एकनाथी भागवत - श्लोक २८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


न ते मामङ्ग जानन्ति हृदिस्थं य इदं यतः ।

उक्थशस्त्रा ह्यसुतृपो यथा नीहारचक्षुषः ॥२८॥

वेदतात्पर्याचे निजखुणे । तुवां पुसिलें मजकारणें ।

तीं वेदाचीं गुह्य निरूपणें । तुजकारणें म्यां निरूपिलीं ॥८४॥

परिसोनि वेदाचे विभाग । उद्धव सुखावला चांग ।

तेणें संतोषें श्रीरंग । संबोखोनि `अंग' उद्धवासी म्हणे ॥८५॥

जो मी हृदयामाजिले वस्ती । परमात्मा निकटवर्ती ।

त्या मातें सकाम निणती । कामासक्तीं नाडले ॥८६॥

तो मी हृदयामाजीं असें । हें एकादेशित्व मज नसे ।

जगदाकारें मीचि भासें । जेवीं कल्लोळविलासें सागरु ॥८७॥

अलंकार झालेपणें । जेवीं असे निखळ सोनें ।

तेवीं जगदाकारें म्यां श्रीकृष्णें । परिपूर्ण असणें पूर्णत्वें ॥८८॥

नाम रूप वर्ण विविध । माझेन प्रकाशें जगदुद्‍बोध ।

परी नामरूपजातिभेद । मजसी संबंध असेना ॥८९॥

आकाश जळीं बुडालें दिसे । परी तें न माखे जळरसें ।

तेवीं मी जगदाकारें असें । जगदादि दोषें अलिप्त ॥२९०॥

ऐसा मी विश्वात्मा विश्वंभरु । विश्वमूर्ति विश्वेश्वरु ।

त्या मज नेणती अज्ञान नरु । जे कां शिश्नोदरुपोषक ॥९१॥

ज्यासी आंधारें दाटे गाढें । कां महाकुहरीं जो सांपडे ।

तो कांहीं न देखे पुढें । अवचिता पडे महागर्तीं ॥९२॥

तेवीं अतिमोहममताभ्रांतें । अज्ञाननिद्रा सबाह्य व्याप्तें ।

जवळिल्या न देखोनि मातें । पडिले महागर्ते तमामाजीं ॥९३॥

न कळोनि माझ्या वेदार्थातें । केवळ जीं कां कामासक्तें ।

तीं पावलीं अधःपातातें । जवलिल्या मातें नेणोनि ॥९४॥

तो मी जवळी कैसा म्हणसी । तरी सर्वांच्या हृदयदेशीं ।

वसतसें अहर्निशीं । चेतनेसी चेतविता ॥९५॥

त्या माझें वेदार्थमत । नेणतीचि कामासक्त ।

तेचिविखीं श्रीकृष्णनाथ । विशदार्थ स्वयें सांगे ॥९६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP