TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन १३६ ते १४०

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन १३६ ते १४०

भजन - १३६

'झणि हासति काय मला जन हे', ही लाज मनी तिळमात्र नको ॥धृ॥

कार्य करा प्रभुला स्मरुनी, निःस्वार्थपणी प्रियता धरुनी ।

मग वानो कुणि निंदाहि कुणी, अभिमान मनी तिळमात्र नको ॥१॥

हे विश्व मकान खरे अपुले. समजोनि करी मग जीव-दया ।

अति क्रूर असूर असेल कुणी, वधण्यासि दया तिळमात्र नको ॥२॥

निर्माण करा प्रभुची, प्रभु देइल मोक्ष ययाचि मता ।

तुकड्या म्हणे काय अरे ! बघता ? घ्या कार्य करी अजि, वेळ नको ॥३॥

भजन - १३७

रमला हरि कुंजवनी सखये ! हुरहुर जिवा अति वाटतसे ॥धृ॥

किति वेळ असा राहील तिथे ? सांगा तरि जाउनिया हरिला ।

कुणि मोहिल काय झणी सगुणा ? अग ! दुःख असे उरि दाटतसे ॥१॥

किति गोड तयाची बंसि सये ! पशुपक्षि-जिवा रमवी विपिनी ।

मनमोहन-बंसि हरील कुणी, मम चित्त कसे होईल पिसे ॥२॥

शिरि मोर-पिसारा सुंदरसा, योगी बघती हृदयात जसा ।

कुणि काढिल काय हळूंच असा ? नेत्रातचि ते रुप साठतसे ॥३॥

चल जाउ झणी बघण्या मिळुनी, दहापाच जणी अति एकहुनी ।

तुकड्या म्हणे भाग्य खुलेल गडे, हरिच्या विरहे जिव फाटतसे ॥४॥

भजन - १३८

विपरीत हवा दिसते नयनी, हरि काय करील मना न कळे ॥धृ॥

नच रीत उचीत कुणा करवे, धरवे न ऋषी-वचना हृदयी ।

अति कामभरे नच नेम उरे, श्रृतिशास्त्र, तया मदने न कळे ॥१॥

करि त्याज्य न राज्य कुचाल जनी, हसताति मनी दुरुनी झुरुनी ।

'बिघडले कधी ही भारतभू ?' परके जनही द्विविधा घुसळे ॥२॥

ऋतु चालति चाल कुचाल अती, नच पृथ्वि पिके उरती पुरती ।

मरतो कइ , अन्न मिळे न पुरे, नरनारि न लुगडी-वस्त्र मिळे ॥३॥

रुसल्या मरिमाय जरा कुलरा, वरि प्लेग-काँलरा भिति न ज्वरा ।

नच सुख जिवा इकडे तिकडे, मन घाबरले अति, धीर ढळे ॥४॥

नच धर्म न कम सुसंगतिही, वळती जन हे विषयी अतिही ।

तुकड्या म्हणे स्वाधिन हे हरिचे, कळते प्रभुला कळणे सगळे ॥५॥

भजन - १३९

हरिनाम जपा मन लावुनिय, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥धृ॥

अति दुर्जन हे रिपु दूर करा, जे काम-क्रोध मद-लोभ अती ।

गुरुपायि चला हृदये नमुनी, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥१॥

रोज करा अभ्यास सदा, जी वेळ मिळे जो काळ मिळे ।

अति प्रेमभरे विरहे प्रभु गा, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥२॥

सत्य सदा वदनी वदणे, समजा सम सर्व जिवा प्रभुच्या ।

अति निर्मळ गोड रहा जगती, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥३॥

'मान असो अपमान असो, निति-धर्म न सांडुनि जाउ कुठे' ।

तुकड्या म्हणे निश्चय घ्या ऎसा, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥४॥

भजन - १४०

कुणि काहि म्हणो न म्हणो जन हे, नच साधु ढळे हरिच्या भजना ॥धृ॥

वाहताति कुणि फल, पुष्प शिरी, कुणि भावबळे घरि ने अपुल्या ।

कुणि निंदिती मार्गि, शिव्या वदनी, सुखदुःख न होय जराहि मना ॥१॥

कुणि देति किती, कुणि नेति किती, कुणी खाति किती, गणतीच नसे ।

कधि लाडु पुरी, कधि भूक उरी, कळणा-घुगरी हरि देत तना ॥२॥

कुणि मान कराया नेत सभे, कुणि प्राण हराया नेत गिरी ।

समतोल तयाची वृत्ति सदा, नच द्वेष-प्रीती कुजना-सुजना ॥३॥

शित-उष्ण असो वा वृष्टि असो, जनलोक असो वा कानन हो ।

मरणी जननी नच खेद जिवा, सदनीहि जसा तैसाचि रणा ॥४॥

नच रंग कधी विसरे अपुला, आनंदस्वरूप अनादि सदा ।

पदि लीन तया तुकड्या नमुनी, ज्याच्या न कळे कवणास खुणा ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-10-02T22:35:42.3530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

snuff box granuloma

  • श्वेतशल्कता (तपकीर, तंबाखुमुळे होणारी) 
RANDOM WORD

Did you know?

बांस की लकड़ी
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site