कथाकल्पतरू - स्तबक १ - अध्याय ५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

तंव ह्मणे प्रभावती ॥ समर्थ असतां श्रीपती ॥

मग सिंहासनाप्रती ॥ कां न बैसे ॥१॥

तयाची ऐसी दिंगतकीर्ती ॥ ब्रह्मादि देव तयासि मानिती ॥

तो सिंहासना श्रीपती ॥ नातळें केवीं ॥२॥

तयाचा सकल वृत्तांत ॥ मज सांगावा जी समस्त ॥

तो राज्यछत्रादि त्यागित ॥ कवणें गुणें ॥३॥

तंव हरुषें ह्मणे हंसिणी ॥ त्याची वडील देवयानी ॥

ते शुक्राची नंदिनी ॥ ययातिजाया ॥४॥

त्या शुक्राचा यजमान ॥ वृषपर्वा दैत्य सुजाण ॥

तयाची कन्या कामबाण ॥ शर्मिष्ठा ते ॥५॥

त्या मिळोन एकेवेळीं ॥ जाती उदकीं आंघोळीं ॥

वस्त्रें ठेवोनियां पाळीं ॥ जळीं नग्न निघालिया ॥६॥

तंव त्या मार्गें तेचि वेळीं ॥ जातहोते चंद्रमौळी ॥

लाजोनि कुमारी सकळी ॥। बाहेरि आल्या ॥७॥

सकळांचा जाहला येकवट ॥ घाईनें वस्त्रांसि होई पालट ॥

लगबगां शर्मिष्ठेचा पट ॥ नेसली देवयानी ॥८॥

तंव देवयानीचें वस्त्र ॥ शर्मिष्ठा नेसली शीघ्र ॥

परि पाहे तंव चीर ॥ नव्हे आपुलें ॥९॥

मग पाहिलें देवयानीसी ॥ आणि वोळखिलें आपुले वस्त्रासी ॥

शर्मिष्ठेनें घेतलें वेगेंसी ॥ हिरोनियां ॥१०॥

चीर आपुलें घेवोन ॥ देवयानी केली नग्न ॥

वैभवमदें कोपोन ॥ बोले दुरुत्तर ॥११॥

पहा हो भिकारणीची चेष्ठा ॥ श्रध्दा करितसे राज्यपटा ॥

भक्तिविण प्राणी वैकुंठा ॥ केविं पावे ॥१२॥

तव पितयाचें महिमान ॥ मागावे मुष्टिमात्र कण ॥

आणि तेणें उदरपोषण ॥ करावें तुह्मीं ॥१३॥

मग ह्मणे देवयानी ॥ शुक्र जाणे संजीवनी ॥

तेणें जय समरांगणीं ॥ पावती दैत्य ॥१४॥

द्विजांचिया आशिर्वादें ॥ राजे पावती आपुलीं पदें ॥

ते भिकारी होती शब्दें ॥ तुझिया केंवी ॥१५॥

विप्रांचिया पुण्यमंत्रें ॥ चिरकाल चालती राज्यछत्रें ॥

विप्रप्रसादें राज्य अवतरे ॥ भलतयासी ॥१६॥

ऐसी देवयानी बोलली ॥ तंव शर्मिष्ठा अति कोपली ॥

मग तिचेंही चीर हरिती झाली ॥ आपुलेंचि ह्मणोनि ॥१७॥

आणि हाणिला करतळ ॥ ह्मणे तूं नेस गे वल्कल ॥

माझें राजकन्येचें पट्टकुळ ॥ तुज केवीं भणंगा ॥१८॥

मग हटें वस्त्र आसुडी ॥ तयेसि नग्न केली उघडी ॥

निर्दयेनें लोटिली प्रौढी ॥ कूपामाजी ॥१९॥

तयेसि कूपीं लोटोन ॥ गृहा गेली शर्मिष्ठा आपण ॥

तिचें घेवोनियां वसन ॥ चीरचोळी ॥२०॥

येरी सखिया सांगातिनींसी ॥ शर्मिष्ठा सांगे तयांसी ॥

न सांगावा हा कवणासी ॥ वृत्तांत तुह्मीं ॥२१॥

ऐशा गेल्या राजकुमरी ॥ वार्ता प्रकट नाहीं नगरीं ॥

येकली कूपाभीतरीं ॥ देवयानी ॥२२॥

सोमवंशींचा राजा ययाती ॥ तो आलासे वनाप्रती ॥

उदका आला त्वरितीं ॥ पारधीं खेळतां ॥२३॥

उदक पाहात पाहात ॥ त्या कूपाजवळी येत ॥

तंव भीतरीं देखत ॥ देवयानी ॥२४॥

तेणें देखिली देवयानी ॥ रायें बाहेरी काढोनी ॥

अति सुंदर जेवीं पद्मिणी ॥ तियेपरी ॥२५॥

मग रायें वस्त्र देवोनी ॥ तें नेसली देवयानी ॥

ऐसें देखोनि नयनीं ॥ मग होय पुसता ॥२६॥

तयेनें सांगितलें वृत्तांत ॥ ऐकूनि मग होय निघता ॥

ह्मणे जावें आतां ॥ गृहा आपुलिया ॥२७॥

तंव ह्मणे देवयानी ॥ त्वां मज नग्न देखोनि नयनीं ॥

वस्त्र दीधलें काढोनी ॥ अंगावरील ॥२८॥

तुझें नेसलें मी अंगवस्त्र ॥ आणि तुझा लागला कर ॥

मज काढिलें बाहेर ॥ उचलोनियां ॥२९॥

आतां मी असें अपर्णित ॥ तरि तूंचि माझा प्राणनाथ ॥

मज आतां वरावें त्वरित ॥ राया तुह्मीं ॥३०॥

ययाती ह्मणे वो सुंदरी ॥ मी जातीचा तंव क्षत्री ॥

आणि तूं असशी पुत्री ॥ ब्राह्मणाची ॥३१॥

क्षत्रियें ब्राह्मण कुमारीसी ॥ पर्णूं नये निश्चयेंसी ॥

दंडितील कीं आह्मासी ॥ राव सकळ ॥३२॥

सुकुमारे शास्त्रइत्यर्थ ॥ तुज सांगतों ऐक सत्य ॥

मग राजा तियेसि सांगत ॥ शास्त्ररीती ॥३३॥

विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र ॥ चारी यातींचा विचार ॥

पर्णावयासि प्रकार ॥ असे ऐसा ॥३४॥

चहूंयातींच्या कुमरी ॥ विप्रें पर्णाव्या निर्धारीं ॥

तिन्हीं यातींच्या क्षेत्री ॥ पर्णीत असे ॥३५॥

दोनी यातींतील वैश्यासी ॥ पर्णावया युक्त परियेसीं ॥

आणि एक याती शुद्रासी ॥ त्याचीच जाण ॥३६॥

ऐसें असे चराचरीं ॥ तरि तूं विप्राची कुमरी ॥

तुज पर्णावी विप्रीं ॥ हेंचि योग्य ॥३७॥

तूं असतां ब्राह्मणकुमरी ॥ तूतें क्षत्रिय कोण वरी ॥

साहस करूं नये सुंदरी ॥ ऐसें मज वाटतें ॥३८॥

देवयानी सांगे निर्धार ॥ ऐक सभाग्या माझा विचार ॥

मज ब्राह्मण नव्हे भ्रतार ॥ ऋषिशापें ॥३९॥

मग पुसे राव ययाती ॥ कैशी शापाची असे स्थिती ॥

सुंदरी सांग वो मजप्रती ॥ सकळिक ॥४०॥

तिणें आपुला पूर्ववृत्तांत ॥ रायासि केला सर्व श्रुत ॥

शेवटीं शापाचा इत्यर्थ ॥ सांगीतला ॥४१॥

तंव पुसे प्रभावती ॥ कोणें शापिलें कोणत्या अर्थीं ॥

त्या शापाची सकळ स्थिती ॥ सांग मज ॥४२॥

मग बोले हंसिणी ॥ प्रभावती ऐक सुलक्षणी ॥

सांगती झाली देवयानी ॥ ययातीप्रती ॥४३॥

तेचि कथा तूं अवधारीं ॥ देवां दैत्यांसी युध्दकुसरी ॥

दैत्य पडती रणाभीतरीं ॥ गतप्राण ॥४४॥

शुक्र जाणे संजीवनी ॥ सामर्थ्यें उठवी दैत्य मंत्रोनी ॥

ते देवांसि पुनरपि उठोनी ॥ झुंजताती ॥४५॥

परि देव जे रणीं पडती ॥ ते वृथाची बापुडे मरती ॥

संजीवनी मंत्र नेणती ॥ कोणी तेथें ॥४६॥

तो प्रकार प्रत्यक्ष पाहोन ॥ देव विचारिती सकळ मिळोन ॥

बृहस्पतीपाशीं येऊन ॥ पुसताती ॥४७॥

तूं आमचा श्रीगुरु ॥ नेणसी संजिवनी मंत्रु ॥

तरी शुक्रासि अधिकारु ॥ देतों आह्मी ॥४८॥

तंव तेथें गुरूचा सुत ॥ कच नामें जो विख्यात ॥

तो बोलता झाला सुवृत्त ॥ देवांप्रती ॥४९॥

शुक्राची विद्या संजीवनी ॥ ती मी येईन शिकोनीं ॥

नातरी मग दवडोनी ॥ द्यावें आह्मां ॥५०॥

ऐसें वचन कचें बोलिलें ॥ देवीं तें निकें मानिलें ॥

स्वस्थ होवोनि देव गेले ॥ निज स्थानासी ॥५१॥

मग तेथून कच निघाला ॥ शुक्राजवळी पातला ॥

नम्रपणें येवोनि भेटला ॥ शिष्यत्वेंशीं ॥५२॥

भार्गवचरण माथाम वंदोनी ॥ आणि विनवी कर जोडोनी ॥

सुफळ द्यावी संजीवनी ॥ विद्या मज ॥५३॥

तंव ह्मणे शुक्राचारी ॥ तुज देखतां माझे घरीं ॥

दैत्य मारितील निर्धारीं ॥ कच जाण ॥५४॥

कच ह्मणे तुह्मीं असतां ॥ मज मरण नाहीं गा ताता ॥

विद्यार्थिया शिकवीं सर्वथा ॥ विद्यामज ॥५५॥

त्याची देखोनि स्वरूपता ॥ देवयानीसि सकामता ॥

मग विनविला पिता ॥ शुक्राचार्य ॥५६॥

ह्मणे शुक्राची प्रिय कुमरी ॥ विद्या द्यावी पुण्यपात्रीं ॥

ताता याहोनि थोरी ॥ काय असे ॥५७॥

हा असे विप्र स्वजाती ॥ यातिअभिमान धरीं चित्तीं ॥

आणि आला शिष्यवृत्ती ॥ विद्येलागीं ॥५८॥

यासि न व्हावें विन्मुख ॥ विद्या द्यावी निःशेष ॥

मग होणार तें देख ॥ होत असे ॥५९॥

॥ श्लोकः ॥

गगनं गति ऋक्षाणां नदीनां सागरो गतिः ॥

राजा गतिर्मनुष्याणां विप्राणां ब्राह्मणो गतिः ॥

तरी आतां ब्राह्मणाशीं ॥ विन्मुख न व्हावें याशीं ॥

संजीवनी विद्या कचासी ॥ द्यावी तुवां ॥६०॥

आणि तुह्मां परोपकार ॥ होईल कीं तात थोर ॥

राहविजे गुरुपुत्र ॥ निश्चयेसीं ॥६१॥

शुक्रें ऐकोनि उत्तरा ॥ स्नेहें राहविलें गुरुकुमरा ॥

गाई चारूं वनांतरा ॥ पाठविला तो ॥६२॥

कच गाई चारितां वनीं । दैत्यीं तयासि देखोनी ॥

ह्मणती मंत्र संजीवनी ॥ शिकों आला ॥६३॥

हा देवगुरूचा पुत्र ॥ शिकेल संजिवनीमंत्र ॥

मग सहसा नावरे भार ॥ देवांचा आह्मां ॥६४॥

ऐसें दैत्यीं विचारोनी ॥ कच मारिला तत्क्षणीं ॥

मग ते गुप्त निघोनी ॥ गेले दैत्य ॥६५॥

श्वापदीं भक्षिलें त्यासी ॥ सायंकाळ झाली निशी ॥

गाई आलिया घरासीं ॥ देवयानी पाहत ॥६६॥

गाई घरीं आलिया ॥ येरी न देखतां तया ॥

जावोनि सांगे पितया ॥ त्वरित गतीं ॥६७॥

ताता गाई आल्या घरीं ॥ कच न देखें दृष्टीभरी ॥

तरी पहाजी ज्ञानांतरीं ॥ काय वर्तलें ॥६८॥

तया दोघांसि सांगातीं ॥ लागली बहु स्नेहप्रीती ॥

आणि करावया पती ॥ मनीं इच्छीं ॥६९॥

ह्मणोनि शुक्रासि विनवित ॥ पिता ज्ञानीं जों पाहत ॥

तंव तो मारिला सत्य ॥ वनामाजी ॥७०॥

ऐसी जाहलिया करणी ॥ शुक्र सांगे कन्ये लागुनी ॥

मग तयासि देवयानी ॥ काय ह्मणे ॥७१॥

उठवा ताता कचासी ॥ संजीवनी जपोनि मंत्रासी ॥

आणावा तो घरासी ॥ कच तुह्मीं ॥७२॥

तंव ह्मणे पिता शुक्रू ॥ दैत्यांसि मी कीती वारूं ॥

आतां सांडोनि विचारू ॥ उगी राहें ॥७३॥

तंव ते करी विनवणी ॥ हें न बोलावें वचनीं ॥

मी कचाविण भोजनीं ॥ न बैसें गा ॥७४॥

कृपाळू तो पिता शुक्र ॥ जपोनि संजीवनी मंत्र ॥

उठविला गुरुपुत्र ॥ कच देखा ॥७५॥

दैत्यीं देखिला मागुतेनी ॥ पुन्हां मारिला तो वनीं ॥

तिलप्राय खंड करूनी ॥ समुद्रांत टाकिलें ॥७६॥

आणिक मागुता एकेवेळीं ॥ गाई चारितां वनस्थळीं ॥

दैत्यीं देखिला सकळीं ॥ कच देखा ॥७७॥

पुन्हः पुन्हः उठतो ह्मणोनी ॥ दैत्य योजिती युक्तीलागुनी ॥

मग तयातें जाळुनी ॥ भस्म केला ॥७८॥

रक्षा घालोनि मद्योदकीं ॥ पात्र भरिलें कौतुकीं ॥

शुक्रापाशीं तात्काळिकीं ॥ आणिलें तें ॥७९॥

ह्मणती शुक्राचार्यासी ॥ आह्मी गेलों होतों गंगेसी ॥

शीतळ आणिलें उदकासी ॥ तुह्मांलागीं ॥८०॥

ह्मणोनि दीधलें पात्रीं ॥ शुक्र घेवोनि प्राशन करी ॥

मग दैत्य गेले झडकरी ॥ निज स्थाना ॥८१॥

तंव गाई आलिया रात्रीं ॥ कच नाहीं आला गोवारी ॥

मागुती तातासि नानापरी ॥ प्रार्थी कन्या ॥८२॥

गाई आलिया समस्ता ॥ परि न देखें गुरुसुता ॥

वनीं काय झालें ताता ॥ विचारा पां ॥८३॥

शुक्र विचारी अंतरीं ॥ तंव तो आपुलेचि उदरीं ॥

मग पडिला विचारीं ॥ दैत्यगुरुं ॥८४॥

कन्या प्रार्थी पितया लागुनी ॥ त्यासि सांगावी संजीवनी ॥

उदरीं मंत्र उपदेशुनी ॥ शिष्य करावा ॥८५॥

ताता तो निघतां बाहेरी ॥ तुह्मा होईल मुत्यु शरीरीं ॥

मग तो उठवील निर्धारीं ॥ तुह्मांसि देखा ॥८६॥

बापें सांगूनि संजिवनीमंत्र ॥ उदरीं शिष्य केला गुरुपुत्र ॥

तत्काळ गुरूदरीं थोर ॥ वाढला तो ॥८७॥

कच ह्मणे जी ताता ॥ मज नाहीं मार्ग सर्वथा ॥

काव्य ह्मणे उदर फाडोनि सुता ॥ निघें बाहेरी ॥८८॥

मग तेणें आपुले करीं ॥ उदर फाडिलें नखाग्रीं ॥

लवलाहें निघाला बाहेरी ॥ कच आपण ॥८९॥

तंव शुक्रें सांडिला प्राण ॥ कचें दिव्य मंत्र जपोन ॥

नंतर उठविला एकनयन ॥ तेचक्षणीं ॥९०॥

शुक्र उठतांचि ऐका ॥ दैत्यांसि शापिलें देखा ॥

ब्रह्महत्येच्या पातका ॥ जडलेती ॥९१॥

कीं जे सुरापान करिती ॥ तयासि ब्रह्महत्या घडती ॥

ते अधःपातीं पडती ॥ सत्य जाणा ॥९२॥

कचासि जाहली संजीवनीं ॥ मग लागला गुरुचरणीं ॥

जावया आज्ञा मागोनी ॥ विनवीतसे ॥९३॥

तंव शुक्राची नंदिनी ॥ कचासि बोले वचनीं ॥

मज जावें जी पर्णोनी ॥ तुवां ह्मणे ॥९५॥

कच ह्मणे वो सुंदरी ॥ तूं माझी सहोदरी ॥

तुह्मा आह्मां एका उदरीं ॥ जन्म दोघां ॥९६॥

तूं गुरुबहीण साक्षात ॥ तुज वरितां पाप घडत ॥

तंव देवयानी शापित ॥ तत्क्षणीं त्या ॥९७॥

शाप बोलिली ऐशा वचनीं ॥ तुज निर्फळ होईल संजीवनी ॥

ऐसें ऐकोनि वचनीं ॥ कच शापी तयेसी ॥९८॥

कच बोले शापवचन ॥ तुज वर नव्हे ब्राह्मण ॥

यापरी शाप देवोन ॥ गेला कच स्वस्थळा ॥९९॥

आपुले गृहा जावोन ॥ जंव मंत्र पाहे जपोन ॥

तंव त्यासि निर्फळ जाण ॥ झाला मंत्र ॥१००॥

मग तेणें पितयासी ॥ शिकविलें त्या दिव्य विद्येसी ॥

यापरी विद्या बृहस्पतीसी ॥ आली देखा ॥१॥

रायासी सांगे देवयानी ॥ विप्र मज न पर्णीं कोणी ॥

ह्मणोनि शापाच्या गुणीं ॥ राहिलेंसे ॥२॥

ऐसी कथा ययाती प्रती ॥ देवयानी आपुली कथी ॥

हंसिणी ह्मणे प्रभावती ॥ ऐक वृत्तांत ॥३॥

देवयानी ह्मणे ययाती ॥ ऐसी माझी असे स्थिती ॥

आतां कुळाची विपत्ती ॥ करूं नको ॥४॥

तूं करिसी माझा अव्हेर ॥ तरी त्यागीन शरीर ॥

तुजवीण नरसमग्र ॥ बंधु माझे ॥५॥

त्वां मज देखिलें नग्न ॥ तुझें नेसलें मी वसन ॥

आणि करेंसीं लग्न ॥ लागलें माझें ॥६॥

तुझा कर मज लागला ॥ तोचि सुमुहुर्त जाहला ॥

राया आतां पदर बांधिला ॥ पदरासी ॥७॥

बळेंचि दीधलीं गांठी ॥ सर्व साक्ष असे सृष्टी ॥

मग गळसरी कंठीं ॥ बाधवीत ॥८॥

राव ह्मणे तूं जाई घरा ॥ ऐसेंचि सांगें शुक्राचार्या ॥

तयाचे आलिया विचारा ॥ मानलें मज ॥९॥

मग ते आली आपुले मंदिरा ॥ कथिलें सकळ शुक्राचार्या ॥

शर्मिष्ठेनें अवधारा ॥ गांजिलें मज ह्मणोनी ॥११०॥

ऐसेंहि देवयानी ह्मणे ॥ ताता मी गेलें होतें प्राणें ॥

मज न सांगवे उणें ॥ शर्मिष्ठेचें ॥११॥

आतां उठावा करीं ताता ॥ नातरी त्यजीन मी जीविता ॥

ह्मणोनि शुक्र जाहला निघता ॥ तियेचिया बोलें ॥१२॥

शुक्र निघाला कोपोन ॥ तें दैत्यरायें जाणोन ॥

चरण दृढ धरोन ॥ शांत केला ॥१३॥

सर्वांसि दग्ध करी वन्ही ॥ परि मुळें उद्भवती मागुतेनी ॥

आणि विप्राचा कोपाग्नी ॥ सहमुळेंशीं भस्म करी ॥१४॥

या कारणें दैत्यरायें ॥ जाणोनि मानिलें भय ॥

ह्मणोनियां लवलाहें ॥ धरिलें चरण ॥१५॥

वृषपर्व्यासि शुक्र ह्मणे ॥ तुझिये कन्येचें करणें ॥

आतां कन्या समजाविणें ॥ तरि समजलों आह्मी ॥१६॥

राव ह्मणे देवयानीसी ॥ कृपा करीं वो आह्मांसी ॥

आपुल्या वचनें शुक्रासी ॥ शांत करीं ॥१७॥

तंव बोले देवयानी ॥ शर्मिष्ठा द्यावी मज लागुनी ॥

तियेसी दासी करोनी ॥ ठेवीन मी ॥१८॥

तें मानवलें दैत्यासी ॥ शर्मिष्ठा दीधली दासी ॥

मग पित्याच्या क्रोधासी ॥ शांत करी देवयानी ॥१९॥

समजाविली देवयानी ॥ कीं शुक्र शापील ह्मणोनी ॥

यापरि रायें भिवोनी ॥ दीधली कन्या ॥१२०॥

मनीं संतोष झाला शुक्रा ॥ मग निघाला अवधारा ॥

गजरें आला नगरा ॥ ययातीचे ॥२१॥

सवें शर्मिष्ठा देवयानी ॥ दहासहस्त्र दासी घेउनी ॥

आणिल्या दोघीजणी ॥ ययाती पाशीं ॥२२॥

शुक्रें ययाती नृपवर ॥ देवयानीसि केला वर ॥

मग शर्मिष्ठेचा विचार ॥ पुसे रावो ॥२३॥

रायासि देवयानी ह्मणे ॥ आपुली इसी दासी करणें ॥

मंदिर बांधोनि देणें ॥ नगरा बाहेरी ॥२४॥

ययातीनें तैसेंचि केलें ॥ चालिला तियेच्या बोलें ॥

शर्मिष्ठेसि ठेविलें ॥ नगरा बाहेरी ॥२५॥

शुक्रासि निरोप दीधला ॥ निजस्थानासि तो गेला ॥

राव ययाती राहिला ॥ राज्य करित ॥२६॥

ऐसा क्रमिला संवत्सर ॥ देवयानिसी जाहला पुत्र ॥

यदु नामें राज्यधर ॥ कृष्णपूर्वज तो ॥२७॥

आणिक झाला दुसरा ॥ तुर्वसू नाम त्या कुमरा ॥

तंव राव गेला बाहेरा ॥ व्याहाळीसी ॥२८॥

खेळोनियां व्याहाळी ॥ आला शर्मिष्ठेच्या मंदिरीं ॥

तंव ते देखिली वेल्हाळी ॥ ऋतुस्नात ॥२९॥

सुकुमार होती ऋतुवंत ॥ राव तिशीं रमला गुप्त ॥

मग तोचि गर्भ राहत ॥ तिचे पोटीं ॥१३०॥

तिसी जाहला प्रथम पुत्र ॥ दुर्जय नामें गंभीर ॥

आणि दुसरा कुरु कुमर ॥ याचिपरी ॥३१॥

हरिवंशींचें ऐसें मत ॥ तिसी जाहले तिघे सुत ॥

म्यां दोघांचा वंश सत्य ॥ निरोपिला ॥३२॥

देवयानिसि दोघे पुत्र ॥ यदु तुर्वसु परिकर ॥

आणि शर्मिष्ठेचे कुमर ॥ दोघे जण ॥३३॥

देवयानी एके अवसरीं ॥ आली दासीचे मंदिरीं ॥

तंव देखिलें कुमरीं ॥ मंडित गृह ॥३४॥

दोघे बाळ खेळताती ॥ रायासारिखेच दिसती ॥

देवयानीनें गृहाप्रती ॥ आणियेले ॥३५॥

बाळांसि सकळ देखती ॥ तंव रायाचीच दिसे आकृती ॥

राज्यलक्षणीं शोभती ॥ दोघेजण ॥३६॥

ते पुत्र दासीच्या हातीं ॥ आणोनियां गृहाप्रती ॥

ययाती राव देखतां चित्तीं ॥ संकोचला ॥३७॥

पुत्रीं देखिला आपुला पिता ॥ दोघे गेले धांवतां धांवतां ॥

हरिख मांडीवरी बैसतां ॥ दोहींकडे ॥३८॥

पुत्र बैसतां मांडीवरी ॥ राव संकोचे अभ्यंतरीं ॥

मग कोपली सुंदरी ॥ देवयानी ॥३९॥

ह्मणे शर्मिष्ठा माझी वैरिणी ॥ तिसी दिधले पुत्र दोन्ही ॥

आतां मी जाईन मरणीं ॥ पुत्रां सहित ॥१४०॥

म्यां कोपोनि यजनामासी ॥ मागीतली असे ते दासी ॥

आता जातें शुक्रापाशीं ॥ सांगावया वृत्तांत हा ॥४१॥

राव ह्मणे मी अपराधी ॥ माझी ठकली वो बुध्दि ॥

आतां न जाईं हो कधीं ॥ तिच्या घरासी ॥४२॥

तुझा पुत्र राज्यधर ॥ येथें नाहीं आन विचार ॥

तंव तेथें पातला शुक्र ॥ तेचि समयीं ॥४३॥

मग सकळ वृत्तांतासी ॥ कन्या सांगे शुक्रासी ॥

मग तो नहुष मानसीं ॥ भ्याला फार ॥४४॥

अति कोप आला शुक्रा ॥ ह्मणे स्त्रीलंपटा कामातुरा ॥

तुज आतांचि होवो जरा ॥ यौवनाची ॥४५॥

तंव तो राव ययाती ॥ येतसे बहु काकुळती ॥

ह्मणे मज नाहीं तृप्ती ॥ विषयसंगें ॥४६॥

दोघी स्त्रियांच्या संगतीं ॥ मज नाहीं जी पूर्ण तृप्ती ॥

श्वशुरा उःशाप त्वरितीं ॥ द्यावा मज ॥४७॥

तेव्हां शुक्र झाला शांत ॥ कृपेनें तया उःशाप देत ॥

ययातीस काय ह्मणत ॥ तये वेळीं ॥४८॥

राया हे त्वां आपुली जरा ॥ द्यावी एखादिया कुमरा ॥

मग तूं तारुण्यें सुंदरा ॥ भोग सुखें ॥४९॥

ऐसें शुक्रें सांगीतलें ॥ तें रायासि मानवलें ॥

मग ययातीस आलें ॥ वृध्दपण ॥१५०॥

वृध्दपण जाहलें त्वरित ॥ कृष्ण केश जाहले श्वेत ॥

ब्रह्मवाक्य नव्हे असत्य ॥ अंग कांपे थरथरां ॥५१॥

नेत्रीं सुटले पाझार ॥ कर्ण झाले बधिर ॥

दंत विराले अंकुर ॥ वाणी तेथें ॥५२॥

इंद्रियें राहिलीं निवांत ॥ परि तृष्णा वाढली बहुत ॥

पुत्र ह्मणती आलें भूत ॥ आपुल्या घरा ॥५३॥

वेळोवेळां येत ढांसी ॥ स्त्री ह्मणे किती खोकसी ॥

बाहेरि कां नव जासी ॥ पापिया तूं ॥५४॥

ऐसी तयासि पातली जरा ॥ विसर पडिलासे विचारा ॥

दृष्टी त्याचिया नेत्रां ॥ मंदावली ॥५५॥

वांकडी जाहली पाठी ॥ ह्मणोनि हातीं घेतली काठी ॥

वृध्दपणाची राहाटी ॥ नये बोलों ॥५६॥

ययाति झाला ह्मातारा ॥ आठविलें शुक्रउत्तरा ॥

मग आला यदुकुमरा ॥ पाशिं रावो ॥५७॥

राव ह्मणे तया यदूसी ॥ घ्यावें तुवां माझे जरेसी ॥

आणि द्यावें तारुण्यासी ॥ आपुलिया ।५८॥

माझें घेईं वृध्दपण ॥ देईं आपुलें तारुण्यपण ॥

तंव पुत्र बोले हांसोन ॥ ययातीप्रती ॥५९॥

उपजीवना साठीं यौवन ॥ कीं स्फटिका साठीं रत्न ॥

हें देऊं शके कवण ॥ सांग बापा ॥१६०॥

मग ह्मणे पुत्रा तुर्वशा ॥ माझी जरा घेईं रे शिरसा ॥

आणि जे तुझी वयसां ॥ ते द्यावी मज ॥६१॥

तोही ह्मणे पितयासी ॥ माझें वचन परियेसीं ॥

जीवित्व सांडोनि मरणासी ॥ कोण अंगिकारी ॥६२॥

राया देवोनियां कापुस ॥ मागतोसी पीतवास ॥

विष देवोनि अमृतरस ॥ मागतोसी ॥६३॥

मग तो राजा ययाती ॥ गेला वेगें दुर्जयाप्रती ॥

तयासि करी विनंती ॥ जराग्रहणाची ॥६४॥

अरे शर्मिष्ठेच्या पुत्रा ॥ तारुण्य देऊन घ्यावी जरा ॥

तंव तो बोले उत्तरा ॥ रायाप्रती ॥६५॥

ह्मणे राया बोलणें वृथा ॥आग्रह धरूं नको सर्वथा ॥

ऐशा तुमचिया भूता ॥ घेईल कवण ॥६६॥

तुह्मीं न बोलावें ऐसें ॥ हें तंव साक्षेपेंचि दिसे ॥

मग राव गेला परियेसें ॥ कुरुप्रती ॥६७॥

अरे शर्मिष्ठेच्या कुमरा ॥ कुरु ज्ञानगुणसागरा ॥

आपुलें तारुण्य देऊन जरा ॥ घेईं माझी ॥६८॥

तंव बोले कुरुपुत्र ॥ तूं माझा उत्पत्तिकर ॥

तुझेनि सर्व संसार ॥ झाला मज ॥६९॥

तरि तुझें तुज देणें ॥ तेथें कायसें बोलणें ॥

मागें जाहलीं पुराणें ॥ पितृभक्तीचीं ॥१७०॥

पिता विकी कन्यासुता ॥ हें अपूर्व काय गा ताता ॥

ह्मणोनि ठेविला माथा ॥ चरणावरी ॥७१॥

आणि कुरु ह्मणे ताता ॥ पितयाची भक्ति करिता ॥

श्रावण वर्णिला सर्वथा ॥ शास्त्रामाजी ॥७२॥

पितृभक्ती परशुरामें ॥ आणी दुजी केली श्रीरामानें ॥

त्यापरी चिलयानें नेमें ॥ सत्व रक्षिलें ॥७३॥

कीं राजा रुक्मांगद ॥ पुत्र तरी धर्मांगद ॥

ऐसा पुराणीं अनुवाद ॥ बहुत असे ॥७४॥

ऐशिया पुत्रांची कीर्ते ॥ म्यां काय सांगावी तुह्मांप्रती ॥

अष्टादश पुराणें गाती ॥ पुत्रधर्मातें ॥७५॥

कुरु ह्मणे परियेसा ॥ म्यां दीधली आपुली वयसा ॥

तुमची जरा ते म्यां शिरसा ॥ वंदिली असे ॥७६॥

ययाति ह्मणे धन्य पुत्रा ॥ माझी हरिली त्वां जरा ॥

आणि देहींच्या अघोरा ॥ दवडिलें ॥७७॥

जरा दीधली कुरु पुत्रा ॥ तारुण्य घेतलें स्वशरीरा ॥

मग आला आपुले मंदिरा ॥ ययातिराय ॥७८॥

राव देवयानी सरसा ॥ सहस्त्र वर्षें भोगी वयसा ॥

विषयभोगीं रात्रि दिवसा ॥ दोघां सुख अपार ॥७९॥

येथें दूषण ठेविलें श्रोतीं ॥ जे पुत्रयौवनें भोगी युवती ॥

तरी पितृरूप पुत्र निश्चिती ॥ हें व्यासवाक्य ॥१८०॥

पितयाचें जें कां तेज ॥ तेंचि पुत्रशरीर सहज ॥

तेथें दूषणाचें काज ॥ सहसा नुरे ॥८१॥

देह तंव असे अज्ञान ॥ आत्मा ऐक असे कारण ॥

आणि तयासि शापदान ॥ भार्गवाचें ॥८२॥

सहस्त्र वर्षांचिया अंतीं ॥ राव सांगें देवयानीप्रती ॥

आतां झाली मज तृप्ती ॥ विषयांची ॥८३॥

कुरुपुत्राच्या प्रसादें ॥ सुख भोगिलें आनंदें ॥

आतां या संसारबाधें ॥ करूं सोडवण ॥८४॥

प्राणी आलिया संसारीं ॥ काहीं सुकृत जो न करी ॥

तो आत्मघातकी निर्धारी ॥ आपणा आपण ॥८५॥

जैसा कोळिश्रयांचा बंध ॥ तो तयासचि करी बध्द ॥

तैसाचि आपुला अज्ञानबंध ॥ पाडी मायापाशीं ॥८६॥

आतां पुरे हा विषयसंग ॥ कीं श्रवणें नासे कुरंग ॥

अथवा मणि संग्रहें भुजंग ॥ पावे मरण ॥८७॥

पतंग नाश पावे नयनें ॥ मधुमाशीसि नाश रसनें ॥

भ्रमरा बंधन होणें ॥ भोगास्तव ॥८८॥

ऐसे नासले बहुत प्राणी ॥ इंद्रियसंगें करोनी ॥

न चुकती ते कदा मरणीं ॥ संसारिये ॥८९॥

रायासि झाली विषयतृप्ती ॥ भेटों आला कुरुप्रती ॥

जरा घेतली मागुती ॥ आपुली तेणें ॥१९०॥

सर्व राज्य दीधलें कुरूसी ॥ शाप देत येरां तिघांसी ॥

काय बोलिला वचनासी ॥ ययाति राव ॥९१॥

यदु पुत्रा परियेसीं ॥ राज्यहानी तव वंशासी ॥

तुज छत्रसिंहासनासी ॥ नाहीं बैसणें ॥९२॥

तूं पितृद्रोही ह्मणोन ॥ तव कुळीं नाहीं सिंहासन ॥

ऐसें ययाती बोले आपण ॥ यदुपुत्राप्रति ॥९३॥

मग देवयानीचा पुत्र दुसरा ॥ तुर्वसु नामें अवधारा ॥

राव तयाप्रति उत्तरा ॥ काय बोले ॥९४॥

अरे तुर्वसो तुझिये वंशीं ॥ राज्य नाहीं परियेसीं ॥

प्रजापणें तूं अससी ॥ एकाधीन ॥९५॥

मग पुत्रा तिसरिया ॥ जया नाम दुर्जया ॥

राव ययाती शापी तया ॥ याचिपरी ॥९६॥

तुमचा होईल गोत्रवध ॥ हा घडेल कुळासि बाध ॥

यापरि होईल अगाध ॥ निर्वंश तुमचा ॥९७॥

कुरूसि दीधला राज्यभार ॥ ह्मणे तूं भला रे पवित्र ॥

राज्याचा योग्य अधिकार ॥ तुझे वंशीं ॥९८॥

पुत्रा पुढें तुझें वंशीं ॥ धर्म जन्मेल पुण्यराशी ॥

तो उध्दरील पूर्वजांसी ॥ सत्य जाण ॥९९॥

तुझा वंश थोर वाढेल ॥ पुत्रपौत्रीं नादाल ॥

राज्यसंपत्ती भोगाल ॥ निरंतर ॥२००॥

ऐसें बोलोनि ययाती ॥ मग गेला तपाप्रती ॥

तप करूनि मोक्षप्राप्ती ॥ पावला तो ॥१॥

तरि त्या यदूच्या वंशीं ॥ जन्म असे श्रीकृष्णासी ॥

ह्मणोनि छत्रसिंहासनासी ॥ न बैसे तो ॥२॥

तुर्वशाचे वंशीं सकळ ॥ प्रजापणें असती प्रबळ ॥

परि तेही आटणार केवळ ॥ अवतारातीं ॥३॥

दुर्जयाचे जे कां सर्व ॥ तेही आटती वंशधर ॥

कुरूचा वंश भूमीवर ॥ निर्विघ्न नांदे ॥४॥

कुरुचे कौरव पांडव ॥ त्यांचें हस्तनापुर राज्य सर्व ॥

इंद्रपदातुल्य वैभव ॥ त्या वंशासी ॥५॥

हंसीण ह्मणे प्रभावतीसी ॥ त्वां पुसिलें ज्या प्रश्नासी ॥

तरि सांगीतलें तुजसी ॥ सकळिक म्यां ॥६॥

त्वां पुसिली हो कथा ॥ सिंहासन नाहीं गोपीनाथा ॥

ह्मणोनि समूळ वृत्तांता ॥ सांगीतलें तुज ॥७॥

तो पाळितो पूर्वजवचना ॥ महा समर्थ कृष्णराणा ॥

राज्य देऊनि उग्रसेना ॥ आपण वर्ते ॥८॥

तूं ह्मणसी मदनरती ॥ त्या दोघांची अतिप्रीती ॥

परि जंव तुझी आकृती ॥ देखिली नाहीं ॥९॥

कन्या तेचि सदैव सुंदरी ॥ माहेराहूनि अधिक सासरीं ॥

तेचि धन्यधन्य संसारीं ॥ कन्या ह्मणिजे ॥२१०॥

तूं ह्मणसी मी दैत्यकन्यका ॥ तरि ते जाण तैशीच उखा ॥

दैत्यकुमरी असोनि देखा ॥ कृष्णपौत्रातें भाळली ॥११॥

बहु दुरी असतां द्वारका ॥ तेथें पाठविली चित्ररेखा ॥

मग सून झाली ऐका ॥ त्या मदनाची ॥१२॥

तूं मज देई उत्तर ॥ जेणें घडें तुझें सैंवर ॥

तें कार्य करीन शीघ्र ॥ सत्य जाण ॥१३॥

मग बोले प्रभावती ॥ त्वांचि मजसी पाडिली गुंती ॥

मार्ग सांगे तोचि सांगाती ॥ होय जैसा ॥१४॥

त्वां जे सांगीतली उखा ॥ ते कोणाची असे कन्यका ॥

कैसी रचिली वर्‍हाडिका ॥ ते सांग मज ॥१५॥

मग ह्मणे राजहंसी ॥ ते कथा आहे यदुवंशी ॥

त्वां प्रश्न केला सायासीं ॥ महाथोर ॥१६॥

सांगताम सकल विस्तार ॥ ग्रंथ वाढेल जैसा सागर ॥

आतां सांगें सारविचार ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥१७॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ प्रथमस्तबक मनोहरू ॥

ययातिआख्यानविस्तारू ॥ पंचमोऽध्यायीं कथियेला ॥२१८॥ ओव्या ॥२१८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP