एकनाथी भागवत - श्लोक १ ला

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


श्रीभगवानुवाच -

अथ ते संप्रवक्ष्यामि सांख्यं पूर्वैर्विनिश्चितम् ।

यद्विज्ञाय पुमान् सद्यो जह्याद्वैकल्पिकं भ्रमम् ॥१॥

जो योगियांचा योगेंद्र । जो ज्ञानियांचा ज्ञानेंद्र ।

जो भक्तचित्तचकोरचंद्र । जो यादवेंद्र यदुवंशीं ॥६२॥

जो प्रकृतिपुरुषांहूनि पर । तो स्वयें बोले शार्ङगधर।

उद्धवा द्वंद्वसहनप्रकार । अतिगुह्य विचार अवधारीं ॥६३॥

जें ऐकतांचि निरुपण । सुखदुःखातीत आपण ।

हे संपूर्ण पावे खूण । तें गुह्य ज्ञान अवधारीं ॥६४॥

मी कपिलरुपें अवतरुनी । प्रकृतिपुरुष विवंचोनी ।

उपदेशिली निजजननी । ते जुनी कहाणी सांगेन ॥६५॥

जे परिसतां सावधान । स्वयें होइजे ज्ञानसंपन्न ।

पुरुषाहूनि प्रकृति भिन्न । सुखदुःख जाण तीपाशीं ॥६६॥

सुखदुःखें मायिक पूर्ण । ऐसें ज्यासी कळलें ज्ञान ।

तेव्हां भवभयभ्रम दारुण । तत्काळ जाण तो सांडी ॥६७॥

जेवीं मोतियांची कंठमाळा । भ्रमें सर्प भासली डोळां ।

ते भ्रमांतीं घालिती गळां । न बाधी कंटाळा सर्पभयाचा ॥६८॥

तेवीं शिवशक्तिविवंचन । तुज मी सांगेन संपूर्ण ।

जें आकर्णितां सावधान । द्वंद्वें सकारण हारपती ॥६९॥

ब्रह्म सुखरुप एकलेपणीं । तेथ प्रकृतिपुरुष कैंचीं दोनी ।

द्वंद्वसुखदुःखें ज्यापासोनी । त्रिभुवनीं न समाती ॥७०॥

तेचि अर्थीचें निरुपण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण ।

प्रकृतिपुरुषांचें जन्म जाण । तें मुख्य कारण सुखदुःखां ॥७१॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP