कथाकल्पतरू - स्तबक ६ - अध्याय १४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

जन्मेजय ह्मणे ऋषिराया ॥ विनंती परिसावी स्वामिया ॥ रामकथा मजलागुनियां ॥ सांगावीं जी ॥१॥

दशरथविवाहो कवणेपरी ॥ लग्न लागलें सागरीं ॥ हे जाहली केवीं नवलपरीं ॥ ऋषिवर्या हो ॥२॥

हें मजसी संकलितं ॥ चरित्र करावें जी विदित ॥ ऐसें असे विनवित ॥ भूपती तो ॥३॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ पंरियेसी राया सुजाण ॥ दशरथविवाहाचा प्रश्न ॥ ऐक आतां ॥४॥

तरी रावणापासूनि कथा ॥ तुज सांगो गा भारता ॥ ते पूर्वींला ऐकें आतां ॥ चित्त देवोनी ॥५॥

येकदां अंगाचिये मस्ती ॥ रावण पुसे नारदाप्रती ॥ कीं मज वधिता त्रिजगतीं ॥ देव दानव कोण असे ॥६॥

ऐसें रावणें पुसिलें ॥ तंव नारदें हास्य केलें ॥ ह्मणे रावणा अपेक्षिलें ॥ तरी ऐक आतां ॥७॥

देवांची सेवा घेसी तूं दशंकठ ॥ दैत्य तुजपुढे फळकटें ॥ दानवा होसी तूं तिखट ॥ तेही न पुरती ॥८॥

परि भविप्योत्तर न पुसावें रावणा ॥ संकल्प विकल्प भावी भावना ॥ मग भविष्य चुकवावया जाणा ॥ नानाविंदानें करिती जन ॥९॥

येरें धरिले मुनीचे चरण ॥ ह्मणे मज सांगा माझें मरण ॥ नारद जाणे रामायण ॥ मग सत्य बोलिला ॥१०॥

ह्मणे गा रावणा तुझे वधाथी ॥ कौसल्यासुत दाशरथी ॥ तो येवोनि लंकेप्रती ॥ वधील राक्षसां ॥११॥

ऐसें सांगोनि रावणाप्रती ॥ नारद निघे ऊर्ध्वपंथीं ॥ त्याचिये गमनाची गती ॥ उपमे नसे आन ॥१२॥

स्कंधीं वीणा वाहूनि जात ॥ रामनामें जाहला अतृप्त ॥ ह्मणोनि नाम मुखीं गात ॥ अतिआनंदें ॥१३॥

कीर्तनाचे परम संतुष्टीं ॥ रामरूप देखे दृष्टीं ॥ पदोपदीं आनंदकोटी ॥ अतिउल्हासे ॥१४॥

ऐसें नारदें केलें गमन ॥ मागे रावण अतिउद्दिग्र ॥ मग पाचरूनि चतुरानन ॥ पुसे त्यासी ॥१५॥

ह्मणे कौसल्या कोण कैसी ॥ आणि दशरथ कोणे वंशीं ॥ त्याची वस्ती कोणे देशीं ॥ तें मज सांग ॥१६॥

जन्मली नसता कौसल्या बाळा ॥ ना दशरथही उपजला ॥ कीं रामजन्म नाहीं जाहला ॥ तंव वदला नारद ॥१७॥

ऐकोनि नारदकथित वचन ॥ कौतुके हांसे चतुरानन ॥ ह्मणे नारदांचे भाष्यवचन ॥ लटिकें केवीं ॥१८॥

मग ब्रह्मा सांगे रावणासी ॥ की कौसल्या कन्या कोसलरायासी ॥ दशरथ तरी सूर्यवंशीं ॥ अजराजसुत ॥१९॥

तरी त्यांचे पाणिग्रहण ॥ आजपासूनि तिसरा दिन ॥ नेमिलें असे सुलग्न ॥ दशानना गा ॥२०॥

ऐसें ऐकोनि उत्तर ॥ रावणें प्रेरिले चपळ हेर ॥ ते घेवोनि आले समाचार ॥ कौसल्येचा ॥२१॥

हेर ह्मणती गा दशानना ॥ कौसल्या केवळ वयसें लहाना ॥ तरी विचारूनि अंतःकरणा ॥ कार्यसिद्धी सांगावी ॥२२॥

ऐसी रावणें ऐकतां गोष्टी ॥ कौसल्या लक्षिली क्षोभदृष्टीं ॥ मग घाडी घालेनि उठाउठी ॥ हरिली ते ॥२३॥

रावण पोटीं भयभीत ॥ कौसल्या न ठेवी लंकेंत ॥ ह्मणे जें चितिती माझा घात ॥ तेच विपरीत करितील कीं ॥२४॥

देव द्वेपिये मजसी ॥ माझा मृत्यु आवडे त्यांसी ॥ ते कौसल्यादशरथासी ॥ करितील भेटी ॥२५॥

ऐसा धाक रावणासी ॥ ह्माणोनि कौसल्या न ठेवी लंकेसी ॥ मग ते घालूनि पेटीसी ॥ समुद्रतटीं ठेवली ॥२६॥

दीप द्राक्षें अमृतफळें ॥ लाडू पक्कान्नें आणि केळें ॥ पात्रें भरोनि शीतळजळें ॥ पेटीमाजी ठेवलीं ॥२७॥

त्या पेटींत कौसल्येसी ॥ घालोनि धाडिली सिंधुपाशीं ॥ हेरें ठेवली मीनापाशीं ॥ तेणें दाढें घातली ॥२८॥

तो मीन क्रीडतां सागरीं ॥ तिमिंगिल येवोनि युद्ध करी ॥ तंव येरू ह्मणे युद्धसंचारी ॥ पेटी चूर्ण होईल ॥२९॥

ह्मणोनि तेणें उठाउठी ॥ पेटी ठेविली येके बेटीं ॥ मागुती परतला कडकडाटीं ॥ संग्रामासी ॥३०॥

इकडे दशरथ लग्नासि त्वराकरी ॥ पायवाटे मार्ग दुरी ॥ ह्मणोनि तारवीं बसोनि सागरीं ॥ जाणें सत्वर ॥३१॥

तेंहूनि जैसी द्वारका ॥ तेंवीं नगरी दूर देखा ॥ ह्माणोनि तारवीं बैसवोनि लोकां ॥ दोनदिवसां नेतसे ॥३२॥

असो दशरथें यापरी ॥ वर्‍हाड घालुनि नावेवरी ॥ वेगें निघाला सागरीं ॥ जावयासी ॥३३॥

फडकत पताका नावावरी ॥ निशाणीं त्राहाटिल्या भेरी ॥ वर्‍हाड चालिलेंसे गजरीं ॥ अति उल्हासे ॥३४॥

तंव रावणे पालती करोनि पुरी ॥ विमानबळें आला अंतराळीं ॥ दशरथ होता ज्या नावेवरी ॥ तेचि नाव फोडिली ॥३५॥

परि प्राप्त जें होणार बळी ॥ तें न चुके कदाकाळीं ॥ असो नवरा बुडवितां जळीं ॥ जाहलें अपूर्व ॥६६॥

दशरथ वुडतां तळवटीं ॥ रामनाम स्मरे वाक्पुटीं ॥ तंव सांपडली फुटकी पांटी ॥ नाम तारक ॥३७॥

राम येणार दशरथकुशी ॥ ह्मणोनि नाम आठवलें त्यासी ॥ बुडतां नव्हें कसाविती ॥ नामें तारिला तो ॥३८॥

आठवितां राम आकांती ॥ माजी होय सुखविश्रांती ॥ नाम तारक त्रिजगतीं ॥ होय साच ॥३९॥

सांपडली असतां फूटकी पांटी ॥ मग तो सिंधुजळचे लाटी ॥ जेथें कौसल्येची पेटी ॥ तेथें दशरथ प्रविष्टला ॥४०॥

तंव तो राव उठाउठी ॥ वेगीं चढला तये बेटीं ॥ तेथें दुजें न देखे दृष्टीं ॥ तेणें विस्मित जाहला ॥४१॥

रायें पेटी हातीं धरिली ॥ तंव कुलूप कडी निघालीं ॥ मग भीतरीं कौसल्या देखिली ॥ असे संचित ॥४२॥

रावों पुसें तूं सुंदरी कवण ॥ ऐकतां जाहली विस्मित पूर्ण ॥ ते ह्मणे तूं कवणाचा कवण ॥ येथें कैसा आलासी ॥४३॥

हा जळनिधी परम गहन ॥ माजी मच्छकच्छ दारूण ॥ ऐसें अगम्य हें स्थान ॥ असती कैसा आलासी ॥४४॥

येरु ह्मणे तूं गोरटी ॥ येथें कैशी प्राप्त पेटीं ॥ तुज कोणीं ठेविलें बेटीं ॥ तें सांग मज ॥४५॥

ऐसें रायें तये पुसिलें ॥ तें कौसल्येनें ऐकिलें ॥ मग सांगों आदरिलें ॥ पूर्वस्थितीसी ॥४६॥

ह्मणे मी कोसल्यरायाची कन्या ॥ बापें दशरथ वर नेमिला जाणा ॥ परि रावणें घालोनि पणा ॥ मज येथें आणीलें ॥४७॥

रावणासी दचक पोटी ॥ ह्मणोनि मज घातलें पेटीं ॥ घाडिलें समुद्रनेहटी ॥ तेणें येथें प्राप्त मी ॥४८॥

कीं न व्हावे दशरथलग्न ॥ ह्मणोनि हें केलें विघ्न ॥ आणि दशरथ करावया भग्न ॥ पाठविलें दळ ॥४९॥

ऐसी कौसल्या सांगतां गोष्टी ॥ बाष्प दाटलें नेत्रसंपुटीं ॥ ह्मणे मी अभागीण सृष्टीं ॥ नव्हे भेटी दशरथा ॥५०॥

जळोजळो तो रावण ॥ स्वप्नींहीं न करावें भाषण ॥ धरुनि दशरथाने ध्यान ॥ त्यजीन प्राण आपुला ॥५१॥

ऐसें ऐकोनियां वचन ॥ विस्मिअ जाहला नृपनंदन ॥ ह्मणे सागरींही चुकोनि मरण ॥ होणार न चुकेची ॥५२॥

मग राजा सांगे वृत्तांत ॥ रावणें माझा करितां घात ॥ रक्षिता जाहला रघुनाथ ॥ समुद्रामाजी ॥५३॥

तोचि मी या समुद्रांत ॥ येथें आलों गे दशरथ ॥ मी असें अजराजसुत ॥ नातु रघुचा ॥५४॥

ऐसें ऐकोनियां वचन ॥ नवरी जाहली सुखसंपन्न ॥ ह्मणे मज तृष्टला नारायण ॥ सुलग्न येकांतीं ॥५५॥

नाहीं कर्माची खटखट ॥ नासतां ममतेची कटकट ॥ नसतां लैकिक चावट ॥ लागलें लग्न ॥५६॥

मग त्या दोघांचा हरिख ॥ तोचि मधुपर्क ॥ बोल बोलती निःशंक ॥ तींचि मंगळ‍अष्टकें ॥५७॥

विकल्पाचीं झोडिलीं फळें ॥ संकल्पाची मूद वोवाळे ॥ स्वधर्माचा दीप उजळे ॥ ऐसा लग्नार्थ ॥५८॥

उदरा येईल रघुनाथ ॥ ह्मणोनि लाधलें अभिजित ॥ घटिका पाहे शाश्र्वत ॥ काळ सांगे सावधान ॥५९॥

आणि वो लक्ष मागें सांडे ॥ तोचिजाणावे पायघडे ॥ परमानंद वाडेंकोडें ॥ ऐसा लग्नार्थ ॥६०॥

वोळखी होतां सदट ॥ सुटोनि गेला अंतःपट ॥ ओंपुण्याह वाचन श्रेष्ठ ॥ मग बैसली वधुवरें ॥६१॥

लग्नभूमिका समुद्रतटीं ॥ बहुलें तेचि होय पेटी ॥ लग्न लागलें उठाउठी ॥ दृप्टादृप्टी होतांची ॥६२॥

ऐसा कौसल्यानें निजकांत ॥ सुलग्नी वरिला दशरथ ॥ आतां पुढीलकथेचा अर्थ ॥ अवधारीं राया ॥६३॥

मग कौसल्या दशरथ ॥ उभयतां निजकांत ॥ सुलग्नीं वरिला दशरथ ॥ आतां पुढीलकथेचा अर्थ ॥ अवधारीं राया ॥६३॥

मग कौसल्या दशरथ ॥ उभयतां बैसलीं पेटींत ॥ फळें पक्कान्नें भक्षित ॥ अति आनंदें ॥६४॥

तंव कौसल्या पुसे रायासी ॥ कीं आतां आपुली गती कैशी ॥ येरु सांगे तयेसी ॥ नाम आह्मां तारक ॥६५॥

श्रीवसिप्ठगुरूचें वचन ॥ कीं करितां नामस्करण ॥ तेणें भवभयाचें निर्दळण ॥ निश्र्वयें होय ॥६६॥

तरी प्रिये आपण आतां ॥ असणें सावधान येकाग्रता ॥ स्मरण करितां रघुनाथा ॥ भय नाहीं आह्मांसी ॥६७॥

भूमि उकलतां उघडे ॥ आकाशही तुटोनि पडे ॥ परि नाम स्मरे त्याचिये कडे ॥ कैंचे भय ॥६८॥

ऐकतां रामनामगोष्टी ॥ विघ्ने पळती बारावाटीं ॥ आतां भिऊंनको गोरटी ॥ नामानौका तारक ॥६९॥

उदरीं यावया रघुनाथ ॥ ह्मणोनि ऐसा भाव गमत ॥ कीं भाग्योदयाचें जाणवित ॥ चिन्ह जेवीं ॥७०॥

असो ऐशा करिता गोष्टी ॥ तिमिंगिले आला नेहटीं ॥ दोघांसहित घेवोनि पेटी ॥ जाहला निघता ॥७१॥

तंव येरीकडे लंकेंत ॥ ब्रह्मया पाचारूनि त्वरित ॥ तयासि रावण पुसत ॥ तें अवधारिजो ॥७२॥

ब्रह्मयातें पुसे रावण ॥ कीं कौसल्याविवाह समय कोण ॥ येरू ह्मणे अजि होतां माध्यान्ह ॥ लग्न लागलें ॥७३॥

ऐसी ऐकोनियां मात ॥ रावण खदखदां हांसत ॥ ह्मणे हा सत्यलोकनाथ ॥ वदे लटिकें ॥७४॥

मग बोले निश्र्वयें विधाता ॥ माझा वाक्या नाहीं असत्यता ॥ तूं जरी मानिसी लंकानाथा ॥ तरी कळलेंचि नाहीं ॥७५॥

तंव ह्मणे दशानन ॥ ब्रह्मया माझें ऐक वचन ॥ तुजसी मीं सत्य सांगेन ॥ विस्तारूनियां ॥७६॥

म्यां द्शरथाचा केला घात ॥ कौसल्या घातल्या समुद्रांत ॥ तरी लग्नीं कैसा दशरथ ॥ ह्मणोनि लटिकें ॥७७॥

ब्रह्मा बोले क्षोभकता ॥ ऐक वचन लंकानाथा ॥ तूं ह्मणसी मारिलें दशरथा ॥ हेंचि असत्य ॥७८॥

तरी जे मृत्युदेवाची सत्ता ॥ ते तुज आली लंकानाथा ॥ ह्मणोनियां बोलसी वृथा ॥ सत्य मज मानवलें ॥७९॥

ऐसी ऐकोनि ब्रह्मवचनें ॥ परम कोपिजे रावणें ॥ मग पेटी आणोनि पाहिलें तेणें ॥ तंव दोघें देखिलीं ॥८०॥

प्रथमचि निघतां दशरथ ॥ तंव दचकला लंकानाथ ॥ मग त्याचा करावया घात ॥ हातीं शस्त्र घेतलें ॥८१॥

ऐसा कोपला रावण ॥ तंव दशरथा आलें स्फुरण ॥ ह्मणे दशकंठाचें वीस नयन ॥ पाडीन करघातें ॥८२॥

ऐसा देखोनि दशरथ ॥ रावण युद्धा जाहला उदित ॥ परि मंदोदरी येवोनि तेथ ॥ सांगे रावणा ॥८३॥

तया नेवोनि येकांना ॥ बुद्धि सांगे तत्त्वतां ॥ कीं मारूंजातां दशरथा ॥ पावाल घात ॥८४॥

जैसा नृसिंह सक्रोधता ॥ स्तंभीं उद्भवला नेणतां ॥ तैसीच परी होईल आतां ॥ येणें प्रसंगें ॥८५॥

पेटींतूनि राव दशरथ ॥ जैसा निघाला अकस्मात ॥ तैसाचि जरी निघेल रघुनाथ ॥ तरी मृत्यु पावलकीं ॥८६॥

ऐसेंचि येथें होईल ॥ नारदवचन फळेल ॥ कीं याचि संधीस पोटीं उपजेल ॥ तो वधील रावणा ॥८७॥

तरी यांसि घावो घालितां ॥ दोघांमाजी अवतार होतां ॥ तो तुह्मां वधील सर्वथा ॥ रावण राया ॥८८॥

ऐसी ऐकतां मुख्य गोष्टी ॥ रावणा भय उपजलें पोटीं ॥ मग त्यांतें देखोनि द्दृष्टीं ॥ कंटाळला ॥८९॥

सती सांगे रावणासी ॥ कांहीं न चाले होणारासी ॥ तरी हीं दोघें अयोध्येसी ॥ धाडा वेगीं ॥९०॥

आणिक ह्मणे वचनासी ॥ न मारावें या दोघांसी ॥ हीं ठेवूं नये लंकेसी ॥ हीं ठेवूं नये लंकेसी ॥ अनर्थभूत ॥९१॥

आन करितां आपण ॥ यांसी नव्हे कदा मरण ॥ मग तें रावणा मानवलें वचन ॥ ह्मणोनि विमान आणाविले ॥९२॥

वेगीं आणुनि विमानासी ॥ माजी बैसवूनि दोघांसी ॥ रावणें धाडिलें अयोध्येसी ॥ भयभीतपणें ॥९३॥

तंव येरीकडे हाहाभूत ॥ अयोध्ये होतसे आकांत ॥ इतुक्यांत कौसल्यादशरथ ॥ आलीं विमानातुनी ॥९४॥

राजासि देखोनि नागरीं ॥ त्राहाटिल्या निशाणभरी ॥ गुढिया तोरणें घरोघरीं ॥ आनंद ऐसा ॥९५॥

जन्मेजयासि ह्मणे वैशंपायन ॥ ऐसें कौसल्यादशरथलग्न ॥ तें चरित्र जाहलें संपूर्ण ॥ येणे गुणें ॥९६॥

ह्मणोनि कौसल्या दशरथ ॥ विवाह जाहला समुद्रांत ॥ पुढें ऐकावें येकचिंत्त ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥९७॥

॥ इति श्रीकथाकल्पतरू ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ दशरथकौसल्यविवाहप्रकारू ॥ चतुर्दशोऽध्यायीं कथियेला ॥९८॥

॥ श्रीमज्जगदीश्र्वरार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ षष्ठस्तबके चतुर्दशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP