मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणतीसावा|
श्लोक ४ था

एकनाथी भागवत - श्लोक ४ था

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


किं चित्रमच्युत तवैतदशेषबन्धो, दासेष्वनन्यशरणेषु यदात्मसात्त्वम् ।

यो रोचयन् सहमृगैः स्वयमीश्वराणां, श्रीमत्किरीटतटपीडितपादपीठः ॥४॥

विघ्न न बाधी तुझ्या भक्तांसी । हें नवल नव्हे हृषीकेशी ।

तूं भुलोनि भक्तप्रेमासी । भक्ताधीन होसी सर्वदा ॥९८॥

होऊनि निजदासाधीन । मध्यरात्रीं पुरविसी अन्न ।

शेखीं तुज न मिळे भोजन । भुकेल्या पान भाजीचें ॥९९॥

उभय सेनेचे देव्हडीं । शस्त्रें सुटतां अति कडाडीं ।

तेथ सोसिसी रथाची वोढी । शेखीं रथींचीं घोडीं तूं धुशी ॥१००॥

तुझा मुकुट नाकळे वेदासी । तेथ भक्तांचा चाबुक खोंविसी ।

देखतां सकळिकां रायासी । रणीं घोडे धुसी निजांगें ॥१॥

वागोरे धरोनि दांतीं । चारी घोडे चहूं हातीं ।

धुतां न लाजसी श्रीपती । भक्ताधीन निश्चितीं तूं ऐसा ॥२॥

बंदीहुनी सोडविलें ज्यासी। तो उग्रसेन स्वामी करिसी ।

उच्छिष्टें धर्माघरींचीं काढिसी । शेखीं गायी राखिसी नंदाच्या ॥३॥

असो ते थोरांची थोर मात । तूंचि मिळोनि गोवळाआंत ।

उभउभ्यां खासी त्यांचा भात । छंदें नाचत त्यांचेनी ॥४॥

न म्हणसी सोवळें ओवळें । प्रत्यक्ष केवळ गोवळे ।

त्यांचेनि उच्छिष्टकवळें । स्वानंदमेळें डुल्लसी ॥५॥

द्रौपदीचिये अतिसांकडीं । नेसतीं जाहलासि तूं लुगडीं ।

गोपिकांचिया निजआवडीं । तूं कडोविकडी नाचसी ॥६॥

पूर्णकलश नेतां पाहीं । कांटा मोडला गोपीचे पायीं ।

तो पाय धरुनि हातीं दोंही । तूं कांटा लवलाहीं काढिसी ॥७॥

खांदीं वाहिलें दुर्वासासी । द्वारपाळ तूं बळीपाशीं ।

ऐसा भक्ताधीन तूं होसी । वचनें वर्तसी दासांच्या ॥८॥

देवा तूं ऐसें म्हणसी । ’गोवळत्व सत्य मानिसी’

तें तुज न घडे हृषीकेशी । तूं पूज्य होसी सुरनरां ॥९॥

(पूर्वश्लोकींचें पद) ’श्रीमत्किरीटतटपीडितपादपीठः ॥’

इंद्र चंद्र आणि महेंद्र । ब्रह्मा बृहस्पति आणि शंकर।

ऐसे पूज्य जे कां ईश्वर । तेही तुझे किंकर श्रीकृष्णा ॥११०॥

तुझे आसनाचे पादपीठीं । त्यांच्या मुकुटमणियांच्या कोटी ।

घर्षणीं झणत्कार उठी । नमस्कार दाटी सुरवरां ॥११॥

तुझी आज्ञा न मानितां । ब्रह्मादिकांचिया माथां ।

साटु वाजे जी सर्वथा । मा इतरांची कथा ते कोण ॥१२॥

तुझे आज्ञेभेणें जाण । वायु वागवी नेमस्त प्राण ।

सूर्य चालवी दिनमान । तुझे आज्ञेभेण गोविंदा ॥१३॥

तुझे आज्ञेचे भयभागीं । समुद्र मर्यादा नुल्लंघी ।

तुझ्या आज्ञेच्या नियोगी। वर्षिजे मेघीं जळ काळीं ॥१४॥

तुझे आज्ञेची अगाध थोरी । स्वयें मृत्यु वंदी शिरीं ।

तोही स्वकाळें प्रळयो करी । आज्ञेबाहेरी कदा न निघे ॥१५॥

आशंका ॥ ’मी तंव नंदाचा खिल्लारी। उग्रसेनाची सेवा करीं ।

माझी हे एवढी थोरी । मिथ्या’ मुरारी म्हणशील ॥१६॥

तुवां पाडूनि काळाचे दांत । गुरुपुत्र आणिला एथ।

इंद्र केला मानहत । गोकुळीं अद्भुत वर्षतां ॥१७॥

इतरांची गोठी कायशी। होऊनि वत्सें वत्सपांसीं ।

वेड लाविलें विधात्यासी । शेखीं गोवळ होसी नंदाचा ॥१८॥

बाणकैवारा लागुनी । शिव आला अतिकोपोनी ।

तो त्वां जिंकिला अर्धक्षणीं । शार्ङगपाणी ईश्वरेश्वरा ॥१९॥

तुझी भेटी घ्यावयाकारणें । उत्कंठा वाहिजे नारायणें ।

ब्राह्मण अपत्यद्वारा तेणें । तुझी भेटी वांछिणें सर्वदा ॥१२०॥

तूं भक्तकाजपंचानन। सत्य करावया अर्जुन ।

क्षीरसागरीं रिघोनि जाण । कृष्णनारायण भेटले ॥२१॥

दोंहीचे भेटीची परवडी । संत जाणती निजआवडीं ।

दोघां मिठी पडली गाढी । निजात्मगोडी अभिन्न ॥२२॥

कृष्णीं विराला नारायण । कीं नारायणामाजीं श्रीकृष्ण ।

दोघां नाहीं दोनीपण । स्वरुप परिपूर्ण एकत्वें ॥२३॥

तेथ अर्जुनासी जाहली व्यथा । थित्या अंतरलों कृष्णनाथा ।

तंव शेषशयनीं होय देखता । नारायणता श्रीकृष्णीं ॥२४॥

तो तूं भक्तकाजकैवारी । लीलाविग्रही अवतारधारी ।

अवतार धरिसी नानापरी । दीनोद्धारी श्रीकृष्णा ॥२५॥

यापरी गा हृषीकेशी । अगाध महिमा तुझेपाशीं ।

येचि अवतारीं आम्हांसी । प्रतीती निश्चयेंसी पैं आली ॥२६॥

अखंड ऐश्वर्याची स्थिती । अनावृत ज्ञानस्फूर्ती ।

अद्वयानंदा नाहीं च्युती । ’अच्युत’ निश्चितीं या नांव ॥२७॥

ऐसा तूं अनंत अपरंपार । नियंत्या ईश्वराचा ईश्वर ।

तरी तुं भक्तकरुणाकर । तोही प्रकार अवधारीं ॥२८॥

(पूर्वश्लोकींचा चरण) ’यो रोचयन् सहमृगैः स्वयमीश्वराणाम् ॥’

देवां दुर्लभ जो नमस्कारा । तो तूं रिसां आणि वानरां ।

खेंव देसी रामचंद्रा । लीलावताराचेनि नटनाट्यें ॥२९॥

तुवां बोलावें कृपा करुनी । यालागीं वेद तिष्ठे सावधानीं ।

तो तूं वानरांच्या कानीं । गुज आळोंचूनी सांगशी ॥१३०॥

तुझें ज्ञान न कळे वेदशास्त्रां । तो तूं विचार पुससी वानरां ।

अनुसरोनि त्यांच्या मंत्रा । उपायद्वारा वर्तसी ॥३१॥

यज्ञींचीं अवदानें प्रांजळें । कदा न घेसी यज्ञकाळें।

तो तूं वानरांचीं वनफळें । खासी कृपाबळें सप्रेम ॥३२॥

ऐसें भक्तांचें निजप्रेम । तूं प्रतिपाळिसी मेघश्याम ।

त्या तुजमाजीं नाहीं विषम । तूं आत्माराम जगाचा ॥३३॥

’एतदशेषबंधो’

तूं अंतर्यामीं निजसखा । परमात्मा हृदयस्थ देखा ।

तुजमाजीं भूतां भौतिकां । भिन्न आवांका असेना ॥३४॥

तूं जडातें चेतविता । मुढातें ज्ञानदाता ।

सकळ जीवां आनंदविता । तुझिया चित्सत्ता जग नांदे ॥३५॥

मातापित्यांचें सख्यत्व देखा । तो प्रपंचयुक्त आवांका ।

तूं हृदयस्थ निजसखा । सकळ लोकां सुखदाता ॥३६॥

ऐसा तूं सर्वांचा हृदयस्थ । सर्ववंद्यत्वें अतिसमर्थ ।

जाणसी हृदयींचा वृत्तांत । स्वामी कृपावंत दीनांचा ॥३७॥

यापरी गा हृषीकेशी । दीनदयाळू निजभक्तांसी ।

ऐशिया सांडूनि स्वामीसी । कोण धनांधासी भजेल ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP