कथाकल्पतरू - स्तबक ३ - अध्याय ४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

वैशंपायनासि पुसे भारत ॥ सीता कोण कोणाची हा मूळार्थ ॥ तो करावा जी श्रुत ॥ वैशंपायना ॥१॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ देवगुरुचा नंदन ॥ सुतश्रवा नामें ब्राह्मण ॥ महाशीळ तो ॥२॥

तो स्वस्त्रियेसी विचारी ॥ आपणा ऐसी व्हावी कुमरी ॥ कीं विष्णूच्या वामकरीं ॥ साजे ऐसी ॥३॥

ऐसा स्त्रियेसि करी संवाद ॥ आणि तो संपूर्ण असे वेदविद ॥ मग प्रीति पावे गोविंद ॥ येणेंचि उद्देशें ॥४॥

ऐसें तयासि आचरतां ॥ काळ त्र्कमिला गा भारता ॥ तंव मुखांतूनि पडिली दुहिता ॥ वेदास्तव ॥५॥

जंव उघडोनि पाहे लोचन ॥ तंव पुढें देखे कन्यारत्न ॥ जाणों त्रिभुवनाचें मोहन ॥ येकवटलें ॥६॥

मग ह्नणे ॠषी सुतश्रवा ॥ स्त्रिये पाहें हो रत्नठेवा ॥ हे गोविंदासीच वेदोद्भवा ॥ साजेयेक ॥७॥

तेणें आनंदे वेदमूर्ती ॥ गुणनाम ठेविलें वेदवती ॥ ऐसी प्रथम जाहली उत्पत्ती ॥ जन्मेजया ॥८॥

ऐसें निश्वयिलें त्याणीं ॥ कीं हे विष्णुजोगी नंदिनी ॥ तंव पिता निमाला आणि जननी ॥ निघाली अग्निमाजी ॥९॥

मग ते कन्या वेदवती ॥ पितयाचा भाव धरोनि चित्तीं ॥ मनीं ह्नणे श्रीपती ॥ वरीन देखा ॥१०॥

मग भोवतीं अग्निकुंडे ॥ माजी काष्ठें घालितसे उदंडे ॥ मध्ये बैसली आसनें दृढें ॥ पंचाग्नीसी ॥११॥

मिथुळा नामें पुण्यनगरी ॥ क्षिप्रानदीचिये तीरीं ॥ तप मांडिती जाहली कुमरी ॥ वनामाजी ॥१२॥

ऐसें करिता तपसाधन ॥ देह दंडीतसे रात्रदिन ॥ हदयी करी चिंतन ॥ आदिपुरुषाचें ॥१३॥

ऐसें करिता वेदवती ॥ तंव रावण आला गा भूपती ॥ दिग्विजय करोनि लंकापती ॥ लंकेसि जातां ॥१४॥

तंव देखिली रुपकळिका ॥ तेणें अभिलाष उपजला दशमुखा ॥ ह्नणे हे घडिता काय अंबिका ॥ निश्वळ होती ॥१५॥

मग ह्नणे हो मृगनयने ॥ देह दमिसी कां तारुण्यें ॥ काय घेतलें असे मनें ॥ तें सांगे मर ॥१६॥

ते राहोनियां ह्नणे सुंदरी ॥ आपणासि वल्लभ असे श्रीहरी ॥ त्यासी बांधावया गळसरी ॥ मांडिला प्रयत्न ॥१७॥

तंव ह्नणे लंकेश्वर ॥ हा तुज ठाउका नाहीं विचार ॥ मजभेणें शारंगधर ॥ पळाला क्षीरसागरीं ॥१८॥

राजसे समस्तही सुरवर ॥ ते तंव माझे कामगार ॥ पृथ्वीमंडळीं छत्र चामर ॥ मजवरीच ॥१९॥

आणिक ह्नणे कामातुर ॥ तूं मज दे पां अनुसर ॥ लंके जाऊनि घराचार ॥ चालवीं माझा ॥ ॥२०॥

हांसोनि बोले सुंदर ॥ हे तूं बोलिलासि अपवित्र ॥ येका विष्णुवांचोनि समग्र ॥ बंधु माझे ॥२१॥

ऐकोनि ऐसें लंकापती ॥ हाती धरीत जंव युवती ॥ तंव उडी घाली वेदवती ॥ अग्निमाजी ॥२२॥

मग शाप बोलिली ते सुंदरा ॥ अरे पापिया निशाचरा ॥ मजनिमित्त यमक्षेत्रा ॥ जासील जाण ॥२३॥

ऐसें जाहलें तयेवेळी ॥ आणि लंके गेला दशमौळी ॥ मग भूमीचे गर्भमंडळी ॥ राहीली ते ॥२४॥

तंव कित्येक काळांतरीं ॥ जनक जाहला महाक्षेत्री ॥ परि पुत्राविणें अहोरात्रीं ॥ चिंतातुर तो ॥२५॥

शतानंद नामें कुळगुरु ॥ जो गौतमअहिल्येचा कुमरु ॥ ॠषींमाजी सदाचारु ॥ आत्मज्ञानी ॥२६॥

तो सकलविद्येंत थोर ॥ त्यासी जनक पुसे विचार ॥ ह्नणंए प्रजा होती तो प्रकार ॥ सांगा मज ॥२७॥

मग ह्नणे ॠषेश्वर ॥ पुत्रइष्टी करावा अध्वर ॥ तेणें प्रजा होतील सत्वर ॥ जनका तुज ॥२८॥

मुहूर्त पाहोनि पवित्र ॥ भूमी शोधुं जुंपिले नांगर ॥ तंव तासासरिसी सुंदर ॥ निघाली वेदवती ॥२९॥

तें चोज करोनि नृपनाथ ॥ ह्नणे पूर्ण जाहला मनोरथ ॥ कन्या घेवोनि शीघ्रवत ॥ आला मंदिरा ॥३०॥

उभविलीं गुढिया तोरणें ॥ नगरीं जाहलें वाधावणें ॥ द्विजां दीधलीं नानादानें ॥ जनकरायें ॥३१॥

कीं भूमी चाळितां शेती ॥ कन्या लागली हलाचे सिंतीं ॥ ह्नणोनि नाम भूपती ॥ सीता ऐसें ठेवित ॥३२॥

मिथुळे उपजली ह्नणोनि मैथिली ॥ जनकें पाळिल्या जानकीबाळीं ॥ मग ते खेळतां राउळीं ॥ जाहला चमत्कार ॥३३॥

जनकाचा कोणी पूर्वज नेमी ॥ तेणें प्रसन्न केला उमास्वामी ॥ शिवें त्र्यंबक दीधलें पराक्रमी ॥ बळधनुष्य ॥३४॥

तें पर्वतातुल्य असे भारी ॥ ह्नणोनि कोणी न धरी करीं ॥ मादुसेमाजी मंदिरी ॥ पडिलें होतें ॥३५॥

जैं पूजेची पावे तिथी ॥ तंव नवशतें ह्नैसे जुंपिती ॥ मग ते मांदुस आणिती ॥ राजांगंणीं ॥३६॥

सीतेनें तें पाहिलें धनुष्य ॥ जें पडिलें बहुत दिवस ॥ तें घोडा करोनि डोळस ॥ बैसली वरी ॥३७॥

कौतुकें बाळलीले परी ॥ घोडा करोनि खेळे कुमरी ॥ जाणो दर्भतृणाची दोरी ॥ धेनुवे जैसी ॥३८॥

ऐसें देखोनि कौतुक ॥ विस्मित जाहला जनक ॥ मग करिता जाहला विवेक ॥ तिचे बालत्वाचा ॥३९॥

प्रमाण बोले नृपवर ॥ हें धनुष्य वाहील जो नर ॥ त्यासी हे देऊं निर्धार ॥ जानकी कन्या ॥४०॥

ऐसी हे कन्या जानकी ॥ साजे त्याचेचि वामांकीं ॥ जो त्र्यंबक वाहोनियां जिंकी ॥ तो वरील इयेतें ॥४१॥

राया ती हे सती सीता ॥ वैदेही जोडली मिथुळानाथा ॥ आणिक उद्योग उक्ता ॥ मुनेश्वराचा ॥४२॥

तया जैमिनीचें वचन ॥ कीं वेदवतीचे जाहलें रत्न ॥ तें रावणें शोधोनि दहंन ॥ नेलें लंकेप्रती ॥४३॥

मग तें दावोनि मंदोदरी ॥ ठेविलें पेटीभीतरी ॥ रात्रीं पाहे तंव कुमारी ॥ होय रत्नाची ॥४४॥

मंदोदरी हें देखोनि अवचिन्ह ॥ रावणासी विनवी वचन ॥ ह्नणे हें जेथील तेथें रत्न ॥ ठेवी वहिलें ॥४५॥

ऐकोनि ऐसें लंकापती ॥ पेटी नेतसे मिथुळेप्रती ॥ मग ते रोंबिली शेती ॥ जयमिनीमतें ॥४६॥

आणिक ह्नणती कोणी कोणी ॥ हे पद्माक्षरायाची नंदिनी ॥ तरि हें वाल्मीकरामायर्णी ॥ बोलिलें नाही ॥४७॥

असो ऐसी हे योग्यता ॥ वायां धिस्तारुं कां ग्रंथा ॥ आतां पुढें ऐकें कथा ॥ भारता तूं ॥४८॥

सोळा वर्षे न्युन पूर्ण ॥ वयसें जाहले रामलक्ष्मण ॥ तंव आला गाधीनंदन ॥ विश्वामित्र ॥४९॥

तें जाणोनि दशरथ ॥ ॠषीतें विनवी भयभीत ॥ पूजा करोनि कुशलवृत्त ॥ पुसता जाहला ॥ ॥५०॥

राजा विनवी प्रीतिवचनें ॥ आजि सुखी जाहलो दर्शने ॥ जैसे सांपडे ठेवणें ॥ दुर्बळासी ॥५१॥

कां त्रिवेणीचें घडे स्त्रान ॥ कां कुंडीचें उदक प्राशन ॥ तैसे मानिले माझें मन ॥ तवदर्शने ॥५२॥

तुं प्रबुद्ध महामुनी ॥ सकळ कांपती तप देखोनी ॥ तो तूं आजी देखिला नयनीं ॥ थोरभाग्यें ॥५३॥

कर जोडोनि दशरथ ॥ ॠषीस विनवी भयभीत ॥ ह्नणे काय मागणे असे अर्थ ॥ तो सांगावा जी ॥५४॥

मग ॠषी ह्नणे आपण ॥ तवप्रसादें सर्व पूर्ण ॥ परि एक असे जी विघ्न ॥ राक्षसपीडा ॥५५॥

ते होमाचे काळवेळी ॥ याग नाशिती महाबळी ॥ रक्तमांसमात्री कुश्वळीं ॥ वर्षती सदा ॥५६॥

मी शाप देऊं जरी निशाचरा ॥ तरी तप जाईल नरेंद्रा ॥ नाना माया असती विचित्रा ॥ राक्षसांपाशी ॥५७॥

तरी तुझा रामचंद्र ॥ मज दिवस दहा देई निर्धार ॥ माझा सरलिया अध्वर ॥ आणीन मागें ॥५८॥

ऐसा शब्द ऐकतां ॥ कल्पांत वाटला नृपनाथा ॥ कीं वज्रघावो पडे माथां ॥ एकाएकी ॥५९॥

कीं चंडवातें कर्दळिका ॥ कीं पतंगऊडी घाली पावका ॥ अथवा गरुड झडपी दंदशूका ॥ एकाएकीं ॥६०॥

तैसे रायाचें अंतःकरण ॥ मोहें व्यापिलें परिपूर्ण ॥ काहीं न बोलवे वचन ॥ दाटला कंठ ॥६१॥

क्षणैक राहोनि निश्वळ ॥ मग राजा बोले बेंबळ ॥ ह्नणे हा काकपक्ष केवळ ॥ रामचंद्र माझा ॥६२॥

तरी हें बाळक अज्ञान ॥ शस्त्रविद्या नेणे जाण ॥ तो राक्षसवधार्थ तुह्मालागुन ॥ देऊं कैसा ॥६३॥

ते रावणाचे ठाणेकर ॥ जे मधुदैत्याचे पुत्र ॥ आह्नासीही ते अनिवार ॥ अगम्य जाणा ॥६४॥

ते सुंदोपसुंदाचे कुमर ॥ जे राक्षस भयंकर ॥ कवणा वधवती गिरिवर ॥ मरीचि सुबाहु ॥६५॥

ते यज्ञपुरुषाचे घातक ॥ यमातुल्य महा अंतक ॥ तरी तेथें हा बाळक ॥ कैसा जिंकी ॥६६॥

मज नव्याण्णव संवत्सरां ॥ तैं पुत्र लाधले गा दुर्धरा ॥ त्यांमाजी राम गा ॠषेश्वरा ॥ वल्लभ मज ॥६७॥

तरी ऐका एक वचन ॥ सर्व सैन्य जावें घेउन ॥ देईन आठही प्रधान ॥ तुह्नांसांगातें ॥६८॥

आणि तुर्मा होईल आज्ञा ॥ तरी मीही येईन जाणा ॥ परि मी रामचंद्र देइना ॥ ॠषिश्वामी ॥६९॥

मग ह्नणे गाधीनंदन ॥ तूं महाराजा परि अज्ञान ॥ हा रामचंद्र गा लहान ॥ न ह्नणावा तुवां ॥७०॥

यक्ष गणगंधर्व निशाचर ॥ किन्नर पन्नग सुरवर ॥ याचिये सग्रामी हातेर ॥ न धरवे कवणा ॥७१॥

हा सकळविद्या संपूर्ण ॥ अरिगजांसि पंचानन ॥ सूर्यवंशी प्रभाघन ॥ सहस्त्रकिरण हा ॥७२॥

ब्रह्मपुत्र बोलिजे पुलस्ती ॥ त्याचा विश्रवा वेदमूर्ती ॥ त्यापासाव जाहली संतती ॥ कैकसीसी ॥ ॥७३॥

ते रावण कुंभकर्ण ॥ त्यांसी झुंजों न शके त्रिनयन ॥ त्यांसी अजित असे नंदन ॥ दशरथा तुझा ॥७४॥

तुह्नी सूर्यवंशी पवित्र ॥ महाक्षेत्री परंपर ॥ तरी राम दे गा साचार ॥ राया मज ॥७५॥

मग ह्नंणे वसिष्ठ कुळगुरु ॥ रामासि निर्भय हा निर्धारु ॥ राम न देता विश्वामित्रु ॥ कोपेल जाण ॥७६॥

प्रधान ह्नणती सकळिक ॥ सूर्यवंशीचें ह्नणोंनये बाळक ॥ याचे पंवाडे अनेक ॥ ऐकों आह्मी ॥७७॥

हा शेषशाईचा अवतार ॥ अरिवनासि कुठार ॥ करील दैत्यांचा संहार ॥ रावणादिकांचा ॥७८॥

ऐसें बोलिलें प्रधानजनीं ॥ मग तो राव विश्वास मानी ॥ ह्नणोनि आणिला बोलावुनी ॥ सभेमाजी राम ॥७९॥

वसिष्ठ ह्नणे रघुनंदना ॥ दावीं जापुली विद्या प्राज्ञा ॥ आणि शस्त्रास्त्रीच्या साधना ॥ दाखवी तूं ॥८०॥

मग त्या विद्या समस्ती ॥ श्रीराम दावी वसिष्ठाप्रती ॥ येकमेकां वचनिं बोलती ॥ गूढशब्दांचीं ॥८१॥

ऐसी विद्येची संपूर्णता ॥ राम दाखवी ॠषिनाथा ॥ मग जाहला संतोषता ॥ वसिष्ठगुरु ॥८२॥

रामासि ह्नणे गुरुदेवो ॥ जैसा मजवरी असे भावो ॥ तैसाचि पूजीं ॠषिरावो ॥ गाधिसुत हा ॥८३॥

दशरथें जवळी बोलावुनी ॥ दोघे आलिंगिले प्रीतिकरोनी ॥ वस्त्राभरणें देउनी ॥ दीघली आज्ञा ॥८४॥

मग तो अयोध्यापुरंदरु ॥ राक्षसवनकुळांगारु ॥ सद्भावें नसुनि श्रीगुरु ॥ निघाला राम ॥८५॥

कटीं पीतांबर परिघार ॥ हातीं मिरवे धनुष्यबाण ॥ सवें निघाला सुमित्रानंदन ॥ लक्षुमण तो ॥८६॥

तंव देव वर्षले सुमनीं ॥ वाद्यें लागलीं अमरभुवनीं ॥ आनंदला महामुनी ॥ विश्वामित्र ॥८७॥

पुढें चाले विश्वामित्र ॥ मागें राम आणि सौमित्र ॥ जाणों त्रयअग्निनिर्धार ॥ मनुष्यरुपें ॥८८॥

मग पावले शरयूतीरीं ॥ अर्धयोजन आले क्षणमात्री ॥ तंव ॠषि ह्नणे गा अवधारीं ॥ काकुत्स्थासी ॥८९॥

अगा हे रामभूपाळा ॥ बळा आणि अतुर्बळा ॥ त्या विद्या देईन सकळा ॥ जाणावया तुज ॥९०॥

येणें मंत्रें दिवस पंधरा ॥ क्षुधा न लागे रामचंद्रा ॥ आणि तूं अजित चराचरा ॥ होसील येणें ॥९१॥

हा ब्रह्याचा विद्यामंत्र ॥ येणें तृषा न लागे निर्धार ॥ ऐसें बोले ॠषेश्वर ॥ रामाप्रती ॥९२॥

मग तोरामें धर्ममूर्ती ॥ ॠषि नमिला गुरुपद्धती ॥ विद्या घेतल्या मंत्रशक्ती ॥ बळा आणि अतिबळा ॥९३॥

तंव पुढें शरयू आणि त्रिपथा ॥ संगम पावला गा भारता ॥ ध्वनी ऐकिला गर्जतां ॥ रामचंद्रें ॥९४॥

राम ह्नणे हो महामुनी ॥ हा शब्द ऐकतसों श्रवणीं ॥ तरी हें स्थान कोणाचें आणि पाणी ॥ कोठील हें ॥९५॥

मग ह्नणे मुनेश्वर ॥ कैलास नामें गिरिवर ॥ तेथें तप केलें एक संवत्सर ॥ विरंचि देवें ॥९६॥

ब्रह्ममानसास्तव निघाले नीर ॥ तें बोलिजे मानस सरोवर ॥ तेथोनि निघाली पवित्र ॥ शरयूनदीहे ॥९७॥

तो हा शरयूनदीचा मेळ ॥ ह्नणोनि शब्द होतसे बहळ ॥ आणि पूर्वी होता भूपाळ ॥ कंदर्प सांग ॥९८॥

या संगमाचे पुण्यपाळीं ॥ तप करोनि पुण्यें साधलीं ॥ मदनें विंधिला चंद्रमौळी ॥ कामबाणें ॥९९॥

ह्नणोनि तेणें महारुद्रें ॥ काम दाहिला तृतीयनेत्रें ॥ त्याची जाळिलीं गात्रें ॥ रुद्रदेवें ॥१००॥

तरी हें कामाचे पूर्वस्थान ॥ परि आतां असती मुनिजन ॥ दीर्घचक्षु आणि जाण ॥ शुद्धपंथॠषी ॥१॥

ते रामासि भेटले समग्र ॥ पूजा करोनि केलें स्थीर ॥ उदयो जाहलिया राम विप्र ॥ निघते जाहले ॥२॥

पुढें लागलें महावन ॥ शुक बोलताती वचन ॥ भैरव नामें महादारुण ॥ भयानक जें ॥३॥

राम ह्नणे हो कौशिका ॥ हें वन कोणाचें काय अटका ॥ उद्वस जाहलें कां भयानका ॥ सांगा वेहिलें ॥४॥

मुनि ह्नणे वृत्रवधा कारणें ॥ दधीचि वधिला सुरपतीनें ॥ ते ब्रह्नहत्या फिटली स्त्रानें ॥ भैरववनीं या ॥५॥

पूर्वी ॠषि आणि मानव ॥ थोरथोर महानुभव ॥ आश्रमीं दाटले होते गांव ॥ भैरववनींचे ॥६॥

तंव ताटिका नामें यक्षिणी ॥ शापें जाहली राक्षसिणी ॥ ते समस्तांसि भक्षोनी ॥ राहिली येथें ॥७॥

तेणें मोडली मार्गाची गती ॥ नगरें घाली मुखाप्रती ॥ अश्व गज नर रथी ॥ भक्षिले तिणें ॥८॥

मार्गस्थ भक्षिले वणिजारे ॥ आणि भोंवतालीं नगरें ॥ उद्वस केलीं समग्रें ॥ पापिणीनें ॥९॥

तीर्था जातां कापडी ॥ तेही भक्षिले अंगप्रौढी ॥ देश केलासे दुधडी ॥ ताटिकेनें ॥११०॥

या कारणें गा रघुपती ॥ उद्वस जाहली हे जगती ॥ आणि खुंटली मार्गगती ॥ येणेंगुणे ॥११॥

ते नवनागसहस्त्रबळी ॥ महाकाळासि घे हातोफळी ॥ तंव राम ह्नणे बळ पावली ॥ कैसेनि ते ॥१२॥

मग ह्नणे मुनी कौशिक ॥ सुकेतु नामें कोणी यक्ष ॥ तेणें प्रसन्न केला चतुर्मुख ॥ कन्येलागीं ॥१३॥

ह्नणे मज कन्या व्हावी पवित्र ॥ तिसी बळ नवनागसहस्त्र ॥ ते हे ताटिका जाहली सुंदर ॥ ब्रह्मवरदें ॥१४॥

मग सुंद नामें असुर ॥ तो ताटिकेसि केला भ्त्रतार ॥ पुढें ते प्रसवली कुमर ॥ मरीचि नामें ॥१५॥

तंव त्या मार्गी जातां अगस्ती ॥ त्यासी छळावया गेली युवती ॥ विशाळ धरोनि आकृती ॥ पुत्रासह ॥१६॥

तंव ॠषींने शापिली दोन्ही ॥ तुझी राक्षस होवोनि वनीं ॥ रक्तमांसाचे भोजनीं ॥ तृप्ती तुह्मां ॥१७॥

वैश्य शूद्र आणि ब्राह्मण ॥ क्षेत्री आदि भक्षाल वर्व ॥ ऐसे शापें हें उद्वसवन ॥ ताटिकेचें ॥ ॥१८॥

आतां ते येईल निशाचरी ॥ जाणों प्रळयसिंधुची लहरी ॥ रामा ते वधितां नारी ॥ न करीं विचार ॥१९॥

स्त्री वधितां लज्जापातक ॥ हा पढोंनको गा श्लोक ॥ चारिवणींचे जे घातक ॥ त्यांसी वधितां दोष नाहीं ॥१२०॥

पूर्वी मंथरा नामें तत्वतां ॥ कोणी येक विरोचनसुता ॥ राक्षसी होती गा रघुनाथा ॥ अग्निरुप ॥२१॥

ते भक्षी सकळजनां ॥ तें श्रुत जाहलें गजेंद्रवाहना ॥ मग ते वज्रघातें अंगना ॥ वधिली इंद्रे ॥२२॥

ऐसें ऐकुनि रघुवीर ॥ धनुष्या केला टणत्कार ॥ जाणों गर्जिन्नला जलधर ॥ प्रळ्यकाळींचा ॥२३॥

तो जाणोनियां ध्वनी ॥ ह्नणे कोण धीट प्रवेशला वनीम ॥ ह्नणोनि धाविन्नली कामिनी ॥ ताटका ते ॥२४॥

ते होती हो निद्रिस्थ ॥ भंवतिया राक्षसी बहुत ॥ त्या कन्या करिती जागृत ॥ तयेसी पैं ॥२५॥

सहस्त्रसंख्या वृक्षघातीं ॥ तिये जाहली जागृती ॥ मग आवाळुबे चाटिती ॥ उठिली ते ॥२६॥

जाणों उंचावला गिरीवर ॥ जैसा गजबजिला फणिवर ॥ दशन जाणों अडसर ॥ मुखदरीसी ॥२७॥

माथां विशाळ बाबरझोटी ॥ लंबकर्ण विशाळवोठी ॥ ऐसी रामें देखिली दृष्टीं ॥ येतां जवळी ॥२८॥

मग राम ह्नणे लक्ष्मणा ॥ पैल पहा येतसे अंगना ॥ सौमित्र ह्नणे धनुष्यी बाणा ॥ लाविजे जी ॥२९॥

मग कानाडी भरुनि धनुर्धरें ॥ हदयीं बाण विंधिला निकरें ॥ भूमी पाडिली प्रथमशरें ॥ राक्षसी ते ॥१३०॥

देव वर्षले पुष्पसंभारीं ॥ दुंदुभी वाजल्या अंबरीं ॥ ह्नणती भला गा अवधारीं ॥ कौशिका तूं ॥३१॥

या रामाचिये संगती ॥ कल्पना पुरोनि वाढेल कीतीं ॥ आणीक ऐकें गा भारती ॥ ॠषेश्वरा ॥३२॥

कृशध्वजा जे कुमर ॥ ते महाबळिये वीर ॥ या रामाचे साह्यकार ॥ होतील जाण ॥३३॥

ऐसें ऐकोनि विश्वामित्र ॥ प्रेमें जाहला निर्भर ॥ मग ते रात्रीं जाहला स्थीर ॥ त्या तपोवनीं ॥३४॥

उदयो जाहलिया दिनमणी ॥ नेम सारिला ॠषिजनीं ॥ रामासि बोले प्रीतिकरोनी ॥ विश्वामित्र ॥३५॥

ह्नणे नानाविद्यांचे महामंत्र ॥ ते तुज देईन सर्वत्र ॥ यां योग्य गा परम पात्र ॥ तूचि अससी ॥ ॥३६॥

मग गुरुशिष्यांचे पद्धतीं ॥ रामें वंदिलें ॠषीप्रती ॥ तंव तो देत मंत्रशक्ती ॥ रामचंद्रासी ॥३७॥

धर्मचक्र काळचक्र ॥ ब्रह्नास्त्र आणि रुद्रांस्त्र ॥ धर्मपाश काळपाश अस्त्र ॥ शिवशुळ तो ॥३८॥

वज्रास्त्र ब्रहशिरास्त्र ॥ अहिशस्त्र क्रौचास्त्र ॥ कंकोल मुसळ कापाल शस्त्र ॥ आणि दोनसहस्त्र धनुष्यें ॥३९॥

नादास्त्र आणि महाशक्ती ॥ शिखरी मोदकाची युक्ती ॥ संहारास्त्र परिघास्त्र शक्ती ॥ किंकिणी आणि विद्याधरा ॥१४०॥

वरुणास्त्र अग्निअस्त्र ॥ मानवास्त्र मोहास्त्र ॥ घातास्त्र आणि पातनास्त्र ॥ सौरास्त्र पैं ॥४१॥

धैर्यास्त्र आणि निद्रास्त्र ॥ भाते दोनी दिव्यास्त्र ॥ उदकास्त्र आणि पर्वतास्त्र ॥ पर्जन्यास्त्र पैं ॥४२॥

राक्षसशस्त्र नारायणास्त्र ॥ दैत्यनाश शोषणास्त्र ॥ मदनास्त्र आणि वातास्त्र ॥ प्रशमनास्त्र पैं ॥४३॥

अश्व गज महारथी ॥ महाअशनीधर पदाती ॥ चातुरंगसैन्य जिंकिती ॥ ते दीघली विद्या ॥४४॥

ऐसिया विद्या समस्ता ॥ ॠषींने दीधल्या रघुनाथा ॥ प्रत्यक्षरुपें जाहल्या बोलत्या ॥ नानामतांच्या ॥४५॥

आणि जृंभकादि महावीर ॥ ते कृशध्वजाचे कुमर ॥ त्यांचाही दीधला मंत्र ॥ रामचंद्रासी ॥४६॥

ऐसियांची व्हावी प्रचीती ॥ ह्नणोनि आव्हानित रघुपती ॥ तंव ते येकशत पर्वताकृती ॥ ठाकले उभे ॥४७॥

तो देखोनि चमत्कार ॥ विस्मित जाहला रामचंद्र ॥ जृंभकीं करोनि नमस्कार ॥ बोलते जाहले ॥४८॥

आमुतें कासया बोलाविलें ॥ काय कार्य सांगा वहिलें ॥ मग राम ह्नणे पडिलिया वेळे ॥ यावें तुह्मीं ॥४९॥

ते धंदोनियां रघुनंदना ॥ गेले आपुले निजभुवना ॥ तंव पावले महावना ॥ सिद्धाश्रमासी ॥१५०॥

तेथें पुण्यनदी दिव्य तरुवर ॥ शुक्र सारिका महा सरोवर ॥ राम ह्नणे हें पुण्यक्षेत्र ॥ असे कवणाचें ॥५१॥

मग ह्नणे विश्वामित्र ॥ बळी विरोचनाचा पुत्र ॥ तेणें केला होता अध्वर ॥ ये भूमिकेसी ॥५२॥

मग वामनरुपें नारायण ॥ बळींचे मस्तकी ठेवी चरण ॥ दैत्य दवडोनि अमरभुवन ॥ दीधलें देवांसी ॥५३॥

ऐशी सिद्धी जाहली नारायणा ॥ ह्नणोनि सिद्धाश्रम नाम वना ॥ तंव ह्नणेराम राणा ॥ येथें करावा याग ॥५४॥

मुनी ह्नणे सत्यवचन ॥ येथेंचि करुं याग हवन ॥ हें पूर्वी दीघले स्थान ॥ वामनें मज ॥५५॥

तरी तेथें वामनाची खुण ॥ अद्यापि असे जाण ॥ खुजीं माणसें ॠषिजन ॥ देउळें खुजीं ॥५६॥

मग हाकारिले मुनिजन ॥ द्रव्य सामुग्री केली परिपूर्ण ॥ दीक्षा घेतली आपण ॥ गाधिनंदनें ॥५७॥

पाहोनि सुमुहूर्त सुदिनीं ॥ कुंडीं स्थापिले दिव्य अग्नी ॥ अवदानें देती यज्ञीं ॥ वेदमंत्री पैं ॥५८॥

रामासि खुणाविलें ॠषेश्वरी ॥ आतां येईल दुराचारी ॥ तूं धनुष्य घेवोनियां करीं ॥ होई सावध ॥५९॥

मग राम आणि लक्ष्मण ॥ धनुष्या लावोनि वज्रबाण ॥ निद्रा नेणति अर्धक्षण ॥ दोघे वीर ॥६०॥

तंव ऐकतां वेदमंत्र ॥ दोनी पावले निशाचार ॥ जाणो साजीवले गिरिवर ॥ सैन्यशिखरीं ॥६१॥

तें जाणोनियां रामचंद्रें ॥ बाण सोडिला धुंधुवातरें ॥ राक्षस निवारले धनुर्धरें ॥ वरिच्यावरी ॥६२॥

रक्तमांसाचे वळले घन ॥ ऐसे वर्षले दोघेजण ॥ नासावया होमहवन ॥ ॠषीश्वरांचें ॥६३॥

मग राम ह्नणे गा लक्षुमणा ॥ दृष्टी करीं कां माझिया बाणा ॥ राक्षस वधोनियां मुनिजनां ॥ करीन आनंद ॥६४॥

मग वायव्यास्त्रें शतबार्णी ॥ मरीचि विंधिला हदयस्थानीं ॥ शतयोजनें समुद्र जीवनीं ॥ पडिला तो ॥६५॥

तंव सुबाहू नामें निशाचार ॥ तो धाविन्नला महावीर ॥ क्रोधें चालिला आतुर ॥ रामावरी ॥६६॥

तो जाणूनि दुराचारी ॥ रामें वधिला कामशरीं ॥ गात्रांची करोनि कांडोरी ॥ पाडिला धरणीं ॥६७॥

मग खवळला सैन्यभार ॥ राम उठावला महावीर ॥ जाणों कमळांवरी कुंजर ॥ उठावला जैसा ॥६८॥

येकां पाडिलें भूमीं ॥ येकांसी उडविलें गगनीं ॥ येकांची शतखंडे करुनी ॥ विदारिलें ॥६९॥

येकांची तुटली शिरें ॥ करचरण तोडिले निकरें ॥ येकां मारिलें चक्रें ॥ रणामाजी ॥१७०॥

येकांची लोंबती आतें ॥ येक मारिले गदाघातें ॥ येक मारिले शस्त्रघातें ॥ राम सौमित्रीं ॥७१॥

मग मंत्रोनि रुद्रबाणीं ॥ सर्व सैन्य पाडिले धरणीं ॥ तंव वर्षाव केला सुमनीं ॥ अमरनाथें ॥७२॥

मग तो विश्वामित्र ॥ हर्ष जाहला निर्भर ॥ ह्नणे सिद्धी पावविला अध्वर ॥ रामा तुवां ॥७३॥

ॠषी ह्नणे गा रघुनंदना ॥ उत्तीर्ण जालासि गुरुदक्षिणा ॥ सुखी केलें ॠषिगणा ॥ काकुत्स्था तुवां ॥७४॥

षटदिनीं संपादिलें हवना ॥ यथाशक्ती दानदक्षिणा ॥ मग केलें अवभृंथस्त्रामा ॥ गाधिनंदनें ॥७५॥

मांडिले यज्ञसंपादन ॥ मग पूजिले रामलक्ष्मण ॥ वस्त्रालंकार दिव्यरत्न ॥ देता जाहला ॥७६॥

ऐसें जंव मांडिलें ॥ तंव लग्नपत्र मिथुळेहूनि आलें ॥ कीं सैंवर असे मांडिले ॥ जानकीचें ॥७७॥

तेथें बोलाविलें ॠषेश्वरां ॥ ऐसा आलासे पाचारा ॥ तंव तो ॠषि रामवीरा ॥ काय बोले ॥७८॥

ह्नणे गा धन्या रामचंद्रा ॥ आतां जाऊं मिथुळानगरा ॥ तेथें याग पाहूं नरेंद्रा ॥ विदेहाचा ॥७९॥

तुज होईल कल्याण ॥ हें माझें सत्य वचन ॥ मग निघाले मुनिजन ॥ रामासहित ॥१८०॥

सकळ निघाले ॠषेश्वर ॥ मध्यें चालती रामसौमित्र ॥ आतां पुढें होईल उद्धार ॥ अहिल्येचा ॥८१॥

ऐसे निघाले रामलक्ष्मण ॥ तंव जाहले शुभ शकुन ॥ त्यांचे पुढें असे कारण ॥ तें ऐकावें श्रोतीं ॥८२॥

आतां असो हें यागहवन ॥ राम करील त्र्यंबक भंजन ॥ तें ऐका रामकीर्तन ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥८३॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ तृतीयस्तबक मनोहरु ॥ ताटिकासुबाहुवधप्रकारु ॥ चतुर्थोऽध्यायीं कथियेला ॥१८४॥

॥ श्रीजानकीरमणार्पणमस्तु ॥ ॥ सांबसदाशिवार्पणमस्तु

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP