TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन १४६ ते १५०

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन १४६ ते १५०

भजन - १४६

धन्य जाहलो, सदगुरुचे चरणी । दाविली अघटित निज करणी ॥धृ॥

अजब ते घर, सुंदर साजाचे, दिसतसे औट हात साचे ।

तयाचे मधी, जगचालक नाचे, स्वरुप का बोलु अता वाचे ।

मुखे वदवेना, श्रमली वेदवाणी । दाविली अघटित ० ॥१॥

रत्न लाविले, आत दिव्य सात, तयांचा उजेड चकचकित ।

सदा झगमगे, न बोलवे मात, डुलतसे अजपा दिनरात ।

स्मरण स्फुरणाचे, आवाज घुमघुमित, त्रिवेणीसंगम झुरझुरत ।

सप्त हौदांचे, लहरावे पाणी । दाविली अघटित ० ॥२॥

बंद ठेविले, ते दसवे द्वार, नऊ खिडक्या त्या चौफेर ।

आत नांदती, स्त्रिया तिथे चार, तयांचे नावी घरदार ।

मनाजी गडी, करी कारभार, सदा पाहतसे व्यवहार ।

धनी सर्वांचा, एकविसा वरुनी । दाविली अघटित ० ॥३॥

गुंग जाहला, तया पुढे ज्ञानी, वृत्तिशून्यत्व अंगि बाणी ।

तेज फाकले, नच मावे नयनी, संशय विरले सर्व मनी ।

दंग होतसे, निज स्वरुपी प्राणी, सद्गुरु आडकुजी-ध्यानी ।

दास तो तुकड्या, सहज समाधानी । दाविली अघटित ० ॥४॥

भजन - १४७

किति सांगती, संत तुला बोध । सुटेना अजुनि कामक्रोध ॥धृ॥

काय तुज ठाव, असेल संतांचा ? अवेळी जाशिल रे ! साचा ।

शेवटी कुणी, साथ-संगतीचा, नसे कर शोध अंतरीचा ।

समज मानसी, कोण तू कवणाचा ? , सुसेवक होई संतांचा ।

कृपा घेउनी, तोडिशि ना नाद । सुटेना अजुनि ० ॥१॥

उदरिं नवमास, त्रासहि सोसोनी, अचानक पडला या भुवनी ।

स्मरण ते वेळी, केले स्थिर ध्यानी, अता का होशी अभिमानी ?

जन्म पावला, झाला वयमानी, 'बाळपण खेळण्यास' मानी ।

विषय सेविता, किति झाला बध्द । सुटेना अजुनि ० ॥२॥

पुरा मायेत, होउनिया दंग, सेविली विषयांची भांग ।

सुचेना काही, दुःखाचा रंग, धरिला वृध्दपणी संग ।

श्वास लागला, पुत्र म्हणे 'रोग ?, मांडिले बुडग्याने ढोंग' ।

काढि येथुनी, न तोडिशी बंध । सुटेना अजुनि ० ॥३॥

जगी मानती, तुच्छ तुला प्राण्या ! न होशी हुशार तरि शहाण्या !

मूर्ख बनतोसी, का खोट्या नाण्या, अजुनि 'अविनाश' पाहि प्राण्या !

स्वरुप विसरला, अंतरला कान्हा, अजर अमृत रे ! निज पान्हा ।

दास तुकड्या हा, म्हणे होइ शुध्द । सुटेना अजुनि ० ॥४॥

भजन - १४८

भटकला, कितिक भटक्शी ?, न झाली खुशी विषय-भोगाची ? ।

रे ! कर सार्थकता अता तरी देहाची ॥धृ॥

हे अजब वाटते पिसे, तुला रे ! नसे, हौस तरण्याची ।

मग ओरडशी जव येइल फेरि यमाची ॥

ना कुणी येइ रक्षण्या, समज शाहण्या ! गतिच देहाची ।

तुज कशी नसे रे ! बुध्दी अपरोक्षाची ? ॥

वरि-वरी दावितो ज्ञान, असे अज्ञान, गोष्ट अंतरिची ।

रे ! कर सार्थकता अता तरी देहाची ॥१॥

बहु फिरत फिरत येउनी, पावला झणी, तनू मनुजाची ।

धाडिली विचारा करिता-करिता साची ॥

वाचुनी बहूत पुरण, धरी अज्ञान, होत तू वाची ।

ना अनुभव ऎसा सर्व जनी बघलाचि ॥

रे ! जाण पशूपक्षि जे, ययानी किजे, धाव पुढच्याची ।

परि नसे फिकिर त्या खाण्याची दिवसाची ॥

जाहला नीच त्याहुनी, समज रे ! मनी, गोष्ट स्वहिताची।

रे ! कर सार्थकता अता तरी देहाची ॥२॥

सांगती संत ते बोध, तुला ये क्रोध, दुही सुजनाची ।

कर विचार आता, करि भक्ती ईशाची ॥

नवमास उदरि साहुनी, त्रासली मनी, जननि ते तुमची ।

का केली अपकीर्ति हो ! तिच्या नावाची ? ॥

तो तुकड्या सांगे सार, नसे आधार, स्थिति सर्वांची ।

रे ! कर सार्थकता अता तरी देहाची ॥३॥

भजन - १४९

बा ! प्रपंच-वन हे दाट, सुचेना वाट, चढाया घाट, तुझा श्रीहरी !

कर दया, आवरी माया अजुनी तरी ॥धृ॥

वनि मद-मत्सर जंबुके, अवेळी भुके, करिति गर्जना ।

कधि बा ! धरती हे ? भिववुन सोडिति मना ॥

वासना-वीज कडकडे, घडी-घडी उडे, विषय-अंधारी ।

मार्गात लागते ठेच जिवाला भारी ॥१॥

कधि काम-व्याघ्र खळबळे, क्रोधे जळफळे, आरळी मारी ।

धाव रे धाव ! करु कायच वाटे हरी ! ॥

आशा-तृष्णा ह्या नद्या, न वाहति सुद्या, ओढिती धारी ।

टाकताचि पाउल पुढे फजीती सारी ॥२॥

करु काय ? सांग सदुपाय, वाटतो पाय कठिण देवाचे ।

पाश हे कधी तुटतील पापि जीवाचे ? ॥

तुकड्यादास ठाव दे अता, नसे तारिता, तुझ्याविण कोणी ।

दे प्रकाश मज या भयाण काननस्थानी ॥३॥

भजन - १५०

श्रीहरी ! कोठवरि आता फिरविसी वाया ?

जाहलो श्रमी बहु, नका दावु ती माया ॥ श्रीहरी ! ॥धृ॥

राहुनी प्रपंची जिवा नसे सुख काही ।

करिताचि कष्ट बहु शिणलो, या भव-डोही ॥ श्रीहरी ! ॥

पाहुनी द्रव्य-सुत-दार वैभवा ऎशा ।

भटकला जीव हा, न सुटे घरची आशा ॥ श्रीहरी ! ॥

मागता भीक श्वानासम पोटासाठी ।

हे हीन कर्म मारिते, आडवी काठी ॥ श्रीहरी ! ॥

(अंतरा)

नच द्रव्य कधी घेउनी पाहिले डोळा ।

कष्टला जीव मम सर्व सोशिता ज्वाळा ।

घरधनी कशाचा घरचा बाइल-साळा ।

हा नर-जन्माचा, काळ लोटला वाया ॥ जाहलो श्रमी ० ॥१॥

कुणि बरे पाहिना, जावे दुसर्‍या दारा ।

काय सांगु वैभव ऎशा या परिवारा ? ॥ श्रीहरी ! ॥

तरि तुझे नाव मम न ये मुखी भगवंता ! ।

श्रीगुरु-कृपेने आठवला गुणवंता ! ॥ श्रीहरी ! ॥

आठवता ऎसे वाटे मज ते काळी ।

'फेडील पांग हा येउनिया वनमाळी' ॥ श्रीहरी ! ॥

(अंतरा)

ते मधुर बोल ऎकवशिल श्रवणी कधी ।

येउ दे दया मम, शांतवि अपुल्या मधी ।

ऎश्वर्य जाउ दे, मज घे अपुल्या पदी ।

तुकड्यादास ठाव दे श्रीसद्गुरुच्या पाया ॥ जाहलो श्रमी ० ॥२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-10-02T22:38:56.7330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

slag pocket

  • धातुमळी कप्पा 
RANDOM WORD

Did you know?

विनायकी आणि संकष्टी चतुर्थीबद्दल शास्त्रार्थ सांगावा.
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site