कथाकल्पतरू - स्तबक ६ - अध्याय ३

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

ऋषि ह्मणे गा भारता ॥ म्यां पृथ्वी पाहिली भ्रमतां ॥ परि तुजसारिखा श्रोता ॥ न मिळेकघीं ॥१॥

जैसा प्रदतामासि मेरू ॥ कीं आकाशीं पूर्ण अमृतकरू ॥ तैसा तूं श्रोता चतुरू ॥ अतिपाडें गा ॥२॥

राया तुझेनि सादरपणें ॥ हरीचीं चालिलीं आख्यानें ॥ जेणें करूनि फिटे धरणें ॥ जन्ममरणाचें ॥३॥

आणि तुझि ये सत्संगतीं ॥ मी उद्धरलों गा भूपती ॥ तरी आतां ऐकें विनंती ॥ श्रीभागवतींची ॥४॥

तूं श्रोता विचक्षण ॥ सर्वज्ञाता सुजाण ॥ ह्मणोनि हें तुज करूं ज्ञान ॥ जन्मेजया गा ॥५॥

असो कोणेयेके काळवेळीं ॥ शंभु आणि शैलबाळी ॥ खेळावया क्रीडाकेली ॥ बैसलीं होतीं ॥६॥

तेथें ब्रह्मयानें ह्मणतां मंत्र ॥ येक वर्तलें नवल चरित्र ॥ वायूनें वारिलें कटिचरि ॥ शिवकांतेचें ॥७॥
तें ब्रह्मयानें देखिलें अकल्पित ॥ मग तो तेणें द्रवला रेत ॥ ते वालखिल्य जाहले ब्रह्मसुत ॥ सहस्त्र साठी ॥८॥

तंव तेथें येऊनि सुरवर ॥ ह्मणती ब्रह्मया घडलें अक्षेत्र ॥ येणें नेत्रद्वारें परनार ॥ अभिलाषिली शिवा ॥९॥

हा थोर जाहला प्रायश्र्वित्ती ॥ आतां सामर्थ्यें कैंचि तीर्थीं ॥ कीं परद्वाराची फळश्रुती ॥ नासूं शके ॥१०॥

तंव बोलिला देवगुरु ॥ यासि घडला नेत्रविकारु ॥ ह्मणोनि चालेल प्रतिकारु ॥ प्रायश्वित्ताचा ॥११॥

मग देव मिळोनि समस्त ॥ तत्त्वें मेळवूनि काढिलें नीर ॥ तेणें भरिलें पाणिपात्र ॥ ब्रह्मयाचें ॥१२॥

पिळोनियां पंचभूतां ॥ तें सत्वोदक गा भारता ॥ तेणें पवित्र केला विधातां ॥ सिंचूनियां ॥१३॥

मग तें पात्र चिरकाळ ॥ सत्वाचें होतें पुण्यजळ ॥ तंव बळियागीं उचललें पाउल ॥ त्रिविक्रमाचें ॥१४॥

बळीनें पूजिला वामन ॥ त्रिपदें बोलिला दानपण ॥ तंव हरीचा गेला चरण ॥ ब्रह्मकटाहासी ॥१५॥

त्या विष्णूचेनि चरणनखें ॥ ब्रह्मकटाह रचिला देखें ॥ मग चरण पूजिला पुण्यपुरुषें ॥ ब्रह्मदेवानें ॥१६॥

असो मग तें पात्रींचें जळ ॥ नखीं राहिलें चिरकाळ ॥ मग तें तेथूनिया सलिल ॥ आलें शिवस्थाना ॥१७॥

परि दिव्ययोगें सहस्त्र येक ॥ सेविला होता आदिपुरुष ॥ मग तेणें टाकिला लोक ॥ रुद्रदेवाचा ॥१८॥

तेथूनि बत्तिसकोटींचें अंतर ॥ तें सत्यलोका आलें नीर ॥ इतुकीं योजनें उद्धतर ॥ होतें शिवस्थानीं ॥१९॥

तेथूनि आठ कोटिया जाणा ॥ उदक आलें तपोलोकभुवना ॥ तेथोनि चौकडी गा नॄपनंदना ॥ आलें जनलोकासी ॥२०॥

तेथोनि दोनकोटी अंतर ॥ महलोंका आलें नीर ॥ तेथोनि एककोटी पवित्र ॥ टाकिला ध्रुवलोक ॥२१॥

ऐसें एकसहस्त्र दिव्ययोगें ॥ येतां काळ क्रमिला गंगे ॥ मग पूर्वे सेविलें महाभागें ॥ आदिगंगेनें ॥२२॥

परि स्वर्गाचे उपरि माथां ॥ ध्रुवलोक असे गा भारता ॥ तेथूनि सक्षुमण गा सरिता ॥ आली सप्तऋषिमंडळीं ॥२३॥

त्या ऋषीनीं वंदिली माथां ॥ तयां सिद्धि जाहली गा भारता ॥ मग दोनीलक्ष योजनें सरिता ॥ आली शनिमंडळीं ॥२४॥

तेथोनि दोनीलक्ष योजनां ॥ ते आली गुरुभुवना ॥ तेथोनि दोनीलक्ष माना ॥ आल मंगळमंडळीं ॥२५॥

तेथोनि दोनीलक्षयोजनां ॥ आली बुधाचिया भुवना ॥ मग दोनलक्ष गा नृपनंदना ॥ आली शुक्रंडळीं ॥२६॥

तेथूनि तीनलक्ष गा अंतरें ॥ तारामंडळ टाकिलें सुंदरें ॥ मग चंद्रमंडळ निर्धारें ॥ योजनें लक्ष दोनी ॥२७॥

तेथोनि लक्ष येक खालता ॥ रविलोक बोलिजे भारता ॥ मग तेथें आली सरिता ॥ आद्यगंगा ते ॥२८॥

ऐसी क्रमोनि स्वर्गपथा ॥ ते आली मेरूच्या माथां ॥ मग चारी वोघ गा भारता ॥ जाहले तयेचे ॥२९॥

अलकनंदा आणि सीता ॥ भद्रा आणि चक्षुषी सर्वथा ॥ या जाहलिया विभक्ता ॥ ब्रह्म्पुरिसी ॥३०॥

ते ब्रह्मपुरीहूनि सीता ॥ इंद्रपुरीचेनि गा भारता ॥ अंतराळें गेली सरिता ॥ पूर्वसागरासी ॥३१॥

यमपुरीसि जाऊनि तेथें ॥ आली ब्रह्मकटाहरूपें दक्षिणपथें ॥ अंतराळें गेली गगनवातें ॥ ते अलकनंदा पैं ॥३२॥

आतां चक्षुषी गा भारता ॥ ते पश्र्विमसागरा गेली सरिता ॥ वरूणवती वेढूनि पूण्यलता ॥ गेली अंतराळें ॥३३॥

आतां चौथा वोघ गा नृपवरा ॥ वेढा घालोनि कुबेरपुरा ॥ ते भद्रा गेली उत्तरसागरा ॥ अंतराळें पैं ॥३४॥

तंव तिचा वायूनें फूटला कण ॥ जो दुरितगजपंचानन ॥ तो हिमाचळीं पडोनि पुण्यपावन ॥ आला भरतखंडीं ॥३५॥
परि त्या मिळाल्या क्षीरसागरा ॥ नदी नद आणि गिरींद्रा ॥ नवहीखंडीच्या समग्रा ॥ मिळाल्या तेथें ॥३६॥

आतां तये आठां खंडीं सर्वज्ञा ॥ आयुष्याची जाहली गणना ॥ दहा सहस्त्र गा नूपनंदना ॥ नेमिलें देवें ॥३७॥

तयां दहासहस्त्रहत्तीचें बळ ॥ कन्या कीं पुत्र येक फळ ॥ स्त्रीसंभोगीं चिरकाळ ॥ वीर्यास्तव ॥३८॥

तयांची असे अंगकांती ॥ देवांसम गा भुपती ॥ दुःखदरिद्राची गती ॥ नेणती ते ॥३९॥

जे हे आयुष्याची करी गुणना ॥ तरी उदंड होय मनकामना ॥ येतायुगाची तेथें गणना ॥ होय आयुष्य ॥४०॥

तयां पाप ना दुष्टवासना ॥ हिंसा निंदा ना अवज्ञा ॥ इष्टदेवांची करिती उपासना ॥ आठही खंडींचे ॥४१॥

या नवखंडीं नव उपवनें ॥ नवमूर्ती स्थापिल्या नारायणें ॥ आतां जंबुद्वीपाचें असो सांगणें ॥ भारता हें ॥४२॥

हिमाचळीं हींव ठेविलें सर्वथा ॥ तेणें येवो जावो राहिला भारता ॥ आतां परियेसीं तत्वतां ॥ गगनपंथ ॥४३॥

तरी क्षारसमुद्राचे परतें ॥ प्‍लक्षद्दीप असे भोंव तें ॥ तें दोनीलक्ष गांवें गणितें ॥ आडवें साच ॥४४॥

तें क्षारसागरींहूनि पूर्ण ॥ प्‍लक्षद्दीप द्विगुण योजन ॥ उंच असे जेवीं गगन ॥ कनककांतीचें ॥४५॥

तेथें सप्तजिव्हांचा अंगारू ॥ तो रूपें असे साक्षात्कारु ॥ परि तो अग्नी गा निर्धारू ॥ स्थापना त्याची ॥४६॥

प्रियव्रत नामें राजा ॥ त्याचा इध्मजिव्ह आत्मजा ॥ तो राजा प्रेमपूज्या ॥ असे तेथें ॥४७॥

परि तो पुढें काळसंकेता ॥ इध्मजिव्ह निमाला गा भारता ॥ मग राज्य दीधलें सांता सुतां ॥ सातां खंडींचें ॥४८॥

शिवखंड आणि शातखंड ॥ अभय चौथें अमृतखंड ॥ क्षेम यवयस सुभद्रखंड ॥ सातही पुत्रनामांची ॥४९॥

जे खंडीं राज्य ज्या पुत्रा ॥ तेंचि खंडासीं नाम गा नरेंद्रा ॥ आणि सातांही गिरिवरां ॥ मंडित तें पैं ॥५०॥

हिरण्यष्ठीव आणि मणिकूट ॥ सुपर्ण चवथा वज्रकूट ॥ ज्योतिष्मानू इंद्रसेन वरिष्ठ ॥ मेघमाल सातवा तो ॥५१॥

ययांपासाव सात सरिता ॥ त्या विखुरल्या सागरीं भारता ॥ वेगें मिळालिया समस्ता ॥ गतिप्रमाण ॥५२॥

अरूणा नृम्णा ऋतंभरा ॥ सुप्रभा आणि सत्यंभरा ॥ आंगिरसी गुरुवेगा नरेंद्रा ॥ सातवी सावित्री ॥५३॥

येथें हंस आणि पतंग ॥ ऊर्ध्वायान आणि सत्यांग ॥ हे चारीवर्ण गा येकरंग ॥ असती पैं ॥५४॥

त्यांसी आयुष्य अब्द येक सहस्त्र ॥ देवांसमान येक पुत्र ॥ आणि उपासिती दिनकर ॥ लोकपाळ ते ॥५५॥

ऐसा प्‍लक्षद्दीपींचा वेव्हार ॥ भोंवता इक्षुरससागराचा फेर ॥ तो दोनक्षगांवें थोर ॥ खोल आडवा पैं ॥५६॥

तेथें आयुष्य बळ वोज ॥ क्षेम वीर्य इंद्रियतेज ॥ हें सारिखें गा सहज ॥ असे सर्व ॥५७॥

तया इक्षुसागराभोंवतें ॥ शाल्मली द्वीप परीघतें ॥ चारी लक्ष गांवें गणितें ॥ रुंदी तया ॥५८॥

तेथें शाल्मलीचा तरु ॥ तो चारीलक्षें उंचतरु ॥ कनकवर्ण विचित्रु ॥ ऐसा राया ॥५९॥

मिनीं चिंतूनियां अनंता ॥ तेथें गरुड असे गा भारता ॥ हे पंचमस्कंधींची कथा ॥ व्यासमुखींची ॥६०॥

तेथें प्रियव्रताचा कुमर ॥ यज्ञबाहु असे नरेंद्र ॥ तेणे तपसाधनें राज्यभार ॥ सांडिला राया ॥६१॥

मग तेणें सातां सुतां देश वाटिला निरुता ॥ तीं सप्तखंडें जाहलीं भारता ॥ पुत्रनामांचीं ॥६२।

सौमनस्यखंड सुरोचन ॥ रमणक पारिभद्र पावन ॥ देववर्ष आणि आप्यायन ॥ अविज्ञात सातवें ॥६३॥

तेथें सातां पर्वतांचा बांध ॥ शतश्रृंग वामदेव कुमुद ॥ सहस्त्रश्रुति आणि कुंद ॥ स्वरस आणि पुष्पवर्ष ॥६४॥

यांपासाव नदी भूपती ॥ नंदा राका सरस्वती ॥ कुहू रजनी आणि अनुमती ॥ सातवी सिनीवाली ते ॥६५॥

तेथें वीर्यधर आणि श्रुतघर ॥ वसुंधर आणि इषंधर ॥ हे चारी वर्ण गा निरंतर ॥ सोमसेवक ॥६६॥

तये शाल्मलीद्दीपाचे फेरीं ॥ वारुणीसमुद्राची गळसरी ॥ तो चारी लक्ष गांवें निर्धारीं ॥ आडवा आणि खोल ॥६७॥

परि आणिके पुराणांतरीं ॥ शाल्मलीद्दीपाचे बाह्मफेरीं ॥ सप्तसमुद्र ऋषेश्वरीं ॥ कथिले राया ॥६८॥

असो त्या सिंधूच्या पैलपारीं ॥ कुशद्दीपाची गळसरी ॥ तें आठलक्षगांवें उंच उत्तरीं ॥ आडवें राया ॥६९॥

तेथें कुशस्तंबाचा तरु ॥ तो आठलक्षगांवें थोरु ॥ तेजें आथिला दिनकरू ॥ शोभे जैसा ॥७०॥

त्या कुशस्तंबाचेनि पुंजाळें ॥ प्रकाश धावें अंतराळें ॥ अष्टदिशांसी उजाळें ॥ पडे तेणें ॥७१॥

तेथें प्रियव्रताचा कुमर ॥ हिरण्यरेता नरेंद्र ॥ तो पुत्रां देवोनि राज्यभार ॥ गेला तपासी ॥७२॥

वसु आणि स्तुत्यव्रत वसुदान कीं नाभिगुप्त ॥ दृढरुची आणि विविक्त ॥ वामदेव खंडनामें ॥७३॥

हीं सात नामें सातां सुतां ॥ तींचि खंडाचीं नामें भारता ॥ सात पर्वत उंच तत्वता ॥ असती तेथें ॥७४॥

चतुःश्रृंग आणि कपिल ॥ चित्रकूट आणि चक्राचळ ॥ देवानीक ऊर्ध्वरोमा शैल ॥ सातवा द्रविण ॥७५॥

यांपासाव महा सरिता ॥ रसकुल्या मधुकुल्या विभक्ता ॥ श्रुतविंदा मित्रविंदा उभयता ॥ आणि घृतच्युता ते ॥७६॥

महासरिता अंत्रमाळा ॥ देवगर्भा सुशीतळा ॥ आणिकही नदी भूपाळा ॥ असती तेथें ॥७७॥

चारी वर्ण असती तेथें ॥ ते उपासिती अग्निपुरुषातें ॥ आरोग्यपृष्टीस्तव व्याधीतें ॥ नेणती ते ॥७८॥

आतां कुशद्दीपा परता ॥ घृतोद समुद्र गा भारता ॥ तो आठलक्षगावें भोंवता ॥ खोल आणि रुंद ॥७९॥

तया घॄतसागराचे फेरीं ॥ कौंचद्दीप पैल तीरीं ॥ आठलक्षयोजनें भारीं ॥ असे राया ॥८०॥

परि कदाकाळीं गा भारता ॥ षण्मुख आला तया प्राता ॥ ओघ होता तें सांगतां ॥ न सरे कांहीं ॥८१॥

कवितत्व कवित्व करिती ॥ योघासि त्यांचें डंबत्व देती ॥ ह्मणवूनि त्या ओघाची उत्पत्ती ॥ न सांगवे ॥८२॥

तेथें प्रियव्रताचा कुमर ॥ घृतपृष्ठ नामें राज्यघर ॥ पुत्रां देवोनि राज्यभार ॥ गेला तपातें ॥८३॥

ते मधुरुह आणि मेघपृष्ठ ॥ आमा सुघामा भ्राजिष्ठ ॥ वनस्पति लोहितार्ण शिष्ट ॥ पुत्रनामखंडें ॥८४॥

शुक्ल आणि वर्धमान ॥ सर्वतोभद्र भोजना ॥ नंद आणि उपबर्हिण ॥ सातवा नंदन तो ॥८५॥

यांपासाव नदी गा भुपती ॥ अमृतौघा आणि तीर्थवती ॥ अभया आर्यका रूपवती ॥ पवित्रवती शुक्का पै ॥८६॥

तेथें चारीं वर्ण गा भारता ॥ ते उपासिती आपदेवता ॥ आपदा दैन्याची व्यथा ॥ नेणती ते ॥८७॥

आतां कौंचद्दीपाचे फेरीं ॥ क्षीरसमुद्र अवधारीं ॥ तो सोळालक्षगांवें तीरीं ॥ आडवा आणि खोल ॥८८॥

त्या क्षीरसमुद्राचे पैलतीरीं ॥ शाकद्दीप अवधारी ॥ सोळालक्षगांवें निर्धारीं ॥ आडवा असे ॥८९॥

तेथें सगुणनामें महातरु ॥ सोळालक्षगांवें उंचतरु ॥ दीप्तिवतपणें दिनकरू ॥ महसुगंध तो ॥९०॥

तेथें प्रियव्रताचा सुत ॥ मेधातिथे नामें नृपनाथ ॥ तो पुत्रांसि देवोनि अर्थ ॥ गेला तपासी ॥९१॥

चित्ररेफ मनोजव पवमान ॥ धूम्रानीका पुरोजव जाण ॥ सहावा विश्र्वधारवरुण ॥ आणि सातवा बहुरूप तो ॥९२॥

तेथें चारीवर्ण भारता ॥ ते उपासिती अनंता ॥ दुःख दरिद्र व्याधि व्यथा ॥ नेणती कोणी ॥९३॥

ईशान आणि बलभद्र ॥ उरुश्रृंग शतकेसर ॥ महानस सहस्त्रश्रोत्र ॥ सातवा देवपाळ तो ॥९४॥

यांपासाव नदी गा भारता ॥ आद्य पंचपदी सहस्त्रस्त्रोता ॥ उभयसंपुष्टी पराजिता ॥ आयुर्दा सहस्त्रस्त्रोता ते ॥९५॥

तेथें चारी वर्ण गा भूपती ॥ ते सूरात्मयातें उपासिती ॥ अष्टयुगांचे पद्धतीं ॥ आचरती ते ॥९६॥

आतां शाकद्दीपाचे पैलपारीं ॥ दधिसमुद्र अवधारीं ॥ तो बत्तीसलक्षगांवें निर्धारीं ॥ आडवा आणि खोल ॥९७॥

तये समुद्राचे पैलतीरीं ॥ पुष्करद्दीपाची गळसरी ॥ तें बत्तीसलक्ष गावें निर्धारी ॥ आडवें राया ॥९८॥

तेथें कमळाचा तरुवरु ॥ बत्तीसलक्षगांवें उंचतरु ॥ वरी सहस्त्रदळ सूर्याकारू ॥ प्रभा कमळाची ॥९९॥

तेथें ब्रह्मयाचें आसन ॥ सावित्री गायत्री ब्रह्मगण ॥ तो ध्यात असे परिपूर्ण ॥ विष्णुमूर्तीसी ॥१००॥

तेथें चारीवर्ण गा भारता ॥ ते उपासिती विधाता ॥ द्दीपीं पर्वत आणि सरिता ॥ असंख्यात ॥१॥

माजी उदेलीं सहस्त्रकमळें ॥ सुवर्णमय असती अमळें ॥ नानादळें परि मळें ॥ वेष्टिलीं तीं ॥२॥

तेथें मानस नामें गिरिवर ॥ बत्तीसलक्षगांवें उंचतर ॥ कनकवृत्तीं विचित्र ॥ असे राया ॥३॥

तये मानसाचळाचे माथां ॥ लोक पाळांचीं वस्ती भारता ॥ आणिक ऐकें अपूर्वता ॥ राजया तूं ॥४॥

सूर्य देवाची काळचक्रक्षिती ॥ ते अंतरीं फिरे गा भूपती ॥ ज्याचिये तेजें तेजदीप्ती ॥ तेथील लोकपाळां ॥५॥

तेथें प्रियव्रताचा कुमर ॥ वीतिहोत्र नामें नरेंद्र ॥ तो दोघां पुत्रां देवोनि राज्यभार ॥ गेला तपासी ॥६॥

हे कमळासनाचे संयोग ॥ तें ब्रह्मयाचें मयलिंग ॥ अद्दितीयभावें राजे जग ॥ पूजिती तेथींचे ॥७॥

आतां पुष्करद्दीपाचे फेरीं ॥ मधुरोदकसिंधूची भोंवरी ॥ तो चौसष्टीगांवें अवघारीं ॥ खोल आणि रुंद ॥८॥

ऐसी द्दीपें आणि सागर ॥ अनुक्रमें द्दिगुण थोर ॥ आतां पूर्ण जाहलें गा चरित्र ॥ सप्तद्दीपावतीचें ॥९॥

वडवानळ नामें अग्नी ॥ तो जळसागरीं गा चूडामणी ॥ मेघवृष्टीचें शोषी पाणी ॥ नित्य बारायोजनें ॥११०॥

जो देवीं मथिला सागरु ॥ तो मधुरोदकाचा निर्धारु ॥ परि अगस्त्तीनें घोंटिला अपवित्रू ॥ तो क्षारोदकाचा ॥११॥

ह्मणोनियां कनकपुष्करें ॥ तेथें जन्म जाहला इंदिरे ॥ आणि प्रलयांतीं रत्‍नें शस्त्रें ॥ ठेविती देवी ॥१२॥

हे सप्तद्दीपनवखंडींची कथा ॥ तुज निवेदिली गा भारता ॥ परि दहावें काशीं खंड हे वार्ता ॥ काशिखंडींचीं ॥१३॥

आतां असो हे सप्तद्दीपावती ॥ पंचमस्कंधींची विप्तत्ती ॥ पूढील ऐकाजी भारती ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥१४॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ सप्तद्दीपनवखंडप्रकारू ॥ तृतीयोऽध्यायीं सांगितला ॥११५॥

इति श्रीकथाकल्पतरौ षष्ठस्तबके तृतीयोऽध्यायः समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP