कथाकल्पतरू - स्तबक ४ - अध्याय १४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मुनीसि ह्नणे राजा भारत ॥ पद्म कैसा लाधला अनंत ॥ तो सविस्तर सांगा वृत्तांत ॥ मुनिदेवा ॥१॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ सकळ सांगेन अनुमान ॥ तो तुवां मानावा गुण ॥ प्रत्युत्तराचा ॥२॥

उदकें व्यापिलें भूमंडळ ॥ पद्मनाभीं प्रसवलें कमळ ॥ तें अष्टदिशाचें अष्टदळ ॥ उदेलें पैं ॥३॥

मध्यें उपजला ब्रह्मा मुनी ॥ दृष्टीं पाहे तों न दिसे कोणी ॥ इतुक्यांत अवचटें आले दोनी ॥ मधुकैटभ ॥४॥

ते जन्मले विष्णूचे कर्णयुगुळीं ॥ महाप्रौढी महाबळी ॥ तयांसि मांडिता समफळी ॥ न दिसे दुसरा ॥५॥

निद्रेनें दाटला आदिपुरुष ॥ पुढें तिहीं देखिला चतुर्मुख ॥ मग त्यावरी धरोनि रोष ॥ चालिले दोघे ॥६॥

ब्रहयासि केलें आंदोळण ॥ तंव विधि ह्नणे मी ब्राह्मण ॥ पैल केलें असे शयन ॥ तो पुरवील काज ॥७॥

दैत्य धांवले कर्णजात ॥ परि विष्णु जाणोनि निद्रिस्थ ॥ हरीसि करितसे जागृत ॥ योगमाया ॥८॥

तो कमळनयन वनमाळी ॥ माया उपजली नेत्रकमळीं ॥ ते लक्ष्मीच तये वेळीं ॥ विनटली ऐसी ॥९॥

असो अठ्ठाविस युगेंवरी ॥ सुषुप्तीं होता श्रीहरी ॥ तो जागविला सुंदरीं ॥ तये वेळीं ॥१०॥

ऐसा जागविला श्रीहरी ॥ तंव ते पावल महावैरी ॥ तिघां मांडिली झुंजारी ॥ वेगां जाण ॥११॥

थोर मांडिली महामारी ॥ ते दोघे हा एकला हरी ॥ ह्नणोनि पडिला विचारीं ॥ महाविष्णू ॥१२॥

केलें नाना युद्धसाधन ॥ परी त्यांचें न दिसे मरण ॥ मग विष्णु ह्नणे मी प्रसन्न ॥ जाहलों तुह्मां ॥१३॥

तंव हांसले बंधु दोनी ॥ तूं याचक आह्मी दानी ॥ तरी मागरे अंतःकरणीं ॥ असेल जें तें ॥१४॥

ऐकोनि ह्नणे नाराण ॥ तुह्मी दानी मीच कृपण ॥ तरी माझेनि हातें मरण ॥ व्हावें तुह्मां ॥१५॥

तंव ते ह्नणती तथास्तु ॥ परि जळ सांडोनि करावा घातु ॥ मग जानूवरी केला निःपातु ॥ तयांचा पैं ॥१६॥

त्यांचेनि मेदें थिजलें पाणी ॥ तेंचि नाम जाहलें मेदिनी ॥ तंव ब्रहयानें स्थापिले कमळकर्णी ॥ आठ दिग्पाळ ॥१७॥

राया ऐसें तें आदिकमळ ॥ जें विष्णूचें नाभिमंडळ ॥ ब्रह्मादिकांचें वेळाऊल ॥ आदिपद्म तें ॥१८॥

आणि तें लक्ष्मीचें निजभुवन ॥ आदिमायेचें निद्रास्थान ॥ तया पद्मीं करोनि शयन ॥ राहे सागरीं ॥१९॥

कल्पांताचे अवसरीं ॥ देवां दैत्यां मांडे झुंजारी ॥ तैं रत्नें टाकिती सागरीं ॥ देव समस्त ॥२०॥

मागुती जाहलिया वस्ती ॥ रत्नें काढिती येचि पद्धतीं ॥ ते कमळासरिसी आदिशक्ती ॥ निघे बाहेरी ॥२१॥

तरी कमळ ब्रहयाचें स्थान ॥ आणि लक्ष्मीचें निजभुवन ॥ ह्नणोनि करीं आपण ॥ धरिलें देवें ॥२२॥

तें मूळ असे नाभिकमळ ॥ जेथें आहे विश्व सकळ ॥ ह्नणोनि न विसंबे तें फुल ॥ नारायण ॥ ॥२३॥

परी आणिकही असे संकेत ॥ विश्वासि दावितसे अनंत ॥ कीं मी हदयकमळीं सतत ॥ आहें जाणा ॥२४॥

हे अठठावीस युगांची वार्ता ॥ तुज म्यां कथिली गा भारता ॥ पूर्वी सावर्णि मनु वर्ततां ॥ जाहलें चरित्र ॥२५॥

तरी तेचि योगमाया अवधारीं ॥ जे उपजलीसे द्वापारीं ॥ नंदयशोदचे उदरीं ॥ कुमारीरुपें ॥२६॥

सर्व सारोनि संजीवनी ॥ तेचि हे उपजली रुक्मिणी ॥ अवतरलासे चक्रपाणी ॥ जाणोनियां ॥२७॥

हे सत्य मानावी वाणी ॥ ऋषीमताविण न वाहे लेखणी ॥ हे कथा असे पुराणीं ॥ मार्केडेयाचे ॥२८॥

मुनि ह्नणे गा भारता ॥ त्वां पुसिली कमळकथा ॥ तरी पद्म लाधलें अनंता ॥ ऐसियापरी ॥२९॥

मागुती ह्नणे जन्मेजयो ॥ कैसा कौस्तुभ पावला देवो ॥ तो फेडावा जी संदेहो ॥ माझे मनींचा ॥३०॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ तूं श्रोतयांमाजी विचक्षण ॥ तरी आतां पुशीचा प्रश्न ॥ सांगेन तुज ॥३१॥

श्रीमद्भागवतींचे कथनीं ॥ कौस्तुभ जोडला समुद्रमंथनीं ॥ तें साच परि पद्मपुराणीं ॥ अनारिसे गा ॥३२॥

देवीं मंथिला मंदराचळ ॥ कूर्ममेदिनीचा जाहला आदळ ॥ तंव द्रवलासे अचळ ॥ रत्नमणीयातें ॥३३॥

त्या मंदराचळाचें सूत्र ॥ जाणों दिनकराचें मादिर ॥ तें राहिलें शतसंवत्सर ॥ पृथ्वीसंगें ॥३४॥

परी तें वज्र महाशीळ ॥ तेणें भेदिलें भूतळ ॥ त्या योगें पडिलें मुक्ताफळ ॥ मस्तकीं शेषाचे ॥३५॥

ऐशी भेदोनि महीतळीं ॥ तें जाऊंपाहे पाताळीं ॥ तंव झेलिलें शिरकमळीं ॥ शेषरायें ॥३६॥

तोचि माथां मिरवला मणी ॥ जाणों द्वादशादित्यांची खाणी ॥ ऐसें रत्न गा त्रिभुवनीं ॥ नाहीं दुसरें ॥३७॥

कुनामें बोलिजे मेदिनी ॥ मंदराचळ स्तंभस्थानीं ॥ तिसरें आभेचिये मिळणीं ॥ साधिलें सूत्र ॥३८॥

तेणें वर्ण नाम जाहली बुद्धी ॥ हें काव्यसूत्र साधिलें संधीं ॥ तेंचि गुणनाम ठेविलें विधीं ॥ कौस्तुभ ऐसें ॥३९॥

पुढें कोणे एके वर्तमानीं ॥ शेषें केलीं गा पळणी ॥ ह्नणोनि जळार्णव जाहली मेदिनी ॥ आधारपणें ॥४०॥

येरु निघों पाहे अंतरीं ॥ तंव तो गरुड महावैरी ॥ ह्नणोनि गेला क्षीरसागरीं ॥ विष्णूप्रती ॥४१॥

देवासि गेला लोटांगणी ॥ भेणें रिघाला आथरुणीं ॥ आणि भेटी दीधला कौस्तुभ मणी ॥ स्वमस्तकींचा ॥४२॥

पूर्वी अमृताचिये हरणीं ॥ ब्रह्मा बोलिला असे वाणी ॥ कीं शेषा तूं सेवीं चक्रपाणी ॥ गरुडाभेणें ॥४३॥

हे साक्षी असे भारतीं ॥ आदिपर्वी गा भूपती ॥ जैं अमृत नेलें सुरपती ॥ जिंकोनि गरुडें ॥४४॥

भारता मग तो कौस्तुभमणी ॥ कंठीं मिरविला शारंगपाणीं ॥ हे व्यासदेवाची वाणी ॥ पद्मपुराणींची ॥४५॥

ऐसें तें हें महारत्न ॥ श्रीहरीस लाधलें भूषण ॥ आणि शेष जोडला आंथरुण ॥ ऐसिया परी ॥ ॥४६॥

मग ह्नणे राजा भारत ॥ पीतांबर लाधला कैसा अनंत ॥ तंव मुनि ह्नणे हा संकेत ॥ सांगों तुज ॥ ॥४७॥

गरुडपुराणीचें मत ॥ युगपरत्वें जाहलें विभक्त ॥ तें प्रसंगीं कथिजेल संकलित ॥ भारता तुज ॥४८॥

परी भविष्योत्तरीचेनि विचारें ॥ पीतांबर दीधला नंदिकेश्वरें ॥ तें वर्णिलेंसे विस्तारें ॥ तृतीयस्तबकीं ॥४९॥

आणिक येक ऐकें विवेक ॥ हरिहरब्रह्मा पिंड एक ॥ तो बोलिजे त्रिगुणात्मक ॥ नारायण ॥५०॥

ब्रह्मा रजोगुण निश्वित ॥ तमसत्वें हरिहर मिश्रित ॥ तेथें वस्त्र दिसे पीत ॥ रजोगुणास्तव ॥५१॥

कुतरी हरी मेघश्यामशोभा ॥ वरी अभ्र वाहिलें विजुप्रभा ॥ कीं अग्नि काढोनि निजगाभां ॥ झळाळे तेज ॥५२॥

की कमळेगर्भाचेनि योगें ॥ लक्ष्मी पीतवर्ण जाहली अंगें ॥ तरी तो तिचियेनि संगें ॥ जाहला पीतांबर ॥५३॥

मग ह्नणे राजा भारत ॥ गरुडवाहन पावला अनंत ॥ तरी त्याचा जन्मवृत्तांत ॥ सांगा मज ॥५४॥

वैशंपायन ह्नणे नृपवरा ॥ दक्षाचिया कन्या तेरा ॥ त्या दीधल्या ऋषीश्वरा ॥ कश्यपासी ॥५५॥

त्यांमध्ये गा भारता ॥ कद्रू आणि दुसरी विनीता त्यांही विनविलें प्राणनाथा ॥ पुत्रालागीं ॥५६॥

ह्नणती तुवां रचिली गा सृष्टी ॥ देवांदैत्यांचिया कोटी ॥ तरी रचावे आमुचे पोटीं ॥ गर्भ स्वामी ॥५७॥

प्रसन्न होवोनि ऋषीश्वर ॥ कद्रुसि दीधले पुत्र सहस्त्र ॥ मग तें अंडीं घालोनि उदर ॥ भरिलें जाणा ॥ ॥५८॥

तेचि उपजले फणिवर ॥ नानापरींचे विखार ॥ ते संकलिंतें थोरथोर ॥ सांगों तुज ॥५९॥

शेष वासुकी आणि तक्षक ॥ काळिया ऐरावत शंख ॥ पुरण धनंजय अंतक ॥ नील वामन पैं ॥६०॥

एकपत्र आणि अजिंक ॥ नीळ कमळाक्ष मयंक ॥ धनुर्धर जय अनंत ॥ लीलावामन पैं ॥६१॥

शल पातक आणि सन्मुख ॥ विमळू आणि दुर्मुख ॥ शृंखळ नहळ अश्वतरु महक ॥ बळनिष्ठुर पंचरपु पैं ॥६२॥

बळी शिवाबीळ पदक ॥ पद्मवंत आणि पीडाकारक ॥ पुष्पहष्ट तै़साचि शमक ॥ आणि कर्कोटक तो ॥६३॥

हेमक आणि सर्वात्मक ॥ सुजलीक कीं अपराजिक ॥ कौरव आणि हरिपदक ॥ हस्तभद्र पैं ॥६४॥

सुबाहु कुण बळीक ॥ कुंजर कर्कर शैलक ॥ धृतराष्ट्र आणि पुष्पक ॥ महामणी ॥६५॥

पाराशरीक आणि थारी ॥ मुखार आणि प्रभाकरी ॥ आतां असो हे विस्तारी ॥ क्षोभतील श्रोते ॥६६॥

ऐसे कद्रूचे एक सहस्त्र ॥ तंव विनतेसि जाहला दीड पुत्र ॥ तो सकळ गा विस्तारी ॥ सांगेन तुज ॥६७॥

दोन अंडीं जन्मली विनता ॥ मग व्यापिली महा चिंता ॥ ह्नणोनि विनवी पतीसि कांता ॥ सुंदरा पैं ॥६८॥

कीं कद्रूसि दीधले पुत्र सहस्त्र ॥ परी मज दोनचि नामपात्र ॥ तंव ऋषि ह्नणे यांचे आहार ॥ होतील ते ॥६९॥

हे नागवती देवां असुरां ॥ नर किन्नरां निशाचरां ॥ हीं अंडीं वर्षी सहस्त्रां ॥ फेडावीं तुवां ॥७०॥

मग ते पांचांशत वर्षा ॥ एक आंडें फोडिलें देखा ॥ तंव त्या देखिलें अंधका ॥ अर्धबाळ कीं ॥७१॥

तोचि जाहला पुत्र अरुण ॥ कटीवरता असे संपूर्ण ॥ परि शाप बोलिला नंदन ॥ मातेप्रती ॥७२॥

मज न भरतां पूर्णदिसीं ॥ अंड फोडिलें हो तामसी ॥ तरी विपायें होसील दासी ॥ सत्य जाण ॥७३॥

तेणें दुखवलीं सुंदरा ॥ तंव अरुण बोलिला सामोपचारा ॥ कीं दुजें अंडें वर्षी सहस्त्रां ॥ फेडावें पैं ॥७४॥

हा तुझा वो दिव्यनंदन ॥ तो शापाच हरील शीण ॥ ऐसें ह्नणोनि गेला अरुण ॥ सूर्यमंडळासी ॥७५॥

तो सूर्याचा जाहला सारथी ॥ कुंकुमपर्वत महादीप्ती ॥ महाक्षेत्री धर्ममूर्ती ॥ अरुण रावो ॥७६॥

पुढें कोणे एके काळवेळीं ॥ कद्रू विनते मांडिली रंळी ॥ कीं सूर्याचा अश्व न्याहाळीं ॥ कैसा असे ॥ ॥७७॥

विनता ह्नणे आहे श्वेत ॥ उचैःश्रवा सिंधुजात ॥ कद्रू ह्नणे आहे कृष्णवत ॥ कान पुच्छ तयाचें ॥७८॥

ऐसिया स्थापिती एकमेकां ॥ मग पैजेचिया बोलिल्या भाका ॥ हरेल ते होय परिचारिका ॥ एकमेकींची ॥७९॥

माता कद्रू पुसे शेषा ॥ कीं उचैःश्रवा आहे कैसा ॥ तंव येरु ह्नणे सीताशा ॥ सारिखा वर्ण ॥८०॥

मग ते कद्रूमाता सुंदरा ॥ कपत सांगे स्वकुमरां ॥ मी प्रसवलें तुह्मा समग्रां ॥ तरी करावें सत्य माझें ॥८१॥

पैल हा सूर्याचा वारु ॥ उच्चैःश्रवा असे शुभ्रू ॥ तो कर्णी पुच्छीं भ्रमराकारु ॥ करावा तुह्मीं ॥८२॥

मग ते गेले फणिवर ॥ कर्णी पुच्छीं जडले समग्र ॥ तंव कद्रू ह्नणे वेगवत्तर ॥ पाहीं विनते ॥८३॥

तंव ते विनता दक्षनंदिनी ॥ अश्व श्याम देखे नयनीं ॥ मग दासी होवोनि चरणीं ॥ लागे कद्रूचिया ॥८४॥

परि जाहली गगनवाणी ॥ तुवां कुडें केलें वो बहिणी ॥ अश्व श्वेत परी पन्नग लावोनी ॥ केला सुनीळ ॥८५॥

ऐसें ऐकतां दक्षनंदिनी ॥ सर्पा शापितसे वचनीं ॥ कीं तुह्मी जळालरे अग्नीं ॥ जन्मेजयाच्या ॥८६॥

तें ऐकोनि शापवचन ॥ सुखी जाहले देवगण ॥ ह्नणती प्रजांचें हरलें विघ्र ॥ इचेनि प्रसादें ॥८७॥

तंव ब्रहयानें बोलाविला पुत्र ॥ जो कश्यप नामें सृष्टिकार ॥ तयांसि उपदेशिला मंत्र पूर्व भविष्याचा ॥८८॥

इकडे कद्रू ह्नणे विनते ॥ खांदीं घेई हो आमुतें ॥ तूं चाल पाताळपंथें ॥ घेवोनियां ॥८९॥

मग तये विनतेचे खांदीं ॥ कद्रू बैसली मंदबुद्धी ॥ वेगां पावली उदधी ॥ पुत्रांसहीत ॥९०॥

तंव वर्षे भरलीं सहस्त्र अंड भेदोनि निघाला पक्षींद्र ॥ महाप्रौढीचा दिनकर ॥ तेजें आगळा तो ॥९१॥

जाणों अग्नीचा पर्वत ॥ तैसा मिरवला लोहित ॥ परी मातेसि असे न्याहाळित ॥ चहूंकडे पैं ॥९२॥

तंव जाहली गगनवाणी ॥ गरुडा न करीं रे चिंतवणी ॥ तुझी आहे विनता जननी ॥ तीरीं समुद्राच्या ॥९३॥

मग निघाला वेगवत्तर ॥ जाणों शितींचा सुटला शर ॥ येवोनि मातेसि नमस्कार ॥ केला शिरसा ॥९४॥

मग तो सर्व समाचार ॥ विनतेनें सांगितला समग्र ॥ तंव सहस्त्रसर्पाचा भार ॥ घेतला गरुडें ॥९५॥

परि सर्पा लागले रविकर ॥ तेणें कोमाइले फणिवर ॥ तंव कद्रूनें स्मरिले जलधर ॥ तयालागीं ॥९६॥

तेणें सर्प जाहले सावधान ॥ मग तिहीम वसविलें जंबुवन ॥ तंव कद्रूसि विनविलें वचन ॥ गरुडदेवें ॥९७॥

कीं माझिये मातेचें दासीपण ॥ कैसेनि फिटेल भाकॠण ॥ तें तूं सांगें पां कारण ॥ मजपाशीं हो ॥ ॥९८॥

मग ह्नणे सर्पमाता ॥ अमृत देई माझिये सुता ॥ तरीच दासीपणा पासोनि विनता ॥ सुटेल पैं ॥९९॥

असो गरुड ह्नणे मातेतें ॥ मज भोजन देई विनते ॥ जठराग्नीचेनि व्यथें ॥ पीडलों थोर ॥१००॥

तंव माता ह्नणे गरुडातें ॥ निषात खाईरे सहस्त्रगणितें ॥ परि तयांमाजील संकेतें ॥ सांडावा विप्र ॥१॥

मग मातेसि ह्नणे कुमर ॥ म्यां कैसा जाणावा विप्र ॥ हा सागें हो विचार ॥ माते मज ॥२॥

विनता पुत्रासि सांगे मंजुळीं ॥ पैल भक्षीरे सहस्त्र कोळी ॥ परि अग्नि लागेल कंठनाळीं ॥ तोचि विप्र जाणावा ॥३॥

कुकमीं होकां ज्ञातिबहिष्कर ॥ खळ चांडाळ अपवित्र ॥ तरी ब्रह्मबीजासि अनुपकार ॥ न करावा तुवां ॥४॥

आणि ब्राह्मणाची दारा ॥ व्यभिचार घडे जया नरा ॥ तो क्लीब कीम कुष्ठशुभ्रा ॥ होय जाण ॥५॥

कीं विप्रहत्येचिया दोषा ॥ वंश न वाढे गोत्रलेशा ॥ वांचेल तरी गलितमांसा ॥ होय कुष्ठी ॥६॥

नातरी होय अपस्मार ॥ अथवा दीर्घरोगी निर्धार ॥ हा कर्म विपाकींचा विचार ॥ सांगितला तुज ॥७॥

अथवा ब्राह्मणाचें ॠण ॥ तें विषापरिस दारुण ॥ मग जाणोनियां खुण ॥ उडाला गरुड ॥८॥

क्षुधें पीडला असे थोर ॥ कोळी भक्षिले एकसहस्त्र ॥ तंव कंठीं लागला अंगार ॥ अवचितां तया ॥९॥

येरें तो उगाळिल ब्रह्मसुत ॥ तरी कोळियाचा होता जामात ॥ जंव स्त्रीसि गिळी तंव मुखांत ॥ उठली व्यथा ॥११०॥

ह्नणोनि उगाळिली ढीवरी ॥ तेणें गरुड पडिला विचारीं ॥ पाहे तंव तियेचे उदरीं ॥ गर्भ ब्राह्मणाचा ॥११॥

असो जाहलें पूर्ण भोजन ॥ गरुड पावला समाधान ॥ तंव आठवलें वचन ॥ मातेचे पैं ॥१२॥

मग उडाला वैनत ॥ तो पावला मेरुपर्वत ॥ तेथें देखिला ॠषिनाथ ॥ कश्यप पिता ॥१३॥

तंव तो गेला लोटांगणीं ॥ येरं आलिंगिला प्रीती करोनी ॥ गरुड देखोनियां ब्राह्मणीं ॥ मानिला हर्ष ॥१४॥

मग गरुड ह्नणे आपण ॥ मज द्यावें जी ताता भोजन ॥ सहस्त्र वर्षे लंघन ॥ पडिलें मज ॥१५॥

ऐकोनि ह्नणे ऋषेश्वर ॥ सुवर्ण नामें सरोवर ॥ तेथें पावसीरें आहार ॥ उदरप्रमाण ॥१६॥

तेथें असती जळचर ॥ पूर्वील वणिजारीयाचे पुत्र ॥ ते शापिले कूर्मकुंजर ॥ परस्परें पैं ॥१७॥

तरी ऐक गा कुमरा ॥ धनदत्त नामें होता वणिजारा ॥ तेणें प्रसन्न करोनियां रुद्रा ॥ प्रसवला पुत्र दोनी ॥१८॥

वडिला नांव वसुनिक ॥ धाकुटा बोलिजे सुप्रतीक ॥ पिता निमालिया बहुतेक ॥ क्रमिला काळ ॥१९॥

मग ते द्रव्यलोभासाठीं ॥ एकमेकां पाहती वैरदृष्टीं ॥ आणि करिती कलह गोष्टी ॥ व्यवहाराच्या ॥१२०॥

मांडिला स्वामित्व विभाग ॥ परी एकमेकांचें रिघे आंग ॥ खंडितां शिणलें सकळ जग ॥ व्यवहार त्यांचा ॥२१॥

ऐसा कलह करिती नित्यानी ॥ वांटितां न घेती समजावणी ॥ मग शाप बोलिले दोनी ॥ परस्परांसी ॥२२॥

वडिलें शापिला धाकुटा ॥ तूं कांसव होसी रे नष्टा ॥ तंव येरु ह्नणे रे गर्विष्टा ॥ होसील गज ॥२३॥

तेचि हे सुवर्णसरोवरीं । दोघे असती पूर्ववैरी ॥ पशु झालिया परि शरीरीं ॥ न सांडिती वैर ॥२४॥

आपुला घेवोनियां चारा ॥ मग पेटती महामारा ॥ तेणें होतसे उजगरा ॥ ॠषीश्वरांसी ॥२५॥

दोघे पुष्ट महाशरीरें ॥ जाणों पर्वताचीं शिखरें ॥ गणित केलें सत्यवतीकुमरें ॥ तें ऐकावें गा ॥२६॥

आडवा योजनें बारा ॥ उंच शतयोजनें रे पुत्रा ॥ हें गणित जाहलें कुंजरा ॥ वसुवडिलासी ॥२७॥

दुसरा उंच योजनें चारी ॥ शतयोजनें आडवा शरीरीं ॥ तो सुप्रतीक सरोवरीं ॥ कांसव जाण ॥२८॥

त्यांचा करीरे आहार ॥ तेणें तुटेल वैर आचार ॥ हें ऐकोनियां पक्षींद्र ॥ आला तेथें ॥२९॥

तंव त्या सरोवराचे पाळीं ॥ दोघे भिडती महाबळी ॥ ते झडपोनियां अंतराळीं ॥ नेले गरुडें ॥१३०॥

मग ते धरिले दोनी चरणीं ॥ तंव द्रुम येक देखिला नयनीं ॥ डाहाळी गेली वायव्यकोणीं ॥ शतयोजनें जयाची ॥३१॥

त्या आमिषेंसी पक्षीवर ॥ डाहाळीये जाहला स्थिर ॥ परि पडतां महाभार ॥ भंगली डाहाळी ते ॥३२॥

तंव तेथें ब्रहयाचे कुमर ॥ वालखिल्लय नामें ऋषेश्वर ॥ डाहाळिये होते वर्षे सहस्त्र ॥ तप करीत ॥३३॥

ते दुखवतील ब्राह्मण ॥ ह्नणोनि डाहाळी झेली सुपर्ण ॥ मग उडाला वदनीं धरोन ॥ पक्षिराज तो ॥३४॥

गजकांसव दोनी चरणीं ॥ डाहाळी मिरवलीसे वदनीं ॥ ऐसा आला तत्क्षणीं ॥ कश्यपा पासीं ॥३५॥

तंव कश्यप ह्नणे रे पुत्रा ॥ तूं जाई महेंद्रशिखरा ॥ गणित असे शतसहस्त्रां ॥ योजनाचें ॥३६॥

तेथें हे ठेवीं डाहाळी ॥ बीजें कीजेल वालखिल्ली ॥ तंव वंदोनि चरणयुगुलीं ॥ उडाला गरुड ॥३७॥

मग त्या पर्वताचे शिखरीं ॥ गरुडें ठेविले ब्रह्मचारी ॥ आणि गजकांसव कंठवरी ॥ भक्षिले तेणें ॥३८॥

परी अनारिसें पुराणांतरीं ॥ कीं गरुड बैसला लंकेचे तीरीं ॥ ह्नणोनि त्रिकुट जाहले चरणाभारीं ॥ करितां भोजन ॥३९॥

कथा दुसरी ऐक राया ॥ गरुडें आमिष घेतलें खावया ॥ मग उडोनि गेला लवलाह्यां ॥ मेरुशिखरीं ॥१४०॥

तेथें जंबुवृक्ष महाथोर ॥ शाखा योजनें अकरासहस्त्र ॥ वरी बैसला पक्षिवर ॥ आमिषासहित ॥ ॥४१॥

तंव त्याचेनि भारें दाटली ॥ खांदी कडकडोनि मोडली ॥ परि ते येरें नखें कवळिली ॥ आणि तैसाचि उडाला ॥४२॥

उडोनि दक्षिणादिशे गेला ॥ समुद्राचिया तीरासि आला ॥ उंच डोंगराचे शिखरीं बैसला ॥ तेचि लंका जाहली मग ॥४३॥

आमिष भक्षोनि उडाला ॥ जबुडाहळा तेथेंचि राहिला ॥ अवघा सोनयाचा जाहला ॥ लंका डोंगर ॥४४॥

पूर्वी आकृती होती वर्तुळी ॥ दाटली गरुडाचिये आंगोळी ॥ तेणें शिखरें तीन जाहलीं ॥ ह्नणोनि त्रिकुट बोलती ॥४५॥

दोहीं पांखांचा विस्तार ॥ एकएक योजनें बारासहस्त्र ॥ हें पुराणीं बोलिले ॠषीश्वर ॥ व्यासादिक ॥४६॥

असो मग तो विनतानंदन ॥ तेणें अमृताचा मांडिला प्रयत्न ॥ अमरावतीचा करोनि प्रश्न ॥ उडाला सहसा ॥४७॥

वेगां पावला सुरनगरी ॥ अमृत पाहतसे चौफेरी ॥ तंव तें सांगितलें अभ्यंतरीं ॥ गगनवाणीनें ॥४८॥

गरुडा न करीम चिंतवणी ॥ पैलकुंडींचा पाहें वन्ही ॥ तो अमृतातें वेढोनि ॥ राहिला असे ॥४९॥

तो जाणोनियां संकेत ॥ वेगां पावला वैनत ॥ तंव भोम नामें इंद्रदूत ॥ असे राखण्या ॥१५०॥

परि तो वधिला सुपर्णे ॥ हांक फुटली तेणें गुणें ॥ तंव इंद्र आला धांवणें ॥ देवांसहित ॥५१॥

मग मांडिली महामारी ॥ जैसा गजयूथावरी केसंरी ॥ तैसें चंचुवें पांखांवरी ॥ पळविलें देवां ॥५२॥

मग गरुड आणि सुरपती ॥ युद्ध मांडलें गा भूपती ॥ दोघे बंधु परी निर्घातीं ॥ उठिले कैसे ॥५३॥

इंद्रें हाणीलीं शस्त्रास्त्रें ॥ तीं जाणवलीं तया दर्भपवित्रें ॥ नातरी सुमनाचेनि पत्रें ॥ लोटिला गज ॥५४॥

मग टाकिलें महावज्र ॥ तें तया जाणों तुळसीपत्र ॥ गरुडें तें वंदिलें पवित्र ॥ ब्राह्मण देह ह्नणोनि ॥५५॥

तें ब्राह्मणाचें अस्थिजात ॥ हें जाणवलें पूर्वगत ॥ कीं निंदितील समस्त ॥ वज्रघातासी ॥५६॥

ह्नणोनि पांखींचे एक पत्र ॥ गरुडें सांडिलें नाममात्र ॥ तेणें गुणें नाम जाहलें पवित्र ॥ सुपर्ण ऐसे ॥५७॥

मग पांखें हालविता सुरपती ॥ जैसीए शिळा लोटली पर्वती ॥ धाकें पळाला ऐरावती ॥ सांडोनियां ॥५८॥

तो आवाहन करोनि सुपर्णे ॥ समुद्रोदक आणिलें तेक्षणें ॥ अग्नि विझविला उदकें तेणें ॥ अमृतकुंडींचा ॥१६०॥

तंव इंद्रें दूत नामें प्रवर ॥ विष्णुपाशी पाठविला शीघ्र ॥ कीं आमुचा राखावा श्रृंगार ॥ घट अमृताचा ॥६१॥

येथें आला असे गरुड ॥ तया देवीं केला नानादंड ॥ परी तो तमघाता मार्तड ॥ नाणीच दृष्टी ॥६२॥

मग तो निघाला प्रवरु ॥ इंद्रें बोलाविला देवगुरु ॥ तयातें पुसिला विचारु ॥ सुपर्णाचा ॥६३॥

ह्नणे हा कैंचा पक्षीवरु ॥ यासी कोणाचा आहे वरु ॥ मग बोलिला देवगुरु ॥ शक्राप्रती ॥६४॥

हा आला आपणा शत्रू ॥ जैसा द्रुमाप्रती पडे अंगारु ॥ मग तो करी गा संहारु ॥ तयाच जैसा ॥६५॥

ऐसें ह्नणोनि पूर्ववृत्तांत ॥ तो गुरुदेवें केला इंद्रासि श्रुत ॥ तें जाणोनियां सुरनाथ ॥ निवांत राहे ॥६६॥

तंव ह्नणे जन्मेजयो ॥ इंद्रासि बोलिला गुरुरावो ॥ तो सांगे गा गर्भभावो ॥ मजप्रती आतां ॥६७॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ पूर्वील ऐकें पां प्रश्न ॥ कश्यपें मांडिला होता यज्ञ ॥ पुत्रालागीं ॥६८॥

तंव आले ऋषिकिन्नर ॥ आणि देवही आले समग्र ॥ वालखिल्लय साठी सहस्त्र ॥ ब्रह्मपुत्र तेहीं ॥६९॥

मग त्यांसी समिधा कारणें ॥ कश्यपें घाडिले पवित्रपणें ॥ आणि इंद्र धाडिला पुत्रपणें ॥ तयां सांगातें ॥१७०॥

मग वंदोनियां तरुवर ॥ समिधा घेवोनि चालिले समग्र । तंव वाटे भेटले थिल्लर ॥ धेनुखुरींचें ॥७१॥

तें गाईखुरींचे थिल्लर ॥ इंद्रें लंधिले पदमात्र ॥ परि खोळंबले साठीसहस्त्र ॥ ब्रह्मपुत्र ते ॥७२॥

ते अंगुष्ठपर्वप्रमाण ॥ विरिंचिदेवाचे नंदन ॥ त्यांहीं देखोनियां जीवन ॥ आशंकले समस्त ॥७३॥

मग समिधा ठेवोनि अवनीं ॥ सकळीं घेतल्या पडदणी ॥ तंव हांसला वज्रपाणी ॥ तयांलागीं ॥७४॥

परि इंद्राचेनि खेदपणें ॥ थोर दुखवले अंतःकरणें ॥ मग बैसले साभिमानें ॥ तपसाधनेंसी ॥७५॥

मंत्रीं आराधिला चतुरानन ॥ कीं कश्यपासी व्हावा नंदन ॥ तेणें जिंकावा सहस्त्रनयन ॥ गविष्ठा हा ॥७६॥

आतां होईल जो पुत्र ॥ तो दुसरा करावा इंद्र ॥ ऐसें ऐकोनि सुरेश्वर ॥ गेला कश्यपापासीं ॥७७॥

सर्व सांगितला वृत्तांत ॥ वालखिल्लीं मांडिला अनर्थ ॥ तें ऐकोनि अदितीकांत ॥ आला तेथें ॥७८॥

तयां कश्यप विनवी वचनें ॥ तुह्मीं उद्यम मांडिला इंद्रा कारणें ॥ परी विनवितों अंतःकरणें ॥ तें द्यावें मज ॥७९॥

यासी ब्रहयाचा असे वर ॥ कीं चौदामनुवरी असावा इंद्र ॥ तरी तुमचाही करु साचार ॥ बोल आआं ॥१८०॥

विनतेसि जो होईल पुत्र ॥ तो पक्षिकुळाचा होईल इंद्र ॥ येणें तुमचा बोल साचार ॥ जालाजी ऋषी ॥८१॥

ऐसें बोलोनियां मंजुळ ॥ मग उठविले वालखिल्लय ॥ हें गुरुनें कथिलें सकळ ॥ देवेंद्रासी ॥८२॥

असो जाणोनियां तो वर ॥ मग मुरडला सुरेश्वर ॥ तंव झेंपावला पक्षीद्र ॥ अमृतासी ॥८३॥

ज्या घटावरी चक्र फिरत ॥ आणि दोघे सर्प धुंधुवात ॥ ते मानोनियां तृणवत ॥ आला गरुड ॥८४॥

ऐसा करोनियां प्रवेश ॥ मग घेतला अमृतकलश ॥ तंव पावला हषीकेश ॥ त्याचवेळीं ॥८५॥

तो ह्नणे रे पक्षिया नष्टा ॥ सांडीं वेगीं अमृतघटा ॥ तूं कां लागसी रे वाटां ॥ यमपुरीचे ॥८६॥

ह्नणोनि हाणितला गदाघातें ॥ येरु ह्नणे पडलें फूल अवचितें ॥ कीं गजा पाहोनि निर्भय वतें ॥ सिंह जैसा ॥८७॥

ऐसें तेथें अनेकांपरी ॥ युद्ध जाहलेंसे मुरारी ॥ परी तो न सांडीच घागरी ॥ अमृताची ॥८८॥

तंव बुद्धी आठवली नारायणा ॥ ह्नणे प्रसन्न जाहलों सुपर्णा ॥ येरु ह्नणे गा त्वांचि दक्षिणा ॥ मागावी मज ॥८९॥

दिनकरा काय द्यावें खद्यीतें ॥ सागरा सरितेनें द्यावेम उचितें ॥ सिंह प्रार्थितसे मृगातें ॥ कैसियापरी ॥१९०॥

तरी तुझियाचि मनोरथा ॥ मी पुरवीनरे अनाथा ॥ तूं याचक मज समर्था ॥ माग कांहीं ॥९१॥

तंव विष्णु ह्नणे आपण ॥ तूं दाता मीच कृपण ॥ तरी तुवां व्हावें गा वहन ॥ गरुडा माझें ॥९२॥

गरुड ह्नणे जी तथास्तु ॥ मी तरी होतों अनाथु ॥ याचिलागीरे वैनतु ॥ उपजलों मी ॥९३॥

माझें जन्म जाहलें सफळ ॥ पृष्ठीवरी ठेवावें ॥ चरणयुगुल ॥ जें ब्रह्मादिकां असे अकळ ॥ तें लाधेन मी ॥९४॥

मग संतोषोनि बोले हरी ॥ गरुडा पवित्र तूं निर्धारी ॥ तरी ध्वजस्तंभीं मजवरी ॥ असावें तुवां ॥९५॥

तंव गरुड विनवी वचन ॥ कीं मातेचें निवारीन दूषण ॥ मग केलिया माझें स्मरण ॥ पावेन मी ॥९६॥

तरी ऐसा गा भारता ॥ गरुड लाधला श्रीअनंता परी गरुडपुराणींची कथा ॥ अनारिसीच ॥९७॥

पिलीं ग्रासिली सरितानाथें ॥ मग टिटवीचेनि आकांतें ॥ धांव घेतली वैनतें ॥ पक्षियांसहित ॥९८॥

तों उपसों लागले सागर ॥ ऐकोनि आला सुरेश्वर ॥ मग संग्राम जाहला थोर ॥ उभयवर्गी ॥९९॥

तैं गरुडाचेनि झडपणें ॥ देवां जाहलें भंगणें ॥ तें जाणोनि नारायणें ॥ धांवणें केलें ॥२००॥

मग दोघां मांडिली झुंझारी ॥ त्रिभुवनींचा भार घेवोनि हरी ॥ उडी घातली पृष्ठीवरी ॥ गरुडाचिये ॥१॥

येरु ह्नणे काय पुष्पमाळा ॥ विष्णूनें टाकिलें जाणों कमळा ॥ परि टाकूनियां भावा कुटिळा ॥ जाहला वाहन ॥२॥

हें गरुडपुराणींचेम मत ॥ सहज सांगितलें संकलित ॥ असो घेवोनियां अमृत ॥ निघाला तो ॥३॥

तंव इंद्र आला धांवत ॥ ह्नणे गरुडा तुज मानवला अनंत ॥ तरी तुझा किती गा पुरुषार्थ ॥ तो सांगें मज ॥४॥

ऐकोनि बोलिला वैनत ॥ कीं आपुला धर्म आणि पुरुषार्थ ॥ वडिलांचा सांगे द्रव्यार्थ ॥ तो निर्बुद्धिक जाणा ॥५॥

परी माझें बळ अवधारीं ॥ पृथ्वी पाताळ घालीन पांखांवरी ॥ चुंचूसि घेवोनि तुझी नगरी ॥ उडोनि जाईन ॥६॥

ऐकोनि ह्नणे सुरेश्वर ॥ गरुडा तूं माझा सहोदर ॥ तरी या अमरावतीचा श्रृंगार ॥ देई मज अमृत ॥७॥

गरुड ह्नणे गा सुरनाथा ॥ दासी जाहली विनता माता ॥ ते सोडवावया अमृता ॥ नेत असें मी ॥८॥

येरव्हीं अमृतीं काय काज ॥ आह्मी तरी अमर सहज ॥ तरी एक ऐक पां गुज ॥ सुरेश्वरा तूं ॥९॥

सर्पाजवळी ठेवोनि घट ॥ मग दास्यत्वाचा मोडीन देंट ॥ परी काकवेष धरोनियां कपट ॥ न्यावेम तुवां ॥२१०॥

मग इंद्र जाहला प्रसन्न ॥ ह्नणे सर्पं हो कां तुझें भोजन ॥ आणि मातेचें दासीपण ॥ मुकेल सत्य ॥११॥

ऐसा करोनियां संकेत ॥ तेथोनि निघाला वैनत ॥ अमृत आणोनि प्रणिपात ॥ केला दोघींसी ॥१२॥

मग ते दर्भदूर्वीकुरीं ॥ ठेविली अमृताची घागरी ॥ तें पहावया आले झडकरी ॥ सर्प तेथें ॥ ॥१३॥

तंव ते सर्पमाता कद्रू ॥ दासीपणाचा तोडी पदरु ॥ मग जाहला चमत्कारु ॥ अवश्वित तेथें ॥१४॥

तंव तो ससाण्याचेनि लोटें ॥ इंद्र आला महा नेटें ॥ घट धरोनि चुंचुपुटें ॥ नेला अमरावतीसी ॥१५॥

परि ते दर्भदूर्वोकुरी ॥ काहीं पाझरली घागरी ॥ ते चाटितां सर्पवैखरी ॥ जाहले भाग दोनी ॥१६॥

ते चाटितां दर्भधारा ॥ विचारिलें निजमनीं ॥ कीं या गरुडाचे झडपणीं ॥ न वांचों आह्मीं ॥१८॥

मग करोनि तपसाधना ॥ प्रसन्न केलें चतुरानना ॥ त्यासी हळूच सांगितली खुणा ॥ ब्रह्मदेवें ॥१९॥

काळियें असावें जंबुवनीं ॥ तक्षकें रहावें खांडववनीं ॥ वासुकीनें सेवावा शूळपाणी ॥ ऐरावतें मलयागिरी ॥२२०॥

शेषा त्वां रहावें पाताळीं ॥ मस्तकीं धरोनि महीतळी ॥ समयानुसार विष्णुजवळी ॥ पावावें तुवां ॥२१॥

तुझें नामरे अनंत ॥ तूं विष्णूचा होसील भक्त ॥ तुझेनि असेल स्त्रेहभरित ॥ नारायण ॥२२॥

भारता मग ते सर्प सकळ ॥ आपुलालें धरिती बिळ ॥ शेष वासुकी पाताळ ॥ सेविते जाहले ॥२३॥

आतां असो हे भारतीकथा ॥ त्वां पुसिलें गा भारता ॥ तरी गरुडवाहन श्रीअनंता ॥ लाधलें ऐसें ॥२४॥

हे ऐकतां गरुडकथा ॥ सकळ विषांची हरेल व्यथा ॥ आणि शब्दश्रवणें दुरितां ॥ होइजे वेगळें ॥२५॥

आतां असो हें गरुडाख्यान ॥ पुढें कथा असे गहन ॥ तें ऐकावें वत्सलांछन ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥२६॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ चतुर्थस्तबक मनोहरु ॥ गरुडाख्यानविस्तारु ॥ चतुर्दशोऽध्यायीं सांगितला ॥२२७॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP