कथाकल्पतरू - स्तबक १० - अध्याय ५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

पूर्वील ऐकोनि कृष्णोक्त ॥ मग पार्थ विनंती करित ॥ कीं व्यासनारदादि असित ॥ तुज ह्नणताति ऐसें कीं ॥१॥

तूं ब्रह्म आदिदेव पुरुष ॥ अज अनादि अविनाश ॥ पवित्र परंधाम दिव्यप्रकाश ॥ शाश्वत विभू ॥२॥

आणि तूंही सांगत अससी ॥ हें मज येतसे प्रचीतीसी ॥ नेणती तुझिये व्यक्तीसी ॥ देवदानव ॥३॥

तरी त्वां स्वमुखें आपुलिया ॥ विभूति मज सांगाविया ॥ जे तिये वस्तूंच्या ठाई ध्यान करोनियां ॥ चित्त स्थैर्तत्व पाविजे ॥४॥

ऐसिया अर्जुनप्रश्नाउपरी ॥ बोलता जाहला श्रीहरी ॥ सकळक्षेत्रांमाझारी ॥ विभूति आपुल्या ॥५॥

भूतांमध्यें आदिमध्यअंत ॥ तो मीच जाण निभ्रांत ॥ सामवेद वेदांआंत ॥ इंद्र देवांमध्यें ॥६॥

इंद्रियांआंत मी मन ॥ भूतांमध्यें चेतन ॥ द्वादशआदित्यांत जाण ॥ सूर्यविष्णु मीची ॥७॥

अंशुमाळी रवितेजांत ॥ मरीचि वायुभेदीं सत्य ॥ आणि नक्षत्रगणाआंत ॥ चंद्रमा मीची ॥८॥

अष्टवसुवीं अंगार ॥ यक्षराक्षसांत कुबेर ॥ अक्षरांत एकाक्षर ॥ भृगु महर्षीमाजी ॥९॥

अकरारुद्रांत शंकरु ॥ तथा पर्वतांमाजी मेरु ॥ सरोवरांत सागरु ॥ गुरु पुरोहितांत ॥१०॥

सेनानायकांत कार्तिक ॥ यज्ञांत जपयज्ञ विशेष ॥ वृक्षांमाजी अश्वत्थ वृक्ष ॥ स्थावरांत हिमाचळ ॥११॥

नारद देवर्षिआंत ॥ गंधर्वामाजी चित्ररथ ॥ सिद्धांत कपिल अश्वाआंत ॥ उच्चैःश्रवा ॥१२॥

गजेंद्रांत ऐरावती ॥ मनुष्यांमाजी भूपेती ॥ वज्र आयुधांत निश्विती ॥ धेनूंमध्यें कामधेनु ॥१३॥

कंदर्पीत पुत्रोत्पादक ॥ सर्पीमध्यें वासुकी देख ॥ नागांमध्यें अनंतशेष ॥ जळचरांत वरुण ॥१४॥

पितरांमध्यें अर्यम ॥ नियमितांमाजी मी यम ॥ दैत्यांमाजी प्रल्हाद नाम ॥ नाशकांत काळ मी ॥१५॥

मृगेंद्र असें मृगाआंत ॥ पक्षियांमाजी विनतासुत ॥ वेगवंतांमध्यें मारुत ॥ राम क्षत्रियांमाजी ॥१६॥

मत्स्यांमध्यें मकर सत्य ॥ भागीरथी नदीआंत ॥ आदिमध्य आणि अंत ॥ सृष्टिसर्गा माजी ॥१७॥

अध्यात्मविद्या विद्यांमाझारी ॥ वाद प्रवादियांत अवधारीं ॥ अकार अक्षरांतरीं ॥ द्वंद्व समासांमाजी ॥ ॥१८॥

काळ असें अक्षयांत ॥ सर्वहरांमध्यें मृत्य ॥ आणि सर्वतोमुखाआंत ॥ ब्रह्मा जाण ॥१९॥

होणारिया पदार्थाचा ॥ प्रकटकर्ता मीच साचा ॥ स्त्रियांमाजी कीर्ति वाचा ॥ आणि लक्ष्मी ॥२०॥

स्मृति मेधा धृतिः क्षम ॥ सामाआंत बृहत्साम ॥ छंदांमाजी उत्तम ॥ गायत्रीछंद ॥२१॥

मार्गशीर्ष मासाआंत ॥ ऋतुमध्यें वसंत ॥ सत्ववतां मध्यें सत्व ॥ जय तो मी जाण ॥२२॥

तथा व्यवसायसत्व ॥ वृष्णीमध्यें वासुदेव ॥ पांडवांमध्यें सद्भाव ॥ धनंजय मी ॥२३॥

मुनींमध्यें व्यासऋषी ॥ कवींमध्यें शुक्र परियेसीं ॥ दमितेयांमाजी विशेषीं ॥ दंड तो मी ॥२४॥

जिंकित्यांमाजी नीति जाण ॥ गौप्यांमाजी मी मौन ॥ ज्ञानियांमध्यें ज्ञान ॥ बीज सर्वाभूतांचें ॥२५॥

उरलिया मध्यें समस्त ॥ मीचि श्रेष्ठ विभूतिमंत ॥ किंबहुना सर्वाआंत ॥ मीचि व्यापक ॥२६॥

मी माझेनि एके अंशें ॥ चराचर व्यापूनि असें ॥ हें विभूतिज्ञान विशेषें ॥ दशमाध्यायीं ॥२७॥

तंव अर्जुनें विनविलें ॥ कीं विभूतिअध्यात्म भलें ॥ तुजपासोनि आयकिलें ॥ जैसजैसें ॥२८॥

आणि तुझेनि एके अंशें ॥ हें सर्व व्यापिलें असे ॥ तरी तें पाहों इच्छीतसें ॥ साक्षात्कारीं डोळां ॥२९॥

यावरी ह्नणे हषीकेशी ॥ ययेडोळां देखों न शकसी ॥ ह्नणोनि घेई दिव्यनेत्रांसी ॥ मजपासोनी ॥३०॥

तंव अर्जुन आश्वर्यकारक ॥ पाहे रुद्रादित्य देव अनेक ॥ वसु अश्विनौदेव नागादिक ॥ त्रैलोक्यब्रह्मांड ॥३१॥

जें पूर्वी कोणीही ॥ कहीं देखिलेंचि नाहीं ॥ ह्नणे तें तूं समग्र पाहीं ॥ दिव्यचक्षूंनीं ॥ ॥३२॥

ऐसें दाखविलें देवें ॥ पार्था विश्वरुप आघवें ॥ अनेक नेत्रें मुखें अवयवें ॥ आभरणें अनेक ॥३३॥

अनेक आयुधें पाद कर ॥ ब्रह्मारुद्र ऋषीश्वर ॥ सिद्ध गंधर्व विद्याधर ॥ सर्वशरीरीं देखिले ॥३४॥

राहिले पृथ्वीआकाश व्यापुनी ॥ येणेंपरी विश्वरुप पाहोनी ॥ श्रीकृष्णासी हात जोडोनी ॥ अर्जुन स्तविता जाहला ॥३५॥

ह्नणे हें तुझें रुप अलोलिक ॥ ययामध्यें देवादिक ॥ धृतराष्ट्रपुत्रादि अनेक ॥ तुझे मुखीं प्रवेशताती ॥३६॥

तैसेचि सैन्यसपरिवार ॥ मुखीं प्रवेशती नृपवर ॥ कितीयेक होती चूर ॥ दाढांमाजी ॥३७॥

जैसे नद्यांचे ओघ अद्भुत ॥ समुद्रीं प्रवेशताती बहुत ॥ अथवा प्रदीप्त अग्निआंत ॥ पतंग पडती जेवीं ॥३८॥

कितीयेक तरी दांतीं ॥ लागोनियां राहिले असती ॥ हे देखोनि तुझी शक्ती ॥ त्रासलों मी ॥३९॥

मग पार्थ ह्नणे हो स्वामी ॥ कोण भगवंत असा तुह्मी ॥ तंव श्रीकृष्ण ह्नणे मी ॥ काळ सकळांचा ॥४०॥

हे सकळही राजे ॥ म्यांचि मारिले असती ओजे ॥ तुवां अर्जुना होइजे ॥ निमित्तमात्र ॥४१॥

युद्धीं मारीं कौरवांसी ॥ यशमात्राचा विभागी होसी ॥ द्रोणाभीष्मादिकां सकळांसी ॥ म्यां आधींच मारिले ॥४२॥

तुवां व्यथा न पावावी देहीं ॥ ऐसें विश्वरुप बोलिलें पाहीं ॥ मग नानास्तुति लाहीं ॥ स्तविलें पार्थे ॥४३॥

ह्नणे मागीलपुढील अपराध ॥ क्षमा करावे मज विविध ॥ नमस्कार स्तुति प्रसिद्ध ॥ करुनि प्रसन्न केला ॥४४॥

तैं विश्वरुप आच्छादोनी ॥ पूर्ववत जाहला चक्रपाणी ॥ पार्थाचें भय निवारोनी ॥ आश्वासिला देवें ॥४५॥

हे विश्वरुपस्थिती ॥ अर्जुना दावी श्रीपती ॥ तेचि धृतराष्ट्ररायाप्रती ॥ निरुपिली संजयें ॥४६॥

वैशंपायन ह्नणती भारता ॥ एकादशाध्याय अपूर्वता ॥ तें विश्वरुपदर्शन पार्था ॥ जाहलें सकळांदेखतां ॥४७॥

पार्थ ह्नणेजी श्रीकृष्णा ॥ हें तवरुप सर्वकारणा ॥ व्यक्तिमंत पूर्णघना ॥ चतुर्भुजात्मक ॥४८॥

ऐसियातें उपासिती ॥ एकतत्परता अव्यक्ती ॥ तयांमध्यें श्रेष्ठ भक्ती ॥ कवण सांग ॥४९॥

ऐसा प्रश्न ऐकोन ॥ बोलता जाहला भगवान ॥ निरुपीत निरुपण ॥ व्यक्ताव्यक्त ॥५०॥

ह्नणे बाह्यवृत्ती टाकोनी ॥ माझ्या ठायीं श्रद्धें करोनी ॥ साकार उपासिती मत्पर होउनी ॥ ते परमयोगी मद्भक्त ॥५१॥

दुसरें अक्षर अव्यक्त ॥ सर्वव्यापी रुप अचिंत्य ॥ सर्वावरी जें वर्तत ॥ अनिर्देश्य ॥५२॥

ऐसियातें ध्याती ध्यानीं ॥ सकळ इंद्रियें दमूनी ॥ चित्त एकाग्र करोनी ॥ निरंतर ॥५३॥

अर्जुना हे दोघे भक्त ॥ मजचि पावती निभ्रांत ॥ परि व्यक्तोपासनेहूनि अव्यक्त ॥ उपासना क्लेशाधिक ॥५४॥

जे कर्में करोनि समस्त ॥ माझ्याठायीं अर्पिती भक्त ॥ अंतरीं तत्पर बहुत ॥ मज विसरती ना ॥५५॥

तयाभक्तांसी आपण ॥ रक्षूं संसारसागरापासून ॥ हें वाक्य तूं सत्य जाण ॥ धनुर्धरा गा ॥५६॥

अतःपर पार्था तूंही ॥ ठेवीं मनबुद्धी माझ्याठायीं ॥ अभ्यास करीं सही ॥ शनैःशनैः ॥५७॥

कर्में आवश्यकें यथोक्त ॥ निष्कामत्वें करोनि चित्त ॥ वश करोनियां सत्य ॥ मन्निष्ठे लावावें ॥५८॥

प्राणिमात्रांचा द्वेष सांडोनी ॥ कृपा धरी अंतःकरणीं ॥ आणि प्राप्ताचा संतोष मानी ॥ यथाकाळीं ॥५९॥

दृढनिश्वयें माझ्याठायीं ॥ मनबुद्धीं अर्पी पाहीं ॥ पार्था तो मद्भक्त सही ॥ प्रियतर मज ॥६०॥

ज्याचियेपासोनि लोक ॥ उद्वेग न धरिती सकळिक ॥ तैसाचि स्वयें नकरी द्वेष ॥ लोकांचेनि उपद्रवें ॥६१॥

सकळपदार्थी निरपेक्ष ॥ पवित्र आळसरहित उदास ॥ बरवेपणें न मानी हर्ष ॥ वोखटेंनी दुःखीं नव्हे ॥६२॥

जया शत्रुमित्र समान ॥ तैसेचि मान अपमान ॥ पार्था तो भक्तराज जाण ॥ प्रिय मजलागीं ॥६३॥

ऐसा हा भक्तियोग पाहीं ॥ सांगीतला द्वादशाध्यायीं ॥ आतां ऐकावा पुढें सही ॥ क्षेत्रक्षेत्रज्ञविचार ॥६४॥

हें शरीर क्षेत्र जाण ॥ जीवात्मा क्षेत्रज्ञ प्रमाण ॥ मातेंही जाणीं कारण ॥ यथार्थभावें ॥६५॥

महाभूतें अहंकार ॥ बुद्धि अव्यक्त इंद्रियें परिकर ॥ पंचविषय तथा अपर ॥ द्वेषइच्छा ॥६६॥

सुखदुःख चेतना धैर्य ॥ एतद्रूप प्रकृतिकार्य ॥ सर्वरचना शरीरमय ॥ यांतें जाणे तो जाणता ॥६७॥

येथें अनासक्ती पाहीं ॥ तथा पुत्रगृहादिकांठायीं ॥ समचितत्व मद्विषयीं ॥ भजन अव्यभिचारें ॥६८॥

जे लौकिक व्यवहार ॥ तेथ करणें अनादर ॥ अध्यात्मज्ञान निष्ठापर ॥ हेंचि ज्ञान बोलिजे ॥६९॥

याहूनि विपरित तें अज्ञान ॥ ज्ञेय अनादि परब्रह्म जाण ॥ जें सदसद्विलक्षण ॥ स्वयंप्रकाश ॥७०॥

ज्ञान ज्ञेय क्षेत्र क्षेत्रज्ञ ॥ हें जाणे तोचि सज्ञान ॥ ईश्वरस्वरुप निर्वाण ॥ पावे पार्था ॥७१॥

हा क्षेत्रक्षेत्रज्ञविभाग ॥ अध्याय तेरावा प्रसंग ॥ पार्था उपदेशी श्रीरंग ॥ ऐकें भारता ॥७२॥

सत्व रज तम गुण तिन्ही ॥ प्रकट प्रकृतिपासोनी ॥ ज्ञानाप्ती सत्वगुणेंकरोनी ॥ विषयवासना रजोगुणें ॥७३॥

तमापासोनि अज्ञान ॥ तें क्रोधमूळचि जाण ॥ ऐसें हें परिज्ञान ॥ गुणत्रयांचें ॥७४॥

सात्विकांसी ऊर्ध्वगती ॥ राजसां मध्यमलोकप्राप्ती ॥ तामसांलागीं अधःस्थिती ॥ प्राप्त होय ॥७५॥

तरी ऐशिया तिहीं गुणातें ॥ जो अतीत होवोनि वर्ते ॥ तो निर्गुणस्वरुपीं निरुतें ॥ जाणावा तुवां ॥७६॥

तो जन्ममृत्युजरादिकीं ॥ मुक्त होवोनियां अशेषीं ॥ पावे मज आदिपुरुषीं ॥ अमृतत्त्वातें ॥७७॥

हा गुणत्रयविभाग पाहीं ॥ कथिला चौदाविये अध्यायीं ॥ आतां संसारवृक्ष आईकैं ॥ ह्नणे कृष्ण अर्जुना ॥७८॥

ऊर्ध्वमूळ अधःशाखा ॥ ऐसा अव्यय अश्वत्थ देखा ॥ छंदादिक पत्रें आइका ॥ तेचि वेद बोलिजती ॥७९॥

त्रिगुणडाहाळिया जाणणें ॥ विषय तरी पल्लव पानें ॥ ऐसा अश्वत्थ लक्षणें ॥ संसारकर्मानुरुप ॥ ॥८०॥

याचें स्वरुप ज्ञानियावांचोनी ॥ पार्था नकळे स्वल्पज्ञानीं ॥ आदिमध्यअंतीं जाणीं ॥ अव्यक्त प्रतिष्ठा याची ॥८१॥

तो हा अश्वत्थ सद्भावें ॥ ज्ञानवैराग्यखङ्गें छेदवे ॥ छेदिल्या संसार नाश पावे ॥ ज्ञानियाचा ॥८२॥

जेथें चंद्रसूर्य अग्नी ॥ प्रकाशक नव्हती कोणी ॥ ऐसें जें पद तें निर्वाणी ॥ पाविजे तेणें ॥८३॥

मान मोह गृह दारा प्रीती ॥ यांची त्यजोनियां संगती ॥ अध्यात्मीं तत्पर सुमती ॥ सुखदुःखीं समान ॥८४॥

कोणे पदार्थी अभिलाष नसे ॥ जेथोनियां सकळ भासे ॥ तें अच्युतपद विशेषें ॥ पाविजे तेणें ॥८५॥

या जीवलोकाचे ठायीं ॥ माझा अंश असे पाहीं ॥ तोचि प्राणोत्क्रमणसमयीं ॥ घेवोनि जातो जीवातें ॥८६॥

पांच ज्ञानेंद्रियें जाण ॥ आणिक सहावें मन ॥ प्रकृतिस्थां आकर्षोन ॥ जातो घेवोनि प्राणांतीं ॥८७॥

जेवीं पुष्पगंधा मारुत ॥ घेवोनियां असे जात ॥ तेवीं घेवोनियां जात ॥ अंश माझा ॥८८॥

आणि जंववरी असे देहीं ॥ तंववरी इंद्रियांच्या ठायीं ॥ वर्तूनि करीतसे पाहीं ॥ विषयभोग ॥८९॥

तो भोगोनि अभोक्ता होय ॥ ऐसें जाणती ज्ञानिये ॥ परि देखती अज्ञानिये ॥ भोगीं बद्ध ऐसा ॥९०॥

ऐसा ईश्वर मी सर्वगत ॥ देह देही मीचि सत्य ॥ अन्न असें पचवित ॥ जठराग्निरुपैं ॥९१॥

प्राणापानाचेनि योगें ॥ हें ज्ञानियें जाणावें वेगें ॥ ऐसें उपदेशिलें श्रीरंगें ॥ अर्जुनासी ॥९२॥

सर्वाच्या हदयीं असोन ॥ ज्ञान अज्ञान आणि स्मरण ॥ यद्विषयीं प्रवर्तक जाण ॥ मीचि पार्था ॥९३॥

वेदींही मीच प्रतिपाद्य ॥ मीचि सकळवेदार्थवेद्य ॥ वेदांतशास्त्र प्रबोध ॥ कर्ता वक्ता मीची ॥९४॥

पार्था इये सृष्टिमाझारी ॥ दोनी पुरुष अवधारीं ॥ क्षर कीं अक्षर सर्वत्रीं ॥ विस्तारले ॥९५॥

क्षर भूतरुप प्रपंच ॥ अक्षर कूटस्थ जीव साच ॥ ऐसा कार्यकारण निर्वच ॥ मजचि पासोनि ॥९६॥

पार्था या क्षराक्षराहूनी ॥ उत्तम पुरुष मीचि जाणीं ॥ वेदशास्त्रपुराणीं ॥ नांव पुरुषोत्तम ॥ ॥९७॥

जो ऐसिया पुरुषोत्तमातें ॥ जाणे ज्ञानपर सिद्धांतमतें ॥ तोचि उत्तमागतीतें ॥ पावता होय ॥९८॥

हा पुरुषोत्तम योग पाहीं ॥ कथिला पंचदशोध्यायीं ॥ आतां दैवासुरसंपत्तिविभागही ॥ सांगों तुज ॥९९॥

देव आणिक असुर ॥ दोनी सृष्टीमाजी साचार ॥ तरी हेचि सर्गस्थप्रकार ॥ बोलिजताती ॥१००॥

अभय सत्वशुद्ध ज्ञान ॥ योग दम दया दान ॥ अक्रोध शांति अपैशून्य ॥ अहिंसा कोमळ वाक्य ॥१॥

लज्जा अचंचलता स्थिती ॥ तेज क्षमा आणि धृती ॥ बाह्य शौच अद्रोह अंतीं ॥ नाहीं मान्यता ॥२॥

हे उत्तम दैवसंपत्तीं ॥ करी देवलोकादि प्राप्ती ॥ दैवसर्ग सृष्टी बोलती ॥ इयेतेंचि पैं ॥३॥

दंभ दर्प अभिमान ॥ क्रोध कठिनता अज्ञान ॥ पूर्वोक्त विपरीत लक्षण ॥ ते आसुरसंपत्ती ॥४॥

आसुरजन सर्वार्थी ॥ प्रवृत्ति निवृत्यादि नेणती ॥ चिंता आशा आलस्य बहुतीं ॥ शौचादि वर्जित ॥५॥

काम क्रोध आणि लोभ ॥ हीं नरकद्वारें स्वयंभ ॥ ह्नणोनि तिन्ही सगर्भ ॥ त्यजावीं पैं ॥६॥

यांचा त्याग कर्ता जाण ॥ दैवसंपत्तीनें संपन्न ॥ आणि नसंडी तो अज्ञान ॥ आसुर बोलिजे ॥७॥

या दैवासुरसंपत्तीं जाण ॥ ऊक्त षोडशाध्यायीं संपूर्ण ॥ त्यांचें संक्षेपें केलें ज्ञान ॥ कृष्णें पार्थासी ॥८॥

आता शरीरस्थ पुरुषासी ॥ सात्विकी राजसी तामसी ॥ अगा त्रिविध श्रद्धा ऐसी ॥ उपजे जाण ॥९॥

सात्विक भजती देवांतें ॥ राजस यक्षराक्षसांतें ॥ आणि प्रेतभूतगणांतें ॥ पूजिताती तामस ॥११०॥

आयुष्य सत्व बळ सार ॥ आरोग्यकारी अन्न पवित्र ॥ सुस्वादु चिक्कण स्थिर ॥ सुखप्रीतिदायक ॥११॥

कोमळदृष्टीं अपूर्व दिसती ॥ ते सात्विकआहारी बोलिजती ॥ कटु आंबट खारट खाती ॥ तीव्र निरस ॥१२॥

दुःखशोक करिती आमय ॥ ते आहार राजसांसि प्रिय ॥ शिळें कठिण दुर्गाधित होय ॥ उच्छिष्ठादि अन्न ॥१३॥

अर्जुना ऐसे आहार ॥ तामसांसी होती प्रियकर ॥ आतां कर्माचा प्रकार ॥ त्रिविध ऐकें ॥१४॥

यागादिक कर्मे करी ॥ परि फळेच्छा मनीं नधरी ॥ आवश्यकें ह्नणोनि आचरी ॥ तीं सात्विकें जाण ॥१५॥

फळइच्छानुसंधानें ॥ अथवा दंभें आचरणें ॥ पार्थ तीं कर्में जाणणें ॥ राजसाचीं ॥१६॥

विधिहीन अन्नदानरहित ॥ मंत्रदक्षिणेविण अपात्रदत्त ॥ अश्रद्धें कर्म करी तो सत्य ॥ तामसकर्ता ॥१७॥

देवब्राह्मणगुरुपूजन ॥ शौंच सर्वत्र सौजन्य ॥ ब्रह्मचर्य अहिंसा आचरण ॥ हें शारीरतप ॥१८॥

अनुद्वेग सत्य वचनें ॥ परहितकारी बोलणें ॥ वेदाध्ययन जाणणें ॥ हें वाचेचें तप ॥१९॥

मनाची असे प्रसन्नता ॥ जया मौन चित्तनियमता ॥ भावशुद्धी हें तत्वतां ॥ मानसतप ॥१२०॥

एवं काइक वाचिक मानसिक ॥ त्रिविधतपें हीं सात्विक ॥ आपुली प्रतिष्ठा सम्यक ॥ करावयासी ॥२१॥

मानद्रव्यप्राप्त्यर्थी ॥ ऐसीं तपें कर्मे करिती ॥ तियें राजसें बोलिजती ॥ सर्वत्र पैं ॥२२॥

वशीकरण उच्चाटण ॥ एतदर्थ जें आचरण ॥ तें तामस तप जाण ॥ परपीडनार्थी ॥२३॥

जयापासोनि उपकारनोहे ॥ ऐसें सत्पात्र जो पाहे ॥ मग तया दान देता होय ॥ पर्वकाळी ॥२४॥

तें सात्विक दान बोलिजे ॥ प्रत्युपकारबुद्धि धरिजे ॥ मग क्लेशें करुनि दीजे ॥ तें राजसदान ॥२५॥

अकाळीं अपात्रीं जाण ॥ धिक्कार करुनि जें दान ॥ दीजे तें होय प्रमाण ॥ तामस पैं ॥२६॥

महामंत्रें त्रिविध शब्द ॥ ब्रह्मप्रतिपादक प्रसिद्ध ॥ बोलिला तेणें यज्ञवेद ॥ विहिले पूर्वी ॥२७॥

ह्नणोनि महामंत्र उच्चारोनी ॥ यज्ञदानक्रिया करिती ज्ञानी ॥ तैसेंचि तत् यातें स्मरोनी ॥ करिती मोक्षकांक्षी ॥२८॥

सद्भावीं साधुभावीं जाण ॥ सत् शब्दें कर्मकरण ॥ अश्रद्धें होम तप दान ॥ तेथ असत् शब्द इहपर नाहीं ॥२९॥

ऐसा त्रिविधशब्दविभाग ॥ सप्तदशाध्यायीं योग ॥ पार्था निरुपी श्रीरंग ॥ परावाचा ॥१३०॥

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ॥ हे चारी वर्ण सारतर ॥ त्यांचीं कर्मे सविस्तर ॥ ऐकें पार्था ॥३१॥

शम दम तप सौजन्य ॥ क्षांती ज्ञान आणि विज्ञान ॥ आर्जवादिक हें जाण ॥ कर्म ब्राह्मणाचें ॥३२॥

शूरता तेज दक्षता क्षांती ॥ युद्धीं नपळणें ईश्वरभक्ती ॥ दान देणें यथाशक्ती ॥ हें क्षात्र कर्म ॥३३॥

कृषी वाणिज्य करणें ॥ हें वैश्यकर्म जाणणें ॥ आणि शूद्रें त्रिवर्णी भजणें ॥ सेवाकरोनी ॥३४॥

हीं आपुलालीं कर्मे ॥ सकळीं करावीं मनोधर्मे ॥ परि कामना त्यजावी नेमें ॥ फळइच्छेची ॥३५॥

ईश्वरभजन करावें ॥ स्वकर्म तया समर्पावें ॥ मग तो परमपद पावे ॥ भरंवसेनी ॥३६॥

श्रीकृष्ण ह्नणे गा पार्था ॥ हें गीतारहस्य मद्भक्ता ॥ पढवी पढे तो सर्वथा ॥ पावे मज ॥३७॥

नास्तिक निंदकां कुपात्रां ॥ न सांगावें हिंसकां अपवित्रां ॥ मद्भक्तां निरुपीं समग्रां ॥ गुप्त गुह्य ह्नणवोनी ॥३८॥

ऐकें धृतराष्ट्रा भूपती ॥ हा मोक्षयोग पार्थाप्रती ॥ निरुपिता जाहला श्रीपती ॥ अष्टादशाध्यायीं ॥३९॥

जिकडे कृष्णार्जुन असती ॥ तिकडे विजय लक्ष्मी नीती ॥ हें मज मानतसे चित्तीं ॥ निश्वयेंसीं ॥१४०॥

वैशंपायन ह्नणती भारता ॥ हा गीतार्थ विस्तारें सांगतां ॥ तेणें पसर होईल ग्रंथा ॥ मौन बोलतां ब्रह्मादिकां ॥४१॥

ऐसें गीतानिरुपण ॥ करावें दत्तचित्तें श्रवण ॥ तेणें भवतापनिवारण ॥ हें श्रीमुखवाक्य ॥४२॥

हा भीष्मपर्वीचा इतिहास ॥ पुढें कथान्वय उद्देश ॥ तो ऐकावा ज्ञानरस ॥ ह्नणे मधुकरकवी ॥४३॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ दशमस्तबक मनोहरु ॥ गीतोत्तरार्धकथनप्रकारु ॥ पंचमोध्यायीं कथियेला ॥१४४॥ ॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP