागुनी ॥ रुद्रासमान ते दिनीं ॥ दिसता जाहला ॥६१॥

तो व्यूहद्वारीं राहोन ॥ युधिष्ठिर मुख्य करोन ॥ वीरांसि युद्ध करी दारुण ॥ नानापरी ॥६२॥

तेणें व्यूहद्वार रोधिलें ॥ इकडे सौभद्रें काय केलें ॥ असंख्य वीरांसी पाडिलें ॥ रणांगणामाजी ॥६३॥

पार्थे दीधलें होतें थोर ॥ जया नाम गंधर्वास्त्र ॥ तें टाकोनि राजकुमर ॥ दोनशतें पाडिले ॥६४॥

मग दुर्योधन आला ॥ येरें तोही परामविला ॥ क्राथ आला तोहि पाडिला ॥ रणांगणीं ॥६५॥

मारिला दुर्योधनाचा पुत्र ॥ ह्नणोनि द्रोणादिक वीर ॥ एकदांचि उठिले समग्र ॥ परि तो वीर नाटोपे ॥६६॥

द्रोण कृप अश्वत्थामा ॥ आले कर्णादि कृतवर्मा ॥ तितुकियांसही साउमा ॥ जाहला सौभद्र ॥६७॥

कर्णे शतबाण टाकिले ॥ येरेंही शंभर मोकलिले ॥ ऐसें परस्परां वर्तलें ॥ घोरयुद्ध ॥६८॥

मग कर्णाचे सहजन ॥ पुत्र मागध नार्तिक जाण ॥ अवंतिक भोज कुंजकेतन ॥ वीर असंख्य मारिले ॥६९॥

आणि दुःशासनाचे सुत ॥ युद्धीं केले पराजित ॥ शत्रुंजय चंद्रकेत ॥ मेघवेग सुवर्चादी ॥७०॥

सूर्यभास सहित ॥ केला पांचांचाही निःपात ॥ सौबळही विंधिला त्वरित ॥ बाणत्रयीं ॥७१॥

देखोनि दुर्योधन ह्नणत ॥ अरे हा संहार असे करित ॥ तरी सर्वी मिळोनि निःपात ॥ करुं याचा ॥७२॥

तंव ह्नणे द्रोणगुरु ॥ हा महापराक्रमी वीरु ॥ याचा हस्तकौशल्यप्रकारु ॥ न लक्षवे आह्मां ॥७३॥

ऐसा द्रोणें वाखाणिला ॥ परि बाणीं असे पीडला ॥ तंव कर्ण दुःखें बोलिला ॥ कीं याचे बाण दारुण ॥७४॥

यावरी कर्ण द्रोणासि ह्नणे ॥ तुह्मी रथसारथी मारणें ॥ आणि मी छेदीन स्वबाणें ॥ धनुष्य याचें ॥७५॥

मग सकळही वीर मिळोनी ॥ ययालागीं पाडूं मेदिनीं ॥ ऐसें ह्नणोनि तत्क्षणीं ॥ छेदिलें धनुष्य ॥७६॥

अश्व सारथी आणि रथ ॥ भोजें तोडिले समस्त ॥ द्रोणें सोडिले असंख्यात ॥ मार्गण देखा ॥७७॥

मग तो छिन्नध्वज जाहला ॥ ह्नणोनि गगनमार्गे उडाला ॥ गदा घेवोनि धाविन्नला ॥ उभयहस्तीं ॥७८॥

कालिकेय आणि गांधार ॥ कैकेय्यांचे वीरभार ॥ मारिले शतयेक शीघ्र ॥ गदाघातें ॥७९॥

मग अवघ्यांहीं मिळोनी ॥ भेदिते जाहले असंख्यबाणीं ॥ महात्राणें पाडिला धरणीं ॥ अभिमन्यु तो ॥८०॥

समस्त कौरव हर्षले ॥ वाद्यघोषें गर्जिन्नले ॥ चातुरंग रण पडिलें ॥ तेणें शोभली भूमिका ॥८१॥

अभिमन्यु वीर पडला ॥ पांडवभार भग्न जाहला ॥ आपुलाले शिबिरीं गेला ॥ शोकाक्रांत ॥८२॥

कौरव जयजयकार करोनी ॥ राहिले असती संग्रामस्थानीं ॥ ऐसें युद्ध तिसरे दिनीं ॥ जाहलें देखा ॥८३॥

यानंतरें अपूर्व कथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ ते ऐकावी सकळ श्रोतां ॥ ह्नणे मधुकरकवी ॥८४॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ दशमस्तबक मनोहरु ॥ अभिमन्युवधप्रकारु ॥ दशमोध्यायीं कथियेला ॥८५॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP