कथाकल्पतरू - स्तबक ७ - अध्याय १०

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

मुनीसि ह्मणे राव भारत ॥ तुमचे संगतीनें मी कृतार्थ ॥ लाधलों चारी पुरूषार्थ ॥ कथाश्रवणें ॥१॥

तरी मागें जे ध्रूवकथा राहिली ॥ ते पाहिजे कथन केली ॥ कैसी मातेनें मुक्ती दीधली ॥ माउशीयें ॥२॥

कैसा गेला तप करूं ॥ पांचा वरुषांचें लेंकरूं ॥ काय जाहला पुढारू ॥ तो सांगिजे मुने ॥३॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ राया तूं सोमवंशीं धन्य ॥ तरी पूर्वीं उत्तानचरण ॥ ब्रह्मयापासाव ॥४॥

सुरूचि आणि सुनीती ॥ उत्तानचरणाचिया युवती ॥ तयांचे लावण्यगुण वनिता निश्वितीं ॥ विस्तारेल ग्रंथ ॥५॥

बृहस्पती नाम नगरी ॥ तेथें उत्तानपाद राज्य करी ॥ तंव प्रसवली सुंदरीं ॥ येक पुत्र ॥६॥

तो सुनीतीचा जाणिजे धुरु ॥ जो निर्धाराचा आगरु ॥ कीं भक्तिनिष्ठेचा डोंगरू ॥ वैराग्यशीळ ॥७॥

पांचा वरुषांचा जाहला ॥ ध्रुव पितयाचे अंकीं बैसला ॥ तंव माउशियें ढकलिला ॥ मत्सरभावें ॥८॥

ऐसा अपमान पावतां कोपें ॥ जननीसि पुसिलें अनुतापें ॥ कीं हें विश्र्व उपजलें जेणें दीपें ॥ तो सांग माते कवण ॥९॥

जो निजजनांचा अधिष्ठा ॥ ज्ञान अज्ञानां उपविष्टा ॥ ज्याचिये मायेची चेष्टा ॥ चराचर हें ॥१०॥

पृथ्वी आणि आपतेज ॥ आकाश वायु विराज ॥ कल्पना असे जयाचें बीज ॥ तो कवण माते ॥११॥

माता ह्मणे वेद पुराणें पढती ॥ त्रैलोक्य ब्रह्मादि जया नेणती ॥ तो तुज आरुष बाळमतीं ॥ नेणवे बाळा ॥१२॥

जयाचे नाभीं ब्रह्मा जन्मला ॥ तो पारातें नाहीं पावला ॥ तयाची खूण तूं तान्हुला ॥ जाणसी केवीं ॥१३॥

तंव ह्मणे बाळ आपण ॥ मज अंगीं असो धाकुटेपण ॥ परि आपुला वेंचीन प्राण ॥ देवे न भेटतां ॥१४॥

जैसे मदलसेचे सुत ॥ वैराग्यें पावले सिद्धार्थ ॥ ते मी ऐकिलीसे मात ॥ साधुमुखें जननीये ॥१५॥

मग ह्मणे सुनीती जननी ॥ मदलसें उपदेशिलीं तानीं ॥ तें ज्ञान केवीं तुझिये मनीं ॥ होईल पुत्रराया ॥१६॥

रेचक पूरक कुंभक ॥ पंचप्राण त्राहाटक ॥ हे हरिचिंतनेसि साधक ॥ तुज केविं होती ॥१७॥

प्राण अपान आणि व्यान ॥ उदान पांचवा समान ॥ हें प्राणायामांचे विज्ञान ॥ तुज केविं घडेल ॥१८॥

येकवीस सहस्त्र जप पवनु ॥ वेदवाचा मुक्ति मनु ॥ ब्रह्मा विष्णु त्रिनयनु ॥ जाणसी केवीं ॥१९॥

ध्रुव ह्मणे ज्याचा धरिजे वेध ॥ तोचि केवीं न करी बोध ॥ तरी यामाजी काय भेद ॥ सांग जननीये ॥२०॥

आतां असो हे संवादकथा ॥ ध्रुवासि उपदेशितसे माता ॥ ते ऐकें गा राया भारता ॥ उपदेशवाणी ॥२१॥

ह्मणे आधारचक्राभीतरीं ॥ गणाधीश पती सिद्धि नारी ॥ रक्तवर्ण खूण अंतरीं ॥ ऐक पुत्रा ॥२२॥

सहाशतें जप दीधला ॥ तो लक्षलाभ साधला ॥ पंचद्दरीं पवन दाटला ॥ गुदरंध्रेंसीं ॥२३॥

दुसरें चक्र आयकिजे ॥ स्वाधिष्ठानीं ब्रह्मा बोलिजे ॥ तेथें सावित्रीशक्ति सहजें ॥ करी सेवा ॥२४॥

तेथें वाचा वैखरी ॥ जागृतावस्थे भीतरीं ॥ धर्मकळा मुक्ती खेचरी ॥ सलोकता जे ॥२५॥

तेथें खेचरीमुद्रालक्षण ॥ ओंकार ऋग्वेद जाण । अधिभौतिकादि ताप तीन ॥ पुत्रराया ॥२६॥

कीं उरपीठींची सहस्त्रमात्रा ॥ सानुकूळ जेवीं जननी पुत्रा ॥ पवनजप विसां सहस्त्रां ॥ असे ऊर्ध्व ॥२७॥

तयावरुतें पाहें मनीं ॥ पूरकचक्र लिंगदेहस्थानीं ॥ तेथें विष्णुदेव सहपत्‍नी ॥ मध्यमा वाचा निर्मळ ॥२८॥

ते मध्यमा वाचा निर्मळा ॥ स्वप्नावस्था धूम्रकळा ॥ समीपता मुक्तिमाळा ॥ सहितमुद्रा भूचरी ॥२९॥

तेथें सत्वगुण आकार ॥अद्वैत संचित कर्माकार ॥ समान प्राण तो साचार ॥ कळेल केवीं ॥३०॥

चतुर्थ गुरुलिंग कुंभक पवन ॥ श्रीहाटध्वनि अनुहात यज्ञ ॥ द्दिदळमातृका द्दिदळ प्राण ॥ जप सहासहस्त्र ॥३१॥

इतुकें ऐकोनि ह्मणे धरू ॥ माते कैसा अनुहात विचारु ॥ अणि कारण देहाचा आदरु ॥ सांगें मज ॥३२॥

तंव ते सुनीती जननी ॥ यशवंत ह्मणे हांसोनी ॥ पुत्रा उमा शूळपाणी ॥ असे तेथें ॥३३॥

तेथें ताम्रप्रभा पश्यंतीवाचा ॥ सुषुप्ति अवस्था शब्द साचा ॥ स्वरूपता मुक्ति ज्योतिकळेचा ॥ आश्रम तेथें ॥३४॥

चांचरी मुद्रा तमोगुण ॥ मकार अक्षर सामवेद जाण ॥ अध्यात्मिक कर्मज्ञान ॥ त्राहाटक पवन पैं ॥३५॥

गोल्हाट पीठ चतुष्टाकार ॥ प्राणमध्य पुलस्ति सहासहस्त्र ॥ अनुहातजप द्दादशसहस्त्र ॥ जाण पुत्रा ॥३६॥

विशुद्धचक्रीं कारणदेही ॥ अविद्याशक्ति आत्मा देवो ॥ परावाचा तुर्या वस्था ध्यायो ॥ वेद अथर्वण ॥३७॥

ज्वाळाकळा सायुज्यता मुक्ती ॥ रेचक पवन साधिती ॥ अगोचरी मुद्रांपंक्ती ॥ प्राण तो उदान ॥३८॥

पुण्यगिरी पीठाश्रम जाण ॥ क्षीरप्रभा अर्धमातृका खुण ॥ षोडशदळ ध्यान प्रामाण ॥ सहस्त्र येक ॥३९॥

अग्निचक्रीं लिंगदेह ॥ ध्रुवासि सांगे सुनीती माय ॥ परमात्मा देव तेची सोय ॥ मायाशक्ति पूजनें ॥४०॥

तरी प्राप्तव्हावया ते उन्मनी ॥ माणिकप्रभा धरीं ध्यानीं ॥ प्रसादलिंग अंतःकरणीं ॥ त्रिवेणीसंगम ॥४१॥

तेथें असे त्रिकुटस्थान ॥ निश्वळपणें ज्यासि मीलन ॥ येकसहस्त्र जप हे खूण ॥ जाण पुत्रा ॥४२॥

विराटदेह उत्पत्ति अवस्था ॥ उन्मनीदळ सहस्त्र तत्वतां ॥ ब्रह्मरंघ्र पुरुषदेवता ॥ महालिंग तेथें ॥४३॥

जीव असे सगुणमिथुनीं शिवातें होतसे मेळणी ॥ तये समान द्दिदळभुवनीं ॥ जप येकसहस्त्र ॥४४॥

महादेव शक्तिदेहो ॥ प्रळय‍अवस्थेचा भावो ॥ चतुर्थ चरण बीजठावो ॥ अर्धशून्य तें ब्रह्मांड ॥४५॥

तेथें करणींचे निजबीज ॥ तये स्थानीं तूं राहें सहज ॥ मग स्वानंदसुखाचें भोज ॥ भोगीं बाळा॥४६॥

तेथें मूळप्रकृतिदेहें ॥ शुन्यीं निरालंबपणें राहें ॥ अधिष्ठित शिवदेवता पाहें ॥ निर्गुणजीवीं ॥४७॥

जेथें महत्तत्व मूळ ॥ मायाप्रकृतीचें नाहीं जाळ ॥ तेथें आत्मा राहे केवळ ॥ जीवाचे जन्मस्थानीं ॥४८॥

सदा निश्वळ असे अवस्था ॥ निर्गुणब्रह्म जाण सुता ॥ मग तें शून्यभुवन ह्मणतां ॥ खुंटला पवन ॥४९॥

ते निःशद्बदेहीं ब्रहादेवता ॥ निरंजन देहीं अतीता ॥ ऊर्ध्वशून्य मुक्तर्थता ॥ जाणता योगी ॥५०॥

तेथें साक्ष निर्गुण अक्षर ॥ नादाचा जाणीजे अंकुर ॥ चैतन्यमायेचा पदर॥ महदादि ह्मणती ॥५१॥

पिंडब्रह्मंड वेगळें ॥ तैसेचि चराचर बोलिलें ॥ पूर्णज्ञानाचेनि मेळें ॥ हारपोनि सरे ॥५२॥

शून्यदेहीं अलक्षता ॥ महादादिमायेहूनि परता ॥ निरखूनियां आत्मातीता ॥ तेचि मुक्ती जाणिजे ॥५३॥

तेथें निजमन गोविंदीं ॥ राहे देवध्यान जीवीं ॥ तो निरंजन गा अनुभवी ॥ तये पंथें ॥५४॥

बापा तोडीं मायाजाळ ॥ सांडोनि देह अहंकारमूळ ॥ मग तुज भेटेल राउळा ॥ निरंजनाचें ॥५५॥

ऐसें जया निर्धारलें जाण ॥ त्यासि विष्णु भेटे आपण ॥ वांचोनियां निर्धारमन ॥ सर्वाअगोचर ॥५६॥

यापरि ऐकतां भागलें ॥ मौनें राहिलें तान्हुलें ॥ तंव जननीयें जाणितलें ॥ कीं आतां असे विशेष ॥५७॥

आतां असो हें भारता ॥ ज्ञान उद्भवलें उत्तानसुता ॥ मग जाहला वन सेविता ॥ अघोरकष्टें ॥५८॥

भारता तो वांचोनियां जननी ॥ येकलाचि गेला चुकवोनी ॥ तंव भेटले नारदमुनी ॥ मार्गी जातां ॥५९॥

हे स्कंदपुराणींची कथा ॥ परि रघुंवंशीं आन वार्ता ॥ कीं नारद आला तप करितां ॥ उठावावयासी ॥६०॥

आणि स्कंदपुराणी बोलिलें ॥ इंद्रे विष्णूसि श्रुत केलें ॥ कीं अमरावतीसि विघ्र आलें ॥ ह्मणवोनियां ॥६१॥

परि रघुवंशपुराणी ॥ विष्णूनें धाडिला नारदमुनी ॥ कीं तप करी बाळ कवणी ॥ त्यातें उठविजे ॥६२॥

परि तो महासत्वधीरू ॥ ढांळितां न ढळेचि धुरु ॥ ह्मणोनि नारद ऋषीश्वरू ॥ इंद्रभुवनाप्रति गेला ॥६३॥

तंव सकळदेवांसहित ॥ भंद्रें बैसला अमरनाथ ॥ तेथें नारदें कथिली मात ॥ धुवबाळाची ॥६४॥

ह्मणे तो बैसला मधुवनीं ॥ आतां विनवावा शारंगपाणी ॥ चतुरानन शूळपाणी ॥ सहित निघिजे ॥६५॥

तेव्हां अमरपती गजबजिला ॥ सिंहासनाखालीं उतरला ॥ क्षीरसागरा स्वयें निघाला ॥ नारदासहित ॥६६॥

जातां विनविला विघातां ॥ जयजयाजी जगत्पिता ॥ संकट मांडिले अ मरनाथा ॥ तें निवारिजे स्वामी ॥६७॥

मग पुत्रे पिता अमरपती ॥ तिघे आले शिवाप्रती ॥ शूळपाणीसि विनंती ॥ निवेदी ब्रह्मा ॥६८॥

शिवासि घेवोनि सांगातें ॥ हरीनें शयन केलें जेथें ॥ सकळजणीं जेवोनि तेथें ॥ विनविलें दे वासी ॥६९॥

परि भविष्योत्तरीचें कथन ॥ कीं ध्रुव निघाला मातेसि पुसोन ॥ तंव राहविती सकळ जन ॥ पिता जननी सहित पैं ॥७०॥

आणि नारद मार्गी भेटला ॥ तेणें उपदेश दीधला ॥ मंत्रोपदेशें ध्रुव आनंदला ॥ तें असो आतां ॥७१॥

भेटीचा विस्तार असे वहिला ॥ येरा मंत्र उपदेशिला ॥ मग अष्टांगसुत गेला ॥ तेथोनियां ॥७२॥

आतां ध्रुव तप करील ॥ तेथें वैकुंठपती येईल ॥ मग तो अढळपद देईल ॥ ध्रुवदेवासी ॥७३॥

असो बीजें सहित अक्षरें ॥ ध्रुव जपत असे आदरें ॥ व्हावया तारक निरंतरें ॥ परत्रदायक ॥७४॥

उपदिष्ट मंत्र येकचि धरूनी ॥ ध्रुव बैसला मधुवनीं ॥ प्राप्त जाहला निरंजनीं ॥ परम तपिया ॥७५॥

तेथें दिव्यद्रुम‍उद्यानें ॥ चंदनाचीं वनोपवनें ॥ कल्पतरूंची अति सघनें ॥ ठाई ठाई ॥७६॥

चातक मयूर हंस सांरसी ॥ लोळणी घालिती येकमेकांसीं ॥ निर्झर उदक कमळकोशी ॥ अमृतोपम ॥७७॥

तडाग कूप सरोवर ॥ वसंतीं मोहरले तरुवर ॥ वरी पक्षिकुळें भ्रमर ॥ नानाजाती ॥७८॥

आंबियावरी कोकिळा ॥ पंचम आळविती रसाळा ॥ शुद्ध नीलवर्ण अखिला ॥ आनंदगजरें ॥७९॥

मधुकरांची पडे झाउळी ॥ पुष्पांवरी तये वेळीं ॥ जाणों रुणझुणतीं जाहलीं ॥ चंदन बकुळें ॥८०॥

ऐसें देखोनियां वन ॥ उच्चाटेल नंपुसकाचेंही मन ॥ परि ध्रुव ह्मणे तपध्यान ॥ येथेंचि कीजे ॥८१॥

मग ध्रुव तपासि बैसला ॥ बीजमंत्र अंतरीं उच्चारिला ॥ जेणें हरी संतोषला ॥ क्षीरसमुद्रीं ॥८२॥

तृतीय‍उपोषणीं तपमूळीं ॥ पारणें करी कर्दळीफळीं ॥ येकमास क्रमिलिया बळीं ॥ ध्ररूनि प्राण ॥८३॥

दुजिये मासीं उपवास घडले ॥ साहवे दिनीं स्वीकारी पडिलें ॥ फलपत्रें येक मास बळें ॥ केलें तप ॥८४॥

मग तो अवघड तिसरे मासीं ॥ उदक सेवी नववे दिवशीं ॥ आणि वायुसेवी बारावे दिवशीं ॥ मासयेकपरियंत ॥८५॥

नंतरें प्राणायाम केला ॥ तो दोनमहिनें राखिला ॥ मग तेणें निरोध जाहला ॥ सकळदेहीं ॥८६॥

पूरक अवघा पुरविला ॥ कुंभक अंतरीं रोधिला ॥ आणि रेचक लाविला ॥ च्यारीपवनीं ॥८७॥

तंव तें न साहवे सुरेश्र्वरा ॥ अवघे गेले क्षीरसागरा ॥ विनविते जाहले शारंगधरा ॥ लक्ष्मीकांतासी ॥८८॥

ह्मणती जयजया अनाथनाथा ॥ अच्युता माधवा अनंता ॥ श्रीहरी गजेंद्रासि रक्षिता ॥ अधोक्षता तूं ॥८९॥

पडलिया महा आकांतीं ॥ होसी भक्तांचा सारथी ॥ तुझी केवीं स्तुती ॥ कृपासमुद्रा ॥९०॥

आतां सावधान होईजे ॥ वेळ न लागतां निघिजे ॥ ऐसें ऐकतां पातले राजे ॥ वैकुंठींचे ॥९१॥

इंद्राचा धांवा ऐकिला ॥ विष्णु अमरावतीसि पातला ॥ हा श्लोक असे ऐकिला ॥ स्कंदपुराणींचा ॥९२॥

ह्मणे कां मज बोलविलें ॥ कवणें तुजला विरोधिलें ॥ अथवा कवणें निंदिलें ॥ ते सांग वेगीं ॥९३॥

तंव ह्मणे अमरपती ॥ कीं कळलेंचि असेल श्रीपती ॥ तुवां ज्ञानीं पाहिजे मती ॥ ध्रुवदेवाची ॥९४॥

विष्णु ज्ञानी जंव पाहे ॥ तंव तो ध्रुव तप करिताहे ॥ मग विस्मयो करोनि लवलाहें ॥ निघाला देवो ।९५॥

प्रानायाम करोनि बरवा ॥ निरोधिला प्राण आघवा ॥ हें ज्ञान अवघें केशवा ॥ जाहलें श्रुत ॥९६॥

मग देवांसह चतुरानन ॥ शूळपाणी आणि ब्रह्मनंदन ॥ सकळ गणेंसि सहस्त्रनयन ॥ आले धुवाजवळी ॥९७॥

तो सकळदेवांसहवर्तमान ॥ मधुवनीं येवोनि नारायण ॥ देखोनि संतोषे जगज्जीवन ॥ बाळमू तींसी ॥९८॥

मग शंखाचे हातवेगें ॥ कपाळ पुशिलें श्रीरंगें ॥ आणि ह्मणितलें गोविंदें ॥ माग प्रसन्न मी ॥९९॥

तव लक्ष्मीनें बाळ देखिला ॥ प्रीतीनें कडिये घेतला ॥ कुरवंडी करोनि वोंवाळिला ॥ पुत्रभावें ॥१००॥

यानंतरें चतुरानन ॥ दिव्य पीतांबर नेसवोन ॥ तंव आली सावित्री घेवोन ॥ कनकारती ॥१॥

सावित्री कनकपरियेळीं ॥ ध्रुवासि पंचारती वोंवाळी ॥ पुत्रभावें मुख कुरवाळी ॥ ब्रह्मपत्‍नी ते ॥२॥

मग आलीं शिवदाक्षायणी ॥ विभुतितिलक करी शूळपाणी ॥ विजयी रक्षिलासि ऐसें वदनीं ॥ बोले सदाशिव ॥३॥

आणिक शेलतनया ह्मणे ॥ पुत्र कैंची मजकारणें ॥ तरी हा पुत्र पाहोनि नयनें ॥ आनंदलीं माझीं ॥४॥

तंव ध्रुवानें डोळे उघडिले ॥ मूर्तिमंत ब्रह्म देखिलें ॥ मग भावें साष्टांग घातलें ॥ तिहीं देवांसी ॥५॥

ऐसा करुणाकार मुरारी ॥ बाळासि बोले प्रेमगहिंबरीं ॥ सखया पांचा वरुषांचा वनांतरीं ॥ आलासि कैसा ॥६॥

तंव नारद ह्मणे हो हरी ॥ याचा पिता सिंहासनधारी ॥ परि मत्सरें लोटी सापत्‍ननारे ॥ या बाळकासी ॥७॥

पठ्ठराणी सुनीती नारी ॥ राज्य करितां संसारीं ॥ तंव मेळविली दुसरी ॥ ते सुरूची नामें ॥८॥

राव असतां तिचिनि संगतीं ॥ सभेसि बैसे दिनराती ॥ तंव पेखणें मांडलें श्रीपती ॥ सभारंगीं ॥९॥

तो नाद ऐकिला या लेंकुरें ॥ ह्मणोनि धांव घेतली आदरें ॥ कौतुक दावाया सुदरे ॥ सुनीती माये ॥११०॥

ऐसी ते सुनीती माया ॥ कडिये घेगोनि पुत्रराया ॥ आली असे तया ठाया ॥ रायासन्निध ॥११॥

बाप जाहलासे रंगीं पिसा ॥ तंव दृष्टी पडली राजसा ॥ तान्हुलें देखोनि आरसा ॥ मागे रायाजवळी ॥१२॥

देखोनि पुत्र चुडामणी ॥ सेवक करिती वोंवाळणी ॥ क्षणैक त्याग देती पेखणीं ॥ ऐकोनि शब्द ॥१३॥

असो ऐसा बाल देखिला ॥ मग रावो संतोष पावला ॥ ह्मणोनि उचलूनि घेतला ॥ सिंहासनीं ॥१४॥

जंव तो आनंदभरें रायें ॥ उचलोनि बैसविला मांडिये ॥ तंव क्रोधें प्रज्वळली माये ॥ सापत्‍न जे कां ॥१५॥

रायें वानिलें तया कुमरा ॥ ह्मणे वंश उद्धरसी लेंकुरा ॥ तंव बोलिली सापत्‍नदारी ॥ क्रोधरूपें ॥१६॥

ह्मणे या अमंगळाची थोरी ॥ काय वानिसी सभेभीतरीं ॥ आरसा दीधलासे करीं ॥ याचिये तुवां ॥१७॥

जेणें माझिये उदरीं यावें ॥ तेणेंचि मांडिये बैसावें ॥ ऐसें ह्मणोनि मत्सरभावें ॥ क्रोधें उठली ॥१८॥

बाळ हाणितलें चरणनिर्घातं ॥ पडिलें सिंहासना खालतें ॥ मुर्छा आली तयातें ॥ राजस तान्हुल्या ॥१९॥

बाळक करीतसे रुदना ॥ सकळा येतसे करुणा ॥ ह्मणती हे राणी उत्तारनचरणा ॥ न मानीच कीं ॥१२०॥

ऐसें बोलती सकळ राजे ॥ कीं हे रायासि केविं साजे ॥ चांडाळी अपवित्र न लाजे ॥ न पाहिजे इचें मुख ॥२१॥

हे निश्वयें होय राक्षसी ॥ छळूं आली या रायासी ॥ ऐसा समयो वर्तला जनासी ॥ तये वेळीं ॥२२॥

आतां असो हा येथ श्लोक ॥ मग तें उठिलें बाळक ॥ पाहतसे रायाचें मुख ॥ परि न देखे कैंवारी ॥२३॥

ह्मणोनि रुदताचि निघालें ॥ चरणचालीं चालिलें ॥ जन सकळ दुखावले ॥ त्याचेनि दुःखें ॥२४॥

कीं माउशीयें दुखविला ॥ माऊनि भक्तिसि लाविला ॥ मोहिनीनें रुक्मांगद मोहिला ॥ तैसें जाहलें ॥२५॥

मदलसेनें पुत्रांकारणें ॥ उपदेश दीधला पाळणें ॥ तैसें ध्रुवानें घेतलें मौनें ॥ ज्ञानबोधा ॥२६॥

आतां असो मागील कथा ॥ सुनीतीनें उपदेशिलें सुता ॥ तें कथिलेंचि असे भारता ॥ पूर्वप्रसंगीं ॥२७॥

ऐसें कथन त्या मधुवनीं ॥ हरिसि सांगे नारदमुनी ॥ तें ऐकिजे सावधानीं ॥ जन्मेजया तूं ॥२८॥

राज‍अवज्ञेचिये वेगें ॥ जननीप्रति पुसिलें रागें ॥ येरी निर्वाणबुद्धि सांगे ॥ पुसिल्यास्तव ॥२९॥

तेंचि घेतलें येणें मनीं ॥ मग प्रवेशला मधुवनीं ॥ परि द्दाद्श‍अक्षरें साधुनी ॥ मीचि यासी दीधलीं ॥१३०॥

तैंचे सहामहिने जाहले ॥ येणें तप उग्र केलें ॥ उपरीं गोसावी येथें आले ॥ तरी भाग्याचा बाळ हा ॥३१॥

ऐसें ऐकोनि देव ह्मणे ॥ आधीं यासी राज्य देणें ॥ मग मोक्षपदीं बैसविणें ॥ अक्षय निश्वळ ॥३२॥

मग ध्रुवासि ह्मणे श्रीहरी ॥ छत्तीसहास्त्रवर्षे वरी ॥ बालका राज्य अंगिकारीं ॥ मग येथूनि वरी यावें ॥३३॥

ऐसा राज्याचेनि वेधें ॥ ध्रुव स्थापिला गोविंदें ॥ येरू निघाला आनंदें ॥ पितयाजवळी ॥३४॥

हे भविष्योत्तरीं स्कंदीं कथा ॥ परि रघुवंशीं आन वार्ता कीं राज्य नाहीं तपोवंता ॥ बोलिलें असे ॥३५॥

येथें श्रोतीं न कोपावें ॥ अखिल सांगीतलें आघवें ॥ कीं घृतेंवीण भोजन करावें ॥ तेथें रुचि कैंची ॥३६॥

इकडे येके समयीं राजया ॥ सेवकीं सांगितलें धावोनियां ॥ की आजी येतसे वहींहूनियां ॥ पुत्र तुमचा ॥३७॥

राव ह्मणे मी अकर्मचा ॥ मज प्राप्त पुत्र कैंचा ॥ येरू ह्मणे हे सत्य वाचा ॥ पुत्र तुमचा निश्चयें ॥३८॥

तये वेळीं वाधावियातें ॥ रायें हार दीधला उचितें ॥ अमित सेना घेवोनि सांगतें ॥ रावो साउमा चालिला ॥३९॥

येतां देखिला दुरूनी ॥ प्रेमें उचलिला धांवोनी ॥ मुखचुंबन आलिंगनीं ॥ हृदयीं धीरला ॥१४०॥

जाहला त्रिभुवनीं आनंद ॥ पुत्रा लाधलें अढळपद ॥ प्रसन्न केला गोविंद ॥ वैकुंठींचा ॥४१॥

नगरीं वाजती वाधावणीं ॥ गुढिया पताका तोरणीं ॥ धन्यपण मानी जननी ॥ ध्रुवबाळाची ॥४२॥

मग माता ह्मणे रे कुमरा ॥ कैसा वांचलासि वनांतरा ॥ सहामहिने गेले लेंकुरा ॥ तुझे वियोगें ॥४३॥

तुजवांचोनि सहामहिने ॥ जाचलें मी पुत्रासि ह्मणे ॥ बाळा निष्ठुर माझें जिणें ॥ वज्रासमान ॥४४॥

करूनि निंबलोण राजसा ॥ ह्मणे माझिये बाळा डोळसा ॥ वनीं कष्ट केले तापसा ॥ उपमेरहित ॥४५॥

असो मग वर्‍हाडिकेची चिंता ॥ पडली तया नृपनाथा ॥ ह्मणोनि मागितली वायुची दुहिता ॥ ध्रुवदेवासी ॥४६॥

ते वायूची कन्या विडा ॥ दुसरी कुमरी अए कोंडा ॥ ऋषी मिळाले वर्‍हाडा ॥ पत्‍न्यांसहित ॥४७॥

सत्यरूप स्वायंभु मनु ॥ निऋती देव आणि कर्दमु ॥ उभयवर्ग ऋषिआश्रमु ॥ आले वर्‍हाडिकेसी ॥४८॥

ऋचिक आणि आकृती ॥ दक्ष आणिक प्रसूती ॥ पुलह ऋषि आणि गती ॥ क्रिया अत्रि सहित पैं ॥४९॥

आलीं मरीचि आणि कळा ॥ सती अनुसूया वेल्हाळा ॥ अंगिरा आणि सिद्धा वेल्हाळा ॥ ऐसीं वधुवरें ॥१५०॥

वसिष्ठ आणि अरूंधती ॥ भृगु आले पत्‍नीसह क्षितीं ॥ पुलस्ती स्त्रीसहित येती ॥ वर्‍हाडिकेसी ॥५१॥

ऐशा ऋषीचिया नारी ॥ महानुभावांचिया कुमरी ॥ यांहीं लग्न मंत्रोज्वारीं ॥ लाविलें देखा ॥५२॥

लग्न विधि जरी सांगिजेल ॥ तरी कथा विस्तारेल ॥ ह्मणोनि काय जाहलें तें बोलेल ॥ लग्नाउपरी ॥५३॥

ध्रुवासि केला राज्याधीश ॥ रायें अंगिकारिला संन्यास ॥ मग सेवोनियां वनवास ॥ ठेविला देहो ॥५४॥

पुढें छत्तीस सहस्त्र वरूषें ॥ ध्रुवें राज्य केलें विशेषें ॥ तये राज्यीं नाहीं देखें ॥ वैर विरोध ॥५५॥

असो उत्तानचरणाची नारी ॥ सुरूची नामें जे दुसरी ॥ पुत्र जाहला तिचे उदरीं ॥ उत्तम नामें ॥५६॥

मग सर्व कटक सैन्यनिधी ॥ घेवोनि उत्तम गेला पारधी ॥ तेथेंज जाहला आश्वर्यविधी ॥५७॥

तें यक्षरायें ऐकिलें ॥ ह्मणे ये वनीं कोण आलें ॥ मगयुद्धा दळ सन्नद्धलें ॥ यक्षपतीचें ॥५८॥

यक्षेंद्र ह्मणे राजनंदना ॥ केविं आलासि माझिया वना ॥ सांडीं पारधीचिया व्यसना ॥ नातरी प्राणी मुकशील ॥५९॥

दोघां जाहली समदृष्टी ॥ खड्गें वसिन्नलीं मुष्टी ॥ निर्घातघायें सकळ सृष्टी ॥ दणाणित अंबर ॥१६०॥

पळती पशुपक्षी सांडुनी ॥ बहुत वीर पडले रणीं ॥ कुंजर अश्व शस्त्रपाणी ॥ असंख्य जहले भूमिगत ॥६१॥

येक मारिले समोरघाईं ॥ येक बैसले हातपांई ॥ सैन्य पडिलें ठाईठाई ॥ मुद्नलघायें ॥६२॥

तुटलीं चरण करकमळें ॥ बीभत्स गळती शिसाळें ॥ उत्तमें रणमंडळ पाडिलें ॥ मांसकर्दमीं ॥६३॥

आतां असो हे युद्धकुसरी ॥ माता ऐकिली सुरुची सुंदरीं ॥ मग धांवोनि आली झडकरी ॥ अंगणाप्रती ॥६४॥

ह्मणे धांवा विपरीत जाहलें ॥ बोलों नये तें ऐकिलें ॥ उत्तमासि यक्षें वधिलें ॥ खेळतां पारवी ॥६५॥

ऐसा आक्रोश करोनि तत्क्षणीं ॥ येरीनें अंग घातलें धरणीं ॥ ह्मणे म्यां अपराधेंवीण चरणीं ॥ हाणिले होतें ध्रुवातें ॥६६॥

ध्रुवासि देवो भेटाला ॥ आणि नारदें उपदेश केला ॥ ह्मणोनि तया हरि मानवला ॥ प्रसन्नरूपें ॥६७॥

तेणें रागेला शारंगपाणी ॥ ह्मणोनि ऐसी जाहली करणीं ॥ आणि तैसाचि शूळपाणी ॥ कोपला मज ॥६८॥

ह्मणे उत्तमा राजसा ॥ कोणें वधिलासि पाडसा ॥ मज निर्धाराचा भरंवसा ॥ नेला देवें ॥६९॥

ह्मणे माझिया बाळका ॥ ऐसें काय केलें त्र्यंबका ॥ येणेपरी अन्य दुःखा ॥ अनुभविलें नाहीं ॥१७०॥

मज पांगुळांचें टेंकणें ॥ आणिक मुक्याचें बोलणें ॥ कीं आंधळ्याचें देखणें ॥ हरिलें देवा ॥७१॥

तुजवांचोनियां नंदना ॥ स्तनीं दाटला माझे पान्हा ॥ विस्मृती पडलीसे नयनं ॥ मूर्च्छितपणें ॥७२॥

मज उघडियेचें वस्त्र ॥ हरपलें विवासियेचें अंबर ॥ मजारी नारायणें निष्ठूर ॥ केली दृष्टी ॥७३॥

म्यां पिंशुनाचें केलें हांसें ॥ नेणिलें आपणिया सरिसें ॥ चहूवाटेसि म्या निराशें ॥ भ्रमणें आतां ॥७४॥

मग ध्रुव आणि सुनीता ॥ आली सुरूचीजवळी तत्वतां ॥ तंव पडलीसे सापत्‍नमाता ॥ मूर्च्छितपणें ॥७५॥

सुरुचीनें प्राण वेंचिला ॥ तंव ध्रुव सैन्येंसिं सन्नद्धला ॥ यक्षपतीवरी चालिला ॥ सूड ध्यावया बंधूचा ॥७६॥

गुढारिले गज रथ ॥ सैन्य चालिले अगणित ॥ असिवीर पायवीर असंख्यात ॥ चालिले देखा ॥७७॥

उत्तरदिशे हिमाचळ ॥ तेथें यक्षपती आणि ध्रुव बाळ ॥ दोघां युद्ध होत तुंबळ ॥ अशुद्धिनद्या वाहती ॥७८॥

तंव यक्षांचिया कोडी ॥ हिमाचळाचिये दरडीं ॥ रुधिरमिश्रित कराडीं ॥ भुमी आकाश दाटलें ॥७९॥

विशाळ द्रुम साय मोह सांदडे ॥ वेळू कंवट वे हळ हरडे ॥ अपार जातींची तेथें झाडें असती राया ॥१८०॥

शिखरेंचिया लोटिल्या धोंडी ॥ पडती पर्वताचिया दरडी ॥ चंद्रसूर्या येती भवंडी ॥ दिग्मंडळासहित ॥८१॥

ऐसिया तया अवघड ठायीं ॥ कोणीं नगर वसविलें नाहीं ध्रुव ह्माणे येथें नवतें काहीं ॥ ऐसें करीन ॥८२॥

ऐसें ध्रुवें देखोनि नयनें ॥ शंख स्फुरिला महात्राणें ॥ जेणें नादें पडावी भुवनें ॥ तिहीं लोकींची ॥८३॥

तो नाद ऐकोनि गंभीर ॥ खवळले यक्षपतीचे वीर ॥ दरडीहूनि निघती अपार ॥ गजाश्वांसहित ॥८४॥

थव्यां मागें थवेकार ॥ रथ अश्व पदाती कुंजर ॥ जाणों उलथले सप्तसागर ॥ सैन्यरूपें ॥८५॥

खरड वरड दरकुटीं ॥ दिसती सेनेच्या महा थाटी ॥ वराह होतसे हिंपुटी ॥ सांवरितां भूमी ॥८६॥

आतां असो हे सैन्यकथा ॥ संग्राम जाहला गा भारता ॥ कीं वेळ पडालिया उचिता ॥ चुकों नये ॥८७॥

येकदांचि चौदापद्मवीरीं ॥ वेढिलें ध्रुवासि येकसरीं ॥ परि तो वीर येकला समरीं ॥ घडघडवी रथ ॥८८॥

मदें मातले पदाती ॥ किंकाटती भद्रजाती ॥ महात कुंभस्थळें फोडिती ॥ अंकुशघातें ॥८९॥

येकाचि अंगवणे साठीं ॥ येकेचि हातें बाण सुटी ॥ धुवें केलिया बारावाटीं ॥ पळती यक्ष ॥१९०॥

दहासहस्त्र तीक्ष्ण बाण ॥ चरीलक्ष सुटले गुण ॥ पाडिलें यक्षपतीचें सैन्य ॥ पृथ्वीवरी ॥९१॥

येकयेका तीनतीन बाणीं ॥ ध्रुवें लोळबिलेंसे धरणीं ॥ मत्तहस्तींची आयणी ॥ पुरविली ध्रुवें ॥९२॥

सातां वरुषांचा जाहला ॥ तेव्हांचि हा संग्राम केला ॥ तंव अमित सैन्येंर्सिं आला ॥ यक्षराज युद्धातें ॥९३॥

बावन प्रभावळी पडली ॥ ती ध्रुवबाळकें देखिली ॥ मग सूर्यवंशटिळका आली ॥ क्रोधदृष्टी ॥९४॥

तयावरी गुण सरसाविला ॥ बोटें करोनि मर्दिला ॥ सिंहनादें बाण वोढिला ॥ जाणों महा प्रळयची ॥९५॥

आवेशें ह्मणे यक्षपतीतें ॥ साहें माझिया बाणातें ॥ तुझिया प्रभावळी येक शतें ॥ तोडीन मी क्षणार्धें ॥९६॥

ऐसा उठिला महावीर ॥ घायें यक्ष केले जर्जर ॥ ह्मणती हा सान नव्हे निष्ठुर ॥ उठिली विवशी ॥९७॥

राया मग इतुकियावरी ॥ यक्षसैन्य झेंपावलें त्यावरी ॥ ह्मणती रे वीर धीर धरीं ॥ जाशील कोठें ॥९८॥

त्रिशूळ कुंत आणि भाले ॥ हाणितां वीर भागले ॥ परि तो जाणों बाळ खेळे ॥ तयां जवळी ॥९९॥

गदा तोमर आणि खाडीं ॥ चक्रें भवंडीतसे प्रौढी ॥ लाटी मुसळ आणि लहुडीं ॥ वाहे अशुद्ध ॥२००॥

ऐसीं शस्त्रें हाणितां ॥ बाळकें व्यापिलें बहुतां ॥ मग निर्बुजलिया चित्ता ॥ स्मरण न पडे ॥१॥

जाणों सिंही कवळिला हस्ती ॥ कीं तमावरी पडे गभस्ती ॥ नातरी चंद्र शोभे राती ॥ तारांमध्यें ॥२॥

कीं तृणें वन्ही दडपिला ॥ अथवा वायु पर्वतीं आदळला ॥ तैसा ध्रुव बाळ कोंडिला ॥ यक्षसैन्यें ॥३॥

ऐशा बावन प्रभावळी ॥ येक जाहली समफळी ॥ माजी वेढिला अंतुर्बळी ॥ ध्रुवबाळ तो ॥४॥

येरें बीजमंत्र जपिन्नला ॥ तीनशें बाणां गुण लाविला ॥ तेणें मुख्यनायक पाडिला ॥ यक्षपती तो ॥५॥

तंव वीरां न धरवे धीर ॥ पटेला सहस्त्रांचा मार ॥ भंगोनि गेला दळभार । वाहे पुर रुधिराचा ॥६॥

ऐसा यक्ष पडिलियावरी ॥ आतां चित्ररथ येईल समरीं ॥ तो कोपला ध्रुवावरी ॥ मावरूपें ॥७॥

असो तीं घायाळें भयें गेलीं ॥ चित्ररथा सांगती बंबाळबोलीं ॥ ह्मणती क्षयो जाहला दळीं ॥ यक्षपतीसहित ॥८॥

ऐसी ऐकोनियां मात ॥ तेणें खवळला गंधर्वनाथ ॥ जो गंधर्वराजा चित्ररथ ॥ महायोद्धा ॥९॥

जाणों प्रळयरुद्र घडाडिला ॥ कीं सिंधु पृथ्वीवरी लोटला ॥ तैसा गंधर्वरावो चालिला ॥ चित्ररथ ॥२१०॥

रथांचियां चक्रावळी ॥ घडघडती हिमाचळीं ॥ फूटली वीरांची आरोळी ॥ धांवतां तेथें ॥११॥

रथीं धुरोळा उधळला ॥ तो आकाशीं जावोनि लागला ॥ तेणें अंधकारें लोपला ॥ सहस्त्रकिरण ॥१२॥

जाणों प्रळयीं सागर डहूळला ॥ कीं तो आकाशीं वळधला ॥ तैसा ध्रुवें गंधर्व देखिला ॥ चित्ररथतो ॥१३॥

मग चित्ररथें मावरूपें ॥ ध्रुवासि व्यापिलें सकोपें ॥ नानाशस्त्रास्त्रीं तळपें ॥ रणमंडळामाजी ॥१४॥

काळीं निळीं आणि उज्वळीं ॥ खेळतसे लोहित ज्वाळीं ॥ पीत श्यामें अंत्रें सळबळॆएं ॥ पडती वरी ॥१५॥

विंचु काळे पुच्छ पांढरें ॥ कांकडे पीत ठाकुरे ॥ ऐसीं पृथकें विखारें ॥ आव्हानिलीं तेणें ॥१६॥

सर्प पडती येकसरें ॥ माळवें गंहार श्वेतरें ॥ चितारे रक्तवर्ण पांढरें ॥ शंखपाळादि ॥१७॥

द्दिफणी त्रिफणी विखार ॥ पंचसप्तफणी क्रुर ॥ सहस्त्रफणी मुक्ताभार ॥ मस्तकीं जयांचे ॥१८॥

ऐसे नानाप्रकारींचे ॥ सर्प पडिले बहुवर्णाचे ॥ सवेंचि रथ पदातींचें ॥ पडिलें भंवरजाळ ॥१९॥

रीस वानर गोलांगुळें ॥ घुशी मुंगसें आढळें ॥ घोरपडा मुखडुंडाळे ॥ सरटादि पडती ॥२२०॥

कोल्हीं कोंबडी आणि तरसें ॥ व्याघ्र वृक आणि रिसें ॥ गजांची कटकें बहुवसें ॥ पडती बाळावरी ॥२१॥

आतां असो इतुक्यावरी ॥ श्रोते कोपतील या उपरी ॥ श्रीभागवत श्लोकमात्रीं ॥ कथा वर्णिली असे हे ॥२२॥

येथें इतुकें जंव वर्तलें ॥ तंव वसिष्ठासह ऋषि आले ॥ मग त्यांहीं हातीं धरिलें ॥ ध्रुवबाळासी ॥२३॥

ऋषी बोलिले वचन ॥ तूं करीं गा विष्णुचिंतन ॥ मागां भेटला नारायण ॥ तें कार्य विसरलासी ॥२४॥

तंव तो पूर्वील विचार ॥ ध्रुवा आठवला ज्ञानपदर ॥ जेणें भेटला दातार ॥ मुक्तिपंथाचा ॥२५॥

यापरी तो ध्रुव लेंकरूं ॥ ध्यानीं बैसविती ऋषीश्वरू ॥ तंव गंधर्व ह्मणती वीरू ॥ काय जाहला ॥२६॥

मग सकळ ऋषि मिळोनियां ॥ जावोनि ह्मणती गंधर्वराया ॥ अगा धेनु काय ऋषिठाया ॥ आनंदें नये ॥२७॥

इकडे ध्रुव बैसला ध्यानीं ॥ ह्मणे जयजयाजी चक्रपाणी ॥ क्षीरसागरीं शेषशयनीं ॥ निश्विंत अससी ॥२८॥

पावें भक्ता भवभंजना ॥ मुनिजनमानसरंजना ॥ पूर्णकामा कल्पद्रुमा ॥ पावें देवा ॥२९॥

तुजवांचोनियां संसारीं ॥ कोण सोडवील गा मुरारी ॥ नको अव्हेरूं शेवटवरी ॥ भक्तवत्सला ॥२३०॥

तंव पावला कृपानिधी ॥ त्रैलोक्य जयाचे उदरामधीं ॥ मग ध्रुव साष्टांग वंदी ॥ देवाधिदेवा ॥३१॥

विष्णु ह्मणे सखया बाळा ॥ कां केला संग्राम निर्फळा ॥ जयाचा कैवारी घनसांवळा ॥ प्रथमचि असे ॥३२॥

कोण कवणाचीं येकयेकचिये उदरीं ॥ विस्तार असतां भीतरीं ॥ कवण वैरी कवणाचा ॥३४॥

आतां देवाचें ध्यान धरीं ॥ पाहें दश‍इंद्रियें शरीरीं ॥ कवण कवणाचा वैरी ॥ तेथें काय ॥३५॥

अंगीं ज्ञानाचा असतां टिका ॥ वर्तें अज्ञान कां बालका ॥ जया योगें दुःखशोका ॥ प्राप्त होणें ॥३६॥

असो अध्यात्मबोधें ऐसें ॥ ध्रुवा उपदेशिलें हृषीकेशें ॥ मग ध्रुव ह्मणे मज‍ऐसें ॥ मुर्ख कवण ॥३७॥

आतां असो वर्जिली सभा ॥ आज्ञा जाहली पद्मनाभा ॥ मग बाळ राहोनियां उभा ॥ विनवी देवासी ॥३८॥

विष्णु आला ध्रुवाप्रती ॥ हे पद्मपुराणींची भारती ॥ आणि रघुवंशीची मती ॥ स्वयंभपणें ॥३९॥

असो ध्रुव आला स्वनगरा ॥ प्रवेशला राजमंदिरा ॥ तेव्हां संतोषली सुरूची सुंदरा ॥ सूड घेतला ह्मणवोनी ॥२४०॥

मग कोणे एके काळीं ॥ छत्तीससहस्त्र वर्षें भरलीं ॥ ह्मणोनि राज्य‍अधिष्ठा दिधली ॥ उत्कलपुत्रातें ॥४१॥

राज्यीं सुत बैसविला ॥ ध्रुव तपासि निघाला ॥ तो अढळपदा पावला ॥ भारता राया ॥४२॥

तंव आणिक ह्मणे भारत ॥ कीं कवणदेश गेला सांडित ॥ किती योजनें असे गणित ॥ तया देशांचें ॥४३॥

आतां पुढील अग्रकथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ ते आइकावी संतश्रोतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥४४॥

॥ इति श्रीकथाकल्पतरू ॥ सप्तमस्तबक मनोहरू ॥ ध्रुवाआख्यानप्रकारू ॥ दशमाऽध्यायीं कथियेला ॥२४५॥

॥ शुभं भवतु ॥

॥ इति श्रीकथाकल्पतरु सप्तमस्तबके दशमोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP