कथाकल्पतरू - स्तबक ६ - अध्याय १२

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

ऋषी ह्मणे अद्वैतबोधेंविण ॥ विषयसंगें होय बंधन ॥ जैसें भ्रांतिष्टा होय मरण ॥ निज शस्त्रेंची ॥१॥

कीं अन्न वाढिलें येके पंक्ती ॥ तें विटाळलें नानाजाती ॥ मागुती येकवट मिळतां गती ॥ कवण विटाळाची ॥२॥

तैसे हे जीवाचे विषय ॥ सर्वप्रकारीं ब्रह्मचि होय ॥ परि नेणती मूर्ख अज्ञानीज ॥ त्यजिती पैं गा ॥३॥

जे वस्तु अनात्म असे ॥ ते त्यजावी महापुरुषें ॥ मग तेथें सहज प्रकशे ॥ परमात्मा तो ॥४॥

जैसें उदकरूपी लवण ॥ तृषिता सेवितां होय गर्हण ॥ परि तेंचि रुचिकर भोजन ॥ करी जिव्हेतें ॥५॥

जैसें महारोगियासी ॥ मिष्टान्न देखोनि वीट ये त्यासी ॥ कीं बहु सेवितां रोग्यासी ॥ कृपथ्य होय ॥६॥

असो परमात्मा तो नित्य ॥ आणि प्रपंच तो अनित्य ॥ हा जाणिजेल गा पंथ ॥ भक्तिज्ञानवैराग्यें ॥७॥

तरी करूनि अनित्याचा त्याग ॥ धरावा साधूचा संग ॥ आणि रजतमांचा संसर्ग ॥ घडों नेदावा ॥८॥

ऐसियापरी गा भारता ॥ असे खल्विदं ब्रह्मकथा ॥ ते सांगीतली स्वभावता ॥ तुजलागीं पैं ॥९॥

तेंचि ब्रह्म वोळखणे ॥ जें जीवा असे ऐहिकपणें ॥ तत्पद त्वंपद लक्षणें ॥ शबलपूर्वक ॥१०॥

पूर्वचैतन्यें तत्पद ॥ आणि प्रत्यकचैतन्यें त्वंमद ॥ माजी जाणावें शबलशब्द्र ॥ पूर्वचैतन्य तें ॥११॥

तंव रावो ह्मणे गा ऋषी ॥ कीं ऐक्य असतां जीवेश्र्वरासी ॥ साम्य न होय तेजोराशी ॥ तरी हें केविं घडे ॥१२॥

परमात्मा तो सर्व जाणता ॥ आणि मी तरी अल्पज्ञता ॥ ह्मणोनि तत्पदार्थ ऐक्यता ॥ जाणिजे कैसी ॥१३॥

तो सृष्ट्यादि कार्यें करी ॥ मजसी सृजी निरंतरी ॥ तो नित्य मी येरझारीं ॥ अटत असें ॥१४॥

तो व्यापक मी कृमिमात्र ॥ मी पराधीन तो स्वतंत्र ॥ तो स्वामी मी किंकर ॥ सेवकजन ॥१५॥

तरी ऐसें विचारितां ॥ बहु अंतर गा ऋषिसुता ॥ आणि सर्वश्र्वरासी ऐक्यता ॥ केवीं मज ॥१६॥

मग ह्मणे तो ऋषिसुत ॥ राया तूं बोलिलासि वैष्णवीमत ॥ जें जीवब्रह्मासि बहुत ॥ अंतर असे ॥१७॥

जैसें स्वामेचे सिंहासनीं ॥ केवीं बैसिजे सेवकजनीं ॥ नातरी अपत्यें प्रसवें जननी ॥ वांझ केवीं ॥१८॥

परमात्मा कर्मफळादायक ॥ त्याचा भोक्ता जीव येक ॥ परि परब्रह्मासिऐक्य ॥ घडे राया ॥१९॥

तरी उपाधि भेदासी ॥ विश्र्वेश्र्वराचे अभिमानवेशीं ॥ कल्पित असे सत्पदासी ॥ अभेदपणें ॥२०॥

जैसे सुवर्ण लोहाचे आरसे ॥ उमटती येकामुखाचे द्दय ठसे ॥ अविद्या माया संगें तैसें ॥ ब्रह्म जीवनैश्र्वरें ॥२१॥

मी उपाधी परमात्मा ॥ तो अविद्योपाधी जीवात्मा ॥ तरी जीवेश्र्वराचे धर्मा ॥ ते उपाधिक ॥२२॥

अविद्याकल्पिता जीवाचे धर्म ॥ ते मिथ्या ऐसें जाण वर्म ॥ परि जीवाचें निजधाम ॥ परब्रह्म गा ॥२३॥

तूं अनुवादसी गुणांसी ॥ ते साजती मायारूपासी ॥ मग तेचि होय निर्गुणासी ॥ परमार्थमागें ॥२४॥

अविद्येचेनि अनिर्वचनें ॥ आणि मायेचे मिथ्यापणें ॥ या दोहींची करितां मथनें ॥ येक होय ॥२५॥

ईश्र्वरी असे ईश्र्वरपण ॥ जीवीं अविद्यैकजीवपण ॥ दोन्ही निरसितां निर्गुण ॥ येकचि असे ॥२६॥

आणि त्रिविधैकलक्षण ॥ तें भेदाचें करी निरसन ॥ आतां तें ऐक पां बचन ॥ भारता तूं ॥२७॥

जहल्लक्षण तें पहिलें ॥ दुजें अजहल्लक्षण केलें ॥ जहदजहल्लक्षण भलें ॥ ते तिसरें राया ।२८॥

प्रथमलक्षण तो त्याग ॥ दुसरें लक्षण तो अत्याग ॥ उभयमिश्रित त्यागात्याग ॥ बोलिला असे ॥२९॥

तरी वाच्यांश सांडीं जीवाचा ॥ जो मार्ग सबळंअंशाचा ॥ लक्षणांश घ्यावा ईश्र्वराचा ॥ शुद्ध असे जो ॥३०॥

जैशी तांदूळाची त्वचा फळकटी ॥ कीं खोबरें घेइजे त्यजोनी कंवटी ॥ तैसी उपाधी निरसूनि घ्यावी मठी ॥ चैतन्यासी ॥३१॥

जैसा गजावरी नरु ॥ तोचि तेजियावरी जाहलास्वारु ॥ मग तत्वें करिता विचारु ॥ येकचि तो ॥३२॥

मग तीर्थी तोचि भेटला ॥ कीं श्रृंगारयुक्त देखिला ॥ परि विचारिता येकला ॥ तोचि तो नर ॥३३॥

तैसें दोहींस्थळींचें दृश्यकळ ॥ त्यजूनि पाहतां दिसे निर्मळ ॥ कीं उपाधि निरसितां केवळ ॥ येकनरु जैसा ॥३४॥

तैसीच माया विश्र्वेश्र्वराची ॥ सर्वज्ञान काय तैसेंची ॥ हे निरसितां उरे येकची ॥ केवळब्रह्म ॥३५॥

जीवाचें जें अज्ञान ॥ तें कार्य चेतवी प्रतिज्ञान ॥ ह्मणोनि दुःखादि कर्म जाण ॥ निरसावें आधीं ॥३६॥

मग तेथें उरे जीवचैतन्य ॥ तेंही होय प्रसंगप्रतिभान ॥ ऐसी जो पाहे चैतन्यखुण ॥ ईश्र्वराची ॥३७॥

तया प्रत्यकचैतन्यासी ॥ ऐक्य होतां पूर्णचैतन्यासी ॥ आपुल्या निरसी सुखदुःख परदेशासी ॥ उरे तें ब्रह्म ॥३८॥

ऐसा परमात्मा असोनि वेगळा ॥ तोचि जीवात्मा जाहला ॥ तेथें दुजेपणाचा बोला ॥ उरला नाहीं ॥३९॥

जैसें घटमठाचें गगन ॥ अभाव भावितां निधान ॥ दोहींचे होय ऐक्यपण ॥ महदाकाश ॥४०॥

तैसी अविद्यामाया निरसितां ॥ होय जीवश्र्वर‍ऐक्यता ॥ ते महावाक्याची कथा ॥ जहदजहल्लक्षणीं ॥४१॥

तेथें आटल्या कार्य जाण ॥ आणि माया ते कारण ॥ यांचें मिथ्यात्वें ऐक्यपण ॥ जीवेश्र्वरासी ॥४२॥

जीवात्मा कार्योपाधी ॥ परमात्मा कारणनिधी ॥ मग ते निरसितां उपाधी ॥ ऐक्य जैसें ॥४३॥

ईश्र्वरब्रह्मेंसीं तत्पदें ॥ जीवब्रह्मेंसी त्वंपदें ॥ दोघां ऐक्यें होय असिपदें ॥ जीवेश्र्वरासी ॥४४॥

ऐसी हे गा भारता ॥ जीवेश्र्वरांची योग्यता तरी जीवब्रह्मासी ऐक्यता ॥ ऐसियापरी ॥४५॥

तंव रावो ह्मणे गा ऋषिसुता ॥ सर्वाआत्म येक ह्मणतां ॥ तरी येकाची सुखदुःखता ॥ दुजा नेणें ॥४६॥

आणिक देहींचा वृत्तांत ॥ तो मज न कळे समस्त ॥ कोण असे चेष्टवीत ॥ इंद्रयासी ॥४७॥

मग बोलता होय ऋषी ॥ कीं उपाधिगुणें आत्मायासी ॥ जेवीं असे सर्वघटांसी ॥ येकचि गगन ॥४८॥

नातरी एकावृक्षावीं फळे ॥ अतिपक्कें महारसाळें ॥ तींमधुरपणें तरी सकळें ॥ येक जैसीं ॥४९॥

अथवा उदकीं रविमंडळे ॥ प्रतिबिंबें दिसे वेगळे ॥ जीवनयोगें होतां सांचळे ॥ परि येकचि तें ॥५०॥

जेथेंजेथें उदकगुण ॥ तेथेंतेथें बिंब‍उपाधि जाण ॥ परि मुख्यबिंबासि चळणवळण ॥ आथीचना ॥५१॥

तैसा परमात्मा येकला ॥ तो मायमयें श्रृंगारला ॥ मग अनंतदेहीं भासला ॥ जीवभावें ॥५२॥

तरी सुखदुःख कर्मयोग जे ॥ ते लिंगदेहेंचि भोगिजे ॥ लिंगोपाधीवांचोनी सहजें ॥ तो धर्म नाहीं ॥५३॥

लिंगदेहाचीं कर्में समग्रें ॥ ती भोगावीं स्थूळशरीरें ॥ मग त्यागुणें कर्मशरीरें ॥ भोगी जीव ॥५४॥

यापरी सर्व जीवांसी ॥ कर्मानुसार भोग ज्याचांत्यासी ॥ हा उपाधिभेदपणें सर्वांसी ॥ येकचि आत्मा ॥५५॥

जरी ह्मणसी आपुल्यादेहीचां ॥ वृतांत नेणे आणिका देहींचा ॥ हा अंकुर जाण विषयांचा ॥ चित्तासि असे ॥५६॥

हें नाहीं त्या आत्मयासी ॥ कीं बुद्धि लिंगदेहासी ॥ अभिमानि या स्थूळदेहासी ॥ हे विकार ॥५७॥

देही परम अभिमानी ॥ तो चित्तासि वर्तें अधिष्ठानी ॥ या देहद्दैताची करणी ॥ जाणसी तूं ॥५८॥

जैसें जागृतदशेचें ज्ञान ॥ तें दिसे प्रकटलिया स्वप्न ॥ परि दोन्ही जाती हरपोन ॥ शुद्धमाजी ॥५९॥

आणिक दोहींचें जाणणें ॥ जरी पाहसी चित्रगुणें ॥ तरी ज्ञाने सर्वपणें ॥ निंदिलासी ॥६०॥

आतां अतीत अनागत वर्तमान ॥ हें जया होय प्रपंचज्ञान ॥ तरी योगबळें होय तारण ॥ प्राणियासी ॥६१॥

जया इंद्रियसापेक्षा ज्ञान ॥ त्यासी ज्ञान कीं अज्ञान ॥ मग भ्रांतिरूपाचें वचन ॥ साजे तया ॥६२॥

तैसें नव्हे आत्म्याचें दृष्टपण ॥ तेथें नावडे मनचक्षुरादिघ्राण ॥ त्यासी जाणीव असे चैतन्य ॥ संघानमत्रें ॥६३॥

आत्मयासी कर्म देखणें नचलेची ॥ न देखणें अन्यथा देखणें तैसेंची ॥ हे त्रिविघजाती चित्तधर्माची ॥ देखता आत्मा ॥६४॥

जैसें लोहचुंबकाचें संधान ॥ अडकलें होय टाकुन ॥ परि स्वयें चेष्ट वा अचेष्टपण ॥ नाहीं चुंबकीं ॥६५॥

कीं सूर्य आपुले नेत्रांकरवीं ॥ निजप्रकाशें प्रकाशवी ॥ तैसा आत्मा इंद्रियांतें चेष्टवी ॥ अहंताममतारहित ॥६६॥

आत्मा चेष्टपणें चेष्टविता ॥ ते आत्माची जाण सत्ता ॥ परि इंद्रियें स्वतंत्र नव्हती सर्वथा ॥ निजव्यापारें ॥६७॥

तरी कार्य आणि कारण ॥ तें हृदयीं प्रकृति जाणे ॥ त्या तुज सुखदुःख भोगणें ॥ प्रकृतियोगें ॥६८॥

तरी सर्व उपाधिवेगळ ॥ पूर्णचैतन्य केवळ ॥ सुखदुःखभोगसकळ ॥ ज्ञानरूप निज जाणें ॥६९॥

जंववरी दृश्याचं स्फुरण ॥ तोंवरी लटिकेंचि दृष्टपण ॥ तें निरसलिया भूषण ॥ तूंचि आत्मा ॥७०॥

तरी तो दर्शनादि रसनें ॥ नकळे तुझे दृष्टपणें ॥ तीं निरसलिया भूषणें ॥ तूंचि येक ॥७१॥

प्रपंचीं दिसे विस्तारला ॥ परि महाप्रस्थळीं हरपला ॥ तैसा निजरूपावेगळा ॥ मिळोनियां ॥७२॥

ऐसी हे गा भूपती ॥ तुवां पुसिली ब्रह्माची गती ॥ तरी हे बोलिला वेदश्रुती ॥ भारता जाण ॥७३॥

हे ब्रह्मींची वदंती ॥ तुज निवेदिली गा भूपती ॥ तंव रावो करी विनंती ॥ कर जोडुनी ॥७४॥

ह्मणे प्रळयो पंचप्रकारी ॥ म्यां ऐकिले परस्परीं ॥ तरी तें सकळ दवडीं दूरी ॥ अज्ञान माझें ॥७५॥

मग मुनि ह्मणे गा राया ॥ तुवां पुसिलें पंचप्रळयां ॥ तरी ऐक चित्त देऊनियां ॥ वचन माझें ॥७६॥

हे प्रळयांची मूळवार्ता ॥ प्रथमस्तबकीं कथिली कथा ॥ मागुती घेतलें तुझिया चित्ता ॥ तरी ऐक ॥७७॥

दोनी प्रळय असती पिंडी ॥ तैसेचि दोनी ब्रह्माडीं ॥ मग पांचव्या ब्रह्माडाची गोडी ॥ ते मोक्षदशा ॥७८॥

पिंडी प्रळय असती दोनी ॥ जो सुषुप्तिकाळ होय नित्यानी ॥ हे द्दय हेय ह्मणवोनी ॥ तो प्रिय येक ॥७९॥

तो प्रळय नाम दैनंदिन ॥ महाप्रळय तें स्थूळा मरण ॥ ऐसें दोहोंप्रळ्याचें ज्ञान ॥ पिंडामाजी ॥८०॥

आतां ब्रह्माडींचे दोनी प्रळय ॥ चतुर्युग सहस्त्रवेळ जाय ॥ तो विरिंचीचा येक दिन होय ॥ प्रळयो प्रथम ॥८१॥

जोब्रह्मयाचा दिनातूं ॥ तो दिनदिनैक प्रळयानिमित्तु ॥ संहारती सकळ जंतु ॥ त्रिभुवनींचे ॥८२॥

तेथें बारा रवी तपती ॥ आणि महामेघ वर्षती ॥ मग त्या प्रळयोदकीं बुडती ॥ तिन्ही लोक ॥८३॥

तैं स्थूळदेह जाईल ॥ परि लिंग ज्ञानपणें उरेल ॥ मग निद्रिस्थापरि संहरेल ॥ ब्रह्मा दिनांतीं ॥८४॥

तैं जीव लीन होती कारणशरीरीं ॥ स्वकर्माचिये समोग्रीं ॥ जैसी पुरुषाची छाया दूरी ॥ करील कोण ॥८५॥

भारता मग ते प्रळयकळीं ॥ ब्रह्मी माया मांदुसे गाळी ॥ माजी जीवरत्‍नें सामावली ॥ चौभूतग्रामींची ॥८६॥

ऐसा सहस्त्रयुगें वरी ॥ ब्रह्मा ध्यानस्थ रात्रीमाझारी ॥ मग दिवस उगवल्या समग्रीं ॥ सृजी ब्रह्मा ॥८७॥

मागुता खेळ मांडिला ॥ जैसा दिनेशु उगवला ॥ तैसा प्रळयोदकाचा केला ॥ ग्रास ब्रह्में ॥ ८८॥

मागुता खेळ मांडिला ॥ चहूंभूतग्रामीं उभाविला ॥ परि कर्मानुसार सृजिला ॥ जीव जैसा तैसा ॥८९॥

ऐसी दुजी प्रळयस्थिती ॥ तेथें ब्रह्मांडासहित सत्कारती ॥ त्रिगुणांसहित नासती ॥ ब्रह्मादिक ॥९०॥

शतवर्षे होय अवर्षण ॥ तेथें ब्रह्मसृष्टी कैंचे प्राण ॥ तपती महादारुण ॥ द्वादशादित्य ॥९१॥

मागुती शतवर्षें वरी ॥ मेघ वर्षती मुसळधारीं ॥ तेथें बुडे उदकाभीतरीं ॥ त्रिभुवन हें ॥९२॥

जें ब्रह्मांड होतें तें जळालें ॥ अखिलजीवनीं विरालें ॥ भूतजांत संहारिलें ॥ पृथ्वीसहित ॥९३॥

मेघ विरतां तेज प्रकटलें ॥ तेणें प्रळयोदयक ग्रासिलें ॥ मग तें तेज मावळलें ॥ वायुस्वरूपीं ॥९४॥

तो वायु गिळिला महदाकाशें ॥ तें अहंता तमोरूपीं असे ॥ तन्मात्रांसहित गिळिलें राजसें ॥ तामसासी ॥९५॥

मग राजसा गिळिलें सत्वें ॥ तें राजसाचें कार्य सत्वें ॥ तें सत्व गिळिलें महसत्वें ॥ शक्तिशक्तांसहित ॥९६॥

ऐसें देवताचक्र निमालें ॥ आणि सकळ संहारलें ॥ यापरी महत्तत्वातें ग्रासिलें ॥ मायादेवीनें ॥९७॥

तरी गुणक्षोभक माया ॥ महाद्दयासिं गेली विलया ॥ तेही पावली नाशा राया ॥ गुणस्वामिणी ॥९८॥

मग ज्ञानक्रिये शक्तिचक्र ॥ मूळमायेसरिसें समग्र ॥ जैसे मूर्ताग्नीचे अंकूर ॥ उदकामाजी ॥९९॥

मग तेथें स्वरूप सगूण ॥ नाठणी हें ऐसें वचन ॥ तेव्हा होय प्रकृतिवांचून ॥ निर्गुन पैं ॥१००॥

मग पंचभूतग्रामीचें जीव ॥ ते आपुल्या परिवारें सर्व ॥ तिहीं घेतलें वस्तिठाव ॥ सगुणोदरी ॥१॥

मग तें विविक्त कर्म केलें ॥ तेतुलें ज्ञान मुसाविलें ॥ परि आत्मज्ञानेंवीण मुकलें ॥ सूटिके माजी ॥२॥

नातरी वटबीजविचारें ॥ प्रपंच सगूणरूपीं उभारे ॥ तें स्वरूप विरालिया उरे ॥ केवळ ब्रह्म ॥३॥

जैसें मातीचें डिखळ ॥ समुद्रीं मिळालिया सकळ ॥ कीं कर्पूरा होतसे विरघळ ॥ अग्निस्पर्शीं ॥४॥

ऐसे हे प्रळय चारी जाण ॥ पिंडब्रह्मांडींचें कथन ॥ आतां पांचवियासी संहरण ॥ विवेकाचें ॥५॥

जैसा रज्जु कां सर्प भासे ॥ परि तो विवेकें जैसा नासे ॥ तैसी स्वरूपीं भ्रांती ॥ उठली असे ॥ ते नासे विवेकें ॥६॥

हे मायामयादि पृथ्वी ॥ प्रपंचें वेष्टीली आघवी ॥ त्या भ्रांतितमासि संहारवीं ॥ विवेकदीपें ॥७॥

हा प्रपंच जो उठिला ॥ तो निजाकारें आकारला ॥ मृगजळपुर वृथ जाहला ॥ विवेकं जैसा ॥८॥

कीं येका गोधूमाचीं पक्कान्नें ॥ पुत्तलिकादि नानागुणें तें बिवेकें केलिया पाहणें ॥ गोधूमची ॥९॥

तैसें ब्रह्मीं जग आकारलें ॥ विवर्तयोगें विस्तारलें ॥ तें मिथ्यास्वरूप जाहलें ॥ विवेकें पैं ॥११०॥

सकळ असता सर्व निमालें ॥ प्रपंचबंधन संहारिलें ॥ मग केवळ ब्रह्माचि उरलें ॥ सत्तामात्र ॥११॥

ऐसा हा प्रळय आत्यतिक ॥ परि विपरीत असे आणिक ॥ तेथें नासे आणिक येक ॥ स्थूळदेह ॥१२॥

भवदायक अज्ञान उरे ॥ आणि न निमती लिंगशरीरें ॥ ह्मणोनि शुभाशुभ कर्में समग्रें ॥ न जळती पैं ॥१३॥

जैसी भ्रमणचक्राची दोरी ॥ तैसें जीवासी कर्म आवरी ॥ मग चौर्‍यायशींच्या येरझारीं ॥ भोगवी भव ॥१४॥

जीवासि अविद्या आशा धारण ॥ तें होय संसारासि कारण ॥ गुणचित्तयोगें जाण ॥ नानायोगी भोगी ॥१५॥

कर्मद्वारें त्रिगुणादिक ॥ गुणद्वारें चित्त येक ॥ त्या चित्तासारिखी वर्तणुक ॥ इंद्रियांसी ॥१६॥

जैं सत्वरजतम चित्तीं उठी ॥ तैं इंद्रियांची उघडे पेटी ॥ व्यापारें जन्ममरणाची साटी ॥ चुके केवीं ॥१७॥

परि तो सत्वगुण येक ॥ भोगवी कर्मसुखादिक ॥ तमोगुणें भोगवी नरक ॥ रजोगुणें मध्यमु ॥१८॥

ऐसी हे महामहत्वीं दशा ॥ जीवासि पाडिलासे फांसा ॥ परि स्वरूपसुखभरंवसा ॥ नाहीं जीवासी ॥१९॥

जेवीं पुरुष जीर्णवस्त्रें सांडी ॥ नवीं पांघुरे घडिघडी ॥ तैसी स्थूळदेहाची चवडी ॥ भोगी देही ॥१२०॥

असो ऐसा हा प्रळय भला ॥ श्रीकृष्णें पार्थासि कथिला ॥ गीताउपदेश सांगीतला ॥ भीष्मपर्वीं ॥२१॥

तें स्वरूप साधावया सांग ॥ असे तुयां उन्मनीमागें ॥ शुद्धसत्वें घडे प्रसंग ॥ स्वरूपभेटीचा ॥२२॥

तंव रावो करी विनंती ॥ कीं जागृती तुर्या स्वप्न सुषुप्ती ॥ आणि ते पांचवी गतावृत्ती ॥ बोलिली असे ॥२३॥

यांमाजीला अवस्था तुर्या ॥ तेचि उन्मनी ह्मणतां ऋषिराया ॥ आणि स्वरूपरूप साधावया ॥ कैसा मार्ग ॥२४॥

मग ऋषि बोले वचन ॥ जें स्वरूपाचें अनुसंधान ॥ तेंचि देहीं महाकरण ॥ तेथें वर्तें तुर्या ॥२५॥

तये तुर्येची वर्तणुक ॥ जेणें तरले जनकादिक ॥ तये स्वरूपीं सुखाविण अधिक ॥ बोलों न ये ॥२६॥

तये तुर्येचे पूर्ण ज्ञान ॥ राया न कळे साक्षीविण ॥ ह्मणोनि ऐक पां लक्षण ॥ स्थूळदेहाचें ॥२७॥

तेथें स्थूळभोग ना सुषुप्ती ॥ कंठ नेत्र हृदयरहिती ॥ अज्ञान आणि ज्ञानरहिती ॥ अद्दयमेळें ॥२८॥

नाहीं स्थूळ ना लिंगदेह ॥ गुणातति निर्विकार विदेह ॥ संकल्पविकल्परहित बाधेय ॥ केवळ ब्रह्म मी ॥२९॥

भारता यापरी स्वरूपातें ॥ जो स्वयें जाणे निरुतें ॥ तरीच तुर्याअवस्था त्यातें ॥ प्राप्त होय ॥१३०॥

जें तुर्येचें पक्कपण ॥ तेंचि उन्मनीस्वरुप जाण ॥ जैसें निंबोळीसि ये माधुर्यपण ॥ पक्कदशेसी ॥३१॥

कां साखर उदकीं विरे ॥ परी मधुरता शेष उरे ॥ नातरी कर्पूर उदकीं वावरे ॥ परि उरे वास ॥३२॥

तैसी ते तुर्या अवस्था ॥ स्वरूपामजी मिरवतां ॥ मग ते होय गा सर्वथा ॥ उन्मनी पैं ॥३३॥

ते तुर्या आणि शरीरमाया ॥ तेथें प्रत्यगात्मा अभिमानिया ॥ हे तिघे अर्धमात्र्फ़ा तयां ॥ प्रणवाची पैं ॥३४॥

तयां ब्रह्मरघ्रीं असे स्थान ॥ आनंद आभास ॥ भोगभिमानिया ॥ हे तिघे अर्धमात्रा तयां ॥ प्रणवाची पैं ॥३५॥

ऐसिया सर्वा अवस्था ॥ तोचि प्रणवाचा भाग चौथा ॥ जो नादात्मक निर्गुण सर्वथा ॥ स्वरुप पैं ॥३६॥

तंव रावो विनवी वचन ॥ कीं प्रणवाचा चौथा चरण ॥ त्याचें कैसेनि होय श्रवण ॥ तें सांगा मज ॥३७॥

ऋषी ह्मणे गा भारता ॥ गुणसाम्यें माया नसतां ॥ तुर्या आणि सर्वज्ञता ॥ तेथें कैची ॥३८॥

या द्दयावस्थांचेनि गुणें ॥ येक ब्रह्म अभिमानपणें ॥ परमात्मा नामें येणें ॥ दोन्हीं होती ॥३९॥

जेथें न भोसे महामाया ॥ तेथें कैंची सर्वज्ञता तुर्या ॥ मग परमात्मा प्रत्यगात्मया ॥ कैंचा अभिमान ॥१४०॥

ऐसा तेथींचा विचार ॥ ह्मणोनि तयां स्थान ब्रह्मरंघ्र ॥ आणि आनंदाभास भोगविस्तार ॥ सर्वशुद्धत्व ॥४१॥

हाचि प्रणवाचा चतुर्थचरण ॥ ऐसें बोलती योगीजन ॥ कीं जो परमात्मा सगुण ॥ तो प्रणवपाद ॥४२॥

तेथें वर्णाचा नाहीं विचार ॥ ध्वनिमात्रें होय व्यवहार ॥ ह्मणोनि अर्धमात्रेचा विस्तार ॥ साजे प्रणवासी ॥४३॥

मुनि ह्मणे गा नृपनाथा ॥ तुवां पुसिली प्रणवकथा ॥ ते पूर्ण जाहली गा आतां ॥ पुढें देई चित्त ॥४४॥

ब्रह्मारंघ्री नादासि विश्रांति होय ॥ तेथें मायेचें अहेव देखतां नये ॥ केवळ ज्ञान ब्रह्मरंघ्र आहे ॥ सत्तामात्र ॥४५॥

तें करणेंवीण समस्त ॥ आणिक नाहीं कार्यजात ॥ ह्मणोनि परब्रह्मीं नाहीं भिन्नत्व ॥ प्रपंच हा ॥४६॥

परि ब्रह्मासत्तेवीण ॥ वृद्धि न पावे प्रपंचकारण ॥ तेणें गुणें विस्तारण ॥ सूक्ष्मप्रपंचाचें ॥४७॥

सुक्ष्मप्रपंचाचे आंगें ॥ स्थूळप्रपंच वर्तों लागे ॥ ह्मणोनि सत्य होऊं लागे ॥ कार्यचि कारण ॥४८॥

जन्म मरण आणि जरा ॥ हीं असती स्थुळशरीरा ॥ परि लिंगदेहाचा गाभारा ॥ न भंगे काहीं ॥४९॥

तें लिंगदेह अंगुष्ठपर्व प्रमाण ॥ न भंगे आत्मज्ञानेंवीण ॥ परि स्थूळदेहासि कवण ॥ साधूं शके ॥१५०॥

स्थूळदेहाचें सार्थक कीजे ॥ आत्मज्ञान जाणिजे ॥ राया ते गुरुमुखें लाहिजे ॥ विश्र्वरूपभेटी ॥५१॥

तये ज्योतीची आंत्रदृष्टी ॥ मग लिंगविषयां पडे फुटी ॥ जैसें नारिकेळ सुटे देंटीं ॥ जाहलेपणें ॥५२॥

कीं उगवतां दिनमणी ॥ तेचि तमासी होय पाठवणी ॥ तैसें नासे आत्मज्ञानीं ॥ लिंगदेह हें ॥५३॥

तयाचा जाहलिया नाशु मग कोठें मिळे अंशु ॥ परि कर्मलोभाचा लेशु ॥ लिंगदेहातें ॥५४॥

ह्मणोनि धरावा ज्ञानमार्ग ॥ तोडीं ग्रंथी देहलिंग ॥ तेणें ब्रह्मरंघ्रीं नलगे उद्देग ॥ मुक्तीचा पैं ॥५५॥

तरी ऐसी हे गा राया ॥ तुवां पुसिली अवस्था तुर्या ॥ ते स्वरुपें देहीं भेटावया ॥ उन्मनी हे ॥५६॥

तेथें नलगे सांगणे ऐकणे ॥ स्वयेंचि स्वरूपसुख भोगणें ॥ आणि नेत्रेंवीण कैसें देखणें ॥ हें प्रत्ययावीण न वाटे सत्य ॥५७॥

ऋषि ह्मणे गा नृपनंदना ॥ आरसा केवीं पाहिजें कंकणा ॥ ने त्रियासी कीजे अंजना ॥ काय काज ॥५८॥

मागुती ह्मणे गा भारता ॥ ऐकें योगाअभ्यासवार्ता ॥ मार्कंडेयपुराणींच्या अनुमता ॥ देई चित्त ॥५९॥

तरी बैसोनि पद्मासनी ॥ नासाग्रदॄष्टी लाउनी ॥ एकाग्र करोनि चित्त उन्मनी ॥ लाविजे पैं गा ॥१६०॥

इडेपिंगळेचे पवन ॥ ते धरीं पां आवरुन ॥ आदिमूळासि आपण ॥ तैसेचि पैं गा ॥६१॥

मग तो रुधेंल वारा ॥ जाईल सूक्ष्मतनूचिया घरा ॥ तंव तेणें भरती षट्चक्रां ॥ आपेंआप ॥६२॥

या नंतरें तेथील सर्पिण ॥ उठेल ऊर्ध्वमुख होऊन ॥ परि भ्रमण पावेल रांधवण ॥ वाटे होय ॥६३॥

तेथें जप बाहात्तरीस ॥ राया वर्षती बहुवस ॥ तेणें स्वर्ग येकवीस ॥ भिजतील पैं गा ॥६४॥

मग तेथें पवनविस्तारा ॥ बुडती पन्नासही मात्रा ॥ आणि अनिल अग्निचक्रा ॥ चाले वरी ॥६५॥

मग त्या चक्राच्या उपकंठीं ॥ अनुहातसारणीच्या राहटीं ॥ तेथें हानपार जगजेठी ॥ ईश्र्वरातें ॥६६॥

मग तेथें ध्यान ना करणी ॥ नाहीं चंद्र ना दिनमणी ॥ तारा तमादिकांची करणी ॥ आथीचना ॥६७॥

तेथें नांदे ज्योतिरत्‍न ॥ नेत्री न्याहाळी नयनेंवीण ॥ होते अनुहातगर्जन ॥ ध्यनिमात्र पैं ॥६८॥

शंख भैरी काहळा ॥ वीणे आणिक मांदळां ॥ ऐसी वाजंत्रे वाजती निश्र्वळा ॥ ध्वनिअंगेंसी ॥६९॥

तेथें ज्योती असे सहज ॥ जिये पोटीं सूर्यापरिस तेज ॥ ह्मणोनि दिनरात्रीचें बीज ॥ चोजवेना ॥१७०॥

होत अमृताचें पान ॥ कामधेनूचें क्षीरभोजन ॥ तेथें बैसलासे आपण ॥ महासिद्ध ॥७१॥

तो भ्रमरगुंफे माझारी ॥ असे सुमनाचे शेजेवरी ॥ आदिअवसानाचे अंतरीं ॥ व्यापकू जो ॥७२॥

तेणें देखिजे आदिमूर्ती ॥ जे तरी त्रिभूवनीची ज्योती ॥ मग तेथें होय निर्गती ॥ लिंगदेहाची ॥७३॥

जैसे रवीचे रश्मि नयनीं ॥ प्रमाणें भासती भुवनीं ॥ असोनियां लोपती रमणी ॥ अभावपणें ॥७४॥

तैसें पाहतां चर्मदृष्टीं ॥ वाउगीं दिसे चक्षुपेटी ॥ गुरुमुखें देहकोटी ॥ द्यावी पै गा ॥७५॥

लाऊनि दीप ज्ञानाचा ॥ तो एकांत शुद्ध ज्योतीचा ॥ तोचि ब्रह्मा असे श्रोतीचा ॥ शब्दापरता ॥७६॥

तें देखिलिया निधान ॥ लिंगविषयां पडे खान ॥ हा महामार्ग असे जाण ॥ पिपीलिकेचा ॥७७॥

आणिक येक मार्ग भला ॥ जे पक्षी उडे अंतराळा ॥ तो कर्म सांडोनियां फळा ॥ घाली मुख ॥७८॥

आणिक जो येक मार्ग ॥ तो प्लवंगेम उडे फळासि चांग ॥ मग पावे फळलाग ॥ पूर्वभाग्यें ॥७९॥

आणिक येक वृक्षातळीं ॥ लाऊनि दृष्टी अंतराळीं ॥ योगी बैसे प्राप्तकाळीं ॥ आत्मविद ॥१८०॥

ऐसे हे चौघे साधक ॥ परि फळ पावे तो अधिक ॥ तेथें गुरु शिष्य मूढ पढिक ॥ आथीच ना ॥८१॥

ह्मणोनि लावीं मुद्रा खेचरी ॥ मग तूं न्याहाळीं शुन्यांतरीं ॥ मग तें सुमनशेजेवरी ॥ देखसी रूप ॥८२॥

राया नासिकाचे शेवटीं ॥ अंतरीं ॥ पाहें धूर्जटी ॥ मग देखिलियावरी मिठी ॥ होवोनि ठाके ॥८३॥

तेथें आणिक न कळे विचार ॥ कापेल कर्माचा मूळदोर ॥ तेणें वैराग्येंरणीं शूर ॥ होशील तूं ॥८४॥

तें सरलिया त्रिविधकर्म ॥ तेणें होय देहस्वधर्म ॥ मग तेथें न राहे सीम ॥ यातायातीची ॥८५॥

जैसी अग्नींत पडिलें ॥ तें तृणकाष्ठ अग्नीच जाहलें ॥ तैसें बोधीं ब्रह्माचि आलें ॥ प्रपंचासी ॥८६॥

कीं धान्य भाजलिया पावकीं ॥ तें भूंमिसंगें मिळे उदकीं ॥ परि विरुढपणाची लटकी ॥ माता राया ॥८७॥

तैसें दिव्यचक्षुतेजें ॥ जरी प्रपंचधान्य भाजे ॥ तेथें विरूढेना जीव सहजें ॥ मिळे ब्रह्मीं ॥८८॥

गुरुमुखें लाविनि दिवटी ॥ अंतरीं पाहें दीर्घदृष्टीं ॥ मग ते करितां उफराटी ॥ देखिजे तें ॥८९॥

हे ऐसी सायुज्यता मुक्ती ॥ मार्कंडेयपुराणींची उक्ती ॥ आणिक असे इची प्राप्ती ॥ ब्रह्मज्ञानें ॥९०॥

तंव रावो ह्मणे वेदमूर्ती ॥ आह्मी ऐकों चारी मुक्ती ॥ तरी निर्गुणसायुज्यतेची प्राप्ती ॥ कैसी असे ॥९१॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ राया तूं महाविचक्षण ॥ तरी पुसिले पुसीचा प्रश्र्न ॥ ऐक आतां ॥९२॥

सलोकता समीपता ॥ स्वरूपता आणि सायुज्यता ॥ या मुक्ती परिक्षितिसुता ॥ होती सत्य ॥९३॥

तरी या ऐशा चारी मुक्ती ॥ मायानिर्मित गा होती ॥ ह्मणोनि जीवा न चुकती ॥ येरझारा ॥९४॥

जैसें जयविजयांसी ॥ पतन जाहलें दोघांसी ॥ तैसें प्राप्त प्राणियासी ॥ दुःखसुख ॥९५॥

मायेमध्यें जें विस्तारलें ॥ तें महाप्रळयीं हारपलें ॥ मग ते माया संहरतां उरलें ॥ कांहीं नाहीं ॥९६॥

ह्मणोनि येणें विचारें ॥ चौंमुक्तींचें कांहीं नुरे ॥ मग निर्गुणसायुज्यता उरे ॥ पांचवी ते ॥९७॥

तये मुक्तीचें लक्षण ॥ सत्य न वाटे साक्षीविण ॥ तें स्थूळलिंग गा कारण ॥ देहत्रय ॥९८॥

तें जीवासि असे भजन ॥ जैसें सुवर्णासि वस्त्र वेष्टण ॥ तैसें ज्ञान अग्निदहन ॥ कर्मासहित ॥९९॥

कीं जैसा अग्नि वनींचा ॥ संहार करी काष्ठतृणांचा ॥ तैसा संसारजाळ ब्रह्माविद्येचा ॥ ज्ञानाग्निजाळी ॥२००॥

जैसें काष्ठ अग्नीनें जाळिलें ॥ परि तें अंगार‍अवस्थे उरलें ॥ तेव्हांच होय अवसरलें ॥ भस्म जैसें ॥१॥

तैसें ज्ञानवडवानळें ॥ देहत्रय हें जाळीलें ॥ परि दग्धपटन्यायें उरलें ॥ लटिकेंचि पैं ॥२॥

अग्नीनें ग्रासिलें लुगडें ॥ तें प्रावर्ण केवीं घडे ॥ परि तैसेंच सारिखें पुढें ॥ दिसत असे ॥३॥

तैसा देहदैवें ठसा ॥ दिसे सांचा सारिखा परियेसा ॥ परि आत्मयासी फांसा ॥ पाडूं न शके ॥४॥

जैसें कां धान्याचें भूस ॥ तेणें क्षूधे होय हारांश ॥ परि विरुढपणाची आस ॥ आथीच ना ॥५॥

जंव प्रारब्धकर्म वोसरे ॥ तंव देहधर्म मात्र उरे ॥ मग तेंहीं सरलिया नुरे ॥ येणेंजाणें ॥६॥

तैसाचि इंद्रियविकार ॥ शुष्क उरे येरवीं मात्र ॥ ह्मणोनि ब्रह्मविदासि संसार ॥ आथीच ना ॥७॥

जैसें कोडें मोकलिया धनुर्धरा ॥ कीं कुलालचक्राचा भोंवरा ॥ कर्मयोगाचिया वोडंबरा ॥ धावें तैसा ॥८॥

ते सर लिया धांवणी ॥ तेवींच होय कर्मपाठवणी ॥ तैसें प्रारब्ध गेलिया सरोनी ॥ नासे देहद्वैत ॥९॥

अंगारदेशींची कणिका ॥ तृणग्रास करी निका ॥ मग आपणही जाय येका ॥ स्वरूपाआंत ॥२१०॥

तैसे ब्रह्मज्ञानरूप अग्नीं ॥दग्ध देह होती दोन्ही ॥ मग आपणचि निभ्रंशुनी ॥ निजरूपीं लीन होय ॥११॥

ऐसी हे सायुज्यता मुक्ती ॥ सांगीतली संकलितीं ॥ तेथें नाहीं पुनरावृत्ती ॥ ब्रह्मविदासी ॥१२॥

हे वेदवणी गा भारता ॥ आणि बोलिली ब्रह्मगीता ॥ ते विरिचि सांगे ब्रह्मकथा ॥ विबुधांसि पैं ॥१३॥

आतां हें संपूर्ण भारता ॥ जाहली ब्रह्मज्ञानाची कथा ॥ परि सिंधु काय सरे उपसितां ॥ करकमळांहीं ॥१४॥

जेथें शीण जाहला चतुरानना ॥ आणि शेषा सहस्त्रनयना ॥ तेथें वर्णाया मी अजाणा ॥ केवढा केवा ॥१५॥

राया हे ब्रह्मज्ञानकथा ॥ स्वयें उद्धरें गाता ऐकता ॥ मग तो मुक्तीचिया पंथा ॥ घाली चरण ॥१६॥

ऐसी हे पुण्यपावनकथा ॥ फळश्रुती न सरे सांगतां ॥ ते पूर्ण जाहलीसे आतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥१७॥

॥ इति श्रीकथाकल्पतरू ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ अध्यात्मकथनप्रकारू ॥ द्दादशाऽध्यायीं कथियेला ॥२१८॥

॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ षष्ठस्तबके द्वादशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP