कथाकल्पतरू - स्तबक ६ - अध्याय ५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

ऐसी अपूर्व हे भूगोलकथा ॥ वैशंपायन सांगे भारता ॥ जे धर्ममूळ पुण्यलता ॥ अतिपावन पैं ॥१॥

पृथ्वीप्रदक्षिणेचें फळ ॥ श्रवणें घडे तात्काळ ॥ आणि अज्ञान जळें सकळ ॥ हे कथा ऐकतां ॥२॥

वैशंपायन ह्मणती गा भारता ॥ हे पंचमस्कंधींची वार्ता ॥ तुज निरुपिली भगवंता ॥ अनुक्रमेंसीं ॥३॥

तंव ह्मणे जन्मेजयो ॥ वैशंपायना तुं ज्ञानडोहो ॥ सर्व फेडिलें संदेहो ॥ माझिये मनींचा ॥४॥

श्रवणें मज पुनीत केलें ॥ मजसहित पूर्वज उद्दरिले ॥ आणि सर्व सांकडें फेडिलें ॥ संदेहाचें ॥५॥

रावो ह्मणे हो वेदमूर्तीं ॥ कांहीं येक स्मरलें चित्तीं ॥ तरी पृथूनें कैसी रचिली क्षिंती ॥ तें सांगिजे चरित्र ॥६॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ हा बरवा केला गा प्रश्न ॥ तरी ऐकें चित्त देऊन ॥ पृथुकथा हे ॥७॥

ऐशी हे सप्तद्दीपावती ॥ आतां आणिक ऐकें भूपती ॥ कोणे येके काळीं वसुमती ॥ रचिली पृथुरायें ॥८॥

राया सृष्टिआरंभीं जाण ॥ प्रियव्रतबंधु उत्तानचरण ॥ तो उदेला जेवी शीतकीरणं ॥ भूमंडळीं या ॥९॥

उत्तानपादाचा ध्रुव कुमर ॥ ध्रुवापासाव वत्सर ॥ वत्सराचा वंशधर ॥ उल्मुक नामा ॥१०॥

उल्मुकाचा पुत्र अंग ॥ त्याचा सुत वेन उपांग ॥ तेणें विहितपंथ केला भंग ॥ पीडिले ब्राह्मण ॥११॥

परि वेनापासाव पृथु ॥ तो महाप्रतापी पुण्यवंतु ॥ तयानें स्थापिला विहितपंथु ॥ जाण राया ॥१२॥

घालोनि धनुष्याची आडणी ॥ डोंगर अवघे पाडोनी ॥ पृथ्वी सम केली खणोनी ॥ स्वप्रतापें ॥१३॥

ऐशा ऐकोनि आख्याना ॥ राव ह्मणे वैशंपायना ॥ कांहीं येक पुसतों मना ॥ आठवलें तें ॥१४॥

ध्रुववंश परम मंगळ ॥ असतां वेन जन्मला अमंगळ ॥ आणि त्याचा पृथु सुशीळ ॥ जाहला कैसा ॥१५॥

ऐकोनि मुनी संतोषला ॥ ह्मणे श्रोता भेटतां अर्थिला ॥ तरीच वक्तयाचे बोला ॥ निघती जिव्हा ॥१६॥

वेनासि राज्यभिषेक जाहला ॥ अंगयुक्त योग साधला ॥ येरें राज्यपट आदरिला ॥ महाक्रौर्यैं ॥१७॥

थोरथोर ऋषिजन ॥ रायें बोलाविले जाण ॥ तें रायाचें ऐकूनि वचन ॥ आले समस्त ॥१८॥

सनत्कुमार सनक सनंदनु ॥ सनत्सुजात स्वायंभुवमनु ॥ अंगिरा आणि देवतनु ॥ ब्रह्मयासह ॥१९॥

अत्रिऋषी नारदमुनी ॥ पौलस्ती आणि पुलहमुनी ॥ भृगु पारशर मिळोनी ॥ येते जाहले ॥२०॥

वसिष्ठ कर्दम अवधारा ॥ मेळविलें ऋषेश्र्वरां ॥ ऐकोनि रायाचा हांकारा ॥ आले समग्र ॥२१॥

ती आकारमंडळींची रूपें ॥ पवित्र आणि विचित्र लेपें ॥ अग्निहोत्र पंचाग्निरूपें ॥ प्रकटलीं तेथें ॥२२॥

जे विधीचें अतिपवित्र ॥ श्र्लोक ह्मणती गायत्रीमंत्र ॥ येका कौपीन येका धोत्र ॥ येक नग्न दिगंबर ॥२३॥

अग्नीसारिख्या देखा ॥ तैशा काढिल्या ऊर्ध्व शिखा ॥ मुद्रा धारणा अनेकां ॥ देखिल्या अंगीं ॥२४॥

ब्रह्मवेत्ते निर्विकार ॥ देखोनि उपजे सुख अपार ॥ जाणॊं मुक्तीसे आधार ॥ ऐशी मांदी मिळाली ॥२५॥

ऋषीश्र्वरांची मंडळी ॥ पुढें देखोनि पदावळी ॥ कीं परावाचा बोलिली ॥ प्रत्यक्ष पैं ॥२६॥

विष्णुनामें अनुक्रमें ॥ सुरेख टिळे वाहती धर्में ॥ बाहेरी नामाचीं वर्में ॥ मुक्तिभूत ॥२७॥

ऐसे ऋषीश्र्वर पातले ॥ ते तेथें कैसे गमले ॥ कीं ब्रह्मविद्येचे पुतळे ॥ चालते बोलते ॥२८॥

वेदविद्येचिये विचारें ॥ तोडर काढिती तोडरें ॥ सदा मंत्रघोष उच्चारें ॥ ऋषि देखा ॥२९॥

ऐसे ऋषीश्र्वर झडकरी ॥ उभे ठाकले रजद्वारीं ॥ परि राव नुठे मदपुरी ॥ ह्मणोनियां ॥३०॥

राजा दुष्ट महापापी ॥ सर्वकर्में आपणा संकल्पी ॥ ह्मणे सर्वस्व मीचि हें स्थापी ॥ भोक्ता मीची ॥३१॥

वेदघोष न करा तोंडीं ॥ अनुष्ठानाची करा सांडी ॥ जरी कराल तरी परवडी ॥ दुःखी व्हाल ॥३२॥

आजी प्रातःस्नाना जो जाईल ॥ तो आपुलें केलें पावेल ॥ त्यासी अपमान होईल ॥ मग मी नेणें ॥३३॥

सोडा विष्णूचें चिंतन ॥ वेदमंत्र महाध्यान ॥ पंचाग्नि आणि धूम्रपान ॥ तेंही सांडा ॥३४॥

जेणें विष्णुनामघोष केला ॥ तरी ह्मणावा तोचि मेला ॥ कीं तात्काळ तो अंतरला ॥ प्राणांसि पैं ॥३५॥

चतुर ह्मणवितां साच ॥ परि जडमूढ असा तुह्मीच ॥ तुह्मी वडील परि आहाच ॥ हरपली बुद्धी ॥३६॥

मी राव पृथ्वीपती ॥ परि विष्णु सदा तुमचे चित्तीं ॥ तरी जे परद्वारिणीसि गती ॥ ते तुह्मां होईल ॥३७॥

माझें सांडोनि चिंतन ॥ तुह्मी करितां वेदाध्ययन ॥ तरी तुह्मांहूनि दुर्जन ॥ कोण असे आणिक ॥३८॥

ऐसें ऐकोनियां सकळ ॥ ऋषी दुःखें गेले तात्काळ ॥ मग थोर जाहली कळवळ ॥ सत्कर्माची ॥३९॥

पुण्य अग्निदान राहिलें ॥ पृथ्वीवरी अधर्म वाढले ॥ होमधूम्र पराभविले ॥ तंव पाहिलें महाजनीं ॥४०॥

कीं पुण्याची गती गेली ॥ पापकर्मरीती आली ॥ पृथ्वी पूर्ण फुलली ॥ पापपुष्पीं ॥४१॥

पडिले भजनतरुवर ॥ सुकलें नेमसरोवर ॥ माजी विहित जीव सुकुमार ॥ तळमळती गा ॥४२॥

फिरला पापकर्मडांगोरा ॥ विध्वंसिला यज्ञ सारा ॥ मांडिला स्त्रियांसी आडोसा ॥ प्रकटपणें ॥४३॥

दोषा नाहीं आडकाठी ॥ फिटली सन्मार्गराहटी ॥ ऐसा दोषांसि अधिष्टी ॥ भूपती तो ॥४४॥

इष्टदेवता मंत्रशक्ती ॥ त्यांची वारिली पुण्यकांती ॥ मंत्र यंत्र भावभक्ती ॥ नाहीं हरिचिंतन ॥४५॥

जपा तरी वेननाम जपा ॥ मीच देव तीर्थ अजपा ॥ ऐसा आचार सांगोनि सोपा ॥ नाडिल्या प्रजा ।४६॥

इतुकें करोनियां वोजा ॥ ऋषीश्वरांतें ह्मणे राजा ॥ कीं तुह्मीं समस्तीं पूजा ॥ बाधां मज ॥४७॥

माझें जालिया दर्शन ॥ तुमचें कैवल्यसाधन ॥ माझिये मूर्तीचें ध्यान ॥ तुह्मासि पैं ॥४८॥

मजसी घाला मिष्टान्न केवळ ॥ मग यज्ञ तुमचे जाहले सफळ ॥ कीं माझें सेवितां पाउल ॥ तुह्मासि तीर्थ कासया ॥४९॥

मागुती बहुत मिळोनि ऋषी ॥ बोधों आले त्या रायासी ॥ कीं आपुली करुणा यासी ॥ उपजावया ॥५०॥

आशीर्वादघोषमुखीं ॥ ऋषीनीं राव केला सुखी ॥ कीं हा राजा न होय दुःखी ॥ ऐसा विचार करावा ॥५१॥

ह्मणती राया तूंचि देवता ॥ तूंचि जीवांचा जीवविता ॥ तूंचि आदि द्रव्य वित्तां ॥ सृष्टीमाजी ॥५२॥

तूंचि अससी तीर्थपूजा ॥ अधिष्ठान मंत्रबीजा ॥ तरी तुज सारिखा दुजा ॥ देखिला नाहीं ॥५३॥

तुजयेवढा प्रतापी पाहीं ॥ चौदा भुवनें शोधितां नाहीं ॥ तुवां केलें तें आह्मां पाहीं ॥ पाहिजे केलें ॥५४॥

ऐकोनि संतोषला राव थोर ॥ ऋषींसि केला आदर ॥ मग पुसतसे विचार ॥ ऋषींलागीं ॥५५॥

राव ह्मणे कृपाकरां ॥ काय निरूपितां ऋषीश्र्वरा ॥ मग तयाचे उत्तरा ॥ बोलती ते ॥५६॥

रायें यज्ञ केला पाहिजे ॥ आणि यज्ञचिंतनीं राहिजे ॥ मग प्रजेचें अरिष्ट निरसिजे ॥ तेणें पुण्यें ॥५७॥

यज्ञ होय पृथ्वीवरी ॥ तेणें पृथ्वी पिके बरी ॥ नातरी अपाय होय भारी ॥ दुःखमूळ ॥५८॥

आरोग्य होय राजया ॥ सुखें वर्तती सर्व प्रजा ॥ मग राक्षसादि दुष्ट झुंजा ॥ न येती कोणी ॥५९॥

यावरी खळापरिस खळ क्रूर ॥ वेन कोपला नृपवर ॥ रोषें बोलतसे उत्तर ॥ लोकांप्रती ॥६०॥

आजपासूनि ऐसें वचन ॥ बोलतां होईल अनन्य ॥ कोणी आचरितां विष्णुभजन ॥ दंडीन त्यासी ॥६१॥

हें ऐकूनियां उत्तर ॥ सकळ कोपले ऋषीश्र्वर ॥ ह्मणती ऐसें चांडाळशरीर ॥ पडो याचें ॥६२॥

ऋषीनीं ऐसा शाप दीधला ॥ रायाचा देह तत्काळ पडिला ॥ राजमातेनें कोल्हाळ केला ॥ तये वेळीं ॥६३॥

आतां पुत्र नाहीं वंशीं ॥ करावा राज्यभिषेक कोणासी ॥ मग वेनदेह अहर्निशीं ॥ सांभाळीतसे ॥६४॥

असो वेन शापिलियावरी ॥ केलें स्नान ऋषीश्र्वरीं ॥ मुनि ह्मणे राया अवधारीं ॥ येरेकडील कथा आतां ॥६५॥

जंव ऋषींनी स्नान केलें ॥ तंव येक अद्भुत वर्तलें ॥ नेणों कोठीले कोण आले ॥ महाराक्षस ॥६६॥

जेवढें होतें राजमंडळ ॥ तेवढें जाइलें राक्षसकुळ ॥ येकचि उठला कल्लोळ ॥ खादलें लोकां ॥६७॥

ते गजमुख खरनयन ॥ सूकरमुख अश्र्वलोचन ॥ येक श्र्वानमुख ॥ गजकर्ण ॥ वेताळ पैं ॥६८॥

ऋषीश्वरांसी पडलें सांकडें ॥ कीं उजूं करितां जाहलें वांकडे ॥ प्रजेसि जाहलें बापुडें ॥ तिहीं लोकीं ॥६९॥

तंव स्वायंभुव मनु ह्मणे ॥ मी तें मथित कर्म जाणें ॥ तें केलिया सहज जिंकणें ॥ राक्षसांसी ॥७०॥

चला वेनाचा कर धरा ॥ दर्भासन घालोनि पवित्रा ॥ मंथन करावें वेनशरीरा ॥ पुरुषप्राप्तीसी ॥७१॥

तंव दर्भशिखा घेवोनि करीं ॥ मंथन आरंभिलें ऋषीश्र्वरीं ॥ ऐशी करिते जाहले कुसरी ॥ वेनभुवना ॥७२॥

दर्भशिखेनें वामजानु तेथ ॥ मथितां जाहला कल्पांत ॥ रूप प्रकट जाहलें ते मात ॥ ऐक राया ॥७३॥

कृष्णांबर बाबरझोटी ॥ रक्ताक्ष आणि दीर्घओंठी ॥ खुजट पुरुष स्थूळपोटी ॥ जन्मला तो ॥७४॥

जो वेनाचे अंगींचा मद ॥ तो हा कोळीरूपें निघाला निषाद ॥ मग ऋषींहीं मांडीला प्रबंध ॥ त्या पुरुषासी ॥७५॥

कीं मनुष्यरहित स्थळ जेथें ॥ पापिया तूं जाय तेथें ॥ ऐसी ऋषीश्र्वरीं त्यातें ॥ दीधली आज्ञा ॥७६॥

मागुती मंथिली दक्षिणभुज ॥ तंव प्रकट जाहलें विष्णुतेज ॥ आनंदें नाचती भोज ॥ ऋषीश्वर ते ॥७७॥

तो जाणिजे विष्णुअव तार ॥ पृथुनामें अतिसुंदर ॥ करावया पापसंहार ॥ घेतला देह ॥७८॥

मग मंथिली वामभुजा ॥ तवं स्त्रीरूपें निघाली सिंधूंजा ॥ ते अर्चि नामें तया बाहुजा ॥ दिधली ऋषीनीं ॥७९॥

असो जे बोलिजे पृथ्वी देवी ॥ ते सकळ चराचरातें वागवी ॥ आतां पुढील कथा आघवी ॥ ऐकें राया ॥८०॥

मग ब्रह्मा अग्नि सूर्य मही ॥ इंद्र यम वरुण पाहीं ॥ पृथुदर्शना सर्व देवही ॥ येत जाहले ॥८१॥

उत्तानचरणा पासोनी ॥ पिढिया जाहल्या तेथोनी ॥ ते सूर्य आणि सोम दानी ॥ जाहले वंश ॥८२॥

मग सुवर्णाआसन कुबेरें ॥ किरीट दीधला तया इंद्रे ॥ संतुष्ट केला आतपत्रें ॥ सूर्य देवानें ॥८३॥

विश्र्वकर्म्यानें रथ जाण ॥ वायूनें दीधलें व्यजन ॥ यमें दीधलें संयमन ॥ धर्मैं कीर्तिमाला ॥८४॥

एवं सर्वदेवाहीं पृथूसी ॥ मंडित केले वैभवेंसीं ॥ मग लग्न लावोनि अचींसीं ॥ गेले स्वस्थाना ॥८५॥

पृथूनें पाडिले डोंगर ॥ पृथ्वी केली सम साचार ॥ तेणें राक्षसांचे मोगर ॥ भंगले राया ॥८६॥

ऐसी पृथ्वीमंडळावरी ॥ दैत्यांची केली बोहरी ॥ मग एकही समीप अरी ॥ उरों नेदी ॥८७॥

परि लोटतां बहुतां दिवशीं ॥ दुष्काळ पडिला प्रजेशीं ॥ रुदन करूं लागले पृथूशीं ॥ लोक समस्त ॥८८॥

ह्मणती आह्मी पृथ्वीवरी ॥ बीजें घालितों निरंतरीं ॥ परि कोंभ न निघती बाहेरी ॥ कदाकाळीं ॥८९॥

पृथ्वीनें खादलें बीज ॥ हें सांगता थोर लाज ॥ ह्मणोनि सांगावया तुज ॥ आलों राया ॥९०॥

नेणों कोणाचा पायवट जाहला ॥ एक ह्मणती समय पुरला ॥ एक ह्मणती होता भला ॥ वेनराव ॥९१॥

आह्मी भुकें पीडलों थोर ॥ ऐसें बोलती समग्र ॥ तेव्हां तयांसी बोले उत्तर ॥ राव पृथु तो ॥९२॥

मजयेवढा आचारवंत ॥ असतां बीजें खादलीं सत्य ॥ तरी आतां करीन घात ॥ या दुष्टेचा ॥९३॥

मग आवेशें ठाकला उभा ॥ तो सत्वाचा निश्र्वळ गाभा ॥ नारायणमूर्ती प्रत्यक्ष प्रभा ॥ दिसत असे ॥९४॥

सरसावोनि धनुष्यबाण ॥ ह्मणे घेतों पृथ्वीचा प्राण ॥ जाणों कोपला नारायण ॥ दैत्यांवरी ॥९५॥

पूर्ण कानाडी वोढिली ॥ तैं पृथ्वी भयें पळाली ॥ ते गिरिकंदरा प्रति गेली ॥ धेनुरूपें ॥९६॥

राव चालिला पाठिलागें ॥ धांवता होय मनेविगें ॥ गिरि उल्लंघितां भागे ॥ तये पाठीं ॥९७॥

महा अवघड अरडी दरडी । उतरतां कडे कडाडी ॥ येर कानाडी कोपर नाडी ॥ काढीतसे ॥९८॥

तुझे रक्तमांसें पृथु ह्मणे ॥ प्रजेसि करीन पांरणें ॥ तूं न पिकसी कवण्या गुणें ॥ पापरूपे ॥९९॥

असतां मजसारिखा राजा ॥ बीजें खादलीं कवणकाजा ॥ तुज उपासिती माझ्या प्रजा ॥ येकनिष्ठेनें ॥१००॥

धांवतां पृथ्वी कष्टली भारी ॥ वेगें उतरतां गिरिदरी ॥ मांस न दिसे शरीरीं ॥ उरल्या अस्थी ॥१॥

क्षणोक्षणीं गोमय मूत्रीं ॥ स्त्रवत असे ते गायत्री ॥ आणि पृथुराव महाक्षेत्री ॥ न सोडी पाठी ॥२॥

मग ते काकूळती आली ॥ अंग भूमीवरी घाली ॥ पृथुबाणें असे भ्याली ॥ तये वेळीं ॥३॥

ह्मणे रक्षरक्ष गा राया ॥ शरण आल्यें तवपायां ॥ माझी क्षीण जाहली काया ॥ न पळवे मज ॥४॥

ऐसी ते पृथ्वी विनंती करी ॥ ह्मणे राया अवधारीं ॥ मज मारूंनको येपरी ॥ तूं चक्रवतीं पिता माझा ॥५॥

राया तुझा वेन पिता ॥ थोर प्रवर्तला दुरिता ॥ यज्ञदान कांहीं न करितां ॥ वागविलें मज ॥६॥

तया वेनाचेनि पापें ॥ मी क्षुधित असें रूपें ॥ ह्मणोनियां खादली कोपें ॥ सकळ बीजें ॥७॥

आतां राव तूं पुण्यश्र्लोकं ॥ तरी मजसी देई भाक ॥ मग माझिये पासाव पीक ॥ होईल राया ॥८॥

येरू ह्मणे न देतां बीज ॥ सत्यत्वें विदरीन तुज ॥ तुवां थोर कष्टविलें मज ॥ धांवतां पाठीं ॥९॥

आणि ह्मणे विषमगिरी ॥ असंख्य आहेति तुजवरी ॥ तेणें कष्ट होती भारी ॥ प्रजाजनांसी ॥११०॥

तंव धेनु ह्मणे रायासी ॥ तुवां समान करावें मजसी ॥ आणि भाक दीधलिया मजसी ॥ देईन बीजें ॥११॥

इतुक्यांत आला प्रजाभार ॥ ह्मणती जीवरसां जाहला संहार ॥ भूतगणांचा आहार ॥ आटला पैं ॥१२॥

तंव हेमगिरी आला ॥ ह्मणे अष्टवातुनाश पावला ॥ भूमीनें सकळ ग्रास केला ॥ जाणोनियां ॥१३॥

तिजा आला विश्र्वावसु ॥ ह्मणे भूमीनें केला ग्रासू ॥ अमृत हरपतां देववसु ॥ इंद्र आला ॥१४॥

सकळ पन्नगां समवेत ॥ शेष आला धांवत ॥ प्रल्हाद पावला दैत्यसुत ॥ तये वेळीं ॥१५॥

मागुती श्र्वापदांसहित ॥ सिंह आला धांवत ॥ मांस फळ आहारविणें क्षुधित ॥ तेथें राया ॥१६॥

नदी आल्या पाठोपाठी ॥ तयांमागें तृणचरांची द्राटी ॥ ह्मणती तृणें हरपलों पोटीं ॥ पृथ्वीचिया ॥१७॥

बृहस्पतीनें धावणें केलें ॥ ह्मणे वेदांचे वीर्य गेलें ॥ वेदांहीं स्वरूप आपुलें ॥ लपविलें राया ॥१८॥

ऐशी दुःखवार्ता ऐकोनी ॥ पृथु ह्मणे अवनी लागुनी ॥ आतां बीजें समर्पोनी ॥ सुखवीं लोकां ॥१९॥

तंव ते ह्मणे धेनुका ॥ माझिये दोहावें ऊधसा ॥ तेणें इच्छित सकळिकां ॥ पावेल सत्य ॥१२०॥

मग वत्स जाहला स्वायंभुवमनु ॥ सकल औषधी करी दोहनु ॥ त्याचियेपरी विबुधजनु ॥ स्वेच्छें तीतें दोहिती ॥२१॥

वत्स जाहला शूळपाणी ॥ रक्त दोहिलें भूतगणीं ॥ पान्हा अवघा काढोनी ॥ नेला वेगें ॥२२॥

वत्स बृहस्पति प्रसिद्ध ॥ ऋषीश्र्वरीं दोहिले वेद ॥ तेणें जाहला आनंद ॥ ऋषीश्र्वरांसी ॥२३॥

गंधर्व राय विश्र्वावसु ॥ तोही जाहला स्वयें वत्सु ॥ तेणें गंधर्वां परम उल्हासु ॥२४॥

चित्ररथ नामें गंधर्व ॥ तो वत्स जाहला मनोभाव ॥ मग दोहितसे महाबाहो ॥ तये धेनूसी ॥२५॥

तेणें दोहिलें गायन ॥ ताल वाद्य आणि नर्तन ॥ संगीतकला संपूर्ण ॥ रचिली तेणें ॥२६॥

इंद्रे येवोनि वत्सभावें ॥ तैं अमृत दोहिलें देवें ॥ सुवर्णपात्रीं आघवें ॥ वीर्यबलेंसी ॥२७॥

वत्स जाहला प्रल्हाद ॥ तेणें दोहिला श्रवणपद ॥ असो जाहला परमानंद ॥ दोहनीं तयेचे ॥२८॥

वत्स जाहला हिमवंतु ॥ पर्वतीं दोहिले अष्टघातु ॥ मग संतुष्ट जाहला पृथु ॥ उत्तीर्णपणें ॥२९॥

बनुष्याची पाठधारी ॥ पृथु हाणी पर्वतांवरी ॥ तेणें सम जाहली धरित्री ॥ येणेंप्रकारें ॥१३०॥

पृथ्वीचें मोडिलें समविषम ॥ दोष दुष्काळांचें भंगलें नाम ॥ ऐसा पृथुपासुनि अनुक्रम ॥ पृथ्वीसी या ॥३१॥

मग भूमि पिके निरंतर ॥ फळरसीं पुष्पीं तरुवर ॥ पृथु चक्रवतीं भूमिचक्र ॥ भोगी सदा ॥३२॥

तो राजा पुण्यपावन ॥ सदा सुखी प्रजाजन ॥ विप्रांचा न करिती अपमान ॥ कदा काळीं ॥३३॥

ऐसी पृथ्वीची पूर्वील कथा ॥ ऐकतां श्रोती तुकाविजे माथा ॥ आतां पुढील चरित्र भारता ॥ ऐकें चित्त देउनी ॥३४॥

हे गुह्म कथा दुर्लभ ॥ त्रैलोक्यासी जाहली सुलभ ॥ तुजसी सांगीतला भावगर्भ ॥ अनेकांपरी ॥३५॥

आतां याचिये पुढील कथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ ती ऐकावी सकळ श्रोतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥३६॥

इत श्रीकथाकल्पतरु ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ पृथुरावचरितप्रकारू ॥ पंचमोऽध्यायीं कथियेला ॥१३७॥

॥ शुभंभवतु ॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ षष्ठस्तबके पंचमोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP