एकनाथी भागवत - श्लोक २५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


देहो गुरुर्मम विरक्तिविवेकहेतुर्बिभ्रत्स्म सत्त्वनिधनं सततार्त्युदर्कम् ।

तत्त्वान्यनेन विमृशामि यथा तथापि पारक्यमित्यवसितो विचराम्यसङ्गः ॥२५॥

देहासी जें गुरुत्व जाणा । तें दों प्रकारीं विचक्षणा ।

सांगेन त्याच्या लक्षणा । संरक्षणा परमार्था ॥२५०॥

देहाऐसें वोखटें । पृथ्वीमाजीं नाहीं कोठें ।

देहाऐसें गोमटें । पाहतां न भेटे त्रिलोकीं ॥५१॥

वोखटें म्हणोनि त्यागावें । तैं मोक्षसुखासी नागवावें ।

हो कां गोमटें म्हणोनि भोगावें । तैं अवश्य जावें नरकासी ॥५२॥

तरी हें त्यागावें ना भोगावें । मध्यभागें विभागावें ।

आत्मसाधनीं राखावें । निजस्वभावें हितालागीं ॥५३॥

जैसें भाडियाचें घोंडें । आसक्ति सांडोनि पुढें ।

येणेंवरी नेणें घडे । स्वार्थचाडेलागूनि ॥५४॥

हेतु ठेऊनि परमार्था । गेहीं वस्तीकरू जेवीं उखिता ।

देहआसक्तीची कथा । बुद्धीच्या पंथा येवों नेदी ॥५५॥

देहाची नश्वर गती । नश्वरत्वें उपजे विरती ।

नाशवंताची आसक्ती । मुमुक्षु न करिती सर्वथा ॥५६॥

जेणें उपजे विरक्ती । तो विवेक जाणावा निश्चितीं ।

एवं विवेकवैराग्यप्राप्ती । निजयुक्तीं नरदेहीं ॥५७॥

इतर देहांच्या ठायीं । हा विचारूचि नाहीं ।

केवळ शिश्नोदर पाहीं । व्यवसावो देहीं करिताति ॥५८॥

यालागीं नरदेह निधान । जेणें ब्रह्मसायुज्यीं घडे गमन ।

देव वांच्छिती मनुष्यपण । देवाचें स्तवन नरदेहा ॥५९॥

म्हणसी नरदेह पावन । परी तो अत्यंत निंद्य जाण ।

योनिद्वारें ज्याचें जनन । पाठींच मरण लागलेंसे ॥२६०॥

जंव जन्मलेंचि नाहीं । तंव मरण लागलें पाहीं ।

गर्भाच्याचि ठायीं । मरणघायीं धाकती ॥६१॥

एवं या देहासरिसा । नित्य मृत्यु लागला कैसा ।

पोषूनियां बालवयसा । तारुण्यसरिसा लागला ॥६२॥

विसरोनियां आत्ममरण । तारुण्य चढलें जी दारुण ।

चतुर शाहणा सज्ञान । बळें संपूर्ण मी एकु ॥६३॥

त्या तारुण्याची नवाळी । देंठ न फेडितां काळ गिळी ।

जरा जर्जरित मेळी । मरणकाळीं पातली ॥६४॥

धवलचामरेंसीं आलें जाण । जरा मृत्यूचें प्रस्थान ।

मागूनि यावया आपण । वेळा निरीक्षण करीतसे ॥६५॥

सर्वांगीं कंपायमान । तो आला मृत्युव्यजन ।

मान कांपे तो जाण । डोल्हारा पूर्ण मृत्यूचा ॥६६॥

दांत पाडूनि सपाट । काळें मोकळी केली वाट ।

मृत्युसेनेचा घडघडाट । वेगीं उद्भट रिघावया ॥६७॥

पाठी झाली दुणी । तेचि मृत्यूची निशाणी ।

दोनी कानीं खिळे देउनी । सुबद्ध करूनि बांधिली ॥६८॥

येतिया मृत्यूसी पुढारें । नयनतेज धांवे सामोरें ।

मग न्याहाळतीना अक्षरें । अंजनोपचारें शिणतांही ॥६९॥

उभळीचा उजगरा । उबगु सेजारिल्या घरा ।

म्हणती न मरे हा म्हातारा । बाळाची निद्रा मोडितो ॥२७०॥

देखोनि मृत्यूची धाडी । पायां वळतसे वेंगडी ।

जिव्हेसी चालली बोबडी । तुटल्या नाडी सर्वांगीं ॥७१॥

मरण न येतां जाण । थोर जरेचें विटंबन ।

विमुख होती स्त्रीपुत्रजन । अतिदीन ते करी ॥७२॥

जन्मवरी सायासीं । प्रतिपाळिंले जयांसी ।

तींचि उबगलीं त्यासी । जरेनें देहासी कवळिल्या ॥७३॥

जरा लागलिया पाठीं । कोणी नाइके त्याची गोष्टी ।

विटावों लागलीं धाकुटीं । कुतरीं पाठीं भुंकती ॥७४॥

शाहणीं सांगती अबलांसी । बागुल आला म्हणती वृद्धासी ।

निसुर पडों नेदी ढांसी । कासाविसी होतसे ॥७५॥

'म्हातारा हो' हा आशीर्वाद । दीधला तेहीं केलें द्वंद्व ।

जरे‍एवढें विरुद्ध । आणि द्वंद्व तें नाहीं ॥७६॥

ऐसी जरेची जाचणी । देखोनियां तरुणपणीं ।

हेचि दशा मजलागूनी । हात धरूनि येईल ॥७७॥

देहो तितुका षड्‌विकारी । कोटि अनर्थ एकेके विकारीं ।

षडूर्मी लागल्या त्या भीतरी । जेवीं अग्नीवरी घृतधारा ॥७८॥

या दुःखाचें जें मूळ । तें देहाचें आळवाळ ।

देहो वाढवितां दुःख प्रबळ । उत्तरफळ महादुःख ॥७९॥

एवं देहाची जे संगती । ते निरंतर दुःखप्राप्ती ।

यापरी सांडावी आसक्ती । हेतु विरक्ती देहगुरु ॥२८०॥

या देहाचेनि साधनें । अविनाश पद पावणें ।

याहीपरी येणें गुणें । गुरुत्व म्हणणे देहासी ॥८१॥

देह उपकारी अपकारी । यासी गुरुत्व दोन्हीपरी ।

येथ विवंचूनिं चतुरीं । निजहित करी तो धन्य ॥८२॥

करितां तत्त्वविवंचन । देहाचें मूळ तें अज्ञान ।

निजरूपाचें अदर्शन । तेंचि भान प्रकृतीचें ॥८३॥

प्रकृतीस्तव त्रिगुणसूत्र । त्रिगुणीं त्रिविध अहंकार ।

येथूनि महद्‍भूतविकार । इंद्रियव्यापार देहेंसी ॥८४॥

एवं पिंडब्रह्मांडखटाटोप । हा अवघाचि आरोप ।

दोरु जाहला नाहीं साप । भ्रमें सर्प तो म्हणती ॥८५॥

पाहतां देहाचें मूळ । भासे जैसें मृगजळ ।

भ्रमाची राणीव प्रबळ । हा आरोपचि केवळ वस्तूचे ठायीं ॥८६॥

नसतें देह आभासे जेथें । आरोपु म्हणणें घडे त्यातें ।

आतां सांगेन अपवादाते । सावचित्ते परियेसीं ॥८७॥

देह पांचभौतिक प्रसिद्ध । तो 'मी' म्हणणें हें अबद्ध ।

देहो मलिन मी शुद्ध । अतिविरुद्ध या आम्हां ॥८८॥

पृथ्वी मी नव्हे जडत्वें । जळ मी नव्हे द्रवत्वें ।

तेज मी नव्हें दाहकत्वें । चंचलत्वें नव्हें वायु ॥८९॥

नभ मी नव्हे शून्यत्वें । अहं मी नव्हें दृश्यत्वें ।

जीव नव्हें मी परिच्छिन्नत्वें । माया मिथ्यात्वें मी नव्हें ॥२९०॥

देह नव्हें मी नश्वरत्वें । विषय नव्हे मी बाधकत्वें ।

या तत्त्वां आणि मातें । संबंधू येथें असेना ॥९१॥

'ब्रह्माहमस्मि' अभिमान । हंसपरमहंसांसी मान्य ।

तें सत्त्वावस्थेचें साधन । तोही अभिमान मी नव्हें ॥९२॥

जितुका तत्त्वांचा अनुवादू । तितुका मजवरी 'अपवादू' ।

हा माझा बुद्धीचा बोधू । तुज म्यां यदु सांगितला ॥९३॥

हें माझें गुप्त ज्ञान । तुझें देखोनि अनन्यपण ।

केलें गा निरूपण । भावें संपूर्ण तूं भावार्थी ॥९४॥

येरवीं करावया हे कथा । मज चाड नाहीं सर्वथा ।

परी बोलवीतसे तुझी आस्था । नृपनाथा सभाग्या ॥९५॥

ऐशिया संवादाच्या मेळीं । अद्वैतबोधें पिटिली टाळी ।

दोघे आनंदकल्लोळीं । ब्रह्मसुकाळीं मातले ॥९६॥

ऐसा उपकारी देखा । या देहासारिखा नाहीं सखा ।

म्हणसी राखावा नेटका । तंव तो पारका मुळींचि ॥९७॥

यासी अत्यंत करितां जतन । दिसे विपरीत निदान ।

श्वानशृगालांचें भोजन । कां होय भक्षण अग्नीचें ॥९८॥

या दोंही गतींवेगळें पडे । तरी सुळबुळीत होती किडे ।

चौथी अवस्था यासी न घडे । हें तूंही रोकडें जाणशी ॥९९॥

यालागीं देहाची आसक्ती । मी न धरींच गा नृपती ।

निःसंगु विचरतसें क्षितीं । आत्मस्थितीचेनि बोधें ॥३००॥

देहासी उपभोगसाधनें । तितुकीं जाण पां बंधनें ।

दृढ वासना तेणें । अनिवारपणें वाढते ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP