कथाकल्पतरू - स्तबक ५ - अध्याय १४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मुनीसि ह्नणे जन्मेजयो ॥ वैशंपायना तूं मतीचा डोहो ॥ तरी एक फेडावा संदेहो ॥ माझिये मनींचा ॥१॥

आह्मी कुरुचे वंशजात ॥ असोनि कां ह्नणसी भारत ॥ या बोलाचा निश्वयार्थ ॥ सांगिजे मज ॥२॥

मग बोलिले ऋषीश्वरु ॥ भरताहूनि आरुता कुरु ॥ भरत तुमचा मुख्य पितरु ॥ तें ऐक आतां ॥३॥

विश्वामित्र महामुनी ॥ ज्याचे तपा न पुरे धरणी ॥ तें जाणोनि वज्रपानी ॥ जाहला भयाभीत ॥४॥

त्याचिये तपाची करावी शांती ॥ ह्नणोनि मेनका पाचारी सुरपती ॥ ह्नणे विश्वामित्रा देवोनि रती ॥ हरावें पुण्य ॥५॥

तये दोघे दीधले सांगाती ॥ मलयानील आणि रतिपती ॥ ऐशीं तिघें आलीं शीघ्रगती ॥ हिमगिरीसी ॥६॥

तेथें देखिला गाधिपुत्र ॥ जो दुसरा सृष्टि करणार ॥ इंद्रियां करोनि संहार ॥ समाधिसिंधू तो ॥७॥

ऐसें तप जाणोनि दुस्तर ॥ वसंतें श्रृंगारिले तरुवर ॥ सुगंधकुसुमांवरी भ्रमर ॥ घालिती झेंपा ॥८॥

कोकिळा मयुरां चातकां ॥ चर्चा होती येकमेकां ॥ मध्ये दावितसे झुळुका ॥ मलयानिळ तो ॥९॥

ऐसा ऐकोनियां गजर ॥ तेणें चेतावला विश्वामित्र ॥ दृष्टीं करीतसे न्याहाळ ॥ वनस्थळीचा ॥१०॥

तंव मेनकेचे परिधाना ॥ वायूनें उडविलें दूरी वसना ॥ ऋषिरायें ते देखिली नग्ना ॥ तयेवेळीं ॥११॥

ऐसी ते देखिली नग्न ॥ तेणें ऋषीचें भ्रमलें मन ॥ मग कामातुर होवोन ॥ जाहला बोलता ॥१२॥

तूं स्वर्गीची सुरांगना ॥ सहज आलीस मृत्युभुवना ॥ तरी रती देवोनि मदना ॥ करावी तृप्ती ॥१३॥

ह्नणोनि धरिली वामकरीं ॥ तप विसरला ब्रह्मचारी ॥ मग ते सोळावर्षे खेचरीं ॥ भोगिली तेणें ॥ ॥१४॥

ऐसा नागविला ब्रह्मचारी ॥ तंव गर्भ जाणोनियां उदरीं ॥ मग तया त्यजोनि सुंदरी ॥ गेली मेनका स्वर्गातें ॥१५॥

जैसें स्तनीं आटतां पीयूषां ॥ मग जननी नावडे बालका ॥ कीं द्रव्य सरलिया गणिकां ॥ त्यजी वल्लभातें ॥१६॥

तैसी ते स्वर्वेश्या अप्सरा ॥ त्यजोनि गेली विश्वामित्रा ॥ आणि गर्भ सांडिला सुक्षेत्रा ॥ हिमगिरीसी ॥१७॥

तें कन्यारत्न गा भूपाळा ॥ जियेचें नाम शकुंतला ॥ मकरंदाचा देवोनि गरळा ॥ वांचविलें शकुंतांही ॥१८॥

तंव कण्व नामें महामुनी ॥ तेणें ते कन्या देखिली नयनीं ॥ मग नेली ऋषिभुवनीं ॥ शकुंतला ते ॥१९॥

ऐसी ते रुपें मनोहर ॥ वयसें जाहली उपवर ॥ अवयवीं उगवले अंकुर ॥ तारुण्याचे ॥२०॥

कोणे एके काळवेळां ॥ मठीं ठेवोनि शकुंतला ॥ ऋषी गेला गंगाजळा ॥ स्नानासि पैं ॥२१॥

तंव दुष्यंतराव सोमवंशी ॥ पारधी खेळतां वनासी ॥ तेणें कण्वाश्रमीं देखिली डोळसी ॥ शकुंतला ते ॥२२॥

तिची देखोनि स्वरुपता ॥ राया उपजली कामव्यथा ॥ मग वारु बांधोनिय वार्ता ॥ मांडिली तयेसी ॥२३॥

राव ह्नणे वो सुंदरीं ॥ तूं येकली कां वनांतरीं ॥ तुझे स्वरुपाचिये लहरीं ॥ व्यापिलें मज ॥२४॥

ते ह्नणे कण्व ऋषीश्वर ॥ माझा पिता आहे परिकर ॥ तो सकळही जाणे विचार ॥ वर्‍हाडिकेचा ॥२५॥

तंव तयेसि ह्नणे नृपवर ॥ मज दे आधीं रतिविचार ॥ मग प्रार्थीन ऋषीश्वर ॥ लौकिकासी ॥२६॥

तैं विधिमत्रें वो सुंदरी ॥ तुज पर्णीन महागजरीं ॥ परी आतां क्रीडोनि ये अवसरीं ॥ राखीं प्राण ॥२७॥

मी राजा आहें अयाचित ॥ परी आजि तुझा असें अतीत ॥ तरी कामें करुनियां तृप्त ॥ राखीं मजसी ॥२८॥

शकुंतला तो मानूनि विचार ॥ ह्नणे मज होईल जो कुमर ॥ तो करावा राज्यधर ॥ तुह्मी असतां ॥२९॥

तें मानवलें नृपनाथा ॥ कीं राज्य देईन तुझिये सुता ॥ ऐसी भाष दीधली भारता ॥ शकुंतलेसी ॥३०॥

यापरि देवोनि भाषदान ॥ मग प्रतिष्ठिलें गंधर्वलग्न ॥ शेजे ते अंगना भोगोन ॥ गेला दुष्यंतरावो ॥३१॥

तंव आला कण्वमुनी ॥ तेणें शकुंतला देखिली नयनीं ॥ परी अंतरीं जाणितली चिन्हीं ॥ पुरुषभोग्य ॥३२॥

मग ऋषी तोषला चित्तीं ॥ ह्नणे तुज कोण जोडला पती ॥ ते ह्नणे दुष्यंतरायें रती ॥ दीधली मज ॥३३॥

असो ते शकुंतला सुंदरी ॥ पतिसंगें जाहली गरोदरी ॥ नवमास भरतां समग्रीं ॥ प्रसवली पुत्रा ॥३४॥

जनकें वर्तविलें जातक ॥ तंव ग्रह देखिले अलोलिक ॥ कीं सकळरायां वरिष्ठ देख ॥ होईल हा ॥३५॥

तों जाहली गगनवाणी ॥ हा येकछत्री करील अवनी ॥ याचें नांव पढती पुराणीं ॥ ऋषीश्वर ॥३६॥

सातां वर्षाचा होतां पूर्ण ॥ तंव हस्ती व्याघ्र आणिल बांधोन ॥ मग नाम ठेविलें सर्वदमन ॥ कण्वें तयाचें ॥३७॥

तो व्याघ्राचा करोनि वारु ॥ वरी आपण होय स्वारु ॥ पुढें गजांचा पडिभारु ॥ लीलाविनोदें ॥३८॥

मग शकुंतले आणी कुमरा ॥ कण्वें धाडिलें हस्तनापुरा ॥ त्या दुष्यंतराय नरेंद्रा ॥ भेटावयासी ॥३९॥

सवें दीधले विद्यार्थी ॥ कीं सांगा तुमचीं पुत्रयुवती ॥ असो ऐकतां चमकला चित्तीं ॥ सभे दुष्यंत ॥४०॥

वैशंपायन ह्नणती भारता ॥ तो दुष्यंत परिभ्रमल ॥ चित्ता ॥ जैसा मदिरें माथा घेतां ॥ विसरे नरु ॥४१॥

मग तो ह्नणे दुष्यंत ॥ माझी स्त्री नव्हे हें सत्य ॥ साच मानाया पूर्ववृत्तांत ॥ होय कैसा ॥४२॥

शकुंतला ह्नणे जी नृपती ॥ आपुली भाक सत्य भारती ॥ पारधी समई वनाप्रती ॥ मंदिरीं घडला योग ॥४३॥

तें मज दीधलें भाकदान ॥ कीं पुत्रा देईन सिंहासन ॥ तें आजि लोपवितां वचन ॥ घडतील दोष ॥ ॥४४॥

बोलोनि सरे पाठिमोरा ॥ तो नरकीं पडे अधोरा ॥ विश्वासघातें गा नरेंद्रा ॥ नाहीं जय ॥४५॥

ऐशा अनेकीं धर्मनीतीं ॥ शकुंतलेनें बोधिला भूपती ॥ परी लागती दुष्यंतचित्तीं ॥ बोल तयेचे ॥४६॥

ज्यासी जयाची नाहीं चाड ॥ त्यासी वाटते ती बडबड ॥ जैसें तान्हेलें न साहे तोंड ॥ पाक्याचें ॥४७॥

ऐसेंही करितां भूपाळा ॥ परी न सोडीच शकुंतला ॥ ह्नणोनि राव रागें बोलिल ॥ तयेप्रती ॥४८॥

कीं ऐसियासी साक्ष असती ॥ ते वदवीं पां सभेप्रती ॥ तरीच हा माझा पुत्र हे युवती ॥ मानेल मज ॥४९॥

तंव ते ह्नणे सुंदरी ॥ पवनं आकाश आणि धरित्री ॥ आप सूर्य देव अंतरीं ॥ हे साक्षी माझे ॥५०॥

परि तो ह्नणे राव दुष्यंत ॥ हाही मज न गमे सिद्धांत ॥ तरी गगनवाचा वदतां सत्य ॥ मानीन मी ॥५१॥

भारता मग ते शकुंतला ॥ कर जोडोनि लावी निढळा ॥ आणि विनविती जाहली अबळा ॥ पंचभूतांतें ॥५२॥

कीं हा ममपती राजा दुष्यंत ॥ मी पत्नी हा याचाचि सुत ॥ हा बोल जरी असेल सत्य । तरी वदावें ये वेळी ॥५३॥

ह्नणोनि गेली लोटांगणी ॥ तों वाचा जाहली गगनीं ॥ कीं शकुंतला हे तुझी पत्नी ॥ आणि सर्वदमन पुत्र सत्य ॥५४॥

तेव्हां राव आनंदला मनीं ॥ ह्नणे म्यां लौकिकार्य केली उधडणीं ॥ मग लाविली वाद्यध्वनी ॥ नगरामाजी ॥५५॥

आनंदाचीं होती गायनें ॥ सुवासिनी करिती अक्षयवाणें ॥ कुमरा आलिंगी पुत्रपणें ॥ दुष्यंतरावो ॥५६॥

मग त्या नाम ठेविलें भारत ॥ कीं गगनभारती बोलिली सत्य ॥ जो दिंग्मंडळींचा विख्यात ॥ अजिंक्य सर्वी ॥५७॥

त्यापासाव होवोनि संतती ॥ वंश वाढला गा भुपती ॥ ह्नणोनि तुह्मां भारत ह्नणती ॥ पूर्वापर जन ॥५८॥

आतां असो हे वित्पत्ती ॥ तुवां पुसिलें गा भूपती ॥ तरी भारतांची उत्पत्ती ॥ ऐसियापरी ॥५९॥

आतां असो हे पूर्वील कथा ॥ धर्मराजा राज्य करितां ॥ विपावो घडला येक पार्था ॥ तें ऐक राया ॥६०॥

पांडव असतां शक्रप्रस्थीं ॥ तैं नारदे नेमिली रती ॥ तेणें धर्मे सकळ चालती ॥ पंडुपुत्र ॥६१॥

परी कोणे एके अवसरीं ॥ धर्मद्रौपदी असतां मंदिरीं ॥ भ्रमरमंचकाचे अरुवारीं ॥ दोघेंजणे ॥६२॥

तंव येके विप्राचीं गोधनें ॥ वळूनि नेलीं येकेजणें ॥ ती हाक ऐकतां धांवणें ॥ निघाला पार्थ ॥६३॥

परि शस्त्रे होती धर्ममंदिरीं ॥ तेणें पार्थ पडिला विचारीं ॥ कीं धर्म द्रौपदी असतां शेजेवरी ॥ प्रवेशू कैसा ॥६४॥

विधिभंगितां प्रायश्वित्त ॥ आणि गोधनें न सोडवितां नरकपात ॥ ह्नणोनि शस्त्रीं घातला हात ॥ धांवोनिया ॥६५॥

जंव हातीं वसविलें धनुष्यभाते ॥ तंव दोघे देखिली येकस्थितें ॥ मग रथीं बैसोनियां पार्थे ॥ सोडविली गोधनें ॥६६॥

परतोनि आलिया धनुर्धर ॥ धर्मासि करी नमस्कार ॥ ह्नणे मी अपराधी जी थोर ॥ जाईन तीर्था ॥६७॥

तंव धर्म ह्नणे गा पार्था ॥ मी ज्येष्ठबंधू जैसा पिता ॥ तरी अपत्यें काय येकांता ॥ येवोंनये ॥६८॥

धर्मनीतीनें पाहतां निषेधु ॥ परि तूं पुत्र जैसा धाकुटा बंधु ॥ ह्नणोनि इतुका न मानीं खेदु ॥ अवलोकनाचा ॥६९॥

येरु ह्नणे शेजे पांचाळी ॥ म्यां देखिली नेत्रकमळीं ॥ नारदवचनासि तयेकाळी ॥ विसरुं कैसा ॥७०॥

मग समस्तांसि करोनि नमस्कार ॥ तिर्था निघाला पार्थवीर ॥ प्रथम आला वेगवग्त्र ॥ हरिद्वारासी ॥७१॥

तेथें कश्यपाचा रेतजात ॥ सर्प नामें ऐरावत ॥ तया फणीचा महासुत ॥ कौरव नामें ॥७२॥

त्याची कन्या मनोहरी ॥ उलुपी नामें सुंदरीं ॥ ते असे गा उपवरी ॥ त्या गंगेमाजी ॥७३॥

तंव ते सहज गंगाजळीं ॥ अर्जुनें करितां आंघोळी ॥ उलुपीनें धरिला करकमळीं ॥ पतिभावें तो ॥७४॥

ते ह्नणे गा प्राणनाथा ॥ नेत्र शिणले वात पाहतां ॥ तरी मज पर्णी कां आतां ॥ ऐसें न करितां त्यजीन प्राण ॥७५॥

पार्थ ह्नणे वो सुंदरी ॥ मी नेमें असें ब्रह्मचारी ॥ बारावर्षे अवधारीं ॥ असे नेम ॥७६॥

मग सकळही समाचार ॥ उलुपीसि सांगे धनुर्धर ॥ तंव येरी ह्नणे हा वेव्हार ॥ द्रौपदीसींच ॥७७॥

येरी ह्नणे हो गुणनिधी ॥ हा द्रौपदीसीच असे विधी ॥ येरासी तरी नारदीं ॥ दूषिलें नाहीं ॥७८॥

ऐसें अनेकदृष्टातें ॥ अर्जुना प्रबोधिलें कांतें ॥ मग ते वरिली वीरें पार्थे ॥ तये वेळीं ॥७९॥

मग सर्वही सुगंधभार ॥ आणिक भोग परिकर ॥ श्रृंगारोनि भोगस्थळ ॥ विचित्र केलें ॥८०॥

ते महासंभोगसुंदरीं ॥ अर्जुनें भोगिली चारुगात्री ॥ तेणें आनंद झाला गात्रीं ॥ उभयांचिया ॥८१॥

मग तेथोनि होय निघता ॥ आला हिमगिरीपर्वता ॥ कुंतळदेशींचिया तीर्था ॥ केलें स्त्रान ॥८२॥

मग आला गंगासागरीं ॥ आणि प्रवेशला मणिपूरीं ॥ तेथें दृष्टी देखिली सुंदरीं ॥ अनुपम्य जे ॥८३॥

तेथें चित्रवाहन राजा सूर्यवंशी ॥ त्याची कन्या तेजोराशी ॥ चित्रांगी नामें डोळसी ॥ अलोलिक ॥८४॥

ते सप्तखणांचे गोपुरीं ॥ अर्जुनें क्रमित असतां नगरीं ॥ तेणें देखिली सुंदरी ॥ अकस्मात ॥८५॥

मूर्च्छनें गेला चांबारी ॥ आपण सांवरी ॥ ह्नणे हें रत्न सृष्टीवरी ॥ दुजें नाहीं ॥८६॥

हे तरी असे राजन्यका ॥ परि प्रवासियासी काय शंका ॥ भिक्षा मागतां रायारंका ॥ समान सर्व ।८७॥

ह्नणोनि आला राजभुवनीं ॥ तो रायें वोळखिला चिन्हीं ॥ ह्नणे तूं कोण कवणेगुणीं ॥ आलासि येथें ॥८८॥

तंव तो रायासि ह्नणे पार्थ ॥ मी तीर्थवासी असें सत्य ॥ परि तवकन्येस्तव अतीत ॥ आलों राया ॥८९॥

राव ह्नणे हो भगवाना ॥ मी प्रसन्न केलें त्रिनयना ॥ पुत्राभावीं या कन्यारत्ना ॥ पावलों मी ॥९०॥

तरी मज पुत्राची असे आस्था ॥ ह्नणोनि इच्छित देतों दुहिता ॥ तरी पुत्र देईल त्या जामाता ॥ देईन कन्या ॥९१॥

मग ह्नणे पंडुसुत ॥ हा तुमचा पुरवीन मनोरथ ॥ कीं प्रथम जो होईल सुत ॥ तो घ्यावा तुह्मीं ॥९२॥

तें मानवलें दोघांजणा ॥ मग कन्या दीधली अर्जुना ॥ आणी शेंस भरिली दोघांजणा ॥ चित्रवाहनरायें ॥९३॥

भारता तेथें पंडुकुमर ॥ तीनवर्षे जाहला स्थीर ॥ तंव चित्रांगीस जाहला पुत्र ॥ बभ्रुवाहन तो ॥९४॥

तयेसि मागील कथोनि कथा ॥ आज्ञा घेवोनि नृपनाथा ॥ अर्जुन जाहला निघता ॥ तेथोनियां ॥९५॥

ऐसा आला दक्षिणपंथें ॥ तेथें देखिलीं पंचतीर्थे ॥ परि वोस पडलीं निमित्तें ॥ भयास्तव ॥९६॥

तंव तेथें अकस्मातीं ॥ येक भेटला द्विजजाती ॥ अर्जुन ह्नणे गा वेदमूर्ती ॥ सांगा मज ॥९७॥

ऐसीं असोनि महातीर्थे ॥ कैसेन जाहलीं उपहतें ॥ तें सांगावें येकचिते ॥ मजप्रती ॥९८॥

द्विज ह्नणे गा धनुर्धरा ॥ येथे ग्रहो नामें जळचरा ॥ तो स्त्रान करितां जीवमात्रा ॥ करितो घात ॥९९॥

मग तें जाणोनि द्रूषण ॥ अर्जुनें तेथें केलें मार्जन ॥ तंव दोन्ही धरिले चरण ॥ ग्रहजातीयें ॥१००॥

चरण झाडितां पंडुनंदना ॥ तंव ग्रहजाती जाहल्या अंगना ॥ कीं ज्या मेलियाही मदना ॥ जीववूं शकती ॥१॥

तंव तो होवोनि विस्मित ॥ तयांसि पुसे पंडुसुत ॥ कीं तुह्मी जळग्रह व्हावया वृत्तांत ॥ काय जाहला ॥२॥

त्या ह्नणती गा धनुर्धरा ॥ आह्मी कुबेराच्या अप्सरा ॥ तपा ढाळितां ऋषीश्वरां ॥ पावलों शाप ॥३॥

कीं ग्रह व्हाल अगस्तितीर्थी ॥ मग पांडव द्वापारी जन्मती ॥ त्यांतील अर्जुनाचे स्पर्शीती ॥ याल स्वस्थानीं ॥४॥

तरी तूं आमुचा देहदात ॥ मग नमन करोनियां पार्था ॥ त्या गेल्या गगनपंथा ॥ पांचहीजणी ॥५॥

पार्थ तेथोनि जाहला निघता ॥ तंव भेटी झाली अर्जुनहनुमंता ॥ ते वाढली असे लोकवार्ता ॥ विलासासी ॥६॥

हें बोलिलें असे प्राकृत्ती ॥ परी नसे व्यासांची उक्ती ॥ येरव्हीं लिहितां काय ग्रंथीं ॥ करितों आळस ॥७॥

जैं खांडववन जाळी पार्थ ॥ तैं ध्वजी होता हनुमंत ॥ तैसाचि आणोनि दीधला रथ ॥ अग्निपुरुषें ॥८॥

आणि देवीं प्रळयकाळीं ॥ शस्त्रें ठेविलीं वरुणाजवळी ॥ तीं अर्जुना दीधलीं ते वेळीं ॥ अग्निपुरुषें ॥९॥

असो आतां गोकर्णरामेश्वरा ॥ करोनि आला प्रभास क्षेत्रा ॥ तेथें भेटला यादवेश्वरा ॥ कृष्णदेवासी ॥११०॥

तो कापडी परिलक्षणें ॥ अर्जुन वोळखिला नारायणें ॥ मग नमन क्षेमालिंगनें ॥ झालीं सकळां ॥११॥

कृष्ण ह्नणे सखया पार्था ॥ बारावर्षें कां सेविलें तीर्थी ॥ मग सांगितली सर्वकथा ॥ धर्मद्रौपदीची ॥१२॥

ह्नणोनियां गा सर्वेश्वरा ॥ म्यां केल्या तीर्थयात्रा ॥ त्या सफळ जाहल्या सर्वत्रा ॥ तवदर्शनें ॥१३॥

तंव कृष्ण ह्नणे गा पार्था ॥ बारावर्षें क्रमिलीं प्रायश्चित्ता ॥ तरी शुद्ध झालासी जयातीर्थी ॥ तीं सांगें मज ॥१४॥

मग ह्नणे धनंजयो ॥ देवा तूं सकळतीर्थाचा रावो ॥ परि देखिलीं तयांचा प्रभावो ॥ ऐक आतां ॥१५॥

प्रथम जटा पशुपती ॥ भगीरथा दीधली भागीरथी ॥ ते सप्तवा जाहली वातघातीं ॥ येतयेतां ॥१६॥

हरिदिनी आणि नंदिनीं ॥ सुचक्षा आणि पावनी ॥ या चार गा पश्विमवाहिनी ॥ गंगा पवित्र ॥१७॥

सीता सिंधू भागीरथी ॥ या पूर्वेस तिन्ही वाहती ॥ हे सप्तओघ गा श्रीपती ॥ वंदिले आपण ॥१८॥

हरिद्वार बद्रिकेदार ॥ कामाक्षी कांतीदुळ वैश्वानर ॥ माहुर मातुलिंग प्रथमकाळेश्वर ॥ आणि गंगासागर पैं ॥१९॥

हिंगुळा असापुरी नेपाळ ॥ जगन्नाथ पंढरी त्रिमल्ल ॥ रंगनाथ मल्लिकार्जुन हिमशैल ॥ आणि ज्योतिलिंगें पैं ॥१२०॥

पंपातीर्थ मथुरा रामेश्वर ॥ अनंतशयन विमळ जंबुकेश्वर ॥ शुक्लतीर्थ शूळपाणी हरिहर ॥ आणि गोदासागर पैं ॥२१॥

गोसमाधी गोकर्ण कन्याकुमरी ॥ काळस्त्री त्रिमल्ल ब्रह्मगिरी ॥ आणि पुण्यतीर्थ गोदावरी ॥ कृष्णासागरसंगम ॥२२॥

प्रयाग काशी कामरु ॥ अंबुअयोध्या मानस सरोवरु ॥ लोणारु रेणुका पंपासरोवरु ॥ आणि चित्रकूट पैं ॥२३॥

वेदपुर वंजरा काळिका ॥ कर्‍हाड काळहस्ती चंडिका ॥ प्रेतवहनी आदिअंबिका ॥ आणि गोरक्षी हटडी पैं ॥२४॥

येळोर येळराजकांती ॥ गया नर्मदा भागीरथी ॥ यमुना भीमा तपती ॥ आणि हपीविरुपाक्ष ॥२५॥

नैमिषारण्य महाभद्रकाळी ॥ शशिबिंदु विरुपाक्षकदली ॥ श्रीपाद सिंधुमती महाकाली ॥ आणि रामघांट पैं ॥२६॥

आदित्र्यंबक कोटेश्वर ॥ चंद्रगौतमी सिद्धमुरुडेश्वर ॥ स्वामी ज्वालामुखी कर्दमेश्वर ॥ आणि जयनारसिंह ॥२७॥

धूळखेट मलया सारणेश्वर ॥ वाई पुष्कर महाबळेश्वर ॥ सिद्धवंशकर नारायण धामेश्वर ॥ महापवित्र ॥२८॥

निवृत्तिसंगम नाशिकवरापर्वत ॥ प्राचीभास्कर नारसिंहपर्वत ॥ जटाशंकर सिद्धपुर सत्य ॥ आणि वासरसरस्वती ॥२९॥

चंपकारण्य गंडिका तुळजारामेश्वर ॥ नागपाटण पीटपुर सिद्धेश्वर ॥ त्रिचनापल्ली खांडेपाखाळ लक्ष्मणेश्वर ॥ शिवकांची आणि विष्णुकांची ॥१३०॥

गुप्तप्रयाग कुरुक्षेत्र अंबुवन सुंदर ॥ काश्मीर क्षिप्रा चंडिकेदार ॥ मंजरथतीर्थी बिल्वेश्वर ॥ नांदें दत्तात्रेय पैं ॥३१॥

नीळकंठ खेटक वैतरणी ॥ सुरनदी शंखोद्धारस्था कामिनी ॥ मूळमाधव कनकेश्वर चक्रपाणी ॥ आणि पंचतीर्थे पैं ॥३२॥

जयंती गोमती धारेश्वर ॥ जुनागड वेदवती गौतमेश्वर ॥ तुंगभद्रा कावेरी भुलेश्वर ॥ आणि ताम्रपर्णी पैं ॥३३॥

अहिरावण कोण कोल्हापुर ॥ महिरावण प्रणिता नादपुर ॥ भ्रमरअंबा गोरक्षीपुर ॥ आणि गोरक्षीमठी पैं ॥३४॥

मूळतापी राजमहेंद्रा काळिजरु ॥ लंका चांगदेव कुवचेश्वरु ॥ नगरमांधाता जंजावर मोरेश्वरु ॥ मल्लारी ह्नाळसा पैं ॥३५॥

गुप्तकेदार चोरभगवती ॥ मलबार कालिकोट गोमती ॥ सर्वोद्धार धर्मपुर द्वारावती ॥ देखिली आतां ॥ ॥३६॥

आलापुर जोगेश्वरी देवी ॥ कलंकेश्वरी विराटदेवी ॥ हस्तनापुर उष्णबावी ॥ आणि चरण तुझे ॥३७॥

आणिकही उपतीर्थी ॥ स्नानें केलीं असंख्यातां ॥ परि तवदर्शनें अखिलदुरितां ॥ जाहलों वेगळा ॥३८॥

ह्नणाल हें नव्हे ऋषिवचन ॥ परि ताटीं वाढितां मुख्यान्न ॥ मग शाखा अनेकपूर्ण ॥ अन्नरुचीसी ॥३९॥

तैसी तया कुंतिकुमरा ॥ बारावर्षे घडली तीर्थयात्रा ॥ तीं पृथकें सांगतां दोषयात्रा ॥ न करावें कीं ॥१४०॥

मग संतोष जाहला श्रीधरा ॥ ह्नणे सुभद्रा झाली उपवरा ॥ ते देवोनि कुंतिकुमरा ॥ करुं मित्र ॥४१॥

ऐसें चिंतोनि निजमनीं ॥ अर्जुन नेला राजभुवनीं ॥ तेथें बळदेवादि करोनी ॥ भेटला सकळां ॥४२॥

तंव ते सुभद्रा नयनें ॥ वागतां देखिली अर्जुनें ॥ मग खोंचला कामबाणें ॥ मनामाजी ॥४३॥

तें जाणवलें गोपिनाथा ॥ मग तेणें प्रबोधिलें पार्था ॥ कीं हे कन्या स्वयंवर होतां ॥ हरावी तुवां ॥४४॥

सुभद्रेनेंही देखिला पार्थ ॥ मनीं ह्नणे हा व्हावा कति ॥ तें जाणोनिया गोपिनाथ ॥ अनुवादला सुभद्रेसी ॥४५॥

ह्नणे हा अर्जुन धनुर्धर ॥ सुभद्रे तुज मेळवीन वर ॥ तरी न घालावा अवसर ॥ आणिकासी ॥४६॥

मग त्या सुभद्रेचे चित्ता ॥ आणि कृष्णाचिये अनुमता ॥ अर्जुनें पुसूं धाडिलें शक्रप्रस्था ॥ धर्माप्रती ॥४७॥

तें मानवलें धर्मकुंतीतें ॥ पार्था लिहूनि आलीं लिखितें ॥ ह्नणे हें घडतां कुळमाते ॥ देईन नवस ॥४८॥

तंव मांडिली सैंवरआयती ॥ सुभद्रे दुर्योधन योजिला पती ॥ पत्रें धाडिलीं रायाप्रती ॥ मूळ सर्वा ॥४९॥

कृष्ण ह्नणे दादा बळिभद्रा ॥ रैवताचळा न्यावी सुभद्रा ॥ यात्रा करोनि गौरीहरा ॥ आणा वहिलीं ॥१५०॥

मग यादवेंसी उग्रसेन ॥ भोजवंशीय रेवतीमय ॥ सुभद्रा रथीं घालोन ॥ निघाले यात्रें ॥५१॥

कृष्णें आपुला रत्नजडित ॥ अर्जुनासि दीधला रथ ॥ आपण राहिला गोपिनाथ ॥ द्वारकेसी ॥५२॥

अनेकांपरी त्या पंडुपुत्रा ॥ कृष्णें कथिलें बीजमंत्रा ॥ कीं मार्गी जातां सुभद्रा ॥ हरावी तुवां ॥५३॥

असो जंव करोनि गौयात्रा ॥ यादव येतहोते नगरा ॥ रथ तंव प्रेरोनि सुभद्रा ॥ हरिली अर्जुनें ॥५४॥

कीं स्वर्गस्थ अमृतघट सुपर्ण ॥ जैसा घेतसे झेंप घालोन ॥ तैसें केलें सुभद्राहरण ॥ पार्थवीरें ॥५५॥

तंव जाहला हाहाःकार ॥ कटकीं नेणती आपपर ॥ वीर पाहती परि सैन्यभार ॥ न देखती पारिका ॥५६॥

त्याहीं देखिलें धनुर्धरा ॥ भगवाकापडी सवें सुभद्रा ॥ परी तें देखोनि बळिभद्रा ॥ आला कोप ॥५७॥

जात असतां उत्तरपंथें ॥ रथ फिरविला तत्काळ पार्थे ॥ कीं रणीं पाठि देतां कुंतीमाते ॥ अप्रिय होणें ॥५८॥

येकावांचोनियां कृष्णा ॥ यादव बळदेव उग्रसेना ॥ नागवीन या सकळां जाणा ॥ हे प्रतिज्ञा साच माझी ॥५९॥

तंव सरसावले यादववीर ॥ धनुष्या करोनि टणत्कार ॥ वाद्यें वाजती भयंकर ॥ नादें कोंदलें नभ तेथें ॥१६०॥

सुभद्रा चिंतितसे मनीं ॥ कीं कैसी उभयां जाहलें वैरिणी ॥ धांव आतां शारंगपाणी ॥ द्वारकाधीशा ॥६१॥

तें मनीं वसतसे माधवा ॥ परी सुभद्रेचा ऐकोनि धांवा ॥ येणें जाहलें कृष्णदेवा ॥ रैवताचळासी ॥६२॥

तंव त्रासिले यादववीरां ॥ पाहे अर्जुन रथीं सुभद्रा ॥ मग हांसें आलें शारंगधरा ॥ विनोदें तेणें ॥६३॥

तें पाहोनि रेवतीरमणें ॥ ह्नणे हें कृष्णाचेंचि करणें ॥ येर्‍हवीं आमुचें पाहोनि उणें ॥ कोप न सोडिता ॥६४॥

मग बळिभद्रासि ह्नणे कृष्ण ॥ हा दोपक्षीं सोहिरा पूर्ण ॥ सखा सोइरा होतां अवगुण ॥ काय तुह्मांतें ॥६५॥

यासी कोणीही नरेंद्र ॥ झुंजता न पुरे स्वयें इंद्र ॥ आतां राखाजी पडिवार ॥ आपुला तुह्मीं ॥ ॥६६॥

यापरी बळदेवा करोनि शांत ॥ सामोरा गेला गोपिनाथ ॥ हातीं धरोनि सुभद्राकांत ॥ आणिला जवळी ॥६७॥

समस्तां जाहलें वाधावणें ॥ परस्परेंसी आलिंगनें ॥ वधुवरें आणिलीं सुलग्नें ॥ द्वारकेसी ॥६८॥

मग सुदिनीं ते वेदमंत्रें ॥ सुभद्रा वरिली पंडुपुत्रें ॥ द्वारके राहिला नवरात्रें ॥ अर्जुन तो ॥६९॥

हे आदिपर्वीची कथा ॥ परि भागवतीं आन वार्ता ॥ कीं युद्ध जाहलें यादवांपार्था ॥ सानसान ॥१७०॥

असो पुष्करावरोनि इंद्रप्रस्था ॥ अर्जुन आला गा भारता ॥ बारावर्षें जाहलीं मोजितां ॥ प्रायश्वित्तासी ॥७१॥

सवें सुभद्रा पद्मिणी ॥ अनुपम्य गुणवर्धिनी ॥ रथ वाजिन्नला सुपवनीं ॥ शक्रप्रथा ॥७२॥

तें ऐकिलें भीमसेनें ॥ नगरी केलें वाधावणे ॥ उभवोनि गुढिया तोरणें ॥ आले भेटावया ॥७३॥

सकळां भेटोनि सहोदरां ॥ चरणीं लागली सुभद्रा ॥ अर्जुन गेला राजमंदिरा ॥ आनंदेंसी ॥७४॥

नमन करोनि कुंतीमाते ॥ पार्थ भेटला द्रौपदीतें ॥ तंव कृष्ण आला काळसंकेतें ॥ भेटावयासी ॥७५॥

वस्त्रें द्यावया समस्तां ॥ आणि धर्मभेटीची आस्था ॥ ह्नणोनि बळदेव आले शक्रप्रस्था ॥ यादवेंसी ॥७६॥

तेथें उभयतां परस्परें ॥ येकमेकां जाहली वस्त्रें ॥ मग सुभद्रें नेलें बळिभद्रें ॥ मूळ करोनी ॥७७॥

परि अर्जुनाचिये प्रीतीं ॥ कृष्ण राहिला इंद्रप्रस्थी ॥ तेथें पर्णिली देवें युवती ॥ कालिंदी ते ॥७८॥

पारधी खेळती पार्थकृष्ण ॥ तों अवचित आला येक ब्राह्मण ॥ महारोगी अंग संकीर्ण ॥ अग्निपुरुष ॥७९॥

तेणें आशिर्वाद केला उभयांसी ॥ ह्नणे श्वेतकीर्ती राव सोमवंशीं ॥ तेणें केली मज मोडशी ॥ घृतावदानें ॥८०॥

बारावर्षे आहुती ॥ मुसळधारीं चाले संतती ॥ द्रव्यहवनांची गणती ॥ आथीचना ॥ ॥८१॥ ]

तेणें जाहलें गा अजीर्ण ॥ रोगें व्याधिष्ट असे पूर्ण ॥ ब्रह्याने जाणोनि नरनारायण ॥ धाडिले येथें ॥८२॥

तरी खांडववनीं औषधी ॥ तेणें हरेल माझी व्याधी ॥ हें सांगितलें असे वैद्यी ॥ अश्विनौदेवीं ॥८३॥

आतां विनंती गा कृष्णपार्था ॥ मजसी तें वन द्यावें भक्षार्था ॥ आणि तुह्मां असतां सुरनाथा ॥ न शंके मी ॥८४॥

आतां असो या पुनरागता ॥ हे चतुर्थस्तबकीं असे कथा ॥ खांडववनदाह श्रोतां ॥ पहावें तेथें ॥८५॥

मग कृष्ण ह्नणे धर्माप्रती ॥ अगा पुरुष अथवा युवती ॥ वेळ न पाहतां असतांही सुरपती ॥ पडती अपायीं ॥८६॥

देव अथवा ऋषेश्वर ॥ जटी मौनी दिगंबर ॥ मदन कोपलिया विचार ॥ पांगुळा होय ॥८७॥

स्त्री जाहलिया ऋतुमती ॥ चारी दिवस त्यजावी युवती ॥ आणि चौमासां पासाववरुती ॥ गरोदरी ते ॥८८॥

ह्नणोनि अन्न पडे जें जठरीं ॥ तो पाक होय अहोरात्री ॥ उत्तम भाग तें रेत निर्धारी ॥ मध्यम रक्त निर्मळ ॥८९॥

ऐसें नित्य सांचे शुक्र ॥ तें कोणा न राखवे रौद्र ॥ तपानुष्ठान हरावया तीव्र ॥ नाहीं दुजें ॥९०॥

ह्नणोनि गा पंडुसुता ॥ पुरुषें कराव्या दोन कांता ॥ त्यावांचोनिया श्रीमंता ॥ अपाव जाण ॥९१॥

तरी तुह्मां पांचां येक युवती ॥ दहामासीं येकासि ये रती ॥ येक गृहस्थ परि चवधियां यती ॥ होणें लागे ॥९२॥

परि हे निर्मळ गा राजनीती ॥ अतीतअभ्यागताना विश्रांती ॥ कीं वृक्ष निराश्रयो पर्वतीं ॥ उदकेंविण जैसें ॥९३॥

आतां ऐकें युधिष्ठिरा ॥ जेवीं अर्जुनें वरिली सुभद्रा ॥ तैशा कराव्या भोगाचरा ॥ युवती तुह्मीं ॥९४॥

तें मानवलें पंडुकुमरां ॥ मग कृष्ण गेला द्वारकापुरा ॥ आतां स्त्रिया जाहल्या समग्रां ॥ तें ऐकावें जी ॥९५॥

गोवसेन रायाची नंदिनी ॥ देविका नामें चंद्रवदनी ॥ ते पर्णिली असे पत्नी ॥ धर्मरायें ॥९६॥

आणि बळधन्या नामें सुंदरी ॥ जे काशीश्वराची कुमरी ॥ ते वरिली गा वेदमंत्रीं ॥ भीमसेनें ॥९७॥

उलूपी आणि सुभद्रा ॥ तिसरी चित्रांगी सुंदरा ॥ या तिघी युवती गा नरेंद्रा ॥ अर्जुनाचिया ॥९८॥

चैद्यराजयाची जे बाळा ॥ ती दीधली राया नकुळा ॥ करुणावती नामें सकळां ॥ वरिष्ठ जे ॥९९॥

आणि मद्ररायाची सुता ॥ ते सहदेवा केली कांता ॥ विजया नामें मन्मथा ॥ माजवण जे ॥२००॥

ऐसें पांडव राज्य करितां ॥ मग पुत्र जाहले समस्तां ॥ तें सकळ ऐकें गा आतां ॥ परिक्षितिपुत्रा ॥१॥

प्रतिविंध्य श्रुतसेन श्रुतकीतीं ॥ शतानीक श्रुतकर्मा हे द्रौपदीसती ॥ प्रसवलीसे धर्मादिकगती ॥ अनुक्रमेंसी ॥२॥

आणिक धर्माची जे राणी ॥ देविका नामें चंद्रवदनी ॥ तिसी माध्ययु जाहला गुणमणी ॥ पुत्र येक ॥३॥

भीमसेनाचा प्रथम कुमर ॥ हेडंबीउदरीं घटोत्कचवीर ॥ बळधन्येचा सर्वगम्यवीर ॥ बभ्रु पद्मावतीचा ॥४॥

अर्जुनाची पत्नी सुभद्रा ॥ ते प्रसवली अभिमन्युवीरा ॥ आणि बभ्रुवाहन दुसरा ॥ चित्रांगीचा ॥५॥

नकुळाचा विख्यात कुमर ॥ त्रिमी नामेम महावीर ॥ तो करुणावतीचा निर्धार ॥ पुत्ररावो ॥६॥

सहदेवाची जे कांता ॥ विजया नामें गा भारता ॥ ते सहोत्र नामें विख्याता ॥ प्रसवली पुत्रा ॥७॥

तंव ह्नणे जन्मेजयो ॥ अभिमन्यू ह्नणती विकटबाहो ॥ तें व्हावया काय उपावो ॥ जाहला मुने ॥८॥

मग ह्नणती ऋषेश्वर ॥ अभिमन्यू चंद्राचा अवतार ॥ ह्नणोनि उदरीं जाहला सहस्त्रकर ॥ तेणेगुणें ॥९॥

तरी पूर्वी त्या निशांपतीप्रती ॥ शापिलें होतें बृहस्पती ॥ कीं मनुष्यदेहीं रे विपत्ती ॥ पावसी तूं ॥२१०॥

परी विष्णुपुराणींचा विचार ॥ कीं अभिमन्यू जाहला सहस्त्रकर ॥ तो सहस्त्रार्जुनाचा अवतार ॥ तेणेंमतें ॥११॥

असो द्वारके असतां सुभद्रा ॥ तयेनें भीमकीघरीं केली निद्रा ॥ तंव ते कृष्णासि ह्नणे गा सहोदरा ॥ सांगें वार्ता युद्धाची ॥१२॥

तेथें चक्रविभूचे चरित्रा ॥ ऐकतां निजेली सुभद्रा ॥ तो हुंकार तीधला शारंगधरा ॥ गर्भे तेणें ॥१३॥

ते जाणोनि गर्भवाणी ॥ मनीं चमकला चक्रपाणी ॥ मग विचारोनि पाहिलें मनीं ॥ तंव तो निशापती सत्यत्वें ॥१४॥

मागील आठवलें शारंगधरा ॥ कीं येणें हरिली गुरुची तांरा ॥ तरी हा झुंजतां सुरनरां ॥ आणील उणें ॥१५॥

येणें हरिली जैं तारा ॥ तैं रणी पळविलें त्रिनेत्रा ॥ आणि इंद्रादिकां समग्रां ॥ घातलें हींव ॥१६॥

हा असलिया सहस्त्रबाहो ॥ मग उग्रसेन कैंचा रावो ॥ ह्नणोनि उदरीं घातला घावो ॥ सुदर्शनाचा ॥१७॥

उदकें न्हाणोनि सुदर्शन ॥ तें सुभद्रेसी पाजिलें जीवन ॥ कीं दोन राखोनि येर खंडन ॥ करावे भुज ॥१८॥

गर्भी पावतां तें अमृत ॥ हस्त विराले लवणवत ॥ निद्रा न भंगितांही किंचित ॥ सुभद्रेची ॥१९॥

अन्यमतें चक्रविभूचें रिघावणें ॥ हें ऐकिले गर्भे तेणें ॥ तंव कथा राहविली कृष्णे ॥ निर्गमाची ॥२२०॥

हें आदिपर्वी वर्णिलें संस्कृत ॥ जें परंपरा ऋषिप्रणीत ॥ तें म्यां कथिलेंसे प्राकृत ॥ अनंतप्रसादें ॥२१॥

हें पांडवांचे आख्यान ॥ सभाग्यासी होय श्रवण ॥ तेणें महादोष गहन ॥ हरतील सत्य ॥२२॥

तया स्त्रान गंगासागरीं ॥ कीं पूजा वाहिली केदारीं ॥ जेणें ऐकिली अवधारीं ॥ भारती है ॥२३॥

कीं पृथ्वीचिये प्रदक्षिणे ॥ तें पुण्य जोडे कथाश्रवणें ॥ किंवा वाहिलीं कनकसुमनें ॥ रामेश्वरासी ॥२४॥

ब्रह्महत्या गोघाती विशेष ॥ ते श्रवणें होतील निर्दोष ॥ जैंसें तेजें जाळी तमास ॥ भानुबिंब ॥२५॥

आतां याचिये पुढील कथा ॥ मुनी सांगतील भारता ॥ ती ऐकावी सकळ श्रोतां ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥२६॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ पंमस्तबक मनोहरु ॥ पांडववर्णनपरिकरु ॥ चतुर्दशोऽध्यायीं सांगीतलें ॥२२७॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ ॥ शुभंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP