एकनाथी भागवत - श्लोक २२ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


सांख्येन सर्वभावानां, प्रतिलोमानुलोमतः ।

भवाप्ययावनुध्यायेन्मनो यावत्प्रसीदति ॥२२॥

जें सृष्टीपूर्वीं अलिप्त । तेंचि सृष्टिउदयीं सृष्टिआंत ।

महत्तत्त्वादि देहपर्यंत । तत्त्वीं अनुगत तेचि वस्तु ॥२८॥

आणि सृष्टीच्या स्थितिविशेषीं । गुणकार्यातें तेंचि प्रकाशी ।

शेखीं गुणकार्यातें तेंचि ग्रासी । उरे अवशेषीं ते वस्तु ॥२९॥

नग न घडतां सोनेंचि साचें । नग घडवितां सोनेंपण न वचे ।

नग मोडितां सोन्याचे । घडामोडीचें भय नाहीं ॥२३०॥

मेघापूर्वी शुद्ध गगन । मेघा सबाह्य गगन जाण ।

मेघ विराल्या गगनीं गगन । अलिप्त जाण संचलें ॥३१॥

तेवीं उत्पत्तिस्थितिप्रळयांतीं । वस्तु संचली अलिप्तस्थितीं ।

तेहीविखींची उपपत्ती । उद्धवा तुजप्रती सांगेन ॥३२॥

कुलाल जें जें भांडें घडित । त्यासी मृत्तिका नित्य व्याप्त ।

तेवीं जें जें तत्त्व उपजत । तें तें व्यापिजेत वस्तूनें ॥३३॥

सागरीं जे जे उपजे लहरी । तिसी जळचि सबाह्यांतरीं ।

तेवीं महत्तत्त्वादि देहवरी । सबाह्याभ्यंतरीं चिन्मात्र ॥३४॥

हो कां जो जो पदार्थ निफजे । तो आकाशें व्यापिजे सहजें ।

तेवीं जें जें तत्त्व उपजे । तें तें व्यापिजे चैतन्यें ॥३५॥

अनुलोभें पाहतां यापरी । वस्तूवेगळें तिळभरी ।

कांहीं न दिसे बाहेरी । निजनिर्धारीं विचारितां ॥३६॥

पृथ्वीपासूनि प्रकृतीवरी । लयो पाहतां प्रतिलोमेंकरीं ।

जेवीं जळगारा जळाभीतरीं । तेवीं लयो चिन्मात्रीं तत्त्वांचा ॥३७॥

प्रकृत्यादि तत्त्वें प्रबळलीं । विकारोनि लया गेलीं ।

वस्तु अलिप्तपणें संचली । नाहीं माखली अणुमात्र ॥३८॥

एवं उत्पत्तिस्थितिप्रळयांत । वस्तु अविनाशी अलिप्त ।

नित्य शुद्ध बुद्ध मुक्त । जाण निश्चित उद्धवा ॥३९॥

ऐशा वस्तूच्या ठायीं भवजल्प । तो जाण पां मिथ्या आरोप ।

जेवीं दोराअंगीं सर्प । वृथा भयकंप भ्रांतासी ॥२४०॥

सर्प दवडोनि दोर शुद्ध । करावा ऐसा नाहीं बाध ।

एकला एक परमानंद । ऐसें गोविंद बोलिला ॥४१॥

ऐशिये वस्तूच्या ठायीं जाण । मन विसरे मनपण ।

येणें साधनें पैं जाण । होय ब्रह्म पूर्ण साधकु ॥४२॥

हें परम अगाध साधन । ज्यासी नाटोपे गा जाण ।

त्याचें निश्चळ व्हावया मन । सुगम साधन देवो सांगे ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP