एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


न नरः स्वर्गतिं कांक्षेन्नारकीं वा विचक्षणः ।

नेमं लोकं च कांक्षेत, देहावेशात्प्रमाद्यति ॥१३॥

झालिया नरदेहाची प्राप्ती । अधर्में होय नरकगती ।

कां संचितां पुण्यसंपत्ती । तेणें स्वर्गप्राप्ती अनिवार ॥३२॥

स्वर्गें होय पुनरावृत्ती । नरकीं घोर दुःखप्राप्ती ।

म्हणूनि सांडोनि दोंहीचीही प्रीती । नरदेहीं आसक्ती धरुं म्हणती ॥३३॥

मनुष्यदेहाची आवडी । तेचि देहबुद्धि रोकडी ।

जेथ कामक्रोधांची जोडी । प्रमाद कोडी क्षणक्षणां ॥३४॥

स्वर्ग नरक इहलोक । यांची प्रीती सांडूनि देख ।

साधावें गा आवश्यक । ज्ञान चोख कां निजभक्ती ॥३५॥

ज्ञान साधावयालागीं जाण । कष्टावें न लगे गा आपण ।

सप्रेम करितां माझें भजन । दवडितां ज्ञान घर रिघे ॥३६॥

गव्हांची राशी जोडल्या हातीं । सकळ पक्वान्नें त्याचीं होतीं ।

तेवीं आतुडल्या माझी भक्ती । ज्ञानसंपत्ती घर रिघे ॥३७॥

द्रव्य झालिया आपुले हातीं । सकळ पदार्थ घरास येती ।

तेवीं जोडल्या माझी भक्ती । भुक्तिमुक्ति होती दासी ॥३८॥

म्हणती करितां भगवद्भक्ती । विघ्नें छळावया आड येती ।

तेथें मी सुदर्शन घेऊन हातीं । राखें अहोरातीं निजभक्तां ॥३९॥

पक्ष्याचेनि नामोच्चारें । म्यां वेश्या तारिली चमत्कारें ।

पाडूनि विघ्नांचें दातौरें । म्यां व्यभिचारें उद्धरिली ॥१४०॥

यालागीं नरदेह पावोन । जो करी माझें भजन ।

तोचि संसारीं धन्य धन्य । उद्धवा जाण त्रिशुद्धी ॥४१॥

भावें करितां माझे भक्तीसी । भाविका उद्धरीं मी हृषीकेशी ।

जे चढले ज्ञानाभिमानासी । ते म्यां यमासी निरविले ॥४२॥

साधितां माझी भक्ति कां ज्ञान । ज्यासी चढे ज्ञानाभिमान ।

तो म्यां आपुलेनि हातें जाण । दीधला आंदण महादोषां ॥४३॥

उद्धवा तूं ऐसें म्हणशी । ’ते कां दीधले यमहातेशी’ ।

तो जाचूनियां महादोषियांसी । ज्ञानाभिमानासी सांडवी ॥४४॥

यालागीं सांडूनि देहाभिमान । भावें करितां माझें भजन ।

पूर्वील साधु सज्ञान । नरदेहें जाण मज पावले ॥४५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP