कथाकल्पतरू - स्तबक ३ - अध्याय ८

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नम:

मागां वर्णिली रामकथा ॥ बालकांडींची तत्वता ॥ त्यांतील आक्षेप जाहला पुसता ॥ राव मुनीसी ॥१॥

जन्मेजय ह्नणे हो मुनी ॥ मागां सांगितलें मुखवचनीं ॥ कीं त्र्यंबक वाहिलें होतें शूळपाणीं ॥ दक्षावरी एकदा ॥२॥

पुढें जनकाचा पूर्वज नेमी ॥ त्यासी दीधलें सेवाधमीं ॥ तें मोडिलें पराक्रमा ॥ रामचंद्रें ॥३॥

त्र्यंबक वाहोनि त्रिपुरारी ॥ दक्षा नाशिती कां अध्वरीं ॥ तें शिवचरित्र गा विस्तारीं ॥ सांगा मज ॥४॥

दक्ष काय कोणाचा कैसा ॥ विरोध वाढला कां महेशा ॥ तें सांगावे वेदव्यासा ॥ बाळकासी ॥५॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ बरवा केलासि गा प्रश्न ॥ जेणें सुखी होय मन ॥ श्रोतायांचे ॥६॥

हे चतुर्थस्कंधींची कथा ॥ विदुरासि सांगे मैत्रेय वक्ता ॥ ते ऐकें गा भारता ॥ जन्मेजया ॥७॥

दक्ष हा ब्रह्याचा सुत ॥ जो प्रजापती ऐसा समर्थ ॥ उत्पात्ति असे अंगुष्ठजात ॥ ऐक राया ॥८॥

रुद्र आणि दक्षप्रजापती ॥ हे जामात सासुरे होती ॥ परी दोघां नाही प्रीती ॥ सर्वकाळ ॥९॥

दोघांजणा निरादरु ॥ एक एकां पाहती मारुं ॥ तंव साक्षेपे पुसे नरेंद्रु ॥ मुनेश्वरासी ॥१०॥

त्याची कन्या दाक्षायणी ॥ तयेनें देह त्याजिला कां वन्हीं ॥ आणि विरोधिला कां शूळपाणी ॥ कोणे काजास्तव ॥११॥

जो सकलांचे दैवत ॥ आणि सर्वत्र परिपूर्ण व्याप्त ॥ त्या शिवावीण समस्त ॥ जीव कैचे ॥१२॥

जो करी हरिहरांसी विरोध ॥ तो अभक्त जाणिजे महामंद ॥ जैसा नेत्र काढूं पाहे अंध ॥ आपुले हातीं ॥१३॥

विषपात्र लावावें ओठीं ॥ कीं शस्त्र घालूं पाहे कंठी ॥ जै ऐसी कर्मबुद्धी उठी ॥ तैं मरणचिन्ह ॥१४॥

नातरी धरी गोत्रकळी ॥ कीं विप्रासि द्वेष चावळी ॥ तापसियासी करी रळी ॥ हें भलें नव्हे ॥१५॥

शिव तरी साक्षात ईश्वर ॥ परमात्मा परात्पर ॥ जाचा श्रुतींही नेणिजे पार ॥ त्यासी विरोध कां केला ॥१६॥

सर्वोघटी असे व्यापक ॥ परिपूर्ण तो देव त्र्यंबक ॥ हे सर्वही त्रिगुणात्मक ॥ सृष्टी जाणा ॥१७॥

शिवेंवीण ब्रह्मांडीं ठावो ॥ रिता नाहीं पहाहो ॥ मग दक्षें निर्भात्सिला देवो ॥ कवणें कार्ये ॥१८॥

दक्ष तरी शिवाचा साप्तुरा ॥ तो पितयासमान दूसरा ॥ तरी जामाता शंकरा ॥ निर्भर्त्सिलें कां ॥१९॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ जन्मेजया तूं विचक्षण ॥ तरी पुसिले पुसीचा प्रश्न ॥ ऐक आतां ॥२०॥

दक्षापासाव हे सकल सृष्टी ॥ त्यासी कन्या जाहल्या साठी ॥ हे समस्त असे पाठी ॥ श्रीभागवतीं ॥२१॥

आणि हरिवंशींचे मत ॥ कीं कन्या जाहलिया एकशत ॥ त्यांमाजी दाक्षायणी सत्य ॥ शिवकांता पैं ॥२२॥

तरी कोणे एके काळ वेळीं ॥ देवीं याग मांडिला भूमंडळी ॥ महा प्रयाग पुण्यजळीं ॥ जान्हवीतीरीं ॥२३॥

आले यम इंद्र आणि वरुण ॥ ब्रह्मा चंद्र त्रिनयन ॥ अश्विनौदेव मरुत कृशान ॥ परी नयेचि श्रीहरी ॥२४॥

ॠषी योगी भूमिपाळ ॥ गणगंधर्व सकळ ॥ मुहुर्त पाहोनियां सुफळ ॥ मांडिला याग ॥२५॥

इतुक्यांत दक्ष आला तेथें ॥ भृगुपूषा ॠषी मंडपीं होते ॥ भग्न आलासे सांगतें ॥ सभेमाजी ॥२६॥

दक्षें पावलिया यागभूमी ॥ महागर्विष्ठ पराक्रमी ॥ ऐसा देखिला भूतस्वामी ॥ सभेमाजी ॥२७॥

तो जाणोनि प्रजापती ॥ उभे राहिले देव भूपती ॥ परि ब्रह्मा आणि पशुपती ॥ न राहती उभे ॥२८॥

ह्नणोनि क्रोधें दाटला दक्ष ॥ मग बैसला शिवासन्मुख ॥ शिवावरी धरोनियां रोख ॥ बोलतसे ॥२९॥

क्रोधें दक्ष जाहला बोलता ॥ कीं वडील आमुचा हा पिता ॥ येणें उठोनये सर्वथा ॥ हा नीतिधर्म ॥३०॥

परि हा लोकपाळांतील शिव ॥ यासी दाटला महागर्व ॥ याचा कोणें केला महिमाव ॥ देवांमाजी ॥३१॥

हा माझा शिष्य जैसा पुत्र ॥ त्रिनयन पंचवक्र ॥ माझी कन्या वरुनियां उग्र ॥ जाहला आतां ॥३२॥

हा अनाचारी अमंगळ ॥ ब्रह्महत्यारा केवळ ॥ आह्मां ब्राह्मणांसि केला विटाळ ॥ जटियाळें या ॥३३॥

यासि नाहीं प्रजासंतती ॥ कपटी भोग नाहीं संपत्ती ॥ पिशाच हिंछे दिशाप्रांती ॥ ब्रह्महत्येचेनी ॥३४॥

स्नान दान नाहीं सुशीळ ॥ हातीं सदा नरकपाळ ॥ वृषभवाहन दुःशीळ ॥ प्रीती त्यांची ॥३५॥

जैसी शूद्रासी वेदश्रुती ॥ कीं चांडाळाघरीं सरस्वती ॥ श्वपंचामुखीं सप्तशती ॥ अशोभ्र जैसी ॥३६॥

कीं कृपणाघरीं संपत्ती ॥ नातरी पातकीयाची सुकीर्ती ॥ अथवा जारिणीची संतती ॥ अशुभ जैसी ॥३७॥

तैसी रुद्रासि दाक्षायणी ॥ म्यां दीधली मृगनयनी ॥ मग दक्षें घेतलें पाणी ॥ शापावयासी ॥३८॥

तंव उठिले देव ब्राह्मण ॥ हां हां ह्नणती वचन ॥ परि दक्षें टाकिलें जीवन ॥ शिवावरी ॥३९॥

ह्नणे हा पवित्र देवयाग ॥ येथें रुद्रासि न द्यावा भाग ॥ ऐसा धरुनियां राग ॥ शापिला रुद्र ॥४०॥

यासि देतां आधीं विभाग ॥ त्याचा निर्फळ होईल याग ॥ ब्रह्मयाचा शिरोभंग ॥ घडला यासी ॥४१॥

परी रुद्र न बोलेचि मुखें ॥ अधिकाधिक संतोखे ॥ तो ईश्वर परमात्मा देखे ॥ सकळां सम ॥४२॥

तटस्थ पडिलें महारुद्रा ॥ कीं पितयासम जाणिजे सासुरा ॥ ह्नणोनि जाहला असे धीरा ॥ नातरी जाळिता क्षणार्धें तो ॥४३॥

जैं केली शिवाची अवज्ञा ॥ तैं हांसे आलें ऋषीभग्ना ॥ हरिख जाहला भृगुब्राह्मणा ॥ शिवअवज्ञेनें ॥४४॥

परि शिवाचे अपमानरोखें ॥ नंदी उठिला असे तबकें ॥ ह्नण दक्षा तूं बस्तमुख देखें ॥ शिवनिदेनें होसील ॥४५॥

मागुती ह्नणे ब्रह्मनंदना ॥ शापा घेईरे दारुणा ॥ आचार्य जाहलासी हवना ॥ शिवनिदकां तूं ॥४६॥

शाप दीधला भृगुसी ॥ तुझी दग्ध हो कां मिशी ॥ जे जे हांसले शिवासी ॥ ते शापितों आतां मी ॥४७॥

हे तुझेनि अपराधें ब्राह्मण ॥ यांही करावें भिक्षाटण ॥ जरी जाणती वेदपुराण ॥ परी न होती मुक्त ॥४८॥

जे शिवर्निदेनें संतृप्त ॥ शिवद्वेषांचे जयां आर्त ॥ ते योनी येती पुनरागत ॥ आणि गर्विष्ठ ॥४९॥

ते होती इंद्रियलंपट ॥ चतुर्वणीं महा नष्ट ॥ यापुरी होतील कनिष्ठ ॥ याचक पैं ॥५०॥

भृगु ह्नणे रे भारवाहका ॥ आह्यासि शापिले अविवेका ॥ तरी तुझ्या वंशी रे मूर्खा ॥ होतील नपुंसक ॥५१॥

जे या रुद्राचे सेवक ॥ ते होतील पाखंड मूर्ख ॥ अनाचारी प्रवास दुःख ॥ भोगितील ते॥ ॥५२॥

सुरापानी पशुघाती ॥ देवां विप्रांतें न नमिती ॥ ऐसी होका शिमभक्ती ॥ शापिलें भृगेनें ॥५३॥

नंदी भग्नातें ह्नणे ॥ त्वां दक्ष चेष्टाविला खुणें ॥ तरी फुटतील रे देखणे ॥ नेत्र तुझे ॥५४॥

आणि शिवातें हांसती ॥ त्यांचे दंत भग्न होती ॥ शाप येईल रे फळाप्रती ॥ अल्पचि काळें ॥५५॥

अहा केलें रे कटकटा ॥ नंदी ह्नणे रुपभ्रष्टा ॥ कां दुखविलें नीलकंठा ॥ दक्षा तुवां ॥५६॥

जो अनादि परात्पर ॥ ब्रह्मादिक नेणती पार ॥ तो दुखविला ईश्वर ॥ प्राणिया तुवां ॥५७॥

दक्षा आलीरे काळव्यथा ॥ कीं रुद्रभाग वर्जिला देतां ॥ वायां विणेम जगन्नाथा ॥ दुखविलें तूं ॥५८॥

जैं मुंगीशी मरण नेहट ॥ तैं त्या भूचरे पांख फुटे ॥ शरीर बुद्धी पालटे ॥ तैं मरणचिन्ह ॥५९॥

दिपकळिकासुरंग ॥ ते देखोनि धाड घाली पतंग ॥ नातरी द्विपघटेवरी कुरंग ॥ पाविजे मरणा ॥६०॥

ऐशीं नंदीचीं सक्रोध वचनें ॥ तीं ऐकिली दक्षदुर्जने ॥ मग अहंतापें त्रिनयनें ॥ पालाणिला नंदी ॥६१॥

तेणें याग राहिला पुढती ॥ कैलासा गेला पशुपती ॥ देव गेले स्वस्थानाप्रती ॥ आपुलाले ॥६२॥

शाप जाहले परस्परें ॥ आतां याग राहिला निर्धारें ॥ ऐसी बोलोनियां उत्तरें ॥ गेले समस्त ॥६३॥

हेंचे वैरासि जाहलें कारण ॥ शाप जाहले दारुण ॥ जैं राहिलें यागहवन ॥ तें ऐकें राया ॥६४॥

पुढें एकसहस्त्र वर्षा ॥ दोघां काळ ॠमिला देखा ॥ परि यागकर्म अशेखा ॥ राहिलें रुद्रेविण ॥६५॥

कर्मेवीण ॠषीश्वर ॥ देव दिक्पाळ पितर ॥ सहस्त्रवर्षे निराहार ॥ पडले यागेंविण ॥६६॥

रुद्राचेनि नसतां श्रद्धे ॥ कोण घालील स्वाहा स्वधे ॥ आणि दक्षाचिये शापबाधे ॥ राहिले हवन ॥६७॥

मग इतुकियावरी देखा ॥ नारद गेला दक्षाचिये लोका ॥ दक्षें तो बैसविला देखा ॥ सिंहासनीं ॥६८॥

मनीचिये प्रीतोप्रती ॥ दक्ष पुसे नारदाप्रती ॥ कीं आपणा नाहीं संतती ॥ पुत्रप्रजेची ॥६९॥

तरी ऐसियासी सांगा मंत्र ॥ जेणें आपणासी होतील पुत्र ॥ पुत्राविणें गा अपवित्र ॥ पुरुष नारी ॥७०॥

हे ॠषत्रयासी व्यथा ॥ पुत्रेवीण न टळे ब्रह्मसुता ॥ तरी हें विचारोनियां आतां ॥ सांगिजे मज ॥७१॥

मज कन्या जालिया साठी ॥ परी पुत्रमुख न देखें दृष्टीं ॥ जैसी गोवळ्या सवें काठी ॥ गोधनाची ॥७२॥

कीं स्त्रियेसि सर्व श्रृंगार ॥ परी गळसरीवीण अपवित्र ॥ तैसा पुत्रेंवीण स्त्रीनर ॥ अमंगळ पैं ॥७३॥

तंव ह्नणे राव भारत ॥ वैशंपायना तूं बुद्धिवंत ॥ तरी दक्षकन्यांचा वृत्तांत तो सांगे मज ॥७४॥

मग मुनी ह्नणे गा नरेंद्रा ॥ सत्तावीस दीधल्या चंद्रा ॥ तेरा दीधल्या ॠषीश्वरा ॥ कश्यपासी ॥७५॥

कृशानासि दीधल्या दोन्ही ॥ रुद्रा एक दीधली दाक्षायणी ॥ दहा दीधल्या नंदिनी ॥ यमरायासी ॥७६॥

वरुणासि दीधल्या तिन्ही ॥ एक वायूसि वायव्यकोणीं ॥ दोनी दीधल्या नैॠत्यभुवनीं ॥ एकी प्राचीनाथासी ॥७७॥

मग नारद ह्नणे हो प्रजापती ॥ दक्षा तूं गा पुण्यकीर्ती ॥ तरी यज्ञेवीण प्राप्ती ॥ नाहीं पुत्रफळाची ॥७८॥

प्राणिया जाहली राज्यप्राप्ती ॥ आणि धर्माची न धरी प्रीति ॥ तो गेला जाणिजे अधोगती ॥ चंद्रार्कवरी ॥७९॥

जैसी अर्जुनवृक्षांची सुंदर फळें ॥ परि तीं न जाणावी रसाळें ॥ तैसें दानेवीण गेलें ॥ कृपणाचें द्रव्य ॥८०॥

जेणें पूजिला नाहीं हरिहर ॥ एकादशी ना सोमवार ॥ धर्मभाग्य ना परोपकार ॥ तो नाडला जगीं ॥८१॥

पूर्वी केलें तपदान ॥ तेणें पावलें राज्यभुवन ॥ वाजी गज सैन्य आणि चंदन ॥ क्षेम तुह्मां ॥८२॥

राज्यांती नरक भोगणे ॥ हें बोलिजेती पुराणें ॥ ह्नणोनि जितांचि धर्म करणें ॥ जाणिजे त्याणें ॥८३॥

सहज पारधीचें व्यसन ॥ होडें करिती पशुवधन ॥ परस्त्रीशीं घडे गमन ॥ तोचि नरक ॥८४॥

सदा अभिलाषी परधन ॥ जगा लटिकेंची ठेवी दूषण ॥ प्रजांचा करोनि अपमान ॥ घेती द्रव्य ॥८५॥

अल्पदोषदूषणासाठीं ॥ करी सर्वाची निर्द्यलुटी ॥ नीतिमार्ग नाहीं दृष्टीं ॥ अभिलाषगुणें ॥८६॥

लंघोनि वडिलांचे वचन ॥ विश्वासानें करिती हरण ॥ दूषणेंवीण दुखविती ब्राह्मण ॥ तोचि नरक ॥८७॥

प्रौढीचिया उन्मत्तता ॥ स्त्रिया करिजती बहुता ॥ एकीसी त्यजोनि एकीसि रमतां ॥ तोचि नरक ॥८८॥

जरी आलिया शरणागता ॥ तो वैरिया दीजे मागुता ॥ कां पीडा कीजे साधुसंतां ॥ तोचि नरक ॥८९॥

ह्नणोनि रायें प्रजेतें पाळावें ॥ संतांसाधूंसि मिळावें ॥ व्याधीवैरियां छळावें ॥ शास्त्रबुद्धीनें ॥९०॥

दक्षा नर अथवा नारी ॥ काहीं आख्या जो न करी ॥ तो तरंग जाणिजे उदकावरी ॥ उदेला जैसा ॥ ९१॥

आतां असो हें भाषित ॥ दक्षा तुज पुत्राची आर्त ॥ तरी याग करीं गा समर्थ ॥ धर्मकाजा ॥९२॥

नारद ह्नणे गा अवधारीं ॥ नैमिषारण्याभोतरीं बृहस्पती नामें नगरी ॥ उत्तानचरणाची ॥९३॥

ते महा विस्तीर्ण थोर ॥ बारा कोस चौफेर ॥ क्षिप्रानदी मनोहर ॥ देवशारंगधर ॥ ते स्थळीं ॥९४॥

महा पुण्यराशी संपूर्ण ॥ बृहस्पतीनें केला यज्ञ ॥ तेणें भेटला नारायण शेषशाई ॥९५॥

तें मानवलें प्रजापती ॥ मग यागाची केली आयती ॥ आला बृहस्पती नगराप्रती ॥ दक्षराव ॥९६॥

सकळांही देखिलें नेत्रीं ॥ उत्तरदक्षिण चौफेरी ॥ क्षिप्रानदीचे उत्तरतीरीं ॥ राहिलें सैन्य ॥९७॥

विंदानी बोलावोनी तबका ॥ यागमंडप घातला देखा ॥ परी जीवीं असे शंका ॥ महा चिंता जे ॥९८॥

ह्नणे म्यां केलासे अभिमानु ॥ तरी नये विरिंची विष्णु ॥ आणि रुद्र जाहला कृशानु ॥ आह्मांवरी ॥९९॥

ऐसी कल्पिली अंतरी बुद्धी ॥ याग कैसा पावेल सिद्धी ॥ मग कैसी साधेल ॠद्धी ॥ यागाची पैं ॥१००॥

ऐशी करोनी चिंतवणी ॥ माथा ठेविला मूर्तीचे चरणीं ॥ आणि करिता जाहला विनवणी ॥ शारंगधराची ॥१॥

जयजयाजी शारंगधरा ॥ जयजयाची अभयंकरा ॥ जयजयाची वज्रपंजरा ॥ भक्तजनाचिया ॥२॥

जय देवा असुरसंहारा ॥ जयजय हो करुणाकरा ॥ जय भगवंता लक्ष्मीवरा ॥ अनंता तूं ॥३॥

जयजय भुवनतारका ॥ जय अनंत ब्रह्मगोळका ॥ उत्पत्तिस्थितिलय कारका ॥ तो तूंचि देवा ॥४॥

जयजयाजी विश्वकंदा ॥ जयजयाजी परमानंदा ॥ जयजयाजी दैत्यवृंदां ॥ कुठार तूं ॥५॥

जय विष्णी वेदोद्धारणा ॥ जय कर्ता कार्य कारणा ॥ जय धर्मप्रतिपाळणा ॥ तूंचि देवा ॥६॥

जी जी एका सेवकासाठीं ॥ करिसी त्रिभुवनाची पिठी ॥ महाकाळचिया कंठीं ॥ घालिसी चक्र ॥७॥

तुह्मां शरण जी शारंगधरा ॥ मी शंकतसें महारुद्रा ॥ तरी प्रसन्न होई सर्वेश्वरा ॥ अभयदानी ॥८॥

ह्नणोनि माथा ठेविला चरणीं ॥ तंव निद्रा आली तत्क्षणीं ॥ विष्णु आला असे स्वप्नीं ॥ यागरुपें ॥९॥

देवें धरिला मृगाचा वेष ॥ ऐसा स्वप्नीं देखतसें दक्ष ॥ मग बोलिला प्रसन्नमुख ॥ शारंगधर ॥११०॥

ह्नणे प्रसन्न जाहलों प्रजापती ॥ तुज मरण नाहीं गा शस्त्रघातीं ॥ आणि याग हवनाचे अंती ॥ भेटेन तुज ॥११॥

ह्नणोनि दीधली पोफळाची खुण ॥ हातीं बांधिलें कंकण ॥ मागुती बोलिलें वचन ॥ मृगें तयासी ॥१२॥

सत्व न टळेरे अभंगा ॥ सिद्धी पाववीन यागा ॥ तंव दक्ष जाहला जागा ॥ न देखे कुरंग ॥ ॥१३॥

विस्मयें उठोनि पाहे वरतें ॥ दिशा विलोकी भोंवते ॥ परी न देखे कुरंगातें ॥ दक्षराज ॥१४॥

हाती पाहे तंव सुपारी ॥ कंकण बांधिले असे करीं ॥ ऐसी देखोनियां कुसरी ॥ संतोषला तो ॥१५॥

हर्षे निर्भर जाहला मनीं ॥ दक्ष उठिला प्रसन्नवदनीं ॥ मग पूजा केली नानारत्नीं ॥ शारंगधराची ॥१६॥

असो इकडे जाहली आयती ॥ मंडप उभारिले निगुती ॥ तंव आले यागाप्रती ॥ ॠषेश्वर ॥१७॥

जे सृष्टीचे कारणीक ॥ अग्नीचे स्थापक सम्यक ॥ नानापाडें व्योमपंथक ॥ उदेले जैसे ॥१८॥

जे सदा सर्वागी निर्मळ ॥ मुखवाचेचे शीतळ ॥ त्यासी केवीं चंद्रमंडळ ॥ पावे उपमा ॥१९॥

ऐसे यागा आले ब्राह्मण ॥ वेदविद आणि शास्त्रज्ञ ॥ तपिये व्रतस्थ सत्यवचन ॥ शीळशांत ॥१२०॥

पाठक ज्योतिषी दीक्षित ॥ भट्ट अग्निहोत्री महापंडित ॥ शुक्क मुळिये अनंत ॥ आले यागा ॥२१॥

नानाशास्त्रांचे विचार ॥ नानागोत्रांचे पवित्र ॥ नानातपांचे गिरीवर ॥ महामुनी जे ॥२२॥

विश्वामित्र आणि वसिष्ठ ॥ गौतम आणि भारद्वाज श्रेष्ठ ॥ अत्रि कश्यप वरिष्ठ ॥ सातवा जमदग्नी पैं ॥२३॥

वामदेव गर्ग देवल ॥ भृगुमाकैडेय सुशीळ ॥ ॠषिश्रृंग आणि शांडिल्य ॥ पाराशर तो ॥२४॥

नासिकेत कौशनीक ॥ नारद ॠषि भृगु देख ॥ शातातप उद्दालिक ॥ ॠषि वाल्मिक तो ॥२५॥

बकदालभ्य आणि शुक ॥ कौडण्य दुर्वास विभांडिक ॥ आले रोम हर्षणादिक ॥ शरभंगॠषी ॥२६॥

कात्यायन ॠषि मुनिवर्य ॥ जयमिनी व्यास मांडव्य ॥ सुमंतु आणि वैकल्य ॥ आले यागा ॥२७॥

ऐसे अठ्यायशीं सहस्त्र ॥ नानागोत्रींचे द्विजवर ॥ भूमंडळीचे केवळ दिनकर ॥ ॠषिवेषें ॥ ॥२८॥

मग आला तो वृषलीपंती ॥ कृष्णवर्ण पशुघाती ॥ तो पाहिजे कर्माती ॥ पशुपीडेसी ॥२९॥

मग सुमुहूर्ते शुभदिनीं ॥ गणेश कुळदेवता वंदोनी ॥ अल्प प्रमाण दानें करोनी ॥ मांडिला याग ॥१३०॥

दक्षें ठेविले द्वारपाळ ॥ अष्टदिशांचे महा दिक्पाळ ॥ ते स्थापिले अढळ ॥ यागमंडपी ॥३१॥

पूर्वेसि ठेविला इंद्र ॥ उत्तरे स्थापिला अमृतकर ॥ पश्विमेसी जलधर ॥ दक्षिणे यम ॥३२॥

आग्नेयीस ठेविला कृशान ॥ वायव्ये स्थापिला पवन ॥ ईशान्ये राव ईशान ॥ निॠती नैॠत्ये ॥३३॥

चहूं द्वारीं समीपता ॥ ब्रह्मा आणिक उद्नाता ॥ मग अध्वर्यु आणि होता ॥ नेमिले देखा ॥३४॥

स्थंडिल रेखिलें चहूं कोणी ॥ तेथें स्थापिले तिन्ही वन्ही ॥ गार्हपत्य दक्षिणाग्नी ॥ तिसरा आहवनीय ॥३५॥

मग आणिली यागपात्रें ॥ नाना वर्णाचीं विचित्रें ॥ मग आव्हानिली वेदमंत्रें ॥ गायत्री देवी ॥३६॥

शंकु स्त्रुवा घेवोनि ठाकले ॥ सम्यक कृष्णाजिन ठेविलें ॥ उलूखल आणि मुसळे ॥ काश्मिराचीं ॥३७॥

आज्यस्थाली प्रणीता ॥ दर्भपुष्पे भूमी मंडिता ॥ गोमूत्र गोमय वर्णयुक्ता ॥ आणिलें तेथें ॥३८॥

सोमवल्लीचे तोंवर ॥ तेंचि सोम पान मधुर ॥ चमंस आणिलें चौमुखी पात्र ॥ यागालागीं ॥३९॥

मग स्त्रुवे आणि समिधा ॥ पुण्यतरुंच्या विविधा ॥ मूळीच्या आणूनि सिद्धा ॥ ठेविल्या मंडपीं ॥१४०॥

मध्यें केलें होमकुंड ॥ विधियुक्त महा प्रचंड ॥ तेथें केलें प्रमाण मुंड ॥ ठशाकृती ॥४१॥

द्रव्ये आणिली अनंतें ॥ आज्यपात्रें पूर्णघृतें ॥ मग जाहले आरंभिते ॥ कलशपूजेसी ॥४२॥

ब्रह्मासन दीधलें मार्केडेया ॥ तो यजमान दक्ष बाहिया ॥ भृगु केलासे आचार्या ॥ यागविधीसी ॥४३॥

ॠत्विजां दीधले पोफळें ॥ रत्नें भरोनि नारिकेळें ॥ हाती करसूत्र बांधिले ॥ जांबुनदाचें ॥४४॥

मग प्रसुती नामें दक्ष पत्नी ॥ जे स्वायंभुमनूची नंदिनी ॥ ते बैसविली पुण्याहवाचनी ॥ दक्षानिकटीं ॥४५॥

तया मार्केडेयाच्या चरणीं ॥ लागलीसे प्रसूती राणी ॥ तंव ॠषि बोले आशीर्वचनी ॥ अभंग होतील चुडे ॥४६॥

बेलाचंदनाची काष्ठें ॥ कूंडी रचिली एकदाटें ॥ मग घालिते जाहले चौंबोटें ॥ आहुती पैं ॥४७॥

स्वाहा स्वधा विधि वचनें ॥ होमीं देताती अवदानें ॥ दीक्षा घेतली यजमानें ॥ आधीच पैं ॥४८॥

मृगचमीची परिधानें ॥ हाती शिंगे कंडुवारणें ॥ दर्भाची करुनि अंथुरणें ॥ भूमीवरी ॥४९॥

ब्रह्मचर्याचा निर्धार ॥ भुकेसि पय आहार ॥ इच्छादान देती उदार ॥ जगासी पै ॥१५०॥

सत्यवादी व्रत अहिंसा ॥ देह द्रव्यांची नाहीं आशा ॥ जटा जाहलिया केशां ॥ मस्तकींच्या ॥५१॥

सभा घनवटली अपार ॥ इंद्रादि देव आले नृपवर ॥ तंव पावले नृत्यकार ॥ यागस्थळीं ॥५२॥

मृदंग मेळवोनि श्रुती ॥ पाडिली टाळांची ज्योति ॥ वीणे घेवोनियां निगुती ॥ ठाकले रंगीं ॥५३॥

नारद तुंबर मांदाळी ॥ श्रुती फुकिती मंजुळी ॥ नाद लाविला टाळीं धुमाळी ॥ यक्षकिन्नरी ॥५४॥

गणगंधर्व टाळधारी ॥ सामगायन सप्तस्वरीं ॥ दाविताती नानापरी ॥ तिहीं स्थानी ॥५५॥

दाविती शुद्ध देशी मार्ग ॥ राग मूर्छना स्वरवेग ॥ हाहा हुहु श्रुतिवेग ॥ दाविताती ॥५६॥

कंपकंपित सप्तस्वरीं ॥ तंव मांदळी वाहतसे कातरी ॥ मिळतसे टाळधारी ॥ श्रुतिकारेंसी ॥५७॥

वोडवतांडवांची कुसरी ॥ लावियेली यंत्रकारीं ॥ कल मंद्र गंभीर तारीं ॥ दाविती भेद ॥५८॥

तंव पावल्या नृत्यकारी ॥ स्वर्गागना मनोहरी ॥ नमुनियां यज्ञेश्वरी ॥ राहिल्या रंगी ॥५९॥

रंभा मेनिका सुकेशी ॥ घृताची मंजुघोषा उर्वशी ॥ आणि सातवी ते डोळसी ॥ तिलोत्तमा ॥१६०॥

रंभा घालीत पुष्पाजुळी ॥ मंजुघोषा गात मंजुळी ॥ घृताची वाहतसे टाळी ॥ थैकारारंभी ॥६१॥

रंगी ठाकली उर्वशी ॥ लास्य तांडव समरशी ॥ आणि दावितसे सुकेशी ॥ पेखणातें ॥६२॥

लागवेगांची कुसरी ॥ अंतरीं दाविती भरोवरी ॥ अंगभाग चौसष्टी करीं ॥ दाविती हस्तकें ॥६३॥

श्रृंगार वीर बीभत्स ॥ शांत भयानक सदृश ॥ करुणाद्भुत रौद्र हास्य ॥ दाविती नवरसातें ॥६४॥

मधुपुष्पांचिया रसा ॥ रंग मुराला रागीं तैसा ॥ कीं साखरेचेनि मुसां ॥ वोतिलें अमृत ॥६५॥

ऐसा मुराला तो राग ॥ प्रभेने शोभतसे याग ॥ तें देखोनि आला राग ॥ नारदासी ॥६६॥

देखे सकळा उभिया बहिणी ॥ परी न देखे दाक्षायणी ॥ मग उठिला तत्क्षणीं ॥ नारद तो ॥६७॥

स्वांतरी संतोषोनि मुनी ॥ ह्नणे हिंडावी नलगें मेदिनी ॥ आजि माझे भाग्याहुनी ॥ दुसरा नाहीं ॥६८॥

तरी प्रयत्न न करिता कळी ॥ आपेआप जोडली रळी ॥ परि जावें लागेल ये काळी ॥ शिवलोकसी ॥६९॥

आतां असो हें भारता ॥ दाक्षायणी येईल आतां ॥ तें ऐकावें सकळ श्रोता ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥१७०॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ तृतीयस्तबक मनोहरु ॥ दक्षयज्ञविस्ताकरु ॥ अष्ठमोध्यायीं सांगितला ॥१७१॥

॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP