एकनाथी भागवत - श्लोक २४ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


तस्मात्सङगो न कर्तव्यः, स्त्रीषु स्त्रैणेषु चेन्द्रियैः ।

विदुषां चाप्यविश्रब्धः, षङ्‌वर्गः किमु मादृशाम् ॥२४॥

जेणें सज्ञाना उठी छळ । सकाम भुलवी तत्काळ ।

ऐसा स्त्रीसंग अनर्थशीळ । त्याहूनि प्रबळ स्त्रैणाचा ॥६८॥

यालागीं कर्मेंद्रियांचे स्थितीं । स्त्री आणि स्त्रैणाची संगती ।

घडों नेदावी परमार्थीं । जे निजस्वार्थीं साधक ॥६९॥

जरी विषयीं क्षोभेल मन । तरी इंद्रियें आवरावीं आपण ।

तरी मनींचा विषयो जाण । मनींचि आपण स्वयें विरे ॥२७०॥

निकट विषय स्त्रीसंगती । मन क्षोभे विषयासक्तीं ।

क्षणार्ध स्त्रीसंगप्राप्ती । पडले अनर्थी सज्ञान ॥७१॥

स्त्रीदर्शनें कामासक्त । देवेंद्र झाला भगांकित ।

चंद्र कळंकिया एथ । केला निश्चित गुरुपत्‍न्या ॥७२॥

सौभरी तपस्वी तपयुक्त । तो मत्स्यमैथुनास्तव एथ ।

करुनि सांडिला कामासक्त । ऐसा संग अनर्थभूत स्त्रियांचा ॥७३॥

निजकन्येचिया संगतीं । ब्रह्मा भुलला कामासक्ती ।

मा इतरांची कोण गती । संग अनर्थी स्त्रियांचा ॥७४॥

कामिनीसंग अतिदारुण । शिवासी झालें लिंगपतन ।

प्रमदांसंगें सज्ञान । ठकले जाण महायोगी ॥७५॥

नारदें विनोददृष्टीं । कृष्णपत्‍नी मागितल्यासाठीं ।

तो नारदी केला गंगातटीं । तेथ जन्मले पोटीं साठी पुत्र ॥७६॥

कौतुकें स्त्रियांप्रति जातां । सज्ञान पावे बाधकता ।

मा मजसारिख्या मूर्खाची कथा । कोण वार्ता ते ठायीं ॥७७॥

क्षणार्ध स्त्रियांची संगती । सज्ञान ठकले ऐशा रीतीं ।

जे स्त्रीसंगा विश्वासती । ते दुःखी होती मजऐसे ॥७८॥

यालागीं विश्वासतां स्त्रीसंगासी । इंद्रियषङ्‌वर्ग ठकी सर्वांसी ।

एथ आवरुनि इंद्रियांसी । सर्वथा स्त्रियांसी त्यागावें ॥७९॥;

त्यागूनि स्त्रियांची संगती । उपरमूनि इंद्रियवृत्ती ।

राजा पावला परम शांती । तेंचि श्रीपति स्वयें सांगे ॥२८०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP