कथाकल्पतरू - स्तबक ७ - अध्याय १३

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मुनीसि ह्नणे जन्मेजयो ॥ प्रेंतें नेलीं तो कवण भावो ॥ आणि तारामतीसि अपावो ॥ जाहला कवणे परी ॥१॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ राया बरवा पुसिला प्रश्न ॥ कीं जेणें सुखिया होय मन ॥ श्रोतयांचें ॥२॥

असो मग विश्वामित्र ह्नणे ॥ रुदन कैसियासी करणें ॥ भाळीं लिहिलें जें नारायणें ॥ तें कवण टाळील ॥३॥

आतां चलावें माझिये घरा ॥ अस्तमान जाहला दिनकरा ॥ तंव ते तारामती सुंदरा ॥ देतसे उत्तर ॥४॥

जी सांडूनि जाणें प्राणेश्वरातें ॥ तोचि कुंभीपाक मातें ॥ मग जातां स्वर्गपंथें ॥ मुक्ती कैंची प्राप्त होय ॥५॥

येरु ह्नणे ऐक वार्ता ॥ ऋणाइता मुक्ती नाहीं सर्वथा ॥ तरी तुझिये प्राणनाथा ॥ मुक्ती कैंची ॥६॥

तुह्मां दोघांसि नाहीं गती स्वर्गपंथें जाऊं न देती ॥ तूं तयाची कुळवंती ॥ तरी मनें विचारीं पां ॥७॥

ब्राह्मणाचें राहिलें ऋण ॥ तें जेव्हां व्हाल उत्तीर्ण ॥ मग तुह्मां स्वर्गगमन ॥ होईल सहज ॥८॥

ऐसें ह्नणोनिया निघाला ॥ सवेंचि तो अदृश्य जाहला ॥ तंव अस्तमानासि पावला ॥ गभस्तिदेवो ॥९॥

मग विश्वामित्रें केली माव ॥ कैसी छळावयाची ठेव ॥ अदृश्य जालिया स्वयमेव ॥ व्याघ्र होवोनि पातला ॥१०॥

तंव ते तारामती सतिया ॥ प्रेतें धरोनि राहिली हदया ॥ ऐसी राखित असे राया ॥ वनामाजी ॥११॥

अवचित येवोनि तेणें व्याघ्रें ॥ प्रेतें धरोनि नेलीं घोरें ॥ परि तारामती दुःखसागरें ॥ राखिली साच ॥१२॥

ह्नणे जवळी नाहीं माता ॥ दूरी राहिला माझा पिता ॥ आतां कवणा बाहुं अनंता ॥ येकली मी ॥१३॥

निर्धनासी जोडलें धन ॥ तें सवेंचि जाय हरपोन ॥ मग ते तळमळोनियां प्राण ॥ सांडी जेवीं ॥१४॥

तैसी तारामती वेडावली ॥ जिव्हा दांतें रगडिली ॥ तंव तियें दृष्टी घातली ॥ पुढें सन्मुख ॥१५॥

जेवीं निर्धनासि धन जोडे ॥ त्याच्या मनीं आनंद वाढे ॥ कीं दुर्बळाचिये शेतीं पडे ॥ मेघवृष्टी ॥१६॥

तैसें पुढें जातजातां ॥ देखे पति आणि सुता ॥ मग लवलाहें धांवत धांवतां ॥ वोडगीतसें ॥१७॥

आटोपोनि तारामती ह्नणे काय दिसतसे मजकारणें ॥ भगवंता मी कांहीं नेणें ॥ देवराया ॥१८॥

जैसी वत्सासि मिळे धेनु ॥ कीं पृथ्वीवरी पडतां धनु ॥ तैसें उल्हासलें मनु ॥ तारामतीचें ॥१९॥

नातरी चातकियेचे उदरीं ॥ उदक न माय शिंपीभरी ॥ परि ते उल्हासे मनीं भारी ॥ गर्जतां घन ॥२०॥

तैसी ते पतिव्रता जातां ॥ उल्हासली पतिपुत्र देखतां ॥ मग करिती जाहली वार्ता ॥ पतिसमागमें ॥२१॥

विश्वामित्राचा देश सांडिला ॥ तंव आणिक मार्ग लागला ॥ उदकें तडाग असे भरला ॥ देखती येक ॥२२॥

तेथें येक भयानक नगर ॥ देखती वोस भयंकर ॥ राजमंदिरें धवलार ॥ उपरमाडिया ॥२३॥

मदलसा आणि मोहटिय ॥ चित्रें बहु शोभलीं तयां ॥ परि कळस तुटोनियां ॥ पडिले असती ॥२४॥

वृश्विक आणि नागकुळ ॥ जीवजंतु सरड वेताळ ॥ पाळोपाळीं डुंडुळ ॥ वसती तेथें ॥२५॥

आतां असो हा विस्तारु ॥ पुरें कथणें कल्पतरु ॥ तंव अस्तमानीं दिनकरु ॥ पावला तेथें ॥२६॥

मग तया वोसनगरीं ॥ तिघें राहिलीं येके मंदिरीं ॥ रात्री प्रवर्तली अंधारी ॥ भयानक थोर ॥२७॥

निशांती उगवला दिनकर ॥ मार्गस्थ जाहला हरिश्चंद्र ॥ कडिये घेतलें लेंकुर ॥ तये वेळीं ॥२८॥

ऐसा बहुत मार्ग क्रमिला ॥ तंव महादेवाचा प्रासाद देखिला ॥ कळस अति रम्य उभविला ॥ गगनचुंबित ॥२९॥

आम्रबिल्वादि तरु विशाळ ॥ मध्यभागीं शोभे देउळ ॥ प्रभा देखती अतिनिर्मळ ॥ देवालयाची ॥३०॥

ठाईठायीं हरिकीर्तनें ॥ ऐकती भारतादि पुराणें ॥ संस्कृतभोषें बोलती वचनें ॥ श्रीभागवतींचीं ॥३१॥

तो अनुपम्य त्रिवेणीसंगम ॥ स्त्रानें करोनि करिती धर्म ॥ यात्राजनांचा हारपे श्रम ॥ अनंतजन्मींचा ॥३२॥

आतां असो तये विश्वेश्वरीं ॥ हरिश्वंद्र मानसपूजा करो ॥ सर्वे तारामती असे सुंदरी ॥ पुत्रासहित ॥३३॥

देखिला भवानीशंकर ॥ दंडपाणी विश्वेश्वर ॥ वृषभध्वजा जयजयकार ॥ केला तेथें ॥३४॥

आचमन केलें भीतरीं ॥ कोटितीर्थ असे बाहेरी ॥ महाद्वारीं शिवाचा भांडारी ॥ कुबेर असे ॥३५॥

तैं पूजा करोनि विश्वनाथा ॥ राजा बाहेर आला त्वरिता ॥ सर्वे तारामती पतिव्रता ॥ आणि रोहिदास ॥३६॥

दुर्जे देवालय देखिलें ॥ त्या बिंदुमाधवा नमस्कारिलें ॥ अंतर शीतळ असे जाहलें ॥ हरिश्चंद्राचें ॥३७॥

सव्य घालूनि आपणा ॥ करिता जाहला प्रदक्षिणा ॥ तंव विश्वामित्र जाणा ॥ पावल तेथें ॥३८॥

हरिश्वंद्र ह्नणे तारामतीप्रती ॥ येथें अनंतव्रत जे करिती ॥ ते मुक्तिपदातें पावती ॥ होवोनि अढळ ॥३९॥

परि लाधे केवीं दैवहता आपणा ॥ पूर्वी लाधलें कौंडिण्य ब्राह्मणा ॥ तें केविं लाधे आणिका जना ॥ भाग्यविणा ॥४०॥

ऐसें ह्नणत विश्वेश्वरातें ॥ प्रदक्षिणा करीत होते ॥ तंव विश्वामित्र उभा तेथें ॥ भेटला तयां ॥४१॥

विश्वामित्रें पूर्वरुपा ॥ धरिलें रायासमीपा ॥ ह्नणे भाष आपुली सांभाळीं पां ॥ दक्षिणा दे माझी ॥४२॥

तूं अमरावतीचें अढळपद ॥ घेऊं पाहसी भाग्यमंद ॥ कां करितोसि गर्वमद ॥ न करितां ऋणशुद्धी ॥४३॥

जरी त्रिवेणीचे स्त्रानें ॥ पावन जाहलां तिघेंजणे ॥ तरी माझे दक्षिणेचे ऋणें ॥ नाडलीं जाल ॥४४॥

माझी दक्षिणा राखिसी ॥ आणि विष्णुपद इच्छिसी ॥ तरी तें तूं कैंसें पावसी ॥ मनीं विचारी पां ॥४५॥

राजा आणिक ब्राह्मण ॥ यांचें न फेडितां द्रव्यऋण ॥ जरी देहांतूनि जाती प्राण ॥ तरी जन्मांतरीं श्वान होय ॥४६॥

विप्रें तीनवेळ मागावें ॥ दक्षिणेसि यजमानें द्यावें ॥ तयासि सावधान करावें ॥ मागतियानें ॥४७॥

विप्राचें ऋण न फेडितां ॥ मृत्यु पावे जरी मागुता ॥ तरी तो सूकरयोनी भोगिता ॥ होय जन्मवरी ॥४८॥

इतुकेन मी मागत असतां ॥ तूं न देशी गा नरनाथा ॥ तरी वचनीं असत्यता ॥ आली तुज ॥४९॥

आतां आह्मां काय काज ॥ हें वर्म सांगितलें तुज ॥ हा व्यवहारधर्म गुज ॥ कथिला असे ॥५०॥

मर्यादेचा शेवट जाहला ॥ ह्नणोनि व्यवहार सांगितला ॥ सूर्य अस्तमानासी चालिला ॥ मग त्वां भाष उल्लंधिली ॥५१॥

तंव हरिश्वंद्र राव ह्नणे ॥ स्वामी मर्यादा किंचित् देणें ॥ तुह्मी हित मजकारणें ॥ कथियेलें जी ॥५२॥

तंव ह्नणे तारामती ॥ आतां मर्यादा असे लोटती ॥ मग नचले प्रयत्नस्थिती ॥ दक्षिणेची ॥५३॥

असो रायाचे करीं होती मुद्रिका ॥ ते दीधली शेतिया येका ॥ तयेचें तृण घेतलें देखा ॥ शेतीचें विकत ॥५४॥

मग तो हरिश्वंद्र चक्रवतीं ॥ मस्तकीं तृण धरी आपुले हातीं ॥ तृणसुया रुपोनियां हातीं ॥ वाहावे रक्त ॥५५॥

यापरी ते तृणाची मोळी ॥ बांधोनि निघाला तये वेळीं ॥ उचलोनि घेतली शिरकमळीं ॥ आला नगरचोहटां ॥५६॥

तंव ह्नणे तारामती ॥ आह्मी असतां हे न कीजे स्थिती ॥ आमुचा वेंच करा भूपती ॥ आपुले हातें ॥५७॥

रावो ह्नणे मी आपुले हातें ॥ सुगुणें कैसें विकूं तूर्ते ॥ तंव विश्वामित्र ऐकोनि तें ॥ बोलिला काय ॥५८॥

ह्नणे स्त्री पाहिजे तुजपाशीं ॥ आणि पुत्राचा लोभ धरिशी ॥ तरी कोठोनि द्रव्य देशी ॥ हें सांग मज ॥५९॥

तंव तारामती ह्नणे राजेश्वरा ॥ भाषीं राखणें ऋषीश्वरा ॥ माझा वेंचु कीजे नगरा ॥ रोहिदासासमवेत ॥६०॥

मग तिघांसि निघणें जाहलें ॥ नगरामाजी गमन केलें ॥ रायें विकत घ्या जी ह्नाणितलें ॥ स्त्रीपुत्रांसी ॥६१॥

चोहटे चोहटां फिरती ॥ कोणी प्रतिग्रह न करिती ॥ ह्नणोनियां गेला भूपती ॥ गणिकेंवाडा ॥६२॥

ऐसी तिघें पातलीं तेथें ॥ तंव पंचजनें आली धावतें ॥ संभ्रमें पुसती येरयेरांतें ॥ की विकितो कवण ॥६३॥

ऐकोनि घ्या ह्नणे हरिश्वंद्र ॥ मी विकितो स्त्री आणि पुत्र ॥ परि देखती आणि पवित्र ॥ ह्नणोनि जन शंकले ॥६४॥

तेथें विश्वामित्र येवोनि ह्नणे ॥ इचेनि तुके द्यावें सोनें ॥ तंव गणिका येक मार्गे तेणें ॥ जात होती ॥६५॥

सुखासनाचिया हारी ॥ पालवछत्रें धरिलीं वरी ॥ सुवर्णासहित - भीतरी ॥ बैसलीसे ॥६६॥

नानाअलंकारांचे सागर ॥ कीं मुक्ताफळांचे डोंगर ॥ गणिका बोलती उत्तर ॥ तारामतीतें देखोनि ॥६७॥

कीं ऐसी हे हरुषलावण्य ॥ जरी आह्मां जोडेल रत्न ॥ तरी धन्य आमुचें जीवन ॥ हिचेनि प्रसादें ॥६८॥

हिचिये येवढी करुं राशी ॥ सुवर्णाची परियेसीं ॥ जरी हे लाधेल आह्मांसी ॥ तरी थोरभाग्य ॥६९॥

तरी आतां न कळतां कोणा ॥ आपणचि घ्यावी हे अंगेना ॥ नाहीं तरी हे लावण्यसुगुणा ॥ नेतील कोणी ॥७०॥

हिचें औटभार देवोनि सोनें ॥ कुंटिणी ह्नणती आह्मासि घेणें ॥ तारामतीसि ह्नणती बैसणें ॥ माये सुखासनीं ॥७१॥

लोढें गादिया तिवासी ॥ अगे सुकुमारी परियेसीं ॥ नवरत्नाचिया मंचकाशीं ॥ करीं शयन ॥७२॥

आणिक ह्नणती कुंटिणी ॥ कीं तुज गायनीं आणि नाचणीं ॥ श्रृंगारें गुंफावया वेणी ॥ दासी आह्मी तुझ्या गे ॥७३॥

आतां वोखटें जीवीं त्यागिसी ॥ नित्य मिष्टान्नें तूं जेविसी ॥ आणि अखंड विडिया खासी ॥ परिमळयुक्त ॥७४॥

तूं गोसावीण आह्मी दासी ॥ तूं आह्मांतें पोशिसी ॥ आतां सर्वसंतोष मानसीं ॥ भोगिसी तूं ॥७५॥

तंव येरीसि आला कळवळा ॥ पाहे रायाच्या मुखकमळा ॥ ह्नणे यांचें सुवर्ण नृपाळा ॥ घेणें आपणा अनुचित ॥७६॥

ऐसी येवोनि काकुळती ॥ बोले विश्वामित्रापती ॥ चरणीं लागोनि ह्नणे पुढती ॥ कीं कुंटिणीसी विकूं नका ॥७७॥

मी तुह्मांसि आलें शरण ॥ रक्षा पतिव्रतेचें लक्षण ॥ विकाल तरी होईल न्यून ॥ तुह्मांलागीं ॥७८॥

तंव काळकौशिक नामें करुन ॥ तेथें आला येक ब्राह्मण ॥ तो ह्नणे मी देतों सुवर्ण ॥ या बाईचें ॥७९॥

क्रोधें विश्वामित्र ह्नणे ॥ तयातें कासया पुसणें ॥ आह्मीच तारामतीसि विकणें ॥ कार्यालागीं ॥८०॥

या रोहिदास नामें पोरा ॥ आणि तारामती हरिश्वंद्रा ॥ ऐसिया तिघांचा विकरा ॥ मांडिला असे मी स्वयें ॥८१॥

तुह्मी द्रव्याची राशि कीजे ॥ आणिक बोलणें नाहीं दुजें ॥ घेणें असे किंवा सहजें ॥ चोजवूं आलां ॥८२॥

यानंतरें त्या ब्राह्मणें ॥ दीधलें येकभार सोनें ॥ मग करीं धरोनियां तेणें ॥ चालविलें तारामतीसी ॥८३॥

तंव हाहाःकार जाहला तेथें ॥ शिविया देती विश्वामित्रातें ॥ येक निंदिती रायातें ॥ अपराधी ह्नणवोनी ॥८४॥

ह्नणती स्त्री विकोनियां पाहीं ॥ कोणी दान दीधलें नाहीं ॥ याचें सत्व ह्नणावें काई ॥ लोकांमध्ये ॥८५॥

स्त्री बाळकासि विकणें ॥ आणि ब्राह्मणा दान देणें ॥ तरी जळोजळो गा जिणें ॥ या पुरुषाचें ॥८६॥

ऐसे सकळ लोक निंदिती ॥ राया आली मूर्छना आकांतीं ॥ काळकौशिक ह्नणे वो तारामती ॥ आश्रमा चालें आमुच्या ॥८७॥

तारामती ह्नणे हो स्वामी ॥ मज ठेवाल कवणे कामीं ॥ येरु ह्नणे स्वयंपाकधार्मी ॥ ऋषिभोजनासी ॥८८॥

तारामती ह्नणे तथास्तु ॥ माझेनि हातें ऋषि तृप्तु ॥ काहीं पुण्याचा होता तंतु ॥ ह्नणोनि हा लाभ ॥८९॥

ऐसें ह्नणोनि तारामती ॥ निघाली त्याचिये गृहाप्रती ॥ परि मार्गे जाहली पाहती ॥ पुत्राची वांस ॥९०॥

तंव तो रोहिदास ह्नणे ॥ ताता मज मातेसि भेटी करणे ॥ ऐसें ह्नणोनि निघालें तान्हें ॥ भेटावयासी ॥९१॥

ह्नणे आई मुरडें मागुती ॥ मज सांडूनि जासी केउती ॥ ऐसें ऐकतां तारामतीप्रती ॥ नावरे पान्हा ॥९२॥

असो पान्हा घेतला बाळकें ॥ तंव चाल ह्नाणितलें कौशिकें ॥ उशीर लागतां आला तवकें ॥ विश्वामित्र तये ठायीं ॥९३॥

तो बाळकातें आंसुडित ॥ तंव तो पडिला मूर्छागत ॥ मग तारामती असे ह्नणत ॥ कीं धीर धरा जी स्वामिया ॥९४॥

अहो अगा जी काळकौशिका ॥ विकत घ्यावें या बाळका ॥ तरी पुण्याच्या अमोलिका ॥ होतील राशी ॥९५॥

मग विश्वामित्रासि विप्र ह्नणे ॥ याचें काय जी मोल घेणें ॥ येरु ह्नणे अर्धभार सोनें ॥ द्यावें द्विजा ॥९६॥

भारता मग त्या ब्राह्मणें ॥ सोनें देवोनि घेतलें तान्हें ॥ तंव राजा कंठ दाटूनि ह्नणे ॥ ऐसें काय जी सदाशिवा ॥९७॥

देवा स्त्रीपुत्रां वेगळा ॥ मज केला जी गोपाळा ॥ प्रभो याची करुणा सकळां ॥ झळबतसे ॥९८॥

ऐसें ह्नणे हरिश्वंद्र ॥ कीं मी विकिलें आपुलें लेंकुर ॥ तंव आला दुःखोन्द्रार ॥ तारामतीसी ॥९९॥

ह्नणे आतां जाणें न चुके ॥ काय कार्य येणें शोकें ॥ विघडली तुमचीं स्त्रीबाळकें ॥ हरिश्वंद्रराया ॥१००॥

पितयासि रोहिदास ह्नणे ॥ जळो जळो हें माझें जिणें ॥ तुमची सेवा मजकारणें ॥ घडली नाहीं ॥१॥

मी जाहलों भूमिभारु ॥ मातृकुक्षीं जन्मलों पाथच ॥ सागरीं बुडालें भाग्यतारुं ॥ साह्यकारिया विण ॥२॥

तंव हरिश्वंद्र राव ह्नणे ॥ बारे विप्राची सेवा करणें ॥ या कौशिकाचें त्वां बोलणें ॥ मानावें पितयासमान ॥३॥

बरवें आचरण आचरिजे ॥ पूर्वजांचें नांव राखिजे ॥ ऐसी कीर्ती करोनि मरिजे ॥ तरीच धन्य ॥४॥

ऐसें वदलिय नंतरीं ॥ गेलीं कौशिका बरोबरी ॥ आज्ञा प्रमाण त्याचिये घरीं ॥ नांदती पुत्रमाता ॥५॥

मग विश्वामित्र रायासि रावो ॥ आले डोंबाचा जेथ ठावो ॥ कुबेरासम संपत्तिन्याहो ॥ असे तयाचा ॥६॥

विश्वामित्र रायासि ह्नणे ॥ त्वां पुसावें डोंबाकारणें ॥ कीं मज विकत घ्या देवोनि सोनें ॥ या ब्राह्मणाचें ॥७॥

ऐसी त्या अनामिकाचे श्रवणीं ॥ राया संचरली ऋषिवाणी ॥ तंव तो आल धांवोनि चरणीं ॥ तयांसमीप ॥८॥

मग हरिश्चंद्र तयासि ह्नणे ॥ मी या विप्राचें असें देणें ॥ तरी तुह्मी देवोनि दोनभार सोनें ॥ विकत घ्यावें मजलागीं ॥९॥

डोंब ह्नणे जी अहो स्वामी ॥ अपवित्र कुळीचे डोंब आह्मी ॥ भले पवित्र असोनि तुह्मी ॥ ऐसें कां जी बोलतां ॥११०॥

राव ह्नणे जी कृपा करणें ॥ मज औटभारापासोनि सोडविणें ॥ मज निर्मळ अंतःकरणें ॥ विकत घ्या जी ॥११॥

आह्मी तुमची सेवा करणें ॥ आह्मासि आपण कोरान्न देणें ॥ आतां सुवर्ण देवोनि करणें ॥ ऋणमुक्त मज ॥१२॥

असो द्रव्य घेवोनि विकिलें आपणा ॥ मग डोबें गृहासि आणिलें जाणा ॥ त्या दुर्गेधिके कुत्सित स्थाना ॥ अंगिकारिलें दृढमनें ॥१३॥

दिवसा आणोनियां पाणी ॥ भरावें नित्य लागे रांझणी ॥ तंव विश्वामित्रें काय करणी ॥ केली तेथें ॥१४॥

दर्दुररुप धरोनि जाणा ॥ तळीं पाडिलें छिद्र रांझणा ॥ भागला अयोध्येचा राणा ॥ परि तो न भरेची ॥१५॥

डोंबीण ह्नणे रे चांडाळा ॥ कैसा आलासि माझिया कपाळा ॥ पाणी पुरतें नाहीं चुळा ॥ रांजण तुवां फोडिला ॥१६॥

ह्नणे यासी न भरवे पाणी तरी राखणा ठेवूं स्मशानीं ॥ येणें कर घ्यावा नित्यानीं ॥ प्रेतभूमीचा ॥१७॥

नगरलोक प्रेतें जाळिती ॥ ते स्मशानीं कर देती ॥ ह्नणोनि हरिश्वंद्रासि ठेविती ॥ रक्षणार्थं तेथें ॥१८॥

आतां इकडे तारामती ॥ तिचिये सर्वे पुत्रसंपत्ती ॥ ह्नणोनि छल विचारी चित्तीं ॥ विश्वामित्र ॥१९॥

ते सुखवे सती पुत्रासवें ॥ नित्य पाक करी भावें ॥ समस्त ऋषी जेवोनि स्वभावें ॥ होती तृप्त ॥१२०॥

तंव विश्वामित्रें केली करणी ॥ ऋषिभोजनसमय धरुनी ॥ सर्प जाहला तेचि क्षणीं ॥ देवालयामाजी ॥२१॥

ऋषीनें समिधा आणावयातें ॥ धाडिले होतें रोहिदासातें ॥ देउळामध्ये जातां तयातें ॥ झोंबिन्नला महासर्प ॥२२॥

ऋषिपुत्र होते सांगातें ॥ ते आले वार्ता सांगावयातें ॥ तारामती होती जेथें ॥ तंव तयेसी सांगती ॥२३॥

ऐसिये समयीं ऋषिपंक्तीं ॥ वाढीत होती तारामती ॥ तंव ब्रह्मवृंदें तये सांगती ॥ पुत्राचें वर्तमान ॥२४॥

तंव ते ह्नणे उगेचि असा ॥ ब्राह्मण जेवितां होतील निराशा ॥ भलतैसें होवो रोहिदासा ॥ जंव हे जेविती तों ॥२५॥

मग भोजनें जाहलिया ॥ पुत्रांचे प्रेत आणिती राया ॥ त्यासी सन्दती द्यावया ॥ नेती स्मशानीं ॥२६॥

स्मशानींचा विधि जाहला ॥ मग अग्नी प्रज्वळिला ॥ तंव रावो विझविता जाहला ॥ प्रेत टाकोनि भूमीसी ॥२७॥

ह्नणे आधीं कर देणें ॥ मग याचें दहन करणें ॥ तंव कर म्यां कोठोनि देणें ॥ ऐसें ह्नणे तारामती ॥२८॥

पहा हो कर्मगती कैसी ॥ रावो नोळखी स्त्रीपुत्रासी ॥ आतां काय सांगों देवासी ॥ ह्नणोनि प्रेतासी कवळिलें ॥२९॥

ऐसी तारामती दुश्वित्त ॥ धरुनियां राहिली प्रेत ॥ तंव विश्वामित्र येवोनि तेथ ॥ काय करिता जाहला ॥१३०॥

दिवस गेला अस्तमानीं ॥ ते राहिली प्रेता धरुनी ॥ घोर प्रवर्तली यामिनी ॥ निशीभर ॥३१॥

नानापरी दुःखें रुदन ॥ करितां तारामती आपण ॥ तंव दुःखनिद्रेनें नयन ॥ झांकोळले तियेचे ॥३२॥

विश्वामित्रें माव केली तेथें ॥ काढोनियां प्रेताचीं आतें ॥ ती कंठीचें मुखी मांस खाते ॥ ऐतें विपरीत दाविलें ॥३३॥

आतां इकडे राजमंदिरीं ॥ राणी ह्नणे बाळ नेलें चोरीं ॥ मग शुद्धी कराया चौफेरीं ॥ राजदूत चालिले ॥३४॥

तंव सांगती नगरजन ॥ पैल येकी खातसे पुत्ररत्न ॥ कंठीं बैसोनि अशुद्धपान ॥ करीतसे चांडाळी ॥३५॥

ऐसी सकळ गाव देखती ॥ लोक कौतुक पाहती ॥ ह्नणती हे लांव निश्विती ॥ बाळें खाय नित्यानी ॥३६॥

कौशिकें हे घेतली होती ॥ आली रायाच्या बाळाभोंवती ॥ तंव येवोनि तेथें भूपती ॥ ह्नणे धरा इयेतें ॥३७॥

नगरजन सर्व देखती ॥ अपराधी हे खरी ह्नणती ॥ तरी चालवा सुळाप्रती ॥ दंडावया इयेतें ॥३८॥

इतुक्यांत सती जागृत जाहली ॥ पाहे तंव माव ऐसी देखिली ॥ कीं सुळाजवळी असे नेली ॥ आपणा लागीं राजदूतीं ॥३९॥

तंव ते सती पतिव्रता ॥ हरिश्चंद्ररायाची कांता ॥ सुळापाशीं दूतीं आणितां ॥ नारदमुनी पातले ॥१४०॥

गेला विष्णुलोका धांवता ॥ ह्नणे पाव गा श्रीअनंता ॥ पुरल मृत्युलोकासि आतां ॥ भक्ताचा अंत ॥४१॥

अगा भगवंता हषीकेशी ॥ भक्त बुडला सूर्यवंशीं ॥ कां वा तयासी न पावसी ॥ निर्वाणप्रसंगीं ॥४२॥

तुजकारणें भक्त घ्याती ॥ ते मोक्षपदातें पावती ॥ तरी हरिश्वंद्राकारणें चित्तीं ॥ कां कोप धरियेला ॥४३॥

गजबजोनि उठिला मुरारी ॥ ब्रह्मयासहित त्रिपुरारी ॥ तिघे आले तेथें झडकरी ॥ काशिभुवना ॥४४॥

तीनी विमानें प्राप्त जाहलीं ॥ तीं काशीजनीं देखिलीं ॥ जे जगत्रयाची माउली ॥ ते आली भेटों हरिश्वंद्रा ॥४५॥

असो प्रत्यक्ष पावला हरी ॥ आतां विश्वामित्र काय करी ॥ तंव देवें देखिली असे दूरी ॥ तारामती ते ॥४६॥

सती सुळापाशीं उभी ॥ तंव पातले पद्मनाभी ॥ मग उचलोनि उभाउभी ॥ घातली विमानीं ॥४७॥

जे तरी भ्यासुर प्रेतदशा ॥ आली होती रोहिदासा ॥ त्यासी ह्नणे हषीकेशा ॥ होई वत्सा सावधान ॥४८॥

देवें अमृतदृष्टीं पाहिलें ॥ रोहिदासा सावध केलें ॥ मग तयासी बैसविलें ॥ विमानामाजी ॥४९॥

सकळही विमानें निघालीं ॥ राया हरिश्वंद्राजवळी आलीं ॥ तंव तयानें मूर्ती देखिली ॥ देव चक्रपाणीची ॥१५०॥

चतुर्भुज गदापाणिपद्म ॥ वैजयंती मेघश्याम ॥ ऐसा परब्रह्म पुरुषोत्तम ॥ देखिला डोळां ॥५१॥

राव ह्नणे जयजय मुरारी ॥ कष्टलेति देवा भारी ॥ तंव नाभी ह्नणोनियां श्रीहरी ॥ विमानीं बैसविता जाहला ॥५२॥

जयजयकार प्रवर्तला ॥ हरिश्वंद्र देवातें भेटला ॥ देवो विष्णुलोका निघाला ॥ तये वेळीं ॥५३॥

वाराणसीचे सकल जन ॥ पाहात ठेले विमान ॥ ह्नणती दीधलें यालागुन ॥ देवें पद उत्तम ॥५४॥

इंद्रचंद्रादि दिव्य स्थानें ॥ सकळ नमिती जयाकारणें ॥ ह्नणोनि तें मुक्तिपद देणें ॥ घडलें तिघांसी ॥५५॥

आतां असो हा विस्तार ॥ मुक्ति पावला हरिश्वंद्र ॥ पुढें प्रश्न पावला थोर ॥ ह्नणोनि आवरिलें कथेतें ॥५६॥

या कल्पतरुची कथा ॥ प्रीति पावो श्रीअनंता ॥ श्रीभागवतींचिया अर्था ॥ असे साक्ष ॥५७॥

आतां असो हे ग्रंथकथा ॥ संस्कृताची टीका प्राकृता ॥ ते पुढें ऐकें गा भारता ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥५८॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ सप्तमस्तबक मनोहरु ॥ हरिश्वंद्रआख्यानप्रकारु ॥ त्रयोदशाऽध्यायीं कथियेला ॥१५९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP