एकनाथी भागवत - श्लोक ३५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


वेदा ब्रह्मात्मविषयास्त्रिकाण्डविषया इमे ।

परोक्षवादा ऋषयः परोक्षं मम च प्रियम् ॥३५॥

कर्मकांड उपासना ज्ञान । इंहीं त्रिकांडीं वेदु आपण ।

चित्तशुद्धिद्वारा जाण । ब्रह्मसंपन्न जीव करी ॥५३॥

पारधी लावून बडिशपिंडी । मीनांसी जळाबाहेर काढी ।

तेवीं दावून स्वर्गसुखगोडी । वेद जीवास ओढी परमार्थीं ॥५४॥

परोक्षवाद वेदव्युत्पत्तीं । त्यागमुखें गा अन्योक्ती ।

सांडविली विषयासक्ती । ब्रह्मप्राप्तीलागूनि ॥५५॥

हें जाणोनि वेदार्थगुह्यज्ञान । जो जीव झाला ब्रह्मसंपन्न ।

तेथ कर्म-कर्ता मिथ्या जाण । आश्रम-वर्ण कैंचे ॥५६॥

तेथ कैंचें ध्येय-ध्याता-ध्यान । कैंचें ज्ञेय-ज्ञाता-ज्ञान ।

नाहीं भज्य-भजक-भजन । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥५७॥

तेथ कैंचे कर्म-कर्माचरण । कैंचा वेद-वेदाध्ययन ।

कैंचें साध्य आणि साधन । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥५८॥

तेथ कैंचे दोष कैंचे गुण । कैंचे पाप कैंचें पुण्य ।

कैंचें जन्म कैंचें मरण । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥५९॥

तेथ कैंचा भेदु कैंचा बोधु । कैंचा मोक्ष कैंचा बंधु ।

सदोदित परमानंदु । हा वेदार्थ शुद्ध उद्धवा ॥३६०॥

या वेदार्थाचें निरूपण । प्रकट करितां आपण ।

निजस्वार्था नाडती जन । यालागीं जाण म्यां गुप्त केलें ॥६१॥

हें वेदार्थाचें गुह्य सार । मज गुप्ताचें गुप्त भांडार ।

तुझा देखोनि अधिकार । म्यां साचार सांगितलें ॥६२॥

हा गुह्यार्थ करितां प्रकट । सांडोनि कर्ममार्गाची वाट ।

कर्म ब्रह्म उभयभ्रष्ट । होतील नष्ट अनधिकारी ॥६३॥

हें जाणॊनि ज्ञाते ऋषीश्वरीं । वेदार्थनिरूपणकुसरी ।

हा मुख्यार्थ झांकोनि निर्धारीं । परोक्षवादावरी व्याख्यान केलें ॥६४॥

सकळलोकहितार्थ । माझेंही हेंचि मनोगत ।

परोक्षवाद गोड लागत । लोकासंग्रहार्थ उद्धवा ॥६५॥

मीही लोकसंग्रहार्थ । अकर्ता कर्में आचरत ।

वेदाचें जें परोक्ष मत । मी स्वयें राखित लोकहिता ॥६६॥

वेदाचें स्वरूप गहन । अतर्क्य अलक्ष्य अगम्य जाण ।

तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥६७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP