मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ४४

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

गोदा यमुना सरस्वती । कृष्णा तुंगभद्रा भागीरथी ।

चंद्रभागा आणि भीमरथी । कीर्तनांत येती निजप्रेमें ॥१॥

तापी मही आणि प्रहरा । नर्मदा गोमती वेण्या निरा ।

ककुद्मी तीर्थ पुष्करा । कुशावर्त शंकर प्रिय असे ॥२॥

स्वर्गींचें तीर्थ मंदाकिनी । भोगावती पाताळ वाहिनी ।

पर्वकाळासहित येउनी । सुस्नात कीर्तनीं त्या होती ॥३॥

आणिक हीं पृथ्वीचीं बहुतीर्थे । पुराण प्रसिध्द नामांकित ।

भक्त कथा वाचितां निश्चित । येती त्वरित त्या ठायां ॥४॥

चित्तीं धरोनि बहुत आर्त । श्रवणासि बैसती साधुसंत ।

तयांसि सकळ तीर्थांचें स्नान घडत । अनुतापयुक्त ते काळीं ॥५॥

मागिले अध्यायाचे शेवटीं कथा । सवें चोरें श्रीधरासि मारितां ।

परतोनि पाहतांचि त्याची कांता । तों आले अवचितां रामचंद्र ॥६॥

धनुष्यबाण घेऊनि हातीं । तस्कर मारिले दुर्मती ।

श्रीधरासि श्रीजानकीपती । सजीव करिती निजकृपें ॥७॥

आणिक कथा बहु रसाळ । सादर ऎका भक्त प्रेमळ ।

एक धनवंत वैष्णव केवळ । असे हरिपाळ नाम त्याचें ॥८॥

संतांच्या चरणीं त्याचा भाव । सप्रेमें पूजी हरिभक्त वैष्णव ।

सामान्य मानी इतर जीव । संत तेचि देव साक्षात ॥९॥

वैष्णवभक्त येतांचि नगरा । तयांसि जातसे सामोरा ।

नमस्कारोनि त्या अवसरा । निज मंदिरा नेतसे ॥१०॥

सर्वोपचारें करोनि पूजन । मग देतसे इच्छा भोजन ।

वस्त्रें अलंकार भूषणें । यथा शक्तीनें अर्पितसे ॥११॥

ऎसी सेवा करितांचि प्रीती । पदरींची वेंचिली धनसंपत्ती ।

कोठें हात नचलें निश्चिती । म्हणे कैसी युक्ती करावी ॥१२॥

मागील सत्कीर्ती ऎकोनि कानीं । वरासि येती वैष्णव मुनी ।

विमुख होतां त्यांजलागोनी । तरी सत्वासि हानी येईल ॥१३॥

ऎसा विचार करोनि मनें । मग काय युक्ति योजिली त्याणें ।

तस्कराचें रूप धरोनि । पांथस्थाचें धन हरितसे ॥१४॥

भय दाखवोनि बहुवस । वाटसरांचे वित्त हरितसे ।

परी जीवें न मारी कोणास । करुणा वसतसे अंतरीं ॥१५॥

संतांचा वेष देखोनि पाहीं । तयांसि उपद्रव न देच कांहीं ।

इतर जनांचे लवलाहीं । वित्त सर्वही हरीतसे ॥१६॥

ऎशा रीतीं करोनि जाण । करीतसे संतसेवन ।

म्हणे मी हरितों ज्यांचें धन । तयांसीच पुण्य हें घडो ॥१७॥

ऎसा चितीं निरभिमान । लोटोनि गेले बहुत दिन ।

तों अद्भुत चरित्र वर्तलें गहन । तें ऎका सज्जन भाविक हो ॥१८॥

घरीं संतजन आले बहुत । अन्न तों मंदिरांत नसे किंचित ।

मग होऊनि चिंताक्रांत । अरण्यांत तो गेला ॥१९॥

धनुष्यबाण घेऊनि तेथ । पांथस्थांचि वाट पाहत ।

परी सर्वथा कोणी नयेचि तेथ । मग चिंताक्रांत मानसीं ॥२०॥

म्हणे गति करावी कैसी । साधु राहती उपवासी ।

तों देवाधिदेव वैकुंठवासी । कौतुक तयासी दाखवितसे ॥२१॥

सावकाराच्या रूपें सारंगधर । आपण बैसले गाडीवर ।

जवळ रुक्मिणी असे सुंदर । प्रगटले सत्वर ते ठायीं ॥२२॥

तें हरिपाळें देखोनि नयनीं । परम संतोष वाटला मनीं ।

मग धनुष्यासि बाण लावोनि । आडवा होऊनी काय बोले ॥२३॥

धनवित्त आतां सांडोनि देणें । नाहींतरी तत्काळ घेईन प्राण ।

करुणा भाकीत जगज्जीवन । परी नायकेचि वचन सर्वथा ॥२४॥

निजभक्ताचें भय बहुत । चित्तीं वागवूनि वैकुंठनाथ ।

वस्त्रें अळंकार द्रव्य समस्त । तयासि अर्पित जगदात्मा ॥२५॥

रुक्मिणीचे अलंकार सकळ । उतरोनि घेतसें हरिपाळ ।

देवासि नागवोनि ते वेळ । आला तत्काळ मंदिरा ॥२६॥

वैष्णवजनांसि बरव्यापरी । भोजन घातलें ते अवसरीं ।

इकडे रुक्मिणी म्हणतसे श्रीहरी । आतां कैसीपरी करावी ॥२७॥

वस्त्रें अलंकार निश्चित । हिरोनि नेलीं तुमच्या भक्ते ।

हरी म्हणे जीवे रक्षिलें आम्हांते । हा उपकार चित्तीं न मानिसी ॥२८॥

संतसेवेचेनि निमित्तें । हरितसे पांथस्थांचे वित्त ।

तव रुक्मिणी म्हणे त्याची स्थित । मजसी त्वरित दाखवा ॥२९॥

संतचरणीं त्याची आर्ती । कैशी पूजा कैसी भक्ती ।

जावोनि पाहावें सत्वर गती । मग वैकुंठपती अवश्य म्हणे ॥३०॥

मग संताचा वेष जगज्जीवन । धरीतसे निजप्रीतीनें ।

तुळसीमाळा गळा घालून । गोपीचंदन लाविलें ॥३१॥

ऎसें नटतां चक्रपाणी । तों वैरागीण जाहली रुक्मिणी ।

हरिपाळाच्या घरासी जावोनि । सीताराम ध्वनी बोलती ॥३२॥

हें दृष्टीसी देखतांचि त्याणें । साष्टांग घातलें लोटांगण ।

बैसावयासि देऊनि आसन । करीतसे पूजन सद्भावें ॥३३॥

पात्रें वाढोनि तये क्षणीं । उभयतांसि बैसविलें भोजनीं ।

तृप्त होतांचि चक्रपाणी । मुखशुध्दि आणुनी देतसे ॥३४॥

म्हणे धन्य आजीचा सुदिन । जाहलें स्वामींचे आगमन ।

कृपादृष्टीं विलोकून । दीधलें दर्शन निजदासा ॥३५॥

आणिक इच्छा असेल कांहीं । तरी ती सांगावी येसमयीं ।

ऎसें पुसतां लवलाहीं । मग शेषशायी बोलत ॥३६॥

आम्ही तुझे भेटीसि येतां सत्वर । तों वाटेसि आडवा आला तस्कर ।

मी होतों धनवंत सावकार । लुटिलें समग्र मज त्याणें ॥३७॥

अळंकार वस्त्रें होतीं अंगीं । तीं हिरोनि नेलीं वेगी ।

मग चित्तीं होऊनि वीतरागी । जाहलों वैरागी उभयतां ॥३८॥

यावरी हरिपाळ बोले वचन । तुम्हां संतांसि लुटिलें तस्करानें ।

तरी धुंडोनि सर्व अरण्य । घेईन प्राण तयाचा ॥३९॥

ऎसें बोलतां ते अवसरीं । लाघव दाखवितसे श्रीहरी ।

तत्काळ सावकाराचें रूप धरी । हरिपाळ अंतरीं लज्जित ॥४०॥

परम अनुताप जाहला चित्तीं । सप्रेम अश्रु नेत्रीं वाहती ।

म्हणे देवाधिदेवा रुक्मिणीपती । म्यां तुजप्रती लुटिलें ॥४१॥

तूं कळिकाळाचा शास्ता पूर्ण । हें नेणेंचि मी अज्ञान ।

सितासि चढविला होता बाण । घ्यावया प्राण पैं तुझे ॥४२॥

तूं जगद्गुरु इंदिरावर । निजांगें झालासि सावकार ।

हें नेणेंचि मी मू्ढमती पामर । लुटिलें साचार तुजलागीं ॥४३॥

मी अनंत अपराधाचा पुरा । ऎसी साक्ष येतसे अंतरा ।

दीनबंधू करुणाकरा । जगदुध्दारा क्षमा करी ॥४४॥

ऎकोनि हरिपाळाची ग्लांती । हांसोनि बोले रुक्मिणीपती ।

तुझी संतसेवेसि जडली वृत्ती । तेणें संतुष्ट चित्तीं मी असें ॥४५॥

अलंकार हरिले होते सकळ । ते हरिपाळ आणीत तत्काळ ।

रुक्मिणीसि लेवविले तये वेळ । म्हणे अपराधीं बाळ मी तुझा ॥४६॥

मग प्रसन्न होऊनि चक्रपाणी । सावकार वेष पालटित तये क्षणी ।

चतुर्भुज रूप धरोनि । हरिपाळालागोनि भेटले ॥४७॥

निष्काम भक्ति देखोनि अंतरीं । काय वर देतसे श्रीहरी ।

आजपासोनि सिध्दि राबतील घरीं । तरी सुखें करी संतसेवा ॥४८॥

ऎसें बोलोनि त्याजकारण । देव पावले अंतर्धान ।

हरिपाळ करीत संतसेवन । पदार्थ संपूर्ण सर्व घरीं ॥४९॥

आणिक जसू कुणबी ऎक । होता प्रेमळ वैष्णव भाविक ।

श्रीहरीचें भजन करीतसे मुखें । नावडे आणिक या परतें ॥५०॥

कृषिकर्म करितसे जाण । योगक्षेम चालवीत तेणें ।

क्षुधितासि देतसे अन्न । यथा शक्तीनें आपुल्या ॥५१॥

दोन वृषभ होते निश्चिती । ते तस्करीं सोडोनि नेले रातीं ।

संकटीं पडिले वैकुंठपती । बैल निर्मिती आणिक ॥५२॥

हें देवाचें कर्तुत्व नाहीं विदित । वृषभ नेले शेता आंत ।

आऊत हाकितां तस्कर पाहत । मग ते विस्मित जाहले ॥५३॥

नेले बैल पाहती जाउनी । तों ते तैसेच बांधिले तये स्थानीं ।

दुसरें रात्रीं मागुती येऊनि । नेले चोरोनि वृषभ त्याचे ॥५४॥

मागुती निर्माण करी श्रीपती । तस्कर विस्मित जाहले चित्तीं ।

चार वेळ ऎशा रीतीं । चोरोनि नेती तस्कर ते ॥५५॥

मग परम अनुताप जाहला मना । म्हणती यासि साह्य वैकुंठराणा ।

आपण व्यर्थचि केली छळणा । नरक साधना लागोनि ॥५६॥

ऎसें म्हणवोनि ते समयीं । जसू स्वामीचे लागती पायीं ।

वर्तमान सांगीतलें सर्वही । अनुताप जीवीं धरोनियां ॥५७॥

मग अनन्यभावें शरण येउनि । त्याचा अनुग्रह घेतला त्याणीं ।

सेवेसि तिष्ठत दिवस यामिनि । विष्णुस्मरणीं लागलें ॥५८॥

भक्त कथा परम रसिक । आणिक ऎका भक्त भाविक ।

धनाजाट कुणबी एक । ज्यासि वैकुंठनाथ भेटले ॥५९॥

लहान वयांत होता जाण । तों घरासि आले वैष्णवजन ।

त्यांचें देवतार्चन देखोन । साष्टांग नमन करीतसे ॥६०॥

हात जोडोनि भक्तवैष्णवा । म्हणे मज शाळग्राम पूजेसि द्यावा ।

त्यांणीं काळा गोटा पाहोनि बरवा । दीधला तेव्हां त्यालागीं ॥६१॥

परमविश्वास धरोनि अंतरीं । धनाजाट त्याची पूजा करी ।

भक्तिभाव देखोनि श्रीहरी । तेथेंचि निर्धारीं प्रगटले ॥६२॥

गाई राखावया निर्धारीं । नित्य जातसे वनांतरी ।

शाळग्राम घेतले बरोबरी । मग स्नान करी उदकांत ॥६३॥

रानफुलें वाहोनि देवासी । पूजा करितसे सद्भावेंसी ।

सिदोरीचा नैवेद्य दाखवी तयासी । म्हणे हृषीकेशी जेवी आतां ॥६४॥

भक्तिभाव देखोनि श्रीहरी । आवडीनें रुखी खात भाकरी ।

संतोषें धनाजाट अंतरीं । मग उरली सिदोरी भक्षीतसे ॥६५॥

बाळपणापासूनि देखा । देवाधिदेव जोडला सखा ।

न विसंबतीच एकमेका । सप्रेम सुखा भोगिती ॥६६॥

धनाजाट वैष्णववीर । दिवसंदिवस जाहला थोर ।

वैष्णव साधु असतां क्षुधातुर । तरी भोजन साचार दे त्यांसी ॥६७॥

तंव एके दिवशीं घेऊनि आउत । पेरावयासि जातसे शेत ।

तों बैरागी वाटेसि भेटले बहुत । सीताराम बोलती निज मुखें ॥६८॥

धनाजटासि बोलती उत्तर । वैष्णव मंडळी क्षुधातुर ।

तूं अन्नदान करितोसि फार । सत्कीर्ती साचार ऎकिली ॥६९॥

दुष्काळ पडिला असे भारी । आणिक दाता नसेचि नगरीं ।

तरी आम्हांसि भोजन देऊनि सत्वरीं । तृप्ति करी विष्णुदासा ॥७०॥

ऎसी ऎकोनियां मात । धनाजाट विचार करित ।

घरीं तों धान्य नसे किंचित । मग उपाय योजितां तेधवां ॥७१॥

बीज दळोनियां सत्वरी । संतांसि घालावें ये अवसरीं ।

ऎसा निश्चय करोनि अंतरीं । जातसे माघारी मंदिरा ॥७२॥

मग गहूं दळोनियां जाण । वैष्णवांसि घातलें भोजन ।

तृप्त जाहलिया साधुसज्जन । आशीर्वचन बोलती ॥७३॥

जो देवाधिदेव रुक्मिणीवर । तो तुज साह्य असो निरंतर ।

सत्वासि कदा न पडो अंतर । सत्कीर्ती गजर हो तेणें ॥७४॥

ऎसें बोलोनि तयासि । साधु गेले तीर्थवासी ।

धना जाटाच्या चित्तासी । संतोष मानसी वाटला ॥७५॥

गांवींचे सकळ निंदिती जन । म्हणती हें तों अघटित केलें याणें ।

प्रपंच साधूनि परमार्थ करणें । तरीच धन्य संसारीं ॥७६॥

मुदलचि बुडवोनियां पाहे । त्याणें केला व्यवसाय ।

त्याचा परिणाम उत्तम न होय । आला प्रत्यय आम्हांसी ॥७७॥

ऎसे जननिंदेचे येतां लोट । शांतीसागरीं भरीतसे घोट ।

म्हणे निरसली प्रपंच खटपट । वैकुंठ पीठ जोडला ॥७८॥

घरची मनुष्यें चिंता करीती । म्हणती अतां पेरावें काय शेतीं ।

प्रपंच चालेल कैशा रीतीं । उत्तम गती दिसेना ॥७९॥

धनाजटाचा भाव सात्विक । म्हणे निर्जीव भूमी देतसे पीक ।

सजीव वैष्णवसंत सकळिक । ते कायएक न करिती ॥८०॥

ऎसा निश्चय धरोनि अंतरीं । भजन करितसे सप्रेम गजरी ।

तों अघटित चरित्र वर्तलें परी । तें सादर चतुरीं परिसिजे ॥८१॥

जो भक्तवत्सल वैकुंठनाथ । निजांगे आपण पेरितसे शेत ।

दुसरे दिवशीं लोक पाहत । तों गहुं शेतांत उगवला ॥८२॥

देखोनि लोक आश्चर्य करिती । म्हणती धनाजटाची सप्रेम भक्ती ।

संकटी पावला रुक्मिणीपती । जाहली सत्कीर्ती जनांत ॥८३॥

पुढें पीक अद्भुत आलें । तेंही त्याणें सत्कारणीं लाविलें ।

वैष्णव बैरागी मेळवूनि भले । भोजन घातलें तयासी ॥८४॥

आणिक चरित्र अति अद्भुत । सादर ऎका भाविक भक्त ।

एक सुखानंद ब्राह्मण निश्चित । भजन करित श्रीहरीचें ॥८५॥

वैष्णव घरासि येतां जाण । त्याचें सद्भावें करी पूजन ।

भोळा भाविक प्रेमळ जन । आणिक साधन नेणेची ॥८६॥

विष्णुनैवेद्य महाप्रसाद सार । त्याचे ठायीं प्रीति थोर ।

कोणी आणूनि दीधलें जर । तरी भक्षीत सत्वर ते समयीं ॥८७॥

परम भाविक त्याची कांता । सुरसुरी नांवें पतिव्रता ।

जाणोनि पतीच्या मनोगतां । साधुसंतां पूजीतसे ॥८८॥

सुखानंद असतां अस्नात । जरी महाप्रसाद कोणी देत ।

तरी तत्काळ घालीतसे मुखांत । संशय चित्तांत न धरितां ॥८९॥

हरि प्रसादा वरिष्ट कांहीं । आणिक लोभ सर्वथा नाहीं ।

ऎसा निश्चय दंपतींहीं । केलासे जीवीं आपुल्या ॥९०॥

तंव कुटील निंदक मिळोनि नर । त्याणीं मांडिला अविचार ।

म्हणती याचा विश्वास हरिप्रसादावर । तरी साक्षात्कार पहावा ॥९१॥

मग जाऊनि बाजारांत । जिलिब्या वडे घेतले विकत ।

सुखानंदापासीं निश्चित । येऊनि बोलत काय तेव्हां ॥९२॥

आम्हीं जाऊनि हरिमंदिरासी । हरिप्रसाद आणिला तुम्हांसी ।

तो सुखानंद संतोष मानसी । निजप्रीतीसीं भक्षितसे ॥९३॥

ऎसें देखोनि ते अवसरीं । गदगदां हांसती दुराचारी ।

म्हणती जिलिब्या घेऊनि बाजारीं । ये अवसरीं आणिल्या ॥९४॥

तुम्हीं ब्राह्मण सज्ञान निश्चित । हें तरी केलें अनुचित ।

आतां घेणें लागेल प्रायश्चित । नाहीं तरी वाळीत घालितों ॥९५॥

हरिप्रसादासि विटाळ नसे । परी बाजारींचे अन्न भक्षिलें कैसें ।

ऎसें बोलतां निंदकांस । मग विष्णुदास काय करी ॥९६॥

मुखापासीं नेऊनि हात । जिलब्या वडे सगळेचि काढित ।

कुटिळाचें हातीं देत । देखोनि विस्मित ते होती ॥९७॥

नवल वाटे सकळ लोकां । म्हणे वडे जिलिब्या भक्षितां देखा ।

लोटोनि गेली एक घटिका । चमत्कार निका दाखविला ॥९८॥

ऎसें बोलोनि परस्पर । सद्भावें करिती नमस्कार ।

म्हणती तुम्हासि साह्य रुक्मिणीवर । छळिलें साचार व्यर्थ आम्ही ॥९९॥

सुखानंदाची सप्रेम स्थिती । सुरसुराचीही तैसीच वृत्ती ।

एकचित्तें स्त्रीपुरुषें असती । सेवा करिती संतांची ॥१००॥

तंव कोणें एके दिवसीं । यात्रेसि गेले मथुरेसी ।

स्वमुखें सांगोनि कांतेसी । तुवां संतसेवेसी असावें ॥१०१॥

घरासि येती वैष्णवजन । तुवां करावें त्याचें सेवन ।

काया वाचा आणि मन । कांहीं न वंचणें सर्वथा ॥२॥

ऎसे सांगोनि सुरसुरीप्रती । आपण गेले सत्वरगती ।

मागें वृत्तांत कैशा रीतीं । जाहला तो श्रोतीं ऎकिजे ॥३॥

एक बैरागी वेषधारी । आला सुखानंदाचे घरीं ।

घरस्वामी त्यासि नमस्कारी । पूजाही करी निज प्रेमें ॥४॥

स्वरूप सुंदर देखोन । कामातुर जाहला मनें ।

सुरसुरीसि म्हणे भोगदान । मजकारणें आज देयी ॥५॥

ऎकोनि म्हणें पतिव्रता । तुम्हीं भोजन करावें आतां ।

रात्रि समयीं तुमच्या आर्ता । पुरवीन तत्वतां निश्चित ॥६॥

ऎसें वचन देऊनि त्यासी । भोजन घातलें षड् रसीं ।

वेषधारीं संतोष मानसीं । म्हणे भोगीत इसी रात्रिसमयीं ॥७॥

अस्तमानासि जातां दिनकर । लोटोनि गेली प्रहररात्र ।

मग एकांतीं शेज घालोनि सुंदर । केलें एकाग्र मन तेव्हां ॥८॥

स्वपतीचे पाय हृदयांत । चिंतोनि त्यासि बोलावी आंत ।

दीपक जळतसे मंदिरांत । तों कामिक त्वरित पातला ॥९॥

द्वारापासीं मग येऊनी । हृदयीं भेदला कामबाणीं ।

सुरसुरीस पाहे आपुले नयनीं । तों महावाघिणीं ते दिसें ॥११०॥

मग परम भय वाटलें चित्तां । म्हणें हे तों विपरीत जाहली वार्ता ।

अमृत म्हणुनी सेवुं जातां । तो विषचि हातां आलें कीं ॥११॥

धनाची मांदुस साचार । यास्तव अभिलाषें घातला कर ।

तों दृष्टीसि दिसें खदिरांगार । तैसाच विचार हा जाहला ॥१२॥

रत्नहार म्हणवोनि उठाउठी । बालूं गेलों आपुले कंठीं ।

तों महाभुजंग देखिला दृष्टीं । तैसीच गोष्टी हे झाली ॥१३॥

कां दौपदी सतीसी आलिंगन । द्यावयासि कीचके केले प्रयत्न ।

तो एकांतीं पाहतां भीमसेन । मजकारणें तेविं दिसे ॥१४॥

ऎसें म्हणवोनि ते अवसरीं । परम भयभीत जाहला अंतरीं ।

वाघीण आंतून गर्जना करी । नेत्र वटारी सक्रोधें ॥१५॥

लज्जित जाहला रतिनाथ । धातु जिराली तेथीच्या तेथ ।

पंच विषयांचा मथितार्थ । गेलें चित्त विरोनी ॥१६॥

मग भीत भीत वचन बोलत । म्हणे मज अन्याय घडला माते ।

तुज म्यां छळिलें धैर्यवंते । हा अपराध चित्तांत न गणी तूं ॥१७॥

ऎसें विनीत बोलोनि उत्तर । मग साष्टांग घातला नमस्कार ।

मग दूर जावोनि निजे बाहेर । तों पातला दिनकर उदयासी ॥१८॥

सुरसुरी होऊनि पूर्ववत । सडासंमार्जन मंदिरी करित ।

वैरागी तिजला नमस्कारित । म्हणे अन्याय माते क्षमा करी ॥१९॥

परम अनुताप होऊनि अंतरी । निरंतर राहिला त्याचें घरीं ।

सकळ जिंतोनि षड्वैरी । सेवा करी ते ठायीं ॥१२०॥

चार मास लोटितां निश्चित । तों सुखानंद यात्रा करोनि येत ।

अन्याय घडला जो आपणातें । तो बैरागी सांगत त्यापासी ॥२१॥

अंतर साक्ष वैष्णवपूर्ण । त्याजवरी केले कृपादान ।

नित्य करीत सप्रेम भजन । साक्षात्कार तेणें पावला ॥२२॥

आणिक चरित्र रसाळ गहन । सादर ऎका भाविक जन ।

एक माधवदासनामें ब्राह्मण । असे निपुण वेदशास्त्रीं ॥२३॥

तो महापंडित असे निश्चित । परी कदापि नोहे विषयासक्त ।

सर्वकाळ असे विरक्त । प्रपंच मात आवडेना ॥२४॥

ऎसें लोटतां बहुत दिन । तों कांता जाहली गतप्राण ।

चित्तीं मानीत समाधान । म्हणे संसारबंधन सुटलें ॥२५॥

घरीं धनधान्य होते काहीं । भांडीं आणि वस्तभाव सर्वही ।

ती ब्राह्मणांसि वांटोनि पाहीं । संतोष जीवीं पावला ॥२६॥

आशापाश तोडोनि ऎशारीतीं । यात्रेसि चालिला जगन्नाथीं ।

जैसा शुक पिंजर्‍यांतून निघे निश्चिती । संतोष चित्तीं तेविं झाला ॥२७॥

महातीर्थासि येऊनि जाण । समुद्रतीरीं केलें स्नान ।

मग विष्णुमंदिरीं येतसे त्वरेनें । लोटांगण घालित ॥२८॥

दृष्टींसीं देखोनि सगुण मूर्ती । अनुतापयुक्त करितसे ग्लांती ।

म्हणे देवाधिदेवा वैकुंठपती । उगविली गुंती सर्व माझी ॥२९॥

मायबाप बंधु सज्जन । पुत्र कलत्र आणि धन ।

आतां कांहींच नसे तुजवांचुन । एकाग्र मन जाहलें ॥१३०॥

ऎसें बोलोनि ते समयीं । सप्रेम माथा ठेविला पायीं ।

श्रीहरि भजनावांचूनि पाहीं । साधन कांहीं नावडे ॥३१॥

वेदशास्त्रीं निपुण पंडित । परी विद्याभिमान नसें किंचित ।

सर्वदा प्रेमळ आणि विरक्त । सगुणीं प्रीत बहु तया ॥३२॥

तंव पुढें पूजारें येऊनि येथ । माधवदासासि काय बोलत ।

देवासि उपद्रव न करीं येथ । होय त्वरित बाहेरी ॥३३॥

रित्या हातें नमस्कार । देवासि करिसी वारंवार ।

ऎसें बोलोनियां उत्तर । घातलें बाहेर तयासि ॥३४॥

माधवदास सद्गदित चित्तीं । जावोनि बैसे एकांतीं ।

ऎसी इच्छा धरिली चित्तीं । म्हणे सगुण श्रीपती भेटवा ॥३५॥

बहुत ग्लांती केली तेणें । म्हणें मी सेवाहीन भक्तीहीन ।

पदरीं किंचित नसेचि धन । करावें पूजन कैशा रीतीं ॥३६॥

कैसी करावी मानस पूजा । हें सर्वथा नेणें अधोक्षजा ।

बाह्यात्कारें गरुडध्वजा । दास मी तुझा म्हणवितों ॥३७॥

ऎशा रीतीं बोलोनि वचन । नघे फळ मूळ किंवा अन्न ।

अहोरात्र नामस्मरण । तीन उपोषणें जाहलीं ॥३८॥

सोडोनि देहगेहाआस्था । आवडीनें भजतसे जगन्नाथा ।

संकट पडिलें रुक्मिणीकांता । म्हणें सांभाळ आतां करावा ॥३९॥

तों जगन्नाथ रुक्मिणीसि म्हणे । सगुण रूप सत्वर धरून ।

माधवदासासि घाली भोजन । उपोषणें तीन घडलीं तया ॥१४०॥

आज्ञा होताचि तये क्षणीं । काय करितसे विश्वजननी ।

सुरस अन्न ताटीं भरोनी । आली घेउनी त्यापासी ॥४१॥

तों समूळ सांडोनि देहभान । माधवदासें केलें शयन ।

त्यासि निजलोभें उठवीत रुक्मिण । म्हणे भोजन करीं आतां ॥४२॥

सुंदर स्वरूप देखोनि निश्चित । माधवदास जाहला विस्मित ।

म्हणें तूं कोण आहेस मातें । सांग त्वरित ये समयीं ॥४३॥

रुक्मिणी बोले प्रतिवचन । तूं सर्वकाळ ज्याचें करितोसि ध्यान ।

त्याचें अर्धांगीं असतें जाण । नांव रुक्मिण पैं माझे ॥४४॥

भोजन घालावयासि तुंते । मज आज्ञा केली वैकुंठनाथे ।

आतां आग्रह न करावा किंचित । जेवी त्वरित ये समयीं ॥४५॥

स्वल्प काळें तुजकारणें । देवही देतील साक्षात दर्शन ।

ऎसें देतांचि आश्वासन । धरितसे चरण जननीचे ॥४६॥

मातेच्या वचनासि देऊनि मान । माधवदासें केलें भोजन ।

तयासि मुखशुध्दि देऊन । अदृश्य रुक्मिण जाहली ॥४७॥

सुवर्णताट रत्नजडित झारी । तेथेंचि राहिली ते अवसरीं ।

माधवदासें धुवोनि सत्वरी । आंथरूणाशेजारीं ठेवितसे ॥४८॥

तों प्रभात समय होतां निश्चिती । पूजारें कांकड आरती करिती ।

सर्वोपचारें वैकुंठपती । पंडे पूजिती तेधवां ॥४९॥

तों सुवर्णताट रत्नजडित झारी । दृष्टीसी न दिसे ते अवसरीं ।

म्हणती देउळीं जाहली चोरी । तो तस्कर सत्वरी पहावा ॥१५०॥

हरिमंदिरीं शोध करिती । सकळांपासीं झाडा घेती ।

परी ठिकाण न लागे निश्चिती । म्हणती कैसी गती करावी ॥५१॥

मग माधवदासापासीं येउनी । पाहते जाहले तये क्षणीं ।

तों झारी ताट देखिलें नयनीं । म्हणती तस्कर ठिकाणी लागला ॥५२॥

एक म्हणती हा मैंद पूर्ण । कैसें धरिलें बकध्यान ।

चार दिवस येथें राहून । वस्ता चोरून घेतल्या ॥५३॥

अंतरभाव नेणोनि चित्तीं । नाना दुरुत्तरें बोलती ।

मग कोठडींत घालोनि तयाप्रती । बंधन करिती सभोंवतें ॥५४॥

तंव स्वप्नीं येऊनि जगन्नाथ । पूजारियाप्रती काय सांगत ।

माधवदास प्रेमळ भक्त । गांजिलें व्यर्थ तुम्ही त्यांसी ॥५५॥

येथें येऊनिया त्याणें । केली तीन उपोषणें ।

मग आम्हीं रुक्मिणींसि आज्ञा करोन । घातलें भोजन तयासि ॥५६॥

झारी ताट विसरोनि तेथ । रुक्मिणी आली देऊळांत ।

तुम्हीं तयासी कोंडिलें व्यर्थ । ऎसा दृष्टांत देखिला ॥५७॥

पंड्यांसि अनुताप जाहला थोर । मग माधवदासापासीं आले सत्वर ।

सद्भावें करिती नमस्कार । म्हणती छळिलें साचार व्यर्थ आम्हीं ॥५८॥

मग नेउनि देऊळांतरीं । घातला देवाच्या पायांवरी ।

हरिप्रसाद ते अवसरीं । आपुले करीं तिहीं दिला ॥५९॥

तैंपासूनि माधवदासासी । सकळ मानिती क्षेत्रवासी ।

देवाचा नैवेद्य येतसे त्यासी । क्षुधित उपवासी न राहे ॥१६०॥

ऎसे दिवस लोटले कांहीं । तों काय करित शेषशायी ।

आणिक चमत्कार दाखविला कांहीं । तो ऎका सर्वही भाविकहो ॥६१॥

पाखळ पूजा होतां सत्वरी । तों लोटोनि गेली अर्धरात्री ।

मग माधवदासासि पुजारी । म्हणती सत्वरी बाहेर या ॥६२॥

ऎसें पंडे बोलती वचन । परी तयासि नाहीं देहभान ।

सगुण स्वरूपीं जडलें मन । नाहीं देहभान सर्वथा ॥६३॥

मागील चमत्कार आठवोनि चित्तीं । पूजारे सकळ बाहेर येती ।

आपुले हातें द्वाराप्रती । कुलुपें घालिती तेधवां ॥६४॥

तों माधवदास शेजार मंडपांत । आधींच होता ध्यानस्थ ।

किंचित होता सावचित्त । मग शीत वाजत तयासी ॥६५॥

हें जाणूनि जगन्नाथ । तयापासी आले त्वरीत ।

हातें कुरवाळोनि त्यातें । मग सकलाद घाली अंगावरी ॥६६॥

प्रातःकाळ होतांचि ते अवसरीं । पूजारे येऊनि पाहती सत्वरी ।

तों सकलाद नाहीं पलंगावरी । विस्मित अंतरीं मग होती ॥६७॥

मग बाहेर येऊनि पाहती सत्वर । तों देवाचें सुवासिक वस्त्र ।

माधवदासाच्या अंगावर । त्यांणीं साचार ओळखिलें ॥६८॥

म्हणती देवाच्या खोलीत निर्धारी । कुलुपें तैसींच होतीं रात्रीं ।

आणि सकलाद घातली याजवरी । लाघवी श्रीहरी कृपाळू ॥६९॥

ऎसाच चमत्कार देखोन । मग मानूं लागले सर्वत्र जन ।

राजा येऊनि लोटांगण । निजप्रीतीनें घालितसे ॥१७०॥

मानमान्यता वाढतां बहुत । तेथोनि उदास जाहलें चित्त ।

मग मथुरेसि चालिला असे त्वरित । श्रीकृष्णनाथ पहावया ॥७१॥

आधीं निस्पृह उदास अंतरीं । मार्गक्रमितसे ते अवसरीं ।

तों वैष्णव भक्त एके नगरीं । मार्गावरी राहत होता ॥७२॥

त्याची सत्कीर्ती ऎकोनि श्रवणीं । यास्तव पातला त्याचें सदनीं ।

तों गावांस गेला असे घरधणी । घर स्वामिणी पुढें येत ॥७३॥

तिनें सद्भावें करोनि नमन । म्हणे शिधा देतें करा भोजन ।

आम्हीं क्षत्रिय जातीचे हीन । तुमचें सेवन घडेना ॥७४॥

मग माधवदास उत्तर देत । तुम्ही विष्णुस्मरणी सर्वदा रत ।

पवित्र कुळ केलें निश्चित । उंचासि निश्चित वंद्य तुम्हीं ॥७५॥

मग घरधणीन जावोनि बाजारांत । दूध पेढे आणिले बहुत ।

उपाहार घालोनि त्यात । केलें तृप्त सद्भावें ॥७६॥

तेथूनि निघतांचि सत्वरी । तों संत भेटले वाटेवरी ।

परतोनि घरासि ने ते अवसरीं । मधुरोत्तरीं सांगतसे ॥७७॥

घरधणीन होती मंदिरांत । तिणे आमुचा आदर केला बहुत ।

पोटभर पेढे भक्षिले तेथ । आतां इच्छा किंचित असेना ॥७८॥

ऎशा रीतीं समजावून । परस्परें केलें नमन ।

पुढें यमुनातीरीं करोनि स्नान । मथुरा पट्टण प्रवेशला ॥७९॥

मग जावोनि देवळांतरी । नमस्कार घालितसे महाद्वारी ।

प्रवेशतां अंतर मंदिरीं । तों आडवे पुजारी पातले ॥१८०॥

दर्शनासि जावया अडथळा । पंडे करिती तये वेळां ।

धक्के देवोनि वेळोवेळा । भक्त प्रेमळा भवंडिती ॥८१॥

मनोदय देवासि नमस्कार । करोनि निघे वैष्णववीर ।

मग चीर घाटीं जाऊनि सत्वर । एकाग्र स्थिर मन केलें ॥८२॥

ध्यानांत आणोनि श्रीकृष्णनाथ । भजन करीत प्रेमयुक्त ।

तों एक कणवाळू येऊनि तेथ । साहित्य देत स्वयंपाका ॥८३॥

पाकनिष्पत्ती झालियावरी । देवाचा आठव जाहला अंतरीं ।

तों तेथें पातलें श्रीहरी । कैशापरीं ते ऎका ॥८४॥

चतुर्भुज सांवळी मूर्ती । झळके पितांबराची दिप्ती ।

दिव्य कुंडलें कानीं तळपती । मकराकृती सुढळ ॥८५॥

श्रीमुख साजिरें मनोहर । दृष्टींसि पाहतां देहभान विरे ।

ऎशा रूपें सारंगधर । प्रगटले साचार ते ठायीं ॥८६॥

दृष्टींसीं देखून सगुण मूर्ती । चरणीं सत्वर घातली मिठीं ।

मग माधवदासासि धरोनि पोटी । बोलतसे गोष्टी जगदात्मा ॥८७॥

म्हणे तूं माझा जिवलग प्राण । हें पूजारियांसि न कळे खूण ।

भवंडोनि बाहेर घातले जाण । मग आलासि रुसोनि ये ठायीं ॥८८॥

मग मज चैन न पडेचि देउळीं । आपुलें चित्तीं बहु तळमळी ।

मग धुंडीत आलों ये स्थळीं । ऎसें वनमाळी बोलिले ॥८९॥

तेव्हां देवभक्तांचे नयन । अश्रुपातें भरलें जाण ।

जैसी माता समजवितांचि तान्हें । वाढें द्विगुण लोभ त्याचा ॥१९०॥

मग वरण पानगे आणि मिठ । सांगातें जेवीं वैकुंठपीठ ।

सप्रेम भक्ती देखोनि चट । भरितसे पोट ते ठायीं ॥९१॥

प्रार्थना करितां पाकशासन । जो सर्वथा न करीच अमृतपान ।

तों भाविकांच्या सांगातें कदन्न । निजप्रीतींने जेवीतसे ॥९२॥

तृप्त झालियां जगज्जीवन । माधवदासासि समाधान ।

मुखशुध्दीसि तुळसी पान । निज प्रीतीने देतसे ॥९३॥

मग देउळीं जावोनि श्रीकृष्णनाथ । पूजारीयासि दृष्टांतीं सांगत ।

मी माधवदासाच्या सांगाते । जेविलों निश्चित पोटभरी ॥९४॥

तुम्हीं त्यासि दीधले भवंडून । यास्तव चीरघाटीं बैसला रुसून ।

आतां तयासि आणा समजावून । नैवेद्य सेवीन तरीच मी ॥९५॥

ऎसें सांगतां चक्रपाणी । पंडे विस्मित झाले मनीं ।

मग माधवदासासि समजावुनी । आले घेउनि देउळां ॥९६॥

देवें दाखविला साक्षात्कार । मग मानूं लागले सर्वत्र ।

ज्याचा सखा रुक्मिणीवर । तरी विश्व त्यावर कृपा करी ॥९७॥

मग म्हणे आपुल्या चित्ता । जगन्नथीं वाढली मान्यता ।

यास्तव मथुरेसि आलों आतां । परी पालट संचिता न करवे ॥९८॥

चार मास मथुरेसि राहोनि । मग गेलें गोकुळ वृंदावनी ।

जगन्नाथासि भक्त शिरोमणी । येतसे परतोनि सत्वर ॥९९॥

घेऊनियां देवदर्शन । क्षेत्रवासी भेटले सज्जन ।

तव माधवदासाकारणे । लागली हगवण ते समयीं ॥२००॥

वेरझारा करावयासि सत्वरी । कांहीं शक्ति नसेचि शरीरीं ।

मग जाऊनि बैसले समुद्रतीरीं । उपद्रव भारी म्हणवोनियां ॥२०१॥

तेव्हां सगुणरुपें चक्रपाणी । शौचासि उदक देती नेउनि ।

वस्त्र भरतांचि तये क्षणीं । आणितसे धुवोनि जगदात्मा ॥२॥

हें माधवदासें देखोनि दृष्टीं । मग स्वमुखें देवासि पुसें गोष्टी ।

म्हणे व्यथा दूर करावयासि जगजेठी । सामर्थ्य पोटीं तुज नाहीं ॥३॥

ऎकोनि निजभक्ताचें वचन । काय म्हणतसे जगज्जीवन ।

शरीर भोग नेमिला जाण । तो लागे भोगणें निश्चित ॥४॥

व्यथा दूर करावयासि आज । कांहीं संकट नसेचि मज ।

परी शरीर भोग भोगावया तुज । जन्म सहज घेणें लागे ॥५॥

बहुत दिवस सोशीला भोग । आणिक चार दिवस राहिला रोग ।

मग पुढती होसील अरोग । ऎसें श्रीरंग बोलिले ॥।६॥

तेव्हां आराम जाहला देहास । तें कांहीं एक लोटले दिवस ।

कांहीं चरित्र वर्तलें विशेष । तें ऎका सावकाश भाविकहो ॥७॥

एक थोर पंडित वादक निश्चिती । आला असे जगन्नाथीं ।

तो माधवदासासि बोले वचनोक्ती । तुम्ही तों वेदांतीं प्रवीण ॥८॥

कांही करावें संभाषण । ऎसी इच्छा धरिली मने ।

माधवदास अवश्य म्हणे । शौचाहून मी येतों ॥९॥

मग तांब्यापीतांबर घेऊनि बरोबरी । जाऊनि बैसले समुद्र तीरी ।

म्हणे ब्राह्मणासि वाद निर्धारीं । कैशापरी घालावा ॥२१०॥

अहंकार हा मोठा दुर्गुण । धरितां नाडिले बहुत जन ।

मग ब्रह्मराक्षस लागे होणें । करितां अपमान ब्राह्मणाचा ॥११॥

म्हणे देवाधिदेवा श्रीहरी । हें संकट निवारी कैशापरी ।

ऎसी चिंतातूर होऊनि अंतरीं । मग समुद्रतीरी बैसले ॥१२॥

मग देवाधिदेव श्रीहरी । माधवदासाचें रूप धरी ।

पंडितापासीं जाऊनि सत्वरी । वचनेचि करीं कुंठित ॥१३॥

जो चहूं वेदांची खाणी । निघाली ज्याच्या श्वासापासूनी ।

त्यासीं बोलतां पुरवेल कोणी । ऎसा त्रिभुवनी दिसेना ॥१४॥

इतुकें कार्य करोनि जाण । मग अदृश्य जाहले जगज्जीवन ।

तों माधवदास शौचाहून । आले परतोन स्वस्थाना ॥१५॥

मग पंडित देखोनि तयाप्रती । नमस्कार करीती सत्वरगती ।

तंव क्षेत्रवासी वैष्णव सांगती । तुम्ही जिंतले याप्रती निश्चित ॥१६॥

म्हणवोनि सांडोनि अभिमान । आतां सद्भावें आलों शरण ।

तंव पंडित माधवदासासि म्हणे । आबाधित ज्ञान तुमचे ॥१७॥

मी पृथ्वी हिंडोनि समग्र । पंडित जिंतले थोर थोर ।

तुम्हीं एकाचि वचनें साचार । कुंठित अंतर केलें कीं ॥१८॥

माधवदासासि समजलें आपुलें मनीं । म्हणे हे तो श्रीहरीची करणी ।

तो पंडित म्हणे मज ये क्षणीं । अनुग्रह स्वामीनी देईजे ॥१९॥

काया मनें आणि वाचा । संप्रदायी जाहला माधवाचा ।

भक्तीमार्ग करोनि साचा । केला देहाचा उध्दार ॥२२०॥

पुढिलें अध्यायीं रस अद्भुत । वदविता श्रीपंढरीनाथ ।

महीपती त्याचा मुद्रांकित । गुण वर्णित संताचे ॥२१॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेचि पुरती मनोरथ ।

परिसोत भाविक भक्त । चव्वेचाळिसावा अध्याय रसाळ हा ॥२२२॥ अध्याय ॥४४॥ ओव्या ॥२२२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP