कथाकल्पतरू - स्तबक ३ - अध्याय १२

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

वीरभद्रें करोनि ख्याती ॥ रणी मारिला दक्षप्रजापती ॥ मग आनंदोनि कैलासपर्वती ॥ गेले शिवदूत ॥१॥

इकडे भृत्य गेला धांवत ॥ तेणें राउळी जाणविली मात ॥ कीं युद्धीं पडिला दक्षनाथ ॥ संगमीं क्षिप्रेचिया ॥२॥

ह्नणे रायें वीरभद्र आणिला क्षितीं ॥ तंव झडपिला शिवदूतीं ॥ ऐसे कपटें करोनि प्रजापती ॥ आणिला तळासी ॥३॥

तयाचें भूतसंचारें शिर ॥ माते फिरे हो चौफेर ॥ मारितां अत्यंत शस्त्रास्त्र ॥ परि न तुटे कांहीं ॥४॥

तें न तुटे शस्त्रास्त्रीं ॥ ह्नणोनि मुरडिलें शिववीरीं ॥ होमीं जाळिले अवधारीं ॥ दक्षशिर ॥५॥

ऐसें केलें हो प्रसूते ॥ थोर विटंबिलें लोकपाळांतें ॥ मग ते निघोनि कैलासातें ॥ गेले शिवदूत ॥६॥

ऐसें ऐकताचि श्रवणीं ॥ मग उठिली दक्षराणी ॥ जे स्वायंभुमनूची नंदिनी ॥ प्रसूती नामें ॥७॥

ते महा पतिव्रता सती ॥ जयेची सकळीं ऐकिजे कीर्ती ॥ पुढें तयेचे भाव भक्ती ॥ तोषला रुद्र ॥८॥

तंव कुमरीनीं केला कल्लोळ ॥ नगरीं उठिला आंरोळ ॥ मग बोलिली मंजुळ ॥ सती त्यांतें ॥९॥

गांभीर्ये ह्नणे प्रसूती ॥ व्यर्थ कां करितां बोभाइती ॥ प्रळ्यो आणि उत्पत्ती ॥ सरिसेचि जीवां ॥१०॥

जरी राखिलें हें शरीर ॥ तरी नासेल हाचिं निर्धार ॥ मग संग्रामीं पडिजे समोर ॥ तेंचि शूरत्व ॥११॥

ऐसें बोलोनि सुललितीं ॥ मग बैसली सत्वाचे अंतीं ॥ कलशें उदक आपुले हातीं ॥ घेतलें माथां ॥१२॥

ह्नणे माझा प्रियपती ॥ तो जातसे कैलासाप्रती ॥ तया भेटेन मी अवचितीं ॥ श्रृंगारेंसी ॥१३॥

नेसली सुताचें पातळ ॥ पल्लव पिंवळा अळुमाळ ॥ धारिये रंगला बहुळ ॥ कुसुमरंगाचा ॥१४॥

वरी कनकवर्णाची चोळी ॥ बिरडे कसिलें मुक्ताफळीं ॥ कांस कसिली सुढाळीं ॥ पातळधारीं ॥१५॥

कंठीं नवरत्नांचा हारु ॥ पीवरस्तनीं शोभला उरु ॥ मध्यें शोभला गळसरु ॥ चौं सरांचा ॥१६॥

तांबूलें भरोनि वक्र ॥ विदुमांपरी शोभती अंधर ॥ दर्शन गमले अंकुर ॥ माणिकांचे ॥१७॥

नासीक शोभे मुक्ताफळें ॥ रत्नकंकणे सोज्वळें ॥ चारी भेटले निश्वळें ॥ सहोदर तेथें ॥१८॥

नेत्रमीन अति चंचळ ॥ वीर काजळ रुतलें अळुमाळ ॥ सोगां पातले बुबुळ ॥ व्यंकटा रोषें ॥१९॥

करुनि भिंवईची धनुवटी ॥ तेथें नेत्रबाणांची काठी ॥ जाणों ते आणील पाठीं ॥ मागुता दक्ष ॥२०॥

श्रवण शोभले कनकपत्रीं ॥ नगां दीपन केशरीं ॥ फुलें खोविली भ्रमरी ॥ मुक्तांगनेशीं ॥२१॥

भाळी चर्चूनियां कस्तुरी ॥ वरी अर्धचंद्राची चिरी ॥ भांग भरिलासे शेंदुरी ॥ महासतीचा ॥२२॥

फणी शीसफूल गोंडा ॥ राखडी भवंडु आणि दंडा ॥ कुरळें वाहूनिया जुडा ॥ खोंविलीं सुमनें ॥२३॥

करीं कळाविया कंकण ॥ मुद्रिका रत्नें सुलक्षण ॥ चरणीं मिरवले पैंजण ॥ दशांगुळासी ॥२४॥

शोभती वांकी बाहुटे ॥ किंकिणी किलकिलती नेटें ॥ श्रृंगार बाणला बरवंटे ॥ प्रसूतेसी ॥२५॥

मग हातीं घेवोनि आरसा ॥ माजी रुप पाहतसे डोळसा ॥ ह्नणे आजि श्रृंगार अनारिसा ॥ गमला मज ॥२६॥

होतां श्रृंगाराची आईती ॥ स्फुरणें दाटली महासती ॥ घोडी आणारे आरती ॥ ह्नणे प्रसूता ॥२७॥

तंव शुकसाळ्या आक्रंदती ॥ मोहें कुमरी प्रजा चरणीं लागती ॥ राहें राहें हो सुमतीं ॥ ह्नणती प्रसूते ॥२८॥

आह्मां रुसला प्रजापती ॥ परि तूं सांडुं नको संगती ॥ ह्नणोनि चरणावरी घालिती ॥ बाळकांतें ॥२९॥

आह्मां नाहीं बंधु सहोदर ॥ आतां तूंचि माये माहेर ॥ कोण करील मनश्रृंगार ॥ तुजवीण हो ॥३०॥

जरी जाहली रायाची राणी ॥ परि ते कन्या स्मरे जननी ॥ तिचिये हातींचे पेजपाणी ॥ अमृतासम ॥३१॥

चक्रोर चिंती पूर्णचंद्रा ॥ कीं मयूर स्मरे जलंधरा ॥ तैसी चिंतितसे माहेरा ॥ कन्या ते हो ॥३२॥

अस्त जाहलिया गभस्ता ॥ पथिक चिंती सांगाती ॥ अथवा औषधीतें स्मरती ॥ रोगिये जैसे ॥३३॥

कीं मीनं अंतरी स्मरे जळ ॥ कीं पोळियेलें स्मरे शीतळ ॥ तैसें सदा चिंती बाळ ॥ मातृकेसी ॥३४॥

कीं कोकिळा वसंतॠतीं ॥ नातरी नलिनीसी गर्भस्ती ॥ तैसें स्मरें हो प्रसूती ॥ अखंड आह्मां ॥३५॥

ह्नणवोनि येती लोटांगणीं ॥ अंगुष्ठ घालिती वदनीं ॥ परि ते न पाहे नयनीं ॥ तयांकडे ॥३६॥

मग कन्या वाहोनि हातीं ॥ प्रधान बोलाविला सुमती ॥ ह्नणे तुज निरविलें सेनेप्रती ॥ आणि कन्यांसी ॥३७॥

करावें धर्माचें रक्षण ॥ पाळावे प्रजा ब्राह्मण ॥ स्नेहें करावें पाळिग्रहण ॥ सेना कन्यांचें ॥ ॥३८॥

तूं रायाचा धर्मपुत्र ॥ सुमती नामें महापवित्र ॥ तुवां फेडावा सार ॥ आमुचे मुखींचा ॥३९॥

तेणें प्रधान गेला विकळी ॥ हदय भिजलें नेत्रजळीं ॥ मग चरण ठेवोनि निढळीं ॥ विनवीतसे ॥४०॥

ह्नणे माये ऐक विनवणी ॥ राया देवों निदाघपाणी ॥ तुह्मी बैसा हो सिंहासनीं ॥ मी चालवीन राज्य ॥४१॥

तंव ह्नणे दक्षराणीं ॥ स्त्रियेसि राज्य हे विटंबणी ॥ भ्रतारे विण दूषणीं ॥ निंदिती लोक ॥४२॥

आणिक ऐकें गा विचार ॥ वंशा व्हावया विस्तार ॥ जरी पुत्र असे राज्यधर ॥ तरी राहे एखादी ॥४३॥

नदी आटलिया बांधरा ॥ कीं पती निमालिया श्रूंगारा ॥ कीं अस्त झालिया आतपत्रा ॥ प्रयोजन काई ॥४४॥

तैसी भ्रतारेंवीण स्त्री ॥ ते रंडा आणि अपुत्री ॥ तयेसि हर्ष राज्यछत्री ॥ कैं शोभे गा ॥४५॥

देव आणि पितृॠण ॥ तिसरें जाणिजे मनुष्यॠण ॥ हीं पडतां शरीरीं गहन ॥ तैं सोडवी पुत्र ॥४६॥

असो पतिपुत्रेंविण जे नारी ॥ ते शिणली गा येरझारीं ॥ ती चिंतेचिया अंगोरीं ॥ प्रज्वळे सदा ॥४७॥

तूं करितोसि रे आग्रहो ॥ राज्यभिलाषें नाहीं संग्रहो ॥ इतुकें जाणोनि विग्रंहो ॥ राखिजे कैसा ॥४८॥

आतां वेगीं करा आइती ॥ दूरी गेले प्रजापती ॥ आणिक बोलतां अपघातीं ॥ त्यजीन देह ॥४९॥

ऐसें प्रसूतीचें वचन ॥ प्रधानें ऐकिलें निर्वाण ॥ मग घोडी आणिली सुलक्षण ॥ शुभ्रवणीं ॥५०॥

मग चरण वंदोनि मुष्टी ॥ वेगीं आरुढे अश्विनीपृष्ठीं ॥ आणि सोडिली वीरगुंठी ॥ सतीयें पैं ॥५१॥

लागलें दुंदुभीनिशाण ॥ सत्वें जाहलें प्रसन्नवदन ॥ आंगीं दाटलें भूषण ॥ अति स्फुरणाचें ॥५२॥

हातीं मिरवे नारिकेळ ॥ टाकीतसे रत्नांचें किळ ॥ दुरडां भरोनि तांबूल ॥ अविंधमुक्तांचे ॥५३॥

मागें रुळती कुरळ ॥ माथां शेंदुराची खोळ ॥ पत्रें पुष्पें टाकिती सकळ ॥ मस्तकावरी ॥५४॥

तुळशी सुमनांचिया माळा ॥ शोभती मस्तकी आणि गळां ॥ ऐसी चालिलीसे बाळा ॥ स्वायंभुमनूची ॥५५॥

उदो देतसे प्रजापती ॥ आरसां मुख न्याहाळी ती ॥ आणि नाम असे घेती ॥ शारंगधराचें ॥ ॥५६॥

मग वानिलें बंदिजनीं ॥ तुझा प्रभाव हो मनुनंदिनी ॥ तुजऐसी या त्रिभुवनीं ॥ नाहीं पतिव्रता ॥५७॥

उच्चारिती दोन्ही कुळें ॥ काळावरि करोनि आगळें ॥ ह्नणती स्वर्गी भोगिसी सोहळे ॥ भ्रतारेंसी ॥५८॥

तुं सतियाशिरोमणी ॥ दक्षरायाची पठ्ठराणी ॥ जे शापिलें शूळपाणी ॥ चारी युगें ॥५९॥

तो तरी रणरंगीं महाधीर ॥ जेणें वीरभद्र केला निःशस्त्र ॥ तंव सतीनें उभारुनियां कर ॥ वारिले बंदीजन ॥६०॥

मग पावली रणक्षेत्र ॥ देखे चौफेर लोटिलें रुधिर ॥ तंव देखे कलेवर ॥ प्रजापतीचें ॥६१॥

तो वोळखोनि स्वपती ॥ उतरली तुरंगीखालती ॥ मग निघाली नाचती ॥ महासती ते ॥६२॥

पडिला देखे वाळूवंटीं ॥ रुधिरें रांपलीसे तळवटी ॥ अधोंदकीं बुडालीं घोटीं ॥ क्षिप्रेचिये ॥६३॥

धांवोनियां धरिले चरण ॥ प्रेमें दीधलें आलिंगन ॥ निढळीं करुनियां वदन ॥ बोले प्रसूता ॥ ॥६४॥
दीक्षित झालासि रणयज्ञीं ॥ शिरसंग तरी त्यागुनी ॥ आतां राहिलासि स्वर्गोगणीं ॥ राया कैसा ॥६५॥

तुज एकपत्नीव्रत ॥ हें वचन बोलती सत्य ॥ तरी स्वगौगनासीं प्राप्त ॥ जाहलासि कैसा ॥६६॥

तुह्मां खुपती सुमनदेंट ॥ ह्नणोनि पत्रेंचि पसरीं दाट ॥ ते आजी साहिले जी नेहट ॥ हरळ नदीचे ॥६७॥

आंगी अभ्यंग नसतां कस्तुरी ॥ तैं निद्रा नये शरीरीं ॥ तो आजी साहिला रुधिरीं ॥ कर्दमलेप ॥६८॥

भूमीची करोनियां शेज ॥ अंबेर पांघुरलासि सहज ॥ कैसी आली दीर्घनीज ॥ उदारा तुह्मां ॥६९॥

तुवां काळाहूनि केलें आगळें ॥ त्या रुद्रासी मांडिलें फळें ॥ आहुती राखिली बळें ॥ यागभागाची ॥७०॥

कां जी रुसलां प्राणनाथा ॥ कां निष्ठुर जाहलासि आतां ॥ वीरश्रियेच्या आर्ता ॥ त्यजिलें मज ॥७१॥

आतां असो हे प्रेमप्रीती ॥ प्रधानें उचलिला प्रजापती ॥ चंदन चर्चूनि म्हाणिती ॥ क्षिप्रेमाजी ॥७२॥

विधिमंत्रें सुशील स्त्रान ॥ सतीनें केलें आपण ॥ मग भराडी वोवसा दान ॥ करिती जाहली ॥७३॥

आतां असो हे भराडी ॥ उद्रावना काय अनुमोडी ॥ मग रुंड घालोनियां मांडी ॥ निघाली ते ॥७४॥

तंव प्रधान ह्नणे हो प्रसूती ॥ वाळुवंटीं केली आइती ॥ तेथें दाध देऊं प्रजापती ॥ शरीरासी ॥७५॥

मग ते बोले सुंदरा ॥ होमीं दाहिलें जेथें शिरा ॥ कीं सर्वकारण शरीरा ॥ शिर तें पैं ॥७६॥

जाणों पत्नीसहित अध्वरा ॥ आणि पूजिलें शारंगधरा ॥ भक्तिभावें नानोपचारां ॥ दक्षरायें ॥७७॥

जेथें समर्पिले शिरा ॥ तेथें चालिली सुंदरा ॥ वाद्यें विशाळ रणतुरां ॥ गगनगजें ॥७८॥

तंव विष्णूसि जाहलें ज्ञान ॥ मग बोलाविले पर्जन्य ॥ ह्नणे तुह्मीं विझवावें दहन ॥ प्रजापतीचें ॥७९॥

आतां त्यासी घालितील सरणीं ॥ तरी त्वां शीतळ व्हावें वन्ही ॥ जरी रोम करपे तरी अग्नी ॥ शापीन तुज ॥८०॥

तो माझा प्रथमभक्त ॥ त्याचा म्यां पाहिला अंत ॥ परि न टळेचि सत्ववंत ॥ शरीरसंपत्तीसीं ॥८१॥

तो भक्तभावें पावे प्रेमळ ॥ भक्तांसी न करी विशाळ ॥ थोरिवेचा ॥८३॥

भक्तांचिया उद्योगासाठीं ॥ क्षीरसिंधु सांडोनि वैकुंठीं ॥ पावला रंकाचिये भेटी ॥ त्रैलोक्यनाथ ॥८४॥

असो ते पावली यज्ञकुंड ॥ उतरलीं सती आणि रुंड ॥ मग दक्षा लाविले त्रिपुंड् ॥ विप्रवर्गी ॥८५॥

गळां घातल्या तुळसीमाळा ॥ समीप केली धर्मशिळा ॥ तंव अवचितां मेघमाळा ॥ दाटल्या अंबरीं ॥८६॥

भूतीं केलें अन्योन्य ॥ परि पवित्र तें याग हवन ॥ जैसें तुळसीमाजी रिघालें श्वान ॥ परि पवित्र त्या ॥८७॥

रुंड उचलिले वेदमंत्रीं ॥ तें घातलें सरणावरी ॥ अग्नी लावूनि भीतरीं ॥ टाकिती घृतें ॥८८॥

तेणें अग्नी जाहला विशाळ ॥ निघती ज्वाळांचे कल्लोळ ॥ मग कुंडाचे पश्विमे शिळ ॥ मांडिलीसे ॥८९॥

पती याग आणि दहना ॥ केली तिहींस प्रदक्षिणा ॥ हातें वारुनि प्रधाना ॥ नमिला भानु भूमीं ॥९०॥

आड धरोनि जवनिका ॥ हांसोनि करी कौतुका ॥ ह्नणे मरतिया काय विवेका ॥ करुंशकें मी ॥९१॥

ह्नणोनि आसुडिला हातीं ॥ मग शिळेवरी राहिली नाचती ॥ ह्नणे जन्मोजन्मीं गा प्रजापती ॥ होई भ्रतार ॥९२॥

अग्नीत टाकिलें नारिकेळ ॥ अंग उचलिले अळुमाळ ॥ तंव बोभाईली कोकिळ ॥ अंतरीहुनी ॥ ॥९३॥

ह्नणे नको नको हो प्रसूती ॥ तुझा उठेल प्रजापती ॥ अग्नीत घालितां अधोगती ॥ जासील तूं ॥९४॥

हें कर्म जाण वो मिथ्या ॥ तुज घडेल आत्महत्या ॥ तरी न शिवावें असत्या ॥ वचनें माझे ॥९५॥

तुवां दाक्षायणीचे हातीं ॥ कंकण घातलें हो प्रसूती ॥ तरी चुडे केवीं भंगती ॥ सतिये तुझे ॥९६॥

गौरीसि वाहती ज्या तंतुदोरा ॥ त्या सौभाग्य पावती सुंदरा ॥ तुवां तरी तिचिया करां ॥ वाहिले कंकण ॥९७॥

यज्ञीं करितां पुण्याहवाचन ॥ मार्केडेयें दीधलें आशीर्वचन ॥ तेम कोण करुं शके भंजन ॥ तुझिये चुड्यांचे ॥९८॥

सती नविक जाहली स्थिर ॥ ह्नणे कोकिळे तूं महा खेचर ॥ होमीं जाळिलें दक्षशिर ॥ तरी उठेल कैसा ॥९९॥

तूं आलीस सत्व ढाळूं ॥ परि सुष्ठु ऐकावा बोलु ॥ ह्नणोनि राहीलें अळुमाळु ॥ वचनीं तुझ्या ॥१००॥

आह्मां जिणें अथवा मरण ॥ तेथें पक्षियां काय कारण ॥ परि तुझें ऐकोनि वचन ॥ राहों क्षणभरी ॥१॥

जरी तूं सत्वाची होसी कोकिळ ॥ तरी अग्नींत टाकिलें नारिकेळ ॥ तें मागुतें देई तात्काळ ॥ मग मानीन विश्वास ॥२॥

तंव ते कोकिळा भवानी ॥ आणि वन्हीनें ऐकिलें श्रवणीं ॥ मग बाहेर टाकिता जाहला अग्नी ॥ नारि केळ तें ॥३॥

सती देखे नारिकेळ ॥ तंव तें करपलें नाहीं अळुमाळ ॥ ह्नणती सत्य हो कोकीळ ॥ वचन तिचें ॥४॥

कोकिळेसि ह्नणे प्रसूती ॥ तुझी सत्य होईल भारती ॥ तरी कनकाची करोनि मूर्ती ॥ पूजीन तुज ॥५॥

सुशीळ सीतळ स्त्रानें ॥ ब्रह्मचर्ये भूमिशयनें ॥ व्रत करीन येकमनें ॥ कोकिळे तुझें ॥६॥

हें व्रत ज्या करितील नारी ॥ त्यांची अभंग होईल गळसरी ॥ त्या धनपुत्रभ्रतारीं ॥ नांदतील पैं ॥ ॥७॥

ऐसें आयकोनि मंजुळ ॥ आणि सत्व जाणोनि निश्वळ ॥ मग अदृश्य जाहली कोकिळ ॥ भवानी ते ॥८॥

तें अग्निमुखींचे नारिकेळ ॥ जाणों प्रत्यक्ष श्रीकमळ ॥ कीं देवें धाडिली कोकिळ ॥ खुणेलागीं ॥९॥

कीं पितया ठेवोनि दूषण ॥ राखावें श्रीरुद्राचें मन ॥ ह्नणोनि कोकिळ जाहली आपण ॥ कंकणासाठीं ॥११०॥

कीं शापाचें होईल फळ ॥ मख नासेल व्यर्थ केवळ ॥ ह्नणोनि ते जाहली कोकिळ ॥ मज पाहतां ॥११॥

हा कोकिळेसतीचा सौरस ॥ या नावें बोलिजे कोकिळा वंश ॥ हा ऐकतां होईल नाश ॥ महा पापांचा ॥१२॥

तंव मेघ वर्षला जीवन ॥ तेणें विझालें तें दहन ॥ तो चमत्कार देखोनि जन ॥ जाहले विस्मित ॥१३॥

मग रुंड काढिले बाहेरी ॥ परि सतीनें कैसें जावें घरीं ॥ आणि तें रुंड विनाशिरीं ॥ न्यावें कैसेम ॥१४॥

असो मिळोनि परिवार ॥ प्रधान करी विचार ॥ तंव सतीनें दीधला धीर ॥ सकळिकांसी ॥१५॥

ह्नणे तुह्मीं जावें निजस्थाना ॥ तंव मी आणीन यजमाना ॥ मग त्या मानूं अनुमाना ॥ सत्यत्वें पैं ॥१६॥

शुभ तें व्हावें तात्काळ ॥ अशुभ तें त्यजावें चिरकाळ ॥ महा पुरुषांचें बोल ॥ वंदावे आधीं ॥१७॥

बाप विधांत्याची करणी ॥ कैसी चुकवीतसे वाणी ॥ नंदीने शापिलें वचनीं ॥ तें टाळील कवण ॥१८॥

ह्नणोनि ते सतीशिरोमणी ॥ लागली रुंडाचे चरणीं ॥ मग हदयीं ठेविलें धरोनी ॥ वरुषें सहस्त्र ॥१९॥

सर्वो देवोनि पाठवणी ॥ दीक्षा घेतली भूमिशयनीं ॥ रुंड केलें कंठमणी ॥ पतिव्रतेनें ॥१२०॥

या कोकिळासतीचा सौरस ॥ जे ऐकती प्रेमरस ॥ तयां प्रसन्न होय महेश ॥ उमेसहित ॥२१॥

हें कोकिळासतीचें कथन ॥ जे ऐकती येकाग्रसन ॥ तयांसि करिल निर्विघ्र ॥ महासती ते ॥२२॥

हे पद्मपुराणींची कथा ॥ तुज निरुपिली गा भारता ॥ पुढें दक्ष उठेल ते ऐका श्रोतां ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥२३॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ तृतीयस्तबक मनोहरु ॥ कोकिळाप्रसूतिसंवादप्रकारु ॥ द्वादशोऽध्यायींकथियेला ॥१२४॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP