कथाकल्पतरू - स्तबक १० - अध्याय ७

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

भीष्में रचिला गरुडव्यूह ॥ तंव पांडवसैन्यसमूह ॥ रचोनि क्रौंचव्यूह अपूर्व ॥ आला देखा ॥१॥

दोनी भार मिसळले ॥ युद्ध घोरांदर मांडलें ॥ रक्तनद्यांचे पूर चालिले ॥ जाहले मांसकर्दम ॥२॥

धूळीपटळ होतें ॥ उडालें ॥ तें रक्तपूरें शमलें ॥ आणि चातुरंग निमाले ॥ परस्परें ॥३॥

भीष्म जयद्रथ पुरुमित्र ॥ विकर्ण शकुनी सौबळवीर ॥ यांहीं पांडवसैन्या अपार ॥ केला क्षय ॥४॥

ह्नणोनि घटोत्कच भीमसेन ॥ सात्यकी आणि चेकितान ॥ यांहीं युद्ध केलें दारुण ॥ जेवीं देवीं दैत्यांसवें ॥५॥

सात्यकी आणि सुभद्रासुतें ॥ निरोधिलें गांधारातें ॥ तो सोडविला त्वरितें ॥ भीष्मद्रोणांनीं ॥६॥

तंव अर्जुनें अमित बाणीं ॥ सकळ र्जजर केले रणीं ॥ तो कोल्हाळ आयकोनी ॥ तेथें आला दुयोधन ॥७॥

क्रोधें भीष्मालागीं ह्नणे ॥ तुह्मी वीर असतां मानें ॥ संहार जाहला माझिये सेने ॥ पळाली दशादिशां ॥८॥

थोर कलंक लागला तुजसी ॥ तूं तरी पूर्वी बोलिलासी ॥ कीं मी सर्वथा पांडवांसी ॥ मारीन युद्धीं ॥९॥

यावरी भीष्म बोले वचन ॥ मी गतायुष वरी वृद्धपण ॥ परि जे चालेल आंगवण ॥ ते करीन मी ॥ ॥१०॥

ऐसें बोलोनियां वचनीं ॥ युद्धा प्रवर्तला निर्वाणीं ॥ सैन्य अंसख्य पाडिलें रणीं ॥ पांडवांचें ॥११॥

तो सर्वासि अनिवार ॥ भीष्म प्रतापदिनकर ॥ दशदिशां सैन्यांधकार ॥ पळविला देखा ॥१२॥

तंव पार्थासि ह्नणे अनंत ॥ हा सैन्याचा देखोनि अंत ॥ काय गा बैसलासि निवांत ॥ रथावरी ॥१३॥

तुवां पूर्वी बोलिलें होतें ॥ कीं मी मारीन भीष्मादिकातें ॥ तरी आतां स्ववाक्यातें ॥ करीं सत्य पार्था ॥१४॥

ऐसा तिरस्कार केला ॥ तंव अर्जुन सिद्ध जाहला ॥ देवें रथ पिटाळिला ॥ भीष्मसमपि ॥१५॥

मग शस्त्रास्त्रीं भिडिन्नले ॥ तेव्हां रमाधवें आपुलें ॥ लाघव दावूं आदरिलें ॥ सैनिकांसी ॥१६॥

गतोविगती अश्व चालवी ॥ बाणजाळ अवघें चुकवी ॥ तंव भीष्मेंही स्वलाघवीं ॥ केलें संधान ॥१७॥

बाण अदृष्टचि सोडिले ॥ ते कृष्णार्जुना खडतरले ॥ तंव देवें विचारिलें ॥ आपुले मनीं ॥१८॥

हा भीष्म महाविंदानी ॥ न जिंकवे अर्जुनाचेनी ॥ येणें महावीर पाडिले रणीं ॥ पांडवांचे ॥१९॥

व्याकुळ केला धनंजय ॥ तरी पांडवां व्हावया जय ॥ हा मरिजेल ऐसा उपाय ॥ काय कीजे ॥२०॥

ऐसें विचारी श्रीकृष्ण ॥ तंव बाणीं गंगानंदन ॥ भरोनियां टाकी गगन ॥ तेणें भानु लपाला ॥२१॥

यावरी तो चक्रपाणी ॥ रथाखालीं उडी घालोनी ॥ पतित रथचक्र उचलोनी ॥ भीष्मावरी धाविन्नला ॥२२॥

ह्नणे धर्मा राज्यीं स्थापोन ॥ पांडवांसी आनंदवीन ॥ ह्नणोनि जात वेगेंकरुन ॥ मारावया भीष्मासी ॥२३॥

तयाचे हातीं पद्मवत ॥ चक्र असे भोवंडत ॥ जाणों भुजदंड तें निभ्रांत ॥ नाळ तया पद्माचें ॥२४॥

तेंचि सुदर्शन कल्पोनी ॥ निघाला उच्चहस्त करोनी ॥ हाहाःकार केला सर्वजनीं ॥ कांपिन्नलें ब्रह्मांड ॥२५॥

कुरुकुळादि राजयां ॥ समस्तांसी जाळावया ॥ श्रीकृष्ण धूमकेतुप्राया ॥ कोणी पाहूं शकेना ॥२६॥

ऐसा धांवत चालिला शीघ्र ॥ परि न भियेचि गंगाकुमर ॥ गुणीं सादोनियां शर ॥ सद्नद जाहला ॥२७॥

ह्नणे गोविंदा भलाभला ॥ तुझा प्रभावो मज कळला ॥ नाश करोनि कौरवकुळा ॥ रक्षितोसी पांडवां ॥२८॥

तूं मज जालासि मारिता ॥ यांत वोखटें काय अनंता ॥ तुज पावेन मी सर्वथा ॥ मरणानंतरें ॥२९॥

असो हें चक्र सोडोनि कृष्णें ॥ जंव भीष्मासि घ्यावें प्राणें ॥ तंव धांवोनियां अर्जुनें ॥ मिठी घातली कृष्णपाई ॥३०॥

तें नायकोनि सरोष ॥ धांविन्नला आदिपुरुष ॥ परि पार्थे कवळिला विशेष ॥ स्वबळेंकरोनी ॥३१॥

ह्नणे म्यां प्रतिज्ञा केली होती ॥ कीम भीष्माची करीन शांती ॥ तरी होईल अपकीर्ती ॥ कैवल्यपती जाणिजे ॥३२॥

आतां कोप करा जी शमन ॥ नकरा देवव्रताचें हनन ॥ कृपाळें कीजे अश्वप्रेरण ॥ साजोनि रथ ॥३३॥

हें ऐकोनि संतोषला ॥ येवोनि रथीं बैसला ॥ पांचजन्य वाजविला ॥ पार्थे घेतलें गांडीव ॥३४॥

असो यावरी दुर्योधन ॥ भूरिश्रवा गंगानंदन ॥ करिती बाणवृष्टी धांवोन ॥ अर्जुनावरी ॥३५॥

तंव तयांचे सकळ बाण ॥ पार्थे पाडिले तोडोन ॥ मग सैन्य भेदिलें दारुण ॥ कौरवांचें ॥३६॥

तैं संग्रामभूमिके पार्थे ॥ नद्या वाहविल्या रक्तें ॥ भयंकर शब्द होती तेथें ॥ तोचि प्रवाह घोष ॥३७॥

पडले पुरुष हत्ती रथ ॥ जाणों तीं तीरें प्रस्तुत ॥ छत्रें हंस जळचरेंभूत ॥ राक्षस पक्षिये ॥३८॥

शिरकपाळें केश शेवाळ ॥ कवचें त्या लहरी बहळ ॥ नरनागावयव सकळ ॥ वाळू जाण ॥३९॥

ऐसा अर्जुनाचा पुरुषार्थ ॥ तेवीं कोणा न करवे अद्भुत ॥ तंव मावळला दिननाथ ॥ मोड जाहला कौरवां ॥४०॥

महावीर मरोनि पडिले ॥ उरले मेळिकारीं गेले ॥ ऐसें थोर युद्ध जाहलें ॥ तृतीयदिवशीं ॥४१॥

मग ते रात्री दुःखें क्रमली ॥ तंव पूर्वदिशा उजळली ॥ उभयसेना सन्नद्धली ॥ पूर्वोक्तप्रकारें ॥४२॥

अर्जुनाचा महाध्वज ॥ देखोनि मंडित कपिराज ॥ पंचताल उंच गंगात्मज ॥ ध्वज लावी आपण ॥४३॥

भीष्म कृप शल्य विविंशती ॥ दुर्योधनादि सोमदत्ती ॥ हे उठावले तयांप्रती ॥ झुंजती पार्थ अभिमन्य ॥४४॥

अभिमन्यें भीष्म विंधिला ॥ थोर खेदखिन्न केला ॥ तंव भूरिश्रवा चित्रसेन धांवला ॥ आणि शल्यनामा कौरव ॥४५॥

तिघीं सौभद्र कोंडिला ॥ तंव अर्जुन साह्य आला ॥ इकडे पांचाळपुत्रें मारिला ॥ संयमिनीकुमर ॥४६॥

तें देखोनि गांधारीआत्मजु ॥ घेवोनि दशसहस्त्र गजराजु ॥ मागध पुढें करोनि उजु ॥ आला पांचाळपुत्रावरी ॥४७॥

तंव हस्तीवरोनि तत्क्षणीं ॥ भीम आला गदा घेवोनी ॥ जैसा गिरि छेदाया वज्रपाणी ॥ धांवे वज्रेंसीं ॥४८॥

घोरयुद्ध आरंभिलें ॥ अस्थिमांसाचे पर्वत घडले ॥ रक्तनद्यांचे पूर चालिले ॥ भेटावया सिंधूसी ॥४९॥

भगदत्तें भीम विंधिला ॥ येरु मूर्छागत पडिला ॥ उरलेयांहीं पळ काढिला ॥ ते वारिले घटोत्कचें ॥५०॥

पडिला देखोनि भीमसेन ॥ घटोत्कच करी प्रयत्न ॥ मायावी हस्ती केले निर्माण ॥ ऐरावतीसारिखे ॥५१॥

चतुर्दत तयांवरी ॥ आपण बैसला महामारी ॥ अंजन वामन चौफेरी ॥ महापद्म ॥ ॥५२॥

त्यांहीवरी दुजे कोणी ॥ मायावी पुरुष बैसवोनी ॥ आले धांवोनि माहात्राणीं ॥ कौरवसेनेवरी ॥५३॥

थोर धडका जाहला ॥ कौरवां आकांत वर्तला ॥ शब्द द्रोणाचार्ये ऐकिला ॥ कल्लोळप्राय ॥५४॥

तंव द्रोणासि ह्नणे गंगात्मज ॥ हा मायावी घटध्वज ॥ यासी इंद्रही कराया झुंज ॥ समर्थ नव्हे ॥५५॥

आणि अस्तमानही जाहलें ॥ सैन्य श्रमलें आपुलें ॥ हें भीष्मवाक्य ऐकिलें ॥ मग गेले मेळिकारीं ॥५६॥

नम्रमुख आणि लज्जित ॥ कौरव जाहले समस्त ॥ पांडव वाद्यनादें हर्षित ॥ गेले स्वस्थानीं ॥५७॥

भ्रातृदुःखें दुर्योधन ॥ चिंताग्रस्त होऊन ॥ आपुले शिबिरीं येवोन ॥ राहिला सैन्येंसीं ॥५८॥

ऐसें चतुर्थदिनीं युद्ध ॥ जाहलें परस्पर बहुविध ॥ रणभूमिसि अपार जोध ॥ पहुडले देखा ॥५९॥

व्यवस्था ऐकोनियां ऐशी ॥ धृतराष्ट्र ह्नणे संजयासी ॥ कीं भीष्म असतां पांडवांसी ॥ जैत्य केवीं लाधलें ॥६०॥

तयांच्याठायीं बहुतेक ॥ असे मंत्रविद्या औषधादिक ॥ काय कारण तैं सम्यक ॥ सांगें मज ॥६१॥

यावरी संजय ह्नणे राया ॥ नाहीं पांडवांसी मंत्रमाया ॥ स्वयें पराक्रमीं तयां ॥ असे धर्मवासना ॥ ॥६२॥

आणि साक्षात् श्रीपती ॥ तया पांडवांचा सारथी ॥ ह्नणोनि ते जिंकिताती ॥ कौरवांसी ॥६३॥

असो शिबिरीं गेलियावरी ॥ दुर्योधन चिंता करी ॥ ह्नणे त्रैलोक्य जिंकितील ऐसे क्षत्री ॥ असोनि आपुले सैन्यांत ॥६४॥

परि पांडवांचा होतो जय ॥ कां पां आह्मासि अपजय ॥ ह्नणोनियां पुसता होय ॥ भीष्मालागीं ॥६५॥

भीष्म बोलिला तिये अवसरीं ॥ तेंचि धृतराष्ट्रा अवधारीं ॥ ह्नणे दुर्योधना उत्तरीं ॥ द्यावें चित्त ॥६६॥

मागां तरी बहुत वेळे ॥ म्यां तुजलागीं शिकविलें ॥ कीं युद्ध करितां नव्हे भलें ॥ पांडवांसी ॥६७॥

श्रीकृष्ण रक्षक तयांचा ॥ मग पराजय होय कैंचा ॥ शिष्टाईसमयीं आमुची वाचा ॥ अव्हेरिली तुवां ॥६८॥

कृष्ण हा परब्रह्म साक्षात ॥ हें असे पुराणोक्त ॥ तरी सांगतों एतदर्थ ॥ प्राचीन कथा ॥६९॥

अगा कोणे येकेसमयीं ॥ देवऋषीं गंधर्व पाहीं ॥ गेले ब्रह्मदर्शना सर्वही ॥ गंधमादनपर्वतीं ॥७०॥

सकळीं ब्रह्मया नमस्कारिलें ॥ आपुलें दुःख निवेदिलें ॥ मग विधीनें ध्यान केलें ॥ जगदात्मयाचें ॥७१॥

देव विमानीं बैसोनि आला ॥ ब्रह्मा उठोनि स्तविता जाहला ॥ चतुर्भुज घनसांवळा ॥ तेजःपुंज ॥७२॥

ऋषीश्वरही उठिन्नले ॥ आश्वर्ययुक्त जाहले ॥ मग ब्रह्मयानें स्तविलें ॥ तें ऐकें राया ॥७३॥

श्लोकः ॥ विश्वावासो विश्वमूर्तिर्विष्वक्सेनो जनार्दनः ॥ विश्वकर्ता विश्वपते देवदेव नमोऽस्तु ते ॥१॥

ऐसी स्तुती आयकोनी ॥ देव संतोषला मनीं ॥ मग बोलिला अमृतवाणी ॥ ब्रह्याप्रती ॥७४॥

ह्नणे तुझें अंतर्गत ॥ म्यां जाणितलें निभ्रांत ॥ तैसेंचि होईल यथार्थ ॥ मग अदृश्य जाहला ॥७५॥

या उपरी ऋषी समस्त ॥ होवोनियां आश्वर्ययुक्त ॥ पुसों आदरिलें साद्यंत ॥ ब्रह्मयासी ॥७६॥

विधि ह्नणे हा माझा पिता ॥ जो कार्यकारणकर्ता ॥ पूज्य तुह्मां आह्मां समस्तां ॥ आदिविष्णु ॥७७॥

तो म्यां याचिला जगज्जीवन ॥ कीं वसुदेवगृहीं अवतरोन ॥ दुष्टांचें करोनि दमन ॥ सनाथ कीजे वसुमती ॥७८॥

वेदमार्गातें रक्षावें ॥ आणि धर्मातें प्रतिपाळावें ॥ देवब्राह्मणां अभय द्यावें ॥ स्थापावे स्वस्थानीं ॥७९॥

जे पूर्वकाळीं समरीं ॥ दैत्य पडले होते झुंजारीं ॥ तेचि उपजले द्वापारीं ॥ मनुष्यरुपें ॥८०॥

तयांचिये मारणार्थ ॥ नरनारायण मूर्तिमंत ॥ होतील समस्तां अजित ॥ ऐका ऋषीश्वर हो ॥८१॥

ऐसें बोलोनि सत्यनाथें ॥ विसर्जिलें त्या सभेतें ॥ मग आपुले स्वस्थानांतें ॥ गेले देवऋषी ॥८२॥

व्यास नारद जमदग्नी ॥ हे कथा ऐकिली त्यांपासोनी ॥ ते धरोनियां अंतःकरणीं ॥ कथिली तुज ॥८३॥

तरी तेचि नरनारायण ॥ साक्षात् हे कृष्णार्जुन ॥ ऐसें विश्वोपाख्यान ॥ असे भारता ॥८४॥

हें रात्रीं कथन करितां ॥ तंव उदयो पावला सविता ॥ मग मकरव्यूह रचिता ॥ जाला भीष्मदेवो ॥८५॥

वेगें पांडवसेनेवरी ॥ कौरव आले समभारीं ॥ तंव श्येनव्यूह झडकरी ॥ रचिला पांडवीं ॥८६॥

भीमें व्यूह रचोनि वहिला ॥ कौरवसैन्यांत प्रवेशला ॥ शरधारीं आच्छादिला ॥ भीष्मदेवो ॥८७॥

द्रोणाचार्या ह्नणे गांधार ॥ माझिये बंधूंचा संहार ॥ तुह्मांदेखतां अपार ॥ जाहला देखा ॥ ॥८८॥

तुमचा भीष्मासि आधार असे ॥ तरी आजी करावें ऐसें ॥ कीं पांडव सविशेषें ॥ मरतील रणीं ॥८९॥

ऐसा शब्द आयकिला ॥ द्रोणें धनुष्या हात वसविला ॥ थोरसंग्राम भविन्नला ॥ शिखंडियासी ॥९०॥

धडमुंडीं रणमेदिनी ॥ आच्छादिली कवचाभरणीं ॥ अंबरप्राय धरणी ॥ जाहली तदाकाळीं ॥९१॥

हस्ती मेधपटलें तेथ ॥ शस्त्रें विद्युल्लता सत्य ॥ आयुधांचे शब्द अत्यंत ॥ गर्जना तेची ॥९२॥

पार्थधनुष्यशब्द ऐकोनी ॥ राजे वीर आले धांवोनी ॥ कांबोजदेशमुकुटमणी ॥ मद्र गांधार ॥९३॥

सौवीर त्रिगर्त कलिंगसहित ॥ दुःशासन शंबर जयद्रथ ॥ बर्बरमुख्य समस्त ॥ सहस्त्र चौदा ॥९४॥

ऐसे निवडिले संग्रामासी ॥ भीष्माचार्य अर्जुनेंसीं ॥ विंदानुविंद काशिराजाशीं ॥ सैंधव आणि भीमसेन ॥९५॥

असंभाव्य रण माजलें ॥ अस्थिमांसांचे पर्वत पडले ॥ रक्तनदीमाजी वाहावले ॥ रथद्विरद ॥९६॥

वीर झुंजती अतिनिकुरें ॥ मालाकार उडती शिरें ॥ तंव अस्ताचळीं भास्करें ॥ धरिली आरक्तता ॥ ॥९७॥

सकळीं शस्त्रास्त्रें ठेविलीं ॥ यानंतरें रात्रि क्रमली ॥ मग प्रभातीं सन्नद्धलीं ॥ उभयदळें ॥९८॥

भीमें मकरव्यूह रचिला ॥ तो भीष्में अवलोकिला ॥ मग क्रौंचव्यूह केला ॥ स्वयें जाणा ॥९९॥

कौरवें योजिला विचारु ॥ कीं भीमासि जिवंत धरुं ॥ ऐसें जाणोनि वृकोदरु ॥ उतरला रथाधःस्थळीं ॥१००॥

गदा हातीं वसवोन ॥ असंख्यांचें करी चूर्ण ॥ वडवानळ शोषी जीवन ॥ सिंधूचें जेवीं ॥१॥

कौरवसेनेंत भीमसेन ॥ जेवीं समुद्रीं तळपे मीन ॥ तंव तयाचे साह्यालागुन ॥ धृष्टद्युम्न पातला ॥२॥

तेणें सोडोनि मोहनास्त्र ॥ मूर्छित केले कौरवभार ॥ तंव द्रोण येवोनि सत्वर ॥ प्रज्ञास्त्र जाहला प्रेरिता ॥३॥

तेणें निद्राभंग जाहला ॥ कौरवभार उठिन्नला ॥ तंव माध्यान्हासि आला ॥ चंडकिरण ॥४॥

यावरी द्वंद्वयुद्धा पूर्वोक्त ॥ वीर जाहले संप्रवृत्त ॥ तो समरसंग्राम अद्भुत ॥ नवर्णवे गा ॥५॥

दुर्योधन बैसोनि रहंवरीं ॥ त्राणें लोटला भीमावरी ॥ तंव धांवले करीत मारी ॥ सकळ कौरव ॥६॥

ऐसें अस्तमानपरियंत ॥ युद्ध होतां मारिले बहुत ॥ भीष्में पांडवसेना अगणित ॥ पाडिली देखा ॥७॥

शस्त्रें ठेवोनि सकळवीर ॥ करिती सूर्यासि नमस्कार ॥ ऐसा षष्ठमदिनप्रकार ॥ जाहला देखा ॥८॥

पुढें रात्रिसमय कमला ॥ दिनमणीसि उदय जाहला ॥ तंव मंडळव्यूह रचिला ॥ भीष्मदेवें ॥९॥

ऐसें पांडवीं देखोनी ॥ केली वज्रव्यूहा दाटणी ॥ उठले परस्पर मारीत रणीं ॥ जयाशेनें ॥११०॥

द्रोण चालिला विराटावरी ॥ अश्वत्थामा शिखंडीवरी ॥ दुर्योधन धृष्टद्युम्नावरी ॥ नकुळसहदेव शल्येंसीं ॥११॥

विंदानुविंद इरावतासी ॥ भीमसेन हार्दिक्येंसीं ॥ येर अवघे अर्जुनासीं ॥ झुंजिन्नले द्वंद्वयुद्धें ॥१२॥

अवघे भीष्मामागें चालिले ॥ तेव्हां अर्जुन कृष्णासि बोले ॥ आजी औडंबर करोनि आले ॥ समस्त कौरव ॥१३॥

तरी आजि हे यमसदनीं ॥ अवघे धाडीन निर्वाणीं ॥ मग संधान मांडिलें बाणीं ॥ तेणें दशदिशां व्यापिल्या ॥१४॥

तें सकळही निवारोन ॥ भीष्में आच्छादिले कृष्णार्जुन ॥ मग शस्त्रास्त्रप्रयुंजन ॥ जाहलें परस्पर ॥१५॥

येरीकडे हैडंब उठिला ॥ तो भगदत्तासीं झुंजिन्नला ॥ पाहूनि वीरां कंप सुटला ॥ तो संग्राम ॥१६॥

जेवीं कुंजर सरोवरीं ॥ करी कमळांची बोहरी ॥ तेवीं भगदत्तें समरीं ॥ केला वीरक्षय ॥१७॥

तंव आसुरीमाया कल्पोन ॥ घटध्वजें उठविले राक्षसगण ॥ त्याहीं शिळांचा पर्जन्य ॥ अरिसेनेवरी पाडिला ॥१८॥

तंव मावळला दिनमणी ॥ मग वोसरल्या सेना दोनी ॥ ऐसें होवोनि सातव्या दिनीं ॥ पुढें क्रमली रजनी ते ॥१९॥

तंव प्रातःकाळ जाहला ॥ कौरवीं सागरव्यूह रचिला ॥ यावरी धृष्टद्युम्नें रचिला ॥ श्रृंगाटकव्यूह ॥१२०॥

थोर धडधडाट जाहला ॥ वीरांसि आट भविन्नला ॥ भीमाभीष्मासीं मांडला ॥ थोर संग्राम ॥२१॥

भीमें भीष्माचा सारथी मारिला ॥ तेणें रथ सैराटला ॥ आणि सुनाभबंधु मारिला ॥ दुर्योधनाचा ॥२२॥

तंव आदित्यकेतु कुंडधर ॥ बव्हाशी आणि महोदर ॥ अपराजितादि राजपुत्र ॥ चालिले भीमावरी ॥२३॥

तेणें खवळला भीमसेन ॥ बाण सोडिता झाला दारुण ॥ सकळांचें केलें निर्दाळण ॥ क्षणामाजी ॥२४॥

ऐसें देखोनि दुर्योधन ॥ भीष्मापें जावोनि आपण ॥ ह्नणे तूं मध्यस्थ असोन ॥ उपेक्षितोसि आह्मांतें ॥२५॥

भीष्म ह्नणे गा परियेसीं ॥ हे पांडव अजित देवांसी ॥ सकळीं शिकविलें तुजसी ॥ कीं युद्ध त्यांसीं न करावे ॥२६॥

तें वचन त्वां नायकिलें ॥ आह्मांसि दुःख देशी बळें ॥ आतां युद्धचि करीं वहिलें ॥ सोडोनि जयाशा ॥२७॥

असो इकडे द्रोणादि समस्त ॥ उठले पांडवसेना विंधित ॥ तंव येक जाहला वृत्तांत ॥ तो ऐकें राया ॥२८॥

ऐरावतीनागाची कुमरी ॥ भर्तृहीन होती घरीं ॥ पार्थ गेला तिचे मंदिरीं ॥ ते बापें दीधली तयासी ॥२९॥

तियेचे पोटीं इरावत ॥ उपनला असे पार्थसुत ॥ तो पार्थाजवळी त्वरित ॥ आला होता पूर्वीच ॥१३०॥

तेणें कथिलें आदिअवसान ॥ नागलोकीं जन्मलों आपण ॥ मातेनें कथिलें मजलागून ॥ कीं पार्थ पिता तुझा ॥३१॥

ऐसें ह्नणोनि केलें नमन ॥ तेणें संतोषोनि अर्जुन ॥ ह्नणे आह्मां युद्धालागुन ॥ साह्य होई सुपुत्रा ॥३२॥

तो शब्द तेणें मानिला ॥ मग युद्धार्थ उठावला ॥ कौरवसैनिकां आकांत वर्तला ॥ झुंजतां त्याशीं ॥३३॥

तो थोर पराक्रमें झुंजला ॥ परि शेवटीं रणीं पडला ॥ तैं पांडवसैन्यासि वर्तला ॥ दुःखसमय ॥३४॥

पार्थ परम दुःखी जाहला ॥ प्राणसंकल्प तेणें केला ॥ मग संग्रामा प्रवर्तला ॥ कौरवांसीं ॥३५॥

ऐसें परस्परें झुंजले ॥ उरले ते श्रांत जाहले ॥ अस्त होतां निघोनि गेले ॥ आपुलाले मेळिकारी ॥३६॥

ऐसी आठविये दिवशीं ॥ आटणी जाहली उभयांसी ॥ तंव दुर्योधनें निशी ॥ काय केलें परियेसा ॥३७॥

शल्यद्रोणादि वीरांसि ॥ मंत्र करिता जाहला निशीं ॥ तंव कर्ण ह्नणे तयासी ॥ मी पांडवां जिंकीन ॥३८॥

राया उदयीक भीष्मासी ॥ जावोंनेदीं संग्रामासी ॥ तूं तरी कां पां करितोसी ॥ दुःख बंधूंचें ॥३९॥

ऐसा शब्द आयकिला ॥ मग भीष्माजवळी गेला ॥ तया तिरस्कार उपजविला ॥ छलकवाक्यें ॥१४०॥

यावरी भीष्म क्रोधें ह्नणे ॥ उदयीक मारीन पांडवांकारणें ॥ असो उषःकालीं गंगानंदनें ॥ रचिला महाव्यूह ॥४१॥

दोनी भार सन्नद्धले ॥ युद्धघनचक्र माजलें ॥ पांडवसैन्य संहारलें ॥ भीष्में असंख्यात ॥४२॥

देखोनि अभिमन्य उठावला ॥ कौरवसेने संहार केला ॥ तो कोल्हाळ आयकिला ॥ दुर्योधनें ॥४३॥

मग ह्नणे अलंबुषासी ॥ मारावें या अभिमन्यासी ॥ तूंचि कारण आहेसी ॥ जाई वेगवत्तर ॥४४॥

येरु आज्ञा घेवोनि उठिला ॥ महामारीं प्रवर्तला ॥ सैन्या संहारिता जाहला ॥ गजपद्मन्यायें ॥४५॥

ययाउपरी धृष्टद्युम्न ॥ द्रुपद कैकेय्य मिळोन ॥ शरजाळीं गंगानंदन ॥ आच्छादिला त्यांहीं ॥४६॥

कौरवसैन्य जिंकिलें ॥ पांडवीं वाद्यघोष केले ॥ तेणें दुःखें शरजाळ घातलें ॥ देवव्रतें देखा ॥४७॥

ऐसें देखोनि कृष्णनाथें ॥ स्वयें ह्नणितलें पार्थातें ॥ कीं तूं बोलिला होतासि बहुतें ॥ जिंकीन भीष्मा ह्नणवोनी ॥४८॥

आतां आकांत होतो सैन्यासी ॥ तरी कां गा उपेक्षा करिशी ॥ मारुनियां शत्रूसी ॥ धर्मा बैसवीं राज्यासनीं ॥४९॥

यावरी पार्थ उठावला ॥ परि भीष्म नावरे तयाला ॥ ह्नणोनि खालीं उतरला ॥ श्रीकृष्णनाथ ॥ ॥१५०॥

तंव पार्थ करी विनंती ॥ कीं शस्त्र न घ्यावें आपुले हातीं ॥ भंग होईल गा श्रीपती ॥ प्रतिज्ञेसी आपुले ॥५१॥

दुसरें म्यांचि मारावें सही ॥ प्रतिज्ञा वायां जाईल हेही ॥ ऐसें सांगोनि लवलाहीं ॥ कृष्णा रथीं बैसविलें ॥५२॥

मग प्रेरोनियां रथातें ॥ घोरयुद्ध केलें पार्थे ॥ तंव अस्ताचळा दिनकरातें ॥ जाहलें गमन ॥५३॥

दोनही भार मुरडले ॥ आपुलाले स्थानीं गेले ॥ ऐसें थोर युद्ध जाहलें ॥ नववे दिवशीं ॥५४॥

आतां दहाविये दिवशीं ॥ युद्धीं पतन होईल भीष्मासी ॥ तें आइकावें उल्हासीं ॥ ह्नणे मधुकरकवी ॥५५॥

इति श्री०॥ द०॥ नवमदिनयुद्धप्र०॥ सप्तमाध्यायीं क० १५६

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP