मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन ७१ ते ७५

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन - ७१

येशिल ना शेवती तू, गुरुराया ! धावुनी ।

जव नेती ओढुनीया, मम प्राणा काढुनी ॥धृ॥

मरण्याचे संकटाला, नच कोणी आपुले ।

देशिल ना साथ तै तू, शिरि धरुनी कर भले ॥१॥

जन म्हणती-'लवकरी या, काढा ना आतुनी' ।

मग रचती ना चिता या, देहासी निजवुनी ॥२॥

कुणि म्हणती-'ठीक झाले, काळाने ओढला' ।

म्हणशील ना-'मीच नेला, माझा हा तान्हुला' ॥३॥

तुकड्याची प्रेम-भक्ती, भोळी चहुबाजुंनी ।

परि अंती ध्यान लागो, तव स्मरणी रंगुनी ॥४॥

भजन - ७२

श्रीहरिच्या प्रेमळांनो ! घ्या पदरी बालका ।

जरि पापी भ्रष्ट कर्मी, अज्ञानी होइ का ॥धृ॥

प्रभु तुमच्या ओळखीने, दीनासी भेटतो ।

तुमचीया एक बोले, कार्यासी कष्टतो ॥१॥

अति चिंता लागलीसे, जिवाभावापासुनी ।

प्रभु भेटो, रूप दावो, ही आशा मन्मनी ॥२॥

नच डोळे त्याविना हे, राहताती शांतसे ।

तुकड्याची हाक घ्या हो ! मज काही ना सुचे ॥३॥

भजन - ७३

मंजुळ हा नाद आला, कोठोनी बंसिचा ।

पहायासी कृष्ण ! झाला जिव वेडा आमुचा ॥धृ॥

कुणि सांगा मार्गियांनो ! दिसला तो का कुणा ?

त्याविण या लोकि झालो, दुबळासा मी सुना ॥१॥

दचकोनी उठविताना, स्वप्नचिसा भेटला ।

झणि पाहो परि न भासे, ऎसा का करि भला ? ॥२॥

अजुनी ना विसरला तो, खेळवणे आपुले ।

अम्हि दुःखी बहुत त्याने, का ना हे जाणले ? ॥३॥

मज वाटे भेट द्याया, लपुनी तो येतसे ।

तुकड्याची हाक कानी, लांबुनिया घेतसे ॥४॥

भजन - ७४

रमशील ना हरी ! तू भक्तिच्या सुमंदिरी ।

तुज कमल-दली, नेत्रांजलि, न्हाणि अंतरी ॥धृ॥

ही भाव-भक्तिची सुमने, माळ वाहि मी ।

बहु सत्वशील वृत्ति तुझ्या, पाऊली धरी ॥१॥

पद-पूजना करूनि, दीप 'सोहं' जाळुनी ।

तुज वरुनि फिरविताच 'मी-तू' भाव हा हरी ॥२॥

हे उरु न देइ देह-धर्म, आपुलेपणा ।

तुकड्याचि हाक घे सख्या ! ही आस कर पुरी ॥३॥

भजन - ७५

मशि बोल तरी बोल जरा, रुक्मिणी-वरा !

मन रंगु दे पदरी घे सख्या ! दीन-उध्दरा ! ॥धृ॥

भव-दुःख हे अती कठीण, पार ना मिळे ।

तव भक्तिसुखे चित्त सख्या ! सुखवु दे वरा ॥१॥

अति ज्वाल षडविकार महा, अग्निच्य परी ।

मज ओढतील क्षण न तुझी, दृष्टि श्रीधरा ! ॥२॥

जनि पाहता तुझ्याविणे, नच शांति ये जिवा ।

बघु सांग तरी काय कुठे, कुणाचिया घरा ? ॥३॥

नच तीर्थ शांति दे, न मंदिरे, मढी कुणी ।

तुकड्याचि हाक घेइ, भेटि देइ पामरा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP