कथाकल्पतरू - स्तबक ४ - अध्याय ८

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

यानंतरें श्रीकृष्णकथा ॥ ते ऐकें गा भारता ॥ कुब्जेसि भेटोनि मागुता ॥ भेटला अक्रुरासी ॥ ॥१॥

मग तयाच्या मंदिरां ॥ येणे जाहलें शारंगधरा ॥ जगदात्मा भक्तांचिया पुढारा ॥ न विसंबे पैं ॥२॥

योगी योगादिकीं साधनीं ॥ अखंड वर्तती ज्याचिये ध्यानीं ॥ तो प्रत्यक्ष दिसे लोचनीं ॥ भक्तिभावें ॥३॥

मग मधुपर्कादि पूजा ॥ अक्रुर करिता जाहला वोजा ॥ देवोनियां गोसहस्त्र द्विजां ॥ दक्षिणासहित ॥४॥

करुनि साष्टांगे प्रणिपात ॥ अक्रुर चरणांवरी लोळन ॥ ह्नणे आजी जाहलों कृतार्थ ॥ दर्शनमात्रें ॥५॥

मग उद्धवा धाडोनि गोकुळा ॥ प्रेंमें पुसिलें गोपी गोपाळां ॥ तेव्हां भ्रमरभावीं अवला ॥ कृष्णासि पुसती ॥६॥

प्रेमें यशोदा आणि नंद ॥ उद्धवासी करिती अनुवाद ॥ राया तो विरहो अगाध ॥ असो आतां ॥७॥

हें काय सांगावें फलकट ॥ जैसें जेवण जालिया उच्छिष्ट ॥ नैशी सांडिली कृष्णें वाट ॥ गोकुळीचीं ॥८॥

पुढें सांदीपन आणि जरासंध ॥ काळयवन मुचुकुंद ॥ हा वर्णिला असे कथासंबंध ॥ द्वितीय स्तबकीं ॥९॥

नगोत्तम घातला पाताळीं ॥ आणि वसविली कुशस्थळी ॥ हे कथा आहे वणिली ॥ द्वितीय स्तबकीं ॥१०॥

नगरी सांडोनिया मथुरा ॥ द्वारके वास चक्रधरा ॥ मग विवाह बळिभद्रा ॥ योजिला प्रथम ॥११॥

रेवतरायाची थोर ॥ तेणें प्रसन्न करोनि ईश्वर ॥ मागीतली कन्या ॥१३॥

ते परम सुंदर सूलक्षण ॥ वर पाहतां तिथे समान ॥ सकळ हिंडतां त्रिभुवन ॥ नमिळे कोठें ॥१४॥

मनीं रेवत विचारी आपण ॥ ब्रहयानें वर केला जो निर्माण ॥ तरी आतां जाऊनि आपण ॥ त्यासीच पुसों ॥१५॥

मग संगें घेवोनि कन्या ॥ पातला तो ब्रह्मभुवना ॥ तंव अवसर नाहीं चतुरानना ॥ भेटावयासी ॥१६॥

सभा घनवटली असे थोर ॥ यक्ष गणगंधवे किन्नर ॥ इंद्रादिक सुरवर ॥ वोळंगती तेथें ॥१७॥

अष्टनायकांची पेखणें ॥ सरस्वती बोलवी षड्जानें ॥ नारद तुंबरांचें गाणे ॥ वीणातंत्री ॥१८॥

ऐसा वोडवलासे रंग ॥ भेटीसि नाहीं प्रसंग ॥ असो ऐसा धडिला वियोग ॥ वटिका चारी ॥१९॥

समयीं जाहलिया अवकाश ॥ रायें नमस्कारिला वेदपुरष ॥ आणि कन्येचा आयास ॥ सांगता जाहला ॥२०॥

मग बोले चतुर्मुख ॥ इशीं वर योजिला शेष ॥ तो द्वापारीं आदिपुरुष ॥ अवतरलासे ॥२१॥

यादवां माजे वसुदेवकुमर ॥ बळदेव नामें महावीर ॥ रैवता तो करीं वर ॥ रेवतीसी ॥२२॥

मग करोनि अभिवंदन ॥ राव निघाला तेथोन ॥ पावला जंव मृत्युभुवन ॥ तंव विचित्र देखिलें ॥२३॥

त्या वर्तमानींची लोकचर्या ॥ पाहे दृष्ठीं विचारोनियां ॥ तंव बत्तीस युर्गे भरलीं तया ॥ पूर्वीलवर्तमानासी ॥२४॥

जंव तो पाहे भूमंडळीं ॥ तंव अवतरले गोकुळीं ॥ रामकृष्ण महाबळी ॥ यादववंशीं ॥२५॥

मग ते रायें कन्या रेवती ॥ बळदेवा दीधली हस्ती ॥ आपण राहिला नेमस्ती ॥ आत्मध्यानी ॥२६॥

आतां असो हा विचारु ॥ सांगणें असे कल्पतरु ॥ राया हें रेवतीसेंवरु ॥ सांगितलें तुज ॥२७॥

मग कृष्णाची वर्‍हाडिका ॥ कन्या पाहती अनेका ॥ तंव आली असे पत्रिका ॥ भीमकीची ॥२८॥

ते पर्णिलीसे नारायणें ॥ ओंपुण्याहें आष्टन्हाणें ॥ बहुलें बाशिंगें नानाउटणें ॥ सासुरवाडीसी ॥ ॥२९॥

जैसा सुपर्ण झडपी उरग ॥ कीं सिंह कवळीं मातंग ॥ तैसा घेवोनि गेला श्रीरंग ॥ कामिनी ते ॥३०॥

येकाची घेतली हळदी ॥ सवेंचि विटंबिला संबंधी ॥ पूर लोटले रणयुद्धीं ॥ अशुद्धांचे ॥३१॥

तंव ह्नणे राजा भारत ॥ विवाहीं कां मांडिला अनर्थ ॥ हा सांगा हो विस्तार समस्त ॥ वैशंपायना ॥३२॥

मग ह्नणे मुनेश्वर ॥ राया तूं श्रवणीं तत्पर ॥ तरी आतां ऐक विस्तार ॥ कृष्णविवाहाचा ॥३३॥

वैदर्भदेशा भीतरीं ॥ कौंडण्यपुर नामें नगरी ॥ तेथें भीमकराव पुण्यक्षेत्री ॥ जो श्रीहरीतें अनुसरला ॥३४॥

तो पवित्र पुण्यशीळ ॥ करी प्रजेचा सांभाळ ॥ नाहीं परस्त्रीपरद्रव्यविटाळ ॥ ज्याचे मनीं ॥३५॥

प्रतापप्रौढीनें आथिला ॥ क्षत्रियांमाजी तो मिरविला ॥ जेणें पुरुषार्थ असे जोडिला ॥ चतुर्विध ॥३६॥

पांच पुत्र जाहले त्यासी ॥ त्यांत कन्या येक गुणराशी ॥ जिचेनि स्मरणें पातकांसी ॥ नाश होय ॥३७॥

रुक्मबाहू रुक्मकेत ॥ रुक्ममाली रुक्मरथ ॥ पांचवा रुक्मिया ज्येष्ठ त्यांत ॥ आणि धाकुटी रुक्मिणी ॥३८॥

जैशी हिमवंताचे उदरीं ॥ जन्म पावली स्वयें गौरी ॥ कीं तिचेनि योगें त्रिपुरारी ॥ जोडला जैसा ॥३९॥

नातरी सागराचे उदरीं ॥ लक्ष्मीं जन्मली कुमरी ॥ तैशी भीमकाचे घरीं ॥ रुक्मिणी ते ॥४०॥

ते आदिमाया योगशक्ती ॥ जे वर्णितां वेद शिणती ॥ तेथें मी काय मंदमती ॥ बोलों शकें ॥४१॥

परी येक असे कारण ॥ तेचि जरी होईल प्रसन्न ॥ तरी वांग्देवता मुखीं आपण ॥ येवोनि राहे ॥४२॥

ते सर्वगुणांची आथिली ॥ जाणों हेमरसाची वोतिली ॥ तैशी प्रभा मिरवली ॥ भीमकीसी ॥४३॥

तारुण्यें मोहरली वयसा ॥ मुखशोभा नाहीं शीतांशा ॥ जाणों कृष्णपक्षीची निशा ॥ धम्मिल्ल माथां ॥४४॥

वेढिला कांसेसि पातळ ॥ वरी बोटधारीचा पायघोळ ॥ तयेमागे मेखळा चंचळ ॥ अरुणरंगीं ॥४५॥

मदवीयेची वरी चोळी ॥ बिरडें काढिलें मुक्ताफळीं ॥ वरी मिरवे येकावळी ॥ नवरत्नांची ॥४६॥

मुखीं रंगलें तांबूल ॥ अधर जाहले रातोत्पल ॥ द्विज रत्नें कीं अलिकुळ ॥ गमले अवघे ॥४७॥

पक्क डाळिंबीचा गाभा ॥ तैसी दंतपंक्तीची शोभा ॥ मुखमांदुस याची नभा ॥ थोरविजू जैशी ॥४८॥

नेत्र देखोनि लज्जित हरिण ॥ कटि देखोनि पंचानन ॥ वेणी देखोनि पवनाशन ॥ पावले व्रीडा ॥४९॥

नासिक शोभे मुक्ताफळीं ॥ जाणों शुक्रचि शशिमंडळीं ॥ चंदन चर्चोनियां भाळी ॥ रेखिलीं कुंकुम कस्तुरीं ॥५०॥

भोवया जाणों कोदंड ॥ नयन बाणले कामदंड ॥ पातीं रेखिलीं काळखंड ॥ अंजनाची ॥५१॥

कर्णी शोभली कनकपत्रें ॥ रत्नखचित नानागात्रें ॥ फुलें भरिली कचकेसरें ॥ श्रीविराजे ॥५२॥

माथां मोतीलग जाळी ॥ अर्धचंद्र मिरवे भाळीं ॥ हदय मिरवे स्तनयुगुळी ॥ विश्वमातेंचे ॥५३॥

करीं करावया कंकणे ॥ मुद्रिका रत्ने सुलक्षणें ॥ जाणों चंद्रासि चतुराननें ॥ दीधलें क्षेम ॥५४॥

उदरीं मिरवे रोमरेखा ॥ जाणों कृष्णवर्ण पिपीलिका ॥ नाभिरंघ्रीं अधोमुखा ॥ अनुक्रमेंसी ॥५५॥

कटीं किणकिणती क्षुद्रघंटा ॥ किंकिणी घागारिया बरवंटा ॥ अंदुवांकींच्या बोभाटा ॥ वरी दशांगुळें ॥५६॥

गतीं पिसाटली हंसिणी ॥ उपमा थोडकी पक्षिणी ॥ ऐसें अनुपम्य रत्न रुक्मिणी ॥ भीकतनया ॥५७॥

भीमक तो उपमेचा सागर ॥ भीमकी लक्ष्मीचा अवतार ॥ रुक्मिया बंधू जालंधर ॥ सत्य जाणा ॥५८॥

असो कोणे एके अवसरीं ॥ सभेसि आली राजकुमरी ॥ रायें बोलावोनि सामोरी ॥ आसनावरी बैसविली ॥५९॥

भीमक न्याहाळी कन्यावदन ॥ तंव दावीतसे तारुण्यपण ॥ मग थोर चिंतावलें मन ॥ कन्या गहन देखोनी ॥६०॥

राया इतुकिया अवसरीं ॥ बंदी पातले राजद्वारीम ॥ ज्यांमाजी येक असे धुरकरी ॥ चंडनामें ॥६१॥

तेणें मांडिली राजकीर्ती ॥ अवनिंमंडळींचे भूपती ॥ जे वर्णिले अनुक्रमगती ॥ छंदसकट ॥६२॥

शिंदे साळोखी पडवळ ॥ रांगड राइके वाघोळ ॥ मोरिये माहाळे सुखे गोळ ॥ सूर्यवंशीं ॥६३॥

देवल डोहीय बागुल ॥ चव्हाण चाडये रणशिंगळ ॥ गरुडसाळोंखी जंघोळ ॥ थोरांत गुंजाळ पैं ॥६४॥

ढोकण बिरारी बोढरे ॥ विषई जाईत डेविरे ॥ गौळी गोळहात वाघचवरे ॥ जगताप गंगड ॥६५॥

मुरकुटे मोरे महावडे ॥ चिते दोरीख घोरपडे ॥ डुबे ढोनी माळमहिडे ॥ जनमोहित पैं ॥६६॥

ढोंकण नळवाडे तोबर ॥ सुरवे जाविये कुंवर ॥ वोशिवे रणदिवे पंवार ॥ कुंभकडे चांदेड पैं ॥६७॥

झोळे सोनवणी निकुंभ ॥ काठी प्रमाडी वैरकुंभ ॥ खडपवार रणस्तंभ ॥ अहीरराये ॥६८॥

वाघ वोरीसे पडिहार ॥ शंखपाळ क्षेत्रीमगर ॥ बाराइपे रणहल थोर ॥ ब्रह्मसाळूंखे ॥६९॥

अंग वंग चीन भोट ॥ माळवी बाहार मर्‍हाठ ॥ तेलंगप्प गौड गंगातट ॥ आणि कर्णाटक वानिले ॥७०॥

साडे गौड मळिवाळ ॥ द्राविड गांधार बंगाल ॥ कलिंग कांबोज कोतुळ ॥ आणि हिमाचळ वानिले ॥७१॥

मग वानिली द्वारावती ॥ मथुरा मारवाड गुजराथी ॥ सौराटराज कल्याणकीर्ती ॥ मंगळमूर्ती गोविंद ॥७२॥

जो अरिरांया गजकेसरी ॥ अदट रुळताती नेपुरीं । शरणागतां वज्रपंजरी ॥ नित्यचारीं यादव ॥७३॥

सुरेख सांवळा सुंदर ॥ प्रथमवयसा निमासुर ॥ दानखड्र अति उदार ॥ तो पवित्र सोमवंशी ॥७४॥

वसुदेवांचा आत्मज ॥ पीतांबरधारी गरुडध्वज ॥ पंवाडे वानिती वंशज ॥ दोहीं पक्षीं ॥७५॥

राये थिल्लर तो सागर ॥ राय दर्दुर तो भ्रमर ॥ राव मशक तो कुंजर ॥ पृथ्वीपती ॥७६॥

तो हंस येर वायस ॥ येर सविकार तो अस्पर्श ॥ तो अविनाश येर मनुष्य ॥ नाशिवंत ॥७७॥

तो परीस येर लोष्ठं ॥ तो अमृत येर काळकूट ॥ तो चंदन येर काष्ठ ॥ इंधनाचें ॥७८॥

येर खद्योत तो तरणी ॥ राजे खुबट तो महामुनी ॥ येर मागते तो दानी ॥ भुक्तीमुक्तींचा ॥७९॥

मग ह्नणे त्यासी राजा ॥ त्वां राजकुळें वानिलीं वोजा ॥ हे कृष्णा उचित देवोनि माझा ॥ पूर्ण होवो मनोरथ ॥८०॥

मग गौरविला कल्याणकीर्ती ॥ परि रुक्मिणीजीवीं लागली खंती ॥ येरी कृष्णचरण चिंतोनि चित्तीं ॥ पूजा करी अंबेची ॥८१॥

असो मग एके अवसरां ॥ रुक्मया भीमका ह्नणे अवधारा ॥ भगिनी रुक्मिणीयोग्य नोवरा ॥ विचारावा ॥८२॥

तंव बोलिली भीमकयुवती ॥ राय वणिले कल्याणकीर्ती ॥ तो कृष्ण भीमकीच्या चित्तीं ॥ आला ऐसें जाणवित ॥८३॥

ऐकतां उभयांसी ह्नणे भीमक ॥ इचिया रुपा यदुनायक ॥ तो द्वारके माजी मयंक ॥ गोविंद पैं ॥८४॥

उभयकुळींचा विख्यात ॥ नीतिधर्मी आचारवंत ॥ बळेम समरंगणीं समर्थ ॥ रुपें मन्मथ ठेंगणा ॥८५॥

सकळ गुण सकळ कळा ॥ बहु कुटुंब बहु गोतवळा ॥ त्यासी हे रुक्मिणी शोभे बाळा ॥ जैसी बुबुळा बाहुली ॥ ॥८६॥

तो जरी जोडेल इसी वर ॥ तै आमुचा धन्य संसार ॥ जैसा हैमवतीये कर्पूरगौर ॥ श्रेष्ठपणेंसीं ॥८७॥

ऐकोनि रुक्मया बोले कटकटा ॥ ह्नणे काय वानिलें स्त्रीलंपटा ॥ त्या मातुळघाताकिया नष्टा ॥ मणी मर्कटा कें विंसाजे ॥८८॥

तया नाहीं जातीकुळ ॥ कालीं पोशिलें नंदें गोवळ ॥ तुह्मां हांसतील राजे सकळ ॥ केविं कमळ दर्दुरा ॥८९॥

एक ह्नणती नंदाचा ॥ एक ह्नणती वसुदेवाचा ॥ ठाव नाहीं निर्धाराचा ॥ तयालागीं ॥९०॥

रुपें तंव दिसे बहु काळा ॥ संपत्ति तरी काठी कांवळा ॥ विद्या ह्नणावी तरी गोवळां ॥ माजी हुंबरी घालितो ॥९१॥

तेणें आधीं व्यभिचार केला ॥ मग व्रतबंधनेम जाहला ॥ तो तुह्मीं गृहस्थीं बोलिला ॥ ब्रह्मचारी ॥९२॥

जरी रणीं ह्नणों आगळा ॥ तरी जन्मला तेचिवेळां ॥ पळोनि गेला गोकुळा ॥ कंसभेणें ॥९३।

त्यासि कैंची राजलीळा ॥ तो चहूंवर्णापासोनि वेगळा ॥ आश्रमधर्माहूनि सकळां ॥ वेगळा तो ॥९४॥

नातें गोत्र न विचारी ॥ भुलवूनि भोगितो परनारी ॥ सदा हिंडे घरोघरीं ॥ गोपिकांच्या ॥९५॥

कालवरी होता नंदधरीं ॥ गोपींसी व्यभिचारकर्मे करी ॥ त्यासि ह्नणती ब्रह्मचारी ॥ सात्विकजन ॥९६॥

तरी भगिनी भीमकीसि वर ॥ दमघोषरायाचा कुमर ॥ चैद्यदेशींचा शिशुपाळ नृपवर ॥ सुंदर साजे ॥९७॥

रुक्मया ह्नणे ताता भीमका ॥ हे मी रचीन व‍र्‍हाडिका ॥ ह्नणोनि लिहिली पत्रिका ॥ दमघोषासी ॥९८॥

कीं तुमचा पुत्र शिशुपाळ ॥ त्याचा नक्षत्रजन्मकाळ ॥ घटीत पहावया उताविळ ॥ पाठवावें ॥९९॥

असों तें आणिलेम जन्मपत्र ॥ घटीत पाहतां जाहलें अंतर ॥ तें येरें पालटिलें सत्वर ॥ परी विधिसूत्र केवीं ढळे ॥१००॥

तैं रुक्मयें अंगिकारिलें सकळ ॥ कन्या आणोनि पूजिलेम पोफळ ॥ परि रुक्मिणीनेत्रीं सुटलें जळ ॥ भीमकें तांबूल सांडिलें ॥१॥

तंव प्रश्न करी जन्मेजयो ॥ कृष्णावरी भीमकीचा मोहो ॥ तरी पूर्वी काय वासुदेवो ॥ देखिला तयेनें ॥२॥

त्यजोनियां ज्येष्ठ भ्राता ॥ पत्र लिहिलें मनसंकेता ॥ तरी पुर्वी काय देवकीसुता ॥ देखिलें तिनें ॥३॥

विहित त्या त्यजोनि वरा एका ॥ परपुरुषीं धाडिजे पत्रिका ॥ हा तंव नीतिधर्म लौकिका ॥ मिरवूंनये ॥४॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ याचें ऐकें भारता कारण ॥ हा त्वां केला प्रश्न गहन ॥ हरिकथेचा ॥५॥

आतां तो ऐकावा विनोद ॥ ब्रह्मपुत्र जो कां नारद ॥ तेणें प्रबोधिला गोविंद ॥ गोकुळीं असतां ॥६॥

कीं तुझी जे पूर्वअंतुरी ॥ ते जाण भीमकाची कुमरी ॥ कमळा अवतरली कौंडण्यपुरीं ॥ तव सेवेसीं ॥७॥

पुढें मथुरेसि असतां मुरारी ॥ वार्ता ऐकिली दूतद्वारीं ॥ कीं स्वयंवर होतसे कौंडण्यपुरीं ॥ भीमकतनयेचें ॥८॥

ऐसें जाणवलें गोपिनाथा ॥ मनी उपजली तिची अवस्था ॥ मग स्मरिलें पक्षिनाथा ॥ तये क्षणीं ॥९॥

सत्वर तया गरुडावरी ॥ आरुढ जाहला मुरारी ॥ वेगें पावला कौंडण्यपुरीं ॥ श्रीकृष्णदेवों ॥११०॥

तंव जरासंधादिक वीर ॥ तेथें राव मिळाले थोर ॥ धूसरें दाटलें नगर ॥ बाह्याभ्यंतरीं ॥११॥

ह्नणोनि कृष्णासि न मिळे बिर्‍हाड ॥ मग उभय पर हालवी गरुड ॥ तेणें वातें अश्वकुंजर ॥ भरले रानीं ॥१२॥

इकडे खालता उतरला मुरारी ॥ तें ऐकोनि राजकुमरीं ॥ ह्नणीतलें कॄष्ण असतां स्वयंवरी ॥ जय नाहीं आह्या तें ॥१३॥

तंव तो आला भीमक ॥ तेणें राउळा नेला कृष्ण देख ॥ मंडपीं केला मधुपर्क ॥ सकळरायासीं ॥१४॥

ऐसे पूजिले नृपवर ॥ एका सिंहासन चवरी छत्र ॥ एकाचे डेरिया चामर ॥ मिरविताती ॥१५॥

तें नाहीं यादवकुळटिळका ॥ तेणें खंती वाटे भीमका ॥ एकोभावें यदुनायका ॥ पाहोनियां ॥१६॥

यादव ह्नणती अहो कुलीन ॥ यासी कैंचे छत्र सिंहासन ॥ परी कृष्ण मिरवितों आपण ॥ गोवळेपणें ॥१७॥

हा उग्रसेनाचा वोळगणा ॥ आणि गौळियांचा पोसणा ॥ गौळी कीं क्षेत्री हे विवंचना ॥ कोणा नकळे पणें ॥१८॥

तंव तेथें होता नारद ॥ तेणें ऐकिला अनुवाद ॥ कीर्तिगुणें जो मायाभेद ॥ तो निघाला मुनी ॥१९॥

वेगें पावला अमरावती ॥ तों भद्रीं उपविष्ट सुरपती ॥ तेणें जाणोनि वेदमूर्ती ॥ नमिला नारद ॥१२०॥

रदमुनी ॥ काय वर्तनसे मृत्युभुवनीं ॥ तुह्मी हिंडतां त्रिभुवनीम ॥ असेल ठावें ॥२१॥

मुनि ह्नणे गा सुरेश्वरा ॥ कृष्ण गेल कौंडण्यपुरा ॥ रुक्मिणीचे स्वयंवरा ॥ लागोनियां ॥२२॥

तेथेम सकळ रायां छत्रसिंहासन ॥ परि कृष्णासि भूमी बैसकावासन ॥ तेणें हांसती सकळ जन ॥ तें मज न साहवे ॥२३॥

ऐसी देखोनियां अवस्था ॥ खंती दाटली गा सुरनाथा ॥ ते जाणवावया तुज वार्ता ॥ आलों येथें ॥२४॥

ते ऐकोनियां वचन ॥ इंद्रें साडिलें सिंहासन ॥ आणि सर्व पाचारोनि सैन्य ॥ निघाला इंद्र ॥२५॥

आरुढ होवोनियां गजेंद्र ॥ इंद्र आला कौंडण्यपुरा ॥ तेहतीसकोटी सुरवरां ॥ सहित पैं ॥२६॥

वेगां पावले कौंडण्यपुर ॥ गणगंधर्व यक्ष किन्नर ॥ राउळीं उतरतां सुरवर ॥ देखती राव ॥२७॥

मग साष्टांगे प्रणिपात ॥ कृष्णासि करी सुरनाथ ॥ कर जोडोनि विनवित ॥ प्रार्थनावचनीं ॥ ॥२८॥

ह्नणे समर्थ तूं गा त्रिभुवनीं ॥ चराचर तुजपासुनी ॥ सकळ रायांत मुकुटमणी ॥ असमी देवा ॥२९॥

तरी एक असे विनवणी ॥ तुह्मी आरुढावें सिंहासनीं ॥ आह्मीं तरी तव आज्ञेंकरोंनी ॥ वर्ततों सदा ॥ ॥१३०॥

इंद्रें दीधलें सिंहासन ॥ वरी आरुढला यदुनंदन ॥ मग इंद्र करीतसे स्तवन ॥ देवांसहित ॥ ॥३१॥

आणि केला महाअभिषेक ॥ सिंहासनीं आदिपुरुष ॥ मग बोलाविला राव भ्रीमक ॥ अमरनाथें ॥ ॥३२॥

ह्नणे अगा हा कन्येचा प्रसाद ॥ त्वां स्वहस्तें पूजावा गोविंद ॥ ते परंपरा याची वधू विशद ॥ जन्मांतरींची ॥३३॥

अगा हे समस्त भूपाळ ॥ पाहतां तरी अमंगळ ॥ अमृत त्यजोनि हळाहळ ॥ घेसी झणी ॥३४॥

ऐसा करोनि एकांत ॥ स्वर्गी गेला अमरनाथ ॥ मग वीरीं सांडिला मनोरथ ॥ स्वयंवरींचा ॥३५॥

भीमक ह्नणे गा गोपाळा ॥ त्वां वरावी हे बाळा ॥ त्याग देवोनि भूपाळां ॥ करुं शोभन ॥३६॥

तंव ह्नणती वनमाळी ॥ आह्मां जाणें आहे कुशरस्थळीं ॥ दुष्त वधोनियां भूमंडळीं ॥ मग करीन वर्‍हाडिका ॥३७॥

मथुरे असती सहोदर ॥ ते यादव आणीन समग्र ॥ मग हे पर्णीन सुंदर ॥ राया भीमका ॥३८॥

ऐसें बोलोनि गेला मुरारी ॥ वेगां पावला मथुरापुरी ॥ असो भीमकें बोधोनि कुसरी ॥ धाडिले राय ॥३९॥

आतांचि न लाभे मुहूर्त ॥ कन्या असे कुळवंत ॥ ग्रह नाहीं इयेसि लाभत ॥ जीवादिक ॥१४०॥

गोविंदें त्या पक्षिनाथा ॥ अन्यस्थळीं धाडिलें भारता ॥ ह्नणे दुष्ट दंडोनिस्वरुपता ॥ रचावें नगर ॥४१॥

ऐसा करोनि वाग्निश्वय ॥ मथुरे आला कृष्णदेव ॥ ह्नणोनि भीमकीचा मोह ॥ कृष्णावरी ॥४२॥

तेव्हांच वरावी रुक्मिणी ॥ तंव जरासंघ आला चालोनी ॥ युद्ध करीतां चक्रपाणी ॥ शिणला तेथें ॥४३॥

ऐसा जाणोनियां विरोध ॥ तंव सवें आला गार्गीनंद ॥ तेणें पळोनि गेला गोविंद ॥ सिंधुतीरा ॥४४॥

असो ते उपवर जाहली भीमका ॥ देवों केली चैद्यनायका ॥ तें जाणोनि धाडिली पत्रिका ॥ भीमकात्मजेनें ॥४५॥

ह्नणोनीच हे भारता ॥ भीमकी कृष्णेंसीं अवस्था ॥ पूर्वबोलाचिये संकेता ॥ जाणती दोनी मतें ॥४६॥

जैसें रमारमणाचें सूत ॥ उभय जाणवी रहस्यभूत ॥ निकट असतांही अपत्य ॥ वर्‍हाडिका जाहली ॥४७॥

तैसें त्यजोनियां ज्येष्ठसुता ॥ कन्या देइजे गोपिनाथा ॥ नातरी जिंकिल्या चैद्यनाथा ॥ मिरवेल काय ॥४८॥

त्वां पुसिलें गा भारता ॥ ह्नणोनि सांगितलें स्वभावता ॥ आतां असो हे आडकथा ॥ निश्वयाची ॥४९॥

हे हरिवंशींची कथा ॥ परि ते नाहीं भागवता ॥ कीं पोफळ दीधलें चैद्यनाथा ॥ वरितां रुक्मयानें ॥१५०॥

तंव निकट पावला मुहूर्त ॥ वर्‍हाडिके आले राजे समस्त ॥ महा प्रौढीचे विख्यात ॥ असुर जे कां ॥५१॥

शाल्व दमघोष भगदत्त ॥ दंतवक्र आणि विदूरथ ॥ कलिंग प्रौढ कीं समस्त ॥ आणि जरासंध महाबाहो ॥५२॥

ऐसे मिळाले नृपवर ॥ असंख्यात अनिवार ॥ अश्व रथ नर कुंजर ॥ कौंडण्यपुरा पातले ॥५३॥

मठ मंडप राजभुवनें ॥ जानवसां राहविलीं सैन्यें ॥ शिशुपाळ आला थोरमानें ॥ तया भुवनें दीधलीं ॥५४॥

जाहलें तेलवण मुहूर्त ॥ अळंकार वाहिले समस्त ॥ करीं कंकणें चिंत्ताग्रस्त ॥ मनीं दुश्वित भीमकी ॥५५॥

रुक्मया बंधू वाटला कैसा ॥ तुळसी वाहतसे वायसा ॥ आसुवें सांडो उकसाबुकसां ॥ धांव महेशा धांवण्या ॥५६॥

मग सुदेवासि ह्नणे नोवरी ॥ कीं द्वारके जावोनि सांगें हरी ॥ मी तरी दासी परोपरी ॥ झणीं यावें दातारा ॥५७॥

तूं माझा श्रीगुरु होसी ॥ तरी हें दुर्घट निवारिसी ॥ विनंती नेवोनि श्रीकृष्णासी ॥ वेगां त्वरित सांगिजे ॥५८॥

मग ते पत्र लिही आपण ॥ मर्दोनि नेत्रांचे अंजन ॥ प्रथम करोनियां वंदन ॥ श्रीकृष्णचरणीं ॥५९॥

स्वस्ति श्रीसकळउत्तमगुणा ॥ परमपुरुषा नारायणा ॥ अनादिसिद्धा परिपूर्णा ॥ श्रीहरी तूं ॥१६०॥

जय प्रौढी प्रताप मल्ला ॥ गोकुळ राखिलें अवलीळा ॥ दुष्टां मर्दिलें गोपाळा ॥ तें आजि डोळा दाविजे ॥६१॥

देवावैरिकुळकंदकुठारा ॥ भक्तजनवज्रपंजरा ॥ शरणागतां अभयंकरा ॥ तें साच आतां करावें ॥६२॥

सिंह आटोपी जंबुका ॥ कीं गरुड जैसा मशका ॥ नातरी कुंजरासी रासभ देखा ॥ रळी करी दुर्मदपणें ॥६३॥

सिंह नेतां आपुला आहार ॥ जंबुक करी अडिवार ॥ तैसेपरी शिशुपाळ पामर ॥ अपवित्र हा ॥६४॥

यज्ञअवशिष्ट पुरोडांश ॥ त्यास स्पर्शोपाहे वायस ॥ नातरी श्वान करी स्पर्श ॥ पवित्र अन्ना ॥६५॥

तरी आपण असोनि गोपाळा ॥ आतळां न द्यावें शिशुपाळा ॥ जंव पातला नाहीं जवळा ॥ तंव यासी निवारीं ॥६६॥

मी तवठाईची अखिली ॥ येथें आन नाहीं बोली ॥ तुज मीं अर्पिलें वनमाळी ॥ आपुलें काय ॥६७॥

स्त्रियेचा बोल साच न मानिसी ॥ मी तरी जन्मोजन्मींची दासी ॥ हें विचारोनियां मानसीं ॥ शीघ्र यावें ॥६८॥

जरी तूं करसील अव्हेर ॥ तरी देह त्यजीन हा निर्धार ॥ तवनाम भक्तवज्रपंजर ॥ हा बडिवार राखिजे ॥६९॥

परवां लग्न सातां घटिकां ॥ मी पूजों जाईन अंबिका ॥ तेव्हां न्यावें यदुकुळदीपका ॥ ऐसी पत्रिका लिहिलीसे ॥१७०॥

मग तो निघाला ब्राह्मण ॥ मार्गी जातां जाहले शकुन ॥ कुमारीहातीं दध्योदन ॥ घटीं जळ पूर्ण भरलें ॥७१॥

मनाचा करोनियां रथ ॥ पवनसूत्रें चालवित ॥ वाग्दोरे चाळी गोपिनाथ ॥ सारथी पुढें तयाचा ॥७२॥

रुक्मिणीचा भक्तिभावो अदट ॥ तेचि दोनी चक्रवाट ॥ ज्ञानाचा ध्वज झळके नीट ॥ मनोरथासी ॥७३॥

जैसे योगी ऊर्ध्वगतीं ॥ सांडोनी षट्चक्राचीं वृत्ती ॥ मग सहस्त्रदळाचें प्रांती ॥ पावती वेगां ॥७४॥

तैसा वनें आणि उपवनें ॥ गिरिकंदरें अटव्यस्थानें ॥ ती क्रमोनियां तत्क्षणें ॥ नगराप्रती पातला ॥७५॥

वेगां पावला द्वारावती ॥ सुदेवो भेटला मंगळमूर्ती ॥ मग पत्रव्यक्ती कृष्णाप्रती ॥ जाहला देता ॥७६॥

द्विज ह्नणे भीमकरायाची कुमरी ॥ ते केवळ हेमवल्ली नोवरी ॥ पत्र वाचोनि चंपका श्रीहरी ॥ तेथें झडकरी चलावें ॥७७॥

मग पत्र घेवोनियां करीं ॥ वाचों आदरीतसे श्रीहरी ॥ तंव लिहिला सकोमळ अक्षरीं ॥ गर्भी भाव ॥७८॥

स्वस्ति श्री सकळतीर्थ ॥ सकळगुणआळंकृत ॥ कमळीं कमळ जें असे सत्य ॥ तें उचित देइजें ॥७९॥

वल्लभा सकळगुणसंपन्न ॥ वीसबारापरिपूर्ण ॥ साठीचार जेथें परिपूर्ण ॥ कळा वसती ॥१८०॥

पंचवीस तत्त्वांची राशी ॥ जन्म जयांचे यदुवंशीं ॥ अष्टसिद्धि जेथें दासी ॥ जये चरणीं विलसती ॥८१॥

ऐश्वर्यादि साही गुण ॥ वोळंगती जयाचे चरण ॥ ह्नणोनि भगवंत नामगुण ॥ ह्नणती संत ॥८२॥

तूं सकळकळा सारासार ॥ सकळश्रुतींचें बीजाक्षर ॥ मांझें प्राणलिंग साचार ॥ तूं भांडार गोविंदा ॥८३॥

करुणाकरा सर्वगुणा ॥ सर्वव्यापका नारायणा ॥ पत्र आणोनि अंतःकरणा ॥ वेगां अवकाश होईल ॥८४॥

कृष्णें पत्रिकें केलें अवलोकन ॥ यथाक्षरीं वाचिलें मौन्य ॥ मग वसुदेवाचें शिणलेति ह्नणोनि पुसे आपण ॥ चरण चुरीत ॥८६॥

तो देव विप्रा साच करित ॥ भक्तजनांचा वेळाइत ॥ ह्नणोनि विप्रा मान देत ॥ आपुलें साच करावया ॥८७॥

द्विजें समस्त स्वयंवरकथा ॥ श्रुत केली गोपिनाथा ॥ कृष्णे ह्नणे उदईक सूर्यबिंब उगवतां ॥ रथ संजोगीं दारुका ॥८८॥

शैब्य सुग्रीव मेघपुष्पक ॥ चौथा जाण बलाहक ॥ सज्ज करोनियां रथांक ॥ कृष्णसुदेव बैसलें ॥८९॥

एक रथीं दोघेजण ॥ जैसे जीव परमात्मा जाण ॥ ठाकावया मुक्तीभुवन ॥ जें निर्वाणपद बोलिजे ॥१९०॥

कोणा न सांगतां विचार ॥ सहसा निघाला शारंगधर ॥ नगरा बाहेरी रहवर ॥ आला पवनवेगेंसी ॥९१॥

वेगां पावले कौंडण्यपुर ॥ रम्यस्थळीं केलें बिढार ॥ तंव दमघोषराया होत अहेर ॥ नादें अंबर गर्जतसे ॥९२॥

गेला कोठें शारंगधर ॥ हा यादव नेणती समाचार ॥ तो पुढिले प्रसंगीं ऐका विचार ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥९३॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ चतुर्थस्तबक मनोहरु ॥ पत्रिकेचा विस्तारु ॥ अष्टमोऽध्यायीं सांगितला ॥१९४॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP