मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सोळावा|

एकनाथी भागवत - श्लोक ४४ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


तस्माद् वचो मनः प्राणान् नियच्छेन् मत्परायणः ।

मद्‍भक्तियुक्तया बुद्ध्या ततः परिसमाप्यते ॥४४॥

इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कंधे षोडशोऽध्यायः ॥१६॥

मन बुद्धि इंद्रिय प्राण । अवश्य नेमावीं गा जाण ।

वृत्ति करोनि सावधान । माझें भजन जो करी ॥८॥

भावें करितां माझीं भक्ती । विषयवासना जळोनि जाती ।

विर्विकल्प उपजे शांती । माझे भक्तिपंथीं चालतां ॥९॥

चालतां माझे भक्तिपंथीं । सकळ साधनें लाजोनि जाती ।

भावें प्रकटें मी श्रीपती । करीं संसारनिवृत्ती निजभक्तां ॥३१०॥

हो कां माझिया निजभक्तां । संसारबाधेची व्यथा ।

ते लाज मज भगवंता । गांजूं निजभक्तां मी नेदीं ॥११॥

हो कां माझिया निजभक्तां । संसारबाधेची व्यथा ।

ते लाज मज भगवंता । गांजूं निजभक्तां मी नेदी ॥१२॥

प्रल्हाद गांजितां जगजेठी । मी प्रकटलों कोरडें काष्ठीं

वैकुंठ सांडूनि उठाउठीं । गजेंद्रासाठीं पावलो ॥१२॥

द्रौपदी जांचितां तत्काळीं । म्यां कौरवांची तोंडें केलीं काळीं ।

आगीनें गांजितां गोवळीं । म्यां प्राशिला ते काळीं दावाग्नी ॥१३॥

गोकुळ गांजितां सुरपती । म्यां गोवर्धन धरिला हातीं ।

कीं गोपिकांची पुरवावया आर्ती । मी झालों श्रीपति कामारा ॥१४॥

अर्जुनप्रतिज्ञेचे प्राप्ति । म्यां दिवसा लपविला गभस्ती ।

लावूनि जयद्रथासी ख्याती । सुभद्राप्रति वांचविला ॥१५॥

अंबरीषाचे गर्भवास । म्यांचि सोसिले सावकाश ।

उणें आपुल्या निजभक्तांस । मी हृषीकेश येवों नेदी ॥१६॥

भक्तांचे पायींची माती । मी हृदयीं वाहें श्रीपती ।

वानरें वनचरें भावार्थीं । म्यां आपुले पंक्ती बैसविली ॥१७॥

यालागी उद्धवा पुढतपुढती । मी सांगें करावी माझी भक्ती ।

माझे भजनें माझी प्राप्ती । अवलीळा पावती मद्‍भावें ॥१८॥

मद्‍भावें करितां माझी भक्ती । मी अनंत आतुडें त्यांच्या हातीं ।

शेखीं कामारा होय भक्तांप्रती । भक्तीची प्रीती मज ऐशी ॥१९॥

माझिये भक्तीपरतें । सुगम साधन नाहीं येथें ।

हें जाणोनि म्यां तूतें । भजनपंथें लाविलें ॥३२०॥

लाविल्या लागे सद्‍भक्ती । तैं संसार बापुडें तें किती ।

हेळसून चारी मुक्ती । निजसुख भोगिती मद्‍भक्त ॥२१॥

मद्‍भक्तांचे महिमान । अतिशयें अगम्य गहन ।

ऐसें बोलूनियां श्रीकृष्ण । उद्धवासी जाण कुरवाळी ॥२२॥

तेणें श्रीकृष्णकराग्रस्पर्शें । उद्धवासी झालें कैसें ।

व्याले धेनूचेनि वोरसें । वत्स जैसें उल्हासे ॥२३॥

जेवीं कां लागतां चंद्रकर । सबाह्य निवों लागे चकोर ।

मेघ देखोनि मयूर । नृत्यतत्पर स्वानंदें ॥२४॥

यापरी उद्धव जाण । स्वानंदें झाला परिपूर्ण ।

विसरला देवभक्तपण । कृष्णही कृष्णपण विसरला ॥२५॥

यापरी भक्तिसुखाआंत । दोघेही ऐक्यें झाले उन्मत्त ।

परमानंदाचा तेथ । धेंडा नाचत स्वानंदें ॥२६॥

या भक्तिसुखाची गोडी । भाग्येंविण न कळे फुडी ।

उद्धवभजनाचे कुळवाडी । जोडला जोडी श्रीकृष्ण ॥२७॥

एका जनार्दना शरण । भजनसुखाची उणखूण ।

तो एक जाणे संपूर्ण । भक्तजीवनजिव्हाळा ॥२८॥

जो निजभक्तांचा जिव्हाळा । तो गोकुळीं होऊनि गोंवळा ।

क्रीडोनि त्यांचिया खेळामेळा । गोपीगोपाळां उद्धरिलें ॥२९॥

स्वयें खेळोनि त्यांचिया खेळा । उद्धरिलें बाळगोपाळा ।

हें नवल नव्हे त्याची कळा । उदार लीळा ते ऐका ॥३३०॥

पर्वत पाषाण तृण तरुवर । भृंग मत्स्य मृग मगर ।

व्याघ्र वनचर विखार । पारावतें मयूर आदिकरून ॥३१॥

येणेंसी समवेत । गोकुळींचे जीव समस्त ।

स्वयें उद्धरी श्रीकृष्णनाथ । कृपाळू समर्थ स्वलीला ॥३२॥

कां पितृवचन पुढारां । सीतेचिया वियोगद्वारा ।

रिसां आणि वानरां । उद्धरी निशाचरां रघुनाथ ॥३३॥

सेवेनें तारिले रीसवानर । युद्धें तारिले निशाचर ।

हें नवल कांहीं नव्हे थोर । ऐक उदार लीला त्याची ॥३४॥

अयोध्येपासून लंकेपर्यंत । मार्गी वृक्षवल्ली पाषाण पर्वत ।

तृणादि जीव समस्त । उद्धरी रघुनाथ स्वलीला ॥३५॥

एवं नानावतारीं जनार्दन । यापरी उद्धरी सकळ जन ।

तेणें एका एकू केला पावन । हें नवल कोण मानावें ॥३६॥

परी नवल एक केलें मोठें । मज मूर्खाचेही मुखावाटें ।

श्रीभागवतबोल केले मर्‍हाटे । हें आश्चर्य वाटे माझेंचि मज ॥३७॥

यालागीं एका जनार्दना शरण । ज्याची कृपा ऐशी परिपूर्ण ।

त्याचे स्मरोनि श्रीचरण । केला संपूर्ण सोळावा ॥३८॥

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धव संवादे

एकाकारटीकायां विभूतियोगो नाम षोडशोऽध्यायः ॥१६॥

॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥श्लोकसंख्या ॥४४॥ओव्या ॥३३८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP