मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय १२

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ।

जो सच्चिदानंदघन अनंत । त्याच्या विभूति असंख्यात ।

चक्षुःश्रव्यासि न कळे अंत । तेथें मी प्राकृत काय वाणूं ॥१॥

जैसा मेघ वर्षतां क्षितीं । त्याच्या धारा न गणवती ।

कीं भूमीतूनि तृणांकूर निघती । ते न मोजवती सर्वथा ॥२॥

नातरी सागरीच्या अनंत लहरी । येती जाती दिवस रात्रीं ।

त्यांची संख्या कोण करी । ऐसा धरित्री दिसेना ॥३॥

किती अंगुळें गगन निश्चित । मोजितां कोणाचा न पुरेची हात ।

तेवी ईश्वराच्या विभूति बहुत । संख्या रहित असती ॥४॥

भावें अथवा वैरें निश्चितीं । जयासि घडली सत्संगती ।

त्याची ही जाहली सात्विक वृत्ती । सायुज्य मुक्ती पावले ॥५॥

मागिले अध्यायीं कथा निश्चितीं । नानक मक्केसि गेले प्रीतीं ।

तेथें पाहोनि श्रीविष्णुमूर्ती । मग गोरक्षाप्रती भेटले ॥६॥

आणिक चरित्र रसाळ पूर्ण । ऐका सार भाविक जन ।

रोहिदास वैष्णव पूर्ण । विष्णु उपासना करीतसे ॥७॥

ध्यानांत आणून वैकुंठपती । चर्माचीच निर्मिली मूर्ती ।

सांवळा चतुर्भुज श्रीपती । शंख चक्र हातीं मंडित ॥८॥

सुहास्यवदन मनोहर । दृष्टीसी देखतां देहभान विरे ।

ऐसी भोगमूर्ती निरंतर । सर्वोपचारे अर्चितसे ॥९॥

त्या गोपाळमूर्ती पुढें निश्चितीं । शाळग्राम पंचायतन असती ।

गणपति शिव ब्रह्म भास्कर शक्ती । रोहिदासें प्रीतीं मांडिलीं ॥१०॥

त्या पंचायतनाचें करी पूजन । परी कृष्ण उपासक म्हणवीत पूर्ण ।

ऐसें त्याचें वैष्णव धर्म जाण । जाहले श्रवण कबीरासी ॥११॥

तो राम उपासक भक्‍त प्रेमळ । सत्वधीर वैराग्यशीळ ।

इंद्रियें स्वाधीन केली सकळ । अनुताप बळें करोनियां ॥१२॥

चातक न घेचि भूमीचें जीवन । कीं माते वांचुनि न समजे तान्हें ।

चकोरासि चंद्र प्रमाण । नेणती आन सर्वथा ॥१३॥

तेवीं कबीराचिया मना । आवडे श्रीराम उपासना ।

इतर दैवतें आहेत नाना । दृष्टीसीं पाहे ना त्यांकडे ॥१४॥

ऐसा कबीर पूर्ण ज्ञानी । रोहिदास भक्‍त ऐकोनि कानीं ।

अकस्मात एके दिनीं । भेटीलागोनी पातला ॥१५॥

आणिक वैरागी वैष्णवभक्‍त । दोघे असती संगातें ।

तें पाहोनि गोपाळ मूर्तीतें । केला प्रणिपात सद्भावें ॥१६॥

कबीर भक्‍त तये वेळीं । अर्चन पाहे नेत्र कमळी ।

उगाचि जावोनि बैसे जवळी । हृदय कमळीं विस्मित ॥१७॥

हें रोहिदासें देखोनि नयनीं । स्वमुखें बोले तये क्षणीं ।

म्हणे हरिमंदिरासि येऊनि नयनीं । अहंता मनीं कासया ॥१८॥

भक्‍तवत्सल वैकुंठ विहार । सगुण मूर्ति साकार ।

यासि न केला नमस्कार । आणि वैष्णव वीर म्हणवितसां ॥१९॥

कबीर बोले प्रती वचन । श्रीरामावांचूनि दैवत आन ।

आम्हीं न घेवों त्याचें दर्शन । आज्ञा प्रमाण गुरुची ॥२०॥

तुवां चर्माची मूर्ति करोनि वरी । कापूस भरला त्या भीतरीं ।

यासी नमस्कार प्रितीं । कैशापरी करावा ॥२१॥

ऐकोनि कबीराचें वचन । रोहिदास म्हणे त्याजकारण ।

चामां वांचोनि पदार्थ कोण । तुम्हां कारणें दिसतसे ॥२२॥

शरीर पंचमहाभूतांचें । हें चामें करुनि वेष्टिलें साचें ।

आणि गोपाळ मूर्ति निंदितां वाचें । मत तुमचें उलटें कीं ॥२३॥

अंडज जारज उद्भिज प्राणी । चामें वेष्टिल्या तिन्हीं खाणी ।

यांत चैतन्यनाथ चक्रपाणी । असे व्यापोनि निराळा ॥२४॥

काहाळा ढोल मृदंग निश्चितीं । चर्मे वेष्टित वाद्यें असती ।

नादब्रह्म बहुता रीतीं । शास्त्र संमती बोलिले ॥२५॥

चामाचा हस्ती शोभिवंत । वस्त्राभरणीं लखलखित ।

त्यावरी चामाचा नृपनाथ । चामानें पाहत सभोंवतें ॥२६॥

चामाची गाय कपिला कृती । तिचें दूध पवित्र म्हणती ।

चामाचे दोहणार पय सेविती । चामाच्या जिव्हे करुनी ॥२७॥

तुम्ही सर्वगत वैष्णव जन । बरें पहा विचारुन ।

चाम मंदिरीं गोपाळ कृष्ण । असे व्यापून निराळा ॥२८॥

ऐकोनि रोहिदासाचें वचन । कबीर बोले धिक्कारुन ।

म्हणे श्रीराम जगाचें जीवन । ऐसीं पुराणें गर्जती ॥२९॥

तुझा कृष्ण द्वापारींचा । खिल्लारी नंदाच्या घरचा ।

गौळणींनी बांधिला साचा । पराक्रम त्याच्या वाणिसी ॥३०॥

माझा राम सूर्यवंशी । जन्मला दशरथाच्या कुशीं ।

जो सार्वभौम अयोध्यावासी । सनकादिकांसी प्रिय जो ॥३१॥

रोहिदास बोले प्रतिवचनीं । रामाची किर्ति ऐकिली श्रवणीं ।

मायामृगापाठीं धांवोनी । सीते लागोनी हरविले ॥३२॥

कांतेच्या वियोग बाणें । रुदन करीत रानोरान ।

कवळी वृक्ष पाषाण । तो रघुनंदन तुझा कीं ॥३३॥

तंव कबीर म्हणे तें वेळीं । तुझा कृष्ण बांधिला उखळी ।

स्फुंदस्फुंदो रडे वनमाळी । माते जवळी तेधवां ॥३४॥

आणि श्रीराम माझा परब्रह्म मूर्ती । सीतेची देखोनि सप्रेम भक्ती ।

धुंडीत गेला वनाप्रती । जगीं सत्कीर्ती व्हावया ॥३५॥

रोहिदास म्हणे रे मोमिना । सार्वभौम म्हणसी रघुनंदना ।

तरी कां मेळविली वानरसेना । रानोरान हिंडावया ॥३६॥

श्रीकृष्ण माझा परब्रह्म मूर्ती । यशोदेची देखोनि सप्रेम भक्ती ।

बांधोनि घेतसे श्रीपती । अवतार स्थिती दावावया ॥३७॥

जो कळिकाळासि नियंता । त्याजवरी पाकशासने मेघ रिचवितां ।

गोवर्धन धरोनि नखावरुता । वज्रवासी समस्तां रक्षिलें ॥३८॥

यावरी कबीर उत्तर देत । कृष्ण कळिकाळासि नाहीं भीत ।

तरी काळयवना पुढें निश्चित । होता पळत कासया ॥३९॥

वाल्मीक प्राय गोवर्धनास । स्वयें उचलितां मिरविसी यश ।

श्रीरामाचा कीर्ति घोष । श्रवण सायासें करी कां ॥४०॥

वानरां हातीं महा पर्वत । आणोनि रघुनाथें बांधिला सेत ।

आणि स्वतां गोवर्धन कृष्ण उचलित । त्याची सत्कीर्त काय गासी ॥४१॥

ऐसा उभयतांचा संवाद तेथ । विबुध येऊनि ऐकती समस्त ।

विमानें दाटलीं आकाशांत । गंधर्व गर्जत नामघोषें ॥४२॥

भक्तिज्ञान वैराग्य पूर्ण । उभयतांसी तत्समान ।

एकनिष्ठ उपासना । अणुमात्र मन फांकेना ॥४३॥

जैसे शशि मित्र निश्चितीं । नभ मंडळीं एकवट होतीं ।

कां हरिहरांची भिन्न आकृती । दोघेजण दिसती सारिखे ॥४४॥

चंद्राचे आंगीं शीतळता । उष्णपणें मिरवे सविता ।

शिवा आंगीं वैराग्य तत्वतां । विलास भोगिता श्रीहरी ॥४५॥

यांच्या वृत्ती सकळ जनां । भिन्नाकार दिसती जाण ।

तेंवीं रोहिदासाची उपासना । कबीराच्या मना न ये कीं ॥४६॥

असो मागील अनुसंधान । सादर ऐका भाविकजन ।

रोहिदासासि कबीर म्हणे । श्रेष्ठ रघुनंदन पै माझा ॥४७॥

हालाहल घेतलें जाश्वनीळें । तेव्हां सर्वांग पोळों लागलें ।

राम नाम जपतां ते वेळे । जाहला शीतळ धूर्जटी ॥४८॥

महा पातकी वाल्हा परम । मरामरा म्हणतां जाहला उत्तम ।

त्याची सत्कीर्ति जाहली सुगम । त्रिजगतीं प्रेम न समाये ॥४९॥

आणिक अनंत जड जीव किती । रामनामें उद्धरले क्षितीं ।

ऐकोनि रोहिदास तयाप्रती । काय वचनोक्ति बोलत ॥५०॥

वनवासा जातां रघुनाथ । शोक करितां निमाला दशरथ ।

तेणें पावला अधोगत । जन बोलत हे वार्ता ॥५१॥

ज्याणें पितयासि दुःख दीधलें पाहीं । तो आणिकाचा शेवट करील कायी ।

ऐकोनि कबीर संतप्त होयी । उणीव न साहे सर्वथा ॥५२॥

म्हणे रे चर्मका अज्ञाना । उणीव आणितोसि रघुनंदना ।

तूं करितोसि ज्याची उपासना । त्या कपटी कृष्णा जाणतसें ॥५३॥

देवकीचें उदरीं जाण । आठवा अवतार होईल कृष्ण ।

तो दैत्यांचे करील निधन । अशरीर वाणी वदोन गेली कीं ॥५४॥

कंसे ऐकोन हे वार्ता । भय उपजलें त्याचिया चित्तां ।

मग वसुदेव देवकी उभयतां । घाला घालिता बंदिखानीं ॥५५॥

तुझ्या कृष्णाचे योगें पाहीं । वसुदेव देवकी कारागृहीं ।

माता पितयांसि सौख्य कांहीं । दीधलें नाहीं सर्वथा ॥५६॥

माता बंदिखानीं । असतां जन्मला चक्रपाणी ।

कंसाचें भय धरोनि मनीं । गेला पळोनी गोकुळीं ॥५७॥

पायींच्या वाळ्यापासून । चोर जार तुझा कृष्ण ।

पूतना करवितां स्तनपान । घेतले प्राण पैं तिचे ॥५८॥

पूर्ण अवतार म्हणवितो जनीं । आणि स्त्रीहत्या केली बाळपणीं ।

त्याची श्लाघ्यता सांगतां जनीं । लज्जा मनीं तुज न ये ॥५९॥

रोहिदास म्हणे रघुनंदनें । शूर्पणखा विटंबिली जाण ।

आणि ताटका वधी स्वयें आपण । ते कां आठवण न करिसी ॥६०॥

राम जन्मला सूर्यवंशी । आणि त्यानें स्त्रीहत्या केली कैसी ।

ऐकोनि रोहिदासाच्या वचनासी । कबीर तयासी बोलत ॥६१॥

म्हणे रे चर्मका ऐक वचन । चोर जार तुझा कृष्ण ।

धाकुटपणा पासूनि त्यानें । गोकुळ संपूर्ण चोढाळिलें ॥६२॥

रिघोनि गोपिकांच्या सदनीं । दधि दुग्ध भक्षिले चोरुनी ।

त्यासि गौळणी टाकिती बांधोनी । मग मातेसि गार्‍हाणीं सांगती ॥६३॥

तुझा कृष्ण साचार । निलाजिरा फजीतखोर ।

घेवोनि श्रीकृष्ण अवतार । वर्णसंकर केला कीं ॥६४॥

राम अवतारी रघुनंदन । त्याचे वाल्मिकें वर्णिले गुण ।

एकपत्‍नी व्रत पूर्ण । एकचि बाण त्यापासीं ॥६५॥

जरा मृत्यु दारिद्रय कैसें । ज्याच्या राज्यांत कोठेंचि नसे ।

तिन्हीं भुवनीं न माय यश । जो अयोध्याधीश राम माझा ॥६६॥

ऐसे म्हणोनि कबीर भक्त । उगाच राहिला मग निवांत ।

सवेंचि म्हणे रोहिदासातें । उत्तर मातें देयीं कां ॥६७॥

तुझा माझा प्रतिवाद होत । कां उगाच बैसलासि निवांत ।

ऐसें जाणोनि वैकुंठनाथ । गजवदनातें अज्ञापी ॥६८॥

म्हणे गणपती ऐक मात । कबीर रोहिदास माझे भक्त ।

उपासनाभिमान धरोनि निश्चित । दोघेही भांडत परस्परें ॥६९॥

तरी तुवां जाऊनि लवलाहें । उभयतांचा करी न्याय ।

सख्य करोनियां पाहे । सत्वर गतीं ये मजपाशीं ॥७०॥

आज्ञापितां वैकुंठनाथ । अवश्य म्हणे पार्वतीसुत ।

रोहिदासाच्या मंदिरा त्वरित । प्रगट साक्षातरुप दाखवी ॥७१॥

गजवदन लंबोदर । चतुर्भुज उंदिरावर ।

एकचि दंत दिसे शुभ्र । सर्वांगीं शेंदूर चर्चिला ॥७२॥

ऐसें रुप प्रगटोनि जाण । उभयतांचें ऐके भांडण ।

मग रोहिदासाचा पक्ष धरोन । गजवदन बोलतसे ॥७३॥

म्हणे कृष्णाची उपासना जाण । यथार्थ भासे मज कारण ।

तंव कबीर बोले धिक्कारुन । म्हणे पुसतें कोण तुजलांगीं ॥७४॥

ढेरपोटया उंदिरावर । बैसोनि सत्वर जाय दूर ।

आम्ही निधडे वैष्णववीर । तुझें उत्तर नायकों ॥७५॥

व्यभिचारी रोहिदास निश्चयेंसी । पंचायतनीं पूजितो तुजसी ।

म्हणवोनि गोष्टी तया ऐसी । या समयासी सांगीतली ॥७६॥

लांचासाठीं देतोसि गाही । तरी हा न्याय यथार्थ नाहीं ।

आल्या वाटे परतोनि जायी । मोदक नाहीं मजपासी ॥७७॥

ऐकोनि कबीराचें वचन । निवांत राहे गजवदन ।

म्हणे यासीं बोलतां पुरवेल कोण । पातळ उणें काढितो ॥७८॥

हें जाणोनि वैकुंठविहारी । वासरमणीसि आज्ञा करी ।

म्हणे तुवां जावोनि सत्वरी । न्याय विचारी दोघांचा ॥७९॥

आज्ञापितांचि लक्ष्मीधरें । विप्रेवेषें प्रगटे भास्कर ।

म्हणे रोहिदासाची उपासना थोर । मज साचार वाटत ॥८०॥

कबीर म्हणे सहस्त्रकरा । तूं कां आलासि या अवसरा ।

द्वैत भेद तुझ्या अंतरा । जाय माघारा परतोनि ॥८१॥

सारिखा प्रकाश सर्वांवर । पाडिसी तूं निरंतर ।

परी कपटी बहुत तुझें अंतर । जाणवलें साचार मज अंतरीं ॥८२॥

चंद्र शीतळ भासतो खरा । परी कलंक आहे त्याच्या शरीरा ।

तेवीं निर्मळ प्रकाश पाडिसी दिनकरा । परी द्वैत अंतरा वसतें कीं ॥८३॥

तुझ्याचि वंशीं जाण गभस्ती । अवतरला माझा रघुपती ।

आणि उच्छेदोनि त्याची भक्ती । सांगसी सत्कीर्ती गौळियाची ॥८४॥

ऐकोनि कबिराची वाणी । निवांत राहे वासरमणी ।

उत्तर द्यावया परतोनी । कांहींच मनीं सुचेना ॥८५॥

मग वैकुंठीहून लक्ष्मीपती । देवीस आज्ञा करी पुढती ।

म्हणे तुवां जावोनि सत्वर गतीं । दोघांप्रतीं समजावी ॥८६॥

मग सिंहावरी बैसोनि जाण । अंबा प्रगटली आपण ।

रोहिदासाच्या सदना येऊन । संवाद तिने ऐकिला ॥८७॥

कृष्णभक्ताचा धरोनि पक्ष । देवी स्वमुखें देतसे साक्ष ।

म्हणे रोहिदास हा परमदक्ष । लाविलें लक्ष परब्रह्मीं ॥८८॥

ऐकोनि मायेचें उत्तर । कबीर म्हणे परतीसर ।

आम्ही निधडे वैष्णववीर । तुझें उत्तर नायकों ॥८९॥

सेंदूर शेरण्या इच्छिसी बळी । हें तों न चले मज जवळी ।

पशु बोकडासी घेसी बळी । ऐसें काळीं जाणवो ॥९०॥

ऐसें वदतां श्रीरामभक्त । देवी राहिली मग निवांत ।

परतोनि उत्तर द्यावया निश्चित । कांहींच तीयें सुचेना ॥९१॥

ऐसें जाणोनि देवाधिदेव । मग मध्यस्थ पाठविला शिव ।

म्हणे कबीर आणि रोहिदास वैष्णव । भांडती अपूर्व मज वाटे ॥९२॥

एक रामभक्त असे पूर्ण । कृष्ण उपासक एक जाण ।

निकरें होय त्यांचें भांडण । तरी समजावोन येणें सत्वर ॥९३॥

अवश्य म्हणवोनि शूळपाणी । पातले रोहिदासाचें सदनीं ।

दशभुजा पंचवदनी । प्रगट नयनीं दीसत ॥९४॥

तों कबीर म्हणे थोर रघुपती । रोहिदास अर्चित गोपाळमूर्ती ।

हें देखोनि कैलासपती । काय बोलती तेधवां ॥९५॥

म्हणे वैकुंठवासी नारायण । येथें पाठवी मजलागुन ।

की उभयतांचें तोडोनि भांडण । सख्य करणें निश्चित ॥९६॥

तो वृत्तांत ध्यानासि आणितां प्रीतीं । मजला भासे ऐशा रीतीं ।

कीं सत्य रोहिदासाची भक्ती । कैलासपती म्हणतसे ॥९७॥

ऐकोनि कबीर सक्रोध । मग उत्तर बोलत असे रागे ।

म्हणे शंकरा तुवां घेतला जोग । यथेष्ट भांग भक्षावया ॥९८॥

धत्तूर खावोनि दिवसनिशीं । स्मशानामाजी क्रीडतोंसी ।

उपासना भक्ती कैसी । ते सर्वथा तुजसी नेणवे ॥९९॥

त्वां पूर्वी घेतलें हालाहल । तेव्हां रामनामें झालासि शीतळ ।

तो आठव नसेचि अलुमाळ । आणि भलतेंच बरळ बोलसी ॥१००॥

पंचायतन मांडोनि पाहीं । रोहिदास पूजितो आपलें गृहीं ।

त्या लांचास्तव ये समयीं । दीधली गाहीं शंकरा ॥१॥

ऐसें वदतां भक्त कबीर । विमानीं बैसोनि ऐकती सुर ।

गदगदां हांसती सर्वत्र । जयजयकार करोनि ॥२॥

ऐकोनि कबीराची वाणी । निवांत राहे पिनाकपाणी ।

म्हणे आम्हांसि उत्तर द्यावया कोणी । नव्हता त्रिभुवनीं धुंडितां ॥३॥

मीही श्रीराम उपासक पाही । ऐसें चित्त देतसे गाही ।

परी बोलत ये समयीं । बरळलों कायी कळेना ॥४॥

तें वर्म धरोनि कबीर भक्ते । शब्द शस्त्रें ताडिलें मातें ।

नाहीं सुचत ये समयीं ॥५॥

ऐसें म्हणोनि धूर्जटी । निवांत राहे आपुलें पोटीं ।

कबीर रोहिदास बोलती गोष्टी । ते कर्णसंपुटीं ऐकत ॥६॥

एक म्हणे श्रीराम थोर । तयासि भजे निरंतर ।

एक म्हणे कृष्ण अवतार । तयासि भजे सर्वदा ॥७॥

दोघेही हट्टी वैष्णव वीर । एक मेरु एक मंदर ।

कां एक शशी एक मित्र । भासती साचार या रीतीं ॥८॥

कां एक वासुकी दिसतो खरा । आंवरोनि धरिली वसुंधरा ।

एक चक्षुःश्रवा बरा । पृथ्वीच्या भारा वाहावया ॥९॥

कां एक शुक्र एक गुरु जाण । देवा दैत्यांसि पूज्य मान ।

दोहींचा सारिखा अभिमान । सद्विद्येनें सम जैसें ॥११०॥

भक्ती ज्ञान वैराग्यें तैसे । समान कबीर रोहिदास ।

परी उपासना भिन्न दिसे । हे संवादासी कारण ॥११॥

कां एक नारद एक तुंबर । कीर्तननिष्ठ परिकर ।

कां एक खगपती एक साचार । महा वानर मारुती ॥१२॥

उभयतांचें मन जाणा । नये एकमेकांच्या मना ।

संकट पडिलें जगज्जीवना । मनमोहना श्रीहरी ॥१३॥

म्हणे मध्यस्थ पाठविले थोर थोर । परी कार्य नव्हे अणुमात्र ।

आतां आपण जावोनि तेथवर । चित्त एकत्र करावे ॥१४॥

कुर्‍हाड कातर कुमाणुस । मध्यस्थ पडिले ज्या ठायास ।

तरी तत्काळ तेथें होय नाश । अनर्थास हें मूळ ॥१५॥

सुईसुहागी सुमासपाहीं । मध्यस्थ पडिलीं जिये ठायी ।

तेथें द्वैत नसेचि कांहीं । एकत्र ठायीं मेळविती ॥१६॥

मी विश्वात्मा जगज्जीवन । जाहलों असे भक्ताधीन ।

तैसें दर्शन त्यांसि देऊन । सख्य करीन निश्चित ॥१७॥

ऐसें म्हणोनि शार्ङगधर । गरुडारुढ जाहले सत्वर ।

सांवळा सुकुमार राजीवनेत्र । मुख मनोहर जयाचें ॥१८॥

चतुर्भुज सांवळी मूर्ती । शंख चक्र आयुधें हातीं ।

दिव्य कुंडलें कानीं तळपती । मकराकृती सुढाळ ॥१९॥

ऐशा रीतीं चक्रपाणी । पातले रोहिदासाचें सदनीं ।

नीलोत्पल पुण्यें तये क्षणीं । सुरवर वरुनी टाकिती ॥१२०॥

कबीराचा रक्षावया मान । स्वयेंचि जाहले रघुनंदन ।

हातीं घेतले धनुष्यबाण । सुकुमार ठाण साजिरें ॥२१॥

कबीर उघडी नेत्रपातीं । तों पुढें देखिली आराध्य मूर्ती ।

अष्टही भावो दाटो निश्चिती । मग सीतापती आलिंगिला ॥२२॥

श्रीरामाचें चरणकमळ । लक्षोनि त्यावरी कबीर लोळे ।

म्हणे माझे मनोरथ जाहले सुफळ । धन्य काळ सुदिन हा ॥२३॥

विलोकितां श्रीरामातें । नेत्रीं न लागे पात्यासीं पातें ।

तों नवल वर्तलें देखत देखत । ते ऐका निजभक्त भाविकहो ॥२४॥

देखत देखत कबीरातें । स्वरुप पालटलें श्रीरघुनाथें ।

धनुष्यबाण जाहले गुप्त । मुरली हातें वाजवी ॥२५॥

मुगुट लोपला सत्वरी । मयूर पिच्छें दिसती शिरीं ।

देहुडा पाउली वाजवी मोहरी । कबीर नेत्रीं पाहतसे ॥२६॥

हें रुप देखतां रोहिदास । येवोनि लागला चरणास ।

म्हणे धन्य आजिचा दिवस । हृषीकेश भेटला ॥२७॥

कबीर रोहिदास ते वेळीं । दोघेही धरिले हृदयकमळीं ।

म्हणे द्वैत कल्पना टाकोनि सकळीं । खेळीमेळी असावें ॥२८॥

रामकृष्ण नामाभिधान । अवतार लीला दाखविल्या दोन ।

परी निज तत्त्व तें एकचि पूर्ण । नाहीं भिन्न सर्वथा ॥२९॥

अपर्णा आणि पार्वती । नीळकंठ आणि कैलासपती ।

तेवीं रघुपती आणि कृष्ण मूर्ती । एकत्र चित्तीं आणिजे ॥१३०॥

गरुड आणि खगेश्वर । कां समुद्र रत्‍नाकर ।

तेवीं गोपती आणि रामचंद्र । चित्तीं एकत्र जाणिजे ॥३१॥

इंद्र आणि आखंडल । तीर्थ मिश्रित असे जळ ।

तेवीं रामचंद्र आणि गोपाळ । स्वरुप केवळ एकची ॥३२॥

ऐसें वदतां शेषशायी । कबीर रोहिदास लागले पायीं ।

द्वैतभेद होता देहीं । निरसोनि सर्वही तो गेला ॥३३॥

इतुकें कौतुक देखोनि पाहीं । सुरवर गेले आपुल्या ठायीं ।

अदृश्य जाहले शेषशायी । भक्‍ताचें हृदयीं तेधवां ॥३४॥

भक्‍ताचें हृदयीं जगन्निवास । करितसे अक्षयीवास ।

कबीर आणि रोहिदास । म्हणे धन्य दिवस आजिचा ॥३५॥

स्वामींनीं येथवर केलें येणे । जाहलें संवादासि कारण ।

म्हणवोनि साद्यंत दर्शन । जगज्जीवनें दीधलें ॥३६॥

ऐसें म्हणवोनि ते समयीं । रोहिदास लागला पायीं ।

कबीरें तयासि लवलाहों । उठोनि हृदयीं धरियेलें ॥३७॥

मग पाक निष्पत्ति करोनि जाण । संतांसि घातलें भोजन ।

मुखशुद्धीसि तुळसी पान । निज प्रीतीनें देतसे ॥३८॥

आज्ञा मागोनि रोहिदासासी । कबीर चालिले वाराणसीं ।

रामरुप धरोनि मानसीं । सप्रेम सुखासी पावले ॥३९॥

जाते समयीं कबीरभक्‍त । रोहिदासासि काय सांगत ।

चार्‍ही दैवतें शाळग्रामांत । न पूजी निश्चित सर्वथा ॥४०॥

नर्मद्या बाण शक्‍ति कोडें । सूर्यकांत दैवत गाढे ।

यांच्या पूजनीं न धरी चाड । संप्रदाय पुढें चालेल कीं ॥४१॥

एक विष्णू वांचूनि दैवत पूजिती । तरी तेचि जाणावी व्यभिचार भक्‍ती ।

ही परस्पर आम्हीं ऐकिली कीर्ती । मग सत्वर गती पातलों ॥४२॥

तरी आतां सावध होऊनि मनीं । विष्णुवीण दैवत न पूजी कोणी ।

अवश्य म्हणोनि तये क्षणीं । रोहिदास चरणीं लागला ॥४३॥

तद्देशीं अद्यापवरी जाण । शाळग्राम पुजिती वैष्ण्वजन ।

एकनिष्ठ उपासन । न फांके मन आनाठायीं ॥४४॥

असो कबीर गेला वाराणसीं । रोहिदास पातले घरासी ।

श्रीविष्णुमूर्ति अहर्निशीं । वसे मानसीं सर्वदा ॥४५॥

तंव श्रोते आशंकित होवोनियां । आदरें प्रश्न करिती वक्‍तया ।

म्हणती चर्मकासि साक्षात्कार व्हावया । तपश्चर्या ते कोणती ॥४६॥

त्याचें सकळ जन्मांतर । आम्हांसि निवेदी साचार ।

नीच योनींत वैष्णववीर । कशास्तव साचार जन्मला ॥४७॥

ऐकोनि सज्जनांचें प्रश्नोत्तर । वक्ता आनंदें देतसें उत्तर ।

रामानंद स्वामी साचार । यतिराज थोर पैं होते ॥४८॥

त्यांनीं एक ब्राह्मण ब्रह्मचारी । संप्रदायी केला ते अवसरीं ।

तयासि सांगितली चाकरी । पीठ घरोघरीं मागावें ॥४९॥

भिक्षेचें अन्न अपवित्र निश्चितीं । धर्मशास्त्रीं बोलिली पद्धती ।

तें पोटभर सेवितां ही प्रीतीं । तरी निश्चक्र म्हणती साधक ॥१५०॥

एकानेंच साहित्य दीधलें जरी । तरी तें न ध्यावें आपुलें पदरीं ।

सद्गुरुनें पद्धती लाविली बरी । तैसेंचि करी ब्राह्मण तो ॥५१॥

भिक्षा मागोनि पीठ चुकटी । पाक सिद्धि करितसे मठीं ।

रामानंद क्षुधित होतांचि पोटीं । ध्यानांत जगजेठी आणितसे ॥५२॥

मानसपूजा करुनि तेव्हां । मग नैवेद्य समर्पी देवा ।

उरला प्रसाद आपण ध्यावा । संतोष जीवां मग होय ॥५३॥

ऐसे लोटतां दिवस बहुत । तों विघ्न ओढवलें अकस्मात ।

ब्रह्मचारी नगरांत भिक्षेसि जात । तों पर्जन्य बहुत लागला ॥५४॥

एका वाणियाच्या दुकानापासी । उभा राहिला वळचणीसी ।

जातां नयेचि भिक्षेसी। चिंता मानसीं उद्भवली ॥५५॥

वाणी म्हणे हा द्विजवर । उभा राहिला घटका चार ।

मग दोघांचें साहित्य सत्वर । देतसे साचार ते समयीं ॥५६॥

ते घेवोनियां ब्रह्मचारी । मठासि आला मग सत्वरी ।

पाक निष्पत्ति करोनि बरी । नैवेद्य पात्रीं वाढिला ॥५७॥

रामानंद मानसपूजा करी । परी नैवेद्य सर्वथा न जेवीच श्रीहरी ।

शिष्यांसि पुसतां ते अवसरीं । कृत्रिम परी त्वां केली ॥५८॥

अपवित्र अन्न मिळविलें आंत । यास्तव न जेवी वैकुंठनाथ ।

ब्रह्मचारी होऊनि भयभीत । साकल्य वृत्तांत सांगितला ॥५९॥

आज पर्जन्य वर्षंला भारी । मागतां नयेचि घरोघरीं ।

मग एका व्यवसायानें सत्वरीं । शिधा पदरीं बांधिला ॥१६०॥

त्याची करोनि पाक निष्पत्त । नैवेद्य वाढिला आहे सत्य ।

ब्रह्मचारियाची ऐकोन मात । रामानंद शापित तयासी ॥६१॥

म्हणे आम्हांसि न सांगतां जाण । व्यवसायाचें घेतलें अन्न ।

तरी चर्मक योनि भोगिसी पूर्ण । सत्य प्रमाण हे वाचा ॥६२॥

ब्रह्मचारि लागतसे पायीं । उःशाप बोलावा जी कांहीं ।

सद्गुरु म्हणती ते समयीं । विष्णुभक्त पाहीं तूं होसी ॥६३॥

तुझिया भक्तिस्तव साचार । श्रीहरि देईल साक्षात्कार ।

भक्तिमार्गासि जीर्णोद्धार । तुझ्यानें साचार होईल ॥६४॥

रामानंद बोलतां ऐसें । ब्रह्मचारी लागला पायांस ।

कांहीं लोटतां दिवस । तों नवज्वर देहास जाहला ॥६५॥

तों चरण संपुष्ट तये क्षणीं । नूतन आणूनि दिधलें कोणी ।

ते कोनाडयांत समोरे ठेउनी । पाहातसे नयनीं सर्वदा ॥६६॥

चित्तीं हेत गुंतला जाण । म्हणे मी ल्यालों नाहीं पायतन ।

व्याकुळ होतां सोडिले प्राण । श्रीहरि स्मरण करितांची ॥६७॥

निजकर्माची विचित्र परी । पुढें गेला चर्मक उदरीं ।

नवमास भरतांचि सत्वरी । गर्भा बाहेरी पडियेला ॥६८॥

माता संबोधितां आपण । परी कदापि न करी स्तनपान ।

तंव रामानंदासि वर्तमान । शिष्य येवोन सांगती ॥६९॥

म्हणती तुम्ही शापिला ब्रह्मचारी । तो अवतरला चर्मकाचें उदरीं ।

परी स्तनपान न करीच निर्धारीं । तरी आपण तेथवरी चलावें ॥१७०॥

मग चर्मकाच्या वाडिया बाहेर । उभे ठाकले यतीश्वर ।

लेकरुं आणोनि समोर । तयासि उत्तर बोलती ॥१७॥

आपुल्या निज कर्मगती करुनी । जे प्राप्त जाहली असे योनी ।

तोचि जन्म उत्तम मानुनी । श्रीहरि स्मरणीं लागिजे ॥७२॥

ऐसी आज्ञा होतांचि जाण । बाळकें केलें हास्यवदन ।

आडवें घेतांचि मातेनें । घेतलें स्तन मुखांत ॥७३॥

ऐशा रीतीं तो योगभ्रष्ट जाहला । दिवसें दिवस वाढिन्नला ।

आपुलें कसब करुं लागला । परी अमंगळ त्याला नावडे ॥७४॥

वेगळेंचि खोपट बांधोनी। शूचिर्भूत केलें सारवूनी ।

तुळसी वृंदावन अंगणीं । सडासंमार्जनीं लखलखित ॥७५॥

नित्य स्नान केल्यावीण । सर्वथा न सेवीच जीवन ।

मुखीं अखंड नामस्मरण । संत सज्जनां पूजितसे ॥७६॥

वैष्णव मंदिरासि आलिया । शिधा साहित्य देतसे तयां ।

पाक पात्रें देवोनियां । आपुल्या ठायां जेववीत ॥७७॥

रंगीत चर्म घेऊनि आयतें । यात्रेकर्‍यांची पायतनें सांधित ।

कोणासि नूतन जोडे देत । परोपकारार्थ तेधवां ॥७८॥

ऐशी असतां उदास परी । तों यात्रा जातसें काशीपुरीं ।

त्यांतील बैरागी वैष्णव कोणीतरी । रोहिदासाचें मंदिरीं पातला ॥७९॥

म्हणे अधेला घेऊन त्वरेनें । सांघोनि देयी पायतन ।

रोहिदास कांहींच न घे जाण । म्हणे कृपादान इच्छितसें ॥१८०॥

तुम्ही काशीस जातां सत्वर । तरी भागीरथीसि सांगा नमस्कार ।

एक अधेला घेऊनि साचार । वैष्णव वीर देतसे ॥८१॥

म्हणे सकळ तीर्थांचि स्वामिनी । जिचा उगम श्रीविष्णु चरणीं ।

तिसि हें तुळसीदळ अर्पूनी । प्रसाद घेऊनी या कांहीं ॥८२॥

अवश्य म्हणे रोहिदासासी । मग यात्रेकरु गेले काशीसी ।

स्नान करितां भागीरथीसी । तों स्मरण मानसीं जाहलें ॥८३॥

अधेला सोडिला त्वरित । तों विष्णु कन्येनें काढिला हात ।

आवडीने घेऊनि मुठींत । प्रसाद देत कांकण ॥८४॥

म्हणे रोहिदास भक्‍त विष्णुस्मरणी । तयासि द्यावें हें नेउनी ।

ऐसी उदकांतून निघतां ध्वनी । यात्रेकरी मनीं विस्मित ॥८५॥

रत्‍नजडित सुवर्ण कंकण । जैसें निर्मिलें चतुराननें ।

तें घेऊनि यात्रेकर्‍यानें । दीधलें म्हणोन रोहिदासा ॥८६॥

म्हणे तुझा भाव पाहोनि निश्चितीं । प्रसन्न जाहली भागीरथी ।

अधेला घेवोनियां प्रीतीं । प्रसाद मज हातीं पाठविला ॥८७॥

ते रोहिदासें पाहोनी त्वरित । म्हणे उपाधि कासया धाडिली मातें ।

मी तुझ्या जळें करोनि तृप्त । मग देव्हारीं पूजित कांकण ॥८८॥

रात्रीं उजेड दीपकाचा । तैसाचि प्रकाश पडे त्याचा ।

परी रोहिदास अभिलाष न धरी साचा । तो मेळा वैष्णवांचा पातला ॥८९॥

शिधा साहित्य द्यावयासि पाहीं । मंदिरीं ऐवज नसे कांहीं ।

मग कांकण घेऊनि ते समयीं । नेत लवलाहीं मोडावया ॥१९०॥

सकळ याती माजी साचा । ठक तो सोनार जातीचा ।

काया आणि मनें वाचा । विश्वास त्याचा धरुं नये ॥९१॥

रोहिदास भोळा वैष्णव जाण । सोनारासि अमोल दिधलें कंकण ।

संतांसि पाहिजे जितुकें अन्न । तितुकेंचि जाण मोल मागे ॥९२॥

तृप्त झालिया वैष्णवजन । चित्तीं पावला समाधान ।

म्हणे प्रसाद पाठविला मातेनें । तो सत्कारणीं पूर्ण वेंचला ॥९३॥

ऐसें म्हणतां तये संधीं । तो सोनार अति दुर्बुद्धी ।

त्याणें राजद्वारासि जाऊनि आधीं । करीत उपाधी काय तेव्हां ॥९४॥

तेथील अधिकारी यवन । तयासि दाखवी तो दुर्जन ।

म्हणे रोहिदासें वोपिलें मजलागुन । तरी दुसरें मागून ध्यावें तुम्हीं ॥९५॥

ऐसी कुबुद्धी ऐकूनि कानीं । यवन संतापला तो मनीं ।

मग रोहिदासासि बोलावुनी । म्हणे जोडा आणुनी दे याचा ॥९६॥

विष्णुदास म्हणे तयाप्रती । तीर्थांत श्रेष्ठ भागीरथी ।

तिणें यात्रेकर्‍याचे हातीं । प्रसाद मजप्रती धाडिला ॥९७॥

साधु संत आलिया जाण । घरीं नव्हतें धन धान्य ।

मग सोनारासि विकिलें कांकण । सत्य प्रमाण हे वाचा ॥९८॥

दुसरें कांकण असतें घरीं । तरी तुम्हांसि देतों ये अवसरीं ।

सांगीतले नानापरी । परी विश्वास अंतरीं न ये त्याच्या ॥९९॥

म्हणे याचा जोडा दे आणून । नाहींतरी शिक्षा पावसी जाण ।

संकटीं पडला वैष्णव जन । मग रायासि वचन बोलतसे ॥२००॥

म्हणे कृपा करोनि मजप्रती । मंदिरासि चलावें सत्वरगती ।

तेथें प्रार्थूनि भागीरथी । कंकण निश्चितीं दाखवीन ॥१॥

जोडयास जोडा मिळाला तर । तुम्ही काढोनि ध्यावा सत्वर ।

आणि हेंच भागीरथी नेलें जर । तरी मजवर शब्द नाहीं ॥२॥

अवश्य म्हणोनि ते अवसरीं । राजा सत्वर पातला घरीं ।

मग रोहिदासें विष्णुकुमरी । नानापरी स्तवियेली ॥३॥

म्हणे सकळ तीर्थांची स्वामिनी । माय मज दर्शन दे लवलाहे ।

ऐसें म्हणोनि मोकली धाय । तों कौतुक काय वर्तलें ॥४॥

श्रीविष्णुचे पाय आठवितां चित्तीं । तो काथवटींत प्रगटली भागीरथी ।

शुभ्र उदका पाहतां भूपती । आश्चर्य चित्तीं करितसे ॥५॥

तया जाळांतून निश्चित । कंकण मांडित निघाला हात ।

राजा दुसरें कांकण लावोनि पहात । तो चरित्र अघटित जाहलें ॥६॥

रायाचे हातींचें कांकण निश्चितीं । आपेआप उघडोनि सत्वरगती ।

बैसले भागीरथीचे हातीं । टकमक पाहाती तोंडाकडे ॥७॥

इतुकें कौतुक दाखवोनि जाणा । आदृश्य जाहली तितुकी रचना ।

राजा धांवोनि धरी चरणा । म्हणे व्यर्थ छळणा म्यां केली ॥८॥

जैसी तैसी आर्ष वचनें । संतीं सादर केलीं श्रवणें ।

न्यूनाधिक कायते नेणें । जाणे रुक्मिणीरमण श्रीहरी ॥९॥

बुद्धिवृत्तीस उल्लेख लहरी। तुम्ही देतसां सर्वोपरी ।

महीपतीसि करोनि निमित्तधारी । ग्रंथ विस्तारी वाढविला ॥२१०॥

स्वस्ति श्री भक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ।

प्रेमळ भाविक परिसोत भक्त । द्वादशाध्याय रसाळ हा ॥२११॥ओव्या ॥२११॥अध्याय १२ वा संपूर्णमस्तु॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP