मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ७

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ।

ऐका श्रोतेहो भाविक प्रेमळ । कृपेनें विलोकितां दीनदयाळ ।

मुके होऊनि वाचाळ । वदतसे सकळ शास्त्रार्थ ॥१॥

श्रीहरिचेनि कृपाबळें । महापर्वत उल्लंघी पांगुळ ।

बरड गोटे जे केवळ । परीस तत्काळ ते होती ॥२॥

खैर बाभुळीचा तरु । तोही होईल कल्पतरु ।

जरी कृपा करिती जगद्गुरु । होईल संसारु सुखाचा ॥३॥

महाविष प्राशितांच जाण । तें होईल अमृतासमान ।

खडे होतील चिंतामण । करुणाघन तुष्टल्या ॥४॥

मारिता वैरी जो दुर्धर । तोही होईल लोभापर ।

पळोनि जातील यमकिंकर । शार्ङगधर रक्षी जया ॥५॥

उदकांत बुडतां सत्वरी । तरी कूर्मरुपें रक्षिल श्रीहरी ।

तयासि घेऊन पृष्टीवरी । पैलतीरीं काढिल ॥६॥

त्याच्या कृपेनें निश्चिंत । न होय तेंचि घडोनि येत ।

ऐसी मज आली प्रचित । अनुभवें वृत्तांत अवधारा ॥७॥

बुद्धिहीन मतिहीन निश्चितीं । ऐसें सर्वत्र लोक जाणती ।

आणि ग्रंथ वदवितो मूढा हातीं । लाघवी श्रीपती म्हणोनिया ॥८॥

मागिले अध्यायीं कथा सुंदर । चांगदेवें पाहिलें पंढरपुर ।

मग प्रसन्न होऊनि रुक्मिणीवर । दीधला मंत्र षडक्षरी ॥९॥

देवासि पुसोनि ते अवसरी । कुटुंबासहित आले घरीं ।

जागृती सुषुप्तीं स्वप्नांतरीं । भरला अंतरीं पांडुरंग ॥१०॥

श्रवण मनन हरिकीर्तन । नित्य होतसे वेदांत श्रवण ।

ऐकावयासि येती जन । निज प्रीतीनें आपुल्या ॥११॥

चारा ध्यावया विहंगम याती । स्वइच्छेनें आपुल्या जाती ।

कीं शर्करेपासी निज प्रीतीं । मुंगिया मिळती अनेक ॥१२॥

ना तरीं उगवतां रोहिणीकांत । चकोर आदरें तयासि लक्षित ।

कीं उदयासि येतां आदित्य । विकास पावत कमळिणी ॥१३॥

कां नृपवर बैसतां जये क्षितीं । तेथेंचि मिळे सैन्य संपत्ती ।

कीं दातयापासीं याचक येती । कामना चित्तीं धरुनियां ॥१४॥

तैशाच रीतीं भाविक प्रेमळ । सर्वदा वसती चांगया जवळ ।

श्रवण मनन सर्वकाळ । करितां वेळ कंठिंती ॥१५॥

कांहीं एक लोटतां दिवस । तों चरित्र वर्तलें अति सुरस ।

चांगदेव पूजा करितां मानस । तों पंढरीनिवास पातले ॥१६॥

साक्षात परब्रह्म गुणमूर्ती । पुढें देखतसे अवचितीं ।

शंख चक्रें आयुधें हातीं । मकराकृती कुंडलें ॥१७॥

कासेसि दिव्य पीतांबर । श्रीमुख साजिरें मनोहर ।

चरणीं नेपुरें वांकी तोडर । ठाण सुकुमार साजिरें ॥१८॥

ऐसें परब्रह्म घन सांवळें । रुप प्रगटलें तये वेळें ।

चांगया पाहत उघडोनि डोळे । चरणकमळें लक्षोनियां ॥१९॥

सर्वोपचारें पूजिला हरी । संतोष जाहला निज अंतरीं ।

तों पांडुरंग म्हणती ते अवसरीं । तूं गोदातीरीं राहे आतां ॥२०॥

चांगदेव म्हणतसे अधोक्षजा । म्यां नित्य करावी कोणाची पूजा ।

जेथें सप्रेम भाव बैसेल माझा । गरुडध्वजा तें सांग ॥२१॥

ऐसें पुसतांचि भक्त प्रेमळ । मग प्रसन्न झाले घननीळ ।

मूर्ति केशवाची गंडकी शीळ । प्रगट तत्काळ ते झाली ॥२२॥

तों पांडुरंग बोले ते अवसरीं । या मूर्ति संचरलों मी हरी ।

तरी तुवां राहोनि । सर्वोपचारीं पूजावें ॥२३॥

ऐशा रीतीं बोलोनि वचन । देव पावलें अंतर्धान ।

कीं चांगयाचें हृदयभुवन । तेथें लपोन राहिला ॥२४॥

मग सकळ ग्रामवासी नरा । चांगदेव पुसती त्या अवसरा ।

आम्ही घेऊन सहपरिवारा । गोदातीरा वास करुं ॥२५॥

ऐसें पुसतां योगेश्वर । क्षेत्रवासी चिंतातुर ।

म्हणती आम्हांसी टाकूनि जातां सत्वर । तरी नाहीं आधार संसारी ॥२६॥

ऐशी ऐकोनियां ग्लांती । मग चांगदेव तयांसि अभय देती ।

म्हणती तुम्हीं इच्छा धराल जे चित्तीं । ते मनोरथ पुरती तत्काळ ॥२७॥

मग आपुल्या हस्तें साचार । तेथें स्थापिला प्रस्तर ।

जे जैसा नवस कल्पिती नर । तो मनोरथ पुरे तयांचा ॥२८॥

ऐसा हा चमत्कार पाहीं । अद्यापि असें तया ठायीं ।

जैसा ज्याचा भाव पाहीं । तैसा घडोनि सर्वही ये तयां ॥२९॥

यापरी जे क्षेत्रवासी जन । केलें तयांचें समाधान ।

मग कुटुंबासह वर्तमान । चांगदेव तेथोन निघाले ॥३०॥

बोळवावयासि योगेश्वर । सकल निघाले लहान थोर ।

रुदन करिती नारीनर । सप्रेम अंतर जयांचें ॥३१॥

म्हणती स्वामी जाताति येथून । आम्ही झालों भाग्यहिन ।

गोदातीरींचे सभाग्य जन । उघडलें प्राक्तन तयांचें ॥३२॥

ऐशा रीती वदोनि गोष्टी । ग्रामवासी होताति कष्टी ।

जैसा मथुरेसि जातां जगजेठी । गोकुळ हिंपुटी होतसे ॥३३॥

जैसा देव तैसा भक्त । सर्वथा अंतर नसे यांत ।

जैसे पुष्प नामें मकरंद तद्वत । एकमेकांत असती ॥३४॥

हाटक आणि त्याची कांती । नामें दोन परी एकचि असती ।

कां मुक्ताफळ आणि ढाळ निश्चितीं । द्वैत त्यांजप्रती असेना ॥३५॥

भास्कर आणि त्याचें किरण । एकचि परी नामें दोन ।

अमृत आणि स्वाद जाण । नामाभिधानें दोन जैसीं ॥३६॥

चंद्रमंडळीं अमृत निश्चित । कीं समुद्रामाजीं कंल्लोळ भासत ।

कीं गाईचे पोटीं दूध राहत । तैसे देवभक्त समरस पैं ॥३७॥

भक्तीं वाढवितां देवाचा महिमा । देवें दासासि दीधला प्रेमा ।

तेणें सुकाळ झाला तुम्हां आम्हां । चरित्र नामा ऐकावया ॥३८॥

असो नारायण डोहींच्या नारीनरां । चांगयाचा वियोग न साहे अंतरा ।

समस्तीं बोळवोनि त्या अवसरा । परतोनि घरांते आले ॥३९॥

प्रस्तर स्थापितां योगेश्वरें । तेथें सद्भाव धरितां नरें ।

त्याचा मनोरथ तत्काळ पुरे । थोर चमत्कार ते ठायीं ॥४०॥

इकडे सवें घेऊनि केशव मूर्ती । चांगदेव पथ क्रमिती ।

ध्यानीं मनीं रुक्मिणीपती । वेधली वृत्ती सर्वदा ॥४१॥

कुटुंबासह वर्तमान । पुण्यस्तंभासि आले त्वरेन ।

होता गोदेचें दर्शन । साष्टांग नमन पैं केलें ॥४२॥

परम अनुताप धरोनि चित्तीं । स्नान केलें पुण्य सरितीं ।

म्हणे भवपाश तोडूनि सत्वर गतीं । सायुज्य मुक्‍ती दे माते ॥४३॥

श्रीविष्णुचरणा पासोनि जाण । तुझा उगम झाला पूर्ण ।

म्हणोंनि मस्तकीं कैलासरमण । निज प्रीतीनें धरीतसे ॥४४॥

गौतम मुनि श्रेष्ठ थोर । त्याणें प्रसन्न केला श्रीशंकर ।

मृत्यु लोकासि आणिलें सत्वर । जगदुद्धार करावया ॥४५॥

तुझें दृष्टीसि पडतां नीर । शत जन्मांचें दुरित हरे ।

स्नान करितां जन्म सहस्त्र । होतसे नर शुद्ध तेव्हां ॥४६॥

ऐशी गोदा जगदुद्धारिणी । दैवें करोनि देखिला नयनीं ।

मज कृपादृष्टीं विलोकुनी । आपुले उगमीं ठाव द्यावा ॥४७॥

ऐशा परी करोनि स्तुती । स्नान सारिलें सत्वर गतीं ।

नित्य नेम सारोनि निश्चितीं । दर्शना जाती शिवाच्या ॥४८॥

सोमतीर्थीं करोनि स्नान । घेतलें रामेश्वराचें दर्शन ।

षोडशोपचारें केलें पूजन । निज प्रीतीनें आपुल्या ॥४९॥

बिल्वपत्राची लाखोली । वाहोनि अर्चिला चंद्रमौळी ।

मग वाहोनियां पुष्पांजळी । संप्रदाय मेळीं बैसले ॥५०॥

तों पाकसिद्धि झाली समस्त । मग पंचमहा यज्ञ करीत ।

पंक्‍तीसि घेऊनि ब्राह्मण अतीत । भोजन सारित मग तेव्हां ॥५१॥

श्रीपांडुरंग आज्ञा वंदोनि शिरीं । मठ बांधिला गोदातीरीं ।

श्रीकेशवराजाची मूर्ति साजिरी । स्थापन करी ते ठायीं ॥५२॥

ब्राह्मण बोलावुनि थोर थोर । अभिषेक केला वेदमंत्रें ।

पंचामृत नाना उपचारें । वैकुंठ विहार न्हाणिला ॥५३॥

दिव्य वस्त्रें परिधान । लेवविले अळंकार भूषण ।

गंधाक्षता सुमन चंदन । धूपदीप नीरांजन वोंवाळिती ॥५४॥

दिव्य मिष्टान्नें निर्मोनि नाना । महा नैवेद्य समर्पिला जाणा ।

ठेवोनि विडे सुवर्ण दक्षिणा । मग प्रदक्षिणा करिताती ॥५५॥

ऐसा पूजोनि वैकुंठनाथ । चांगया घाली दंडवत ।

म्हणे सेवाहीन मी शरणागत । उद्धरीं पतित केशवा ॥५६॥

मूर्ति स्थापिली तो सुदिन । केलें ब्राह्मण संतर्पण ।

नाना परीचीं मिष्टान्नें । द्विजां कारणें वाढिलीं ॥५७॥

विडे दक्षिणा देऊनि सत्वर । संतुष्ट केले द्विजवर ।

चांगयाचा कीर्तिघोष थोर । लोक सर्वत्र ऐकती ॥५८॥

सत्कीर्ति ऐकोनि निश्चित । देशोदेशींची यात्रा येत ।

दुर्बळ आणि धनवंत । तयांचे आर्त पुरती तेथें ॥५९॥

पहिला आराधिला होता शिव । तेव्हां अभंगीं बोलिलें अपूर्व ।

चांगा वटेश्वर घातलें नांव । भक्त वैष्णव जाणती तें ॥६०॥

आतां पुण्यस्तंभीं गोदातीरीं । केशवाची मूर्ति स्थापिली यावरी ।

चांगा केशवदास निर्धारी । कवित्वांतरीं बोलिले ॥६१॥

श्रीपांडुरंग होऊनि प्रसन्न । षडक्षरी मंत्र दीधला जाण ।

तेंचि करिती अनुष्ठान । साक्षात्कार तेणें येतसे ॥६२॥

लोक बोलती सर्वत्र । मागुतीं प्रगटला वटेश्वर ।

त्यासि प्रसन्न होऊनि रुक्मिणीवर । संजीवनी मंत्र दीधला ॥६३॥

त्याच्या आशास्तव निश्चितीं । कामनिक लोक दुरुनि येती ।

त्यांचे मनोरथ पूर्ण होती । यास्तव महंती वाढली ॥६४॥

ऐशा स्थितीनें तत्त्वता । देशोदेशीं फांकली वार्ता ।

तों रामराजा देवगिरीं होता । त्यानें ही कथा ऐकिली ॥६५॥

मग परम सद्भाव धरोनि अंतरीं । दर्शनासि आला ते अवसरीं ।

स्तुति करोनि नानापरी । नमस्कार करी साष्टांग ॥६६॥

कांहीं चमत्कार पाहावा नयनीं । ऐसी इच्छा तयाच्या मनीं ।

मग कर जोडोनि तयेक्षणीं । स्वरुप नयनीं लक्षीतसे ॥६७॥

तंव चांगदेव म्हणती तयाकारणें । सैन्य समुदाय घेऊनि येणें ।

ऐसी ऐकूनि सिद्धाची वचनें । पत्र लिहुन पाठवित ॥६८॥

राजा अज्ञापितां निश्चित । मंत्री सैन्य घेऊनि येत ।

चांगदेव दाखवावया प्रचीत । आमंत्रण देत त्यालागीं ॥६९॥

पाकनिष्पत्ति न करितां घरीं । पंक्ति बैसविल्या त्या अवसरीं ।

तों षड्‌रस अन्नें पात्रावरी । दिसती बरी घवघवित ॥७०॥

सहस्त्रावरी बैसल्या पंक्ती । तितुक्यांची एकदांचि जाहली तृप्ती ।

जें जें रुचे तेचि सेविती । आश्चर्य करिती मनांत ॥७१॥

मग करशुद्धि घेतांचि सकळांनीं । विडे दीधले त्रयोदश गुणी ।

रामराजा परम कौतुक मानी । मृदु वचनीं बोलतसे ॥७२॥

म्हणे धन्य आजिचा सुदिन । जाहले स्वामीचें दर्शन ।

आपण ईश्वर अंश पूर्ण । जगदुद्धरण व्हावया ॥७३॥

जैसी देवाची अघटित लीला । तैसीच संताचे आंगीं कळा ।

भिन्न भाव नसेचि यांजला । अनुभव पाहिला बहुतांनी ॥७४॥

मग हात जोडोनि नृपवर । विनंति करितसे साचार ।

आतां उपवनीं राहावें सत्वर । येथूनि गोदातीर सन्निध असे ॥७५॥

ऐसी विज्ञप्ति करितां जाण । मान दीधला तयाच्या वचना ।

लोक कौतुक पाहताति नाना । आश्चर्य मना वाटतसे ॥७६॥

मग कुटुंबासह वर्तमान । बागांत राहिले येऊनि ।

सोमतीर्थी करोनि स्नान । देवार्चन करिताती ॥७७॥

राजा करोनि नमस्कार । आपुल्या स्थळासि गेला सत्वर ।

तो अद्भुत वर्तलें चरित्र । तें ऐका सादर भाविकहो ॥७८॥

पुण्य स्तंभीं राहतां त्यांसी । द्वादश वर्षे लोटलीं ऐसीं ।

आषाढी कार्तिकी पंढरीसी । नित्य नेमेसी जाताती ॥७९॥

तंव कोणे एके दिवसी । मेळवूनि सकळ संतऋषी ।

केशवदास म्हणतसे त्यासी । आम्हीं समाधीसी बैसतों ॥८०॥

जाणोनि सिद्धाचें मनोगत । संप्रदायी साहित्य करित ।

ब्राह्मण संतर्पण नित्य होत । सुदिन मूहूर्त पाहिला ॥८१॥

मिळोनियां वैष्णव भक्त । कीर्तन समारंभ होत ।

दिंडया पताका घेऊनि तेथें । हरिदास गर्जत नाम घोषे ॥८२॥

चांगदेव बैसले दिव्यसनीं । पूजा होतसे प्रतिदिनीं ।

नानापरीची पूजा घेऊनी । दर्शना लागोनी लोक येती ॥८३॥

समाधिस्थ होतसे योगेश्वर । मात प्रगटली दुरचादुर ।

पाहावयासि यात्रा मिळाली फार । तों अघटित चरित्र वर्तलें ॥८४॥

तों कल्याण कलबुर्गी साचार । शंकर नामें एक द्विजवर ।

तयापासी धन होतें फार । परी पोटीं पुत्र नसेचि ॥८५॥

पोटीं न होतां पुत्रसंतान । मग तो पावला मृत्युसदन ।

तरुण स्त्रियेसि आलें न्हाण । दुःख दारुण मातेसी ॥८६॥

धर्म पुत्र घालिनि निश्चितीं । उत्तर कार्य संपादिती ।

निजपुत्राच्या घेऊनि अस्थी । शोके निघती महायात्रे ॥८७॥

सासू सुना दोघी जणी । निघत्या जाहल्या तये क्षणीं ।

खर्चीस हुंडी करोनि त्यांनीं । अश्व वहनी चालिल्या ॥८८॥

पंथ क्रमितां त्यांजकारणें । पुण्य स्तंभा आल्या जाण ।

ब्राह्मणचे घरीं बिर्‍हाड घेऊन । राहिल्या त्रिदिन त्याठायीं ॥८९॥

तों नारळ बुका फुलें तुळसी । लोक पूजा घेऊनि ऐसी ।

चांगदेव बैसतसे समाधीसी । जाती दर्शनासी तयाच्या ॥९०॥

तों सासू सुना दोघीजणी । उतरल्या होत्या एके सदनीं ।

सोनिका निघे तये क्षणीं । दर्शना लागुनी स्वामींच्या ॥९१॥

तों सुन सासूसि बोले उत्तर । मी येतें तुम्हा बरोबर ।

वडिल म्हणे योगेश्वर । कोपेल तुजवर अवचिता ॥९२॥

तुझे उतरले नाहींत केश । नमस्कार करितां होईल स्पर्श ।

तेव्हां कोपेल महापुरुष । तरी मग कैसे करावे ॥९३॥

ऐसे शिकवितां नानापरी । परी ते नाइकेचि निर्द्धारीं ।

गेली सासूच्या बरोबरी । समज अंतरीं असेना ॥९४॥

दर्शनास येती नारीनर । गेल्या तयांच्या बरोबर ।

दाटीत जावोनि सत्वर । योगेश्वर नमियेला ॥९५॥

यात्रेकरिणीचे सुनेप्रती । चांगदेव आशीर्वाद देती ।

माते तूं होय पुत्रवंती । ऐकोनि हांसती ब्राह्मण ॥९६॥

म्हणती खडकीं वर्षला मेघराज । की अग्निकुंडीं पडिलेबीज ।

तैसें स्वामी अनुचित बोलिले आज । नाहीं काज विचारलें ॥९७॥

इंधन नसतां अग्नि फुंकिला । कीं स्नेहांवीण दीप सरसाविला ।

तेवीं स्वामींचा आशीर्वाद व्यर्थ गेला । ऐसें आम्हांला वाटतें ॥९८॥

मग सोनिकेसि पुसती योगेश्वर । हें काय म्हणती द्विजवर ।

तो सांगावा आद्यंत विचार । इतुकें उत्तर बोलिले ॥९९॥

ऐसें पुसतांचि वचन । दोघीजणीं करिती रुदन ।

गहिंवरें कंठ दाटला पूर्ण । भरले नयन अश्रुपाते ॥१००॥

सोनाई सांगे तये क्षणी । कल्याण कलबुर्गा ते ठिकाणीं ।

आम्ही होतों बहुतदिनीं । तों गेला मरोनि सुपुत्र तेथें ॥१॥

संसारीं येऊनि साचार । पाहिलें दुःखाचें डोंगर ।

पुत्राचे पोटीं नसेचि पोर । संतान समग्र बुडालें ॥२॥

मग सासू सुना दोघीजणी । सत्वर निघालों तेथूनीं ।

जोगाईचे अंबें म्हणती जनी । तये स्थानीं राहिलों ॥३॥

तेथेंही चैन न पडेंचि चित्तां । मग महायात्रेसि चालिलों आतां ।

ऐसी जन्मांतरींची कथा । स्वामीसि आतां निवेदिली ॥४॥

यजुर्वेद शाखा आमुची निश्चित्तीं । सवें घेतल्या पुत्राच्या अस्थी ।

गया वर्जन करावया प्रीतीं । हेच चित्तीं उपजला ॥५॥

काशीपुरासि जातां सत्वर । वाटेसि लागलें गोदातीर ।

तेथें राहोनि तीन रात्र । तीर्थविधि साचार करावा ॥६॥

स्वामींची सत्कीर्ति ऐकून । दर्शनासि आलें मी येथें ।

तेव्हां सुनेसि वर्जिले बहुत । परी नाइकेचि मात सर्वथा ॥७॥

येथें येऊनि साचार । तुम्हांसि केला नमस्कार ।

तो मुखांतुनि निघालें अक्षर । होईल पुत्र तुजलागीं ॥८॥

तें घडेल कैसे निश्चितीं । विधवेसि केवि होईल संतती ।

वृत्तांत सांगोनि ऐशा रीतीं । अश्रु वाहती नेत्रांतूनीं ॥९॥

ऐकूनि सोनाईचें उत्तर । दयेनें द्रवला योगेश्वर ।

म्हणे मी नेणतां दीधला वर । हें असत्य उत्तर न होय ॥११०॥

म्हणे पंढरीशा रुक्मिणीपती । तूं साच करी वचनोक्तीं ।

ऐसी देवासि भाकोनि ग्लांती । ब्राह्मणीसी बोलती काय तेव्हां ॥११॥

पुत्राच्या अस्थि बरोबर । त्या तूं घेऊनि येई सत्वर ।

ऐसें म्हणोनि योगेश्वर । अघटित चरित्र आरंभिले ॥१२॥

विद्वान्‌ पंडित शास्त्री निपुण । क्षेत्रवासी मेळविले ब्राह्मण ।

त्यांसि सांगती अशीर्वचन । नेणतपणें बोलिलों मी ॥१३॥

तें सत्य केल्यावीण निश्चित । होता नये समाधिस्थ ।

म्हणवोनि साक्ष ठेवूनि तुम्हांतें । वरद पुत्र ईतें देतसों ॥१४॥

मग उदकांत अस्थि प्रक्षाळुनी । मंत्र बोलिले संजीवनी ।

विधवेसि पाजिलें तयेक्षणीं । पाहती नयनी जनलोक ॥१५॥

सत्पुरुषाची अघटित चर्या । तत्काळ पातली गर्भच्छाया ।

म्हणे देवाधिदेवा पंढरीराया । करावी दया इजवरी ॥१६॥

ऐसी बोलतां वचनोक्ती । विधवा दिसे सौभाग्यवती ।

मुखग्लांती आगोदर होती । ते पालटली वृत्ती तत्काळ ॥१७॥

ऐसें देखोनि सकळ चरित्र । मग घरासि गेले द्विजवर ।

मागे बोलती निंद्य उत्तर । आतां वर्णसंकर मांडिला ॥१८॥

चांगदेवे अघटित केली युक्ती । विधवा दिसते सौभाग्यवती ।

विठ्ठल सुवासिनी तीस म्हणती । अद्यापि वदती हे असे ॥१९॥

तंव एक म्हणे टाणी टोणी । हा जाण तो मंत्र मोहिनी ।

नाना साबरी मंत्र शिकोनी । अघटित करणी दाखवितो ॥१२०॥

कोणी कुटिळं म्हणे दुर्मती । गर्भ संभवे त्याचे हातीं ।

परी स्वायातींत सरेल कैशा रींतीं । बरवे चित्तीं विचारा ॥२१॥

ऐसें क्षेत्रवासी ब्राह्मण । मागें पुढें निंदिती जाण ।

परी संमुखं न बोलवे वचन । घुबडा प्रमाणें ते नर ॥२२॥

आंधारीं बोटें मोडी जो नर । त्यावरी सर्वथा न जाय शूर ।

तैसें द्विजांचें जाणोनि अंतर । योगेश्वर न बोले ॥२३॥

म्हणती बाळकाची वाट धरोनि आधीं । मग आपण बैसावें समाधीं ।

नाहीं तरी हे दुर्बुद्धी । नानापवादीं पाडतील ॥२४॥

भजनीं तरले वैष्णव जन । काळ मृत्यु तयां आधीन ।

जयांसि नाहीं जन्ममरण । परी लोकाकारणें भासत ॥२५॥

मग सासू सुना दोघीजणी । पुण्यस्तंभी राहविल्या त्यांणी ।

गर्भासि नवमास भरतां ते क्षणीं । तो सुलक्षणी पुत्र जन्मला ॥२६॥

पांडुरंगाचा वरद पुत्र । जाहला ऐकूनि योगेश्वर ।

महा उत्साह केला थोर । दानें द्विजवर तोषविले ॥२७॥

बारावें दिवसीं करोनि बारसें । विठ्ठल नाम ठेविलें त्यास ।

थोर झाला दिवसेंदिवस । आनंद मातेस वाटला ॥२८॥

गर्भ संभवल्या पासून विधवेस । आपुले मठीं ठेविले होतें तीस ।

परोपकारी महापुरुष । म्हणोनि तीस प्रतिपाळी ॥२९॥

श्रीपांडुरंग कृपेचेनि बळें । पांचा वर्षांत आला बाळ ।

आतां व्रतबंध करावा तत्काळ । भक्त प्रेमळ बोलतसे ॥१३०॥

रांडकीचे पोटीं जाहला पुत्र । ऐसें जाणती सर्वत्र ।

म्हणती समर्थे केला अंगीकार । न चले विचार कोणाचा ॥३१॥

परी व्रतबंध करावया कारण । विप्र सर्वथा न घालिती मन ।

अंतर साक्ष चांगदेव पूर्ण । मनोगत जाणे सकळांचें ॥३२॥

म्हणती घेऊनि सहपरिवारा । आपण जावें पंढरपुरा ।

पांडुरंग दीनाचा सोयरा । वृत्तांत बरा त्यासि सांगूं ॥३३॥

मग टाळ विणे मृदंग सुस्वरीं । कीर्तन करीत सप्रेम गजरीं ।

चांगदेव आपुले सहपरिवारीं । क्षेत्र पंढरीं पावले ॥३४॥

चंद्रभागेचें करोनि स्नान । घेतलें पुंडलीकाचें दर्शन ।

मग क्षेत्र प्रदक्षिणा करुन । राउळा त्वरेनें प्रवेशले ॥३५॥

गरुडा पारीं लोटांगण । चांगया घालीत प्रेमें करुन ।

मग अंतर गाभारा रिघोन । रुप सगुण पाहतसे ॥३६॥

ठाण सुकुमार साजिरें । श्रीमुख दिसतें सुंदर ।

कटीं ठेविले दोन्ही कर । कांसे पीतांबर वेष्टिला ॥३७॥

समपाय विटेवरी धनसांवळा । गळा वैजयंती माळा ।

सर्वांगीं बुका उधळला । मुगुटीं रत्‍नकळा फांकती ॥३८॥

ऐसें परब्रह्म रुप सगुण । चांगया आलिंगीत निज प्रीतीनें ।

समूळ विसरोनि देहभान । सद्भावें चरण वंदिले ॥३९॥

मग पुसतसे दिनदयाळ । वर्तमान आहे की कुशळ ।

चांगया म्हणे तये वेळे । कृपेचेनि बळें आपुल्या ॥१४०॥

विधवेसि दीधला वरदपुत्र । तो घातला विठोबाच्या पायांवर ।

म्हणे कृपा असों द्या याजवर । मग रुक्मिणीवर अवश्य म्हणे ॥४१॥

तुझा भरंवसा धरोनि श्रीहरी । इसीं वर दीधला ऐशापरी ।

लोकापवादावीण संसारीं । पुत्रापौत्र घरीं पहाशील ॥४२॥

ऐकूनि म्हणे करुणाधन । मी तुझें वचन सिद्धीस नेईन ।

तुमच्या वचनास्तव जाण । अवतार घेणें मजलागीं ॥४३॥

मत्स्य कच्छ आणि सूकर । जाहलों भक्ताचेंनि कैवारें ।

प्रल्हादें आठव करितां साचार । खांबांत सत्वर प्रगटलों ॥४४॥

मज आठवितां आखंडल । त्रिविक्रम जाहलों घननीळ ।

बळीस दान मागोनि सकळ । द्वारपाळ जाहलों मी ॥४५॥

जमदग्नीच्या वचनांसाठी । माता मारिली उठाउठी ।

एकवीस वेळां निःक्षत्रिय सृष्टी । करीं जगजेठी निजांगें ॥४६॥

राम अवतारीं दशानन । मारोनि स्थापिला बिभीषण ।

तयासि देऊनि लंकाभुवन । चिरंजीव जाण तो केला ॥४७॥

मग श्रीकृष्ण अवतार घेऊनि पाही । निजांगें नंदाच्या राखिल्या गायी ।

पांडवांसि संकट पडतां कांहीं । नाना उपायीं राखिलें त्यां ॥४८॥

आतां पुंडलीकाची निष्ठा मोठी । पाहोनि आलों त्याच्या भेटी ।

पाय जोडोनि विटे नेहटी । भीमातटीं उभा असें ॥४९॥

नामा शिंपीं भक्त प्रेमळ । संकटीं पडतां तात्काळ ।

ओढया नागनाथीं फिरलें देऊळ । पुरविले लळे तयाचे ॥१५०॥

ज्ञानदेवाच्या वचनासाठीं । भिंत चालविली उठाउठी ।

हे तरी तुवां ऐकिली गोष्टीं । कर्ण संपुटीं चांगया ॥५१॥

तैशा रीतीं मी घननीळ । वरद पुत्राचें पुरवीन लळे ।

तूं चिंता नको करुं अळुमात्र । दीनदयाळ म्हणतसे ॥५२॥

ऐसें बोलतां रुक्मिणीपती । चांगदेव सद्गदीत झाले चित्तीं ।

आनंदाश्रु नेत्रीं वाहती । संतोष चित्तीं न समाये ॥५३॥

मग मस्तक ठेऊनि चरणावर । देऊळा बाहेर आले सत्वर ।

वाळवंटीं उतरले साचार । कीर्तन गजर होतसे ॥५४॥

प्रातःकाळ होतांचि निश्चितीं । चंद्रभागेसि स्नान करिती ।

नित्य नेम सारोनि सहज स्थितीं । काय करिती मग तेव्हां ॥५५॥

क्षेत्रवासी धरामर । तें बोलावूनियां समग्र ।

तयांसि पुसती विचार । मधुरोत्तरें करुनियां ॥५६॥

आम्हीं विधवेसि दीधलें आशीर्वचन । वरद पुत्र जाहला तेणें ।

याचा व्रतबंध तुम्हीं करणें । वचनासि मान देवूनियां ॥५७॥

ऐसी सिद्धाची वचनोक्ती । ऐकोनि ब्राह्मण धिक्कारिती ।

विधवेपोटीं जाहली संतती । कैसा स्वयातीं सरेल ॥५८॥

अविधि कर्माचें परम दूषण । सर्वथा नव्हे आमुच्यानें ।

ऐसें बोलोनि ते ब्राह्मण । गेले उठोनि सकळिक ॥५९॥

एक म्हणती भोगिलें खळा । तेणेंचि गर्भ संभवला ।

एक म्हणती सिद्धाची कळा । अघटित लीला नेणवे ॥१६०॥

एक म्हणती चांगा वैष्णव वीर । जाहला मरुद्गणाचा अवतार ।

त्यानें मांडिला वर्णसंकर । ऐसें साचार वाटतें ॥६१॥

एक म्हणती गोदातीरीं । यासी वाळित घातलें द्विजवरीं ।

भाळ्याभोळ्यांची क्षेत्र पंढरी । मग आले सत्वरि या ठायीं ॥६२॥

ऐसें म्हणोनि ते ब्राह्मण । गेले उठोनि सकळ जन ।

पुत्राची माता करी रुदन । पाहोनि वदन चांगयाचे ॥६३॥

तिजला आश्वासित योगेश्वर । चिंत्ता न करावी अणुमात्र ।

शिरीं असतां रुक्मिणीवर । अरिष्ट दुर्धर निरसील तो ॥६४॥

तूं लोकापवादा विरहित होउनी । पुत्रपौत्र देखसील नयनीं ।

ऐसी वदतां वरदवाणी । संतोष मनीं तीस झाला ॥६५॥

चांगदेव म्हणे ते अवसरीं । शत ब्राह्मणांचा स्वयंपाक करी ।

आजि भोजनासि येतील श्रीहरी । निश्चय अंतरीं असों दे ॥६६॥

ऐसें तिजला सांगोनि निश्चित । मग आपण गेले राउळांत ।

कीर्तन करोनि प्रेम भरित । मग रुक्मिणीकांत आळविला ॥६७॥

म्हणे देवाधिदेवा जगजेठी । आजि भोजनासि चलावें वाळवंटीं ।

वरद पुत्रासि कृपादृष्टीं । पाहें संकटीं जगदीशा ॥६८॥

तूं अनाथनाथ भक्तकैवारी । ऐसें बोलती चराचरीं ।

तें वचन आतां सांच करीं । ऐकोनि श्रीहरी अवश्य म्हणे ॥६९॥

इकडे वरदपुत्राची माता सत्वरी । चांगयाची आज्ञा वंदोनि शिरीं ।

पाकनिष्पत्ति सारोनि बरी । ब्राह्मण पाचांरी भोजनां ॥१७०॥

ऐकोनि धरामर बोलती पाहे । तुज तों वाळीत पाडिलें आहे ।

कासया अन्न रांधिलें आहे । कोणी न खाय या लागीं ॥७१॥

भ्रतार गेलिया मृत्युसदनीं । पुत्र प्रसवलीस कैसेनी ।

तो तूं दाखवितां जना लागोनी । लज्जा मनीं तुज न ये ॥७२॥

खळांचे शब्द ऐकोनि कानीं । लज्जित जाहली ते ब्राह्मणी ।

चांगयाचे पाय आठवितां मनीं । म्हणे सद्गुरु धांवोनि ये आतां ॥७३॥

ऐसें चिंतितां मनांत । तों केशवदास चांगया येत ।

म्हणे भोजनासि आले पंढरीनाथ । करा साहित्य लवलाहीं ॥७४॥

चांगदेवाचा भक्‍तिभाव । राउळांतून आले देव ।

दर्शनासि जाति भक्तवैष्णव । तों देवाधिदेव तेथें नाहीं ॥७५॥

एक म्हणती पळोनिया गेला । एक म्हणती चांगयानें नेला ।

देखोनि त्याची सप्रेम कळा । वाळवंटीं गेला जेवावया ॥७६॥

जयासि नाहीं भावभक्ती । म्हणती कैसी चालेल पाषाण मूर्ती ।

वाळवंटीं येउनि पाहती । तों तेथेंहीं त्यांजप्रतीं दिसेना ॥७७॥

क्षेत्रवाई ब्राह्मण मिळोन पाहे । म्हणती विठोबा जाहला काय ।

आतां आम्हांसि कोण आहे । म्हणोनि धाय मोकलिती ॥७८॥

जैसें प्राणावांचुनि शरीर । तैसें राउळ दिसे भयंकर ।

सिंहासनीं नाहीं रुक्मिणीवर । कैसा विचार करावा ॥७९॥

पुंडलिकाचें देखोनि प्रेम । पंढरीस आले पुरुषोत्तम ।

तेणेचि आपुला योगक्षेम । चालतसे परम साजिरा ॥१८०॥

ऐशापरी ते विप्रमंडळी । चिंताक्रांत तये वेळीं ।

मग सकळ उठोनि तत्काळीं । चांगया जवळीं पातले ॥८१॥

स्वमुखें पुसती ते समयीं । राउळीं मूर्ति दिसत नाहीं ।

तुम्हीं विचित्र करणी केली कांहीं । हें लवलाहीं सांगावें ॥८२॥

ऐकोनि म्हणे प्रेमळ भक्त । तुम्हीं विधवेसि घातलें वाळित ।

म्हणोनि जेवावया लागीं येथ । रुक्मिणीकांत आले कीं ॥८३॥

ब्राह्मण म्हणतीं प्रमाण कांहीं । आम्हांसी तो येथें दिसत नाहीं ।

एक भक्‍तिभावाविण कांहीं । शेषशायी नाढळे ॥८४॥

चांगयाच्या भक्‍तिभावा पोटीं । तयासि मूर्ति दिसे गोमटी ।

इतर जनांचिये दृष्टीं । तो जगजेठी पडेना ॥८५॥

यासी असत्य म्हणावें जरी । तरी मूर्ति नाहीं राउळांतरीं ।

संदेह पडिला ते अवसरीं । म्हणोनि अंतरीं चिंतावले ॥८६॥

चांगयासि म्हणति धरामर । येथें आला रुक्मिणीवर ।

आम्हां प्रमाण वाटे तर । जरी हें अन्न पुरे सकळांसी ॥८७॥

ऐसी ऐकूनि विप्रवाणी । चांगदेव म्हणती तये क्षणीं ।

तुम्हीं यावें स्नान करोनी । करील पुरवणी विठोबा ॥८८॥

ऐसें बोलतां योगेश्वर । पंक्‍तीं बैसतीं धरामर ।

पात्रें मांडिलीं दोन सहस्त्र । तरी द्विजवर न सरती ॥८९॥

क्षेत्रवासी इतर याती । तेही वाळवंटीं प्रसादासी येती ।

ब्राह्मण चांगदेवासि बोलती । करावी तृप्ती इतुक्यांची ॥१९०॥

शिजलें अन्न सकळांसि पुरे । तरी साचचि आला रुक्मिणीवर ।

विधवेसि जाहला वर पुत्र । व्रतबंध सत्वर करुं याचा ॥९१॥

धरामर बोलतां ऐसें । अवश्य म्हणे केशवदास ।

मातापुत्र वाढितील तुम्हांस । अन्न सर्वांस पुरेल हें ॥९२॥

ऐसें म्हणोनि ते अवसरीं । उदक प्राक्षिलें अन्नावरी ।

मातापुत्रांसि सांगे सत्वरीं । भात पात्रावरी लवंडित जा ॥९३॥

उकरोनि काढितांचि ओदन । पात्र पालथें न करणें ।

पांडुरंगाच्या कृपें करुन । पुरेल अन्न सकळांसी ॥९४॥

ऐसें सांगतांचि सिद्धमूर्ती । माता पुत्र तैसेंच करिती ।

भात वाढितांचि न सरे निश्चितीं । आश्चर्य करिती ब्राह्मण ते ॥९५॥

म्हणती विठ्ठल सुवासिनी हे तत्त्वता । ऐसा अनुभव जाहला चित्तां ।

इच्या हातें करुनि जेवितां । अनुमान सर्वथा न करावा ॥९६॥

भाविक क्षेत्रवासी नर । तयांसि कळतां समाचार ।

प्रसाद घ्यावया साचार । येऊनि पात्रावर बैसती ॥९७॥

म्हणती चांगयाची प्रेमळ भक्‍ती । साक्षात् परब्रह्म पांडुरंग मूर्ती ।

जेवावया आलीसे प्रीतीं । आतां अनुमान चित्तीं कायसा ॥९८॥

ऐसें क्षेत्रवासी नर । बोलोनि बैसती पात्रावर ।

भोक्‍ता पांडुरंग रुक्मिणीवर । संकल्प सत्वर सोडिला ॥९९॥

जें जें जयासि रुचें जैसें । तें तें पात्रीं सिद्धची असे ।

आश्चर्य वाटलें सकळांस । म्हणती धन्य दिवस सुदिन हा ॥२००॥

समुद्र येऊन बैसला रांजणीं । तरी त्रैलोक्यासि पुरे पाणी ।

इंदिरा जाहली घरचारिणी । पदार्थासि वाण नसे कीं ॥१॥

कां भास्करें दिवटीं धरिली हातीं । तरी अंधकार न पडेचि क्षितीं ।

चंद्रमा विंजणा वारीं हातीं । तरी उबारा निश्चिती मग कैंचा ॥२॥

कां दुर्बळाच्या प्रयोजनीं । सार्वभौम आला प्रीतीकरोनी ।

तेथें सर्व साहित्य घडोनी । येतसे होऊनि अनायासें ॥३॥

ज्या क्षेत्रीं बैसला पाकशासन । तेथें पर्जन्यासि नसे वाण ।

कमळोद्भवाच्या यज्ञांत जाण । मंत्र संपूर्ण विधियुक्‍त ॥४॥

तेंवीं चांगदेवाच्या समाराधनीं । निजांगें पावलें कैवल्यदानी ।

तेथें अतृप्त न राहेची कोणी । करिती पुरवणी महासिद्धी ॥५॥

विनोदें ब्राह्मण बोलती वचन । भातलवंडया वाढी ओदन ।

तैं पासूनि उपनाम जाण । त्याजकारणें हेंची म्हणती ॥६॥

अतृप्त जीव ते समयीं । क्षेत्रांत एकही राहिला नाहीं ।

चांगयासी स्तविती सर्वही । धन्य नवायी अगाध ॥७॥

अल्प अन्न वाढितां तेची । तुप्ति जाहली सकळांची ।

आणि स्वयंपाक राहिला तैसाची । पूर्ण विठ्ठलाची कृपा असे ॥८॥

ऐसें बोलोनि धरामर । मंत्र अक्षता देती सत्वर ।

चांगदेवें पुढें वरद पुत्र । करोनि त्याजवर टाकिल्या ॥९॥

विडे दक्षिणा देऊनि जाण । संतुष्ट केले ब्राह्मण ।

मग देउळांत पाहती जाऊन । तों मूर्ति सगुण दिसतसे ॥२१०॥

म्हणे देवाधिदेवा रुक्‍मिणीपती । आजि आम्ही जेविलों तुझें पंक्ती ।

देखोनि विधवेचि सप्रमे भक्ती । गेला श्रीपती ते ठायीं ॥११॥

ऐसें म्हणोनि धरामर । सद्भावें लोटले चरणावर ।

म्हणती चांगा वैष्णव वीर । अद्भुत चरित्र दाखविलें ॥१२॥

दुसरें दिवसीं सकळ मंडळी । येऊनि चांगदेवा जवळीं ।

माघ मासीं तये वेळीं । तिथि नेमिली मुंजीची ॥१३॥

यथा विधीनें साचार । व्रतबंध करिती धरामर ।

उपदेशोनि गायत्री मंत्र । सोहळा थोर पै केला ॥१४॥

चार दिवसपर्यंत जाण । केलें ब्राह्मण संतर्पण ।

दक्षिणा देतां उदार मन । आशीर्वचन ते देती ॥१५॥

देवासि पुसोनि ते अवसरीं । चांगदेव निघाले सत्वरीं ।

वरद पुत्राचिये घरीं । अति सत्वर चालिले ॥१६॥

कल्याण कलबुर्ग्यांत सदन । माता पुत्र दोघे जण ।

चांगदेवासहित जाण । निज प्रीतीनें प्रवेशले ॥१७॥

सोयरे आप्त विषयीं गोत्रज नर । तयांसि सांगीतला समाचार ।

चांगदेवें दीधला वरद पुत्र । मग आश्चर्य थोर ते करिती ॥१८॥

सुहृद इष्टमित्र ऐकोनियां । ते सत्वर येती भेटावया ।

मुलाचीं लक्षणें पाहोनियां । समाधान तयां वाटत ॥१९॥

एक गृहस्थ थोर होता जाण । चांगयासि विनंति केली त्यानें ।

कीं तुमच्या वरदपुत्रा कारणें । कन्यादान करावें ॥२२०॥

ऐसें पुसतां गृहस्थ । चांगदेव अवश्य म्हणत ।

उभयपक्शीं साहित्य । करी धनवंत ते समयीं ॥२१॥

लग्न तिथि नेमूनि जाण । ॐपुण्याह म्हणती ब्राह्मण ।

मंगळ वाद्यांचा ध्वनि गर्जून । पाणिग्रहण पैं केले ॥२२॥

वस्त्रें अलंकार भूषणें । वधूवरांसि केली त्यानें ।

चार दिवस सोहळा संपूर्ण । यथा विधिनें जाहला ॥२३॥

चांगदेव पुसती त्या कारणें । आम्ही द्वारकेसि जातों जाण ।

क्षेत्रवासी लोक संपूर्ण । म्हणती दुर्लभ दर्शन यावरी ॥२४॥

विठोबाची माता जाण । चांगयासि विनवी कर जोडून ।

पुत्रासि पायांवर घालून । काय वरदान मागतसे ॥२५॥

याची वंश परंपरा निश्चित । तुजवीण नसावें कुळदैवत ।

जो अन्यथा करील या वचनांत । तरी दरिद्र तयाते येईल ॥२६॥

ऐसें विनवितां तिज कारणें । योगेश्वर अवश्य म्हणे ।

यांनीं पांडुरंगाविण दैवत आन । त्याचें आराधन न करावें ॥२७॥

त्या विठोबाचे वंशीं निश्चितीं । कार्तिकमासीं पंढरीस येती ।

लंवडोनि ब्राह्मनांसि भात वाढिती । व्रत चालविती वडिलांचें ॥२८॥

असो तयांसि पुसोनि सत्वर । चांगदेव निघे त्या अवसरीं ।

बोळवीत येती नरनारी । सद्गदीत अंतरीं होऊनियां ॥२९॥

मग नमस्कारोनि योगेश्वरा । परतोनि जाती आपुल्या घरां ।

संप्रदायी समुदाय घेऊनि बरा । चांगदेव त्वरा निघालें ॥२३०॥

अहो भक्तलीलामृत ग्रंथ संपूर्ण । हेंचि कोमळ तुळसीचें वन ।

येथें देवाधिदेव रुक्मिणी रमण । निजप्रीतीनें राहिला ॥३१॥

जो अच्युतानंत पुरती मनोरथ । प्रेमळ परिसोत भोविक भक्त ।

सप्तमाध्याय रसाळ हा ॥२३३॥अ० ७॥ओ० ॥२३३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP